नव्या वर्षाचा हा पहिला महिना. नेमके बोलायचे झाले तर आज एकतीस जानेवारी. गेले तीस दिवस मी प्रचंड दडपणाखाली आहे. केव्हाही काहीतरी अघटीत घडेल अशी भीती आम्हा तिघांनाही सतावते आहे. एकतीस डिसेंबरच्या रात्री 'ती' पार्टी झालीच नसती तर बरं असं आता आम्हा तिघांनाही राहून राहून वाटतं. आम्हा तिघांव्यतिरिक्त त्या पार्टीला हजर असणारा आमचा मित्र रिचर्ड कॅरेक त्यादिवसापासून बेपत्ता आहे आणि त्याचा शोध घेण्याची हिंमत आम्हा तिघांमधेही नाही. त्या दिवशी कॅरेकने सांगितलेली त्याची चित्तरकथा अशक्य कोटीतली वाटेल अशी असली तरी ती पूर्णपणे काल्पनिक आहे असं आम्हा तिघांनाही वाटत नाही.
आम्ही तिघांनीही विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखेत 'डॉक्टरेट' मिळवलेली आहे. मी भौतिकशास्त्रात तर मेडिसननी 'अमूर्त' अंकगणितात आणि ब्रॅझेलनी संगणकप्रणालीशास्त्रात जागतिक पातळीवर आपापल्या संशोधनाचा ठसा उमटवलेला आहे. आम्हा तिघांना एकत्र आणणारा आणि आमचा याराना टिकवून ठेवणारा सगळ्यात महत्वाचा दुवा म्हणजे आमचा विज्ञान काल्पनिका लिहीण्याचा छंद. एकतीस डिसेंबरच्या रात्री ठरल्याप्रमाणे आम्ही तिघे मेडिसनच्या घरी एकत्र जमलेलो होतो. तिघांनीही उंची स्कॉचचे दोन दोन लार्ज पेग रिचवलेले होते. हॉलीवूडमधल्या नटनट्यांच्या भानगडींपासून ते राजकारणापर्यंत सगळ्या विषयांवर मनमुराद गप्पा सुरू होत्या. आमच्यासोबत रिचर्ड कॅरेकही त्याची लाडकी रेड वाईन घेत शांतपणे बसलेला होता. तो नेहेमीसारखाच शांत बसून आमची बकवास ऐकत होता.
रिचर्ड कॅरेक हा माणूसच थोडा रहस्यमय आणि आगळावेगळा वाटायचा. तीन वर्षांपूर्वी अचानकच हा आगंतुक आमच्या विद्यापीठात प्रकट झाला. आम्ही स्वत:ला फारफार बुद्धीमान, व्यासंगी, विद्वान वगैरे वगैरे समजत असलो, तरी रिचर्ड या बाबतीत आमच्याही खूपच पुढे होता. त्याची आकलनशक्ती, विद्वत्ता, धारणाशक्ती आणि प्रगल्भता आमच्यापेक्षा कित्येक पटींनी उजवी होती. त्यालाही विज्ञान काल्पनिका लिहीण्याचा नाद लागला आणि क्वचितप्रसंगी का होईना, तो आमच्यात मिसळायला लागला. त्याच्या विद्यापीठात येण्यापूर्वीच्या आयुष्याबद्दल तो एका चकार शब्दानेही कधीच बोलायचा नाही. जवळजवळ पूर्ण दिवस तो वेधशाळेतल्या दुर्बिणीला वाहिलेला असायचा. अपरात्रीसुद्धा तो आपल्या खोलीत भुतासारखा एकटाच बसून आकडेमोड करताना दिसायचा. 'वैश्विक किरण' या विषयात आपलं खूपच प्रगत आणि महत्वाचं संशोधन चालू आहे या व्यतिरिक्त तो आपल्या कामाविषयी काहीही बोलायचा नाही. मात्र बोलण्याच्या ओघात सहज लक्षात यायचं की पार पुरातत्व विद्येपासून ते मानसशास्त्र, तत्वज्ञान आणि खगोलशास्त्रापर्यंत सगळ्याच ज्ञानशाखांचा त्याचा गाढा व्यासंग होता.
सगळ्या फालतू गप्पा संपल्यावर बोलण्याच्या ओघातच आमचा परग्रहावरील जीवसृष्टीबद्दल उहापोह सुरू झाला. आमच्या काल्पनिकांमधून अशा जीवसृष्टीचा उल्लेख हमखास यायचा. माझी एक वाईट खोड आहे, दारू चढली की माझ्यातला सारासार, वस्तुनिष्ठ आणि व्यावहारिक विचार करणारा वैज्ञानीक अंतर्धान पावतो आणि माझा एकदम 'विश्वयोगी ओशो' होउन जातो. मला मनोविष्लेषणपर थापाबाजी करणे, 'जगाच्या कल्याणा संताच्या विभूती' असा मोठेपणा स्वत:वर ओढवून घेणे, जगाचे कल्याण करण्यासाठी काहीच्याकाही उपाययोजना सुचवणे, पांचट विनोद करणे, तर्कशास्त्राचा खिमा करत इतरांना निरूत्तर करणे, आपले विचार प्रत्येक बाबतीत किती जगावेगळे आहेत आणि 'सुलझे हुवे' आहेत याचे रूखवत मांडणे असले झटके यायला लागतात.
मी बरळायला लागलो, "ज्या समाजात आपण राहतो, तिथे बुद्धीवंतांची साली अजिबात कदर नाही. सगळ्याच क्षेत्रात सत्तांध राजकारणी आणि धर्मांध बुवा, बापूंच्या भ्रष्टाचाराचं थैमान सुरू आहे. जातीच्या, धर्माच्या नावाखाली चाललेला गुंडांचा नंगानाच निमूटपणे सहन करावा लागतो आहे. कधीही आण्विक युद्धाचा भडका उडेल आणि या ग्रहाची राखरांगोळी होईल. आपल्या विज्ञान काल्पनिका तरी काय आहेत? उद्विग्नतेतून बाहेर पडण्यासाठी आपण शोधलेली ती एक पळवाट आहे. काल्पनिक विश्वात गुंग झालो की या जगाचा विसर पडतो. सगळे साधूसंतही साले पळपुटेच आहेत. समाजापासून पळून हिमालयात जायचं, आणि मग गुहेत बसून अप्सरांची स्वप्ने पहायची. आपल्यात आणि या पळपुट्या अध्यात्मात काय फरक आहे? माझ्या अध्यात्मात आधी अप्सरा येतात आणि नंतर जमल्यास थोडेफार आत्मज्ञान येते. कवेत अप्सरा नसली तर करायचे काय त्या आत्मज्ञानाचे?" मी मोठ्या आशेने आपला हात टाळीसाठी पुढे केला, आणि बाकी तिघांच्या चेहर्यावर स्पष्टपणे दिसणारा वैताग पाहून तो निमूटपणे खाली घेतला.
इतक्यात कधी नव्हे ते रिचर्ड कॅरेक स्वत:हून बोलायला लागला, "मला एकदाच माझ्या कल्पनेतल्या परग्रहावर जायची संधी मिळाली आणि दुर्दैवाने तीच माझ्या आजवरच्या आयुष्यातली सर्वात दुर्दैवी घटना ठरू पाहते आहे. ती सगळी कहाणीच मी आता तुम्हाला सांगतो." कॅरेकनी घसा खाकरत त्याच्या नेहेमीच्या संथ लयीत पुढे बोलायला सुरूवात केली, "माझ्या पूर्वायुष्यात मी एक शास्त्रज्ञ होतो. मी बर्याच विज्ञान काल्पनिका लिहील्या. माझ्या कथांमधून मी नेहेमीच परग्रहावरच्या एका अर्ध-सुसंस्कृत समाजाचा उल्लेख करायचो. या ग्रहावरच्या लोकांची सरासरी बुद्धीमत्ता असामान्य असायची, पण वैचारिक पातळी अत्यंत खालची! यांचा सगळा काळ युद्ध करण्यात किंवा युद्धाची तयारी करण्यात जायचा. आपल्या कळप करण्याचा वृत्तीमुळे यांनी आपल्याच ग्रहाचे नव्हे तर अंतराळस्थानकांचेही वेगवेगळे झेंडे लावून स्वतंत्र इलाके केलेले असायचे.
एकेदिवशी मला माझ्या वरिष्ठांचा निरोप आला. माझ्या कथासृष्टीत वर्णन केल्याप्रमाणे एक ग्रह खरोखरच जी-आय-ए सूर्यमालेत अस्तित्वात होता. आमच्या मातृग्रहावरच्या प्रगत समाजात देव, देश, धर्म वगैरे खुळचट कल्पना कधीच्याच रद्दबातल झालेल्या होत्या. शिवाय निकृष्ट वैचारिक पातळी असलेल्या आणि मागास आयुष्य जगणार्या कित्येक समूहांचे शिरकाण करून माझ्या 'झिऑन' समाजाचे माझ्या संपूर्ण मातृग्रहावर एकछत्री साम्राज्यही स्थापन झालेले होते. आमच्या मातृग्रहावरचे इंधनस्त्रोत संपत आल्यामुळे 'पृथ्वी' नामक या ग्रहावरची निर्दयी संस्कृती नष्ट करून तिथे वस्ती करण्याचा आमचा इरादा होता. तशी योजना सुव्यवस्थितपणे तयार झाल्यावर तिच्या पहिल्या टप्प्यात पृथ्वीवर राहून हेरगिरी करण्यासाठी निवडलेल्या पाच जणात माझा समावेश झाला. माझ्या गुणसूत्रांमधे यथायोग्य बदल करून, आवश्यक ते प्रशिक्षण देउन माझी रवानगी करण्यात आली.
माझ्या मेंदूत बसवलेल्या एका जैविक उपकरणाद्वारे माझ्याशी सतत संपर्क साधला जात होता. माझ्या कल्पनेपेक्षाही पृथ्वीवरचं जग गलिच्छ, ओंगळवाणं, मागास आणि प्रतिगामी निघालं. माझा जीव घुसमटल्यासारखा व्हायला लागला. सुदैवानं मला काही सूज्ञ लोकही भेटले. मी त्यांच्यासारखाच माझ्या मातृग्रहावरच्या खरोखरच्या जीवनशैलीचे वर्णन करणार्या कथा विज्ञान काल्पनिका म्हणून लिहायला लागलो. त्यांना खूप प्रसिद्धीपण मिळाली. काही दिवसात अचानक माझा माझ्या मातृग्रहाशी संपर्क तुटला. माझ्या बुद्धीमत्तेच्या जोरावर पृथ्वीवर कोठेही आरामात राहण्याजोगी कमाई करणे मला सहज शक्य होते. माझी माणसं पुन्हा संपर्क साधतील ही वेडी आशाही होती." कॅरेक थोडावेळ बोलायचा थांबला.
"मग या ग्रहावरून तू परत कधी आलास?", कॅरेकनी नशेत बडबड केली असं समजून ब्रॅझेलनी थट्टेखोर स्वरात प्रश्न विचारला. "परत कुठला जातोय? इथेच अडकून पडलोय मी असहायपणे. साहित्यीक भाषेत जिला 'त्रिशंकू अवस्था' म्हणतात ती हीच!", कॅरेक हताशपणे म्हणाला आणि रडवेल्या चेहर्याने पार्टी अर्ध्यात सोडून लांबलांब ढांगा टाकत निघून गेला. नशेत असल्याने सगळ्या गोष्टींचा अन्वयार्थ लावायला आम्हाला थोडा विलंबच लागला, पण मग मात्र आमची नशा खाडकन उतरली. नीट विचार केला तेव्हा कॅरेक अजिबात नशेत नव्हता यावर माझं, ब्रॅझेलचं आणि चक्क मेडिसनचंही कधी नव्हे ते एकमत झालं. कशीही असली तरी मला प्रिय असलेली पृथ्वीवरची आमची 'महान मानवी संस्कृती' खरोखर धोक्यात होती?
(रेडमंड हॅमिल्टन यांच्या 'एक्झाईल' या लघुकथेवर आधारित)
प्रतिक्रिया
4 May 2013 - 5:16 pm | पैसा
मस्त विज्ञानकथा! कॅरेक अदृश्य झाल्यामुळे पुढच्या अनेक शक्यता डोळ्यासमोर दिसताहेत. बाल की खाल काढायची तर, रूपांतर उत्तमच झालंय पण यातील लेखक हा भारतीय आहे हे त्याच्या विचारांवरून दिसतंय पण तसा स्पष्ट उल्लेख कुठे आला नाही.
4 May 2013 - 6:00 pm | अर्धवटराव
एखादा असा परग्रहवासी मिपावर देखील वावतर असावा...
अर्धवटराव
4 May 2013 - 6:29 pm | स्पंदना
खरच आवडला अनुवाद. फार छान झालाय.
4 May 2013 - 6:33 pm | बॅटमॅन
अनुवाद मस्त उतरलाय!!!
4 May 2013 - 6:58 pm | मुक्त विहारि
आवडला..
4 May 2013 - 7:05 pm | प्यारे१
एक सुंदर गोष्ट आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आभारी आहोत.
4 May 2013 - 8:31 pm | शिल्पा ब
कथा आवडली.
4 May 2013 - 9:33 pm | सानिकास्वप्निल
अनुवाद छान झालाय :)
4 May 2013 - 9:38 pm | सस्नेह
कथा जास्त प्रभावी की अनुवाद याचा निर्णय करता येईना.....
6 May 2013 - 9:55 am | अक्षया
+ १
4 May 2013 - 11:03 pm | तुमचा अभिषेक
संपल्यावर अजून मोठी असती तर .. असेही वाटले.. अजून असे काही लिहा ,, वाट बघतोय..
4 May 2013 - 11:59 pm | प्रचेतस
नेहमीप्रमाणेच सुरेख भावानुवाद.
5 May 2013 - 12:40 am | इनिगोय
हम्म्!
अनुवाद उत्तम. कथा मात्र फारच चटकन संपली..
5 May 2013 - 3:38 am | विश्वनाथ मेहेंदळे
कथा आवडली... हल्ली चांगले ललित फार वाचायला मिळत नाही. धन्यवाद. अजून येऊ द्या...
5 May 2013 - 2:12 pm | अग्निकोल्हा
हि संकल्पना फार म्हणजे फारच आवडली/पटली. कारण ते तुमच कथेमधे वैयक्तिक कॉट्रीब्युशनही आहे . बाकि अनुवाद अन कथा छान. पण क्रमशः असती तर आठ चांद मात्र नक्किच लागले असते असं मनापासुन वाटतय. शक्य झाल्यास सिक्वेल करा कारण हा भाग अतिशय मस्त पायाभरणी आहे.
6 May 2013 - 10:01 am | नगरीनिरंजन
मूळ कथा आणि भावानुवाद दोन्हीही प्रचंड आवडले.
6 May 2013 - 10:49 am | अलबेला सजन
आवडेश..
3 May 2020 - 8:04 pm | अनिंद्य
कथा छान आहेच, भावानुवाद उत्तम आहे. आगळ्या धाटणीचा.
Bravo!
3 May 2020 - 10:23 pm | Prajakta२१
छान
आत्ताच्या काळात अशी हि शक्यता असू शकते असे वाटायला लावणारी कथा