सत्याचा विजय - विज्ञान विरुद्ध श्रद्धा

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
22 May 2013 - 6:59 am

इसवी सन 1600. फेब्रुवारी 17. रोममधल्या एका तुरुंगात सात वर्षं खितपत पडलेल्या एका कैद्याला पोलिसांनी बाहेर काढलं. रोममधल्या एका मोठ्या चौकात त्याला एका खांबाला बांधलं. 'दुष्ट/विकृत शब्द बोलते' म्हणून त्याच्या जिभेला एक खिळा ठोकला. त्याच्या पायाशी भरपूर लाकडं आणि त्याचीच पुस्तकं ठेवली. आणि त्यांना आग लावली. ज्वाळांनी होरपळून त्याचा अत्यंत हाल हाल होऊन मृत्यू झाला.

त्याचं नाव होतं ज्योर्दानो ब्रूनो. आताच्या काळात असता तर आपण त्याला शास्त्रज्ञ म्हटलं असतं. पण त्यावेळी शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक अशी अधिकृत पदवी नव्हती. बहुतेक अभ्यासक आपल्या जबाबदारीवर अभ्यास करायचे. युनिव्हर्सिटी, कॉलेजं इत्यादी होती, पण तुरळकच. ज्योर्दानोचे विचार प्रस्थापित विचारांच्या विरोधात होते. त्याचा विश्वास होता की आकाशात दिसणारे तारे हे सूर्याप्रमाणेच आहेत, पण लांबवर आहेत. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आपल्या ग्रहाप्रमाणेच इतर अनेक अनंत विश्वं आहेत. हे विचार आणि मेरीचं अनाघ्रातपण, जीजस, ट्रिनिटी या व इतर ख्रिश्चन कल्पनांच्या विरोधात मतं व्यक्त करणं आणि विश्वाविषयी असल्या कल्पना बाळगणं यापायी रोमन इन्क्विझिशनने त्याला 'हेरेटिक' (प्रस्थापित कल्पनांपेक्षा वेगळा विचार बाळगणारा) ठरवलं. त्याला त्याचे शब्द जाहीरपणे मागे घेण्याची संधी दिली गेली. पण त्याने ती नाकारली व आपल्या वेगळ्या विचारांवर शिक्कामोर्तब केलं. या गुन्ह्याबद्दल अर्थातच वेगवेगळ्या प्रकारे मृत्यूदंडाची सोय होती. पण बर्निंग अॅट स्टेक किंवा खांबाला बांधून जाळणं ही शिक्षा विशेष लोकप्रिय होती. ती त्याला मिळाली.

गॅलिलिओ गॅलिलिइलादेखील 1635 मध्ये याच रोमन इन्क्विझिशनचा असाच अनुभव आला. गॅलिलिओ आणि ज्योर्दानो यांच्यात तशी बरीच साम्यं आहेत. दोघांनाही सुरूवातीला त्यांच्या कर्तृत्वामुळे उच्च स्थानावरच्या लोकांचा पाठिंबा मिळाला होता. दोघांनाही अनेकविध विषयांचा अभ्यास करण्याची हौस होती. गॅलिलिओ त्याच्यापेक्षा थोडा लहान असला तरीही त्यांचा कर्तृत्वाच्या काळात थोडा ओव्हरलॅप आहे. 1591 साली ज्योर्दानोला ज्या गणित विभागाचं चेअरमनपद हवं होतं ते त्याला मिळालं नाही, तर पुढच्या वर्षी गॅलिलिओची त्या पदासाठी निवड झाली. काळ, परिस्थिती आणि विचारपद्धती सारखी असली तरी त्यांच्या स्वभावात फरक होता असं म्हणता येईल. ज्योर्दानो परखड आणि फटकळ म्हणून प्रसिद्ध होता. तर गॅलिलिओ जाहीरपणे तरी विशिष्ट मर्यादा राखून होता. मात्र गॅलिलिओलादेखील पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हटल्याबद्दल इन्क्विझिशनकडून बोलावणं आलं. त्याने मात्र शहाणपणा करून आपली विधानं मागे घेण्याची शिक्षा स्वीकारली. म्हणून त्यांनी दयाळूपणा दाखवून फक्त त्याच्या सर्व (आजवरच्या आणि आगामी) पुस्तकांवर बंदी घातली. आणि गॅलिलिओला नजरकैदेची अत्यंत मवाळ शिक्षा दिली.

या पार्श्वभूमीवर आजच्या काळातली एक घटना उठून दिसते - 2008 सालची. रिचर्ड लेन्स्की नावाच्या जीवशास्त्रज्ञाने त्याआधीची वीस वर्षं एक प्रयोग चालू ठेवला होता. या प्रयोगाचं उद्दिष्ट होतं ते म्हणजे प्रयोगशाळेत उत्क्रांती घडताना प्रत्यक्ष पहाणं. यात त्याला घवघवीत यश आलं. हे पाहून बायबलच्या शब्दावर आंधळा विश्वास ठेवणारांना राग आला. याचं कारण उघड आहे. जगन्निर्माता, जगन्नियंता अशी देवाची प्रतिमा आहे. पृथ्वी हा सामान्य ग्रह आहे, तो सूर्याभोवती गुरुत्वाकर्षणाने फिरतो हे एव्हाना सर्वमान्य झाल्यामुळे देवाने त्यात काही विशेष केलं नाही हे मान्य करावं लागलं होतं. मात्र सजीवांची निर्मिती आणि त्यांच्यात होणारे बदल हेही आपोआप होतात हे मान्य झालं तर देवाचं उरलंसुरलं कर्तृत्वही नष्ट होण्याचा धोका होता. त्यामुळे येनकेनप्रकारेण या प्रयोगाच्या निष्कर्षाला बट्टा लावण्याचा प्रयत्न श्लाफ्ली नावाच्या गृहस्थाने केला. हा माणूस होता एक वकील. त्याने या प्रयोगात खोडा घालण्यासाठी त्याच्या खास वकिली खाशाने लेन्स्कीकडे या सर्व प्रयोगाचा विदा मागितला. लेन्स्कीने प्रथम त्याचं अज्ञान दाखवून नम्रपणे 'आधी आमचे पेपर नीट वाचा' अशी सूचना केली. तरीही श्लाफ्लीने बेमुर्वतखोरपणे दुसरं पत्र लिहून 'आम्हाला विदा तपासून बघण्याचा कायदेशीर अधिकार आहे, तेव्हा तुम्ही हा विदा आम्हाला दिलाच पाहिजे' असं म्हटलं. मग लेन्स्कीने त्याला पुढच्या पत्रात म्हटलं 'माझा विदा फुटकळ निरीक्षणात नाही, आमच्याकडे असलेल्या सॅंपल्समध्ये आहे. ती तुम्हाला मी जरूर पाठवेन. पण तुम्हाला ती हाताळता येणार आहेत का?' हे मी फारच त्रोटकपणे लिहिलेलं आहे. संपूर्ण कथा फारच रंजक आहे. मुद्दा असा आहे की हे वाचून बावचळलेला श्लाफ्ली पुन्हा उत्तर देण्याच्या फंदात पडला नाही.

आता पावणेचारशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा लेन्स्की आणि श्लाफ्ली यांच्यात घडलेल्या पत्रव्यवहाराशी काय संबंध? गॅलिलिओ आणि ज्योर्दानो दोघेही भौतिकशास्त्र आणि गणिताचे अभ्यासक होते, लेन्स्की जीवशास्त्राचा. श्लाफ्लीने लेन्स्कीकडे पुरावे मागितले तर रोमन चर्चतर्फे त्या दोघांना चौकशीसाठी बोलावलं. त्यांना शिक्षा देण्याची शक्ती रोमन इन्क्विझिटर्सकडे होती, तर श्लाफ्लीकडे तसे काही व्यापक अधिकार नव्हते. वरवर बघता फरकच जास्त दिसतात. आणि हे फरकच खरे तर महत्त्वाचे आहेत.

भौतिकशास्त्र असो वा जीवशास्त्र असो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा दावा असो की उत्क्रांती घडताना प्रत्यक्ष पाहिली असं म्हणणं असो - दोन्हीची जातकुळी काही महत्त्वाच्या पातळींवर सारखी आहे. ज्योर्दानोचे विचार आणि लेन्स्कीचे निष्कर्ष हे दोन्ही, जग कसं चालतं याबाबतच्या निरीक्षणांतून आलेले होते. दोघेही विज्ञानवादी दृष्टिकोनातून जे सत्य गवसलं आहे ते जगापुढे मांडत होते. याउलट विचारसरणी म्हणजे आंधळ्या विश्वासाची. रोमन इन्क्विझिटर्स आणि श्लाफ्लीची. बायबलमध्ये जे सांगितलं आहे ते ज्ञान आणि बाकीचं सगळं पाखंड ही आंधळी विचारसरणी दोन्हीतही दिसते. एका अर्थाने हा विचारसरणींमधला लढा आहे. श्रद्धा विरुद्ध विज्ञानामधला लढा. निरीक्षणांमधून दिसणारं ते सत्य मानणारे आणि पुराणपुस्तकात लिहिलेलं, ते देवाने सांगितलेलं आहे म्हणून सत्य मानणारे यांच्यातला झगडा. हा शतकानुशतकं चालू आहे. सोळाव्या शतकाच्या शेवटी आणि सतराव्या शतकाच्या सुरूवातीला हा लढा देणाऱ्यातले ज्योर्दानो आणि गॅलिलिओ. त्यांच्यानंतर चारशे वर्षांनी तीच जागा लेन्स्कीने घेतलेली आहे.

या चारशे वर्षांत या लढ्याच्या स्वरूपात प्रचंड बदल झालेला दिसतो. ज्योर्दानोच्या काळात बायबलची शक्ती महाकाय होती. नवीन विचार मांडणं हे धोकादायक काम होतं. गॅलिलिओ, ज्योर्दानो या दोघांनाही आपल्या विचारांतून बायबलच्या सत्यांना धक्का लागत नाही असं त्यांच्या विचारांबरोबरच सांगण्याची जबाबदारी होती. पण एका विशिष्ट मर्यादेबाहेर कोणी बायबलविरुद्ध बोललं तर चर्च ते खपवून घेत नसे. त्यांच्या स्वतःच्या कोर्टात अशा पाखंड्यांना खेचून त्यांना शिक्षा देत असे. बायबलमध्ये सांगितलेलं 'सत्य' प्रस्थापित होतं. सर्वांचा त्यावर विश्वास असो नसो, विरुद्ध विचार हे तणांप्रमाणे निपटून काढले जायचे. त्यामुळे तेच प्रस्थापित सत्य अजूनही पुढे प्रस्थापित राहील अशी काळजी घेतली जात होती. याचं कारण उघड आहे. या विचारांना उचलून धरण्याचं, जनतेत पसरवण्याचं कार्य करणाऱ्या धर्मसंस्थेला प्रचंड शक्ती प्राप्त होत होती. राज्यसत्तेतला काही हिस्सा धर्मसंस्थेच्या पुढाऱ्यांना मिळायचा. आर्थिक फायदाही प्रचंड होता. या सगळ्याचा पाया होता तो म्हणजे सामान्य जनतेत पसरलेले विशिष्ट विचार - देवाने या विश्वाची निर्मिती केली, मानवाची निर्मिती केली, प्राण्यांची निर्मिती केली. तो सर्वशक्तिमान आहे. आणि त्याच्याशी बोलायचं असेल तर ते आमच्यामार्फतच बोललं पाहिजे. या बोलण्याच्या अधिकारासाठी जो पैसा लागतो तो जनतेकडून, श्रीमंतांकडून उकळून घेण्याचा अधिकार धर्मसत्तेकडे आला. त्यामुळे हे सगळं खोटं आहे, खरं नाही असं सांगणारांकडून या संस्थेच्या पायावरच हल्ला होत होता. आणि तो धोका निवारण्यासाठी जागोजागी इन्क्विझिशनची क्रूर व्यवस्था निर्माण झाली होती.

याच संस्था अजूनही बदललेल्या स्वरूपात दिसतात. पण त्यांच्या शक्तीत प्रचंड फरक पडलेला आहे. गॅलिलिओच्या काळात धर्मसंस्था ही एखाद्या महाबलाढ्य किल्ल्याप्रमाणे होती. आणि तीवर एखाद दुसरा शास्त्रज्ञ आपल्या विचारांच्या घोड्यावर बसून हल्ला करत असे. त्या किल्ल्याच्या फार जवळ यायला लागला तर तोफा डागून त्याचा खात्मा सहज केला जायचा. किंवा अगदीच ठार मारायचं नसेल तर त्याच्या मुसक्या बांधून त्याला नामोहरम केलं जायचं. पण ही परिस्थिती हळूहळू बदलायला लागली. लवकरच पाश्चिमात्य राष्ट्रांत चर्चचा पगडा कमी व्हायला लागला. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सामान्यांमध्ये स्वीकारलं गेलं. इन्क्विझिशनचे सर्व अधिकार आपोआप कमी होत जात एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला या संस्था संपुष्टात आल्या. रोमन इन्क्विझिशन ही संस्था तत्वतः जिवंत आहे, पण 'कॉंग्रेगेशन ऑफ डॉक्ट्रिन ऑफ फेथ' या गुळमुळीत नावाखाली. अर्थातच त्यांना कोणाला चौकशीसाठी बोलवण्याचे अधिकार नसावेत. असल्यास गेल्या कित्येक दशकांमध्ये ते वापरले गेलेले नाहीत. त्यांनी सुनवलेल्या शिक्षा सरकारं अमलात आणतील याची शक्यता शून्य आहे.

आता वैज्ञानिकांना रास्त संरक्षण आहे. जगभर असलेल्या सेक्युलर सरकारांनी कायद्याचा भरभक्कम पाठिंबा वैज्ञानिक पद्धतींना दिलेला आहे. जगभर - किमान जिथे धार्मिक राज्यकर्ते नाहीत तिथे - प्रमाण सत्य म्हणून वैज्ञानिक पद्धतींनी शोधून काढलेलं सत्य शाळांमध्ये शिकवलं जातं. न्यायपद्धतीत वैज्ञानिक पुरावे ग्राह्य धरले जातात. श्लाफ्लीची इन्क्विझिशन मनोवृत्ती असणाऱ्यांना लेन्स्कीच्या वैज्ञानिक विचारांचं तोंड बंद करण्याची शक्ती नाही. फारतर थोडाफार उपद्रव देण्याची क्षमता आहे. उलट लेन्स्कीसारख्या मान्यवर शास्त्रज्ञांना कायद्याचं संरक्षण आहे. त्याच्या शेवटच्या पत्रात जी अरेरावीची भूमिका लेन्स्कीला घेता आली ती या सुरक्षिततेच्या भावनेतूनच. रोमन इन्क्विझिशनला ज्योर्दानोने अत्यंत कळकळीने 'माझं सत्य बायबलला विसंगत नाही' असं सांगण्याचा प्रयत्न केला, करावा लागला. आजच्या काळात श्लाफ्लीसारख्यांकडून पाखंड्यांना शिक्षा देण्याचा अधिकारच काढून घेतला गेला आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते की नाही, यावर तर आता चर्चाही होत नाही, इतकं ते सत्य प्रस्थापित झालेलं आहे. लेन्स्कीकडे सत्य होतं, आणि बायबलच सत्य मानणाऱ्यांच्या तोंडावर ते फेकून मारून तो त्यांचा पराभव करू शकला. ज्योर्दानो किंवा गॅलिलिओला ते करणं शक्य नव्हतं.

लेन्स्कीच्या सत्याचा विजय हा व्यापक अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विजय आहे. हे युद्ध गेली अनेक शतकं चालू होतं. त्यात अनेकांचे बळी पडले. 1540 ते 1794 या कालखंडात लिस्बन, पोर्टो, कोइंब्रा आणि एव्होरा इथल्या स्पॅनिश इन्क्विझिटर्सनी 1175 लोकांना जाळून मारलं. जाळून मारण्यासाठी अर्थातच जे अपराध कबूल करून घेतले जात ते त्या व्यक्तीने कबूल करावे म्हणून महाभयंकर छळ करणारी सामुग्री मुक्तहस्ताने वापरली. हे फक्त चार शहरांमध्ये. संपूर्ण युरोपभर आणि त्यांच्या वसाहतीत कमी अधिक प्रमाणात त्या काळी असले प्रकार चालू होते. पण तरीही यथावकाश जनसामान्यांमध्ये हे आधुनिक ज्ञानाचे विचार मुरले. ज्ञान पसरलं. आणि ते इतकं फैलावलं की शेवटी पाखंडाला अशी शिक्षा करण्याचा प्रयत्नच सामान्य जनतेला खटकायला लागला. आणि चर्चला हे प्रकार गुंडाळून ठेवावे लागले. चर्चचा ज्ञानावरचा पगडा नष्ट झालेला आहे. बायबलमधलं ज्ञान हेच सर्वोच्च या भूमिकेचा किल्ला ढासळून पडला आहे.

मर्ढेकरांनी म्हटलेलं आहे -

या जगण्यातुन या मरणांतुन
हसण्यातुन अन् रडण्यातुन या
अशाश्वताच्या मुठी वळूनी
अपाप चढतिल वरती बाह्या

अखेर घेता टक्कर जरि मग
युगायुगांचा फुटेल भाल
अशाश्वताच्या तलवारीवर
शाश्वताचिही तुटेल ढाल.

बायबलमधलं लिखाण हे शाश्वत सत्य करण्याच्या प्रयत्नांची ढाल अनेक अशाश्वत वाटणाऱ्या पण अस्सल सत्याच्या प्रहारांनी मोडून पडली आहे. हा खरा सत्याचा विजय आहे. हळूहळू पेटणाऱ्या ठिणग्यांनी, एकमेकांना भेटून पेटणाऱ्या ज्योतींनी, अंधाराच्या इतिहासावर मिळवलेला!

धर्मविज्ञानविचार

प्रतिक्रिया

फार उत्तम लेख आहे. आवडला. त्यावेळी सत्यासोबत राहून जाळून घेतलेल्याला वेडा म्हणावे की कट्टर निष्ठावान हे कळत नाही. हळहळ मात्र खूप वाटते.

शेवटी एकूण मनुष्यजातीची सत्य स्वीकारण्याची नीयत आहे हे दिलासा देणारे वाटले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 May 2013 - 8:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फार उत्तम लेख आहे. आवडला.

यावरुन आठवण झाली. आपल्याकडेही विज्ञानाच्या शोधाबद्दल आहे की नाही माहिती नाही पण धार्मिक ग्रंथांच्या विचारांच्या विरोधातल्या लढ्याबाबत देहांताच्या शिक्षा फार कमी असाव्यात.

-दिलीप बिरुटे

सुनील's picture

22 May 2013 - 8:27 am | सुनील

पण धार्मिक ग्रंथांच्या विचारांच्या विरोधातल्या लढ्याबाबत देहांताच्या शिक्षा फार कमी असाव्यात.

याचे कारण, मला वाटते, "तसेही असू शकते" ही विचारसरणी वा मानसिकता भारतात पूर्वापार आहे. म्हणूनच तर भारतात एकाच वेळी द्वैतवादी आणि अद्वैतवादी असे दोन्हीही पंथ नांदू शकले.

बाकी लेख आवडला.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 May 2013 - 10:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

धार्मिक ग्रंथांच्या विचारांच्या विरोधातल्या लढ्याबाबत देहांताच्या शिक्षा फार कमी असाव्यात.

आपल्याकडे देहान्तशासन नाही तरी समाजाच्या मोठ्या गटाला बहिष्कृताचं जगणं जगायला लावण्याचा इतिहास फार शिळा झालेला नाही.

उत्तर पेशवाईमधे उच्चवर्णीयांनी दलित आणि उतरंडीतल्या मधल्या जातीच्या लोकांवर केलेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीमुळे ब्रिटीश आले तेव्हा या लोकांना आनंदच झाला होता. याबद्दल एक लिखित पुरावा सावित्रीबाईंची फुलेंची एक विद्यार्थिनी मुक्ता हिच्या पत्रातून मिळतो. पुण्यात गुलटेकडीच्या मैदानात तेव्हाचे पेशव्यांचे सैनिक महारांची डोकी घेऊन पोलोसारखा खेळ खेळत, महारांची डोकी बांधकामाच्या पायथ्याशी घालत असे उल्लेख आहेत. या लोकांना संशोधन आणि बंडखोरी सोडाच, सामान्य आयुष्य जगणंही मुश्कील झालं होतं.

संन्याशाच्या मुलांची गोष्ट सगळ्यांनाच माहित असावी.

लेख ठीकठाक. लेन्स्कीच्या शास्त्रीय प्रयोगाबद्दल अधिक कुतूहल आहे. रिचर्ड डॉकिन्सच्या 'ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ'मधे याचा त्रोटक उल्लेखही आहे.

आजानुकर्ण's picture

23 May 2013 - 2:36 am | आजानुकर्ण

धार्मिक ग्रंथांच्या विचारांच्या विरोधातल्या लढ्याबाबत देहांताच्या शिक्षा फार कमी असाव्यात.

आणि गंमत म्हणजे अशा शिक्षा पाश्चात्य जगातून जवळपास नाहीशा झाल्या असल्या तरी भारतात अजूनही दलितांना हीन वागणूक मिळणे थांबलेले नाही.

मी_आहे_ना's picture

22 May 2013 - 5:26 pm | मी_आहे_ना

अगदी अगदी

शिल्पा ब's picture

22 May 2013 - 9:51 am | शिल्पा ब

लेख आवडला.

उदय के'सागर's picture

22 May 2013 - 10:22 am | उदय के'सागर

उत्तम लेख!
शास्त्रज्ञांचा थोडक्यात दिलेला परिचय, त्यांचे कार्य आणि त्यामागील तात्पर्य खूपच थोडक्यात पण सुंदर आणि माहिती पुर्ण पद्धतीने मांडले आहे.... धन्यवाद!!!

प्रभाकर पेठकर's picture

22 May 2013 - 10:24 am | प्रभाकर पेठकर

माहितीपूर्ण आणि संयमित, समतोल विचारांचा लेख.
असा लढा दिलेल्या शास्त्रज्ञांना विनम्र प्रणाम.

यनावाला's picture

22 May 2013 - 4:59 pm | यनावाला

श्री.राजेश घासकडवी यांचा लेख माहितीपूर्ण आहे.माझ्या वाचनानुसार सर्व माहिती विश्वासार्ह आहे.लेन्स्की-श्लाफ्ली प्रकरण मात्र मी कधी पूर्वी वाचले नव्हते.आता सत्याला संरक्षण आहे हे खरे पण अजूनही समाजात असत्याचा प्रसार चटकन होतो. सत्याच्या प्रतिष्ठापनेसाठी सतत झगडावे लागते.श्री.राजेश यांस धन्यवाद!
.......यनावाला

मुद्द्याला धरुन, सुरवातीपासून शेवटपर्यंत 'औट' न जाता पूर्ण केला गेलेला लेख आवडला.
मानवी बुद्धीच्या लोभ, खोटेपणा ह्या दुर्गुणांचा 'सदुपयोग' जगभरातल्या तथाकथित धर्ममार्तंडांनी सातत्यानं केलाय.
सत्ता, संपत्ती, किर्ती, प्रतिष्ठा ह्या सगळ्या व्यावहारिक गोष्टी धर्मामध्ये येतात तेव्हा धर्म मोडला तोडला जातोच.

अत्रुप्त आत्मा's picture

22 May 2013 - 6:38 pm | अत्रुप्त आत्मा

लेखाबद्दल अनेकानेक धन्यवाद!

यशोधरा's picture

22 May 2013 - 7:15 pm | यशोधरा

लेख चांगला आहे पण विज्ञान विरुद्ध अंधविश्वास वा रुढी असं म्हणायचं आहे का? श्रद्धा हा शब्दप्रयोग अत्यंत चुकीचा वाटतो. की जाणूनबूजून वापरलाय?

उपास's picture

22 May 2013 - 7:44 pm | उपास

लेख उत्तम पण माझीही अशीच गोंधळाची स्थिती झालेय.
श्रद्धा आणि अंध श्रद्धा ह्यातील रेख धूसर असतेच, इथे चर्चच्या/ प्रस्थापिताच्या संदर्भात श्रद्धाच म्हणायचे आहे असे वाटते!
उदा. लहानपणी भजन-किर्तनातून चंद्रग्रहण/ सूर्यग्रहण म्हणजे राहू/ केतू ग्रासायला येतात, त्याचे वेध अशी माहिती दिली जायची. जेव्हा शिक्षणातून हा सावल्यांचा खेळ कळला तेव्हा उलगडा झाला. तस्मात पुढच्या पिढीस आपण राहू-केतू असं सांगू असं वाटत नाही. आता ती श्रद्धा की अंधविश्वास/ रुढी हा ज्याचा त्याचा प्रश्न. असेच इतर अनेक कालानुरुप संदर्भ गमावलेल्या गोष्टींबद्दल म्हणता येईल.
विज्ञानाची कास धरायला शिकवणार्‍या पद्धतीला आणि विज्ञानाला आपले काम करु देणार्‍या व्यवस्थेचे आभार मानावे तितके कमीच.
लेख आवड्लाच हे पुन्हा नमूद करावेसे वाटते.

मी गोंधळले नाहीये :) श्रद्धा हा शब्दप्रयोग चुकीचा आहे हेच माझे मत आहे. :)

क्लिंटन's picture

22 May 2013 - 7:54 pm | क्लिंटन

लेख चांगला आहे पण विज्ञान विरुद्ध अंधविश्वास वा रुढी असं म्हणायचं आहे का? श्रद्धा हा शब्दप्रयोग अत्यंत चुकीचा वाटतो. की जाणूनबूजून वापरलाय?

+१. लेख चांगला आहे पण लेखाचे शीर्षक खटकले. श्रध्दा हा शब्दप्रयोग इथे अत्यंत चुकीचा आहे.

एडिसन हजारेक अयशस्वी प्रयत्नांनंतर लाईट बल्ब यशस्वीपणे बनवू शकला असे वाचले आहे.इतक्या वेळा त्याला अपयश येत असतानाही आपल्या मनातील अमूर्त कल्पनेला आपण मूर्त स्वरूप देऊ शकतो याच विश्वासाने (श्रध्दा) त्याला परतपरत प्रयत्न करायला प्रेरणा दिली असणार यात शंका नाही.लाईट बल्ब प्रत्यक्षात यायच्या आधी तो एक कल्पना होता.पण एडिसनने या "न बघितलेल्या" किंवा "सिध्द करता न येण्याजोग्या" कल्पनेवर विश्वास (श्रध्दा) ठेवला आणि म्हणूनच लाईट बल्ब प्रत्यक्षात आला.कोणताही मनुष्य एखादी गोष्ट मिळवायला प्रयत्न करतो तेव्हा सध्या कल्पनेत असलेली गोष्ट आपण प्रत्यक्षात आणू शकतो हा विश्वासच (श्रध्दा) त्याला प्रेरणा देत असतो आणि अशा विश्वासाच्या अभावी कोणतीही गोष्ट साध्य करता येऊ शकणार नाही.या पार्श्वभूमीवर विज्ञान विरूध्द श्रध्दा असा रंग द्यायचा स्वत:ला रॅशनल म्हणवणारी मंडळी करतात तेव्हा खरोखरच ते हास्यास्पद वाटते.

क्लिंटन साहेब, शब्दच्छल होत असेल तर क्षमस्व.
श्रद्धा आणि विश्वास हे समानार्थी शब्द म्हणता येणार नाहीत (जसे कंस वापरुन तुम्ही वर वापरलेत).
माझा माझ्या मित्रावर विश्व्वास आहे असं म्हणतो पण माझी माझ्या मित्रावर श्रद्धा आहे असं म्हणत नाही (हां गुरुंवर/ देवावर श्रद्धा आहे असे म्हणतो). स्वतःच्या बाबतीत आत्मविश्व्वास असे म्हणतो आत्मश्रद्धा असे नाही. तद्वत एडिसनला तो बल्बचा शोध लावेल असा विश्व्वास होता, श्रद्धा होती असे म्हणता येईल असे वाटत नाहि. म्हणून मला तरी चर्च च्या संदर्भात श्रद्धा हा शब्द (विश्वास ह्या शब्दापेक्षा) जास्त योग्या वाटला. असो :)

राजेश घासकडवी's picture

22 May 2013 - 8:13 pm | राजेश घासकडवी

विज्ञान विरुद्ध अंधविश्वास वा रुढी असं म्हणायचं आहे का? श्रद्धा हा शब्दप्रयोग अत्यंत चुकीचा वाटतो.

एखादी गोष्ट खरी आहे की नाही हे निरीक्षणं करून, प्रयोग करून तपासून पहाणं, याला मी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो. कुठल्याशा ग्रंथात सांगितलं आहे किंवा कोणी थोर पुरुष म्हणून गेला आहे किंवा कोणालाही न सांगता येणाऱ्या आंतरिक अनुभूतींमधून आलेल्या विचारांवर विश्वास ठेवून ते सत्य मानणं याला मी श्रद्धा मानतो. या उदाहरणात बायबलमध्ये 'पृथ्वी केंद्रस्थानी आहे' असं सांगितल्यामुळे त्यावर विश्वास ठेवणं ही श्रद्धाच. त्यामुळे हा विज्ञान विरुद्ध श्रद्धा असाच लढा होता.

खरं तर वैयक्तिक श्रद्धा बहुतांश वेळी निरुपद्रवी असतात. जोपर्यंत मनुष्य आपल्याला हव्या त्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, आणि आपल्यापुरत्या जपतो तोपर्यंत सगळं ठीक असतं. जेव्हा त्या इतरांवर लादल्या जातात तेव्हा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा त्या श्रद्धा सर्वांनी स्वीकाराव्यात म्हणून त्यांविरुद्ध ज्ञान मांडणारांचे बळी जातात तेव्हा लढा सुरू होतो. अशा लढ्यांच्या बाबतीत आता व्यक्तिनिरपेक्ष, वैज्ञानिक सत्याला योग्य ते सन्मानाचं स्थान मिळतं आहे हे दाखवून द्यायचं आहे.

या लेखाला 'सत्याचा विजय - व्यक्तिनिरपेक्ष वैज्ञानिक दृष्टिकोन विरुद्ध लादलेल्या श्रद्धा' असं नाव देता आलं असतं. पण विज्ञान वि. श्रद्धा हे जास्त सुटसुटीत वाटलं. तेव्हा एका अर्थाने तो जाणूनबुजूनच वापरलेला आहे. नजरचुकीने नाही.

अतिशय संतुलित आणि छान लेखावर लेखकाचा तितकाच सुंदर प्रतिसाद !!!

तुमचा अभिषेक's picture

23 May 2013 - 10:45 pm | तुमचा अभिषेक

अतिशय संतुलित आणि छान लेखावर लेखकाचा तितकाच सुंदर प्रतिसाद !!!

+७८६

अवांतर - "विज्ञानाने कितीही शोध लावले तरी या विज्ञानाचीच निर्मिती करणारी शक्ती या जगात आहे जिला देव म्हणतात" अशी श्रद्धा असणारा एक भलामोठा म्हणजे ९०-९५ टक्के लोकांचा समूह आजही या जगात आहे आणि उद्याही राहणार.

संजय क्षीरसागर's picture

24 May 2013 - 11:11 pm | संजय क्षीरसागर

बायबलमधलं लिखाण हे शाश्वत सत्य करण्याच्या प्रयत्नांची ढाल अनेक अशाश्वत वाटणाऱ्या पण अस्सल सत्याच्या प्रहारांनी मोडून पडली आहे. हा खरा सत्याचा विजय आहे.

पूर्वी विज्ञान धर्मग्रंथात जोडलं होतं. संशोधनामुळे विज्ञान विकसित झाल्यानं ते धर्मग्रंथातून अलग झालं इतकंच पण याचा अर्थ धर्माला विज्ञानानं शह दिला असा होत नाही.

"विज्ञानाने कितीही शोध लावले तरी या विज्ञानाचीच निर्मिती करणारी शक्ती या जगात आहे जिला देव म्हणतात" अशी श्रद्धा असणारा एक भलामोठा म्हणजे ९०-९५ टक्के लोकांचा समूह आजही या जगात आहे आणि उद्याही राहणार.

त्यामुळे विज्ञान नेहमी वास्तविकता समोर आणत राहील आणि संशोधनानं जगणं सुकर करेल. विज्ञान निर्विवादपणे उपयोगी आणि सार्थ आहे. पण ते लोकांच्या धारणा (कन्विकशन्स) बदलू शकणार नाही. थोडक्यात, काही गोष्टी अवैज्ञानिक ठरल्या तरी लोकांची बायबलवरची श्रद्धा अजून जशीच्या तशी आहे.

राजेश घासकडवी's picture

25 May 2013 - 9:44 am | राजेश घासकडवी

पण ते लोकांच्या धारणा (कन्विकशन्स) बदलू शकणार नाही.

अनेक धारणा बदललेल्या आहेत
१. देवाने पृथ्वी निर्माण केली, आणि सूर्य चंद्र तिच्याभोवती फिरतात - ही धारणा बदलून पृथ्वी आपोआप तयार झाली, व ती सूर्याभोवती फिरते ही धारणा झालेली आहे.
२. देवाच्या किंवा देवीच्या कोपामुळे रोगराई होते - ही धारणा बदलून जंतूंमुळे व इतर वैद्यकीय कारणांमुळे रोगराई होते ही धारणा झालेली आहे
३. संतति ही देवाची देणगी आहे - ही धारणा बदलून संततिवर नियंत्रण ठेवता येतं ही धारणा झालेली आहे.

ही यादी प्रचंड मोठी करता येईल. तुम्ही जर धारणा या शब्दाची व्याख्या 'जे विचार कधीच बदलणं शक्य नाही तेच फक्त' अशी केली तरच तुमचं विधान बरोबर ठरू शकेल.

संजय क्षीरसागर's picture

25 May 2013 - 10:32 pm | संजय क्षीरसागर

बायबलमधलं लिखाण हे शाश्वत सत्य करण्याच्या प्रयत्नांची ढाल...हा खरा सत्याचा विजय आहे

विज्ञान अंधश्रद्धा दूर करतं हे निर्विवाद आहे कारण ते संशोधनांती वास्तविकतेची उकल करतं. पण कितीही संशोधन झालं तरी बायबल मोडीत निघू शकत नाही असा मुद्दा आहे

राजेश घासकडवी's picture

26 May 2013 - 12:20 am | राजेश घासकडवी

पण कितीही संशोधन झालं तरी बायबल मोडीत निघू शकत नाही असा मुद्दा आहे

आधी तुम्ही धारणा बदलू शकत नाहीत असं म्हटलंत, त्याला उत्तर म्हणून मी बदललेल्या धारणा दाखवून दिल्या. त्यावर तुम्ही बायबल मोडीत निघू शकत नाही असा वेगळाच मुद्दा मांडत आहात. 'धारणा' किंवा 'मोडीत निघणे' याच्या तुमच्या व्याख्या तुम्ही सांगितल्याशिवाय चर्चा पुढे कशी सरकणार? व्याख्या न देता हवी ती विधानं करण्याचा तुमचा अधिकार बजावू शकता याबद्दल शंका नाही, पण त्यामुळे तुमच्याशी चर्चा करण्यात असलेला माझा रस टिकून कसा रहाणार?

असा वेगळाच मुद्दा मांडत आहात

तुम्ही माझा पहिलाच प्रतिसाद नीट वाचला असता तर म्हणणं लक्षात आलं असतं.

१) विज्ञान वास्तविकाची उकल करतं आणि त्यामुळे धर्मग्रंथातल्या चुकीच्या कल्पना बाद होतात आणि होत राहतील. त्यामुळे हा लेख विषेश असं काही सांगत नाही.

२) याचा अर्थ विज्ञान निरर्थक आहे असा नाही. वैज्ञानिक संशोधनानं मानवी जीवनात अमूलाग्र क्रांती घडवली आहे आणि अनेक अंधश्रद्धांपासून माणसाला मुक्त केलं आहे.

३) धर्मग्रंथात चुकीची वास्तविकता (पृथ्वी सूर्याभोवती फिरते) नोंदवली गेली होती आणि विज्ञानानं ती चूक सिद्ध केली हे देखील उघड आहे.

४) पण धर्म हा सत्याचा शोध आहे. सत्य आणि वास्तविकता (अ‍ॅबसल्यूट अँड रिअ‍ॅलिटी) या दोन भिन्न गोष्टी आहेत. तुम्ही सत्य म्हणजे रिअ‍ॅलिटी (वास्तविकता) अशी सरमिसळ करता आहात. आणि `सत्याचा विजय विज्ञान विरूद्ध श्रद्धा' अशा शीर्षकाखाली विचार मांडले आहेत.

५) माझं म्हणणं इतकंच आहे की विज्ञान कार्यकारण भाव आणि वास्तविकता यांचा उलगडा करतं. धर्म तुम्ही कोण आहात याचा उलगडा करतो.

६) धर्म आणि विज्ञान यात परस्परविरोध नाही. वैज्ञानिक दृष्टी असणारा, विज्ञानाची सार्थकता मान्य करून धर्माचा आभ्यास करू शकतो. बायबल हा धर्मग्रंथ आहे आणि विज्ञान कितीही प्रगत झालं तरी लोकांची त्यावरची श्रद्धा कायम आहे आणि राहिल, या अर्थानं मी सुरूवातीला म्हटलं होतं की विज्ञान लोकांच्या धारणा (कन्विक्शन्स) बदलू शकत नाही. विज्ञान धर्माला शह देऊ शकत नाही. बायबल मोडीत काढू शकत नाही.

राजेश घासकडवी's picture

26 May 2013 - 1:32 pm | राजेश घासकडवी

सत्य आणि वास्तविकता (अ‍ॅबसल्यूट अँड रिअ‍ॅलिटी) या दोन भिन्न गोष्टी आहेत.

अच्छा, म्हणजे आता तुमची सत्याचीच व्याख्या वेगळी आहे. चला, तुमची व्याख्या कळली नाही तरी फरक कुठे आहे हे तरी स्पष्ट झालं.

बायबल मोडीत काढू शकत नाही.

हे विधान नुसतंच येतं. बायबलचा एक परिच्छेद सांगा जो कधीच मोडीत निघू शकणार नाही, म्हणजे त्या विधानाला काहीतरी आधार निर्माण होईल.

प्रसाद गोडबोले's picture

26 May 2013 - 1:54 pm | प्रसाद गोडबोले

Ezekiel 25:17. "The path of the righteous man is beset on all sides by the inequities of the selfish and the
tyranny of evil men. Blessed is he who, in the name of charity and good will, shepherds the weak through
the valley of darkness, for he is truly his brother's keeper and the finder of lost children. And I will strike
down upon thee with great vengeance and furious anger those who attempt to poison and destroy my brothers. And you will know my name is the Lord when I lay my vengeance upon you!

"धर्माच्या मार्गावर चालणार्‍यांचा मार्ग नेहमीच स्वार्थी अन इव्हिल ( संस्क्रुत / मराठी प्रतिशब्द नाही ) लोकांच्या अन्यायाने , छळाने व्यापलेला असेल ....... "

हे कायमच सत्य असणार (कधीच मोडीत निघणार नाही ) !!

( बोल्ड केलेला भाग विशेष तुमच्या साठी :p )

ते 'त्यांच्या धर्माचा' मार्ग पकडूनच चालत आहेत.
-घासकडवींबाबत 'यावेळी सहानुभूती' बाळगून ;) प्यारे

नैतिकतेसंबंधीचा कुठल्याही धर्मातील भाग मोडीत निघण्याजोगा नाहीच. वेल सेड गिरीजा तै ;)

आनंदी गोपाळ's picture

27 May 2013 - 9:02 pm | आनंदी गोपाळ

गिरिजा तै नसून गोडबोले दादा आहेत नां?

बॅटमॅन's picture

28 May 2013 - 12:20 am | बॅटमॅन

हेन्स द डोळामारू स्मायली. :)

राजेश घासकडवी's picture

26 May 2013 - 8:28 pm | राजेश घासकडवी

"धर्माच्या मार्गावर चालणार्‍यांचा मार्ग नेहमीच स्वार्थी अन इव्हिल ( संस्क्रुत / मराठी प्रतिशब्द नाही ) लोकांच्या अन्यायाने , छळाने व्यापलेला असेल ....... "

हे कायमच सत्य असणार (कधीच मोडीत निघणार नाही ) !!

अरेच्च्या हे कायम रहाणारं सत्य होय! अहो, लेखातच ही परिस्थिती कशी बदलली आहे त्याची कथा आहे. ज्योर्दानो आणि गॅलिलिओ हे खऱ्या अर्थाने righteous men होते. त्यांचा मार्ग धर्मसत्तेवर बसलेल्या tyrannical, selfish and evil लोकांनी रोखून धरला होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. घ्या, निघालं हे त्रिकालाबाधित सत्य मोडीत.

आणि ठळक केलेल्या वाक्यांप्रमाणे देव खरंच अशा लोकांचा नाश करतो? अहो आसपास पहा जरा - tyrannical, selfish and evil लोकं कुठे सत्तास्थानांचा सुखाने उपभोग घेताना दिसत नाहीत का?

हो. सविस्तर प्रतिसाद खाली दिला आहे.

अतिशय संतुलित आणि छान लेखावर वाचकाचा तितकाच सुंदर प्रतिसाद !!!

यशोधरा's picture

22 May 2013 - 8:26 pm | यशोधरा

ओके.

एखादी गोष्ट खरी आहे की नाही हे निरीक्षणं करून, प्रयोग करून तपासून पहाणं,

मुळात एखादी गोष्ट खरी आहे का/ असू शकेल का हे पाहण्यासाठी निरीक्षण करावं वाटणं हे श्रद्धेपोटीच होतं ना? देव, दैव आणि तत्सम संकल्पनांअनुषंगाने येणारा शब्दाचा अर्थ सोडून देऊ पण वैज्ञानिकही वैज्ञानिक श्रद्धेपोटीच विज्ञानातील सत्ये शोधू जातात. कोणताही अदम्य विश्वास ही श्रद्धाच आहे, मग त्याला वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणा वा इतर काही.

आंतरिक अनुभूतींमधून आलेल्या विचारांवर विश्वास ठेवून ते सत्य मानणं

तसं तर विज्ञानाने सांगितलेलीही आजची सत्यं उद्या तोकडी पडतात वा खोटी ठरतात. माहिती पुरेशी नसते. मग? जोवर ती पुढील माहिती उजेडात येत नाही तोवर त्याला सत्य मानताच ना? तीही श्रद्धाच की. नाही?

बरं हे असो. एक एकदम अवांतर. मला हे मागेच बघितलं तेह्वा विचारायचं होतं, एक कुतुहल म्हणूनच केवळ.. तिकडे पण माझे मिपावरील लेखन किंवा मिपावरील नवे लेखन अशी स्वाक्षरी करता का हो?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 May 2013 - 8:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एखादी गोष्ट खरी आहे का/ असू शकेल का हे पाहण्यासाठी निरीक्षण करावं वाटणं हे श्रद्धेपोटीच होतं ना?

असं वाटत नाही किंवा असं सरसकट असतंच असं नाही. निव्वळ कुतूहल, जिज्ञासा, गरज (ही शोधाची जननी आहे) या कारणांसाठीही निरीक्षणं घडतात. काही निरीक्षणं उद्देश न बाळगता होतात. इथे निरीक्षण-उद्देश म्हणणं थोडं चूक आहे; शुद्ध गणित बहुतांशी निरुपयोगी, निरुद्देश आहे पण त्यावर संशोधन चालतं ते शुद्ध जिज्ञासेपोटी.

एखादी गोष्ट खोटी असेल अशी शंका येत असेल तर त्याच गोष्टीवर श्रद्धा कशी असू शकेल? अज्ञेयवादी असं या शंकेखोर/scepticism चं भाषांतर करता येईल. शंकेखोरपणा उलट अधिक अश्रद्ध स्थिती दर्शवतो.

---

वर गॅलिलेओच्या दिव्याच्या प्रयोगाचा उल्लेख आहे. हा प्रयोग करण्यामागे श्रद्धा नव्हती; हे माहितीचं उपायोजन होतं.
सैद्धांतिक भौतिकशास्त्राने सिद्ध केल्यामुळे, पदार्थामधून वीजप्रवाह गेला असता प्रकाशकिरण बाहेर पडू शकतात, वीज या उर्जेच्या एका प्रकाराचं रूपांतर प्रकाश या रूपात होऊ शकतं, याची त्याला माहिती होती. कोणते पदार्थ वापरून हे रूपांतर करता येईल याचा तो प्रयोग/शोध होता.

---

श्रद्धा आणि विश्वास या शब्दांचे मोल्सवर्थ शब्दकोषा*त फार उपयुक्त अर्थ सापडले नाहीत:

श्रद्धा (p. 801) [ śraddhā ] f (S) Reverence or veneration. 2 Implicit faith or belief. 3 (Cant.) Ventris crepitus. v सोड, कर, & सर, सुट, हो.

विश्वास (p. 765) [ viśvāsa ] m (S) Trust, confidence, reliance: also faith, belief, assurance.

उपास यांचा वरचा एक प्रतिसाद त्या बाबतीत, व्याख्या नसूनही, अधिक उपयुक्त वाटला.

*दुवा शिकागो विद्यापीठाच्या संस्थळाकडे जातो.

यशोधरा's picture

22 May 2013 - 8:52 pm | यशोधरा

एखादी गोष्ट खोटी असेल अशी शंका येत असेल तर त्याच गोष्टीवर श्रद्धा कशी असू शकेल?

:)

असं वाटत नाही किंवा असं सरसकट असतंच असं नाही. निव्वळ कुतूहल, जिज्ञासा, गरज (ही शोधाची जननी आहे) आणि क्लिंटनचाही प्रतिसाद पहावा.

पैसा's picture

22 May 2013 - 9:43 pm | पैसा

श्रद्धा या शब्दाचा अर्थ "आदर" याच्या जास्त जवळ जाणारा आहे.
होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल आदर दाखवताना "श्रद्धा" हा शब्द वापरला जातो तर आता असलेल्या गोष्टींबद्दल "विश्वास" हा शब्द जास्त वापरला जातो. श्रद्धा ही स्वतःपुरती गोष्ट आहे. ती कधीही लादली जाऊ शकत नाही. लादली की ती जुलूम, जबरदस्ती होते.

उदा.
१) माझ्या नवर्‍यावर माझा विश्वास आहे.
२) वडिलांच्या शिकवणुकीवर माझी श्रद्धा आहे.
३) गणपती दूध पितो ही अंधश्रद्धा आहे.
४) पोर्तुगीजांनी भारतात आधीपासून असलेल्या ख्रिश्चनांवर व्हॅटिकनला मानण्याची सक्ती केली. त्यामुळे बरेच ख्रिश्चन मंगलोरला स्थलांतरित झाले. ही लादलेली जबरदस्ती झाली.

पिवळा डांबिस's picture

22 May 2013 - 11:24 pm | पिवळा डांबिस

ज्योताय, (श्रेयअव्हेरः यशो)
तुम्ही म्हणताय त्याच्याशी ३/४ सहमती. म्हणजे १,२,आणि ४ शी सहमती.
गणपती दूध पितो ही अंधश्रद्धा आहे याच्याशी सहमती. पण मूळ फंडामेंटल प्रश्न असा आहे की खुद्द गणपती ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे? म्हणजे गणपतीवर श्रद्धा असलेल्या मंडळींची ही खूप पवित्र भावना असली (आणि त्यांच्या भावनेचा आदर आहे) तरी त्यातील किती लोकांचा अशी एक हत्तीचं डोकं आणि मानवाचं शरीर असलेली आणि उंदरावर बसून फिरणारी अशी एखादी सचेतन एन्टीटी आहे असा विश्वास आहे? या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं असेल तर मग गणपती ही श्रद्धा मानायची की अंधश्रद्धा? आणि या प्रश्नाचं उत्तर 'होय' असं असेल तर मग बरेच प्रश्न उभे रहातात, इट इज अ मच बिगर इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम!!

बाकी लेख चांगला आहे. पण लेखकाने जरी उदाहरणं फक्त बायबलमधली दिली असली तरी विज्ञान आणि श्रद्धा यांतील विसंगती ही फक्त ख्रिश्चॅनिटीपुरती मर्यादित नसून ग्रंथानुवर्ती कुठल्याही धर्माबाबत दिसून येते, मग ते बायबल असो की कुराण. हिंदूनी जर फक्त वेद हेच अंतिम सत्य असं मानलं असतं तर मग आपल्यालाही इंद्र, कुबेर वगैरे खरे मानावे लागले असते आणि मग आपलीही अशीच गोची झाली असती. याचं कारण हे ग्रंथ हा कालमालिकेतला एक स्नॅपशॉट आहे. काळ आणि पर्यायाने संस्कृती ही सदैव वहात असते, बदलत असते. उत्क्रांत होत असते असं मुद्दामच म्हणत नाहिये कारण संस्कृतीने कधीकधी अधोगतीही केलेली आहे.
आणखी एक गोष्ट. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, आणि जीवन उत्क्रांत होत असतं हे मान्य झालं म्हणून अजून आपल्या पुढले प्रश्न संपलेले नाहियेत. जीव नक्की कधी जन्माला येतो (कन्सेप्शन च्या वेळेस की नंतर कधी) यावर अजूनही वादविवाद सुरू आहेत. खुद्द शास्त्रज्ञा-शास्त्रज्ञांमध्ये या विषयावर मतभेद आहेत. या विषयाचे तर फक्त धार्मिक नव्हे तर प्रचंड सामाजिक आणि नैतिक ओव्हरटोन्स आहेत. अर्थात अशा चर्चांमधूनच सत्य पुढे येत असतं जोवर एक बाजू दुसरीला शत्रू (किंवा मूर्ख!) समजत नाही तोवर!!
असो लेख आवडला.

प्यारे१'s picture

22 May 2013 - 11:43 pm | प्यारे१

>>>अर्थात अशा चर्चांमधूनच सत्य पुढे येत असतं जोवर एक बाजू दुसरीला शत्रू (किंवा मूर्ख!) समजत नाही तोवर!!

याबाबत 'उत्क्रांती' व्हावी का? तशी होताना दिसत नाही. :)

पैसा's picture

23 May 2013 - 12:01 am | पैसा

गणपती दूध पितो हे केवळ एक उदाहरण म्हणून दिलं होतं. गणपतीची मूर्ती दूध कधीही पिऊ शकणार नाही. त्या अर्थाने ती शुद्ध अंधश्रद्धा आहे. आता गणपती हा खराच कोणी उंदरावर बसून फिरणारा आणि हत्तीच्या तोंडाचा कोणी होता का? या प्रश्नाचं उत्तर ज्याचं त्याने आपल्यापुरतं द्यावं.

पण तुम्ही म्हणताय तसे कालौघात अनेक प्रतीकांचे अर्थ बदलत जातात. एका काळात गणांचा अधिपती असलेला कधीतरी हत्तीच्या तोंडाचा गणपती झाला असेलही. त्या विषयावर कधीतरी चर्चा करूच! पण आताचा मुद्दा शब्दाच्या निव्वळ अर्थाबद्दल आहे तर आणखी एक उदाहरण देते. एखाद्या विद्यार्थ्याची शिक्षाकाच्या शिकवण्यावर श्रद्धा असू शकेल. त्यात काही वावगं नाही, पण त्या विद्यार्थ्याने जर गणपतीला नवस बोलला आणि अभ्यास मात्र केला नाही तर ती अंधश्रद्धा झाली.

अगदी खरं सांगायचं तर एखाद्याची विज्ञानावरही श्रद्धा असू शकेल! विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, त्याच्या विरुद्ध अज्ञानच असू शकते. इथे मला अर्धवटरावांचं म्हणणं पटतंय की विज्ञान आणि श्रद्धा या एकमेकांच्या विरोधी गोष्टी नाहीत तर विज्ञान आणि अज्ञान किंवा भीती या एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी आहेत.

पिवळा डांबिस's picture

23 May 2013 - 12:24 am | पिवळा डांबिस

या प्रश्नाचं उत्तर ज्याचं त्याने आपल्यापुरतं द्यावं.

हीच तर ग्यानबाची मेख आहे ना! ज्याने त्याने आपल्यापुरतंच ठेवलं असतं तर चर्चेचा किंवा मतभेदाचा प्रसंगच कशाला आला असता? लेखात विज्ञान आणि सत्य यांचा उहापोह केला आहे. एखादी गोष्ट मी माझ्यापुरती ठेवली तरी ती सत्यच आहे असं ठरत नाही ना?

अगदी खरं सांगायचं तर एखाद्याची विज्ञानावरही श्रद्धा असू शकेल! विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, त्याच्या विरुद्ध अज्ञानच असू शकते. इथे मला अर्धवटरावांचं म्हणणं पटतंय की विज्ञान आणि श्रद्धा या एकमेकांच्या विरोधी गोष्टी नाहीत तर विज्ञान आणि अज्ञान किंवा भीती या एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी आहेत.

असहमत. विज्ञानावर जर एखाद्याची श्रद्धा असेल तर ती अंधश्रद्धाच म्हणायला हवी. मुळात विज्ञान हे स्वतःला नेहमी तावून्-सुलाखून घेत असतं. म्हणूनच जुनी तथ्यं पुन्हापुन्हा परिक्षीली जातात, काही स्वीकारली जातात काही नाकारली जातात. कोणत्याही बाबतीत, मग ते विज्ञान का असेना जर श्रद्धा बाळगली तर तो वैज्ञानिक दृष्टीकोन असू शकत नाही. मी मानतोय म्हणून ते (माझ्यापुरतं का असेना) सत्य आहे असा दृष्टीकोन वैज्ञानिक कसा असू शकेल?

पैसा's picture

23 May 2013 - 8:33 am | पैसा

एखादी गोष्ट मी माझ्यापुरती ठेवली तरी ती सत्यच आहे असं ठरत नाही ना?

आजचं सत्य उद्या तेच राहील याची खात्री नसते. गणपती होता की नव्हता केवळ या गोष्टीबद्दल माझं उत्तर मला माहित आहे. दुसर्‍याचं उत्तर तेच असेल असं सांगता येत नाही. पण म्हणून त्याला मी हसावं असं काही नाही. काही वर्षांनी मी चूक ठरू शकते. आज केवळ वादात "जितं मया" चं समाधान मिळवलं तरी काही वर्षांनी तेच सत्य असेल असेही नाही. श्रद्धा ही वैयक्तिक बाब आहे. त्याचे सामाजिक दुष्परिणाम अंधश्रद्धेइतके भयानक नसतात.

अगदी खरं सांगायचं तर एखाद्याची विज्ञानावरही श्रद्धा असू शकेल!

हे मी समजूनच लिहिले आहे. अगदी तुमचं स्वतःचं उदाहरण घ्या. तुम्ही जे शिकलात किंवा जे काम करताय त्यावर तुमची श्रद्धा नसेल तर त्यावर आधारित संशोधनाचं काम तुम्ही करू शकणार नाही. निष्ठा याचा दुसरा अर्थ श्रद्धा आहे.

न्यूटनपूर्वी अंधारयुग होतं समजा. न्यूटनने एक पाऊल टाकलं. आईन्स्टाईन त्याच्यापुढे गेला. नारळीकर, हॉकिंग आणखी पुढे गेले. उद्या आणखी कोणी याच्याही पुढे जातील. म्हणून न्यूटन आणि आईन्स्टाईन यांच्या कामाची किंमत आज शून्य समजायची का? ते विज्ञाननिष्ठ नव्हते तर अंधश्रद्धाळू होते असं आता म्हणायचं का?

दुसरी गोष्ट. विज्ञान हे प्रवाही आहे. कालचे संशोधन आज जुने होते. आजचे उद्या जुने होईल. ज्यांची विज्ञानावर श्रद्धा आहे तेच हे प्रवाहित्व समजून घेऊ शकतील, आणि त्यांना ते बिनतक्रार मान्य असेल. उलट ज्यांची विज्ञानावर अंधश्रद्धा असेल तर ते म्हणतील की मला माहित आहे तिथेच सगळं संपलं. त्यापुढे काही असू शकत नाही.

मी ज्याला श्रद्धा, विश्वास म्हणत आहे त्याचा अर्थ तुम्ही अंधश्रद्धा असा घेतला आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक काय ते मला वाटतं आता पुरेसं स्पष्ट लिहिलं आहे. बाकी ज्या मंडळींची स्वतःवर अंधश्रद्धा आहे त्यांच्याबद्दल मी काहीच बोलत नाहीये. पण तुमचे संस्कृत आणि मराठी शब्द पक्के आहेत याची माहिती आहे म्हणून इतकं लिहिलं. यापुढे काही गप्पाटप्पा असतील त्या खरडवहीत करू!

पिवळा डांबिस's picture

23 May 2013 - 11:01 pm | पिवळा डांबिस

यापुढे काही गप्पाटप्पा असतील त्या खरडवहीत करू!

मन्य! नाहीतरी या घासूगुर्जीच्या धाग्याचा टीआरपी उगाच कशाला वाढवायचा?
:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 May 2013 - 12:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अजूनही काय सुचवायचं, सांगायचं आहे ते समजले नाही. अजून स्पष्टीकरण आवडेल.

या संपूर्ण प्रतिसादात श्रद्धा आणि विश्वास यांच्यातला फरक दाखवण्यासाठी मला अभिप्रेत असणारे अर्थ वापरले आहेत. बहुदा राजेश आणि उपास यांनीही याच अर्थाने हे दोन शब्द वापरले आहेत. त्यासाठी एक जुना, चुकीची ठरलेला सिद्धांत आणि त्याचा काहीकिंचित इतिहास:

विश्व स्थिरच आहे, जसं होतं तसंच आहे आणि तसंच असेल यावर सगळ्यांचा विश्वास होता. आईनस्टाईनची श्रद्धा होती असंही म्हणता येईल. कारण जेव्हा त्याने सामान्य सापेक्षतावादाची गणिती समीकरणं सोडवली तेव्हा त्याला विश्व प्रसरण पावणारं असू शकतं हे लक्षात आलं. हे त्याला मान्य करता आलं नाही म्हणून त्याने त्या समीकरणांमधे एक स्थिरांक घुसडला, λ(०). पुढे एडविन हबलला निरीक्षणं करताना लक्षात आलं की दीर्घिका एकमेकांपासून लांब जात आहेत. याचा अर्थ विश्व प्रसरण पावत आहे. आईनस्टाईनच्या या λ ची किंमत शून्य केली गेली. पण आता विश्वाच्या स्थिरस्थितीवर कोणाचीही श्रद्धा राहिली नाही. λ शून्य असण्याबद्दल विश्वास होता. पुढे हा λ शून्य नसून याची किंमत शून्य आणि एकच्या अधेमधे आहे असं लक्षात आलं.

आता त्या λ ची किंमत काय यासाठी WMAP(१) सारखी मोठमोठी मिशन्स चालवली जातात. आणि त्या विदेतून मिळालेल्या λ च्या किंमतीवर किती टक्के विश्वास(२) ठेवता येईल अशा अर्थाची चित्र निकाल म्हणून प्रसिद्ध होतात.

---

श्रद्धा आणि विश्वासाच्या बाबतीत शब्दकोशा(३)ने थोडी निराशाच केली तरीही मोल्सवर्थ शब्दकोशा(३)मधे मराठी शब्दांचे नेमके अर्थ मिळतात यावर माझा अजूनही, साधारण ९५% विश्वास आहे.

---

विश्वासार्ह, विश्वासघात असे शब्द मराठी भाषेत दिसतात. ते पहाता विश्वासाची चिकित्सा होते, होऊ शकते असं दिसतं. सामान्य वापरात येणारं वाक्य "पैशाच्या बाबतीत त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस"(४) हे पहाता विश्वास कंडीशनल (मराठी?) असतो असंही दिसतं. घाटपांडे काकांचं आवडतं वाक्य - श्रद्धेची चिकित्सा होत नाही - पटण्यासारखं वाटतं.

---

०. याच Lambdaवरून विश्वाचं Lambda-CDM model बहुमान्य आहे.
१. याबद्दल अधिक उत्सुकता असल्यास खरडवही/व्यनितून लिंका देऊ शकते.
२. ही विकीपीडीयाची लिंक आहे.
३. आता शब्द बरोबर लिहीला. आमच्या खडूस संपादक-मित्राने याची नोंद घ्यावी.
४. ज्यांना माहित आहे त्यांना संदर्भ समजेलच.

-- सदर फुटनोट्स पंगाकाकांना समर्पित.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 May 2013 - 11:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वरच्या प्रतिसादात एक शुद्धलेखन दुरुस्ती: शब्दकोश

(नाहीतर तिकडचे एक संपादक-मित्र पुन्हा खरडी करून जीव खातील.)

अय्या!! तिकडच्या संपादकांना तिथे काही कामं नसतात का? इकडेच ठिय्या देऊन असतात की कॉय? हीच ती एखाद्या संस्थळाबद्दलची श्रद्धा!

पिशी अबोली's picture

22 May 2013 - 11:25 pm | पिशी अबोली

'शब्दकोष' हे माझ्या महितीप्रमाणे चुकीचे नाहीये.

नेटवर पाहिले तर कोश आणि कोष हे दोन्ही शब्द अनुक्रमे डिक्शनरी आणि लेक्सिकॉन अशा अर्थांचे दिसले. त्यामुळे चक्क कुठलाही श/ष लिहिला तरी ते व्याक्रणशुद्धच आहे. असे क्वचितच होत असेल.

पिशी अबोली's picture

22 May 2013 - 11:48 pm | पिशी अबोली

हो ना..म्हणूनच तर या शब्दांची फार गंमत वाटते. यापैकी एकच शब्द माहीत असणार्‍याला दुसरा कायम चुकीचा वाटत असतो. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 May 2013 - 12:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मोल्सवर्थ काकांना प्रश्न विचारला. या लिंका आणि उत्तरं:

कोश (p. 187) [ kōśa ] m (S) A treasury. 2 A particular receptacle, of which five are enumerated; अन्नमय-प्राण- मय-मनोमय-विज्ञानमय-आनंदमय-कोश. 3 A dictionary or vocabulary. 4 A sheath, integument, investing membrane, tunicle, coating. 5 A scabbard. 6 The cod or cocoon of the spider कोळी. 7 A bud. Ex. कमळकोशींचा सुवास बरा ॥. 8 Judicial trial by ordeal--by fire, water, poison, the balance, boiling oil, drinking water that has been poured over his tutelar god or other idol or a Bráhman, and particularly this last form. 9 (क्रोश S) A measure of distance, a kos or cos. See कोस.

कोष (p. 187) [ kōṣa ] m (S) See कोश, except in the sense A measure of distance.

शब्दकोष: ज्ञेय (p. 913) [ jñēya ] a S (Possible, purposed, necessary &c.) to be known or understood. Ex. ह्या शब्दकोषांतील प्रत्येक शब्द ज्ञेय आहे एतज्ज्ञानानें जो ज्ञाता तोच सुज्ञ.

शब्दकोश: (p. 781) [ śabdakōśa ] or -कोष m (S) A repository of words, a dictionary or vocabulary.

शब्दकोष असा शब्द गूगलमधे शोधला तर साधारण 129,000 results मिळाले. शब्दकोश असा शब्द गूगलमधे शोधला तर साधारण 6,430,000 results मिळाले. शब्दकोषाच्या साधारण साडेचारपट अधिक.

निष्कर्षः मोल्सवर्थ - अभिजनांच्या भाषेत - कोश/शब्दकोश हा शब्द मूळ असल्याचं दिसतं. इंटरनेटवर लिखाण करणार्‍या लोकांचं - काही प्रमाणात बहुजन/आम आदमी-औरत - वापरानुसारही शब्दकोश हाच शब्द अधिक प्रचलित दिसतो.

आमच्या खडूस तरीही प्रिय मित्राचं मतही या अभिजन-बहुजनांसारखंच असल्यामुळे निदान मित्रप्रेम का अभिजन-बहुजन मत असा तिढा माझ्यासमोर नाही. अधूनमधून शब्दकोष असं लिहिलं गेलं तरी शेवटचा ष खोडून श लिहीण्याचा प्रयत्न मी करत राहिन. शब्दकोष असा शब्द चूक समजता येणार नाही हे या उपक्रमातून समजलं.

---

विज्ञान आणि वैज्ञानिकांमुळे समाजात घडत गेलेले बदल अशा अर्थाच्या लेखात अवांतर करण्याबाबत क्षमाप्रार्थी आहे. पण मराठी भाषेसाठी शुद्धलेखन हा एक महत्त्वाचा पैलू असल्यामुळे रहावलं नाही.

पिवळा डांबिस's picture

23 May 2013 - 12:47 am | पिवळा डांबिस

मराठी भाषेसाठी शुद्धलेखन हा एक महत्त्वाचा पैलू असल्यामुळे रहावलं नाही.

असं मिपावर जाहीर लिहिल्याबद्दल हिला दहा दिवसांसाठी निलंबित करण्यात यावं असा प्रस्ताव मी मांडत आहे!
एनी अनुमोदक?
:)

बॅटमॅन's picture

23 May 2013 - 12:54 am | बॅटमॅन

"निलंबाया दाही दिवश्या"? ;)

सोत्रि's picture

23 May 2013 - 12:57 am | सोत्रि

पिडां काका, मी आहेच!
+१, अनुमोदन. :)

स्वगतः सोक्या, अजून 'प्रिय अदितीस' हे पत्र लिहायचे राहिले आहे ना रे!

- (अनुमोदक) सोकाजी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 May 2013 - 1:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तिरके तिरके प्रतिसाद देण्याची परंपरा कधी रे मोडली? माझा इतिहासाचा अभ्यास कमी पडतोय.

अवांतरः मी पण तुला प्रॉमिस केलेलं खोद-शोधकाम अजून केलेलं नाहीये. ;-)

आवर्जून लिंका दिल्याबद्दल आभार.आम्ही मोल्सवर्थकाकांना विचारले नव्हते, तर संस्कृत शब्दकोश पाहिला होता. पण हरकत नाही, या निमित्ताने कळ्ळं काय आहे ते. बाकी "शब्दकोष" च्या लिंकमध्ये पाहिल्यास डिक्शनरी हाच अर्थ जाणवतोय. ज्ञेय या शब्दाचा अर्थ सांगताना डिक्शनरीचे उदाहरण दिलेय इतकेच. तस्मात मराठीतही दोन्ही पाठ वैध आहेत, फक्त "कोश" हा पाठ जास्त प्रचलित आहे असे म्हटले तर जास्त सयुक्तिक ठरेल.

राजेश घासकडवी's picture

22 May 2013 - 9:53 pm | राजेश घासकडवी

एकंदरीत आपल्या श्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या व्याख्या किंचित वेगळ्या दिसतात. माझ्या व्याख्या मी स्पष्ट केल्या आहेत. आणि व्याख्यांपलिकडे त्यांचा अर्थ मला काय अभिप्रेत आहे ते लेखातल्या माहितीतून स्पष्ट व्हावंच.

एक एकदम अवांतर. मला हे मागेच बघितलं तेह्वा विचारायचं होतं, एक कुतुहल म्हणूनच केवळ.. तिकडे पण माझे मिपावरील लेखन किंवा मिपावरील नवे लेखन अशी स्वाक्षरी करता का हो?

अवांतर आहे हे कबूल केलंत म्हणून बरं झालं. खरडवही असताना धाग्यावर जाहीर विचारणा करण्याचं कारण काय हा प्रश्न आहेच. पण इथे विचारलंत म्हणून इथे सांगतो. मी 'तिकडे' किंवा 'दुसरीकडे कुठेतरी' काय करतो याविषयी तुम्ही कृपया प्रश्न विचारू नयेत. कारण ते माझं मिपाबाहेरचं व्यक्तिगत आयुष्य आहे. फक्त एवढंच सांगतो, की 'तिकडचे' संपादक असले वैयक्तिक आणि खोचक प्रश्न चालवून घेत नाहीत.

यशोधरा's picture

22 May 2013 - 10:10 pm | यशोधरा

> फक्त एवढंच सांगतो, की 'तिकडचे' संपादक असले वैयक्तिक आणि खोचक प्रश्न चालवून घेत नाहीत.

इकडच्या संपादकांची व्यक्तीस्वातंत्र्यावर श्रद्धा आहे, त्यामुळे दुसर्‍या संस्थळाच्या जाहिराती चालवून घेतात.

आजानुकर्ण's picture

23 May 2013 - 2:30 am | आजानुकर्ण

इकडच्या संपादकांची व्यक्तीस्वातंत्र्यावर श्रद्धा आहे, त्यामुळे दुसर्‍या संस्थळाच्या जाहिराती चालवून घेतात.

सहमत आहे. संवाद आणि छायाप्रकाश या संकेतस्थळांची जाहिरात मलाही मिसळपाव या संकेतस्थळाच्या संपादकांनी चालवून घेतल्यामुळे पाहता आली.

यशोधरा's picture

23 May 2013 - 2:45 am | यशोधरा

मी मिपाची जाहिरातही करते. मिपावर येऊन, इथे लिहून, मिपावर व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होते, मतं मांडता येत नाहीत म्हणून वेगळं संस्थळ काढून लोकांना तिथे या म्हणून सांगत नाही.

सहमतीबद्दल आभार आणि जाहिरात पाहिल्याबद्दल डब्बल आभार.

आजानुकर्ण's picture

23 May 2013 - 3:01 am | आजानुकर्ण

मला वाटते इथे केवळ विवक्षित संकेतस्थळाची जाहिरात इतका तुमचा मुद्दा क्षुद्र नसून अशा जाहिरातींमधील व्यापक अन्योन्याश्रय अपेक्षित आहे. उदा. मिपावर लिहिताना ऐसीची जाहिरात केल्यास ऐसीवर लिहिताना मिपाची जाहिरात करावी वगैरे.

बरं हे असो. एक एकदम अवांतर. मला हे मागेच बघितलं तेह्वा विचारायचं होतं, एक कुतुहल म्हणूनच केवळ.. तिकडे पण माझे मिपावरील लेखन किंवा मिपावरील नवे लेखन अशी स्वाक्षरी करता का हो?

या मुद्द्याशी निदान तुम्ही स्वतः सुसंगत असावे या हेतूने छायाप्रकाश या संकेतस्थळावर तुम्ही मिपाची जाहिरात करावी असे सुचवावेसे वाटते. संवाद या संकेतस्थळावर मिपाची जाहिरात सापडली आहे.

छायाप्रकाशवर करता येत नाही, अन्यथा केली असती. संवादवर सापडली? गुड.

आजानुकर्ण's picture

23 May 2013 - 3:06 am | आजानुकर्ण

धन्यवाद. निदान छायाप्रकाशची जाहिरात मिपावरुन काढून टाकता येईल म्हणजे तुमच्या तत्त्वाशी तुमचे वर्तन सुसंगत होईल.

येईल की. बरेच काही करता येईल. सद्ध्या तुमच्याकडे दुर्लक्ष करीन म्हणते.

बाकी तुमचं चालूद्या. काय? :)

या तिरप्या प्रतिसादांच्या निमित्ताने "कुणाला कशाचं तर बोडकीला केसांचं" ही म्हण* आठवली.

*श्रेय अव्हेरः अखिल सिंहगड रोड वडगांव धायरी (डीयेस्केसह) वारजे मराठी भाषा सेवा संघ

यशोधरा's picture

25 May 2013 - 11:13 pm | यशोधरा

good to see you too. :)

प्रसाद गोडबोले's picture

25 May 2013 - 11:20 pm | प्रसाद गोडबोले

हे असं तिरकं तिरकं किती तिरकं होवु शकत ?

मोदक's picture

26 May 2013 - 8:58 pm | मोदक

अजून बराच वाव आहे.

एखादा प्रश्न विचारा किंवा असहमती दर्शवा.

किंवा ही लिंक बघा!

कवितानागेश's picture

27 May 2013 - 2:33 pm | कवितानागेश

लिहिणारा आयडी किती तिरपा आहे त्यावर अवलंबून असांवं हे तितपे तिरपे जाणे!. ;)
पण मर्यादा प्रत्येक गोष्टीला असतेच. :D

शिल्पा ब's picture

28 May 2013 - 1:08 am | शिल्पा ब

<<<<पण मर्यादा प्रत्येक गोष्टीला असतेच.
पण या (अन इतर काही) धाग्यांवरचे प्रतिसाद पाहता सगळ्याच गोष्टी मर्यादित नाहीत असं स्पष्ट होतं असं आमचं प्रायव्हेट मत आहे.. ;)

मुक्त विहारि's picture

22 May 2013 - 9:04 pm | मुक्त विहारि

विचार करायला भाग पाडणारा अजुन एक लेख..

अर्धवटराव's picture

22 May 2013 - 9:44 pm | अर्धवटराव

पण हा लढा श्रद्धेविरुद्ध विज्ञान असा नसुन भिती विरुद्ध जिज्ञासा असा आहे. धर्मसंस्थेच्या जोखडातुन माणसाची सुटका विज्ञानाने केली नाहि... मानवी मनातली जिज्ञासा/ज्ञानलालसा/लढाऊ वृत्ती त्याच मानवी मनातल्या भितीशी टकरावल्या व त्यातुन माणसाचा श्वास मोकळा झाला.

श्रद्धा व विज्ञान परस्परांविरुद्ध उभे ठाकुच शकत नाहित. त्यांचे मार्ग एकमेकांना कुठेच छेदत नाहित.

कार्यकारण भावावर विज्ञानाचा डोलारा उभा आहे, व तो अनादी अनंत आहे. पृथ्वी नामक एका ग्रहावर विशिष्ट रासायनीक देहधारक मानवाने आपल्या डोळ्यांनी या विज्ञानाचा एक छोटासा कवडसा बघितला. विज्ञानाच्या अतिविषाल पटावर हा कवडसा (क्वांटीटीव्ह दृष्टीने) अगदीच क्षुल्लक आहे.

काळाच्या प्रवाहीपणावर श्रद्धेचा डोलारा उभा आहे. तो देखील अनादी अनंत आहे. त्याच पृथ्वी नामक ग्रहावरच्या मानवाने काळाचे सतत धावते रूप अनुभवले. पुढचे पाऊल टाकावेच लागते हे कंपल्शन अनुभवले. सृष्टीच्या अनादी अनंत पसार्‍याच्या मानाने हा अनुभव देखील क्षुल्लक आहे.

चर्च आदि व्यवस्थेने आपले हितसंबंध जोपासताना माणसाच्या जिज्ञासेला मारुन मुरकुटुन आपली बटीक बनवायचा प्रयत्न केला. तिच जिज्ञासा उफाळुन वर आलि व तिने धर्मसंस्थेचे सिंहासन मोडुन काढले.
आज विज्ञानाचे जे प्रचलीत प्रारुप आहे, कदाचीत एखादा निओ अ‍ॅण्डर्सन ते प्रारुप उद्या मोडुन काढेल.

मानवाला जर खरच सत्याची कास बाणवायची आहे, शोषण थांबवायचे आहे, स्वातंत्र्य उपभोगायचे आहे, तर त्याने सर्वप्रथम धर्म, श्रद्धा, विज्ञान वगैरे कुठल्याही संस्थेकडे अंगुलीनिर्देष करणे थांबवावे. माणसाचा खरा प्रॉब्लेम स्वतः माणुस आहे. मानवतेला अहितकारि स्वतः मानवता आहे. या एका प्रॉब्लेमकडे व्यवस्थीत लक्ष्य दिले तरी (सध्याचे) सर्व प्रश्न सुटतील (आणि कदाचीत नवे प्रश्न सुरु होतील). असो.

अर्धवटराव

यशोधरा's picture

22 May 2013 - 10:11 pm | यशोधरा

मस्त लिहिले आहे.

प्यारे१'s picture

22 May 2013 - 10:18 pm | प्यारे१

+१
पाश्चात्य धर्मसंस्था किंवा तिचं स्ट्रक्चर हे जास्त करुन 'गॉड फिअरींग' अशा स्वरुपाचं आहे.
भारतीय तत्वज्ञान 'गॉड लव्हिंग' स्वरुपाचं सुद्धा आहे. बाकी चालू द्या.

प्रसाद गोडबोले's picture

23 May 2013 - 1:21 am | प्रसाद गोडबोले

भारतीय तत्वज्ञान

>> तुम्हाला हिंदु तत्वज्ञान असे म्हणायचे आहे का ?

प्यारे१'s picture

23 May 2013 - 1:27 am | प्यारे१

तसंही चालेल.
भावना पोचल्या की झालं. जेव्हा हे तत्वज्ञान उदयाला आलं तेव्हा हिंदू वगैरे काहीच नव्हतं त्यामुळं भारतीय म्हणालो. असो.
आईबापाची भीती वाटत नाही. आदरयुक्त प्रेम वाटतं. तसंच काहीसं आहे.
अर्थात ह्यात श्रेणी आहेत. पण इथे तो विषय नाही. असो. :)

सस्नेह's picture

23 May 2013 - 3:33 pm | सस्नेह

विज्ञानाने मानवी जीवन उज्ज्वल बनवले आहे. भीतीवर मात केली आहे. पण मृत्यूवर नाही.
समोर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे अगर घटनेचे स्पष्टीकरण विज्ञान देऊ शकतेच असे नाही. म्हणून ती घटना नाकारण्यात काय अर्थ आहे ? विज्ञान सांगू शकत नसलेल्या गोष्टींचे कारण अनुभूती देत असतील तर अनुभूती नाकारून तिला अंधश्रद्धा समजणे शहाणपणाचे आहे का ? उदा. एखादे अनोळखी काटेरी फळ खाण्यापूर्वी दुसऱ्या कुणी ते खाल्ले आहे अन ते विषारी नाही, या माहितीला श्रद्धा म्हणता येईल. त्यासाठी प्रयोगशाळेत नेऊन चिरफाड केलीच पाहिजे असे नाही.
तेव्हा धर्म श्रद्धा यांची ढापणे असू नयेत तसेच विज्ञानाचेही ढापण बनू नये याची खबरदारी घ्यायला हवी.

स्पंदना's picture

28 May 2013 - 8:24 am | स्पंदना

सुरेख!

अत्रन्गि पाउस's picture

22 May 2013 - 11:16 pm | अत्रन्गि पाउस

ह्यांचा कालखंड एकाच हे आजच कळले !!
विषयांतर बाबत क्षमस्व!!

पिशी अबोली's picture

22 May 2013 - 11:27 pm | पिशी अबोली

लेख अतिशय आवडला.

प्यारे१'s picture

23 May 2013 - 12:55 am | प्यारे१

>>>रिचर्ड लेन्स्की नावाच्या जीवशास्त्रज्ञाने त्याआधीची वीस वर्षं एक प्रयोग चालू ठेवला होता. या प्रयोगाचं उद्दिष्ट होतं ते म्हणजे प्रयोगशाळेत उत्क्रांती घडताना प्रत्यक्ष पहाणं. यात त्याला घवघवीत यश आलं.

ह्याबद्दल अधिक माहिती कुठं मिळेल????

राजेश घासकडवी's picture

23 May 2013 - 9:41 pm | राजेश घासकडवी

ह्याबद्दल अधिक माहिती कुठं मिळेल????

मी या विषयावर एक लेखमाला लिहिलेली आहे.

प्यारे१'s picture

23 May 2013 - 9:47 pm | प्यारे१

धन्यवाद. वाचायला वेळ लागण्याची शक्यता आहे. काही शंका उपस्थित झाल्यास विचारेनच.
पुन्हा एकदा आभार.

आजानुकर्ण's picture

23 May 2013 - 2:33 am | आजानुकर्ण

उत्तम लेख. फार आवडला. पुन्हा पुन्हा वाचावा व संग्रहात ठेवावा असा हा लेख आहे.

अनुप ढेरे's picture

23 May 2013 - 10:38 am | अनुप ढेरे

सुंदर लेख आणि सुंदर चर्चा...

परिकथेतील राजकुमार's picture

23 May 2013 - 11:03 am | परिकथेतील राजकुमार

लेख एकदम आवडेश गुर्जी. ज्ञानात आणि विचारात भर पडली.

लेखाखालच्या प्रतिक्रियांमधून लेखासंदर्भात इतर माहितीची भर पडेल असे वाटले होते, पण तिथे 'मला बघा किती अक्कल आहे' हे दाखवण्याचीच चढाओढ दिसली.

असो...

विकास's picture

23 May 2013 - 11:54 pm | विकास

लेख आवडला. वरती अनेकांनी म्हणल्याप्रमाणे श्रद्धा शब्द पटला नाही. त्या संदर्भात लेखात आलेला धर्मसत्ता शब्दाचा वापर सांगावासा वाटतो. व्हॅटीकन आणि त्याला अनुषंगून असलेली चर्च व्यवस्था ही केवळ श्रद्धेवर आधारलेली नसून त्या व्यवस्थेच्या जन्मापासून सत्तेवर आधारलेली आहे. त्यामुळे "इन्क्विजिशन इज नॉट (ऑलवेज) अबाउट फेथ, इट इज (मेनीटाईम्स) अबाऊट पॉवर" :) असे म्हणावेसे वाटते.

पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सामान्यांमध्ये स्वीकारलं गेलं.

ऑलमोस्ट सत्य आहे. पण श्रद्धेने म्हणा अथवा अज्ञानाने म्हणा, पण अजूनही सूर्य पृथ्वीभोवती फिरतो म्हणणारे आहेत!

http://blogs.discovermagazine.com/gnxp/2011/03/who-thinks-the-sun-goes-around-the-earth/#.UZ5dF9hlGjI

त्या शिवाय Flat Earth Society खरेच अस्तित्वात आहे! त्यांचे विचार वाचण्यासारखे आहेत!

प्रसाद गोडबोले's picture

24 May 2013 - 12:07 am | प्रसाद गोडबोले

कमेंट आवडली बुवा !!

पण , तुम्ही तरी हे सिध्द करु शकता का कि पृथ्वी सुर्या भोवती फिरते , सुर्य पृथ्वी भोवती नाही ... ??

रादर इथे मिपावरच्यांना आपणा पैकी किती जणांनी हे सत्य पडताळुन पाहिले आहे ?
आजपर्यंत माझा वैयक्तिक अनुभव असा आहे कि ९९.९% लोकांची ही केवळ श्रध्दा आहे ... कोणीतरी सांगितलं म्हणुन आपलं मानलं ....कोणी पडताळुन नाही पाहिलं =))

पुरावा काय ? पुरावा काय ?

प्रसाद गोडबोले's picture

24 May 2013 - 12:24 am | प्रसाद गोडबोले

सत्य फार फिलॉसॉफिकल गोष्ट आहे ही .
एखादी गोष्ट सत्य आहे असं जेव्हा पण म्हणतो तेव्हा आपल्या मर्यादित ज्ञानाच्या कक्षेतच ते सत्य असते ...त्याच्या बाहेर नाही ... त्यामुळे एखादी गोष्ट जी आज सत्य वाटत आहे ते कदाचित उद्या असत्य ठरेल ( एक्सेप्ट मॅथेमॅटीक्स ) कारण ज्ञानाच्या कक्षा कायम रुंदावतच राहणार . जेव्हा आपण एखादी गोष्ट सत्य आहे असं म्हणत असतो तेव्हा नेहमीच " आपल्या मर्यादित ज्ञानाच्या आधारावर " हा टॅग असला पाहिजे ...
आणि इथेच तर ग्यानबाची मेख आहे ...जेव्हा हा टॅग लागतो तेव्हा ती गोष्ट श्रध्देच्या कक्षेत गेली नाही का !!!!

थोडक्यात विज्ञान असं काही असणं शक्यच नाही ... तुम्ही कधीच कोणत्याच गोष्टीविषयी अ‍ॅब्सोल्युटली शुअर होवु शकत नाही आणि झालात तरी वर म्हणल्या प्रमाणे "सद्य परीस्थितीत अ‍ॅट ताईम T = 0 , आणि मर्यादित अनुभवांच्या / ज्ञानाच्या आधारावर " हा टॅग कायम असणारच ... सगंळं आहे ती श्रध्दाच आहे !!

रेने देकार्त "मेडीटेशन्स ऑन फर्स्ट फिलॉसॉफी " मधे म्हणतो

" एकुणच सगळेच अनुभव हे इंदिर्यां मार्फत येत असतात , आणि इन्द्रियां मार्फत येणारे अनुभव डिल्युजनल असतात (जसे मृगजळ / पाण्यात सरळ काठी वाकडी दिसणे / पृथ्वी सपाट भासणे इ.इ. ) ... कदाचित हे सगलंच खोट आहे ...मी गाढ स्वप्नात निजलोय ... इतक्या गाढ की ह्या गोष्टी खर्‍या भासताहेत ... आणि "मी आहे (कारण मी हा विचार करतोय ) " ह्या व्यतिरिक्त हे बाकी काही सत्य आहे हे कोणत्याही प्रकारे प्रुव्ह करता येणार नाही . "

वेड लागलं मला वेडं लागलं वेडं लागलं =))

सुधीर's picture

24 May 2013 - 9:03 am | सुधीर

एकंदर लेख आणि प्रतिसाद दोन्ही आवडले.