|| वनस्पतीनाम् तुलसी, मासानाम् कार्तिकः प्रियः ||
|| एकादशी तिथी नाम च क्षेत्रम् द्वारका मम ||
स्कंद पुराणातल्या या श्लोकात श्रीकृष्णाच्या प्रिय गोष्टींमध्ये ज्याचं नाव येतं तो सर्व महिन्यांत श्रेष्ठ असलेला महिना म्हणजे कार्तिक महिना. या महिन्यात श्रीविष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण, विठ्ठल, शिवशंभू या देवांच्या विविध प्रकारे उपासना करतात. दिवाळी, तुळशीचं लग्न, दीपोत्सव, वैकुण्ठ चतुर्दशी (शैव-वैष्णवांनी परस्परांच्या दैवतांना प्रणिपात करण्याचा दिवस), त्रिपुरारी पौर्णिमा हे दिवस कार्तिकात साजरे होतात. कार्तिक स्नानाचेही अपार महत्त्व आहे. बलिप्रतिपदेने सुरू होणाऱ्या या महिन्यातल्या जवळ जवळ प्रत्येक दिवसाला कोणते न कोणते धार्मिक महत्त्व लाभलेले आहे. अशा या महिन्यात घेतलेले कोणतेही साधेसे व्रतही दुर्लभ असे फळ देऊन जाते. साधक आणि उपासकांसाठी तर हा महिना उपासनेचे विशेष फळ देणारा आहे.
कार्तिक कौतुकाच्या बहुतेक कथा श्रीविष्णू आणि श्रीकृष्ण यांच्याशी जोडलेल्या आहेत. आषाढ शुद्ध एकादशीला क्षीरसागरात झोपी गेलेले श्रीविष्णू कार्तिक शुद्ध एकादशीला जागे होतात आणि चातुर्मास संपतो. या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न करता येते, आणि त्यानंतर लग्नाचे मुहुर्त सुरू होतात. म्हणून हा कार्तिक महिना विशेष महत्त्वाचा. सत्यभामेने श्रीकृष्णाला कार्तिकाची महती विचारली असता, कृष्णाने तिला मत्स्यावताराची कथा सांगितली. त्यानुसार, शंखासुराने वेदांचे हरण करून ते सप्तसागरात दडवून ठेवले. वेदांची सुटका करण्यासाठी आणि शंखासुराचा विनाश करण्यासाठी श्रीविष्णूंनी मत्स्यावतार धारण केला तो कार्तिकी एकादशीच्या दिवशी.
मात्र, सर्वात लडिवाळ आणि तितकीच अर्थगर्भ अशी कथा आहे ती बाळकृष्णाची.. कृष्ण आणि बलरामाच्या खोड्यांनी सारे गोकूळ त्रस्त झाले असूनही यशोदेने या दोघांना कधीच शिक्षा केलेली नाही. एकदा मात्र लोणी चोरल्याबद्दल तिने त्याला उखळाला बांधून ठेवले होते. लहान दोरखंड पुरेना तेव्हा मोठा दोरखंड घेऊन तिने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. अखेरीस कृष्ण बांधला गेला. किती विलक्षण आहे पाहा, साक्षात परमात्मास्वरूप असे ज्याचे वर्णन तो जन्मतःच केले गेले, पहिली पावले टाकण्याआधीच ज्याने विक्राळ अशा पूतनेचा वध केला, असा जगदीश्वर "अनिरुद्ध" श्रीकृष्ण यशोदामातेच्या हाती साध्याशा दोरखंडाने बांधला गेला.
भारतीय अध्यात्माने या कथेचा सूक्ष्मतर अन्वय लावला आहे. सर्वसाक्षी परमेश्वराने माणसाचे हे बंधन मानले, स्वीकारले आणि जणू हा संकेत दिला की प्रेमाचा अधिकार भगवंताला सर्वस्वी मान्य असून, तो केवळ त्या नाजूक बंधनातच बांधला जाऊ शकतो. या कथेमुळे श्रीकृष्णाला दामोदर हे नाव मिळाले आणि हा प्रसंग घडला तो कार्तिकातच, म्हणून कार्तिक मास हा कृष्ण भक्तांसाठी "दामोदर मास" ठरला. साहजिकच या महिन्यात मुकुंदाला प्रसन्न करण्यासाठी यथामति, यथाशक्ति प्रयत्न केले जातात. त्याची सखी असलेल्या राधेचीही आराधना केली जाते.
संपूर्ण भारतात, विशेषत: उत्तरेत, या काळात भगवद्भक्तीला बहर आलेला असतो. विविध प्रकारच्या पूजा, धार्मिक कार्यं, नेम-नियम, संपूर्ण महिनाभर सुरू राहतात. यांना कार्तिक व्रत असे म्हटले जाते. हे व्रत अनुसरताना कोणते नियम पाळावेत याचे उल्लेख कार्तिक पुराणात आहेत.
अनेक ठिकाणी या महिन्यात काकडआरतीही केली जाते. काकडा भल्या पहाटे केला जात असल्यामुळे वातावरणातली प्रसन्न शांतता, सौम्य आवाजात म्हटली जाणारी पदं, हलकेच वाजणारी घंटा, देवाच्या चेहर्यावर पडलेला ज्योतींचा प्रकाश, उदबत्त्यांचा गंध, असा हा पंचेंद्रियांना तृप्त करणारा अनुभव ठरतो. भक्तीभाव व्यक्त करणारे घरगुती शब्द लहान बाळाला जागं करताना आईच्या स्वरात आपसूकच येणार्या मायेने म्हटले जातात. आपल्या डोळ्यांदेखत आपला देव जागा होतो आहे, ही भावना खरोखरंच मनात उमटते. एवढ्या पहाटे, कार्तिकातल्या गारव्यात होणार्या काकड्याला बहुधा निव्वळ उपचारादाखल येणारे भाविक नसतात. ज्यांना याची खरोखरीच गोडी असेल, अशी मोजकीच मंडळी मात्र काकड्याला आवर्जून हजर राहतात.
दैनंदिन कार्याखेरीज कार्तिक सोमवार, कालाष्टमी, कुष्मांड नवमी, अक्षय नवमी, हरी बोधिनी किंवा प्रबोधिनी एकादशी, वैकुंठ चतुर्दशी, व्यास पूजा, कार्तिकी पौर्णिमा (जिला त्रिपुरी पौर्णिमा असेही संबोधले जाते), देव दिवाळी, तुलसी विवाह असे अनेक महत्त्वाचे दिवस कार्तिकात येतात. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी शंकराने उन्मत्त अशा त्रिपुरासुराचा वध केला आणि त्याच्या जाचातून त्रैलोक्य मुक्त केले. मृत्यूसमयी त्रिपुरासुराच्या शरीरातून ज्योतिस्वरूप प्राण बाहेर पडला आणि शिव शंकरामध्ये विलीन झाला. त्याचं प्रतीक म्हणून या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो. अतिशय देखणा असा गंगा महोत्सव, आणि मनोरम असे गंगेतील दीपदानही याच महिन्यात पार पडते.
या महिन्याचे विशेष म्हणजे, दिनचर्येपासून पुजाअर्चनेपर्यंत प्रत्येक कृतीला भगवंताचे अधिष्ठान जाणीवपूर्वक द्यावयाचे असल्याने, या सत्कर्मांचेही जीवाला बंधन होत नाही. त्यामुळे पुनर्जन्मासाठी बंधनकारक ठरणाऱ्या सर्व चांगल्या-वाईट कर्मांपासून मुक्ती देणारा हा महिना खरोखरीच "पुण्यानाम् परमम् पुण्यम् पावनानाम् च पावनम्" आहे, असं मानलं जातं. भक्त वात्सल्याने परिपूर्ण असा हा महिना भाविक मनासाठी क्षणोक्षणी पर्वणी साधणारा भासल्यास नवल नाही.
--------------------------------------------------------------------------------
पूर्वप्रकाशित
(टीपः इथे कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी, व्रतवैकल्यांचे समर्थन वा प्रचार करण्याचा हेतू नाही. लेखनप्रकार 'विरंगुळा' आहे याची नोंद सुज्ञ वाचक घेतीलच..)
प्रतिक्रिया
27 Nov 2012 - 12:23 pm | bhaktipargaonkar
सुरेखच ...कार्तिक महिन्याबद्दल ईतका सार पहिल्यांदाच वाचला..कार्तिक स्नानाबद्दल माहिती होतं ...पण त्याबद्दलची माहिती दिल्याबद्दल खरोखरच धन्यवाद.
आजच्या धकाधकीच्या जीवनात व्रतवैकल्ये करणे तर दूरच त्यामुळे त्याबद्डला बोलले पण जात नाही म्हणून बर्याचदा माहिती पण होत नाहीत. या पुढच्या पिढीला ते कसे माहिती होतील जर आपण ते केलेच नाहीत तर..
असो..आपले मन:पूर्वक धन्यवाद
27 Nov 2012 - 12:26 pm | इरसाल
आवडले.माहितीत अजुन भर पडली.
बाकी महिन्यांबद्दलही लिहाल ही अपेक्षा
27 Nov 2012 - 12:33 pm | नितिन थत्ते
>>स्कंद पुराणातल्या या श्लोकात श्रीकृष्णाच्या प्रिय गोष्टींमध्ये ज्याचं नाव येतं तो सर्व महिन्यांत श्रेष्ठ असलेला महिना म्हणजे कार्तिक महिना.
गीतेमध्ये मात्र श्रीकृष्ण "मासानां मार्गशीर्षोहं" असे म्हणून मार्गशीर्ष महिना सर्व महिन्यांत श्रेष्ठ असे म्हणतो.
नक्की कोणता महिना श्रेष्ठ आहे?
27 Nov 2012 - 1:13 pm | दादा कोंडके
बाकी या प्रतिसादात भाजपवर तोंडसूख घेत काँग्रेसची बाजू न घेतल्याबद्दल थत्तेचचांचे अभिनंदन! :)
27 Nov 2012 - 4:41 pm | नितिन थत्ते
हा हा हा. आता लेखात नेहरूंवर तोंडसुख घेतल्यावर आम्ही गप्प बसणार होय?
29 Nov 2012 - 9:23 pm | मदनबाण
लेख आवडला,नविन माहिती कळाली. :)
प्रमाणाच्या बाहेर अवांतर :---
लेखात नेहरूंवर तोंडसुख घेतल्यावर आम्ही गप्प बसणार होय?
खीक्क ! हल्लीच माजी हवाईदल प्रमुख ए. वाय. टिपणीस यांनी सुद्धा नेहरुंवर तोफ डागली होती ते वाचनात आले होते.
http://alturl.com/f6v5i
आमचे चाचा नेहरु असेही होते...
http://alturl.com/479hc
30 Nov 2012 - 8:10 am | नितिन थत्ते
अपयशाचे खापर दुसर्यांवर फोडणे हा तर मनुष्यस्वभावच असतो.
[स्वगत : कोणाला ज्योग कळत नसतील तर आपण उगाच विषय वाढवावा का?]
27 Nov 2012 - 1:59 pm | इनिगोय
तो संपूर्ण श्लोक असा आहे -
संवत्सरोऽस्म्यनिमिषाम् ऋतूनां मधुमाधवौ ।
मासानां मार्गशीर्षोऽहं नक्षत्राणां तथाभिजित् ॥*
अर्थात..
सावधानेंअविकळ । न चुकतां पळें पळ । संवत्सरात्मक जो काळ । तो मी गोपाळ स्वयें म्हणे ॥
त्रसरेणूपासोनि जाण । लवनिमिषदिनमान । संवत्सरवरी सावधान । गणीं मी संकर्षण काळगणना ॥
मधुमाधव वसंतयुक्तू । कृष्ण म्हणे तो मी ऋतू । मार्गशीर्ष मी मासांआंतू । धान्यपाकयुक्तू आल्हादी ॥
गणितां न ये पंचांगांत । नक्षत्रीं असोनि सदा गुप्त । अव्यक्त परी सज्ञाना प्राप्त । तें मी अभिजित् म्हणे हरी ॥
- एकनाथी भागवत
याचा शब्दशः अर्थ 'मासांमध्ये मी मार्गशीर्ष आहे' असा होतो.
इथे कृष्णाने मार्गशीर्ष महिन्याशी स्वतःची तुलना केली आहे. का? तर, मार्गशीर्ष महिना धनधान्याने युक्त आणि आल्हाददायक ऋतुमान असलेला आहे, त्यामुळे तो जसा परिपूर्ण आहे, तसा श्रीकृष्ण आहे.
वर लेखात दिलेला श्लोक श्रीकृष्णाला प्रिय असणार्या चार गोष्टींची नावं घेतो, ज्यात कार्तिक महिना आहे. हा महिना विष्णुभक्तांसाठी श्रेष्ठ का, याचं उत्तर शेवटच्या परिच्छेदात आहेच, त्यामुळे इथे पुन्हा देत नाही.
(* आंजावर याचे पाठभेद दिसले, गीता हाताशी नसल्याने खात्री करता आली नाही.)
29 Nov 2012 - 8:00 pm | मैत्र
गीतेचा दहावा अध्याय हा विभूतीयोग आहे.
अर्जुनाचा प्रश्न आहे की तुझे निर्गुण निराकार रूप माझ्या कल्पनाशक्तीला अवघड आहे.
मग मी या सृष्टीमध्ये तुला कुठे पाहू / कसे पाहू ? // कोणत्या रुपांमध्ये तू प्रकट होतोस?
तुझ्या सर्व विभूतींचे विस्ताराने वर्णन कर...
"केषु केषु च भावेशु चिन्त्योसि भगवन्मया"
याला दिलेल्या विविध उत्तरांमध्ये ३५ व्या श्लोकात मार्गशीर्षाचा उल्लेख आहे -
बृहत्साम तथा साम्ना गायत्री छंदसामहम
मासानां मार्गशीर्षोहम ऋतूनां कुसुमाकरः
27 Nov 2012 - 12:38 pm | स्पा
सुरेख लिहिलंय
हे विशेष आवडलं
27 Nov 2012 - 1:40 pm | श्रीवेद
आवडले.
27 Nov 2012 - 1:41 pm | मूकवाचक
+१
27 Nov 2012 - 2:43 pm | ऋषिकेश
ओक्के आभार! :)
27 Nov 2012 - 5:16 pm | पैसा
अशीच प्रत्येक महिन्याची माहिती येऊ दे! (विरंगुळा म्हणूनच.)
29 Nov 2012 - 7:36 am | किसन शिंदे
असेच म्हणतो.
सुरेख लिहलंय.
वडीलांबरोबर बर्याच वेळा काकड आरतीला गेलो असल्याने तुम्ही लिहलेल्या शब्दशब्दाशी सहमत आहे. त्या संपुर्ण वातावरणाचा बर्याच वेळा अनुभवही घेतलाय.
+१
28 Nov 2012 - 2:29 pm | अनिल तापकीर
सुंदर महिती दिली कर्तिक हा माझा देखिल आवडता महिना आहे कारण या महिन्यात काकड आरती असते.मि लहान्पणापासुन काकड्याला जात होतो आता पुण्यात राह्यला आल्यापसुन बंद झाले तरी दि. सुट्टीत आठ दिवस गेलो होतो
बाकि सर्व माहिती सुंदर व माहितीपुर्ण
29 Nov 2012 - 5:24 am | स्पंदना
आवडल. बरीच माहिती मिळाली.
29 Nov 2012 - 8:57 pm | स्वाती दिनेश
लेख आवडला!
पण माझ्या आधीच्या प्रतिक्रियेला पंख कसे काय फुटले?
असो.
मार्गशीर्ष श्रेष्ठ मास आणि कार्तिक आवडता महिना.. असे असावे का?
स्वाती
29 Nov 2012 - 9:46 pm | कलंत्री
याच महिन्यात नानकजयंती, गोरक्षनाथ जयंती आणि नामदेवाची जयंती येते. या तिघे वेगवेगळ्या उपासनापद्धतींचे हे प्रणेते आहेत.
29 Nov 2012 - 9:55 pm | कवितानागेश
सुंदर वर्णन.
30 Nov 2012 - 7:29 am | चौकटराजा
लेखनप्रकार 'विरंगुळा' आहे याची नोंद सुज्ञ वाचक घेतीलच
धन्यवाद या वाक्याबद्द्ल.कारण गंभीरपणे विचार करायचा झाला तर ... कार्तिक हे एका ३० दिवसांच्या स्लॉटला दिलेले एक नाव या पलिकडे निसर्गात त्याची काही ओळख नाही. निग्रो, स्लाव, मंगोलियन, सॅक्सन, याना त्याचे काही महत्व नाही. आम्हाला म्हणाल तर याच महिन्यातील प्रतिपदेला आमचा जन्म झाला.आम्ही म्हणजे तरी कोण ? एक मर्त्य जंतू म्हणजे पुन्हा महत्वाला मर्यादा आल्याच !
30 Nov 2012 - 10:26 pm | अन्या दातार
सदर प्रतिसादाचा अर्थ कुणी सांगेल काय?