डिस्क्लेमर सुरु:
(शीर्षकाबद्दल कोणाला काही आक्षेप असलाच तर अॅडव्हान्समध्ये माफी मागतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही)
(चू भू द्या घ्या. ह घ्या.)
डिस्क्लेमर समाप्त
प्रवेश 1 ला
(स्टेजवर एक माणूस एका प्लॅस्टिकच्या खुर्चीत बसला आहे. मध्येच तो खिशातून एक मोबाईल काढून त्यात बघतो, त्याच्यावर स्वत:ची बोटं आदळतो, मग वरती धरतो, खाली धरतो. पण एवढं करून त्याचं समाधान झालेलं दिसत नाही. मग तो मोबाईल गदागदा हलवून बघतो. त्या यंत्राकडून त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होते. तेवढ्यात एक मोलकरीण स्टेजवर येते, आणि झाडू मारायला सुरुवात करते. त्याबरोबर लगेच तो माणूस स्वत:चे पाय वर घेतो, आणि खुर्चीवरच मांडी घालून बसतो. ती बाई झाडू मारून निघून जाते.)
विष्णू : नमस्कार, मी विष्णू. आणि हे माझं वैकुंठ(अख्ख्या स्टेजवरून नजर फिरवतो.)! मी विष्णू म्हणजे माझं नुसतं नाव विष्णू नसून मी खरोखरच खऱ्याखुऱ्या वैकुंठातील खराखुरा विष्णू आहे आणि हेच ते खरंखुरं वैकुंठ आहे. यावर तुमचा विश्वास बसणं जरा कठीणच आहे, हे मी मान्य करतो. माझ्या एकूण अवताराकडे (विष्णूने खिसेवाला बुशशर्ट आणि लुंगी नेसली आहे) आणि या मोबाईलकडे बघून तर तुम्ही म्हणाल, की हा विष्णू असणं शक्यच नाही. पण खरंच मी विष्णू आहे हो! काय आहे, इथे वैकुंठात मोबाईलला धड रेंजच येत नाही. कधीपासून त्या नारदाचा फोन ट्राय करतोय, पण रेंज नीट नसल्याने जर बाहेरच्या सिक्युरिटी गार्डाला सुद्धा कॉल करता येत नाहीये मला, तर मग तिथे भूलोकात उनाडक्या करत चकाट्या पिटणाऱ्या त्या नारदाला माझा कॉल कुठून बरं लागायचा! असो. नारदाला कॉल करून ‘येऊ नकोस आज, जरा बिझी आहे’ असं सांगायचं होतं मला. बरं एसएमएस करीन म्हणतो, तर तिथे भूलोकात कुठेतरी दंगलीच्या अफवा कोणीतरी पसरवतंय म्हणून दिवसातून 5 पेक्षा जास्त एसएमएस मला पाठवता येत नाहीत. आणि आजच्या दिवसाचे 5 एसएमएस आमच्या हिने तिच्या सख्यांना पाठवण्यासाठी वापरून टाकले, कारण तिचे स्वत:च्या मोबाईल वरचे एसएमएसही वापरून झालेत. म्हणून तिने माझेही संपवले. असो. मुद्दा काय, तर नारदाला कटवायचंय. अहो हा नारद कधीही अवेळी घरी येऊन टपकतो हो. त्यामुळे आमची ही पिसाळते. मग तिला साडी घेऊन द्यावी लागते. कारण त्याशिवाय मग तिचा राग शांत होत नाही, आणि जोवर तिचा राग शांत होत नाही, तोवर तिथे भूलोकात सेन्सेक्स वाढत नाही. आणि मग ते सगळे व्यापारी सत्यनारायणासारखे उपद्व्याप करून आम्हांला उगाच त्रास देत बसतात.
(तेवढ्यात झाडूवाली बाई पुन्हा येते.)
बाई : देवा, मी चाल्लेय... बाईसाहेबास्नी सांगा की मी सगळी झाडलोट करुन गेले म्हणून... आणि देवा, नारदमुनी आल्येत. जय विजयशी हुज्जत घालतायत... मी जाते... त्यांना पाठवू?
विष्णू : अरे देवा! आज लवकर आली स्वारी वाटतं. बरं, द्या पाठवून. (नारदमुनी प्रवेश करतात. त्यांच्याकडे बघून ते नारद आहेत, असं फक्त त्यांच्या कपाळावरील गंधामुळे वाटतं. विष्णू चेष्ठेच्या सुरात) काय हो नारदमुनी, तुमची वेशभूषा एवढी का हो बदलली?
नारद : गोवा नामक एक अतिशय रमणीय ठिकाण आहे भूलोकी देवा! तेथील अप्सरा या स्वर्गातील अप्सरांनाही लाजवतील, हो. लॉर्ड विष्णू, लॉर्ड विष्णू.
विष्णू : अहो आणि तुमच्या चिपळ्या आणि वीणा? त्यांचं काय झालं?
नारद : काय सांगू लॉर्ड विष्णू, अहो तुमच्या जय-विजयनी त्या सिक्युरिटीच्या नावाखाली कॉन्फिस्केट केल्या आहेत हो.
विष्णू : चालायचंच, सॉरी हं. नंतर देववतो मी तुम्हाला तुमच्या निघायच्या वेळी. बरं पण तुमच्या हातातल्या फुलांच्या माळा? त्या कुठे गेल्या? की त्यासुद्धा कॉन्फिस्केट झाल्या?
नारद : नाही हो, लॉर्ड विष्णू. तिथे भूलोकी मी एकदा असाच फुलांच्या माळा हातात घालून फिरत होतो, तेव्हा एका हवालदाराने माझ्या बसण्याच्या जागेवर त्याच्या छडीने विनाकारण आघात केले हो. तेव्हापासून त्या माळांचा आणि त्यांच्या सुवासाचा विरह सहन करतोय. फुलांच्या माळांचा नुसता उल्लेख जरी झाला तरी छड्या खाऊन फुललेल्या माझ्या पार्श्वभागाची आठवण होते. लॉर्ड विष्णू लॉर्ड विष्णू.
विष्णू : आणि तुमची केशभूषासुद्धा बदललेली दिसत्येय मला. आणि ही तुमच्या केसांना एवढी झळाळी कशी हो? आमच्या हिच्यासारखे ते गार्निअर कलर नॅचरल्स लावता की काय तुम्ही?
नारद : छे हो. मी कोळसा लावतो हल्ली.
विष्णू : कोळसा? केसांना कोळसा?
नारद : हो. फुकट मिळतो आजकाल!! मनमोहन वाटतोय सगळ्यांना. लॉर्ड विष्णू लॉर्ड विष्णू.
विष्णू : हे काय लावलंय मघापासून लॉर्ड विष्णू लॉर्ड विष्णू?
नारद : हेहे. म्हटलं जरा मॉडर्न पद्धतीने जप करून पाहावं. पण आपणांस हे रुचत नसेल तर मी माझ्या ओल्ड ट्रॅक वर येतो.
विष्णू : अरे, माझ्या बायकोने घेतलं नसेल, एवढं नाव घेतोस तू माझं. आजकाल आमच्या हिला एक वेड लागलंय. भूलोकीवरच्या नवनवीन मालिका बघते, आणि मग स्वत: त्यांच्यासारखी वागायला जाते. परवा मला म्हणत होती, मला सासू हवी म्हणून. आता मी कूठून आणायची सासू?
नारद : नारायण, नारायण.
विष्णू : इतकंच नाही, सगळ्या देवींना एकत्र आणून हळदीकुंकू चा बेत केला हिने मागल्या महिन्यात.
नारद : नारायण, नारायण. पण तुमचे नेहमीचे आसन कुठे गेले?
विष्णू : (आठवण येताच डोक्याला हात लाऊन) तो आणखी एक नग आहे!
नारद : अहं, नारायणा, नग नाही, नाग आहे तो, शेषनाग. कुठे आहे कुठे तो?
विष्णू : त्याच्या शेपटीतून कापूस बाहेर येतोय म्हणून शिवायला दिलाय. म्हातारा झालाय रे. हल्ली झेपत नाही त्याला.
नारद : आणि आपण का बरं असे लुंगी नेसून बसला आहात?
विष्णू : काय करणार महाराजा... लक्ष्मीपती आहोत ना आम्ही... तिथे भारतात अर्थमंत्री बदलला की माझा पोशाखही बदलतो. असो. बस रे तू असा उभा का राहतोस? आणि किती वेळ उभा राहणार?? बस... (नारद दुसऱ्या एका प्लास्टिकच्या खुर्चीत बसतो) चहा घेणार?
नारद : काय??
विष्णू : चहा चहा!!
नारद : नारायणा, तुम्ही चक्क अपेयपान करु लागलात?? काय हे? नारायण, नारायण.
विष्णू : अपेयपान?? त्यात कसलं आलंय अपेयपान??
नारद : नारायणा, अमृत प्यायचं सोडून तुम्ही चहा कसले पिताय??
विष्णू : काय करणार बाबा!! तिकडे स्वर्गात अमृताचे भाव वाढलेत त्यामुळे त्यांनी त्याच्या निर्यातीवर बंदी आणलीय. सगळे म्हणतायत इंद्राच्या साठाव्या अप्सरेनेच साठेबाजी करून ठेवलीये म्हणून... खरं खोटं कुणास ठाऊक!!
नारद : अमृत करताना त्यात कांदा घालतात का हो?
विष्णू : मी पाहायला गेलो नव्हतो हा कधी त्या फॅक्टरीत. इथला अमृताचा स्टॉक संपल्याला दोन आठवडे झाले. जाम पंचाईत झाली होती. सकाळी अर्धा कप अमृत ढोसल्याशिवाय प्रेशरच यायचं नाही.
नारद : अहो नारायणा तुम्हाला कशाला येईल प्रेशर?? तुम्ही तर देव आहात तुमच्या शरीरात उत्सर्जनीय असे घटक निर्माण होतातच कसे?
विष्णू : अरे बाबा गणपतीएवढी इम्युनिटी नाही रे माझी. त्याचंसुद्धा पीओपीचे मोदक जरा जास्त झाल्याने पोट बिघडल्याचं ऐकलं होतं. त्याची अशी दशा मग माझी काय हालत होत असेल विचार कर... शेवटी चहावर भागवावं लागलं. आणि हल्ली इम्युनिटी वाढवणारे चहा येतायत मार्केटमध्ये. हा जो पितो तो चहाचा ब्रँड गणपतीनंच रेकमेंड केला.
नारद : नारायण, नारायण. देवा काय ही दुर्दशा करून घेतलीयत स्वत:ची... आणि देवा, एक विचारू? वाईट नका मानू... पण आता घराचं रिन्युएशन करावंसं नाही का हो वाटत तुम्हांला? किती जुनाट आणि ओल्ड फॅशन्ड दिसतंय सगळं.
विष्णू : रिन्युएशन? वैकुठाचं? इकडे वैकुंठ हातचं जायची वेळ आलीये तू रिन्युएशनच्या कसल्या गोष्टी करतोस रे??
नारद : म्हणजे?? तुमचं वैकुंठ तुमच्यापासून कोण हिरावून घेऊ पाहतंय? आणि तो सफल तरी कसा होईल?
विष्णू : कोणास ठाऊक कोणी चहाडी करून प्रकरण उकरून काढलंय ते. माझ्या मते चंद्रगुप्तच असावा. जाम खार खातो माझ्यावर. यमाच्या डिपार्टमेंटमधून बदलीचा अर्ज फेटाळला ना मी त्याचा. अरे आज एवढी युगं मी इथे काढली, आणि आता हे लोक मला म्हणतात की वैकुंठाचं 60% बांधकाम बेकायदेशीर आहे म्हणून.. इहलोकीचे कायदे वाकवून झालंय म्हणे.
नारद : कोण लोक??
विष्णू : हे हे सगळे स्वर्गातले कारकून. आणि कहर म्हणजे ब्रह्म्याही त्यांच्या बाजुने बोलतोय. मला कायदे दाखवतो. आणि त्याला फूस त्या सरस्वतीशी. तिचं आमच्या हिच्याशी पटत नाही, त्यामुळे हिच्यावर कुरघोडी करण्याचा एकही चान्स ती सोडणार नाही. म्हणे तुमच्याकडे काय ते ओसी-बीसी नाही का सीसी नाही. अरे माझ्याच बेंबीतून निघालास आणि माझ्यावरच उलटतोस? शरम नाही वाटत? बरं याला मीच म्हटलं, की ब्रह्म्या, हल्ली विभक्त कुटुंब पद्धतीचा ट्रेंड आहे, तेव्हा तू वेगळ्या घरात राहा. उगाच सिरिअलींत दाखवतात तो फॅमिली ड्रामा वैकुंठात नको. इंद्राला गळ घालून खोटी प्रतिज्ञापत्रं लिहून मी याच्यासाठी एक नवं कोरं चांगलं घर घेऊन दिलं आणि हा असे पांग फेडतो माझे.
नारद : जाऊ द्या हो नारायणा, आपलंच मूल आहे सोडून द्या. मी काय म्हणतो, शंकर भगवानांकडून काही प्रेशर पाडता आलं तर बघा ना! त्यांचा वट सॉलेड आहे. त्यांनी वटहुकूम दिला की ब्रह्म्याचं कोण ऐकतोय.
विष्णू : अरे तो त्या पार्वतीमुळे आजारी पडलाय. बिचा-याचं वय झालं आता, पूर्वीसारखी आकांड-तांडव झेपत नाहीत त्याला. तिकडे टीव्हीवर ते देवों का देव महादेव अशी काहीतरी सिरिअल निघाली आणि इकडे पार्वतीवहिनीचं डोकं फिरलं. सगळ्या देव्या तिला हळदीकूंकूत म्हणाल्या की सिरिअलमधला महादेव ख-या महादेवापेक्षा जास्त हँडसम आणि माचो आहे म्हणून. झालं. घरी गेल्यावर ती हट्ट धरून बसली शंक-याकडे. आधी याच पार्वती वहिनीच्या हट्टापायी बिचा-या शंक-याने आपली हेअर स्टाईल बदलून पार गझनी केला होता. वल्कलांचा त्याग करून शर्ट पँट घालायला लागला होता, हातावर हिब्रूत ‘पार्वती’ असंही टॅटू करून घेतलं होतं.
नारद : हिब्रूत का?
विष्णू : मधे क्रेझ आली होती. प्रत्येक जण स्वत:च्या पार्टनरचं नाव कोणत्यातरी न कळणा-या भाषेत अंगावर गोंदवून घेत सुटला होता. मी बचावलो. असो. तर आता ही पार्वती वहिनी त्याला म्हणते की तुम्ही पुन्हा जटा वाढवायला हव्यात, पुन्हा वल्कलं घालायला हवीत. अगदी त्या सिरिअलमधल्या महादेवासारखी. बिचारा गपचूप जुन्या अवतारात आला. त्याला एक जबरदस्त अँटिवेनम देऊन त्याच्या गळ्यात अडकलेलं सगळं विषसुद्धा कध्धीच काढून टाकलंय. तरी स्कार्फ सारखं नागाला गळ्यात बांधून फिरतो बिचारा, बायकोचा हट्ट काय करणार बाबा!!
नारद : हे सगळ तुम्हाला कधी कळलं?
विष्णू : परवा बसलो होतो रे! तेव्हा सांगितलं. मग तीन पत्ती खेळलो. शकुनीला तेवढ्यासाठी नरकातून जामीन मिळवून देऊन आणला होता.
नारद : तीन पत्ती?? देवा मला नाही का बोलवायचं मग?
विष्णू : तुला?? तुझी आधीच एवढी वर्षांची उधारी बाकी आहे. प्रत्येक देवाकडून काहीना काही तरी उधार घेऊन ठेवलंयस एक हफ्ता तरी फेडलास का त्यातला?
नारद : (मान खाली घालून)नाही.
विष्णू : ते सोड. वैकुंठाचं काय करू ते सांग. तुला काही सुचतंय?
नारद : (जरा विचार करून) तुम्ही कार्तिकेयजींना का नाही विचारत? ते आता कैलास पार्टीचे वाईस प्रेसिडेंट झाल्येत. त्यांच्या हातात हल्ली बरीच पावर आहे. गेल्या महिन्यातला महादेवांनी काढलेला अप्सरा नृत्याच्या बाबतीतला वटहुकूम त्यांनी कार्तिकेयजींच्या सांगण्यावरून मागे घेतला.
विष्णू : अरे हो खरंच की. चल आपण त्याच्याकडेच जाऊया. नारदा, मी काय म्हणतो, मार्केटमध्ये सध्या चांगला गरूड कोणता आहे रे? मला मायलेजवाला पाहिजे.
(दोघेही बोलत बोलत विंगेबाहेर जातात. ब्लॅकआऊट होतो.)
प्रवेश 1 ला समाप्त
क्रमश:
प्रतिक्रिया
16 Nov 2013 - 1:51 am | बॅटमॅन
=)) =)) =))
मजा आली वाचायला. :)
16 Nov 2013 - 2:43 am | रामपुरी
=)) =))
मस्त...
फक्त ते चंद्रगुप्तचं चित्रगुप्त करा. उगीच मधेच "चाणक्य" मधे घुसल्यासारखं वाटतय...
16 Nov 2013 - 3:09 pm | वडापाव
अर्रर्रर्रर्र... चुकून चंद्रगुप्त टंकलं...
16 Nov 2013 - 2:44 am | अगोचर
:) =))
एकदम जोरदार ..
आणि त्यातुन क्रमशः ... म्हणजे सोन्याहुन पिवळं ... (की) सोन्याची अंडी देणारी कोंबडी ..
लिहीत रहा .. हा दुवा अनेक अमिपाकरांना पाठवला आहे ..
16 Nov 2013 - 2:49 am | जेनी...
लय भारी वडपाव काका
मज्जा ली :D
16 Nov 2013 - 3:00 am | प्यारे१
अहो काय हे ?
पार सगळ्यांचंच 'रंगकाम' काढलंय की तुम्ही! :)
16 Nov 2013 - 3:00 pm | शिद
झकास...एखादे विनोदी नाटक पाहतोय असे वाटले.
16 Nov 2013 - 3:28 pm | यसवायजी
येक लंबर..
16 Nov 2013 - 3:52 pm | म्हैस
शीर्षका सकट सगळा लेख एकदम टुकार आणि थिल्लर ..... असल्या विनोदी लिखाणांसाठी तुम्हाला दुसरा काही मिळालं नाही का? कि हिंदू देव धर्माला नाव ठेवल्याशिवाय जेवण जात नाही ?
16 Nov 2013 - 3:57 pm | बॅटमॅन
हिंदू धर्मातील एका महत्त्वाच्या दैवताला तुम्ही नावे ठेवलेली चालतात आणि वर इतरांच्या नावाने गळा काढायला लाज वाटत नाही का?
16 Nov 2013 - 4:09 pm | वडापाव
हिंदू देव धर्माला नावं ठेवण्याचा अजिबात हेतू नव्ह्ता. केवळ एक विनोदनिर्मितीचा केविलवाणा प्रयत्न केला. तुमच्या किंवा कोणाच्याच भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता, नाही. तरीही क्षमा मागतो.
16 Nov 2013 - 4:00 pm | बाबा पाटील
दशावतारींची आठवण झाली बघा...
16 Nov 2013 - 5:21 pm | अत्रुप्त आत्मा
@नारद : नाही हो, लॉर्ड विष्णू. तिथे भूलोकी मी एकदा असाच फुलांच्या माळा हातात घालून फिरत होतो, तेव्हा एका हवालदाराने माझ्या बसण्याच्या जागेवर त्याच्या छडीने विनाकारण आघात केले हो. >>>
....................................................................................................................
@फुलांच्या माळांचा नुसता उल्लेख जरी झाला तरी छड्या खाऊन फुललेल्या माझ्या पार्श्वभागाची आठवण होते. >>>
@याच पार्वती वहिनीच्या हट्टापायी बिचा-या शंक-याने आपली हेअर स्टाईल बदलून पार गझनी
केला होता. वल्कलांचा त्याग करून शर्ट पँट घालायला लागला होता, हातावर हिब्रूत ‘पार्वती’ असंही टॅटू करून घेतलं होतं.>>>
@शकुनीला तेवढ्यासाठी नरकातून जामीन मिळवून देऊन आणला होता.>>>
@(दोघेही बोलत बोलत विंगेबाहेर जातात. ब्लॅकआऊट होतो.)
प्रवेश 1 ला समाप्त>>> पुढच्या(सर्व)भागांची वाट बघतो आहे...
अतिशय मार्मिक आणी मनोरंजक! मस्त.. मस्त..एकदम!
16 Nov 2013 - 5:34 pm | स्पंदना
ह.ह.पु.वा.
16 Nov 2013 - 6:35 pm | भाग्यश्री कुलकर्णी
एक नंबर
लई मजा आली बगा वाचायले.
16 Nov 2013 - 9:45 pm | मुक्त विहारि
पुभाप्र...
17 Nov 2013 - 7:54 am | अमेय६३७७
मस्तच. काही पंचेस अगदी सॉलीड.
17 Nov 2013 - 12:08 pm | जेपी
व्वा व्वा
17 Nov 2013 - 2:18 pm | अनुप ढेरे
:ड
आवडलं !!
18 Nov 2013 - 11:45 am | विटेकर
पंचेस सॉलीड आहेत .
मस्त च ! काही ठिकाणी ओढून ताणून वाटतेय पण एकूण दर्जा चांगला आहे.
18 Nov 2013 - 12:10 pm | मृत्युन्जय
खंग्री जमलय एकदम
20 Nov 2013 - 11:57 am | म्हैस
@
ते आधी हिंदू दैवत आहे हे पटवून द्या . नसलेली अक्कल पाजळू नका