मामाचं गाव (इसावअज्जा)

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
23 Apr 2013 - 11:22 pm

"राज्या, परिक्षेत किती मार्क पडले रे."
मे महिन्याच्या सुटीसाठी बस स्टॅन्डवरुन अजून घरात पाऊल न ठेवलेल्या आपल्या एकुलत्या एक भाच्याला उंबरठ्यावरच प्रश्न विचारणारा मामा आठवला की या मामा लोकांनी माझे लहानपण कसे वाया घालावले याबद्दल दोन-चार आश्रु मी गाळून घेतो. दिड-दोन फुटी आपला भाचा वर्षभर मास्तर व बाईचा मार खाऊन खाऊन वैतागलेला, अभ्यास कर हे एकच पालूपद वर्षभर ज्याच्या मानगुटीवर भुतासारखे बसलेले, तिमाही, सहामाही, वार्षिक च्या सोबत असंख्य तोंडी परीक्षेतून पार पडून थोडा निवांत झालेला असतो तर लगेच घरात टूम निघते.. चला मामाच्या गावी!

मामाच्या गावाला जायचे,
आंब्याच्या झाडावर घर बांधायचे..
विहीरीवर अंघोळीला जायचे,
तेव्हा थोडे पेरु चोरायचे...

असली अफाट कल्पना घेऊन पोहचलेला आपला भाचा पाहिल्या पाहिल्या पहिला प्रश्न काय तर "राज्या, परिक्षेत किती मार्क पडले रे." अरे कसा आहेस विचार, गाल-गुच्चा घे, मामासाठी काय आणलं आमच्या राज्यानं असे बोबड्या भाषेत विचार! पण नाही "राखुंड्या" मास्तरासारखा पहिला प्रश्न अभ्यास नाही तर मार्काचा... पहिले काही दिवस बोंबलून सांगावे असे वाटत असेल मला की लेको.... तुमच्या कर्नाटकात आमच्या पेक्षा आधी २०-२५ दिवस निकाल लागतो रे.. आम्ही घरी गेल्यावर माझा निकाल कळेल.. पण कोण ऐकून घेईल तर शपथ!

तर गावच्या सुट्टीची सुरवात! त्यात मी नवसाचा.. एकुलता एक मुलगा जवळपास २०-२५ घरात (पाहुण्यांच्यात) कोणाच्या पण घरी गेला की पहिला प्रश्न ठरलेला "राज्या, परिक्षेत किती मार्क पडले रे." मी घरातून का पळून गेलो या प्रश्नाचे हे उत्तर नसेल ही पण कुठल्या पाहूण्याच्या घरी कधीच न जाण्याचा संकल्प करण्याचे हेच नक्की कारण होते.

या लोकांना काय असुरी आनंद मिळत असावा असले प्रश्न पोरांना विचारून देवाकं ठावूक!
मामाचा वाडा त्यावेळी खूपच मोठा असल्यामुळे व आजोबा वृद्ध असल्यामुळे एप्रिल-मे महिन्यात त्यांना भेटायला व सुट्टीचा आनंद घ्यायला सगळेच आजोळी यायचे, १६-१७ बहिणी (मावस, आत्ते इ. + सक्की एक) व त्यांच्या आया-बाबा आणि अनेक लांबचे पाहुणे एकावेळी त्या वाड्यावर हजर असतं! खाण्यात रेलचेल असे, पहाटे पहाटे पेटलेली चुल, आम्ही सर्व अंगणात झोपल्यावर रात्री कधी तरी चर्र असा आवाज करीत शांत होत असे. पहाटे पहाटे जाग यायची ती आजोबाच्या हाकेने. माझे दुदैव येवढे की एकुलता एक मुलगा असल्यामुळे सकाळचा शंख माझ्या नावानेच होत असे.. आजोबा मुलींना चुकून ही काही बोलत नसतं, हा त्यांना प्रेमाने खाऊ घाल, सगळ्यांना गोळा करून गोष्टी सांग, स्वातंत्र्य लढ्यात बेळगाव आंदोलनात कशी इंग्रजाची पळतीभूई केली व नंतर कसा मार खल्ला या प्रामुख्याने गोष्टी.

मी आपला बापुडा त्या गोष्टी ऐकण्यासाठी तेथे जाऊन बसावे तोच शेतातील काम संपवून आलेला मामा कडाडत असे "राज्या! लेका बायकांच्यात काय बसला आहेस, बायल्या कुठला!, जा गोठ्यात रम्याला मदत कर" झाले सगळ्या मुली फिदीफिदी हसणार व माझा रंग उडणार हे ठरलेले. रडत आईकडे तक्रार घेऊन स्वयंपाक घरात जावे तर कोणीतरी माउशी, मामी, आत्या, काकी म्हणायची "या राज्याला आईविना करमत नाही, यामुळेच बायकांमध्ये लुडबुड करायची सवय." व तोंडाला पदर लावून गालातल्या गालात हसत. मोठ्याने हसल्या की बाहेरून आजोबांच्या काठीचा आवाज येणार हे नक्की.

बरं या सगळ्याला वैतागून घरातून बाहेर पडण्यासाठी अंगणात यावे तोच लहान मामा "राज्या! घराबाहेर पाय टाकलस तर बघ. तंगडे तोडेन." बर त्याचे ऐकून गप्प परसबागेकडे जावे तर लगेच सन्नतात्या (लहान आजोबा आमचे) लगेच "राज्या! आकडे नी काल इड, निंद काल तगद् निंन कयागं उडत्यान नोड!" बोंबललं, मायला पुढून घरातून बाहेर पडायचे तर लहान मामा पाय तोडायला तयार व परसबागेत जावे तर ज्याने बाग (बाग कसली, रोजच्या भाज्या लावलेल्या) लावली तो पाय तोडून हातात देण्याची भाषा करतो. काय करावे काय करावे असले प्रश्न चिन्ह चेहर्‍यावर मिरवत मी इकडे तिकडे भटकत असलो तर एखादी ताई-आक्का हमखास म्हणायची.."नोड.. हुंब ईदे इद" (बघ, वेंधळाच आहे हा) असे म्हणून परत फिदीफिदी हसायच्या.

शेवटी मी वैताग वैताग करुन इसावअज्जा च्या रुमकडे वळत असे.
इसावअज्जा= पोहायला शिकवणारे आजोबा, हेच नाव त्यांचे गावभर नाही तर पंचक्रोशीत प्रसिद्ध होते, या आजोबांनी एका आणि एक पोराला/मुलीला पोहायला आलेच पाहिजे असा चंग बांधला होता. हे आजोबांचे कोणीतरी लांबचे नातेवाईक होते, ब्रम्हचारी. पोरांना पोहायला शिकवले तर घरचे गहू-तांदुळ द्यायचे, कोणी फारच उदार असेल कधी कधी पैसे देखील. मला आज देखील ते आठवतात ते त्यांच्या दंतपंगतीहिन हास्यामुळे. त्यांचे नक्की वय किती आहे याची चर्चा रात्री अंगणात घरचे सगळे झाडून जेव्हा झोपायला गोळा होत तेव्हा वडीलधारी मंडळी करत म्हणजे पहा किती वय असेल त्यांचे. अज्जा-इसावअज्जा असे सगळेच म्हणत त्यामुळे त्यांचे नाव काय असावे याची चर्चा आम्हां लहान मंडळीमध्ये होत असे, त्याचे कारण म्हणजे मोठा मामा लहान होता तेव्हा त्याने धाडस करुन त्यांना नाव विचारले होते म्हणे व त्यांनी मामाला उचलून २०-२५ फुट खोल असलेल्या विहरीमध्ये फेकलं होते.. अश्या अनेक दंतकथा त्यांच्या बद्दल होत्या. पण मामाला त्यांनी उचलून विहीरीत फेकले होते हे ऐकून मला खूप आनंद झाला असलाच पाहीजे.

इसावअज्जा व माझे जरा बरं जुळत होते (परवा परवा माझी मोठी मामेबहीण मला सांगत होती, ते जेव्हा आजारी पडले व त्यांचे शेवटचे काही क्षण राहीले होते तेव्हा त्यांनी जुन्याकाळात जमणार्‍या गोतावळ्याची आठवण काढली होती व तु हरवला आहेस हे ऐकून ढसाढसा रडले होते.) इसावअज्जा मला त्याच्याकडे असलेल्या ठेवणीतील गोष्टी दाखवत असे. त्याच्या पत्र्याच्या पेटीत खूप काही अमुल्य असे दडलेले होते, त्या पेटीला एक सोडून दोन दोन कुलपे होती व त्याच्या चाव्या इसावअज्जा नेहमी जानव्यात अडकवून ठेवी. जेव्हा जवळपास कोणी नसेल तेव्हा तो ती पेटी उघडून बसलेला असे. त्या पेटीमध्ये काय आहे याची जेवढी उत्सुकता त्याबालसुलभ वयात मला होती तेवढीच थोरामोठ्यांना देखील होती हे आता-आता कळले. त्यांनी ते विश्व इतरांच्यापासून जरा जास्तच लपवून ठेवले होते.

इसावअज्जा माझ्यावर न जाणे का पण खूप प्रेम करायचा, अनेकवेळा इतरांपासून लपवून खाऊ देण्यापासून, प्रसंगी आजोबांचा रोष अंगावर घेऊन मला शेतात मनसोक्त दंगा घालण्यासाठी घेऊन जात असे. पोहणे शिवण्याच्यावेळी प्रसंगी मुलींना देखील उचलुन विहीरीत फेकणारा हा आजोबा मला मात्र पत्र्याचा (डालड्याचा डब्बा) किंवा लाकडाची मोळ बांधल्याशिवाय पाण्यात पाऊल टाकू देत नसे किंवा त्यांनी मला कधीच आधाराविना पाण्यात जाऊच दिले नाही.
त्यांनी मला पोहायला शिकवले, त्यांनी मला निर्धास्तपणे पाण्याशी खेळणे शिकवले मग ते पाणी, विहरीचे असो, वाहत्या ओढ्याचे किंवा तुडुंब भरलेल्या कृष्णेचे!

क्रमशः

मुक्तकप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

पैसा's picture

23 Apr 2013 - 11:25 pm | पैसा

लेखाच्या शेवट क्रमशः बघून बरं वाटलं. तिथलं वातावरण छान टिपलं आहेस आणि लहानग्या मनातले तरंग सुद्धा! त्या आज्याबद्दल आणखी वाचायची उत्सुकता आहे. पुढचा भाग लवकर येऊ दे!

बॅटमॅन's picture

23 Apr 2013 - 11:38 pm | बॅटमॅन

असे लहानांचा विचार करणारे इसावआज्जा कधी ना कधी मिळतात म्हणून बरं असतं तेच्यायला नैतर लहानपणी या ना त्या कारणावरून मारणार्‍यांची (सर्व अर्थाने) संख्याच एकुणात जास्त. :(

मुक्त विहारि's picture

23 Apr 2013 - 11:39 pm | मुक्त विहारि

आता थांबू नका..

प्यारे१'s picture

23 Apr 2013 - 11:40 pm | प्यारे१

राजे, मस्त रे!

कवितानागेश's picture

23 Apr 2013 - 11:42 pm | कवितानागेश

सुंदर लिहिलय. त्या वातावरणात पोचल्यासारखं वाटलं.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत हेवेसांनल. वर्णन सुर्रेख उतरले आहे.

विषय जिव्हाळ्याचा आहे.
सुरवात दमदार झालीये.
पुभाप्र.

लहान मुलाच्या विश्वाचे खूपच छान वर्णन आहे.

स्पंदना's picture

24 Apr 2013 - 6:55 am | स्पंदना

मामा म्हंटल की गोडगोड अस वाटणार्‍या भ्रमाच्या भोपळ्याला पहिल्याच वाक्याने सुरुंग लावल्याबद्दल मोठ्ठा धन्यवाद.
मस्त लिव्हलंय.
अगदी धमुच्या भाषेत सांगायच तर, "कं लिवलय! कं लिवलय?"

दशानन's picture

24 Apr 2013 - 7:01 pm | दशानन

वाचकांचे व प्रतिसाद्कर्त्यांचे आभार!

पु.भा.प्र. मस्त झालाय हा भाग पण

मस्त जमलाय हा भाग. पुभाप्र !!

सस्नेह's picture

24 Apr 2013 - 9:21 pm | सस्नेह

सुट्टीच्या सीझनला समयोचित धागा.

इनिगोय's picture

28 Apr 2013 - 7:07 am | इनिगोय

+१
मस्त लेख. पुढचा भाग येऊद्या लौकर.

दशाननराव, काय सुंदर लिहिलंय! पुढचा भाग लवकर टाका. :)

तुमच्याकडे कन्नडमिश्रित मराठी बोलायचे का हो? मोठी गोड लागते कानाला...

स्पा's picture

25 Apr 2013 - 2:05 pm | स्पा

वा राजे वा
बुंगाट लिवलंय

सुरेख फ्लो आहे
लवकर पुढील भाग टाका

बरली बरली
पुढचा भाग
लगु बरली

अभ्या..'s picture

27 Apr 2013 - 2:34 am | अभ्या..

यरडनेय भाग लगु लगु बरली.
मस्त लिहिलेय. प्रचंड आवडले आहे.
खूप खूप शुभेच्छा.

बॅटमॅन's picture

27 Apr 2013 - 4:55 pm | बॅटमॅन

हौद री, मुंदिन भाग लगु लगु बरली मत्तु बरिली :)

बरीते इंदेन, स्वल्पू कॅल्सा हॅच आगिदे री.

* अक्षरास हसू नये.

बॅटमॅन's picture

27 Apr 2013 - 11:39 pm | बॅटमॅन

सरी, तोन्द्रे इल्ला :)

चौकटराजा's picture

25 Apr 2013 - 3:41 pm | चौकटराजा

एकतर या लेखनाने यंका माडगूळकरांची आठवण आली नाहीतर जयवंत दळवींची.गावाकडलं वातावरण व मामा, इसावआज्जा व मी ही व्हक्तिचित्रे रोचक. सारे प्रवासी घडीचे व बिटाकाका या सहित्यकृतींची आठवण आली. लिक्खे रहो लग्ग्रे रहो !

दशानन's picture

27 Apr 2013 - 11:33 pm | दशानन

अहो कोण मोठी नावे घेतलीत तुम्ही, मी तर त्यांच्या सावलीत उभा राहण्याच्या देखील लायकीचा नाही.
सुचते तसे लिहतो येवढेच. प्रतिसादासाठी आभार.

आभारी आहे, पुढील भाग लवकरच प्रकाशित करतो.

अमोल केळकर's picture

26 Apr 2013 - 3:24 pm | अमोल केळकर

छान आठवणी ! कृष्णेच्या पाण्यात पोहायला शिकलात म्हणजे अजोळ सांगलीजवळ होते का?

( सांगलीकर) अमोल केळकर

दशानन's picture

27 Jun 2017 - 9:39 pm | दशानन

चिककोंडी अंकली :)

अर्धवटराव's picture

26 Apr 2013 - 10:47 pm | अर्धवटराव

हि मारीच ची गोष्ट असेल :D

मस्त झालीये सुरुवात. पु.भा.प्र.

अर्धवटराव

जेनी...'s picture

27 Jun 2017 - 10:25 pm | जेनी...

मस्त ....

सिरुसेरि's picture

28 Jun 2017 - 10:51 am | सिरुसेरि

छान लेखन . सांगली - जयसिंगपुर यांना जोडणारा अंकलीचा पुल , उदगाव , अंकली फाटा आठवला . "संथ वाहते कृष्णामाई " चे चित्रीकरण तिथे झाले होते .

हे अंकली वेगळे, आमचे कर्नाटक अंकली.