दिंड्या, पताका..

यशोधरा's picture
यशोधरा in जनातलं, मनातलं
12 Jul 2013 - 12:01 pm

आमच्याकडे पालखीचा काही खास नेम नाही, कोणतीही दिंडी येत नाही, पालखी, वारकरी, माळकरी कोणासाठीच आम्ही काही करत नाही. वेळ कोणाला हो? आम्ही लय बिझी माणसं बघा. मध्यमवर्गीय आम्ही. आमच्या नोकर्‍या, शिक्षणं, रोजच्या आयुष्यातले लहान मोठे प्रश्न.. काय कमी व्याप आहेत आमच्या मागे? ते सोडवायलाच आयुष्य पुरत नाही हो आम्हांला, कुठे पालखीच्या फंदात पडतोय ! आम्ही भले, आमची टिचभर वितीची आयुष्यं भली, त्यातले प्रश्न भले आणि उत्तरं, आणखीनच भले, भले! असो, असो.

खरं सांगायचं तर ही पालखीच आम्हांला सोडत नाही बघा! काय सांगायचं...

अगदी लहानपणापासून हो. वाडवडिलांची पुण्याई म्हणावी का, घरावरुनच पालख्या जातात, तुकामाऊली म्हणू नका, ज्ञानोबामाऊली म्हणू नका, इतर लहान मोठ्या पालख्या म्हणू नका.. आठवतं आहे तेंव्हापासून जातात.
वारी आणि पालखी अगदी माझ्या लहानपणापासून आयुष्याचा एक भाग व्यापून आहेत. वारी ह्या शब्दाशी निगडीत अश्या काही व्यक्तींच्या आठवणी आहेत. लहानपणी आमच्या इथे एक मावशी यायच्या भाजी विकायला आणि वर्षाची वारी करायच्या. आज्जीचं आणि त्यांचं गूळ्पीठ. आजी मग त्यांना विठठलासाठी काहीबाही द्यायची, त्याही नेऊन पोचवायच्या, येताना बुक्का आणायच्या, थोड्या तुळशी, चुरमुर्‍याचा प्रसाद, एखादा चिकचिकलेला राजगिर्‍याचा लाडू. एकदा विठोबा- रखुमाईची पितळी छोटी मूर्त आणली. अगदी युगे अठ्ठावीस करत विठाई आजतागायत देव्हार्‍यात विराजमान आहेत. आमचे सकाम आणि क्वचित निष्काम नमस्कारसुद्धा आवर्जून आपेलेसे करुन घेतात.. त्यांना सवय आहे. तर अशी ह्स्ते परहस्ते वारी करायची आजीची पद्धत. अजून एक दूरच्या नात्यातल्या आजी वारी करायच्या, त्यांच्या मंडळासोबत, त्या वारीच्या दिवशी आल्या, की त्यांच्या पाया पडून त्यांच्या वारीच्या पुण्यसंचयावर आम्ही लहान मोठे डल्ला मारायचो आधीच. शांत मूर्ती, प्रेमळ चेहरा, मृदू बोलणं. वारी म्हटलं की त्यासोबत हे सारं आठवतं.

अजूनही आठवतं म्हणजे आजी आजोबांबरोबर घेतलेलं वारीचं दर्शन, ते उभे असेतोवर. कपाळावर लावून घेतलेलं गंध, टिळे, बुक्के. घरात तेह्वा वडिलधार्‍यांचे असलेले आणि श्रद्धापूर्व़क केले जाणारे उपवास. आता समजतं की शरीराने वारी चालू शकले नाहीत, तरी त्यांनी मन:पूर्वक वारी अनुभवली. रस्त्यावर आजी आजोबांसकट उभं रहायचं, दोघेही वारीची वाट पहात. जाणार्‍या वारकर्‍यांना नमस्कार करत. आम्ही चिल्ली पिल्ली बाजूलाच हुंदाङपणा करत. वेळ निघून जाई. बराच वेळ टाळ, मृदुंग, टाळ्या, माऊलीचे जयघोष कानी पडत. लोक शांतपणे उभे असत. पावसाची एखादी नाजूक भुरभुर सर येई, की आम्ही अधिकच हुंदाडगंपूपणा सुरु करत असू. आज्जीची आम्हांला आवरता त्रेधातिरपीट उडे. अचानक वातावरण जिवंत होई आणि आली, आली म्हणेपरेंत एकेक पालखी येऊन झपाटृयाने निघूनही जाई. त्यातच लोकांमध्ये प्रसाद म्हणून फुलांच्या पाकळ्या,तुळशी, प्रसाद वगैरे वाटले जात. आजोबा पालख्यांच्या गर्दीमध्ये घुसून दर्शन घेत, आज्जी लांबूनच हात जोडी. आम्ही आपले प्रसादाचे धनी होण्यात समाधानी! अवघा आनंदकल्लोळ असे! काळा बुक्का आणि गंध लावलेला आजोबांचा चेहरा आणि नमस्कार करुन पालखीचं दर्शन घेतल्याने तृप्त समाधानी असा आज्जीचा चेहरा अजून डोळ्यांसमोरुन हलत नाही. आजही पालखीच्या अनाम गर्दीचा चेहरा ह्या दोन चेहर्‍यांना आठवून खूप ओळखीचा बनून जातो.

आणखी म्हणजे त्यादिवशी रस्ता वाहतुकीला बंद असायचा, आजही असतो, सकाळपासूनच अगदी तुरळक वाहतूक असते, बरं वाटतं खरं सांगायचं तर. रोजच्या वाहतूकीचा अव्याहत वाहणारा गदारोळ लईच काव आणतो जिवाला रोज. तेह्वापण असायचा. मात्र आताच्याइतकी वाहतूक नसायची म्हणा. कधी नव्हे ते सकाळची उन्हं रस्त्यावर पडलेली दिसतात, पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात... दिवस शांतपणे उजाडल्यासारखा वाटतो. आम्हांला तर शाळेला सुट्टी पण असायची, खरी मज्जा हीच बरं, वारीच्या दर्शनाच्या निमित्ताने अभ्यासाला रीतसर दांडी. काय दिवस होते..

वयपरत्वे पुढे दोघांचं हे वारी दर्शन बंद झालं. आम्ही गर्दीत घुसून दर्शन घ्यायला शिकलो. माऊलीच्या पादुकांना हात लावून दर्शन घ्यायला मिळालं की एकदम विजय मिळवल्यासारखा वाटायचा! सोसायटीमधलीधली मुलं, आमच्यावर लक्ष ठेवायला म्हणून तरुण दादा, काका पब्लिक वगैरे आम्ही एकत्र मिळून वारीमध्ये जरासं चार पावलं टाकायचो, अगदी फुगड्या वगैरे खेळल्याचंही आठवतय. बाबा, काका आणि आई, काक्या वगैरे तत्सम पब्लिक घरापाशीच उभं असायचं. पालखी आली की आमच्यासोबत दर्शनाला यायचं. पालखी पूर्वीसारखीच, अंगाखांद्यावर गर्दी खेळवत टाळ चिपळ्या म्रूदुंगांच्या तालावर नाचत, अलगद निघून जायची... काही क्षणांसाठीचा पाहिलेला सोहोळा दर वेळी पुढल्या वर्षीपरेंत पुरत गेला. चक सुरुच राहिलेलं आहे.

पुढे काही वर्षं नोकरी धंद्या निमतानं वारी जराशी दुरावली. आठवण येत राहिली.

आणि मग आता पुन्हा एकदा गेली काही ३-४ वर्षं वारीच्या दर्शनाचा लाभ होतो आहे. खूप बदलही जाणवतात. ह्या वेळी आमच्या इथे टीव्ही व्हॅन्स होत्या, साम आणि अजून एक कोणतं तरी चॅनेल. हे इतके फोटोग्राफर्स! बँकेचे बूथ, महानगरपालिकेचा, दिंड्यांचा सत्कार करण्यासाठी बांधलेला मंच! तिथे दाटीवाटीने जमलेले सगळे माननीय! तिथे धावती कॉमेंट्री करणारा एक जण. पांडुरंग भगवान की जय, म्हणे! मज्जाच, म्हटलं मनात. खुद्द पांडुरंग हे संबोधन ऐकून दचकला असावा. त्या माणसाला गालातल्या गालात हसणारे वारकरी, जाऊद्या, तितकंच द्येवाचं नाव येतया तेच्याबी तोंडात, चालायचंच, अशी समजूत काढणारे अनुभवी, मुरलेले वारकरी. त्यांच्यासोबत सहभागी झालेले हौशी, नवशे,पोटार्थी, चोर, लबाड, सज्जन, साव सगळे सगळे. खर्‍या अर्थाने जनसमुदाय. नाचणार्‍या दिंड्या, पताका. डोईवरली तुळशी वृंदावनं. गाठुडी. सामानाचे ट्रक. वारकर्‍यांच्या चेहर्‍यावरचा भक्तीभाव, विश्वास.

आणि कितीही बदल झाले तरीही मूळ भक्ती आणि विशवासाचा जो गाभा अणि पाया आहे तो शाबूत ठेवून वाटचाल करणारी वारी.

वारीची वाट बघत ह्यावेळी उभे होतो. खूप वेळ वाट बघायला लावून पालख्या दृष्टीपथात आल्या. पुन्हा एकदा तोच परिचित आनंदकल्लोळ उसळला. ह्यावेळी दूर उभं राहून हात जोडले. उगाच आपले अचानक डोळे भरुन आले.. एक म्हातारे वारकरीबुवा आणि आज्जींशी त्याच वेळी माझी नजरानजर झाली, माझ्याबरोबर दोघेही खूप समजूतीचं असं हसले. माझ्या मनामध्ये उगाच दिलासा दिल्याप्रमाणे भावना झाली. आजी आजोबा पुढे वाट चालू लागले.

तीनही लोक आनंदाने भरुन टाकत वारीही मार्गस्थ झाली.

संस्कृतीसमाजप्रकटनविचार

प्रतिक्रिया

आतिवास's picture

12 Jul 2013 - 12:15 pm | आतिवास

'वारी' आहे ही अशी आहे; त्यातलं काय दिसावं, काय भासावं, काय घ्यावं, काय सोडून द्यावं - हा अनेक अर्थांनी अत्यंत व्यक्तिगत निर्णय आहे ही जाणीव अधोरेखित करणारं लेखन. आवडलं.

पण म्हणजे त्यातले सामाजिक पैलू, त्यातल्या अपेक्षित सुधारणा, कालानुरुप बदल, त्यातले हौशे-गवशे-नवशे याबद्दल काही चर्चा होऊ नये असं मात्र नाही (तुम्ही तसं काही म्हटलेलं नाही, ही आपली माझी उगीच जोडणी)... तेही तितकंच महत्त्वाचं.

या परस्परविरोधी गोष्टींची मोट आपण आपल्यापुरती कशी बांधतो ते महत्त्वाचं ...

पहिल्याच परिच्छेदातला वारीला न जाणार्‍यांचा किंवा आपल्या आयुष्यात रममाण असणार्‍या मध्यमवर्गीयांचा (म्हणजे स्वतःचाच) उपहासात्मक उल्लेख टाळला आला असता..
बाकी वर्णन छान!

बॅटमॅन's picture

12 Jul 2013 - 12:50 pm | बॅटमॅन

+१.

वारीशी एका मर्यादित लेव्हलवरच्या तादात्म्याचा अनुभव छानच वर्णिला आहे. परंतु त्यासाठी वारीला न जाणारे म्हंजे पथेटिक असा सूर जाणवतो आहे तो अनावश्यकरीत्या बायस्ड आहे.

मला पण खरच हे "वारी" खुप आवडते. मन खुश होउन जात वारी बघितली की. आमच्याकडे पण माझ्या बाबांचे मामा नेहमी वारीला जायचे. ते सुद्धा नेहमी बुक्का लावायचे. त्यांची आठवण झाली.

मैत्र's picture

12 Jul 2013 - 1:00 pm | मैत्र

त्याच भागातले लहानपणचे दिवस आठवले. शाळेत करून न्यायच्या कागद कार्डबोर्डच्या पालख्या --
"ग्यानबा - तुकाराम, ग्यानोबाची पालखी "
अप्पा बळवंत चौकातले गर्दीतले दर्शन.. बुक्का, चुरमुरे..पाकळ्या, आणि हमखास येणारी एखादी सर..
आणि एक विलक्षण उत्साह.. गणपतीत असतो तसा जल्लोषवजा नाहि.. पण एका समाधान देणार्‍या आनंदातून येतो तसा उत्साह..

काही वर्षांमागे दोन तीन वेळा मुंबई पुणे रस्त्यावर तुकाराम महाराजांच्या पालखीचे एकदम जवळून उत्तम दर्शन कंपनीच्या दारात कंपनीकडून जाणार्‍या प्रसाद / नैवेद्याबरोबर.. छान वाटले..
पण मोजक्या लोकांबरोबर जाणारी रिकाम्या महामार्गावरची पालखी, मॅनेजर लोकांबरोबर थाटात दर्शन आणि पेठेतले गर्दीतले मुंडाशी - तुळशी वृंदावने याच्या गलबल्यातले दर्शन हे म्हणजे दगडूशेठचे लखलखते सुवर्णजडीत दर्शन आणि कसबा गणपतीचे शांत नंदादीपासोबतचे साधेसे दर्शन असा फरक वाटला.. असो

खूप छान अभिनिवेशरहित शब्दयोजना (सुरुवातीचे काही शालजोडीतले वगळता) .. बाकी वारीसारखाच साधासुधा निर्मळ लेख. कित्येक वर्षात पालख्या पाहण्याचा योग आला नाहीये.. बर्‍या चांगल्या लेखांनी जुन्या साध्या आठवणींना उजाळा मिळाला.. मनापासून धन्यवाद..

यशोधरा's picture

12 Jul 2013 - 1:13 pm | यशोधरा

अतिवास, चर्चा व्हावी की, जरुर व्हायला हवी आणि त्रुटीही दूर व्हायला हव्यात. त्याबद्दल माझेही दुमत नाही.

मध्यमवर्गीय वा कोणालाही शालजोडी वगैरे म्हणून मी पहिला पॅरा लिहिलेला नाही. आजवर मिपावर मी असे कधी लिहिले नाही. ती माझी स्वतःची खंत आहे, इतकेच. कृपया गैरसमज करुन घेऊ नये ही विनंती.

स्पा's picture

12 Jul 2013 - 1:14 pm | स्पा

मुक्तक आवडले

मूकवाचक's picture

12 Jul 2013 - 1:24 pm | मूकवाचक

शेरलॉक होम्स या रहस्यकथामालिकेतल्या काल्पनिक व्यक्तीरेखेचा लंडनमधला जो काल्पनिक पत्ता आहे, त्या ठिकाणी एक संग्रहालय आहे. शिकलेसवरलेले, विवेकी, शहाणे, अतिशहाणे लोकही तिथे आवर्जुन जातात. गर्दी करतात. अशा संग्रहालयांमधे (उदा. मादाम तुसाँ) फोटू काढायला बंदी असते. तिथले व्यवस्थापन आपले फोटू काढले जातील आणि ते अव्वाच्यासव्वा किंमतीला घेणे भाग पडेल असे नियोजन करते. कित्येक ठिकाणी बाहेरचे खाद्यपदार्थ वगैरे न्यायला बंदी, आणि 'टुरिस्ट अ‍ॅटरॅक्शन'च्या परिसरात ते दुप्पट किमतीला विकण्याची व्यवस्था असते. त्यात व्यवस्थापनाचा 'कट' असतोच.

तेव्हा स्थानमहात्म्य, व्यक्तीमहात्म्य वगैरे प्रकार आणि त्याच्या आश्रयाने चालणारी नफेखोरी मनुष्यस्वभावाला धरूनच आहे. आपल्याकडे लोकसंख्येच्या समप्रमाणात या गोष्टी मॅग्निफाईड दिसतात/ भासतात. वारकरी किंवा तीर्थयात्रेला, परिक्रमेला जाणारे लोकच तेवढे अविवेकी अशा पद्धतीने बडबडणे, तीर्थक्षेत्री फोफावलेल्या व्यापारी प्रवृत्तीवरच जोर देत एकांगी बोलणे मला फारसे पटत नाही. असो. लेख आवडला हे वेगळे सांगायला नकोच.

अभ्या..'s picture

12 Jul 2013 - 1:36 pm | अभ्या..

+१
अगदी सहमत मुवाला.
व्यावसायीकरण सगळीकडेच होत असते. काहीजण दैवत मानतात, काहीजण ब्रँड किंवा आयकॉन करतात.

यशोतैंचे मुक्तक अप्रतिम हे लिहायचे राहीलेच.
या माऊली. आमच्या जिल्ह्यात स्वागत. :)

पैसा's picture

12 Jul 2013 - 2:11 pm | पैसा

बकुळीच्या गजर्‍यासारखं.

मी कधी वारी प्रत्यक्षात पाहिली नाही. पण एवढ्या लोकांना बांधून ठेवणारा अनुभव कसा असेल तो एकदा घ्यायची जरूर इच्छा आहे.

पालखीबद्दल लिहिलंस ते अगदी खरं आहे. गावाला शिमग्यात पालख्या घरोघरी येतात. तेव्हाचं ते गार्‍हाणं वगैरे ऐकायला खूप बरं वाटतं. पण गेल्या कित्येक वर्षांत शिमग्यात गावाला जाणं झालं नाही आणि त्या पालख्या नाचवलेल्याही पाहिल्या नाहीत. :( श्रद्धा-परंपरा, योग्य-अयोग्य, चर्चा-वाद सगळं बाजूला ठेवावं आणि कधीतरी ते भारलेलं वातावरण अनुभवावं. पु लंच्या काकाजी सारखं कधीतरी सूत कातून बघायला काय हरकत आहे?

किसन शिंदे's picture

12 Jul 2013 - 2:43 pm | किसन शिंदे

श्रद्धा-परंपरा, योग्य-अयोग्य, चर्चा-वाद सगळं बाजूला ठेवावं आणि कधीतरी ते भारलेलं वातावरण अनुभवावं

१००% सहमत!

यशोधराताई, पुढच्या वर्षी जायचं नक्की ना??

यशोधरा's picture

12 Jul 2013 - 3:00 pm | यशोधरा

हो :)

धमाल मुलगा's picture

12 Jul 2013 - 9:23 pm | धमाल मुलगा

>>बकुळीच्या गजर्‍यासारखं.
काय सुंदर उपमा दिलीये!! व्वा!! अक्षरशः एका वाक्यात संपुर्ण लेखाचं कौतुक होऊन जातंय. :)

स्वाती दिनेश's picture

14 Jul 2013 - 6:14 pm | स्वाती दिनेश

बकुळीच्या गजर्‍यासारखं.
काय सुंदर उपमा दिलीये!! व्वा!! अक्षरशः एका वाक्यात संपुर्ण लेखाचं कौतुक होऊन जातंय

धमु सारखेच म्हणते,
यशो, वारी आवडली.
स्वाती

प्यारे१'s picture

12 Jul 2013 - 2:57 pm | प्यारे१

ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम!

प्रचेतस's picture

12 Jul 2013 - 2:58 pm | प्रचेतस

सुरेख शब्दांत रेखाटलेले मुक्तक आवडले.

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Jul 2013 - 3:16 pm | ज्ञानोबाचे पैजार

पांडुरंग भगवान कि जय........ चालायचच...... काळ बदलतो आहे त्या बरोबर आस्थाही.

पण वारी हा खरोखरच घेण्यासारखा अनुभव असतो. यशोधराताईंनी मनात अनेक आठवणी जाग्या केल्या

अलका चौकात बराचवेळ ताटकळत उभे राहिल्यानंतर पालखी येते. मग एकच झुंबड उडते. पण पादुकांच्या दर्शनाने मिळणारे समाधान केवळ अवर्णनीय.

पालखीला होणारी गर्दी ही इतरवेळी होणार्‍या गर्दी पेक्षा फार वेगळी असते. पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेला प्रत्येक वारकरी पांडुरंगासारखाच दिसत असतो. वारीच्या गर्दीची सरसकट तुलना कुठे वाचली की मनाला क्लेश होतात. त्यावर फुंकर घालायचे काम यशोधराताईंनी केले आहे.

असो पांडुरंग हरी...

(कधितरी वारी करायची इच्छा असलेला)

अर्धवटराव's picture

12 Jul 2013 - 9:21 pm | अर्धवटराव

>>... खर्‍या अर्थाने जनसमुदाय...
झालच कि मग जनार्दनाचं दर्शन.

अर्धवटराव

सस्नेह's picture

12 Jul 2013 - 9:48 pm | सस्नेह

वारी कुणाची हे महत्वाचं नाही. कुणासाठी हे पाहिलं पाहिजे.
वारीच्या रुपानं आज धार्मिकपेक्षा सामाजिक ऐक्यभावना बळकट होत्ये आहे, हे खरय.

नंदन's picture

13 Jul 2013 - 12:33 am | नंदन

धर्म, कर्मकांडं, रिच्युअल्स हे जरी काही काळ बाजूला ठेवलं; तरी ज्या वातावरणात आणि संस्कृतीत आपण वाढलो, तिचा ठसा अमीट असतो. अगदी रिचर्ड डॉकिन्ससारख्या कट्टर निधर्मीवाद्यानेही ते मान्य केलं आहे. त्याच संस्कॄतीचा एक भाग अगदी नेमकेपणाने मांडणारं हे मुक्तक अतिशय आवडलं.

(अवांतर - हुंदाडगंपूपणा हा शब्दही खासच. लंपनच्या भाषेत शोभावा असा :))

जुन्या आठवणी जागवणारं लेखन आवडलं. पूर्वी आजी आजोबांबरोबर केवळ ते जातात म्हणून आपण जायचं, दंगा करायचा, प्रसाद खायचा असं आमचंही व्हायचं. देवळातही ते जातात म्हणून आम्ही जायचो. आता मात्र आजी आजोबांच्या आठवणीसाठी जाणं होतं..

यशोधरा's picture

13 Jul 2013 - 6:36 am | यशोधरा

सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jul 2013 - 8:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनाच्या तळाशी उतरलेली वारी आणि पालखी पोहचली. छान लिहिलंय....! खरं तर एकदा या वारीचा अनुभव घ्यावा असा विचार अनेकदा येतो. वयोमानाने रेटेल का या विचाराने तो विचार पुन्हा दूर जातो. माझ्याकडे किती वर्षापासून म्हैती नै. एक दिंडी माझ्या गावी जेव्हा मुक्कामी असते... तेव्हा वर्षानुवर्ष एक वयस्कर वारकरी आजही आमच्या ओट्यावर मुक्कामी असतो. आई आम्हा मुलांना चुकवुन त्याला चा पाणी करते.....सकाळी आंघोळीला गरम पाणी देते, (आता सुनाही मदतीला) आणि तो सकाळी दिंडीत पुन्हा रवाना होतो....! मला कमाल वाटते... वारकर्‍यांची... कसल्या ध्येयानं पछाडलेलं असतं त्यांना माहिती नै. असो...!

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

13 Jul 2013 - 9:58 am | सुबोध खरे

मी जवळ जवळ १ १ वर्षे वारी पाहिली आहे ते धुंद आणी प्रासादिक वातावरण याचा अनुभव घेतला आहे. परंतु आळंदी पासून पंढरपूर पर्यंत चालत वारीला जायची इच्छा असूनही आळशी पणामुळे जमलेले नाही. मी स्वतः फारसा भाविक नाही. पंढरीचे दर्शन घेतले आहे. मंदिरात जाईपर्यंत बाहेरच्या वातावरणाची किळस आणी संतापपण आला. परंतु प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घेतल्यावर आतपर्यंत कोठेतरी हलल्याची जाणीव झाली. डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्याचे वस्तुनिष्ठ पणे वर्णन करणे शक्य नाही.
आमच्या वडिलांचे एक स्नेही प्रथितयश स्थापत्य विशारद आणी विकासक होते. त्यांच्या स्वतःच्या शब्दात सांगायचे तर "" मी स्वतःला शहाणा समजणारा माणूस,हे भक्ती वगैरे थोतांड आहे असे पक्के मानणारा समाजवादी माणूस. हे वारकरी एवढे कष्ट करून काय ती वारी करतात त्याला काही अर्थ नाही असे वाटत असे. पण एकदा कुतूहल म्हणून मी त्या वारीत पुणे ते सासवड(किंवा कोणतेतरी दुसरे स्थळ असेल) सहभागी झालो. आणी हा इतका विराट जनसागर कोणताही नियंत्रक नसताना तल्लीन होऊन अपार हाल अपेष्टा सोसूनही कसा पुढे जातो हे पाहून मला स्वतःच्या कोतेपणाची लाज वाटली. पुढच्या वर्षी मी पुणे ते पंढरपूर असा प्रवास अर्धा पायी आणी अर्धा गाडीने असा केला पण आषाढीच्या दिवशी पांडुरंगाच्या चरणी मस्तक ठेवताना आतून भरून आले आणी सर्व पावल्याची जाणीव झाली.माझे मी पण सरले म्हणजे काय झाले हा अनुभव आला ""
पुनः प्रत्ययाचा आनंद झाला
धन्यवाद

स्पंदना's picture

13 Jul 2013 - 11:45 am | स्पंदना

सुरेख अनुभव वर्णन.
देव या कल्पनेशी फार न झगडता देव असा उलगडणे खरच खुप ताकदीचे आहे.
मलाही देवापेक्षा देवभक्तांकडे पाहुन उर भरुन येतो, डोळे न कळत पाणावतात.
विठोबाचा अनुभव मात्र अगदे सुबोध खर्‍यांसारखा. असा सामोरा येतो तो तुमच्या की क्षणात मनात काही तरी झणकारुन जाते.

राघव's picture

13 Jul 2013 - 12:03 pm | राघव

मन ताजंतवानं करणारा लेख फार आवडला. वारीस जायची इच्छा आहेच. जाशील तेव्हा कळव गो माय!

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Jul 2013 - 12:29 pm | बिपिन कार्यकर्ते

सुरेख!

उपास's picture

16 Jul 2013 - 1:46 am | उपास

सुंदर शब्दात मांडलय मनोगत. आवडलंच!

सखी's picture

17 Jul 2013 - 10:37 pm | सखी

हे वाचायचं राहुन गेलं होतं यशो, सुरेख लिहलं आहेस मनोगत आणि त्याबरोबर आलेल्या आजीआजोबांच्या आठवणी!

मोदक's picture

17 Jul 2013 - 10:48 pm | मोदक

मुक्तक आवडले!