क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ७

किलमाऊस्की's picture
किलमाऊस्की in जनातलं, मनातलं
30 Jun 2013 - 10:49 pm

क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग २
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ३
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ४
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ५
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ६

(लेखात वापरलेली सर्व चित्रे प्रताधिकारमुक्त नाहीत. या चित्रांचे सर्व प्रताधिकार University Libraries (University of Washington) - Digital Collection या विभागाच्या मालकीचे आहेत. या लेखमालिकेसाठी ही चित्रे वापरण्याचे विशेष अधिकार दिल्याबद्द्ल University of Washington चे मनःपूर्वक आभार.)

१५ जुलै १८९८ ला सिअ‍ॅटल बंदरात सोनं भरुन आलेल्या 'एक्सेल्सिअर' जहाजाच्या दर्शनानंतर सोनं मिळवण्याच्या आशेवर क्लोंडायक वारीला निघालेल्या स्टँपेडर्सनी बराच लांबचा पल्ला पार केला होता. व्हाईट पास असो वा चिलकूट पास, एकदा का स्टँपेडर कोणत्याही एका मार्गाने लेक लिंडमन किंवा लेक बेनेटपर्यंत पोचला की पुढचा प्रवास पूर्णपणे जलमार्ग होता. त्यामुळे डाउसनपर्यंत पोचण्यासाठी स्टँपेडर्सना छोट्या होड्यांची आवश्यकता होती. यासाठी काही दिवस या भागात स्टँपेडर्सनी बस्तान बसवलं. हळूहळू लेक लिंडमन आणि लेक बेनेटच्या आसपासचा परिसर तंबूंचं शहर झाला होता - जगातलं सर्वात मोठं तंबूंचं शहरं.

ज्या स्टँपेडर्सना संपूर्ण प्रवासाची कल्पना होती त्यांनी वाटेतच होड्या बांधण्यासाठी सामान खरेदी करुन ठेवलं होतं. पण इतरांची चांगलीच पंचाईत झाली. होड्या बांधण्यासाठी हिवाळ्यात या भागात चांगलं लाकूड मिळणं मुश्किल होतं. स्टँपेडर्सनी मग लेक लिंडमनच्या आसपासचं जंगल तोडायला सुरवात केली. भर हिवाळ्यात जरी लाकूड मिळणं कठीण असलं तरी नाव बनवण्यासाठी मिळालेल्या चांगल्या फांद्या कडाक्याच्या थंडीत नाव बनवण्याच्या जागेवर ओढत आणणं हे सुद्धा जिकीरीचं होतं. त्यातून बरेचसे स्टँपेडर्स आयुष्यात पहील्यांदाच नौका बांधणीचं काम करत होते. ज्यांच्याकडे पुरेसे पैसे होते त्यांनी स्थानिक लोकांना कामाला लावलं पण सर्वांनाच ते शक्य नव्हतं. एकदा का नाव बनवण्यासाठी योग्य अशा झाडाच्या फांद्या मिळाल्या की काम जोरात सुरु होई. जवळ असलेल्या हत्यारांनी लाकूड कापून तासून सपाट तळ असलेली साधारणतः २२ ते २५ फूट आकाराची ३-४ टन वजन पेलता येईल अशी होडी बनवली जाई. हिवाळा संपता संपता लेक लिंडमन आणि लेक बेनेटच्या आसपासचा परीसर अहोरात्र कुर्‍हाड - करवतीच्या आवाजाने दणाणून निघाला होता. बर्‍यावाईट जशा जमतील तशा होड्या बनवण्यासाठी स्टँपेडर्स दिवसरात्र झटत होते.

अखेर सर्व स्टँपेडर्स वाट बघत असलेला दिवस उजडला. वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर २९ मे १८९८ ला बर्फ वितळायला सुरवात झाली आणि अवघ्या ४८ तासात ७१२४ नौका पाण्यात उतरल्या. जवळजवळ तीस हजार स्टँपेडर्स आणि ३० दशलक्ष पौंड वजनाचं सामान घेउन या नौका डाउसनच्या दिशेन ५५० मैलाच्या प्रवासासाठी रवाना झाल्या.

आता या पाण्यात उतरलेल्या बर्‍याच नौका चालवणारे नावाडी आयुष्यात प्रथमच नाव चालवत होते. वाटेत काही ठिकाणी अरुंद , काही ठिकाणी खडकाळ, तर काही ठिकाणी बरीच खोल होणारी, ठिकठिकाणी भोवर्‍यांनी भरलेली युकान नदी पार करणं कसरत होती. प्रवास सुरू होताच पहिल्या काही दिवसातच अनअनुभवी १५० नावांना जलसमाधी मिळाली. या घटनेनंतर नॉर्थ-वेस्ट पोलिसांना जाग आली. त्यांनी पाण्यात उतरणार्‍या प्रत्येक होडीची बारकाईने तपासणी करण्यास सुरवात झाली. प्रत्येक होडीची नोंदणी करुन एक नोंदणी क्रमांक दिला जात असे. तसंच प्रत्येक होडीत प्रवास करणार्‍या प्रवाशांची आणि सामानाची ही नोंद केली जात असे. एखाद्या नावेला अपघात झाल्यास अथवा एखादी नाव हरवल्यास या माहीतीच्या आधारे स्टँपेडर्सच्या कुटुंबियांना वर्दी देता येत असे.

युकान नदीच्या पात्रात छोट्या छोट्या होडक्यांची एकच गर्दी जमली. वर आकाशात सुर्य जवळजवळ बावीस तास तळपत असे. मरणाच्या उन्हात स्टँपेडर्स अविरत होडया वल्हवत असत.वाटेत माशा, डास आणि उडत्या चिलटांचा त्रासामुळे रात्रीची झोप घेणंही मुश्किल झालं. इतके दिवस एकत्र प्रवास करणार्‍या स्टँपेडर्समधे क्लोंडायक जसंजसं जवळ येऊ लागलं तसतशी दुफळी माजली. आता मदतीची गरज होती कोणाला? क्लोंडायकची जमिन काही अंतर दूर होती. स्वतः जमीन खणायची आणि मिळेल तेवढं सोनं लुटायचं हा एकच ध्यास. वाटेकरी हवा तरी कुणाला होता? इतके दिवस सोबत काम करणारे , अडीनडीला उपयोगी पडणारे सहकारी आता आपल्या हक्काच्या वाटयाच्या आड येणार म्हणून नकोसे झाले. आपापसातच मार्‍यामार्‍या, भांडण वाढू लागली.

जसजशी स्टँपेडर्सची गर्दी वाढू लागली तसतसे नॉर्थ-वेस्ट पोलिसांनी नियम ही कडक केले. काही स्टँपेडर्सना होडी सुखरुप किनार्‍यापर्यंत पोचवण्यासाठी व्यावसायिक अनुभवी रिव्हर पायलटस भाड्याने घेण्याची सक्ती केली गेली. जून महिन्याच्या शेवटी शेवटी Norman Macauley ने युकान नदीच्या माईल्स कॅनिअन आणि व्हाईट हॉर्स रॅपिडस या धोक्याच्या ठिकाणी ट्राम बांधून पूर्ण केली. या ट्रामच्या सहाय्याने पौंडाला चार-पाच सेंट मधे सामान नदीच्या पैलतीरावर नेता येत असे. प्रवासात मधे मधे उभारलेल्या चेकपॉईंटवर स्टँपेडर्सना सामानाची नोंद करावी लागत असे.

शेवटच्या काही तासात स्टँपेडर्स अक्षरशः जीव तोडून नावा वल्हवत होते. स्पर्धाच लागलेली जणू. खरंतर डाउसन नक्की कुठे आहे याची खात्री कुणालाच नव्हती. पाण्याच्या जोरदार प्रवाहाला तोंड देत नावा आगेकूच करीत होत्या. सरतेशेवटी स्टँपेसर्सना खडकाळ डोंगराळ जमिनीचं दर्शन झालं आणि एकच जल्लोष झाला- हीच ती जागा , जिथे पोचण्यासाठी स्टँपेडर्सनी जीवाचा आटापिटा केला होता, आयुष्यभराची पुंजी खर्च केली होती. त्यांचं सोनेरी स्वप्न पुर्ण करणार्‍या सोन्याच्या खाणी आता काही पावलं अंतरावर होत्या. दूर अंतरावरुन वेडेवाकडे बांधलेलेल तंबू, गर्दी करुन दाटीवाटीने उभी असलेली दुकानं, मधेच डोकावणारं उंच चर्च - एक शहर दमल्याभागल्या स्टँपेडर्सच्या स्वागतासाठी सज्ज होतं. किनार्‍यावर उतरणार्‍या प्रत्येक स्टँपेडरने स्वतःला चिमटा काढून नक्किच पाहीलं असणार. समोर दिसतय ते खरं आहे का? आपण खरंच क्लोंडायकला पोचलोय का? आणि उत्तर होतं - हो! जून महिन्याच्या तळपत्या उन्हात झळाळणारं ते शहर होतं 'डाउसन'. अल्पावधीतच गर्दी करुन दाटीवाटीने पसरलेलं.

मृगजळ पकडण्याचं स्वप्न उराशी बाळगून महिनोमहीने स्टँपेडर्सनी केलेल्या वेड्या धडपडीचा तो शेवट होता. पण मृगजळ खरंच लागतं का हो हाताला?

क्रमश:

संदर्भ :
१) Yukon Gold (Charlotte Foltz Jones)
२) Alaska: Celebrate the States (Marshall Cavendish)
३) Mission Klondike (James M. Sinclar)
४) Alaska : saga of a bold land (Walter R. Borneman)
५) Gamblers and Dreamers: Women, Men, and Community in the Klondike (Charlene Porsild)
६) Klondike Gold Rush Museum - National Historical Park, Seattle Unit
७) Skagway - City of the new Century : Lynn Canal Publishing

इतिहासलेख

प्रतिक्रिया

खेडूत's picture

30 Jun 2013 - 11:33 pm | खेडूत

फारच छान! :)
उत्कंठा वाढतेय! पु. भा. प्र.
(तरीही सोन्यासाठी इतके जिवावर उदार होणे पटणारे नाही. त्या काळी सोन्याचा भाव कितीसा असेल?)

(तरीही सोन्यासाठी इतके जिवावर उदार होणे पटणारे नाही. त्या काळी सोन्याचा भाव कितीसा असेल?)

खरंय. मंदीची फारशी झळ न लागलेल्या आताच्या काळात एवढी धडपड पटत नाही. पण १८९० च्या मंदीत अमेरिकन अर्थव्यवस्था चांगलीच कोलमडली होती. बँका, व्यवसाय बंद पडले होते. सामान्य नागरीकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पदू लागली होती. कल्पना करायची झालीच तर मुंबईत जेव्हा गिरणी कामगारांचा संप हाणून पाडण्यात आला तेव्हा जी परिस्थिती उद्भवलेली त्या वेळी जर कुणी भारतात सोनं सापडल्याची आवई उठवली असती तर नक्कीच थोड्याफार प्रमाणात गोल्ड रश पहायला मिळालीच असती.

बाकी सोन्याचा भाव त्याकाळी साधारण एक औंस सोन्याला $१७ च्या आसपास होता.

प्यारे१'s picture

30 Jun 2013 - 11:40 pm | प्यारे१

लेखमालेसाठी घेतलेले श्रम दिसून येत आहेत.
सवडीने पूर्ण वाचण्यात येईल. ही पोच.
शुभेच्छा.

जेपी's picture

1 Jul 2013 - 12:15 pm | जेपी

सध्या डिस्कव्हरी वाहिनीवर gold rush नावाचा कार्यक्रम चालु आहे . सध्याच्या युगात तिथे कसे सोने काढतात ते दाखवतात .या लेखा सोबत तुलना करताना कल्पना येते जुना काळ कसा अवघड असेल

जेपी's picture

1 Jul 2013 - 12:16 pm | जेपी

सध्या डिस्कव्हरी वाहिनीवर gold rush नावाचा कार्यक्रम चालु आहे . सध्याच्या युगात तिथे कसे सोने काढतात ते दाखवतात .या लेखा सोबत तुलना करताना कल्पना येते जुना काळ कसा अवघड असेल

जेपी's picture

1 Jul 2013 - 12:18 pm | जेपी

सध्या डिस्कव्हरी वाहिनीवर gold rush नावाचा कार्यक्रम चालु आहे . सध्याच्या युगात तिथे कसे सोने काढतात ते दाखवतात .या लेखा सोबत तुलना करताना कल्पना येते जुना काळ कसा अवघड असेल

रामपुरी's picture

2 Jul 2013 - 3:44 am | रामपुरी

पण आवडला. पु भा प्र.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2013 - 7:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्टँपेडर्सबरोबर आम्ही वाचकही क्लोंडायकला पोहचलो. लेखन शैली सहज सोपी असल्यामुळे लेखन वाचायला मजा येत आहे. बाकी, लेखनात चित्र ड्कविण्यासाठी University of Washington ची परवानगी घेऊन लेखनात चित्र डकवली. आपलं लेखन परिश्रमाचं कौतुकच आहे.

पुभाप्र.

-दिलीप बिरुटे

बॅटमॅन's picture

8 Jul 2013 - 12:15 pm | बॅटमॅन

लेखनशैली अन परिश्रमाचे खरेच कौतुक करावे तितके थोडेच.

कवितानागेश's picture

8 Jul 2013 - 12:23 pm | कवितानागेश

छान आहे लेखमाला. मेहनत तर दिसतेच आहे.

किलमाऊस्की's picture

9 Jul 2013 - 7:37 am | किलमाऊस्की

थँक्यू!!!

प्रसाद गोडबोले's picture

7 Jul 2013 - 2:49 pm | प्रसाद गोडबोले

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

पैसा's picture

8 Jul 2013 - 9:06 pm | पैसा

पुढचा भाग वाचायची प्रचंड उत्सुकता आहे.

अजो's picture

8 Jul 2013 - 9:47 pm | अजो

+१ पुभाप्र

या मालिकेतील पुढील लेख - क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ८