“It is one of the great ironies of corporate control that the corporate state needs the abilities of intellectuals to maintain power, yet outside of this role it refuses to permit intellectuals to think or function independently.”
― Chris Hedges
तुमचा भुतांवर विश्वास आहे का? तुमचा भानामतीवर विश्वास आहे का? तुमचा देवावर विश्वास आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या चालीवर तुमचा ग्लोबल वॉर्मिंगवर विश्वास आहे का असा प्रश्न लोक एकमेकांना विचारताना पाहिले की विज्ञान ही एक श्रद्धा-अंधश्रद्धा ठेवण्याची गोष्ट आहे की काय असे वाटू लागते. तथाकथित सुशिक्षित लोक आणि भूत-भानामती वगैरेंवर चर्चा करणारे लोक यात साम्य वाटायला लागते. थोडे खोलात शिरून पाहिले तर असे दिसते की या गोष्टींवर वाद घालणारे दोन्ही बाजूकडचे लोक स्वतःला वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समजत असले तरी ते केवळ दुसर्यांनी दिलेल्या माहितीचे आणि बर्याच वेळा, दुसर्याच कोणीतरी त्या महितीकडे वेगवेगळ्या कोनांतून पाहून मांडलेल्या, गृहीतकांचे वापरकर्ते आहेत. त्यांना वैज्ञानिक दृष्टी नाही असे मला म्हणायचे नाही. पृथ्वी गोल आहे, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते, बर्फाची घनता पाण्यापेक्षा कमी असते वगैरे अतिकीचकट नसलेल्या गोष्टी हे लोक तर्कशुद्ध गणिते व प्रयोगांनी सहज सिद्ध करू शकतात. दुर्दैवाने आजचे विज्ञान या साध्या-सरळ गृहीतकांच्या अनेक प्रकाशवर्षे पुढे गेले आहे. आज कोणत्याही क्षेत्रात काम करणारे वैज्ञानिक इतक्या खोलवरच्या आणि कीचकट गोष्टींवर संशोधन करत आहेत की सामान्य माणसाला स्वतः प्रयोग करून, गणित करून त्या गोष्टी पडताळून पाहणे शक्य नाही. किंबहुना एका क्षेत्रात काम करणार्या बुद्धिमान शास्त्रज्ञाला दुसर्या क्षेत्रातल्या संशोधनाबद्द्ल माहिती असेल असे तर नाहीच; शिवाय स्वतःच्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री व उपकरणे तयार करणे वा विकत घेणे ही एकट्या-दुकट्याच्या आवाक्यातली गोष्ट असेल असेही नाही. म्हणजेच आजच्या संशोधनाला मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि मनुष्यबळाची आवश्यकता असते. ही मोठ्या प्रमाणावरची गुंतवणूक आणि मनुष्यबळ एक तर सरकार पुरवू शकते किंवा मोठमोठ्या खाजगी कंपन्या.
सरकार हे लोकांचे प्रतिनिधीत्व करते त्यामुळे लोकांच्या भावी गरजा किंवा प्रश्न ओळखून त्यावर उपाय शोधण्यासाठी कोणत्याही आर्थिक फायद्याची अपेक्षा न ठेवता सरकार संशोधनाला मदत करू शकते. कंपन्यांचे मात्र तसे नाही. कंपन्या किंवा कॉर्पोरेशन्स एका विशिष्ट हेतूने जन्म घेतात आणि तो हेतू म्हणजे पैसा कमावणे. कायद्याच्या दृष्टीने कॉर्पोरेशन म्हणजे पैसा कमावण्यासाठी जन्माला आलेली एक विशिष्ट व्यक्ती असते आणि पैसा कमावण्यासाठीच प्रयत्न करणे हे कायद्याने तिच्यावर बंधन असते.
सरकारने सर्व लोकांच्या हितसंबंधांचे रक्षण करायचे आणि कंपन्यांनी आपल्या भागधारकांसाठी संपत्ती निर्माण करायची असे दोन वेगवेगळे मार्ग या संस्थांच्या वाटचालीसाठी असले आणि या दोन्ही संस्था लोकांपासूनच बनलेल्या असल्या तरी बर्याच वेळा त्यांचे मार्ग एकमेकांना आडवे जातात आणि दोन्ही संस्थांमधल्या माणसांचे ध्येय पैसे कमावणेच असल्यास त्या चव्हाट्यावर बर्याचदा विज्ञानाचा खून पडतो.
अमर्याद वाढीवर आधारित असलेली अर्थव्यवस्था आणि तिने निर्माण केलेली इंडस्ट्रीयल सिव्हिलायझेशन जसजशी जगभर पसरत गेली तसतसे हे मार्ग अनेकवेळा एकमेकांना आडवे गेलेले दिसतात. जागतिक तंबाखू उद्योग हे याचे एक अत्यंत ठळक असे उदाहरण आहे. विशेषतः कॅपिटॅलिझम(R) आणि डेमॉक्रसीTM यांची गंगोत्री असलेल्या अमेरिकेत विडीउत्पादक कंपन्यांनी शोधलेले आणि वापरलेले (कु)प्रचाराचे तंत्र क्रांतिकारक ठरले. श्री. एडवर्ड बर्नेज या सिग्मंड फ्रॉईडच्या भाच्याने त्याच्या मानसशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग करून पाश्चात्य जगात सिगारेट्सचा खप प्रचंड वाढवला. प्रत्येक बाबतीत पुरुषांची बरोबरी म्हणजेच मुक्ती असे समजणार्या स्त्रियांची मानसिकता अचूकपणे हेरून जाहिरातींतून धूम्रपानाला त्याने स्त्रियांच्या मुक्तीशी जोडून टाकले आणि पाहता पाहता स्त्रियांचे एक मोठे मार्केट या कंपन्यांना खुले झाले. पुढे फुप्फुसांच्या, गळ्याच्या वगैरे कर्करोगामागे आणि श्वसनसंस्थेच्या अनेक विकारांमागे धूम्रपान हे कारण असावे असा विदा समोर येऊ लागला तेव्हाही या कंपन्यांनी आपली प्रचारयंत्रणा वापरून आणि काही शास्त्रज्ञांना पैसे देऊन लोकांचा बुद्धिभेद करायचा प्रयत्न केला. 'धूम्रपान करणार्यांमध्ये फुप्फुसाचा कर्करोग जास्त दिसतो म्हणजे धूम्रपानाने फुप्फुसाचा कर्करोग होतो असे नाही' असा 'Correlation is not causation' मुद्दा या कंपन्यांनी मांडला. अजूनही धूम्रपानामुळे नक्की कशा प्रकारे कर्करोग होतो यावर संशोधन पूर्ण झालेले नाही. सुदैवाने धूम्रपानाने अनेक विकार होतात हे बर्याच लोकांना आणि सरकारांनाही पटले आणि पूर्ण बंदी नाही तरी या कंपन्यांच्या दबावाला बळी न पडता थोडी उपाय योजना करता येणे शक्य झाले.
एडी बर्नेजच्या प्रचारतंत्राचा निर्विवाद विजय म्हणून ज्याकडे बोट दाखवले जाते ते म्हणजे फ्लोराईडेशन. फ्लोराईड हे कारखान्यांतल्या रासायनिक प्रक्रियांमधून निर्माण होणारे एक घातक प्रदूषक रसायन आहे. या रसायनाने हाडे ठिसूळ होतात आणि हे रसायन जमिनीत सोडल्याने सगळी गुरे, झाडे व नदीतले मासे मेले म्हणून अमेरिकेतल्या मोहॉक इंडियन्सनी अॅल्युमिनिअम कंपनीवर केलेला खटला जिंकलाही होता. असे असूनही त्याने दात शुभ्र होतात असे समजून टूथपेस्टमध्ये फ्लोराईड असण्याचा आग्रह धरणारे जगभरातले ग्राहक आणि इतकेच नाही तर स्वतःच्या पिण्याच्या पाण्यात हे फ्लोराईड मिसळण्यास आक्षेप न घेणारे अमेरिकन ग्राहक हा या प्रचारतंत्राचा चमत्कारच म्हटला पाहिजे. पिण्याच्या पाण्यातून वा टूथपेस्ट मधून हे फ्लोराईड शरीरात साठत जाते आणि त्याचे दुष्परिणाम म्हातारपणी जाणवू लागतात. हे सगळं कशासाठी तर दात शुभ्र दिसण्यासाठी ज्याची गरजही कंपन्यांच्या प्रचारानेच निर्माण केलेली! या प्रचारातून कंपन्यांचा मात्र भरमसाठ फायदा झाला. प्रदूषण नियंत्रणाचा खर्चही वाचला, शिवाय ते सरकारला विकून बक्कळ पैसाही कमावता आला.
स्वतःच्या फायद्यासाठी अपायकारक पदार्थांबद्दल चुकीची माहिती संशोधनाच्या नावाखाली खपवणे इतक्यावरच या कंपन्यांचा उपद्रव सीमित नाही. स्वतःच्या व्यवसायास हानीकारक ठरू शकेल अशा संशोधनाविरुद्ध संशय निर्माण करून लोकांचा बुद्धिभेद करणे हा सगळ्यात जास्त गंभीर गुन्हा या कंपन्या करतात. नाओमी ओरेस्केस आणि एरिक कॉनवे यांच्या मर्चंट्स ऑफ डाऊट या पुस्तकात त्यांनी या कंपन्यांसाठी संशयाचे सौदागर म्हणून काम करणार्या शास्त्रज्ञांचा समाचार घेतला आहे. स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी हवामानात बदल होतच नाहीत असे म्हणणे, नंतर बदल होत आहेत असे मान्य केले तरी मानवाच्या प्रदूषणाचा त्यात हात नाही असे म्हणून आपला धंदा आहे तसाच वाढत राहील याची काळजी घ्यायचा प्रयत्न करणे, योग्य वेळ असूनही सौर व इतर ऊर्जास्रोतांचा विकास न होऊ देता खनिज तेलाच्या व्यवसायासाठीच सवलती चालू राहतील हे पाहणे, प्रत्यक्षात पर्यावरणाचा न भूतो न भविष्यति असा नाश होत असला तरी स्वतःची ग्रीन इमेज दाखवणे इत्यादी उद्योग सर्रास चालू असतात.
त्याचवेळी निसर्गाची भीती माणसाला दाखवत त्या भीतीपोटी पैसे आणि सत्ता मिळवणे हाही या कंपन्यांचा व त्यांच्या सरकारात असलेल्या साथीदारांचा आवडता उद्योग आहे. आजवर कोणताही नवीन आजार सापडला तर त्याचे मूळ आधी कोणत्यातरी विषाणूत असणार अशा दृष्टीनेच संशोधनाला सुरुवात केली जाते. स्कर्व्ही, बेरीबेरी, SMON आणि कॅन्सर अशा अनेक रोगांच्या बाबतीत विषाणूंचाच शोध घेत राहिल्याने महत्त्वाचा वेळ आणि अनेक जीव गेले. स्कर्व्ही, बेरीबेरी वगैरे रोगांचे कारण कुपोषण आणि जीवनसत्त्वांचा अभाव आहे हे सिद्ध झाले असले तरी कॅन्सर होण्याचे कारण अद्याप कळलेले नाही. कर्कजनक द्रव्यांचा त्यात मोठा वाटा आहे आणि ही कर्कजनकद्रव्ये कारखान्यांच्या व वाहनांच्या प्रदूषणातून निर्माण होतात हे सगळ्यांना माहित असले तरी कोणीही त्यावर चकार शब्द काढत नाही.
वेगवेगळ्या समूहांमध्ये विभागल्या गेलेल्या समाजाच्या कॉर्पोरेटिजमचे हे युग आहे आणि स्वत:च्या हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या धुमश्चक्रीत उडणार्या धुरळ्यात सत्याचा आणि विज्ञानाचा विपर्यास अनेकदा होत राहील. त्यांच्या प्रचाराच्या गदारोळात स्वतःच्या अस्तित्वाचा मुळापासून विचार करणे, विज्ञान आणि तंत्रज्ञानातला फरक ओळखणे, खर्या अर्थाने परिपूर्ण आयुष्यासाठी स्वत:ला कशाची गरज आहे हे शोधणे आणि ते कळल्यावर तसे वागण्याचे धैर्य मिळवणे हाच आजचा खरा जीवनोपयोगी विज्ञानवादी दृष्टीकोन; तो सगळ्यांना लाभो ही सदिच्छा!
प्रतिक्रिया
20 Mar 2013 - 3:46 pm | दादा कोंडके
मोबाईलच्या रेडिएशनचे होणारे दुष्परिणांबाबत ही असच आहे. हे प्रयोग करण्यासाठी कुणिही पुढे येत नाही. उलट जमतील ती उपकरणं वापरून कुणिकाही निष्कर्श काढले की मोठ्ठ्या मोबाईल कंपन्या त्याची मुस्कटदाबी तरी करतात किंवा फक्त त्याप्रयोची लिमिटेशन्स दाखवण्यापुरते महागडी उपकरणं वापरून प्रयोग करतात.
20 Mar 2013 - 3:56 pm | मनराव
छान लेख
20 Mar 2013 - 4:44 pm | छोटा डॉन
हेच म्हणतो.
'थँक यु फॉर स्मोकिंग' हा चित्रपट पहा, काहीसा असाच आहे.
- छोटा डॉन
21 Mar 2013 - 12:32 pm | मूकवाचक
+१
20 Mar 2013 - 4:47 pm | हारुन शेख
चित्र आंतरजालावरून साभार.
20 Mar 2013 - 4:56 pm | स्पंदना
फ्लोराईड काय, अन सिगारेट काय, सगळ नुसत जाहीरातीच तंत्र.
खरच कधी कधी राग येउ लागतो या लोकांचा. आता माझा डोक्टर उठुन प्रत्येकाला तुमच कॅल्शीअम कमी झालय, या गोळ्या दिवसाला ४ घ्या म्हणुन सांगतो. माझ्या माहीतीप्रमाणे अस कॅल्शीअम डायरेक्ट शरीरात शोषल जात नाही, त्याला मॅग्नेशीअम अन फॉस्फरसची जोड असावी लागते, अन त्यातही अस कृत्रीमरित्या देण्याऐवजी दुध घेतल, किंवा चीज, दही, यामुळे नाही का फरक पडत ? पण नाही घ्या गोळ्या.
मध्यंतरी एका टीव्ही शोवर एक बाई ती सकाळच्या नाश्त्याला विटॅमिनच्या जवळ जवळ २० गोळ्या खाते अस सांगत होती. मार्था स्टुअर्ट्च्या कार्यक्रमात.
तीच गोष्ट लहाण मुलांची. जन्मल्यापासुन मला डॉक्टर सांगत होता. रोज हे व्हिटॅमिनच औषध घाला, मग हे कॅल्शीअम पाजा. प्लस एखादा वेळ फॉर्म्युला दिलात तर वाढ बुस्ट होते बाळाची. आता हे फॉर्म्युले आपल्या लहाणपणी ७० साली अस्तित्वात आले, अन आपल्या पिढीइतका हृदय रोगाचा झटका आणि कोणत्याही पिढीला नव्हता. माझ्या नवर्याच स्पष्ट म्हणन, अनावश्यक व्हिटॅमिन्स शरीरात घातल्याने, (लहान बाळाची पोषण क्षमता आपल्यापेक्षा जास्त असते. त्यांच शरीर मिळेल तेव्हढ सामावुन घेउन वाढायला लागत) त्याचे परिणाम नंतर दिसुन येतात. त्यावेळच्या बाकि सार्या मुलांपेक्षा माझी मुले जरा कमी पुष्ट दिसायची, पण आज मी जेम्व्हा बघते, तेंव्हा दे आर फाईन. दे हॅव ग्रोन नॉर्मली, फ्युअर अॅलर्जीज, मोअर स्ट्रेन्थ, उगा फोफशी नाही आहेत.
पण हे कळणार कसं? टीव्हीवर याची जाहिरात नाही ना येत की नुसत्या आईच्या दुधावर, अन मग घरच्या डाळ तांदळाच्या खिमटीवर बाळ अस दिसत म्हणुन, जाहिरात असते ती या फॉर्म्युलाने कस बाल गुटगउटीत दिसत, आई खुष बाळ खुष.
20 Mar 2013 - 9:44 pm | नाना चेंगट
पण लहान मुलांसाठी नेस्ले कुंपणीचं दूध तर चांगलं असतं असं कुणीतरी सांगत होतं ब्वा !
20 Mar 2013 - 7:21 pm | उपास
बेबी प्रॉडक्ट्सच्या बाबतीत हेच म्ह्णणणार होतो जे वर अपर्णाताईंनी म्हटलय.
इलेक्ट्रीक कारचं संशोधन दाबण्यामागे पण असेच राजकीय आणि कॉर्पोरेट हात आहेत असं वाचण्यात आलं, नाहीतर इलेक्ट्रीक कार केव्हाच बाजारात यायला हवी होती.
सॉफ्टवेअरच्या 'लिगसी' फील्ड मध्ये ही कित्येक वर्ष अशीच मक्तेदारी होती/ आहे पण ओपन सोर्स टेक्नोलोजीने खरंच क्रांती केलेय! बरंच लिहीण्यासारखं आहे ह्या विषयी..
20 Mar 2013 - 7:39 pm | आतिवास
दोन तासांचा दुवा तूर्त बाजूला ठेवला आहे. सवडीने पाहीन.
लेख आवडला. विचारांना चालना देणारा लेख आहे.
माहिती नेहमी बदलत जाते - नव्या माहितीच्या आधारे असं विज्ञानात दिसतं. पण रोजच्या जगण्यात मात्र 'तथ्य' काय यापेक्षा 'अनुभव काय'याला आपण महत्त्व देतो. 'शब्द' प्रामाण्य आलं ते या अनुभवातूनच. एका व्यक्तीचं, एका पिढीचं जीवन मर्यादित असतं - त्यामुळे अनुभवजन्य ज्ञानाला पर्याय नाही. ते नेहमीच आंधळं असतं असं नाही.
मला कधीकधी वाटतं की माहितीच्या भडीमारामुळे आपला गोंधळ वाढला आहे. माहिती हवी तशी गोळा करता येते, माहितीचं विश्लेषण अनेकदा पाहिजे त्या कोनातून करता येतं, माहिती झाकून ठेवता येते, माहितीच्या हव्या तेवढ्याच बाजूचं प्रसरण करता येतं हे मुद्दे आहेतच. आपल्या 'कॉमन सेन्स' वर भर द्यावा म्हटलं तरी तोही कशाने तरी प्रभावित झालेला असतोच.
स्वत:ला कशाची गरज आहे हे शोधायला एक प्रकारचा निवांतपणा लागतो - तो काही किंमत मोजून मिळवावा लागतो असं सुरवातीला तरी वाटतं. शिवाय जे काही मिळेल ते योग्य असेल याची खात्री नाही - त्यापेक्षा मग 'धोपटमार्गा सोडू नको' हे स्वीकारण्याकडे कल होतो.
बाकी जीवनोपयोगी दृष्टिकोन नेहमी विज्ञानवादी असेलच असे नाही - हे समजले की पुरे. आणि कदाचित विज्ञानवादी दृष्टिकोन पण काही प्रसंगी जीवनोपयोगी ठरणार नाही की काय - अशा शंकेला (मनात ती आली तर!) जागा द्यावी हेही बरं असतं! :-)
21 Mar 2013 - 2:57 pm | नगरीनिरंजन
प्रतिसाद आवडला!
पटले. मुळात पिढ्या न पिढ्या धोपटमार्गावर चालून पाळीव आयुष्य जगायची सवय लागल्याने ही कल्पित किंमत खूपच जास्त वाटायला लागते. काहीतरी सतत जपत चालायचं आहे हे मनावर ठसवले गेले असल्याने सगळं सोडून एकदम स्वतंत्र होता येत नाही.
अगदी खरं. मुळात मनात शंका येऊ देणे आणि आलेल्या शंकेला बाजूस न सारता तिचा सांगोपांग विचार करणे हाच विज्ञानवादी दृष्टीकोन नव्हे काय?
20 Mar 2013 - 7:44 pm | तिमा
कॉस्मेटिक्स, कीटकनाशके याबाबतीतही असाच प्रकार चालू आहे. ब्लिचिंग करुन त्वचेची हानी होते हे कोणीच सांगत नाही. नुसतेच ८ दिवसांत गोरे व्हा, असे आमिष दाखवतात.
अन्नपदार्थ ठेवायला वा गरम करायला प्लास्टिक वापरणे किती धोकादायक आहे हे सामान्य जनतेपासून लपवले जाते.
माझी सर्व वाचकांना विनंती आहे की मायक्रोवेव्ह वापरत असल्यास त्यांत फक्त काचेचीच भांडी वापरावीत आणि मायक्रोवेव्ह चालू असताना त्याच्या जवळ उभे राहू नये.
20 Mar 2013 - 11:11 pm | रेवती
लेखन आवडले. बरंच काय काय लिहावसं वाट्टय पण असं लिहिणं शक्य नाही. 'अपनी अकल लगाओ' एवढं जरी केलं तरी बरच भलं होईल. :) सध्यातरी मुलाबाळांना या रेट्यापेक्षा वेगळा विचार करायला लावणं आणि त्यांच्या विरोधाला न जुमानणं असं करताना नाकी नऊ येतात.
20 Mar 2013 - 11:46 pm | नाना चेंगट
असे करायचा प्रयत्न केल्यास हितसंबंधांना बाधा पोहोचते. ती झळ सहन करण्याची ताकद सर्वांपाशी नसते त्यामुळे
तुमची सदिच्छा माउलींच्या दुरितांचे तिमीर जाओ या आर्त सादाप्रमाणे व्यर्थ जाणार याची मी तरी तुम्हाला खात्री देतो.
21 Mar 2013 - 10:26 am | सुबोध खरे
सांप्रत भारत देशात सर्वत्र जीवाणू आणि किटाणु चा जबर्दस्त प्रादुर्भाव झाला आहे असे दूरदर्शन वाहिन्या पाहिल्यावर वाटते. त्यामुळे जंतुनाशक औषधाने हात धुतले नाही तर भयंकर जन्तुबद्ध होण्याची शक्यता आहे.
BMJ (ब्रिटीश मेडिकल जर्नल) ने २००८ साली स्पष्टपणे दाखवून दिले आहे कि हात धुण्यासाठी साधा साबण पुरे. जंतुनाशकाची गरज मुळीच नाही. या विरुद्ध MRTPC आणि ADVERTISING COUNCIL कडे तक्रार केली तर तेथे बसलेली सर्व माणसे बधिर आहेत असा अनुभव आला.
सद्य स्थितीत भारतवर्षातील बालके खुजी आणि मंदबुद्धी असल्याचे जाणवते आणि त्यांच्या उद्धारासाठी दुधात कोम्प्लान किंवा बोर्नव्हिटा ( किंवा तत्सम) याशिवाय पर्याय नाही. त्यातून एक कंपनी हे पण सांगते कि आमच्या दुध्द्राव्यात ड जीवन सत्त्व आहे ज्याशिवाय साधे दुध प्यायले तर् त्यातले कैल्शियम शोषले जाणार नाही. आता आम्ही वैद्यकीय शिक्षणात हे शिकलो कि दुष्ट नैसर्गिक रित्या ड जीवन सत्त्व आणि कैल्शियम असतेच पण या नव्या शोधानी आम्हाला आमच्या आधीच तुटपुंजे असलेल्या ज्ञानाविषयी लाज वाटू लागली आहे.आणि असेही जाणवते कि फक्त चहा पिउन बारीक होता येते किंवा लाव क्रीम हो गोरी इतके सोपे आहे. एवढेच म्हणावेसे वाटते जर जाहिरातीसाठी आपले अंदाजपत्रक( BUDGET) भरपूर असेल तर तुम्ही सर्व लोकांना सर्व काळ मूर्ख बनवू शकता.मूळ वाक्य इंग्रजीत असे आहे (you cant fool all the people all the times)
एका आमच्या वरीष्टांचे वाक्य आठवते आहे. या दुनियेत प्रत्येक माणूस हा " CBM ( चुतीया बनानेका मशीन) लेके आया है".तुम्ही जर जरासे गाफील राहिलात तर तुम्हाला मशीन मध्ये घालून कोणीतरी चु ** बनवून बाहेर काढतो.
राजा वैर्याची रात्र आहे जागा राहा
21 Mar 2013 - 10:39 am | धमाल मुलगा
अवांतर होतंय विषयाशी, पण ..
निदान माझ्या माहितीनुसार तरी उभ्या मराठी भाषेत किटाणु हा शब्द कुठेही नाही. जीवाणू आहे, विषाणू आहे...किटाणु? त्या साबणा-फिबणांच्या जाहिरातींना मराठीत कोंबण्यासाठी चार चव्वल फेकून नेमलेल्या दळभद्र्या भाषांतरकारांच्या बेअक्कलपणाचा परिणाम आजकाल सर्वत्र दिसायला लागला आहे.
कळकळीची विनंती आहे, कृपया असे हिंदाळलेले शब्द वापरु नयेत...डाक्टर तुम्हीच असे नाही, ह्या निमित्तानं सगळ्यांनाच माझी विनंती आहे.
ते असो!
निर्या...लेख बाकी फक्कड लिहिलांयस हों! मजसारख्याला पचायला अंमळ जड आहे, पण उमजून घेतो आहे.
21 Mar 2013 - 12:54 pm | बॅटमॅन
+११११११११११११११११११११.
हिंदाळलेले मराठी अतिशय हिडीस वाटते वाचायला किंवा बोलायला. किटाणू, दिलचस्पी राखतो, इ. वाचून डॉक्शात जातं एकदम.
21 Mar 2013 - 2:20 pm | प्रसाद१९७१
ह्या ही पुढे जाउन कुठल्यातरी जहिरातीत हिंदीतला "समागम" हा शब्द तसाच्या तसा मराठीत वापरला होता. काय अगाध ज्ञान आहे!!!
21 Mar 2013 - 2:29 pm | बॅटमॅन
हम्म असेलही. तसे काही केले तर ऑड वाटतेच.
अवांतरः समागम या शब्दाचा संभोग सोडून सहवास हा अर्थ मराठीत आधीपासून वापरला जातोच. "ते त्यांचे समागमे आले" छाप रचना जुन्या पुस्तकांतून दिसते. अलीकडे मात्र तो अर्थ जाऊन समागम हा शब्द निव्वळ संभोग या अर्थी वापरला जातोय. त्यामुळे अलीकडच्या काळातील असे बॉरोइंग विचित्र वाटणे साहजिक आहे.
2 Apr 2013 - 11:35 am | सुमीत भातखंडे
खर आहे...जिजू हाही असाच एक डोक्यात जाणारा शब्द...नावानी हाक मारा पण जिजू नको
2 Apr 2013 - 12:38 pm | बॅटमॅन
+११११११११११११११.
बराय तिच्यायला अजून हा शब्द ऐकण्याची वेळ अस्मादिकांवर आली नाही ते. सगळाच मूर्खागमनीपणा आहे झालं!
21 Mar 2013 - 2:49 pm | नगरीनिरंजन
भारतात तर सरकार आणि खासगी क्षेत्र यांची फारच घनिष्ट मैत्री आहे. पश्चिम घाटाला असलेल्या धोक्याबद्दलचा अहवाल सरकार अगदी आरामात गुंडाळू शकते. पैसाताईंनी सांगितलं तसं गोव्यात ढाण्या वाघ दिसला तरी तिथे वाघ नाही असाच प्रचार केला जातो म्हणजे खाणींना धोका नको.
आता जीएम धान्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. जीएम बियाणं बाजारात आले तर त्याचे जैविक परिणाम तर जाऊ द्या, ते बियाणं न वापरणार्या शेतकर्यांना ते बियाणं वार्याने उडून शेतात येऊन रुजलं तरी कायदेशीर कारवाईचा त्रास होऊ शकतो याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.
बहुतेक कंपन्या तर राजकारण्यांच्याच मालकीच्या असतात त्यामुळे त्यांना काही नियम पाळले नाही तरी चालतं.
21 Mar 2013 - 10:29 am | सुबोध खरे
शुद्ध लेखनातील चुका सुधारून घ्याव्यात
भयंकर जन्तुबाधा
दुधात नैसर्गिक रित्या ड जीवन सत्त्व आणि कैल्शियम असतेच
21 Mar 2013 - 2:51 pm | स्मिता.
लेख पटणारा आहेच.
सध्या जशी विचारांना पक्वता येतेय (असं आम्हाला वाटतंय) तसं हे जाहिरात तंत्र समजतंय आणि त्यावर विचारही केला जातोय. नाहीतर लहान असतांना पप्पा टिव्हीमधे दाखवतात त्या छान छान गोष्टी आणूनच देत नाहीत, त्यांना काही कळतच नाही असं वाटायचं :(
आता विचार करू शकते असं वाटत असलं तरी तो कितपत करू शकते ही शंकाच आहे. आजच्या या जाहिरात आणि स्पर्धेच्या युगात कोण्या जाणकार व्यक्तिचे ऐकून ज्यावर विचारपूर्वक विश्वास ठेवू ती गोष्ट खरोखर विश्वास ठेवण्यालायक असेलच याची काय शाश्वती?
28 Mar 2013 - 9:43 pm | सस्नेह
जोपर्यंत सामान्य लोक जाहिरातबाजीला भुलून खरेदी करतात तोपर्यंत या कंपन्यांची चालती चालूच राहणार. विज्ञानआदि म्हणवणारे लोकसुद्धा विवेकबुद्धी गहन ठेवून जाहिरातींना शरण जाताना दिसतात. नैसर्गिक जीवनशैलीची आवड आहे कुणाला ? सर्वांना वेगवान अन कृत्रिम जीवनाचे वेड !
29 Mar 2013 - 8:44 am | मंदार कात्रे
अभ्यासपूर्ण लेखनासाठी आभार !
29 Mar 2013 - 10:02 am | ज्ञानोबाचे पैजार
आम्ही साले येडे ते येडेच रहाणार. आम्हाला दोन्ही बाजु पटतात. खरे काय ते कळतच नाही.
खर काय ते कस शोधायच हे आम्हाला कधी कुणी शिकवलच नाही.
शाळेत मास्तर सांगतील तेच खर आणि ऑफिसमधे साहेब म्हणेल ते खर आणि घरी... जाउद्या
यामुळे खर काय? हे शोधायच्या फंदात आम्ही कधीच पडत नाही.
कोणी सांगीतले आयोडीनयुक्त मीठ खा की आम्ही ते नीमुट पणे खाउ लागतो.
सगळे करतात म्हणुन हॉटेल मधे गेल्यावर टिश्यु पेपर ने हात स्वच्छ करण्यात आम्ही धन्यता मानतो.
हॉटेल मधुन बाहेर पडताना चुळ न भरता मेंथॉलयुक्त बडिशोपेचा बकाणा भरुन आम्ही बाहेर येतो.
मच्छरदाणीत न झोपता रात्रभर रसायनांचे फवारे उडवत झोपतो
भुक लागली की रेडी टु इट फुड खातो, तहान लागली की कोक पीतो.
बाटलीबंद पाणी पिउन बाटल्या रस्त्यावर फेकुन देतो
एक ना दोन अशा अनेक गोष्टी आम्ही कळत नकळत करत असतो. त्यातल्या बर्याचशा सगळे करतात म्हणुन मीही करतो.
ननि तुम्हीतरी कशाला डोक्याला ताप करुन घेताय?
30 Mar 2013 - 11:12 pm | पिशी अबोली
मस्तच लेख..
आपण गरज नसताना किती गोष्टींच्या मोहात अडकत जातो आणि त्यामुळे किती गमावतो हे दाखवणारी माझी अत्यंत आवडती डॉक्युमेंटरी-स्टोरी ऑफ स्टफ
http://www.youtube.com/watch?v=gLBE5QAYXp8
2 Apr 2013 - 7:37 am | नगरीनिरंजन
भारतासंबंधी दोन बातम्या:
एक चांगली बातमी म्हणजे नोवार्टिसची केस.
आधीच उपलब्ध असलेल्या औषधात थोडेफार बदल करून त्याचे पुन्हा पेटंट घ्यायचा प्रयत्न करू नये असा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. नोवार्टिसची भयंकर जळजळ झालेली दिसत आहे; पण कॅन्सरग्रस्त रुग्णांना मात्र कमी किमतीत जेनेरिक औषध मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इथून पुढे भारतात 'संशोधन' केले जाणार नाही आणि त्यामुळे भारतात वैद्यकीय प्रगतीला आळा बसेल असा इशारा नोवार्टिसने दिला आहे.
दुसरी बातमी म्हणजे हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग ऊर्फ फ्रॅकिंगच्या भारतातल्या आगमनाचे सूतोवाच. अमेरिकेच्या पावलावर पाऊल ठेऊन, खडकात लपलेला गॅस भरपूर पाणी आणि रसायनांचे मिश्रण फवारून मोकळा करायला ओएनजीसी व रिलायन्स या कंपन्यांना परवानगी दिली जाईल असे दिसते. अर्थातच फ्रॅकिंग 'सुरक्षित' आहे हे अमेरिकन गॅस कंपन्यांनी सिद्ध केलेलेच आहे; शिवाय या साठी लागणारे भरमसाठ पाणी, यातून मिळणारा फायदा पाहता, भारतात सहज उपलब्ध असेल हेही उघडच आहे.
अर्थव्यवस्थेवर ताण पाडणारी तेलाची आयात पाहता पुढच्या दहा-वीस वर्षांची तरी यातून सोय झाली तर बरे असा विचार या मागे असणार.
2 Apr 2013 - 11:36 am | सुमीत भातखंडे
लेख पटला...त्यातल्या विचारांशी सहमत