कबुतरे............

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
12 Oct 2012 - 4:56 pm

कबुतरांचा उपयोग. असाही.....

बर्‍याच लोकांच्या कबुतरावरच्या एका काथ्याकुटावरच्या प्रतिक्रिया वाचून करमणूक झाली पण त्याच वेळी एका वाचलेल्या लेखाची आठवण झाली. त्याच्याच आधारावर ही माहीती.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जर आपण इराणच्या इस्फहान प्रांतात गेलात व जर आपल्याला रस्त्याने प्रवास करायचा प्रसंग आला तर आपल्याला वाहनाच्या खिडकितून ठराविक अंतरावर काही मनोरे उभे दिसतील. या मनोर्‍यांची आता पडझड झाली आहे. हे मनोरे माती व विटांनी बांधलेले आहेत. पहिल्यांदा आपल्याला असे वाटण्याचा संभव आहे की हे जुन्या काळातील टेहळणी बुरुज असतील पण याला बंदुकांसाठी असतात तसे झरोके नाहीत हे लक्षात येते व आपण अजुनच गोंधळून जातो, विचार करायला लागतो. अशा ओसाड प्रदेशात जेथे ना शहर, ना लोकवस्ती तेथे कोण कशाला असले टेहळणी बुरुज उभे करेल ? बरे गंमत म्हणजे जर टेहळणी बुरुज असतील तर एवढ्या जवळ कोण उभे करेल ? कारण याची उंची आहे जवळ जवळ ३० ते ४० फूट. हे धान्य साठवायची कोठारे असतील का ? शक्यता नाकारता येत नाही. का प्राचीन विट भट्ट्या असाव्यात? का दुपारच्या उन्हात झळींपासून संरक्षण करुन मस्त पैकी झोप काढायच्या या श्रीमंतांच्या जागा असाव्यात ? पण नंतर कळाले ते फारच वेगळे होते.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पण सतराव्या शतकात एका जर्मन माणसाने इराणमधे प्रवास केला आणि त्यावर एक पुस्तक लिहिले त्याचे नाव आहे "The Travels of Olearius in Seventeenth Century" या पुस्तकात त्याने इराणच्या कलिंगडाचे आणि बागांचे फारच गोडवे गायले आहेत. या पुस्तकात हे मनोरे म्हणजे कबुतरांसाठी बांधलेली घरे आहेत याचा उलगडा होतो. ही बांधली गेली १५०० सालात शहा अब्बासच्या काळात. कबुतरांसाठी घरे बांधण्या एवढा हा राजा कोमल ह्रद्याचा होता असा गैरसमज करून घेऊ नका. हा एक बुद्धिमान व शास्त्रीय दृष्टिकोन असलेला राजा होता. ही कबुतरखाने हजारो कबुतरांना आसरा द्यायची. इराणमधे त्या काळात ३००० पेक्षा जास्त असले मनोरे उभे केले गेले होते. एका परदेशी प्रवाशाने तर म्हटले, "जनतेची घरेही एवढी चांगली असती तर बरे झाले असते.” काही राजांनी तर कबुतरांच्या शिकारीवर बंदीही घतली होती. या कबुतरखान्याची रचना मोठी वैशिष्ठ्यपूर्ण असायची. याची बाहेरची भिंत कच्च्या विटांची व त्याच्या गिलाव्यासाठी चुना व जिप्सम वापरण्यात येई. मोठ्या कबुतरखान्या्चा व्यास ७० फूटापर्यंत असायचा तर उंची साठ फुटापर्यंत व ही शेतांमधे उभी केली जायची. कबुतरांची हत्या करायला बंदी असल्यामुळे ती खाण्यासाठी पाळायचा प्रश्नच नव्हता. मार्को पोलोनेही कबुतरांना या भागात फार मानतात त्यामुळे ती खाल्ली जात नाहीत असे म्हटले आहे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या कबुतरांसाठी एवढे सगळे करायचे खरे कारण होते त्यांची विष्ठा. हे कबुतरखाने त्यांच्या विशिष्ठ रचनेमुळे ही विष्ठा गोळा करण्यासाठी वापरले जायचे. या विष्ठेत नत्राचे प्रमाण खूप असते त्यामुळे ज्या जमिनीत नत्र कमी असते त्याच्या साठी ही विष्टा म्हणजे वरदानच ! शिवाय यात फॉस्फरसचे प्रमाणही खूप असते. थोडक्यात हे त्यावेळचे एक चांगले NPK खत होते असे म्हणायला हरकत नाही.

हेच खत इस्फहानमधे फळांच्या झाडाला, काकड्यांच्या वेलांना व कलिंगडाला घालत असत. त्या काळात एका झाडा्ला ९०० ग्रॅम एका वर्षाला घालत असत. म्हणजे एका हेक्टरला साधारणत: १७०० किलो खत लागे. या खताने पीकाचे उत्पन्न दुप्पट होई असे लिहून ठेवलले आहे. कोणीतरी हा प्रयोग सध्या करायला हरकत नाही. हिशेब केला तर एका मोठ्या कबुतरखान्यात त्या काळी साधारणत: ५ ते ७ हजार कबुतरे निवास करत असावीत असे गृहीत धरुयात. एक कबुतर वर्षाला साधारणत: २७५० ग्रॅम विष्टा तयार करते हे गृहीत धरले ( हॅनसेनने मोजलेले आहे) तर वर्षाला १६५०० किलो खत तयार होत असे. सर्व साधारण परिस्थितीत हे खत १८००० झाडांना पुरत असे म्हण्जे जवळ जवळ २४ एकर जमिनीला.

ही विष्टा चामडे कमविण्याच्या उद्योगातही वापरले जायची कारण पाण्यात मिसळल्यावर त्याचे अमोनियम क्लोराईड तयार व्हायचे ज्याने कातडे मऊ पडते. ही विष्ठा बंदूकीची दारू तयार करण्यासाठीही वापरली जायची. या दारूत त्या काळी ७५ % पोटॅशियम नायट्रेट, १० % सल्फर, आणि १५ % कार्बन असतो. त्या काळात पोटॅशियम नायट्रेट इराणमधे फक्त याच विष्ठेतून मिळायची सोय होती.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

कबुतरखान्यात कबुतरांना अन्न मिळत नसे ते त्यांना बाहेरून आणावे लागे. ही कबुतरे फक्त रात्रीच या इमाततीत आसर्‍याला येत. या इमारतीचे चित्र जर आपण बघितलेत तर आपल्याला दिसेल की विटांच्या जाळीत बसण्यासाठी अत्यंत योग्य अशी जागा कबुतरांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. कबुतरांची विष्टा सरळ मधे एका हौदात पडेल अशी याची रचना आहे जेथे ती वाळे. हा हौद वर्षातून एकदा उघडला जाई व आतील खत विक्रीला काढण्यात येई. याचा दर साधरणत: पाच किलोला चार ब्रिटिश पेन्स असा असे. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त कबुतरे निवार्‍या ला येतील असे वास्तूशास्त्र या इमारतीत वापरले गेले आहे व ते प्रत्यक्ष बघायला मजा येईल.

कोणी जाणार असेल तर हा कबुतरखान जरूर बघून यावा.
:-)

एरिक हान्सेन यांच्या लेखावर आधारित. फोटोही त्यांनीच काढलेले आहेत.
एरिक हान्सेन यांचा हा लेख आर्मकोवर्ल्डमधे छापून आलेला आहे.
जयंत कुलकर्णी
बिचार्‍या कबुतरांना जरा बरे वाटेल आता................:-)

इतिहासलेखमाहिती

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

12 Oct 2012 - 5:04 pm | दादा कोंडके

छान माहितीपुर्ण लेख.

मी_आहे_ना's picture

12 Oct 2012 - 5:17 pm | मी_आहे_ना

नविनच माहिती कळली..धन्यवाद!

तिमा's picture

12 Oct 2012 - 5:41 pm | तिमा

एक कबुतर वर्षाला साधारणत: २७५० ग्रॅम विष्टा तयार करते हे गृहीत धरले ( हॅनसेनने मोजलेले आहे)
आमच्या सोसायटीत अंदाजे ५० तरी कबुतरे रोज दिसतात. म्हणजे आम्ही नतद्रष्ट, वर्षाचे १३७५०० ग्रॅम, मौल्यवान खत वाया घालवतो!
लेख माहितीपूर्ण!

चौकटराजा's picture

12 Oct 2012 - 7:40 pm | चौकटराजा

वसईला रहाणारा माझा मामा म्हणत असे " चर्चगेट स्टेशनची मुतारी " चालवायला घेतली तर कमी भांडवलात युरीयाचा
मस्त धंदा चालेल .... आयडिया एकेकाच्या ..दुसरे काय ?

दादा कोंडके's picture

12 Oct 2012 - 8:30 pm | दादा कोंडके

नका काढू हो असल्या आठवणी. खूप वर्षापुर्वी तीथं जाणं झालं होतं. आत गेल्यावर हबकलोच होतो. बघेल तिथं असंख्य माणंसं उभं राहून मूX-मूXX होते. वासाच तर सोडा, गरम वाफा सगळीकडे... आराररर गुदमरून जीव गेला असता. :(

कानडाऊ योगेशु's picture

8 Feb 2017 - 11:02 am | कानडाऊ योगेशु

म्हणजे आम्ही नतद्रष्ट,
त्रद्रष्ट म्हणणे योग्य ठरेल इथे. ;)

गणपा's picture

12 Oct 2012 - 6:36 pm | गणपा

ऐकावे ते नवलंच.

सहज's picture

12 Oct 2012 - 6:47 pm | सहज

माहीतीपूर्ण लेख!

जयंतकाका या लेखाबद्दल धन्यवाद. अब्बास राजा (किंवा त्याचे मंडळ) खरा डोकेबाज म्हणायला हवा.

अन्या दातार's picture

12 Oct 2012 - 7:05 pm | अन्या दातार

एखाद्या शेतात प्रयोग करायला हरकत नाही. :-)
उत्तम माहिती.

चौकटराजा's picture

12 Oct 2012 - 7:47 pm | चौकटराजा

मिपा वरचे शेतकरी गंगाधर मुटेना विचारायला काय हरकत आहे ? कबुतरावर गझ्ला ही वाचायला मिळतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Oct 2012 - 8:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्रे वा....! माहितीपूर्ण लेख आहे आवडला. आभार.

-दिलीप बिरुटे

जयंतकाकांचे लेख वाचणे म्हणजे पर्वणीच.

सोत्रि's picture

12 Oct 2012 - 8:49 pm | सोत्रि

वल्लींशी सहमत!

अतिशय माहितीपूर्ण लेख.

- (जयंतकाकांच्या लेखांची आवर्जून वाट बघणारा) सोकाजी

सस्नेह's picture

12 Oct 2012 - 9:26 pm | सस्नेह

लहनपणी 'विचित्र विश्'' नवचे मसिक मिळायचे. त्यात अशी चमत्कृतीपूर्ण माहिती असे.
बाकी एका उपद्रवी वस्तूचा असा कल्पक उपयोग करणारे पूर्वज खरोखरच महान.

त्या कबुतरांनी धान्य टिपण्यासाठी आसपासच्या शेतात भरार्‍या मारून यावं आणि मग 'आरामाची जागा आणि शौचालय' म्हणून अशा मनोर्‍यांमध्ये रहावं ही आयडिया अफलातून होती! पण मग त्या कबुतरखान्यांचा तिथली कबुतरं आता का उपयोग करीत नसावीत असा प्रश्न मनात आला

असंही वाटलं की दादरच्या कबुतरखान्यात असं बरंच खत निर्माण होत असेल....कोणी वापर करत नाही का?

सूड's picture

15 Oct 2012 - 9:33 pm | सूड

>>असंही वाटलं की दादरच्या कबुतरखान्यात असं बरंच खत निर्माण होत असेल....कोणी वापर करत नाही का?
पिकतं तिथं विकत नाही...

५० फक्त's picture

13 Oct 2012 - 8:29 am | ५० फक्त

उत्तम माहिती.

किसन शिंदे's picture

13 Oct 2012 - 8:51 am | किसन शिंदे

जयंत सर, माहितीपुर्ण लेखन आवडलं.

श्रीरंग_जोशी's picture

13 Oct 2012 - 8:57 am | श्रीरंग_जोशी

इराणमधल्या पूर्वजांच्या कल्पकतेला सलाम!!
अन या माहितीपूर्ण लेखाबद्दल अनेक आभार.
अमेरिकेतील बरेच लोक बाल्कनीमध्ये बर्ड फीडर लटकवून ठेवतात व नेमाने त्यात पक्ष्यांचे खाद्य भरत असतात.

प्रभाकर पेठकर's picture

13 Oct 2012 - 10:16 am | प्रभाकर पेठकर

इजिप्तमध्ये (बाजूच्या खेड्यांमधून) आजही असे कबुतरखाने दिसून येतात. ते वापरातही आहेत. आमच्या टूरिस्ट टॅक्सीवाल्याने 'कबुतरांची विष्ठा खत म्हणून वापरात येते' असे सांगितले होते.

बाकी वरील सर्व माहिती तपशिलवार आणि नाविन्यपूर्ण आहे. धन्यवाद.

वपाडाव's picture

13 Oct 2012 - 5:37 pm | वपाडाव

http://www.darkroastedblend.com/2008/09/unique-pigeon-towers-of-iran.html
ह्या लिंकवर गेल्यास जगभरात अजुनही ठिकाणची कबुतरांसाठी बांधण्यात आलेली टॉवर्स पाहायला मिळतील...

पैसा's picture

13 Oct 2012 - 9:15 pm | पैसा

अद्भुत कथा म्हणावे अशीच उत्तम माहिती! कबुतरांना खायला न घालता खत मिळवणारा तो राजा भारी हुषार म्हटला पाहिजे. फक्त एका वर्षाने ही इमारत उघडणार्‍या कामगारांची दया येते! :D

मालोजीराव's picture

13 Oct 2012 - 9:29 pm | मालोजीराव

कबुतर जा जा जा !!!
अस म्हणायला नको आता ;)
.

राही's picture

13 Oct 2012 - 11:22 pm | राही

इराणच्या या शाह अब्बास राजाविषयी असे वाचनात आले होते की हा राजा अतिशय दयाळू,न्यायी,कर्तव्यदक्ष आणि हुशार होता.त्याने अनेक लोकोपयोगी कामे केली.तो इतका लोकप्रिय होता की पुढे कोणी एखाद्याने काही चांगले काम केले की त्याला शाह अब्बासची उपमा दिली जाऊ लागली.पुढे पुढे अशा माणसाला शाह अब्बासच म्हटले जाऊ लागले. त्याचेच लघुरूप म्हणजे आताचे शाब्बास.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Oct 2012 - 8:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाब्बास या शब्दाचा प्रवास माहिती नव्हता, धन्स.

-दिलीप बिरुटे

माझीही शॅम्पेन's picture

14 Oct 2012 - 8:41 pm | माझीही शॅम्पेन

जबरा ...माहिती मुळ लेखात अणि इथे पण

शाब्बास ! राही !!!!

स्पंदना's picture

15 Oct 2012 - 5:40 am | स्पंदना

अरे वा! शाब्बास राही!

शिल्पा ब's picture

14 Oct 2012 - 8:31 am | शिल्पा ब

छान माहीती. लेख अन राहीचा प्रतिसाद दोन्ही आवडले.

स्पंदना's picture

15 Oct 2012 - 5:41 am | स्पंदना

भारी माहीती.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2012 - 10:54 pm | अत्रुप्त आत्मा

नविन माहिती ,,,मस्त एकदम :-)

इरसाल's picture

13 Jan 2017 - 1:41 pm | इरसाल

झालं अस की मागच्याच महिन्यात आम्ही तिघांनी एक छोटा छुपा कट्टा केला बडोद्याला. मालक साहेब, गोड मोदक आणी मी.
अश्याच गप्पा करता करता मोदकाने या धाग्याची माहिती आणी "शाब्बास"चा उगम याबद्दल ज्ञानात भर पाडली.
पाल्हाळाची गरज या साठी की मागच्या आठवड्यात कंपनी मधे आमच्या कस्टमरच्या प्रतिनिधींकडुन त्यांना पुरविल्या जाणार्‍या मालाचे इन्स्पेक्षन होते. दोन इराणीयन होते.(म्हटलं बरे सापडले तावडीत, जातील कुठे) तर २ दिवसाच्या इन्स्पेक्षन मधे पहिला दिवस साळसुदपणे काढला. दुसर्या दिवशी विचारले, बाबा रे शाह अब्बास...तुमचा जुन्या काळातला राजा....माहित आहे का? इस्फहान वगैरे.......तर म्हणे हो त्याचा राजवाडा अजुन आहे आणी पब्लिकला ओपन आहे. तर म्हणे त्याच काय. तु गेलास काय इस्फहान ला ? म्हटल नाही.
मग सांगितलं की भारतात कोणाचेही एखाद्या चांगल्या कामासाठी कौतुक करायचे असेल पाठीवर थाप वगैरे देवुन तर आम्ही....आम्ही हं.....शाब्बास असा शब्द वापरतो.
त्याला विश्वासच बसेना मग त्याला बोल्लो त्याच्या मागे एक स्टोरी आहे तुला सांगतो असं म्हणुन मोदकाकडुन ऐकलेली गोष्ट त्याला सांगितली भाऊ जाम खुष म्हणे असं आहे.. म्हटलं हो.
मग पुढचा दिवस त्याने मशिन्स वर काम करणार्‍या वर्कर्स च्या पाठीवर हळुवार दनके देत सुरुवातीला शाह अब्बास शा अब्बास करत करत शाब्बास वर पोहोचला.

इरसाल's picture

13 Jan 2017 - 1:43 pm | इरसाल

गुगलवर त्याला ह्या धाग्याचे हे फोटो पण दाखवले, म्हणे येस येस हेच ते, बाजुला लिहीलेली मराठी त्याच्या साठी काअभैब.

एस's picture

13 Jan 2017 - 3:56 pm | एस

भारीच.

vikrammadhav's picture

8 Feb 2017 - 10:51 am | vikrammadhav

खूपच चांगली माहिती मिळाली लेखातून !!
आणि शाब्बास बद्दल सुद्धा !!!