एक विमान हरवलेलं...

चावटमेला's picture
चावटमेला in जनातलं, मनातलं
10 Feb 2013 - 12:48 am

झी मराठीवर दर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता मधली सुट्टी नावाचा एक छान कार्यक्रम असतो. सलील कुलकर्णी अँकरींग करतो. वेगवेगळ्या गावांतील शाळांमध्ये जावून तिथल्या विद्यार्थ्यांशी एक सुंदर संवाद साधायचा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. एरवी तो सलील त्याच्या रिअ‍ॅलिटी शोज मधल्या भाषणांनी कधी कधी डोक्यात जातो, पण हा शो मात्र मला मनापासून आवडतो.तर,ह्या आठवड्याच्या भागात, सांगली जवळच्या एका खेडयातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शो होता. सलील चा नेहमीप्रमाणे मुलांशी संवाद सुरू होता. त्याने मुलांना एक प्रश्न विचारला की, तुम्ही सगळे तर लहान गावात राहता, तुम्हाला कधी मोठ्या शहराचे, तिथल्या गोष्टींचे आकर्षण वाटते का? वाटते तर कशाचे वाटते? तेव्हा एका गोड लहान मुलीने तितकेच गोड उत्तर दिले की मला ना मुंबईचा समुद्र खूप खूप आवडतो आणि तिला फक्त एकदा समुद्र बघायला मुंबईला जायचंय.
माझ्या तोंडून लगेच वाह निघून गेला. त्या निरागस मुलीची इच्छा सुध्दा तितकीच निरागस होती. तिला ना मोठमोठ्या बिल्डींग्स चं आकर्षण होतं, ना मॉल्स चं ना मल्टीप्लेक्स चं, ना मॅक्डोनल्ड्स ना पिझा हट चं. तिची स्वप्नं अशीच निरागस राहावीत असंच मात्र मला राहून राहून वाटत होतं.

त्या लहान मुलीने मला चांगलंच अंतर्मुख केलं. तो साधेपणा, तो निरागसपणा कुठेतरी एका कोपर्‍यात बंद करून ठेवलाय आपण. लहानपणी मला असंच टांग्याचं, रेल्वेच्या शिट्टीचं, नदीवरच्या पूलाचं ,त्या पूलाखालून संथपणे वाहणार्‍या कृष्णेचं, गावातल्या लहान मोठ्या वाड्यांचं, आकाशात मधूनच दिसणार्‍या विमानाचं प्रचंड आकर्षण होतं. कधी लांब विमान दिसलं की त्याचा अगदी ठिपका होवून जाईपर्यंत मी जणू त्याचा पाठलाग करत असल्या सारखा पळत जायचो. आज सुध्दा मी पळतच आहे, मीच नाही तर माझ्यासारखे बरेच जण पळताहेत, पण ते ठिपका झालेलं विमान केव्हाच हरवलंय आणि सगळेच जण केवळ दुसरा पळतोय, मग मी सुध्दा पळणार आहे असं म्हणतात आणि पळतात, पण कशाच्या मागे हे मात्र कुणालाच माहित नाही. असं ऊर फुटेस्तोवर आपण धावत राहतो आणि दूर कुठेतरी कोपर्‍यावर आयुष्य आपल्याला खुणावत राहते. मग त्या कोपर्‍यावर आपण बरंच काही सोडून दिलेलं असतं, तिथे असते गल्लीतली हाफ पिच क्रिकेट मॅच, आजीच्या हातचं गरम गरम थालीपीठ, पु.लं ची हसवत हसवत नकळत डोळ्यांत पाणी आणणारी कॅसेट, मित्रांबरोबर करायचा राहून गेलेला तोरणा-राजगडचा ट्रेक, मैत्रिणीसोबत पाहायचा राहून गेलेला सिनेमा, बायकोसाठी आणायचा विसरलेला गजरा, मुलाच्या शाळेतला मिस केलेला गॅदरिंग चा कार्यक्रम असं काही अन् बरंच काही. हातात काहीतरी अनामिक, गूढ पकडण्यासाठी जीवाचा आटापिटा करायचा आणि तोपर्यंत आयुष्यच हातातून कधी निसटून जातं हे समजतच नाही. म्हणूनच मला वाटतं की कधी कधी उगाच काहीतरी लिहायचंच म्हणून पाटी गिचमिड अक्षरांच्या वेड्या वाकड्या डिझाईन्स नी भरवून टाकण्या पेक्षा ती तशीच स्व्च्छ आणि कोरीच ठेवायला काय हरकत आहे.

असो, माझ्या मनातलं ते ठिपका होणारं विमान जसं हरवून गेलं तसा त्या गोड मुलीच्या मनातला, स्वप्नातला अथांग समुद्र कधीच हरवू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना..

मुक्तकप्रकटनविचारमत

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

10 Feb 2013 - 12:58 am | बॅटमॅन

अगदी खरंय :(

हे हरवलेलं काहीतरी पकडून ठेवायच्या धडपडीतूनच काहीजण इतिहासाच्या मागे लागत असावेत असेही वाटते.

शुचि's picture

10 Feb 2013 - 4:41 am | शुचि

मुलांना वेळ देऊ शकत नाही ही काय अथवा जोडीदाराला वेळ देऊ शकत नाही ही खंत प्रत्येकाला वाटत असावी. अगदी मनापासून कराव्याशा वाटणार्‍या गोष्टी किती साध्या साध्या असतात आणि आपण मात्र "मीटींगा कुठे काम कुठे सोशल गेट टुगेदर" करण्यात व्यस्त होऊन जातो. आत आपल्याला कळत असतं की हे दिखाव्याचे क्षण आहेत. पण काही गोष्टी या "क्वालिटी ऑफ लाईफ" मेंटेन करायला (राखायला) कराव्याच लागतात. उदाहरणार्थ पुढे मुलांचे शिक्षण व्हावे या ध्येयाने म्हणा किंवा कुटंबियांना विमा (इन्श्युरन्स) हवा म्हणून पैसे कमावणे.

मात्र जेव्हा २ क्षण निवांत मिळतात तेव्हा त्यांचे मोल जाणणे हेच महत्त्वाचे.

"वक्त की कैद मे जिंदगी है मगर,
चंद घडीयां यही है जो आजाद है"

या ओळी हेच सांगतात.

काही गोष्टी या "क्वालिटी ऑफ लाईफ" मेंटेन करायला (राखायला) कराव्याच लागतात. उदाहरणार्थ पुढे मुलांचे शिक्षण व्हावे या ध्येयाने म्हणा किंवा कुटंबियांना विमा (इन्श्युरन्स) हवा म्हणून पैसे कमावणे.
चरितार्थ किंवा मुलांचे शिक्षणासाठी म्हणून पसे कमावणं ही "क्वालिटी ऑफ लाईफ"..?
मला वाटतं ती गरज आहे..

पैसा's picture

10 Feb 2013 - 8:18 am | पैसा

पण "देर आए, दुरुस्त आए". एवढं मोठं आयुष्य असतं, त्यातून तुम्ही लिहिल्यात त्या गोष्टींसाठी इतकासा वेळ कधी ना कधी काढता येतोच की! हळहळत रहाण्यापेक्षा जेव्हा आठवण येईल, सवड असेल तेव्हा करून टाकावं. त्यात काय!

सुजित पवार's picture

11 Feb 2013 - 12:23 am | सुजित पवार

गल्लीतली हाफ पिच क्रिकेट मॅच - विसरलेलो, पन परवाच खेळलो..लय आन्ग दुखतय राव
मित्रांबरोबर करायचा राहून गेलेला तोरणा-राजगडचा ट्रेक - राहुनच गेला असता...पन जानेवारि मधे एकदाचा करुन टाकला..

चैदजा's picture

12 Feb 2013 - 1:15 am | चैदजा