अन्नधान्य स्वस्त आहे
अन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे
(फक्त कारण एवढे की अन्नधान्ये स्वस्त आहे)
शेर नाही चांगला की, मी नसे कळपात त्यांच्या?
दाद का आलीच नाही, छान! वा... वा!! मस्त आहे!!!
मी म्हणालो फक्त इतुके "शब्द माझे शस्त्र आहे"
चक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे
अर्थसंकल्पात होती खायसाठीची व्यवस्था
कागदावर आकडे अन् माल सारा फस्त आहे
कोण गेले, कोण मेले, कोण पुसतो काळजीला
झोपली सद्भावना अन यादवी आश्वस्त आहे
पुस्तकाने कोणत्याही नोंद नाही घेतली की
कष्ट आणिक भाग्य-लक्ष्मी हाच रेशो व्यस्त आहे
कोरडा दुष्काळ तेव्हा पांढरे पक्षी दिसेना
कंच पिकलेल्या सुगीला मात्र त्यांची गस्त आहे
नापिकीच्या पावलाने काळ हा सोकावलेला
या शिवाराचा जणू तो नेमला विश्वस्त आहे
कोरडे जेव्हा भगोणे, पीठ-मिरची सापडेना
मीच माझी भूक तेव्हा, रोज केली ध्वस्त आहे
तो म्हणाला काव्य कसले? 'अभय' गझला फालतू या
(लेखणीच्या पाभरीने जीवजंतू त्रस्त आहे)
- गंगाधर मुटे 'अभय’
------------------------------------------------------
प्रतिक्रिया
28 May 2013 - 5:56 am | स्पंदना
__/\__.
28 May 2013 - 9:53 am | चाणक्य
जमलिये...
29 May 2013 - 2:02 pm | अत्रुप्त आत्मा
प्रत्येक ओळीला टाळ्या!!!
30 May 2013 - 2:23 am | पिवळा डांबिस
गजल आवडली.
30 May 2013 - 4:02 am | अर्धवटराव
पण या दु:खात लाचारी नाहि, तर दग्धता आहे.
याची गोमटी फळे नक्की मिळातील.
अर्धवटराव
8 Nov 2018 - 11:06 am | गंगाधर मुटे
https://www.facebook.com/photo.php?fbid=1509736822632970&set=a.138211950...
Devdatta Sangep साहेब, धन्यवाद!
समीर सावंत साहेब, हा प्रकार चांगला नाही. याला चोरी म्हणतात. ज्याचे काव्य असेल त्याच्या नावाने टाकावे.
शिवाय मूळ काव्याशी छेडछाड करून त्याला विद्रुप करू नये.