क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग २
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ३
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ४
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ५
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ६
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ७
(लेखात वापरलेली सर्व चित्रे प्रताधिकारमुक्त नाहीत. या चित्रांचे सर्व प्रताधिकार University Libraries (University of Washington) - Digital Collection या विभागाच्या मालकीचे आहेत. या लेखमालिकेसाठी ही चित्रे वापरण्याचे विशेष अधिकार दिल्याबद्द्ल University of Washington चे मनःपूर्वक आभार.)
डाउसनच्या किनार्याला लागताच क्षणी स्टँपेडर्सनी सोन्याच्या खाणींकडे धाव घेतली. पण तोवर बराच उशीर झाला होता....
क्लोंडायकला पोचलेल्या स्टँपेडर्सना साधारणतः दोन भागात विभागता येईल. पहिल्या भागातले स्टँपेडर्स म्हणजे क्लोंडायकच्या आसपास रहाणारे रहिवासी. जॉर्ज कारमॅकला क्लोंडायक नदीमधे सोनं सापडल्याची बातमी वार्यासारखी आसपासच्या भागात पसरली आणि त्यानंतर लागलीच ज्या स्टँपेडर्सनी क्लोंडायच्या दिशेने धाव घेतली ते १८९७ च्या वसंत ऋतूपूर्वी डाउसनला पोहोचले. साधारण १८९७ च्या वसंतऋतूपर्यंत क्लोंडायक नदीच्या आसपास खोदकामाचे हक्क मुबलक प्रमणात उपलब्ध होते व ते विकत घेणं परवडण्यासारखंही होतं. याच सुमारास डाउसनची लोकसंख्या होती ४००० च्या आसपास. ज्यांना क्लेम्स(१) विकत घेणं शक्य नव्हत अशांसाठी नोकर्या उपलब्ध होत्या.
वर्षानुवर्षे या ठिकाणी वास्तव्यास असणार्या 'सोरडोव्हस'(२)ना क्लोंडायकच्या पात्रात नक्की सोनं सापडणारी विवक्षित ठिकाणं शोधणं सोपं होतं. सोरडोव्हसनी भाकीत केलेल्या जागांचे हक्क लागोलाग विकले गेले. नदीकाठच्या जमिनीचे हक्क विकले गेल्यानंतर हळूहळू चीचाकोजनी (३) डोंगरमाथ्यावरच्या जमिनीवर नशिब आजमावयचं ठरवलं. नशिबावर बोल लावून अनेक स्टँपेडर्सनी या जागांचे हक्क विकत घेउन अक्षरशः जुगार खेळला होता. अनेक वर्षांच्या अनुभवाअंती सोरडोव्हजना पक्कं माहीत होतं की डोंगरमाथ्यावर सोनं मिळणं अशक्य होतं पण कित्येक वर्षांपूर्वी झालेल्या भूगर्भीय हालचालींमुळे नदीचं पात्र काही ठिकाणी वर उचललं गेलं होतं आणि चिचाकोजना जेव्हा या प्राचीन नदीपात्रात सोनं सापडलं तेव्हा मात्र त्यांनी नशिबाची खेळी जिंकली होती.
डोंगरमाथ्यावर सोनं मिळवण्यासाठी खोदकाम करणं मात्र फरच कष्टप्रद होतं. कुदळीने नदीपात्राच्या तळाशी असलेला अतिशय कठीण कातळ फोडून काढणं कसोटी होती. आल्बर्ट लँकेस्टर या स्टँपेडरने जेव्हा डोंगरमाथ्यावर खणायला सुरवात केली तेव्हा नदीपात्राच्या तळाशी पोचण्यासाठी आठ आठवडे ७९ फूट खोदकाम केल्यानंतर सुमारे $२००० किंमतीचं सोनं हाती लागलं. लँकेस्टरनंतर त्याच जागी खोदकाम करणार्याला मात्र लागलीच तीसएक पौंडाचं सोनं मिळालं.
(दुर्गम असूनही गोल्ड रशमुळे वेगाने पसरणारं डाउसन शहर.)
'किंग ऑफ क्लोंडयक' म्ह्णून ओळखल्या जाणार्या लाजरबुजर्या, अशिक्षीत अलेक्स मॅकडोनाल्डने आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीही कुदळ फावडं हातात घेतलं नव्हतं. जमीन नुसती वरवर निरखून तो क्लेम विकत घेत असे. 'एल दोरादो' च्या टेकडीवर त्याने एक पोती पिठ आणि काही बेकनच्या बदल्यात तीस क्लेम्स विकत घेतले आणि खोदकाम सुरू करताच काही दिवसातच ते क्लोंडायकमधले सर्वात श्रीमंत क्लेम्स ठरले. त्या जमिनीतून दिवसाला $५००० किंमतीचं सोनं निघत असे. (४)
१८९८ चा उन्हाळा चालू होईपर्यंत डाउसनची लोकसंख्या ५००० च्या वर पोहोचली. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत दुर्गम अशा डाउसनमधे दोन बँका, दोन वर्तमानपत्रे, चर्चेस, दूरध्वनी यंत्रणा, चित्रपटगृह, डझनभत हॉटेल्स, दारुचे गुत्ते, डान्स हॉल्स सुरू झाले होते. डाउसन शहर पसरायला सुरवात झाली होती. उन्हाळ्यात गोठलेली युकान नदी वितळून जहाजाचा मार्ग सुकर झाला आणि सोनं भरलेलं 'एक्सेलसिअर' जहाज सिअॅट्ल बंदराला लागलं. हिच ती वेळ जेव्हा बाहेरच्या जगाला क्लोंडयकमधल्या सोन्याची वर्दी मिळाली. त्यानंतर क्लोंडायकला येनकेनप्रकरणाने पोचण्याची तयारी सुरू झाली.
स्टँपेडर्सचा दुसरा गट साधारणपणे १८९८ च्या जुलै महिन्यात डाउसनमधे दाखल झाला. हे स्टँपेडर्स मुख्यतः व्हाईट वा चिलकूट पास पार करुन डाउसनमधे पोचले होते. एकट्या जुलै महिन्यात जेव्हा २२००० स्टँपेडर्स डाउसनमधे दाखल झाले तेव्हा डाउसनची संख्या अचानक ३०००० च्या वर पोचली. पण त्याधीच क्लोंडायक नदी व आसपासच्या भागतले खाणकामाचे होते नव्हते तेवढे सर्व हक्क विकले गेले होते. नव्याने दाखल होणार्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सामवून घेण्यासाठी कोणात्याही प्रकारची तजवीज केली गेली नव्हती. अचानक शहरातल्या प्रत्येक वस्तूंचे भाव गगनाला भिडले. जागेचा भाव साधारण एक चौरस फूटाला $२००० इतका पोचला होता.
(डाउसन शहराचे 'सोनेरी' रस्ते गुडघाभर चिखलाने भरलेले असत. त्यातून मार्ग काढणं माणसांनाच काय पण प्राण्यांनाही अशक्य होत असे.)
नविन स्टँपेडर्सना शहरात जागा मिळणं तर मुश्किल होतं. हे स्टँपेडर्स आपल्या आयुष्यातला अवघड व असाध्य असा प्रवास पूर्ण करून इथवर पोचले होते. पण त्यातला अनेकांना 'कालचा गोंघळ बरा' अशी परिस्थिती डाउसनमधे होती. काहीतरी काम मिळण्याच्या आशेवर स्टँपेडर्स तासनतास नदीकाठी रिकामटेकडे बसून असत. खरंतर खोदकामाचे हक्क जाउद्यात, इतर स्टँपेडर्सच्या खाणींवर काम मिळणंही मुश्किल झालं होतं. झोपायला तंबू बांधण्यासाठी जागा परवडणं अशक्य असल्याने अनेकांनी नदीकिनारी आपल्या बोटीतच आश्रय घेतला. डाउसनमधे बरीचशी जनता बीन्स आणि पॅनकेक खाउन गुजराण करीत होती. ज्यांच्याजवळ खाणकामाचे हक्क होते त्यांच्याजवळ मुबलक प्रमाणात पैसा होता पण इतरांचे हाल कुत्रं खात नसे. डाउसन 'श्रीमंतांचं गरीब शहर' बनलं होतं. एवढ्या मोठया प्रमाणात लोकसंख्येच्या स्थलांतरानंतर स्वच्छतेचा प्रश्न उद्भभवणं सहाजिकच होतं. उघडी गटारं, कचर्याची योग्य विल्हेवाट न लागल्याने डाउसन बारा महीने कुठल्या ना कुठल्या साथीच्या रोंगांनी आजारी असे.
(डाउसनमधली बरीचशी जनतेचं रहाणीमान अत्यंत प्राथमिक स्वरुपाचं होतं.)
आता प्रश्न असा पडतो की, इतकी वाईट परीस्थिती असतांना स्टँपेडर्सनी क्लोंडायकमधेच टीकून रहाणं पसंद का केलं? काही स्टँपेडर्सनी डाउसन शहराचा हालहवाल पहाताच आल्या पावली परतायचा निर्णय घेतला. उरलेल्यां कित्येकांना परत जाउन काही मिळवण्यासारखं नव्हतं किंवा इथेच राहून काही गमावण्यासारखं नव्हतं. घराकडे परतूनही परिस्थिती तितकीच बिकट होती. मंदीमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं होतंच. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. ज्यांच्याजवळ चांगले क्लेम होते अशा ठिकाणी अनेक स्टँपेडर्सनी काम शोधायला सुरवात केली. त्याकाळी अमेरीकेत सामान्य माणसचं एका दिवसाचं दरडोई उत्पन्न साधारणपणे $२ च्या आसपास असे. पण डाउसनमधे माती चाळून सोन्याचे कण वेचण्याच्या कामासाठी त्याच्या दसपट मिळकत होत असे. हॉटेलात काम करणार्या आचार्यांना आठवड्याला $१०० आरामात मिळत असत. कुशल कामगारांची तर चांदीच होती. थकल्याभागल्या कामगरांच्या करमणुकीकरीता दारुचे गुत्ते होते, जुगाराचे अड्डे होते. संध्याकाळ झाली की डान्सहॉल्स गर्दी ओढत असत. अधेमधे कुस्तीचे फडही रंगत.
ज्यांना काम मिळालं नाही त्यांनी काही ना काही युक्त्या प्रयुक्त्या करुन पैसे कमवले. त्यातलाच एक हेन्री डाउम. हेन्रीने डाउसमधल्या आपल्या वास्तव्यात अनेक खाणकामगारांना विटॅमिन 'सी' च्या कमतरतेमुळे 'स्कर्व्ही' या रोगाने आजारी पडतांना पाहीलं होतं. शहरात कांदे दुर्मिळ असल्याने औषधाच्या दुकानात स्कर्व्ही रोगावरच्या उपराचासाठी कांदा $२ ला एक या दराने विकला जाई. ताज्या भाज्यातर नजरेला पडत नसत. शहरात जागांचे भाव गगनाला भिडले होते. मोठ्या हुशारीने हेन्रीने सोन्यच्या खाणींपासून थोडं दूरवर क्लोंडायक व युकान नदीच्या संगमावर ११ एकरचं बेटं $२३.५० ला विकत घेतलं. भावाच्या मदतीने तिथे त्याने हरीतगृह बांधून काढलं. वसंतऋतूत आगीच्या सहाय्याने हरीतगृह गरम ठेवत असे. पण जसा उन्हाळा सुरू झाला तसा दिवसाचे २२ तास उन्हाने सुर्य तळपू लागला. हेन्रीने मुख्यत्वे 'सी' विटॅमिन देणार्या कोबी सारख्या भाज्यांचं उत्पादन सुरू केलं आणि अल्पावधीतच डाउसनला ताज्या भाज्या पुरवणारा विक्रेता म्हणून हेन्री नावारूपाला आला.
त्याच सुमारास म्हणजे फेब्रुवारी १८९८ मधे स्पॅनिश-अमेरीकन युद्धाची ठिणगी पेटली होती. मातृभूमीपासून दूर असलेल्या स्टँपेडर्सना या युद्धाबद्द्ल फारच उत्सुकता होती. त्यावेळी डाउसनमधे वृतपत्र येण्यास फार वेळ लागत असे . एका स्टँपेडरने सिअॅटलवरुन आपल्याबरोबर वृत्तपत्राची एक प्रत आणली होती. अशाच कोण्या रिकामटेकट्या स्टँपेडरने ती नाममत्र किमतीला विकत घेतली डाउअसनमधल्या चौकात तो उभा राहत असे. एका वाचनासाठी $१ तिकिट लावून त्या वृत्तपत्राचं वाचन करुन बरेच पैसे त्याने जमा केले.
(सिअॅट्ल पोस्ट-इंटलिजर वर्तमानपत्रातील युद्धाच्या बातम्या ऐकण्यासाठी जमलेली गर्दी)
एच.एल.मिलर नावच्या स्टँपेडरने आपली गाय सोबत आणली होती. एका गॅलनला $३० च्या दराने तो दूध विकत असे. एका स्टँपेडरने सोबतीला काही मांजरी आणल्या होत्या. एकटेपणाला कंटाळलेल्या अनेक स्टँपेडर्सना सोबतीची गरज होती, काही सोन्याच्या तुकड्यांच्या बदल्यात सर्व मांजरी हातोहात विकल्या गेल्या. जेन अॅलनने 'क्लोंडायक नगेट' नावाच वृत्तपत्र सुरू करुन बक्कळ पैसा कमावला.
(सोनेरी शहरात ताज्या पावाचा भाव सोन्यापेक्षा जास्त होता. बरेचदा बादलीभर सोनं मिश्रीत वाळूच्या बदल्यात पाव व इतर जीवनावश्यक गोष्टी विकल्या जात. हे विकलं जाणारं सोनं फारच कमी वेळा शुद्ध स्वरुपात असे.)
क्लोंडायकवारीत पुरूषांबरोबर अनेक स्त्रियाही सामिल झाल्या होत्या. त्यापैकीच एक बेलिंडा मुलरूनी. बेलिंडाला व्यवसाय करण्यात रस होता. १८९७ मधे अलास्कातल्या एका दुकानात काम करतांना तिने क्लोंडायमधल्या सोन्याच्या शोधाची बातमी ऐकली. तातडीने तिने $५००० किंमतीच्या गरम पाण्याच्या बाटल्या आणि रेशमी वस्त्र खरेदी करुन युकानच्या दिशेने प्रवास सुरू केला. या वस्तू डाउसनमधे विकून बेलिंडाने जवळ्जवळ $२५००० चा नफा कमवला. त्यातून तिने 'फेअर व्हिव्यु' नावाचं हॉटेल सुरू केलं. हॉटेलच्या भरभराटी बरोबरच बेलिंडाने क्लोंडायकमधल्या श्रीमंतांच्या यदीत नाव कमवलं
(तेलं ही गेलं तुपही आणि अनेक स्टँपेडर्सच्या हातात धुपाटणं ही राहीलं नव्हत. डाउसन मधे दाखल झालेल्या अनेक स्टँपेडर्सनी छोटी दुकान थाटून जवळच्या वस्तू विकायला काढल्या.)
नेली कॅशमन अशीच एक धाडसी बाई. तिने डाउसनमधे छोटं उपहारगृह आणि दुकान थाटून बक्कळ पैसा कमवला. अनेक प्रकारे देणग्या देउन तिने क्लोंडायकमधल्या लोकांची मनं जिंकली.
नॉर्थ-वेस्ट पोलिसांनी आपल्यापरीने या भागातली कायदा सुव्यवस्था सुनियोजित ठेवण्याचं काम योग्य रितीने बजावलं. बारा पोलिसांची फौज दिवसरात्र कार्यरत असे. डाउसन मधे साधारणतः कुत्रे चोरणे, चोरीमारी असे गुन्हे घडत. बंदूक बाळगणं, सुट्टिच्या दिवशी कामं करणं हेही डाउसनमधे गुन्हे मानले जात. शनिवार, रविवार व इतर सणांच्या दिवशी सर्व खाणी, दारुचे गुत्ते, डान्स हॉल बंद असत. या दिवशी रस्त्यावर सामसूम असे. गुन्हेगारांना शिक्षा म्हणून दंड भरणे, सरकारी इमारतीत जळणासाठी लाकूड तोडावं लागत असे. जास्त गंभीर स्वरुपाच्या गुन्हयासाठी स्टँपेडर्सना शहर सोडण्यास सांगण्यात येत असे
१८९८ च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत साधारण १०००० स्टँपेडर्सनी डाउसन सोडून परतीचा मार्ग पकडला. इतरांनी पुढच्या उन्हाळ्यापर्यंत सोन्याच्या खाणींमधे काम पकडून पुढच्या वसंतात बर्फ वितळण्याची वाट पाहत डाउसन मधेच वास्तव्य केलं. परंतु दिवसेंदिवस खाली घसणार्या थंडीच्या पार्याला तोंड देत गुजराण करणं तितकच कठीण बनत चाललं होतं.
क्रमशः
टिपा :
(१) क्लेम्स (Claims) - एखाद्या जमीनीवर खाणकाम करण्याचा कायदेशीर अधिकार.
(२) सोरडोव्ह (SourDough) - सोरडोव्हचा अर्थ खरंतरं बेकींग सोडा आणि यीस्ट घालून आंबवलेली कणिक. बिस्कीटं, ब्रेड बनवण्यासाठी त्याचा वापर होतो. युकान मधे सुरवातीस सोन्याच्या शोधासाठी आलेले लोकं जेवणात सोरडोव्हचा वापर करीत. त्यातुनच अशा जुन्या जाणत्या लोकांना सोरडोव्ह हे नाव चिकटलं. या सोरडोव्ह लोकांना सोनं असलेल्या भागाची चांगलीच जाण होती. ते नविन स्टँपेडर्सना पैशाच्या मोबदल्यात सल्ले देत असत. सोनं सापडणार्या जागा दाखवत असत.
(३)चिचाको (Cheechakos) - डाउसनमधे नविन येणार्या स्टँपेडर्सना चिचाको असं संबोधत असत.
(४) अलेक्स मॅकडोनाल्ड - अलेक्सने इतक्या कमाईनंतरही इतर ठिकाणी क्लेम्स विकत घेणं सुरू ठेवलं . पण त्यातले बरेचसे बिनकमाईचेच ठरले. सरतेशेवटी इतर अनेक स्टँपेडर्सप्रमाणे अलेक्सही हावरेपणामुळे कफल्लक झाला.
संदर्भ :
१) Yukon Gold (Charlotte Foltz Jones)
२) Alaska: Celebrate the States (Marshall Cavendish)
३) Mission Klondike (James M. Sinclar)
४) Alaska : saga of a bold land (Walter R. Borneman)
५) Gamblers and Dreamers: Women, Men, and Community in the Klondike (Charlene Porsild)
६) Klondike Gold Rush Museum - National Historical Park, Seattle Unit
प्रतिक्रिया
9 Jul 2013 - 8:25 am | जॅक डनियल्स
दारूच्या गुत्त्यात नक्किच 'जे डी' श्रीमंत स्टँपेडर्सनी प्यायली असेल...;)
हेन्री डाउम सारख्या अनेक डोकेवाल्या व्यापाऱ्यांना सलाम !
9 Jul 2013 - 10:51 pm | वसईचे किल्लेदार
वाचतोय ...
10 Jul 2013 - 12:33 am | कवितानागेश
शॉल्लिड! :)
10 Jul 2013 - 1:18 am | अर्धवटराव
म्हणुनच कदाची ते "अमेरीका" आहे... ( आपल्या गुज्जु, पंजाबी, मल्लु आणि गुलटी बांधवांचा गोरा अवतार ;) )
अर्धवटराव
10 Jul 2013 - 9:11 am | प्रचेतस
एकदम रोचक.
पुभाप्र
10 Jul 2013 - 11:10 am | मदनबाण
सुरेख ! :)
10 Jul 2013 - 8:17 pm | अजो
हा भाग पण छान. पुभाप्र.
10 Jul 2013 - 8:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
त्या काळच्या फोटोंसकट रोचक वर्णन वाचायला मजा येत आहे. पुढचा भाग लवकर टाका.
10 Jul 2013 - 8:34 pm | पैसा
पुढच्या भागाची वाट पहात आहे!
11 Jul 2013 - 1:17 am | अग्निकोल्हा
.
11 Jul 2013 - 5:10 am | प्यारे१
खूप मस्त.
आपल्याकडं आज चाललंय ते सगळं ह्यांच्याकडं आधीच होऊन गेलंय की! ;)
12 Jul 2013 - 3:19 am | प्रसाद गोडबोले
भारीच लिहिताय हो !!
पुढील काय होईल ह्याची उत्कंठा लागुन राहिलिये
आपल्या देशात असलं काही त्रिलिंग टेजरहंट टाईप का होत नाय :(
12 Jul 2013 - 9:07 am | शिल्पा ब
हंट करायला टेझर नको का !
बाकी लेखमाला नेहमीप्रमाणेच उत्तम. फोटो भारी आहेत.
13 Jul 2013 - 4:11 pm | मुक्त विहारि
आवडला..
15 Jul 2013 - 6:38 am | किलमाऊस्की
या मालिकेतील पुढील भाग - क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ९
16 Jul 2013 - 7:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डाऊसन शहराची गच्च भरलेल्या स्टँपेडर्सची कथा असलेला हाही भाग तितकाच सुरेख. कोबीवाला, एका वाचनाचे पैसे घेणारा वृत्तपत्रवाला, मांजरी विकणारे, पाव विकणारे, सबकुछ प्लस वन. एकदम झकास. खरं तर प्रिंट काढून पानं उलटून एकेक भाग पडल्या पडल्या वाचायला तितकेच मस्त वाटेल. :)
-दिलीप बिरुटे