घरापासून थोड्या अंतरावर, पण हाउसिंग कॉम्लेक्समधेच मेडिकलचं दुकान.
आमचं आरोग्य असं की केमिस्टचं अर्धं दुकान गिळून जिवंत रहावं लागतंय. पण ते आता ठीकच. मी ठरीव गोळ्या मागितल्या. त्यानेही माझ्यासाठी ष्टॉक करुन ठेवलेल्या होत्या त्यातल्या काढून दिल्या.
मेडिकलवाला म्हणजे फक्त केमिस्ट आणि ड्रगिस्ट नव्हे. मेडिकलच्या दुकानात मॅगी, ब्रेड, बटर, कोक-पेप्सी आणखीही काय काय मिळतं.
तसंच आईसक्रीमही मिळतं. बाहेरच क्वालिटी वॉल्सचा आईसक्रीम फ्रीझर ठेवला आहे.
पुन्हा एकदा तंगडतोड करायची टळावी म्हणून घरी फोन केला,"काही आणायचं आहे का?"
"आईसक्रीम आण", अर्धांगाकडून आवाज आला.
"कोणतं आणू", मी नेमकेपणा शिकलो आहे. बरीच वर्षं झाली लग्नाला.
"तुला माहीत आहे मला कुठलं आवडतं. नसेल आठवत तर काहीच आणू नको", अपेक्षित उत्तर आलं.
तिढे पिळणं हे जुनाट संसारात फार वाईट, त्यामुळे आईसक्रीम न नेण्यात अर्थ नव्हता. मग आठवलं की हिला आईसफ्रूटच्या कांड्या आवडतात. रासबेरी वगैरे. आता वॉल्सच्याही मिळतात अशा कांड्या.. पॅकिंगमधे. हायजेनिक असतात.. म्हणजे वायाळ काही खाल्ल्याचा फील नको.
नेमकं जे हवं ते वेळीच आठवल्याने आनंदलो. मग लक्षात आलं की घरी पत्नीखेरीज अजून एक पोर आहे. त्याच्यासाठीही आणखी एक आईसकांडी घेतली पाहिजे. तीही हुबेहूब त्याच फ्लेवरची आणि त्याच मापाची. अन्यथा घरी पोचल्यावर काटेकोर तुलनेतच दोन्ही विरघळून जातील.
विचारप्रक्रियेनुसार केमिस्टला तो फ्रीझर उघडायला लावून दोन रासबेरी कांड्या घेतल्या.
माझ्याच बाजूने आणखी एक छोटासा हात त्या फ्रीझरमधे घुसला. त्या हाताने एक चॉकोबार उचलला आणि उलटसुलट करुन न्याहाळायला सुरुवात केली.
ती एक पाच-सहा वर्षांची छोटी पोरगी होती. सोसायटीतलीच कुणी. तिच्या दुसर्या हातात दहाची एक नोट होती.
न्याहाळता न्याहाळता तिचा चेहरा एकदम उतरला आणि तिने तो चॉकोबार परत फ्रीझमधे ठेवला.
मग तिने दुसरी फ्रूटवाली कांडी उचलली. स्ट्रॉबेरीवाली.
तीही घाईघाईने न्याहाळली. उलटसुलट करुन.
वरुन ऊन मेंदूला वितळवत होतं. केमिस्ट वेंगला होता.
"जल्दी ले लो जो लेना है..फ्रीझ खुलवाओ मत बार बार..आईसक्रीम पिघल जाती है..", तो मुलीवर ओरडला.
मुलगी एकदमच घाईत आली. "एक मिनिट अंकल", असं म्हणत पटापट एकेक आईसफ्रूट उचलून त्याची किंमत शोधायला लागली. तिला विचारायला ऑकवर्ड होत होतं.
तो खत्रूड "अंकल" माझी दोन आईसफ्रुटं घेऊन कॅरीबॅगेत टाकायला आत गेला. तेवढ्याने पोरीला थोडी उसंत मिळाली आणि ती आणखीनच घाईने वेगवेगळ्या फ्लेवरच्या आणि आकाराच्या आईसकांड्या उचलून बघायला लागली.
मीही मग त्यात ओढला गेलो.
तशी व्हरायटी खूप जास्त नव्हती. तिच्या हाती त्याच त्याच प्रकारच्या कांड्या पुन्हा पुन्हा यायला लागल्या. सर्वांचं पॅकिंग आकर्षक. पण किंमत वीस किंवा तीस रुपये.
केमिस्टअंकल परत आला.
"अंकल .. दसवाला कोई है?", तिने पराभव स्वीकारला.
"नही.. बीस से स्टार्ट..", त्याने खाडकन फ्रीझचं दार सरकवून बंद केलं.
माझा हात एकदम पुढे झाला. तोंडात शब्द आले "उसे दे दो जो भी चाहिये.. और मेरे टोटल में जोड दो.."
पण ते शब्द बाहेर आले नाहीत.
मी माझ्या लहानपणी कितीदातरी अशी आईसक्रीम सुकल्या ओठांनी सोडली आहेत.. एखादा रुपया कमी असल्याने. त्या मुलीलाही घरची गरीबी होती असं दिसत नव्हतं. पण एक भलतीच विचित्र भावना माझ्या मनात येत होती.
चॉकलेटवाले गंदे अंकल.. बिटर चॉकलेट.. असे शब्द मनात भरुन राहिले होते. बातम्या दाखवणार्या बर्याच चॅनेल्सनी गेल्या काही दिवसात डोक्यात ठोकून घट्ट केलेले शब्द.
मी माझ्या पोरासाठी आईसक्रीम नेत होतो.. त्या पोरीइतकाच माझा पोरगा.. त्या पोरीचं मन ज्या आईसक्रीमवर आलंय ते मी तिच्या हातातल्या पैशात थोडीशी भर घालून तिला घेऊन देऊ जात होतो.. पण..
पण माझ्या लहानपणी कोणी अनोळखी अंकल पटकन पैसे काढून जी ऑफर करु शकत होते ती करायला गेलो तेव्हा आज मी गोठलो. आईसकांडीच्या गारठ्याने बोटं गोठली होती.. पण तेवढंच कारण नाही.
...
हिला मी आईसक्रीम दिलं तर त्या उतरलेल्या चेहर्यावर लग्गेच हसू फुलेल.
मग उद्या ही मुलगी तिच्या आईबाबांसोबत बागेत, सोसायटीत सायकल चालवताना कुठेही भेटली की माझ्याकडे बघून पुन्हा तसंच हसेल.. ओळखीचं..
मीही हसेन.
मग तिचे आईवडील तिला खोदून खोदून विचारतील.. "कोण आहेत हे?"
ती म्हणेल "आईसक्रीमवाले अंकल"..... ????
....
त्यांना धस्स होईल. ते रागावतील तिला.. अनोळखी लोकांकडून आईसक्रीम घेतलंसच कसं? असं म्हणून.. दिल्लीच्या केसमधे असंच चॉकलेट देऊन तिला घेऊन गेला होता.
तिला ते नवीन पद्धतीनुसार शिकवतील.. स्पर्शातला फरक ओळखायला.. टीव्हीवर दाखवत होते तसं.. बॅड टच.. गुड टच..
त्यांचंही बरोबर आहे. मी कोण टिक्कोजीराव म्हणून मला त्यांनी सज्जन समजावं आपोआप.. हल्ली तर बापही असे निघतात..
....................................
नकोच ते..
तिला आईसक्रीमची इच्छा मारु दे आणि मला तिचं हसू पाहण्याची..
......
मी आईसक्रीमवाला गंदा अंकल ? नाही
मी तिचा कोणीच नाही.. म्हणून गंदाही नाही..
"आईसक्रीमवाले अच्छे अंकल" असा ऑप्शन शिल्लक नाही माझ्यासाठी.
तिच्यासाठी मी केमिस्टच्या दुकानात दिसलेला आणखी एक कोरडा ठणठणीत प्रौढ चेहरा. तोच बरा.
.......................
माझी कॅरीबॅग उचलून एका अनोळखी नात्याचा गळा घोटत मी नात्याच्या लोकांकडे परतण्यासाठी चालू पडलो.
प्रतिक्रिया
27 May 2013 - 3:44 pm | चाणक्य
.
27 May 2013 - 3:44 pm | बिपिन कार्यकर्ते
!
पण ही एक शक्यताच बरं का... अनेकातली जस्ट एक.
27 May 2013 - 3:46 pm | गवि
अगदी मान्य..शक्यतेची मनाला भीती किती बसते ते आपल्या आसपासचं जग वेळोवेळी ठरवत असतं की काय असं वाटतं.
असो.
27 May 2013 - 3:49 pm | बिपिन कार्यकर्ते
बाय द वे, या निमित्ताने काही बिटर वास्तव किती प्रकर्षाने आपल्या आजूबाजूला वावरतंय याची जाणिव परत एकदा वर आली! अगदी परिणामकारक लेखन.
27 May 2013 - 11:30 pm | माझीही शॅम्पेन
सुरेख लेख ,
लक्षवेधक वळणं घेऊन डोक्याला भूंगा लावणारा लेख !
सगळ्या लोकानी तुमच्या सारखा विचार केला तर काहीच समस्या येणार नाहीत पण
ते होणें नाही तो पर्यंत असाच चालू राहणार
28 May 2013 - 7:32 am | सखी
वेदनेतुन सुंदर गोष्टी जन्माला येतात हे पुलंच वाक्य लेखाला लागु होते असे वाटते. सध्याच्या काळात बेकार लोकांमुळे ताकही फुंकुन पिलेलेच बरे त्या निष्पाप जिवांकरता.
27 May 2013 - 3:49 pm | प्रभाकर पेठकर
क्या बात है गवि. फार छान लिहीलं आहे. योग्य तेच केलंत. मनाला फार भिडलं लिखाण.
काही मोजक्या हलकट माणसांनी आपला निर्मळ आनंदही हिरावून घेतला आहे.
27 May 2013 - 4:01 pm | उदय के'सागर
काही मोजक्या हलकट माणसांनी आपला निर्मळ आनंदही हिरावून घेतला आहे. >>> अगदी हेच म्हणायचं आहे...
मलाही मुलीची भारी हौस (पण नाहीये :() ... सोसायटी मधे लहान मुलं खेळत असले की त्यात जावं वाटतं बोलावं वाटतं.. विशेषतः लहान गोड मुली दिसल्या की त्यांना उचलावं वाटतं, त्यांच्याशी 'बोबड्या' गप्पा माराव्या वाटतात. पण मग स्वतःलाच रोखतो की नको उगीच त्यांच्या पालकांना 'असले' संशय यायला ... किती वाईट ना पण ... जसं पेठकर काका म्हंटले तसं ह्या मोजक्या हलकट माणसांनी आपला निर्मळ आनंदही हिरावून घेतला आहेच पण त्यांच्या मुळे आपणच आपल्यावर संशय घ्यायला लागलोय... गरज नसतांना आणि माहिती असतांनाही प्रत्येकाला इथे ताक फुंकूनच प्यावं लागतंय :(
27 May 2013 - 4:03 pm | इनिगोय
एखादं लहान मूल कोणत्या अनोळखी माणसासोबत बोलतंय हे दिसलं की डोक्यात किडा वळवळतो आताशा.
तुम्ही केलंत ते योग्यच. अनोळखी माणसावर चटकन विश्वास टाकू नये, हे तिला शिकायलाच लागणार आहे. कारण यावेळी तिला तुम्ही भेटलात, पण म्हणून पुढल्या वेळी तिला भेटतील ते अंकल अच्छे असतीलच कशावरून?
27 May 2013 - 11:20 pm | कोमल
खरंय ग इने, आज काल लहान मूल दिसलं ना की माझी नजर तिची आई शोधायला लागते. कधी काय होइल काही सांगता येत नाही.
27 May 2013 - 4:07 pm | मदनबाण
मनातल लेखन !
साला हल्ली बलात्कार करण्याची इच्छा असलेल्या मानसिकतेत वाढ होते आहे की काय याचीच भिती वाटत आहे,काही दिवसांपूर्वीच एका लग्नात अशी गोष्ट घडली आहे,खालच्या माळ्यावर लग्न सुरु असताना,तिथल्या एका मुलील्या त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर नेउन बलात्कार केला होता.
27 May 2013 - 4:12 pm | सौंदाळा
बाकी आम्ही क्वलिटी वाल्स खाणे बंद केलय.
ते आता आईसक्रीम राहीले नाही तर फ्रोझन डेसर्ट झालयं
'धिस प्रॉडक्ट कंटेन्स परमिसिबल अमाउंट ऑफ ईडिबल व्हेगीटेबल ऑईल' अशी सुचना असते आता त्यावर
27 May 2013 - 4:16 pm | पैसा
नेमक्या भावना चितारल्यात.
27 May 2013 - 11:27 pm | मी-सौरभ
सहमत आहे
28 May 2013 - 9:39 am | मूकवाचक
+१
28 May 2013 - 9:48 am | मोदक
+१ हेच बोल्तो...
27 May 2013 - 4:26 pm | गुलाम
मला वाटायचं, हे 'असले' विचार फक्त माझ्याच डोक्यात येतात. ऊगाचच असले घाणेरडे विचार कोण कशाला करेल?? पण बर्याच लोकांच्या डोक्यात ही भिती आहे असं दिसतंय.
"सत्यमेव जयते" मधून जनप्रबोधन निश्चितच झाले पण लोकांच्या नजराही गढूळ झाल्या. अर्थात त्याला काही ईलाज नव्हता.
बाकी लेख एकदम 'गवि' टच!!! सुंदर.
--------------------------------------------
27 May 2013 - 4:44 pm | खेडूत
सही उतरलंय !!
अशीच व्यवस्थेची अवस्था झालीय खरी पण आता बदलायची शक्यताही दिसत नाही.
आता ताकही फुंकून प्यायची सवय लागलीय. काळजी घेणे आणि इतराना जागरूक करणे आपल्या हातात आहे.
पण त्यावरून आठवलं,
असाच एक काका (!) पहाण्यात आहे. तो अशा प्रकारात पकडला गेला. पोलिसांच्या तावडीतून त्याला सोडवून राजकीय लोकांनी त्याची पुनः कार्यकर्ता म्हणून स्थापना केली आहे! पण सोसायटीतली सर्व लहान मुले त्याला ओळखून आहेत आणि फटकून रहातात. तो मात्र झाले ते विसरवण्यासाठी गेली तीन वर्षे कधी स्पर्धा भरव, परीक्षेचे निकाल लागले की मुलांचे सत्कार कर, गणपतीचे कार्यक्रम अशी निमित्ते शोधत असतो - असो.
>>> "तुला माहीत आहे मला कुठलं आवडतं. नसेल आठवत तर काहीच आणू नको", अपेक्षित उत्तर आलं.
हे वाचून वपुंची आठवण आली ( When you write more and more personal, it becomes more universal..)
आणखी एका मस्त लेखासाठी पुन्हा धन्यवाद!
27 May 2013 - 7:43 pm | काळा पहाड
नाव घ्या हो नाव घ्या. त्या माणसाचं पण आणि पक्शाचं पण.
27 May 2013 - 5:01 pm | तुमचा अभिषेक
एक जुना किस्सा आठवला हे वाचून, (कसा अचानक आठवला देवास ठाऊक), जुन्या बिल्डींगमध्ये आम्ही मुले रोज रात्रीचे जेवण झाल्यावर चकाट्या पिटत दादरावर (कॉमन पॅसेज) बसायचो. तिथून दूरवरच्या काही घरांचे दरवाजे डोळ्यासमोरच असायचे. एकदा असेच त्यापैकी एका घरातील लहान मुलीला साडी नेसवून तिचे कौतुक चालले होते. मी देखील इथून कौतुकाने बघू लागलो. नजर एकटक तिथेच, त्यावर माझ्या मित्राने मला हटकले, "अरे ए चु.., असा बघू नकोस" मला पहिले तो काय बोलतो हे समजलेच नाही. समजले तेव्हा मी वैतागलोच, "अबे लहान मुलगी आहे ती.." .. पुढे सर्वांच्या चर्चेअंती हाच निष्कर्श निघाला की आपल्या मनात काही असो वा नसो, एखाद्या लहान मुलीबद्दल असे विचार करणार्यांबद्दल आपल्या स्वतालाही किती किळस अन राग का असेना, याबाबत अश्या प्रकारची काळजी घेणेच उत्तम.
पण तरीही तेव्हा मला ते नाही पटले ना आजही पटत. आपले मन साफ आहे, आपली नजर साफ आहे तर हा विचार मनाला नाही शिवला पाहिजे.
अगदी आजही मी ट्रेनमध्ये एखाद्या कॉलेजच्या ग्रूपकडे बघून थोडासा नॉस्टेल्जिक होऊन मनाने त्यांच्यातच मिसळतो. अश्यावेळी माझी नजर म्हणा किंवा माझे लक्ष्य म्हणा त्यांच्या गप्पांवरच लागले असते. अन माझ्या शेजारी बसलेली बायको मला हटकते, "मला माहीत आहे तू सहज बघतोयस पण तरीही नको उगाच गैरसमज..."
यावेळी मात्र मला पटते बायकोचे. कारण समोरच्या ग्रूपमधील मुली कॉलेजगोईंग आणि तरुण असतात, काळजी घ्यायलाच हवी भले आपल्या मनात तसे काही का नसेना..
असो, पण माझ्यामते लेखात उल्लेखलेल्या घटनेत असा विचार आपल्या मनात येत असेल तर आपलेच नक्की काहीतरी चुकतेय. (इथे आपण म्हणजे सभ्य सुसंस्कारीत समाज ज्याचा टक्का आजही मोठाच आहे.) पण काय चुकतेय ते आता मलाही सांगता येणार नाही, लेख आवडला, पटकन जे आठवले सुचले ते मांडले..
27 May 2013 - 5:10 pm | गणपा
येवढ्या लहानश्या वेळात मेंदूत किती ती चक्र फिरली गवि?
मी नसता ईतका विचार केला. मनात आलं असतं अन पटकन देउन मोकळा झालो असतो.
पण सध्या घडणार्या घटना वाचता तुमचं काही चुकलं नाही हे ही खरचं.
28 May 2013 - 9:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> येवढ्या लहानश्या वेळात मेंदूत किती ती चक्र फिरली गवि ?
+१
>>>मी नसता ईतका विचार केला. मनात आलं असतं अन पटकन देउन मोकळा झालो असतो.
अगदी खरं आहे. सेम टू सेम हियर.
>>> पण सध्या घडणार्या घटना वाचता तुमचं काही चुकलं नाही हे ही खरचं.
गविशेठचं काही चुकलं नाही. बरोबरच आहे. काळ मोठा वाईट आहे.
पण तिच्या चेहर्यावरचा आनंद बघायला हवा होताच असं वाटलं.
-दिलीप बिरुटे
29 May 2013 - 10:41 pm | सुहास झेले
अगदी ह्येच बोलतो....
27 May 2013 - 5:18 pm | प्यारे१
मलाही योग्यच वाटलं तिला आईसक्रीम न देणं.
म्हणजे मोलेस्टेशनचा वगैरे विचार नाही.
काही गोष्टी लहानपणी न मिळणं चांगलंच.
मागं लागणारा भुंगा आयुष्यभर कामाला येतो.
मला नाही मिळालं, मी असं काही करीन ज्यानं ते मिळवण्याची क्षमता माझ्यामध्ये येईल.
वयाच्या एका टप्प्यावर आईवडलांविषयी कदाचित चीड निर्माण होते पण स्वतः त्या भूमिकेत गेल्यावर ती भावना देखील निघून जाते.
बाकी
>>>तिढे पिळणं हे जुनाट संसारात फार वाईट
>>>पत्नीखेरीज अजून एक पोर आहे.
अशी गविंची काही स्पेशल वाक्यं मस्तच.
27 May 2013 - 5:22 pm | ज्ञानोबाचे पैजार
बर झाल गवि त्या मुलीला तुम्ही आइस्र्कीम घेउन दिले नाही. त्या बद्दल तुम्हाला वाईट वाटायचे देखील काही कारण नाही.
आता ती ते पैसे स्वतः कडे निट जपुन ठेवेल. केव्हातरी अजुन दहा रुपये मिळण्याची वाट बघेल किंवा आई बाबांकडे हट्ट करेल आणि मग उद्या किंवा परवा त्याच दुकानातुन आइस्क्रीम घेइल. आणि त्या वेळी जो आनंद तिच्या डोळ्यात असेल तो इंस्टंट आइस्क्रीम मिळाले म्हणुन होणार्या आनंदापेक्षा कितीतरी जास्त असेल.
अशा लहान लहान प्रसंगातुन मुले बरेच काही शिकत असतात (संयम, बचत, अपमान सहन करण्याची ताकद ई.) त्या मुळे बरे झाले तुम्ही तीला उगाचच दया दाखवली नाही.
27 May 2013 - 5:28 pm | गवि
हे अगदी खरं आहे. हा अँगलही त्या वेळी मनात आला नाही. कारण त्याआधीच हे सर्व आलं.
नंतर पश्चातबुद्धीने बाकी सर्वही सुचलं. तिला रेडीमेड न मिळणं, संघर्षाचं महत्व, संयम वगैरे.
पण कधीकधी अशा पटकन मिळून जाण्यातही वेगळाच आनंद असतो पोरांना. सुटीत आजोबांकडे जायचो तिथे वाड्यात असलेले एक किराणामाल दुकानदार काका आम्हाला कधीकधी एकेक लिमलेट किंवा रावळगाव गोळी फुकट द्यायचे. आम्ही आशाळभूतपणे बरणीकडे बघत राहिलो की हळूच एखादेदिवशी द्यायचे.. रोज ही ट्रिक चालायची नाही, पण एकदा-दोनदा चालली आणि निखळ आनंदच मिळाला. संघर्ष वगैरे नंतर नको नको म्हटलं तरी शिकायचाच आहे.
27 May 2013 - 6:39 pm | लाल टोपी
ती पुढे मागे आपण म्हणता तशी शिकेलही पण निरागस चिमखड्या चेह-यावर हसू फुलवण्याचा आनंद आपण गमावला हेही खरेच.. गवि खुप परीणामकारक लेखन.
27 May 2013 - 5:33 pm | अद्द्या
लेख वाचताना वाटलं . गावी शेवटी लिहितील .
"मरुदे च्यमाइला . कोण काय करतो बघू . मुलगी खुश होतीये ना . देतो पैसे "
पण मग . खालच्या प्रतिसादांमधले विचार नको असताना सुद्धा पटत गेले .
असा अनुभव आलाय एक दोनदा . .
काही कारणानिमित्त शाळेत जायचा प्रसंग आला होता . ग्यादरिंग असावं .
चौथी पाचवी च्या मुली नाचत होत्या .
तो आम्ही बघत असताना . आमच्या बाजुला बसलेल एक गृहस्थ एकदम म्हणाले .
"लहान मुलीना पण एवढ टक लाऊन काय पाहताय " .
डोक्यात एवढी तिडीक भरली .
बुकललं असतं त्याला तिथेच
नशिबाने तिथे आमचे जुने कोच पण होते . त्यांनी ऐकलं होतं हे .
ते म्हणाले . साहेब . तुम्हाला तसं वाटतं . म्हणून त्यांचे विचार पण तसे असतील असं नाही .
या मुलांपैकी एकाची बहिण पण आहे त्या नाचणाऱ्या मुलीन मध्ये . .
27 May 2013 - 6:14 pm | स्पंदना
सगळच बिघडलय.
पण एक विचारु? पुर्वी हे नव्हत अस वाटतय का?
तेंव्हा बोलायची मुभा नव्हती समाजात अन आता मिळते आहे एव्हढच.
तरीही एक अमानुषपणा आलाय समाजात हे ही खरच.
एकुण दुपार बरीच जिव्हारी सलत राह्यली. असु दे.
27 May 2013 - 6:23 pm | बॅटमॅन
खरंय :( तेव्हा असे बरेच काही दडपल्या जायचे. आणि "तेव्हा" ची व्याख्या ३०-४० वर्षेसुद्धा असायचे कारण नाही. १०-१५ वर्षांपूर्वीसुद्धा जास्त बोलायची पद्धत नव्हती. या गलिच्छ गोष्टीबद्दल बोलावे तितके थोडेच आहे, असो.
28 May 2013 - 12:42 am | चिगो
आधीच्या काळीही हे असेल. बाहेर येत नसेल, दडपले जात असेल.. पण आता सततच्या भडिमारामुळे जे कधीतरी, कुठेतरी होत असेल ते आपल्या खुप जवळ आल्याची भावना वाढीस लागतेय.. नजरा गढुळल्या आहेत. मनं काजळली आहेत..
एकदा मेडिकलच्या दुकानात गेलो असतांना तिथला दुकानदार एका दहाएक वर्षाच्या मुलीला चाॅकलेट्स गिफ्ट देत होता. ओळखीतली असेल असं त्यांच्या वागण्याबोलण्यातुन वाटलं. ती मुलगी चाॅकलेट्स घ्यायला आढेवेढे घेत होती, तर त्याने तिला लाडाने दरडावत, तिच्या गालाला हात लावून तिला चाॅकलेट्स घ्यायला लावली. तेव्हा माझ्या मनात पाल चुकचुकली होती.. काही बोललो नाही, कारण त्यांच्या मनात काही नसेलही कदाचित, काय सांगावं ?
गवि, लेख अत्यंत मार्मिक.. विचार करायला भाग पाडणारा आहे.. पटला आणि आवडला..
27 May 2013 - 7:11 pm | आदूबाळ
सुंदर लेखन.
काही हरामी लोकांमुळे संपूर्ण समाजावरच दबून आखडून रहायची वेळ येते. खूप खोट्या नोटा चलनात आल्या की खर्या नोटांकडेही संशयाने पाहिलं जातं तसं.
तुमचा अभिषेक आणि प्यारे१ यांचे प्रतिसादही आवडले.
27 May 2013 - 7:35 pm | काळा पहाड
हे लोक अशा लोकांना पकडल्यावर पोलिसात कशाला देतात? अशा लोकाना माहिती आहे की कायदा आपले काही करू शकत नाही त्यामुळे त्यांचे फावते. ही 'काँग्रेस' मेंटॅलेटी संपवायची तर अशा लोकांना जमावानेच जागेवर संपवायला हवे. मॉब ने केलेला खून खून नसतोच मुळी. मॉब वर गुन्हा दाखल करता येत नाही. आणि लागतय काय अशा लोकांना संपवायला? थोडेफार दगड.
बाकी हे माझेच निरिक्शण आहे का की या गुन्ह्यात युपी बिहार वाले किंवा एका विशिष्ट समाजाचेच लोक (नाव बोलत नाही कारण आधी पण नाव घेतल्यावर रिप्लाय उडवला गेलाय!) बहुसंख्येने असतात?
27 May 2013 - 8:06 pm | इनिगोय
अशा एका घटनेत समाजाने मिळवलेला न्याय.
28 May 2013 - 4:57 am | स्पंदना
थँक्स ग लिंकेबद्दल.
अगदी पोलीससुद्धा सामिल होते त्या गुंडाला.
प्रश्न इतकाच आहे की ज्या कोणाला आपण शिक्षा करतो आहे तो नक्की गुन्हेगार आहे का?
अर्थात तिथल्या तिथे पकडले तर दगडच काय काट्या चमच्यानेही चेचता येइल.
27 May 2013 - 7:49 pm | निशिगंध
अजुन कसे दिवस येणार आहेत....देव जाणे!!!!
27 May 2013 - 7:50 pm | टवाळ कार्टा
त्या मुलीलासुध्धा सवय होइल अनोळखी लोकांकडुन काहीही न घेण्याची
27 May 2013 - 7:58 pm | श्रीगुरुजी
खूप विचार करायला लागणारा अनुभव!
27 May 2013 - 8:15 pm | निनाद मुक्काम प...
शीर्षक आवडले.
आणि केले ते योग्यच केले
दिवस वाईट आलेले आहेत , आणि पालक धास्तावलेले आहेत.
राईचा पर्वत होणे सहजशक्य आहे.
जुन्या काळातील काबुलीवाला आठवला
डोळे टचकन भरून आले.
क्या से क्या हो गया,
27 May 2013 - 8:43 pm | मुक्त विहारि
आवडला..
28 May 2013 - 8:00 am | विनायक प्रभू
आ व ड ला.
28 May 2013 - 8:32 am | मी_देव
मनाला भिडला. तुम्ही जे केलेत तेच योग्य होते, पण... लहानसा अनुभव खुप विचार करायला लावणारा.. आवडला खुप..
अवांतर -
- spot on :)
28 May 2013 - 8:34 am | रेवती
माझ्या मुलाला जर अनोळखी मनुष्यानं पैसे/ खाऊ दिलाय असं कानावर आलं असतं तर माझी शंका फिटेपर्यंत लक्ष ठेवलं असतं (निदान सहा महिने) शिवाय काळजी करत बसले असते. मुलीला खाऊ आज ना उद्या मिळेल पण तिच्या आईवडीलांना वाटलेल्या काळजीचा विचार केल्यास केलेली कृती बरोबर होती असे दिसून येईल. इनि म्हणते तसं यापुढच्या अनुभवातले अंकल अच्छे नसले तर आणखी नुकसान!
28 May 2013 - 8:41 am | योगी९००
आवडला लेख. वाचून सुन्न झालो.
काही आवडलेली वाक्य..( गविटच गविटच म्हणतात तो हाच...)
तिढे पिळणं हे जुनाट संसारात फार वाईट..
अन्यथा घरी पोचल्यावर काटेकोर तुलनेतच दोन्ही विरघळून जातील...
आईसकांडीच्या गारठ्याने बोटं गोठली होती.. पण तेवढंच कारण नाही.
मी कोण टिक्कोजीराव म्हणून मला त्यांनी सज्जन समजावं आपोआप.. हल्ली तर बापही असे निघतात..
तिला आईसक्रीमची इच्छा मारु दे आणि मला तिचं हसू पाहण्याची..
मी तिचा कोणीच नाही.. म्हणून गंदाही नाही..
तिच्यासाठी मी केमिस्टच्या दुकानात दिसलेला आणखी एक कोरडा ठणठणीत प्रौढ चेहरा. तोच बरा.
माझी कॅरीबॅग उचलून एका अनोळखी नात्याचा गळा घोटत मी नात्याच्या लोकांकडे परतण्यासाठी चालू पडलो.
28 May 2013 - 9:55 am | मीउमेश
त्या लहान मुलीच्या चेहर्या वरिल आनन्द पाहन्यासाठि मी दिले असते पैसे
28 May 2013 - 10:21 am | ब़जरबट्टू
विचार करायला लावणारा लेख. पण समजा तुम्ही ते पैसे दिले असते, तर तिला तर त्यात आनंद मिळाला असता ना, आणि तुम्हाला तर जास्तच तिचे हसू पाहुन.... आपले चुकता नाहीये का नेहमी नकारात्मक विचार करून ? त्या मुलीला केव्हा कळेल की समाजात चांगली लोक पण असतात. तिच्याजवळ कुठे राहतील बालपणातील चांगले किस्से ? अजून कदाचित फक्त एक गवि तयार होईल. नकारात्मक विचार असलेला. सगळे वाईटच असेल हे बिंबवले पण वाईटच…
28 May 2013 - 10:48 am | प्रभाकर पेठकर
तिच्या न कळत्या वयात कोण चांगलं आहे, कोण वाईट आहे हे न उमगून ती एखाद्या वाईट मनोवृत्तीची बळी ठरू शकते. नंतर आपण काय करायचं? जरा हळहळायचं आणि पुढे जायचं.
वाढत्या वयाबरोबर तिच्याकडे वैचारीक प्रगल्भताही येत जाईल आणि कोणाकडून मदत/उपकार घ्यावेत आणि कोणाकडून नाही ह्याचे भानही येईल. तेंव्हा तिला जर गवि आठवले तर त्यांचे हे कृत्य तिला नक्कीच योग्य वाटेल आणि गवि तिच्या आदरास पात्र ठरतील.
हा 'नकारात्मक' विचार 'सुरक्षिततेच्या' दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. एखाद्या आरोग्यदायी कडू औषधासारखा.
आमिष दाखवून लहानग्या मुलींनाही पळवून नेऊन बलात्कारासारखे पाशवी गुन्हे करणारे नराधम आजूबाजूस फिरत असताना परक्यांनीच काय पण कोणी ओळखीच्यांनी जरी, आई-वडिलांच्या अपरोक्ष, कांही देऊ केले तरी नम्रतेने नाकारण्याची सवय मुलांमध्ये रुजविण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
28 May 2013 - 10:31 am | मृत्युन्जय
पुन्हा एक सुंदर लेख. गवि रॉक्स.
28 May 2013 - 11:00 am | ५० फक्त
चांगला लेख, थोडासा पटला नाही तरी थोडा पटला.
असं चांगली माणसंच चांगलं वागण्यापासुन दुर जायला लागली तर वाईट माणसांचंच फावेल ना या जगात, कुठंतरी रस्त्यावरच्या अपघातात सापडलेल्या माणसांना पोलिसांची किटकिट नको म्हणुन मदत न करणारी माणसं,(यात मी सुद्धा आलो) आठवली.
अर्थात. लहान मुलांचं पालन पोषण पेक्षा, संरक्षण ही जास्त महत्वाची आणि अपरिहार्य गोष्ट होत चालली आहे हे खरं.
28 May 2013 - 9:28 pm | इनिगोय
खरं आहे.
आता चांगुलपणा म्हणजे लहान मुलाला खाऊचा अानंद देणे एवढंच उरलं नसून त्याला त्याच्या भोवताली असू शकतील अशा हिणकस, असंस्कृत गोष्टींपासून वाचवणं यावर येऊन पोचलाय.
खाली खबो जाप यांनी दिलेली व्हिडिओची लिंक.. हे भीषण असलं तरी ते वास्तवही आहे.. सावध असणं भाग आहे.
28 May 2013 - 11:02 am | चेतन माने
अंगावर काटा आला.
28 May 2013 - 11:16 am | खबो जाप
आज पर्यंत अशी काही तुलना होयील असे मनातसुद्धा आले नव्हते, आता कुणा छोट्याला काही द्यायचे मनात आले तर पहिल्यांदा तुमचा लेख तो विचार कुरतडेल…
" नजरा गढुळल्या आहेत. मनं काजळली आहेत.." हे मात्र नक्की…
http://www.youtube.com/watch?v=QOM-39bZgnc
हि जाहिरात बघितली तेव्हा २ दिवस विचार करत होतो असे होवू शकते ?
28 May 2013 - 11:18 am | समीरसूर
गविसाहेब,
तुमचं लिखाण इतकं कसदार असतं की ते न वाचणं म्हणजे स्वतःवर अन्याय झाल्यासारखा वाटतो. मागे तुमची बीपीओवरची कथा पण अफलातून होती. काय नेमकेपणाने भावना कॅप्चर केल्या आहेत. आणि शैली तर जबरदस्त! धन्यवाद!
ही भीती मनात असते हे खरे आहे. पुलंचा गजा खोत लहान मुलांमध्ये खूप प्रिय असतो. त्यांच्यासोबत खेळतो, त्यांना गोष्टी सांगतो, त्यांच्यासोबत तासंतास घालवतो. त्या मुलांचे आई-बाप देखील गजा खोतावर खुश असतात. पण तो जमाना वेगळा होता. आताच्या जमान्यात मुलांमध्ये इतकं समरसून खेळणं अवघड झालंय.
अगदी नेमक्या आणि भिडणार्या शब्दात अचूक भावना मांडल्यात...
28 May 2013 - 6:38 pm | सुधीर
नेहमीप्रमाणे सुंदर! गवि टच! पण एवढा विचार मी कधी करत नाही. :(
28 May 2013 - 9:14 pm | धनंजय
विचार करायला लावले.
28 May 2013 - 9:42 pm | मराठे
काय बोलायचं.. काळ बदललाय... आता मी-माझं अशी झापडं लावणंच उत्तम.
28 May 2013 - 9:46 pm | चित्रगुप्त
वाचायला चांगलं वाटलं, असं सुद्धा म्हणता येत नाहिये, पण लेखन उत्तमच.
हे हल्ली काय चाललंय, काही समजतच नाहीये.
आमच्या बाळपणाचा काळ खरंचच किती सुखाचा होता, हे असं काही वाचलं - ऐकलं की प्रकर्षानं जाणवतं.
28 May 2013 - 11:08 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
लेख भिडला. कदाचित ६-७ वर्षांपूर्वी वाचला असता तर इतका भिडला नसता, पण आता स्वतः बाप झाल्यावर हे जास्त तिव्रतेने जाणवले.
अप्रतिम लिखाण. अर्थात गवीटच असल्यामुळेच इतके भिडले, हे नाकारुन कसे चालेल?
29 May 2013 - 12:07 am | संजय क्षीरसागर
तुझ्याकडून ही अपेक्षा नाही.
बापानं बापासारखं वागावं. आपला हेतू शुद्ध आहे मग दुनियेची फिकीर करण्याचं कारण नाही. तू मनस्वी जगणारा माणूस आहेस. पुन्हा संधी आली तर मागे फिरू नकोस. दुनियेनं आपल्याला बदललं तर आपण काय जगलो? आणि आपण दुनियाची मानसिकता बदलली नाही तर जगण्यात मजा ती काय?
29 May 2013 - 9:19 am | चित्रगुप्त
@ संजयः
...दुनियेनं आपल्याला बदललं तर आपण काय जगलो? आणि आपण दुनियाची मानसिकता बदलली नाही तर जगण्यात मजा ती काय?...
- अगदी अगदी. शंभर टक्के सहमत.
29 May 2013 - 9:22 am | सुबोध खरे
शंभर टक्के सहमत.
तरीही कुठेतरी ग वि म्हणतात त्याच्याशीहि सहमत
29 May 2013 - 11:37 am | संजय क्षीरसागर
गवि मी म्हणतोय त्याच्या नेमकं विरूद्ध वागलायं.
29 May 2013 - 2:05 pm | मोदक
कदाचित ते लॉजीकली तुमच्याशी आणि प्रॅक्टिकली गविंशी सहमत असतील.
(Either My Way or Highway असे न वागणारा) मोदक.
29 May 2013 - 2:44 pm | संजय क्षीरसागर
तुम्ही तो दिलसे निवडा किंवा मग दिमागसे.
एका वेळी दोन रस्त्यांवर चालता येत नाही.
इट इज आयदर माय वे ऑर यॉर वे, बट यू हॅव टू डिसाइड ओन्ली वन वे.
29 May 2013 - 3:00 pm | मोदक
प्रत्येक क्षणी एकच पर्याय निवडावा लागतो तुम्ही तो दिलसे निवडा किंवा मग दिमागसे.
माझ्या अल्पमतीनुसार येथे "लॉजीकली दिलसे वाटणारा" पर्याय "प्रॅक्टीकली दिमागसे अवलंबलेला" आहे.
निवडलेला पर्याय एकच आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असताना तुम्ही नवे काय सांगितलेत..?
इट इज आयदर माय वे ऑर यॉर वे, बट यू हॅव टू डिसाइड ओन्ली वन वे.
वरचे उत्तर पुन्हा वाचावे!!
29 May 2013 - 3:08 pm | बॅटमॅन
तसे दिलसे सहमत!
29 May 2013 - 3:44 pm | संजय क्षीरसागर
जेव्हा तुम्ही दिलसे निर्णय घेता तेव्हा कोणताही वैचारिक उहापोह होत नाही (जसा गविचा झाला आहे)
आणि जेव्हा इतका वैचारिक उहापोह होतो तेव्हा उत्सफूर्तता हरवलेली असते. तो क्षण हातातनं निसटलेला असतो. ...गविला ती चुटपुट लागलीये, नाही तर या पोस्टची गरजच काय?
माझं उत्तर नेहमी मनलावून वाचावं (लगेच विरोधी प्रतिसाद देण्याची गडबड करू नये)!!
29 May 2013 - 3:56 pm | बॅटमॅन
थोडक्यात त्यावर वैचारिक उहापोह नको असेच ना =)) =)) =))
29 May 2013 - 9:56 pm | मोदक
तुम्ही मुद्दा का सोडताय..?
दुनियेनं आपल्याला बदललं तर आपण काय जगलो? आणि आपण दुनियाची मानसिकता बदलली नाही तर जगण्यात मजा ती काय? - संजय क्षीरसागर ..................... (१)
[(१) सोबत] शंभर टक्के सहमत. तरीही कुठेतरी ग वि म्हणतात त्याच्याशीहि सहमत - डॉ. खरे ....... (२)
डॉक्टर एक ठरवा! गवि मी म्हणतोय त्याच्या नेमकं विरूद्ध वागलायं. संजय क्षीरसागर ..............(३)
कदाचित ते लॉजीकली तुमच्याशी कदाचित ते लॉजीकली तुमच्याशी आणि प्रॅक्टिकली गविंशी सहमत असतील. - मोदक ...(४)
प्रत्येक क्षणी एकच पर्याय निवडावा लागतो. तुम्ही तो दिलसे निवडा किंवा मग दिमागसे.
एका वेळी दोन रस्त्यांवर चालता येत नाही.
इट इज आयदर माय वे ऑर यॉर वे, बट यू हॅव टू डिसाइड ओन्ली वन वे. संजय क्षीरसागर .......(५)
माझ्या अल्पमतीनुसार येथे "लॉजीकली दिलसे वाटणारा" पर्याय "प्रॅक्टीकली दिमागसे अवलंबलेला" आहे. मोदक ..(६)
जेव्हा तुम्ही दिलसे निर्णय घेता तेव्हा कोणताही वैचारिक उहापोह होत नाही (जसा गविचा झाला आहे) - संक्षी ...(७)
मुद्दा क्रमांक ६ मध्ये मी स्पष्टपणे म्हणत आहे की हा निर्णय "प्रॅक्टीकली दिमागसे अवलंबलेला" आहे* तरीही तुम्ही "जेव्हा तुम्ही दिलसे निर्णय घेता तेव्हा.." हा संपूर्णपणे गैरलागू मुद्दा लावून धरत आहात.
माझं उत्तर नेहमी मनलावून वाचावं (लगेच विरोधी प्रतिसाद देण्याची गडबड करू नये)!!
वैयक्तीक रोख जाणवल्याने ही कमेंट फाट्यावर मारण्यात आली आहे.
(अन्यथा "माझे प्रतिसाद नेहमी प्रिंटाऊट घेवून व समजून वाचावेत, असंबद्ध प्रतिसाद देण्याची गडबड करू नये! असे उत्तर देण्यास माझी ना नव्हती.)
* हाच लेखकाचा स्टँड आहे असा मी दावा करत नाहीये.
29 May 2013 - 10:11 pm | दशानन
नाहीच समजले तर प्रतिसादाची प्रिन्ट काढून पुन्हा पुन्हा वाचा समजेल असे सांगा म्हणजे कसं सोपं पडतं ;)
29 May 2013 - 10:15 pm | प्यारे१
मी कधीच प्रिंट काढलीये पण प्रिंट कोरी आली.
काय झालं कळेनाच. शब्द उडाले असावेत असा एक अंदाज आहे.
29 May 2013 - 10:51 pm | संजय क्षीरसागर
प्रतिसाद खाली दिला आहे.
29 May 2013 - 8:06 pm | सुबोध खरे
मी कसं ठरवणार ग वि नि कसं वागायचं.
माझ्यापुरतं बोलायचं तर i am neither forward nor backward but just awkward.
आणि ग वि ना विनंती " ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे"
30 May 2013 - 1:38 pm | मोदक
माझ्यापुरतं बोलायचं तर i am neither forward nor backward but just awkward.
+१११११
आणि मला कोणी विचारले तर मी सांगेन.. I am neither fascinated nor captivated but just irritated. ;-)
29 May 2013 - 12:21 pm | किचेन
आम्च्या शेजारि एक मुलगा राह्तो.सादे तिन -चार वर्षांचा.त्याला एकद त्याच्या मित्राने सांगितले' कोणि काय खायला दिल तर आइला विचारुनच खायचं' तेव्हापासुन तो शालेतल्या मिस् नि कहि दिल तरि खात नाहि.त्यचि आई जाम वैतागलि आहे.
मला लक्शमी पूजनच्या दिवशि मुलगी झालि.प्रि-टम्र असल्यामुळे तिन महिने अम्हि दोघि दवाखन्यात होतो.पन जेव्हा दिल्लितलि बातमि कळलि तेव्हा वाटलं आत्ता जावुन डोक्टरांना सांगाव ...हिचा वेंटिलेटर..सलाइन..रक्त...सगळ सगळ बन्द करा.
30 May 2013 - 1:20 pm | गणपा
सध्याची परिस्थिती पहाता एखाद्याचं फ्रस्टेशन समजू शकतो पण म्हणुन पोटच्या नवजात पिल्ला बद्दल इतके टोकाचे विचार एखाद्या आईच्या स्वप्नातही येतील का?
घोळ झाल्याने अवांतर असलेला भाग काढुन टाकत आहे.
नजरेस आणुन दिल्याबद्दल धन्स पिलीयन रायडर
30 May 2013 - 2:50 pm | पिलीयन रायडर
बहुदा गल्ली चुकली तुमची!!
29 May 2013 - 1:00 pm | आतिवास
तुमची संवेदनशीलता चांगली आहे.
पण अनेक बाबतीत जास्त विचार केला की आपण चांगलं काम करण्याच्या वृत्तीला दुस-या कशाने तरी प्रभावित करुन बसतो - हा अनुभव त्यातलाच एक.
त्या मुलीला स्वत: पैसे वाचवून आईसक्रीम घेता येईल; हवं ते लगेच मिळत नाही आयुष्यात हे समजेल - वगैरे सगळी मुलीची बाजू झाली - मुलीची 'आपल्याला' वाटणारी बाजू.
पण वाईटाच्या भीतीने आपणही चांगलं वागायचं टाळायला लागलो तर अवघड आहे.
अशा प्रसंगी मनात पहिली जी प्रतिक्रिया उमटेल (जी बहुसंख्य माणसांच्या मनात चांगलीच असते; मदत करण्याची असते...) त्यानुसार वागावं आणि विसरुन जावं हे माझ्यासाठी उत्तम आहे हे माझ्या लक्षात आलंय. :-)
29 May 2013 - 1:47 pm | नीधप
त्या मुलीला आईस्क्रीम देणे = चांगले वागणे. न देणे = वाईट असं गृहित का धरलंय सगळ्यांनी?
त्या मुलीला आईस्क्रीम देण्याने गविंना तिचा हसरा चेहरा बघता आला असता. छान वाटले असते. ते त्यांनी टाळले कारण न जाणो तेवढासा हसरा चेहरा बघण्याच्या सोसापायी कदाचित काय वाट्टेल ते आरोप होऊ शकले असते.
त्यांनी दोन्ही पर्यांयांमधले प्लस मायनस निवडून त्यांना पटेल असा पर्याय निवडला. म्हणजे त्यांनी चांगले वागणे सोडले असं कसं म्हणता येईल?
29 May 2013 - 1:50 pm | बॅटमॅन
+१११११११.
पूर्ण सहमत!
29 May 2013 - 1:53 pm | आतिवास
अवांतर होईल; म्हणून काही जास्त लिहित नाही :-)
29 May 2013 - 1:58 pm | गवि
अगदी...
आणि माझ्यावर थेट आरोप होण्यापेक्षाही (किंवा होण्याबरोबरच) त्या मुलीलाही एरवी कदाचित जो ओरडा खावा लागला नसता तो यामुळे खावा लागला असता. "असं कसं घेतलंस तू अनोळखी अंकलकडून आईसक्रीम?" असं म्हणत त्यांनी एरवी इतक्या लहानपणी कदाचित उघड केली नसती अशी बाह्यजगाविषयीची कटू माहिती तिला या निमित्ताने पुरवली असती.
ती मुलगी परिसरातली असल्याने पुन्हा दिसण्याची आणि सहजरित्या ओळखीचं हसण्याची शक्यता होतीच.. आईसक्रीम देणं दूरच आता तर पोराशी बागेत खेळणार्या लहान मुलींशी नुसती ओळख करणंही कंफर्टेबल वाटत नाही. आधी तिच्या आईवडिलांशी व्यवस्थित ओळख करुन घेऊन मगच तिच्याशी बोलतो.
हा पॅरेनोईड विचार आहे.. एक प्रकारची परिस्थितीजन्य विकृतीच आहे.. हे मान्य आहे.
29 May 2013 - 2:16 pm | स्मिता.
अगदी असाच प्रश्न मला पडला. गविंनी त्या मुलीला आईस्क्रिम न देण्यात काही फार चुकीचं नाही केलंय. एक तर वर आलाय तो मुद्दा, की एखादी वस्तू मिळवण्याकरता आधी आपल्याजवळ पुरेसा पैसा हवा याची जाणीव त्या मुलीला कदाचित होईल... कदाचित होणारही नाही.
पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईस्क्रिम घेवून देणारे गवि अंकल चांगले आहेत या अनुभवावरून आईस्क्रिम देणारे 'सगळेच' अंकल चांगलेच असा तिच्या बालमनाचा समज होवू शकतो. त्यामुळे जरा पुढचा विचार करूनही गविंनी केलं ते योग्यच असं वाटतं.
29 May 2013 - 2:43 pm | चित्रगुप्त
स्मिता. यांनी सांगितलेला मुद्दाही बरोबर वाटतो.
एकंदरित हल्ली जगात कसे वागावे, हे ठरवणे अवघडच झालेले आहे तर.
आमच्या लहानपणी 'जगात वागावे कसे' असे एक पुस्तक होते. आता त्याची सुधारित आवृत्ती काढायला हवी.
29 May 2013 - 2:48 pm | बॅटमॅन
"वागावे कसे" या पुस्तकाचे लेखक श्री.वेलणकर म्हणून सांगलीचे एक उद्योजक होते, "धनी वेलणकर" या नावाने फेमस होते. त्यांनी "मी कारखानदार कसा झालो?" हेही पुस्तक लिहिले आहे.
29 May 2013 - 2:37 pm | १००मित्र
सुन्न....
पुन्हा आपण उलट-सुलट विचार करतो आणी "आतल्या"ला दाबतोच !
हेच "शिक्षण", सभ्यतांचं , बहुधा...
29 May 2013 - 3:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
समाजाची अधोगती होते ती वाईट माणसे वाईट वागतात म्हणून नाही. कारण तशी माणसे थोड्याफार प्रमाणात प्रत्येक समाजात पहिल्यापासूनच होती, आहेत आणि पुढेही असतील.
पण जेव्हा चांगली माणसे चांगले वागायला घाबरू लागतात तेव्हा नक्कीच समाजाच्या अधोगतीला सुरुवात होते.
29 May 2013 - 3:19 pm | तुमचा अभिषेक
मी देखील हे वाचल्याचे स्मरतय, बहुतेक ईंग्लिशमध्ये होते.
29 May 2013 - 4:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
थोडक्यात...
चांगल्या माणसांनी " आईसक्रीमवाले गंदे अंकल.. " ला चेकमेट देऊन.... स्वतः "आईसक्रीमवाले खंदे अंकल.. " बनायला पाहिजे !
सोपं निश्चितच नाही. पण ज्या देशांची अथवा समाजांची आपण स्तुती करतो, तेथेही गंदे अंकल आहेतच (बहुतेक तेवढ्याच प्रमाणात जेवढे इतर ठिकाणी आहेत). पण खंदे अंकल त्यांची पर्वा न करता खंदे आहेत म्हणून त्या देशांची अथवा समाजांची स्तुती करण्याजोगी अवस्था आहे.
या संदर्भात अजून एक महत्वाचे निरिक्षण (विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत) असे आहे की असल्या गंद्या गोष्टी करणार्यांमधे एकदम अनोळखी अंकलपेक्षा ओळखीच्या अंकलचे प्रमाण जास्त आहे. याची मुख्य कारणे ओळखीच्या "अंकल" वरचा विश्वास आणि म्हणून सहज मिळणारी संधी यांचा गैरफायदा. तेव्हा सजग तर सगळीकडेच रहायला पाहिजे पण खंदे पण रहायला पाहिजे. दोरीवरची कसरतच आहे ही... कुठल्याही बाजूला जास्त झोक गेला तरी पडायची भिती आहे !
मुले पळवून नेण्याची भिती मात्र अनोळखी अंकलकडूनच बहुतांशी असते.
29 May 2013 - 9:24 pm | jaypal
गवि लेख आवडला हे वेगळ सांगायला नको