छोट्या पडद्यावरचा हर्क्युल प्वाइरॉ - संक्षिप्त परिचय

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
8 Dec 2012 - 1:04 am

रहस्यकथावाचनाचे वेड तुला कधी लागले? असा प्रश्न कुणी मला विचारला, तर त्याचे नेमके उत्तर देणे अवघड आहे. सुरूवातीला बाबूराव अर्नाळकर, गुरूनाथ नाईक, सुहास शिरवळकर वाचून या साहित्यप्रकाराची जी गोडी लागली, ती पुढे आपसूकच इंग्रजी साहित्याकडे वळून स्थिरावली. या वाचनप्रवासात अर्ल स्टॅन्ले गार्डनरचा 'पेरी मेसन' (उपाख्य सुशिंचा 'बॅ. अमर विश्वास'), सर आर्थर कॉनन डायल यांचा 'शेरलॉक होम्स' या सारख्या मुख्य व्यक्तिरेखा मनात कायमचे घर करून गेल्या. त्या जोडीलाच पेरी मेसनची डेला स्ट्रीट ही सचिव, पॉल ड्रेक हा मदतनीस तसेच शेरलॉक होम्सचा डॉ. वॉटसन हा मदतनीस यासारख्या पूरक व्यक्तिरेखाही मनावर त्यांची अमीट छाप सोडून गेल्या.

बहुतांशी पुरूष लेखकांची मक्तेदारी असलेल्या रहस्यकथा लेखनाच्या प्रांतात अ‍ॅगाथा ख्रिस्ती या सिद्धहस्त लेखिकेकडे एक प्रकारचे अनभिषीक्त सम्राज्ञीपदच आहे. साधारणपणे एखाद्या ग्रंथाइतका ऐवज असलेल्या ख्रिस्तीबाईंनी लिहीलेल्या कित्येक रहस्यकथा अप्रतिम आहेत, बेजोड आहेत. त्यांचे पुस्तक एकदा हातात घेतले, की वाचकाला जागीच खिळवून ठेवते. ते सोडवत नाही. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी 'नाईट मारून' सबमिशन वगैरे करतात, त्या धर्तीवर नाईट मारून असे एखादे पुस्तक वाचत एखादा पूर्ण सप्ताहांत ('वीकेंड') सहज सत्कारणी लावता येतो.

काही वर्षे थोडेसे बाजूला पडलेले रहस्यकथावाचनाचे वेड २००९ मधे ऑनसाईट गेल्यावर पुन्हा उफाळून आले. यावेळी माध्यम मात्र वेगळे, टेलिव्हिजनचे होते. डेव्हिड सुशे (David Suchet)या अभिनेत्याने छोट्या पडद्यावर साकारलेला अ‍ॅगाथा ख्रिस्तींचा मानसपुत्र 'हर्क्युल प्वाइरॉ' (Hercule Poirot)पाहिला, आणि सुरुवातीच्या अर्ध्या तासातच मी या कसलेल्या अभिनेत्याचा चाहता झालो.

छोट्या पडद्यावर आयटीव्ही या ब्रिटीश वाहिनीवर (आणि तसे जगभरच वेगवेगळ्या वाहिन्यांवर) 'हर्क्युल प्वाइरॉ' या रहस्यकथा मालिकेचे प्रसारण नियमीतपणे केले जाते. आता 'डीव्हीडी संच' या स्वरूपातही ती उपलब्ध आहे. या मालिकेची तोंडओळख मिपाकरांना करून देण्याचा हा एक प्रयत्न.

MPHerculePoirot_3AT_t614

बेताचीच उंची, काहीशी स्थूलपणाकडे झुकलेली शरीरयष्टी, 'जी जानसे' मेहनत घेउन कोरलेल्या मिशा, डोक्यावर खुलून दिसणारा चकाकता चंद्र, तो झाकणारी ब्रिटीश पद्धतीची गोल टोपी, कपडे काळजीपूर्वक निवडलेले आणि कटाक्षाने फॉर्मलच! एकंदरच व्यक्तिमत्वात स्पष्टपणे दिसून येणारी टापटीप, चालण्याबोलण्यात हरघडी स्पष्टपणे दिसून येणारा काहीसा उर्मटपणाकडे झुकलेला आत्मविश्वास ही या प्वाइरॉची खासियत. हातात नक्षीकाम केलेली छडी घेउन दुडक्या चालीने झपाझाप निघालेला डेव्हिड सुशेचा प्वाइरॉ असा काही डोक्यात बसतो, की सर पीटर उस्तिनोव्हसारखे भलेभले नटही प्वाइरॉ म्हणजेच सुशे या समीकरणाला छेद देउ शकत नाहीत.

छोट्या पडद्यावरच्या प्वाइरॉ मालिकेत काही 'एपिसोड्स' पाउण तासाचे आहेत तर काही दोन तासांचेही (मूव्ही लेंग्थ) आहेत. अ‍ॅगाथा ख्रिस्तींच्या रहस्यकथा इतक्या कमी वेळात सादर करणे हे फार मोठे आव्हान आहे, पण या मालिकेच्या दिग्दर्शकाने आणि तांत्रिक बाबी संभाळणार्‍या चमूने ते लीलया पेलले आहे. ख्रिस्ती बाईंची कथा लिहीण्याची शैली काहीशी 'पसरट' आहे. प्रत्येक प्रसंग वाचकाच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उभा रहावा यासाठी त्याचे खूपच विस्तृत वर्णन त्या कटाक्षाने करतात. यात स्थळ, काळ, परिस्थितीजन्य बाह्य बारकावे अत्यंत बारकाईने टिपलेले असतात. त्या जोडीलाच कथानकातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेच्या मनात चाललेली आंदोलने 'स्वगत संवाद' या स्वरूपात तितक्याच ताकदीने उभी केलेली असतात.

या मालिकेतल्या बहुतांशी कथा छोटेखानी आणि टुमदार ब्रिटीश गावांमधे घडलेल्या गुन्ह्यांच्या (प्रामुख्याने खून प्रकरणे) शोधावर आधारित असतात. प्रत्येक व्यक्तीचे स्वभाववैचित्र्य, वेळोवेळी घडणारे चित्रविचीत्र नाट्यमय प्रसंग, आव्हानात्मक परिस्थिती आणि त्यातून उमलत जाणारी या एक से एक व्यक्ती आणि वल्लींममधील नातीगोती (यात काही गोत्यात आणणारी नातीही आलीच!)हा तसा गुंतागुंतीचाच मामला म्हणायला हवा. या पार्श्वभूमीवर कुठे परस्परविरोधी हितसंबंध तर कुठे मूल्यांचा संघर्ष, कधी विकृतीकडे झुकलेली भोगलालसा तर कधी आंधळा स्वार्थ यातून खुनासारखा गंभीर गुन्हा घडतो.

गुन्हा घडल्यावर, क्वचितप्रसंगी एखाद्या 'जागृत नागरिकाला' गुन्हा घडेल अशी चाहूल लागल्यावर या ना त्या कारणाने प्वाइरॉ खुनाच्या तपासात ओढला जातो आणि कथानकाचा मुख्य भाग सुरू होतो. मूळ कथेइतका विस्तार तितकाच तपशीलवार छोट्या पडद्यावरच्या सादरीकरणात जसाच्या तसा सादर करणे अशक्य असले, तरी कथानकाचा आत्मा हरवणार नाही ही काळजी घेत या मालिकेतली एक एक रहस्यकथा आयटीव्हीने अत्यंत परिणामकारकपणे सादर केलेली आहे.

(क्रमशः)

वाङ्मयकथाआस्वाद

प्रतिक्रिया

सुनील's picture

8 Dec 2012 - 2:28 am | सुनील

छान ओळख. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

डेव्हिड सुशेचा प्वाइरॉ असा काही डोक्यात बसतो, की सर पीटर उस्तिनोव्हसारखे भलेभले नटही प्वाइरॉ म्हणजेच सुशे या समीकरणाला छेद देउ शकत नाहीत.

डेविड सूशेचे दुसरे एक वैशिष्ठ्य म्हणजे, स्वतः अस्सल ब्रिटिश असूनही त्याने प्वाइरॉचे बेल्जियन धाटणीचे इंग्रजी प्रत्येक भागात अगदी बिनचूकपणे उच्चारले आहे.

(सदर DVD संच माझ्या घरी आहे (मी मात्र सध्या घराबाहेर आहे!) आणि कुठल्याही ठाणेकर मिपाकराला (परत आणून द्यायच्या बोलीवर ;)) उपलब्ध आहे)

कवितानागेश's picture

8 Dec 2012 - 8:29 am | कवितानागेश

येस्स! :)

प्रचेतस's picture

8 Dec 2012 - 9:22 am | प्रचेतस

एकदाचा या विषयावर तू लिहिता झालास तर.
उत्तम सुरुवात. हिस्ट्री वाहिनीवर ही मालिका यापूर्वी पाहिलेली होती. डेव्हिड सुशेने अतिशय जबरदस्त काम केले आहे इतके की प्वॉइरो म्हणले की हाच अभिनेता समोर येतो.

मूकवाचक's picture

10 Dec 2012 - 8:49 am | मूकवाचक

सुनील, लीमाउजेट आणि वल्ली - मन:पूर्वक धन्यवाद.

रहस्य कथे बद्द्ल छान माहीती.