काक मृत्यू

मेघनाद's picture
मेघनाद in जनातलं, मनातलं
20 Mar 2013 - 1:30 pm

एक कावळा मुंबईच्या सकाळच्या सुंदर कोमल वातावरणात आकाशात घिरट्या घालत होता. आपल्या मित्र परिवारात विहार करत असताना तो खाली उजाडत असलेल्या मुंबई नगरीचे दृश्य देखील पाहत होता.

काहीवेळात तो आणि त्याचे काही मित्र उडत उडत भायखळा रेल्वे स्थानक परिसरात आले. तिथे येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेच्या गाड्या, त्यातून उतरणारी ठीगभर माणसे, बायका, पोर. उतरल्यावर त्यांची जिना गाठण्यासाठी होणारी धावपळ हे सर्व तो कावळा रेल्वेच्या विद्युत पुरवठा तारेवर बसून पाहत होता, आणि अचानक काही कारणास्तव त्याच्या पंखांना तारेतील विजेचा जोरदार झटका बसला तसा तो खाडकन भानावर आला आणि दुसऱ्या क्षणी जमिनीवर देखिल.

जमीन म्हणजे काय तर रेल्वेच्या रूळांच्या मधील जागा. तिथे न धड त्याला पाणी मिळत होतं ना शरीर सावरायला जागा. त्यातच हि अपघाताची बातमी त्याच्या सर्व जातीबांधवांपर्यंत पोहोचली आणि त्या जागेवर हितचिंतकांचे थवेच्या थवे उतरू लागले. त्यांच्या आपापसातील कवकवाटाने भायखळा स्थानकाचा तो परिसर सकाळीच दणदणून निघाला. एव्हाना स्थानकातील माणसांचे लक्ष देखील ह्या प्रसंगाकडे वेधले गेले होते. त्याचे काही मित्र त्याच्या बाजूला बसून त्याची उठण्यासाठी चालू असलेली केविलवाणी धडपड पाहत हो, तर त्याचे काही मित्र वरील विदुयत तारेवर बसून खाली चालू असलेल्या प्रसंगाचे अवलोकन करत होते.

स्थानकातील काही व्यक्ती देखील ह्या सर्व प्रसंगाचे आत्मियतेने निरीक्षण करीत होत्या. बराच वेळ उठण्यासाठी प्रयत्न करणारा तो कावळा हळूहळू थकायला लागला होता, तसेच त्याच्या आजूबाजूच्या असलेल्या त्याच्या मित्रांचे विचार देखील बदलू लागले होते. आतापर्यंत त्याला साथ देणाऱ्या काही मित्रांपैकी काही जण आता त्याला चोचीने टोचू लागले होते. त्यामुळे वरच्या बघ्या कावळ्यांचा परत कोलाहल सुरु झाला होता. हळू हळू त्याच्या बद्दलची त्याच्या मित्रांच्या मनात असलेली सहनुभूतीची भावना जाऊन ते आता खुनशी होऊ लागले होते आणि स्थानकातील उभ्या असलेल्या व्यक्ती सहनुभूतीखातर त्रास देणाऱ्या कावळ्यांना लांबुनच हाकवण्याचा प्रयत्न करीत होत्या.

आतापर्यंत एक-दोन त्रास देणाऱ्या कावळ्यांमध्ये अजून ४-५ जणांची भर पडली होती व त्या सर्वांनी मिळून त्या हतबल झालेल्या कावळ्याला अक्षरशः जिवंतच खायला सुरुवात केली होती. इकडे स्थानकातील व्यक्ती देखील हतबल होऊन हा प्रकार बघत होत्या. आणि शेवटी तो क्षण आलाच! भायखळ्याच्या १ नंबर स्थानकात ७ वाजून ५८ मिनिटाची आसनगाव ला जाणारी धीमी लोकल येउन उभी राहिली तशी बघ्यांची चुळबुळ आणि तारेवरील कावळ्यांची कावकाव देखील वाढली. लोकल निघाली आणि तारेवरील आणि रूळावरील बरेच कावळे माघार घेऊन उडू लागले. आता रुळात तो जर्जर झालेला असहाय्य कावळा एकटाच पडला होता. गाडी जवळ येताच वाऱ्याच्या झोतामुळे तो कावळा रुळातून वर खेचला गेला आणि त्यासरशी त्याचा पंख व त्याची मान गाडीच्या दणकट लोखंडी चाकाखाली चिरडलि गेली. तारेवर परत तोच जोरदार कोलाहल सुरु झाला, काही कावळे दिशाहीन झाल्यासारखे गरागर वर्तुळाकार फिरू लागले. ३ नंबर स्थानकात उभ्या असलेल्या व्यक्तींनी देखील हा सर्व प्रकार पाहून धसका घेतला होता. “ अरे यार बहुत बुरा हुआ”, “ट्रयक के बाहर होता तो बचता था बेचारा” अशी वाक्य देखील काही जणं बोलून गेले. बहुतेक बऱ्याच जणांना हा प्रसंग मानवी जीवनाशी मिळताजुळता वाटला असावा, निदान मला तरी वाटला.

हो, मी त्या ३ नंबर वर उभ्या असलेल्या बघ्या व्यक्तींपैकी एक होतो. हि सर्व घटना तंतोतंत खरी असून सोमवार सकाळी भायखळा स्थानकात घडली होती. ती तर जनावर आहेत, कधी कधी काही प्रसंगांत माणूस सुद्धा बर्यापैकी असाच टोचून खाणाऱ्या कावळ्यांप्रमाणे वागतो आणि म्हणूनच हा प्रसंग आपल्या मनाला चटका लाऊन जातो. मुद्दामच हा आखो देखा हाल (आणि त्या कावळ्याचे झालेले हाल) मि.पा वर शेअर करतो आहे….

समाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

20 Mar 2013 - 2:50 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

:(

सानिकास्वप्निल's picture

20 Mar 2013 - 2:59 pm | सानिकास्वप्निल

:(

स्पंदना's picture

20 Mar 2013 - 4:58 pm | स्पंदना

हं!

मदनबाण's picture

20 Mar 2013 - 7:25 pm | मदनबाण

वाचुन वाईट वाटले ! :(
बाकी या कावळ्यांच्या बाबतीत माझे सुद्धा एक निरिक्षण आहे,लोकल ट्रेन मधे लगेजचा थोडा भाग असलेला डब्बा असतो,त्यात मासे विकणार्‍या कोळी बायका आणि हल्ली भय्ये (हो,जर कॄपा शंकर सिंह जौनपुर वरुन मुंबईत येउन कांदे-बटाटे विकता विकता महाराष्ट्रात मंत्री होउ शकतो आणि अगणित माया गोळा करुन मोकळा फिरु शकतो.तर या मराठी ?महाराष्ट्रात भय्या मंडळींनी मासळी विकली तर काय बिघडले ! आपण फक्त जय महाराष्ट्र ओरडत बसायच ! )सुद्धा मासळीची टोपली घेउन चढतात्,जिथे या डब्यांची जागा असते त्याच्या आस-पास ही कावळे मंडली दोन ट्रॅकच्या मधे असणार्‍या लोखंडी जाळ्यांवर बसुन असतात्,जेव्हा लोकल स्टेशनवर येउन थांबते तेव्हा ही कावळे मंडळी या डब्यात शिरकाव करतात आणि मासळीच्या टोपल्यांवर टोचा मारुन अलगद एखादा मासा चोचीत घेउन कलटी मारतात ! ;)

मेघनाद's picture

20 Mar 2013 - 8:09 pm | मेघनाद

@ मदनबाण.....: कावळा हा पक्षी सर्व पक्ष्यांमध्ये चाणाक्ष मानला जातो, अर्थातच हे माझे मत नाही. ह्या संबंधीचे दुवे मायाजालावर सहज मिळतात. कावळ्याने बऱ्याच इंटेलिजंट टेस्ट पास केल्या आहेत.....

मदनबाण's picture

20 Mar 2013 - 8:54 pm | मदनबाण

कावळा हा पक्षी सर्व पक्ष्यांमध्ये चाणाक्ष मानला जातो !
हा.हा.हा ! या बद्धल मला अजिबात संशय नाही,किंवा बिरबल कथेनुसार यात काय संशय ? ;)
माणुस मेल्यावर पिंडाला चोच मारणारा हाच एकमेव पक्षी माझ्या तरी पाहण्यात आहे.बाकी माणुस मेल्यावर कुठे जातो ते मला विचारु नये ! ;)तसेही कथोपनिषदात नचिकेताने यमाला हा प्रश्न विचारला आहे. असे वाचल्याचे मला स्मरते,तेव्हा तिकडे उत्तर मिळेल.
ह्या संबंधीचे दुवे मायाजालावर सहज मिळतात. कावळ्याने बऱ्याच इंटेलिजंट टेस्ट पास केल्या आहेत
काय सांगता राव... २न ४र दुवे हिकड बी द्या की व्हो.

दादा कोंडके's picture

20 Mar 2013 - 8:52 pm | दादा कोंडके

प्रसंगाचं वर्णन छान.

“अरे यार बहुत बुरा हुआ”, “ट्रयक के बाहर होता तो बचता था बेचारा” अशी वाक्य देखील काही जणं बोलून गेले.

तिथं उभी असलेल्या लोकांना लोकल येइपर्यंत टाईमपास म्हणून त्या खेळाकडं पाहायला फुरसत मिळाली. एरवी कामाच्या घाईत माणसं गाडीखाली आली तरी काही सोयरं-सुतक नसतं माणसांना.

शिल्पा ब's picture

20 Mar 2013 - 9:39 pm | शिल्पा ब

कदाचित "हा आता मरणारच आहे तर आपली भुक भाकवुन घ्या" असा मानवी विचार त्यांनी केला असेल.

नाना चेंगट's picture

20 Mar 2013 - 9:47 pm | नाना चेंगट

मानवी मांस खायचं नाही हा संस्कृती विकसनातील नैतिक मूल्याच्या अधिष्टानाचा प्रवास आहे अन्यथा काही शे वा हजार वर्षांपूर्वी त्यात कुणालाही वावगे वाटत नव्हते.

खरयं नाना सेठ्,आजच्या घडीला देखील हिंदुस्थानात अघोरी पंथाचे साधु मानवी मास भक्षण करतात !

दादा कोंडके's picture

21 Mar 2013 - 12:43 am | दादा कोंडके

पंथ वैग्रे जाउदे बाणा, धर्म कोणता म्हणायचा या साधूंचा? ;)

तिमा's picture

22 Mar 2013 - 12:00 pm | तिमा

ती तर जनावर आहेत,
हे कावळ्यांना उद्देशून लिहिले असले तर 'पक्षी' अशी सुधारणा सुचवतो.
माणसांना उद्देशून असेल तर प्रतिसाद मागे घेतो.

धमाल मुलगा's picture

24 Mar 2013 - 8:49 am | धमाल मुलगा

बाझवला तिच्यायला!
बेक्कार हो!

पैसा's picture

24 Mar 2013 - 10:49 am | पैसा

:(

मदनबाण's picture

23 Apr 2014 - 2:11 pm | मदनबाण

आज लोकसत्ते मधे आलेला "काकबुद्धीची नवकथा!" हा लेख वाचल्यावर या लेखाची आठवण झाली.
बाकी मिपावरचे काक लेख :-
पिंडविधी आणि कावळा ~ दोन अनुभव !!
कावळा, कडी आणि कॅमेरा

तुमचा अभिषेक's picture

24 Apr 2014 - 12:38 am | तुमचा अभिषेक

कावळ्याला माणूस शिवला तर इतर कावळे त्याला बाटगा म्हणून आपल्यात घेत नाहीतच वर टोचून टोचून हाल करून मारतात अशी ऐकीव माहीती आहे. ती खरी आहे का? आणि हा यातलाच प्रकार असावा का? पण इथे तसेही काही शिवाशिव झाल्याचे लिहिले नाही. तर मग का मारत असावेत? जख्मी पंगू आयुष्य नको म्हणून ठार मारा इच्छामरण द्या असे काहीसे असेल का? कारण कावळा क्रूर प्राणी तर वाटत नाही, अन्यथा त्याच्यासाठी रोज दाराबाहेर पान ठेवले गेले नसते ना तशी कोणाची इच्छा झाली असती.

यशोधरा's picture

25 Apr 2014 - 1:19 pm | यशोधरा

मला नाही वाटत खरे आहे.

आमच्याकडे कावळे येतात, त्यांना आम्ही खाऊही घालतो, आता काहीजण नेहमी येणारे हातातूनही खाऊ घेतात, पाण्याच्या भांड्यात पाणी नसले तर तसे सांगतात व पाणी मागून घेतात.

तुमचा अभिषेक's picture

24 Apr 2014 - 12:41 am | तुमचा अभिषेक

माणसे मेल्यावर त्याचे कावळे होतात (त्यांचे आत्मे कावळ्यात जातात), मग कावळे मेल्यावर काय होते? त्या आत्म्याला मोक्ष मिळतो का? मग वरील घटनेत त्या कावळ्यात अडकलेल्या आत्म्याला मोक्ष मिळावा म्हणून तर नाही ना इतर साथीदार मदत करत होते. एकंदरीत गूढ पक्षी आहे हा कावळा. अंधश्रद्दा तश्या मानत नाही पण दारात येणार्‍या कावळ्याचे असे काही अनुभव गाठीशी आहेत की विश्वास बसतोच...

प्रभाकर पेठकर's picture

24 Apr 2014 - 1:08 am | प्रभाकर पेठकर

२००५ सालचा माझा एक लेख मनोगतावर आहे. दूसर्‍या संस्थळावरील त्यातही, 'मनोगता'वरील, लिंक इथे देणं अप्रस्तुत ठरेल ह्या भितीपोटी लिंक देत नाही. 'मी एक कावळा' असे गुगलवर शोधल्यास सापडेल.

शुचि's picture

24 Apr 2014 - 6:40 pm | शुचि

'मी एक कावळा' व 'प्रभाकर पेठकर' दोन्ही स्ट्रींगस एकदम जोडून गुगल केल्यास लवकर मिळते. कावळ्याचे अनुभवविश्व तसेच भावविश्व सुंदर रंगवलं आहे.

काकाश्रींची काक कथा सुद्धा आवडली ! :)

अन्या दातार's picture

25 Apr 2014 - 12:22 pm | अन्या दातार

ही तुम्ही पाहिलेली घटना आहे का? कारण पक्ष्यांना असा शॉक लागत असावा असे वाटत नाही. (हवेतल्या हवेत सर्किट कसे पूर्ण होईल?)

प्रभाकर पेठकर's picture

26 Apr 2014 - 1:28 am | प्रभाकर पेठकर

अपवादात्मक घटनेत, पावसाळ्यात किंवा हवेतील उच्च आर्द्रता (high humidity) मुळे शक्य होईलसे वाटते.