निवृत्ती जाहीर केल्यापासून सचिन तेंडुलकर अस्वस्थ होता…
त्याची अनेक कारणं.. काही आम्हाला कळली.. काहींचा अंदाज…
दोनशेवी कसोटी, घरचं मैदान.. पहिल्या दिवशी सचिन खेळलाही मस्त.. ३८ धावांवर नाबाद.. दुसऱ्या दिवशी शतक पक्कं.. स्वप्नवत समारोप..
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावं अशी कुणाची इच्छा नसेल?
दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ नोव्हेंबरला मॅच सुरु झाली, सचिन-पुजाराची नाबाद जोडी मैदानात आली..
सचिन जुन्या फॉर्मात होता..
वानखेडे स्टे़डियमवर सचिनची मॅच बघायला सचिनचं कुटुंबिय तर होतंच पण अगदी दिग्गज, मोठमोठी मंडळीसुद्धा आली होती.
त्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधीही थेट छत्तीसगड की दिल्लीतून आले होते, त्यांच्या दिमतीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच असावं लागणार होतं.
जोपर्यंत सचिन खेळतोय तोपर्यंत राहुल गांधी मॅच बघणार हे ओघानं आलंच,
जोपर्यंत राहुल गांधी मॅच बघणार तोपर्यंत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्यासोबत थांबावं लागणार हे ओघानं आलंच.
जोपर्यंत मुख्यमंत्री वानखेडे स्टेडियमवर थांबणार तोपर्यंत काही महत्वाची कामं, काही काळ तरी खोळांबणार हे ही ओघानं आलंच..
अशाच कामांपैकी एक होतं ऊसदराचा प्रश्न, स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांच्या गावात आंदोलनासाठी नेमकी १५ नोव्हेंबर हीच तारीख निवडली होती..
त्यावर काहीच चर्चा शक्य नव्हती, राष्ट्रवादी सोबतची खुन्नस होतीच पण प्लॅन नसताना सकाळी अचानक सगळी काम बाजुला ठेवून मुख्यमंत्र्यांना वानखेडेवर यावं लागलं होतं, कारण राहुल गांधींना सचिनची शेवटची मॅच पाहायची होती…
त्यामुळेच प्रीतीसंगमावर सकाळी सकाळीच शेतकऱ्यांसोबत जमलेल्या राजू शेट्टींना थोडं गुंतवून ठेवा असा निरोप गेला, शेट्टींनीही सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंत काय ते ठरवा असा सज्जड इशारा दिला.
दरम्यान इकडे मैदानात ड्रिंक्स झाला, त्यावेळी १२ व्या आणि १३ व्या खेळाडूंच्या कुजबुजीतून सचिनला या ऊसदर आंदोलनाची कुणकुण लागली…
आपण खेळतोय तोवर राहुल गांधी जाणार नाहीत, राहुल गांधी जाणार नाहीत तोवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही जाता येणार नाही हे सचिननं ताडलं…
आपल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होतंय या विचाराने अस्वस्थ झाला नसता तर तो सचिन कसला…
इतका वेळ चांगला खेळणाऱ्या सचिननं, पहिली संधी मिळताच आपली विकेट फेकायचा निर्णय तिथल्या तिथं घेतला, स्लीपमधे फिल्डर आहे हे त्याला पक्कं माहिती होतं, तरीही भल्याभल्या फास्ट बोलर्सना आरामात स्लीपच्या डोक्यावरुन किंवा पॉईंटावरुन भिरकावणाऱ्या सचिननं एका स्पिनरला अपरकट मारायचा देखावा करत कॅच उडवला, सामीनं तो झेलला, सचिन आऊट. क्षणभर काय होतंय ते कोणालाच कळलं नाही,
शेवटच्या कसोटीत, शतकाच्या उंबरठ्यावर त्याने आपली विकेट फेकली होती…
सचिन माघारी चालू लागला होता..
आता थांबण्यात अर्थ नाही हे राहुल गांधींच्या लक्षात आलं. कॅमेरा येवून गेल्यावर राहुल गांधी शांतपणे जागेवरुन उठले, ते उठले तसे मुख्यमंत्र्यांनाही उठता आले,
थोड्याच वेळात राहुलचं लक्ष नाहीय हे पाहुन फोन, निरोप वगैरे घेता आले, त्यातलाच एक कराडमधे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचाही विषय होताच.
मुख्यमंत्र्यांनी लगोलग सांगावा धाडला, लवकरच चर्चा करतोय आंदोलन मागे घ्या. निरोप प्रीतीसंगमावर पोचला, राजू शेट्टींनीही २४ तारखेपर्यंत आंदोलन पुढं ढकलल्याची घोषणा केली. पुढं जे होईल ते होईल. तोवर विश्वनाथन आनंदच्या जागतिक बुद्धीबळ लढतीतल्या मॅचेसही संपलेल्या असतील का? एखादा मोठ्या स्टारचा मोठा पिक्चर तर रिलीज होत नाहीय ना? देशात आणखी कुठला मोठा इव्हेंट तर नाही ना? मीडिया ऊस दर आंदोलनाकडे लक्ष देण्याचे चान्सेस वाढतील ना? याची खातरजमा आणि आखणी सुरु झाली.
सत्ताधाऱ्यांची चलाखी तर होतीच पण गेल्यावर्षी बाळासाहेबांमुळेही राजू शेट्टींचं ऊसदर आंदोलन तसं म्हणायला गेलं तर फसलंच..
यंदाही सचिनमुळे तीच वेळ आली होती पण स्वत: दस्तुरखुद्द सचिनने अतिशय शिताफीनं तो बाका प्रसंग टाळला.
सचिनचा स्वभाव बघता हे सगळं तो जाहिरपणे मान्य करणार नाही आणि इतिहासालाही कळणार नाही हे आम्हालाही माहिती आहे. पण ऊस आंदोलनाची तारीख जाहीर झाल्यापासूनच सचिन अस्वस्थ होता असं आम्हाला स्वत: अंजलीनं सांगितलं होतं ( ता.क. -अंजली काय फक्त सचिनच्या बायकोचं नाव नाहीये)
दरम्यान राहुल गांधीमुळेच सचिन बाद झाला अशी टिका मोदीप्रेमी करत असताना आणि तसे जोक्स सोशल मीडीयावर फिरत असतानाच, स्वत: राहुल गांधीनी ही बाब मान्य करत अनेकांना मोठा धक्का दिला. सचिनला लवकर बाद करुन राहुलला मुख्यमंत्र्यांचं लक्ष शेतकरी आंदोलनाकडे वळवायचं होतं असा दावा मनिष तिवारींनी केलाय. त्यावरुन राहुल गांधी हेच शेतकऱ्यांचे कैवारी आहेत अशी प्रतिक्रिया दिग्विजय सिंगांनी दिलीय. त्यानंतर भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आणि मोदी घरीच मोठ्या थ्री डी पडद्यावर मॅच बघत होते त्यामुळेच सचिन बाद झाला असं सांगितलं जातंय. मोदी मुंबईत आले असते तर सचिन कालच बाद झाला असता, त्यामुळे मोदीच खरे शेतकरी मित्र असं भाजप सांगतंय. दोन्ही गट एकमेकांवर आणि जनता दोघांवर विश्वास ठेवायला तयार नाहीय असंही कळतं.
हे असं राजकारण चालू होतं, सोबत सगळा देश सचिन सेलिब्रेट करण्यात दंग होता, पण या सगळ्या गदारोळात आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सचिननं केवढी मोठी कुर्बानी दिली याची कल्पना कोणालाही नव्हती. यामुळेच तर सचिन मोठा आहे,
निवृत्तीनंतर सचिन शेतीतच उतरणार आहे अशीही बातमी आतल्या गोटातून कळलीय…
भारत रत्न द्या किंवा नका देऊ, आधी त्याला शेतीमित्र किंवा कृषी रत्न द्या अशी मागणी जोर धरु लागली असल्याचं कळतंय.
सचिनच आहे शेतकऱ्यांचा खरा मित्र :-)
(अगा जे घडलेची नाही)
प्रतिक्रिया
16 Nov 2013 - 3:47 pm | Tushar Bhambare
म्हणजे तो पानोती राहुल कोणाच्यातरी कामात आला… *lol*
16 Nov 2013 - 4:26 pm | शिद
सचिन तेंडुलकरला 'भारतरत्न' जाहीर
16 Nov 2013 - 6:02 pm | शिद
काँग्रेस सरकारने २०१४ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतलेला दिसतोय.
16 Nov 2013 - 5:07 pm | जेपी
****
16 Nov 2013 - 5:15 pm | चेतनकुलकर्णी_85
शेवटी राजीव शुक्ला यांची "फिल्डिंग " फळाला आली !
हॉकी पटू ध्यानचंद यांचे काय झाले?
16 Nov 2013 - 5:39 pm | अत्रुप्त आत्मा
=))
16 Nov 2013 - 5:49 pm | जेपी
आता जाणार बहुतेक काँग्रेस प्रचाराला ?
=))
16 Nov 2013 - 6:00 pm | चेतनकुलकर्णी_85
+१
16 Nov 2013 - 6:14 pm | विद्युत् बालक
शेतकऱ्याचा खरा मित्र साप किंवा गांडूळ असे शाळेत वाचले होते .सचिन पण झाला हे कळून गम्मत वाटली .
सोनियाने भर सभेत " हमने सचिन को भारत रत्न दिया " असे म्हणाली नाही म्हणजे नशीब !
१-२ दिवसांपूर्वी पप्पूने सचिन माझा चांगला मित्र आहे असे म्हटले होते म्हणजे सच्या पण आता कॉंग्रेस साठी खेळणार बहुतेक
16 Nov 2013 - 9:49 pm | मुक्त विहारि
+ १
17 Nov 2013 - 10:09 am | चौकटराजा
समजा सचिनला २०१४ ची निवडणूक समोर ठेवून भारतरत्न चा निर्णय असेल तर त्याचा काहीही उपयोग राजकारण बदलण्यसाठी होणार नाही. ज्याची राजकारणाची समज प्रगल्भ आहे अशाच सेलेब्रिटीचा झालाच तर उपयोग होतो.सचिन चे सारे आयुष्य नेट, पिच, जाहिरात यांच्या भोवती गेले आहे. तो पेपर ही वाचत नाही असे त्यानेच म्हटले आहे.
20 Nov 2013 - 10:28 am | सौंदाळा
खुसखुशीत लेख.
(सचिनची शेवटची खेळी प्रत्यक्ष मैदानावर बघण्याचा आनंद लुटलेला) सौंदाळा