मिपाचा पंचवर्षीय वाढदिवस नुकताच साजरा झाला.....
त्यानिमित्ताने अलिकडे उंबराचे फूल झालेल्या बर्याच लेखकांनी लेखनाची हौस पुरवून घेतली!! ;)
मिपामालकांनीही माळा साफ करावा तसं संस्थळ साफ आणि अद्ययावत करायचं बरेच दिवसांचं पेंडिंग काम उरकून घेतलं....
सगळं काही मस्त झालं, अपवाद एकच!
देवनागरीत टाईप करताच येईना हो!!!!
:(
धागा काढतांना, व्यनि पाठवतांना, आणि वरताण म्हणजे लोकाच्या खवत लिहिण्याचा आमचा मुख्य उद्योग करतांना देवनागरीत लिहायचा प्रयत्न केला कि रोमन अक्षरं उमटायची.....
भाषा बदला मध्ये जाऊन शंभरवेळा मराठी/ इंग्रजी टॉगल करून पाहिलं, पण मिपा ढिम्म्!!!
शेवटी कोकिळा जशी कावळीच्या घरट्यात अंडी घालते त्याप्रमाणे आधी गमभन वर जाऊन तिथे लिखाण करायचं आणि मग ते इथे कॉपी-पेस्ट करायवं असा द्राविडी प्राणायाम करायची वेळ आली....
मालकांना विचारलं की हे काय गौडबंगाल? तर त्यांनी उत्तर दिलं की हे उर्ध्वश्रेणीचं वरण आहे म्हणून!!!
आधी वाटलं की हा थट्टा करतोय!!!
किंवा पिडांकाकांच्या खात्याचा ठरवून गेम केलेला दिसतोय!!
पण माणूस मुळात अतिशय सालस आहे ही खात्री असल्याने मलाच काही घंटा कळलं नसावं अशी समजूत करून घेतली झालं!!!
नंतर हा प्रश्न फक्त मलाच पडलेला नसल्याची खात्री देणार्या खरडी व्यनि यायला लागले....
एका ताईने विंग्रजीतून 'मला मराठीत का लिहिता येत नाहिये?' असं विचारलं....
तिला सांगितलं की बहुतेक पराने तुझ्या खात्यात व्हायरस घुसवला असेल!!! :)
नाहीतरी आजकाल मिपावर काहीही धुमशान झालं की परावर त्याचा आळ घ्यायची फॅशन आहेच!! ;)
पण मिपावर देवनागरीत लिहिता येऊ नये म्हणजे पंचाईतच की!!!
एकतर आम्हाला रोमन लिपित लिहिलेलं मराठी वा हिन्दी चट्कन वाचता येत नाही. Tere mere samane किंवा mai tulasi tere aamgana ki वगैरे वाचायला लागलं की आमच्या तोंडून शिव्यागाळी बाहेर पडतात!!!
पण अहो त्या शिव्यांनाही रोमन लिपीत तो जोर नाही हो!!
आम्ही च्यामायला असं लिहिलं तर ते chyamayalaa असं उमटायचं...
आता हे आमच्या पेठकरकाकांना वाचून समजणार कसं आणि त्याबद्दल ते आमचा निषेध करणार कसा?
सगळाच गोंधळ!!
हे उर्ध्वश्रेणीचं वरण आता आंबट वरण लागायला लागलं होतं!!!
:)
शेवटी हा सगळा वैताग व्यक्त करायला (आणि जमल्यास त्याची टंचनिका निरखायला) पराच्या खरडवहीत गेलो...
पण टंचनिका गायब!
पराला जाब विचारला तर तो म्हणतो की धाग्यावर जरी फोटो टाकता येत असले तरी खव मध्ये टाकता येत नाहीयेत. कारण हेच!
आता मात्र ह्या उर्ध्वश्रेणीच्या आंबट वरणाचा भलताच राग आला!!!
म्हणजे धाग्यांवर चित्रविचित्र पदार्थांचे, पानाफुलांचे, विक्षिप्त ठिकाणांचे फोटो बघायला लागतात आणि खवमध्ये टंचनिका बघायची बंदी! अगदी घासूगुर्जींच्या खवमधली ती शिंक आलेली मधुबालासुद्धा गायब!! हा म्हणजे शुद्ध अन्याय झाला!!!!
आणि हे उर्ध्वश्रेणीचं आंबट वरण आम्ही ओरपायचं तरी किती दिवस? याला काही शेवट आहे की नाही?
शेवटी जर आज मराठीत टाईप करता आलं नाही तर पुढले काही दिवस मिपावर यायचंच नाही असा निर्धार करून आज मिपावर लॉगइन केलं....
बघतो तर पराचा निरोप! देवनागरीतून मराठी लिहिता येतंय म्हणून!!
काय आनंद झालाय म्हणता! त्या आनंदाला वाट करून देण्यासाठी हे प्रकटन!!
:)
मिपामालकांचं अभिनंदन!
आता जरा त्या खवमध्ये फोटो टाकायची सुविधाही सुरू करा...
म्हणजे पराच्या खवला भेट द्यायला बरं!!!!
;)
प्रतिक्रिया
3 Oct 2012 - 11:35 pm | प्रास
अगदी अगदी!
पिडांकाका, अगदी मनातलं बोललात.
नुकतंच "उर्ध्वश्रेणीकरणातलं मिपा पूर्वीच्या सर्व सोयी पुन्हा देओ" यासाठी रवळनाथाला गार्हाणं घालून आलो आहे याची उर्ध्वश्रेणीकारकांनी नोंद घ्यावी.
3 Oct 2012 - 11:43 pm | इन्दुसुता
ही ही ....
बाकी टंचनिकांचे ( नाही नाही आम्ही तसल्या नाही, आम्हाला टंचनिक ( अनेक वचन टंचनिकच असावे ... असो त्या अनेक टंचनिकांचे फोटो येथे अभिप्रेत आहेत.. गैरसमज नसावा ) फोटो कुठल्या खवत बघायला मिळतिल तेवढं बरीक आम्हाला अजून कळालेलं नाहीय ( म्हणून पिंडां चा आणि पराचा दोघांचेही निषेध हो... ) :)
स्वगत : मिपा महिलां मध्ये कोण बरे आघाडीवर असावे?
3 Oct 2012 - 11:45 pm | कपिलमुनी
रवळनाथाकं :)
3 Oct 2012 - 11:45 pm | चिंतामणी
त्यात हळू हळू फोडणी, मसाले, मीठ पडत आहे हो.
जरा दमाने घ्या.
लेखन आवडले.
4 Oct 2012 - 12:08 am | विकास
>>>देवनागरीत लिहायचा प्रयत्न केला कि रोमन अक्षरं उमटायची..... <<<
तुर्तास "टाईप अॅज रोमन्स डू" :-) आणि जरा अंमळ पेशन्स राहुंदेत, तसा रहात नसेल तर (आज ऑक्टोबर २ नाही तरी देखील) शांतीपूर्ण निषेध म्हणून दरोज किमान एक रोमन लिपितून टंकलेला मराठी निरोप सरपंचांना पाठवा! ;) (स्वगतः आता मला मिपावरून गाशा गुंडाळावा लागणार :( )
तसे देखील ( + मास नसल्याने) पुढच्या वर्षी गणपती लवकर येणार आहेत त्यामुळे उर्ध्वउर्ध्वश्रेणीकरण लवकरच होईल! कल्जी नसावी! :-)
4 Oct 2012 - 12:21 am | नंदन
आंबट वरणाची पाककृती आवडली, या वीकांताला नक्की करून पाहीन ;)
बाकी 'उर्ध्व लागणे' हा वाक्प्रचार कुठून आला असावा, असा प्रश्न तूर्तास पडला आहे :D
4 Oct 2012 - 1:39 am | Nile
पाककृती अंडं घालून करायची की न घालता? ;-)
म्हणजे पाककृतीत अंडं घालून बरंका...
4 Oct 2012 - 4:56 pm | मैत्र
--^--
कोटीभास्कर नंदन यांना दंडवत..
इथे हसून हसून उर्ध्व लागण्याची परिस्थीती आली..
झक्कास पाकृ पिडां काका..
गमभन टूलबार वापरून देवनागरी चालवत होतो इतके दिवस.. तेही थांबेल आणि आम्हालाही पराच्या सौंफु ची लवकरच झलक मिळेल असे दिसतेय.
4 Oct 2012 - 12:34 am | राजेश घासकडवी
उगाच काहीतरी तक्रारी करण्याबद्दल पिवळा डांबिसकाकांचा विरोध. कोल्ह्याला उर्ध्वश्रेणीचं वरण आंबट, यातली ही गत असावी.
मला उर्ध्वश्रेणीकरण झाल्यापासून एकदाही खरडवहीत मराठी लिहायला त्रास झाला नाही. इन्स्क्रिप्ट वापरण्याचे फायदे हे असे असतात.
आणि आमच्या मधुबाला शिंक येणारी म्हटल्याबद्दल डब्बल निषेध. तिच्यासारखी सुंदर स्त्री आत्तापर्यंत झाली नाही, आणि पुन्हा होणार नाही. तेव्हा तिच्या सुंदर चित्राविषयी असले अनादरी उद्गार कदापिही चालवून घेणार नाही. आम्ही लवकरच एक 'मधुबाला ब्रिगेड' स्थापन करून तिला शिंक येणारी, तिरळी वगैरे विशेषण लावणाऱ्यांना त्यांचे शब्द मागे घ्यायला लावणार आहोत.
4 Oct 2012 - 9:09 am | सोत्रि
>> आमच्या मधुबाला शिंक येणारी म्हटल्याबद्दल डब्बल निषेध. तिच्यासारखी सुंदर स्त्री आत्तापर्यंत झाली नाही, आणि पुन्हा होणार नाही. तेव्हा तिच्या सुंदर चित्राविषयी असले >> अनादरी उद्गार कदापिही चालवून घेणार नाही.
प्रचंड सहमत!
- ( मधुबाला ब्रिगेडी ) सोकाजी
4 Oct 2012 - 11:20 am | कवितानागेश
तिच्यासारखी सुंदर स्त्री आत्तापर्यंत झाली नाही, आणि पुन्हा होणार नाही>>
याच्याशी सहमत.
पण काय सुंदर स्त्रीनी शिंकू देखिल नये?????????????
ती सुंदर आहे हा काय तिचा दोष झाला, की स्त्री आहे का, की दोन्ही? ????????
कशीही असली तरी प्रत्येक स्त्रीला एक माणूस म्हणू जन्मतःच शिंकायचा अधिकार आहे.
(म्हणजे अधिकार जन्मतः आहे, जन्मतःच शिंकायला सुरुवात करावी असे नाही. ते सौंदर्यावर ठरते म्हणे!!)
पण काय एका स्त्रीनी साधे शिंकायचे देखिल नाही???
हा सरळसरळ स्त्रियांवर अन्याय झाला.
तुमच्या या असल्या कसल्यातरीच वृत्तीचा टिब्बल निषेध!
खबरदार! यानिमित्त तुमच्या खवमध्ये लवकरच एक शिंकमोर्चा आणण्यात येइल!
:D
पुरे आता......
4 Oct 2012 - 1:57 am | प्रभाकर पेठकर
>>>>च्यामायला असं लिहिलं तर ते chyamayalaa असं उमटायचं...
आता हे आमच्या पेठकरकाकांना वाचून समजणार कसं आणि त्याबद्दल ते आमचा निषेध करणार कसा?
च्यामायला!.... उगीच?
4 Oct 2012 - 6:08 am | सहज
पण काकांचा बिचारा रॉमनी आज ओबामाला कोपच्यात घेणार होता ह्या मुद्यावरुन पण तिकडच्या विठोबाच्या मदतीला मिपाचा कान्हा धावला म्हणायचा!!!
शिंक आलेली घासुबाला खासच!!
4 Oct 2012 - 6:55 am | राही
थोडसं पातळ झालंय खरं पण जरा रटरटवल्यावर होईल मनासारखं. पूर्वीच्या तिखटजाळापेक्षा हे बरं.
4 Oct 2012 - 7:12 am | चौकटराजा
हे नवीन मिपा करणं वगैरे ठीक पण तिथं ज्यामायला, च्यामायला, तेजायला, आरं तिच्या मारी, आय्चा घो, पुलेशू पुकशु येउ द्या आणखी , खी: खी: बाबो, ब्वॉ , ब्वॉर ई
मर्हाटी व्यापारचिन्हे दिसंनात म्होन लई वंगाळ वाटंत हुतं !
4 Oct 2012 - 9:22 am | ज्ञानराम
शिंक आलेली घासुबाला खासच!! >>>>>
4 Oct 2012 - 9:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पिडाशेठ, व्यवस्थेविरुद्ध सौम्य शब्दात लिहिल्याबद्दल आभारी. शिंक आलेली घासुबाला तर केवळ उच्च. :)
बाकी, उर्ध्वश्रेणीच्या आंबट वरणानं माझी तब्येत पार डाऊन आहे. (गेलं संपादकपद आता) कोणाशी बोलावं वाटत नाही, तोंडाला चव नसल्यासारखं झालं आहे. फ्रेशही होत नाही आणि फ्रेशही वाटत नाही. सारखं आंबट वरणाच्या करपट ढेकरी. सारखं डोकं धरलंय. पण, माझं दैवं चांगलं आहे. काल गणेशाला साकडं घातलं. '' बाबा रे हे काय आहे'' वाटल्यास पुढच्या मंगळी चतुर्थीपासून उपवास धरीन पण मांगा था क्या और मिला क्या ?
शेवटी काल स्वप्नात गाढवाच्या लग्नातला सावत्या कुंभार आला. दृष्टांतच म्हणा. आणि त्यानं जय-विरुनं बांधलेली पूर्वीची सातताळी इमारत दाखवली तेव्हा काल पासून जरा बरं वाटतंय.
-दिलीप बिरुटे
4 Oct 2012 - 10:57 am | सुहास..
शिंक आलेली मधुबाला >>
=)) =))
आयच्या गावात आणि बाराच्या भावात
4 Oct 2012 - 12:00 pm | स्वाती दिनेश
पाकृ आवडली, ;)
स्वाती
4 Oct 2012 - 12:48 pm | गणपा
पिडांकाकांच्या भावनांशी सहमत. :)
शिंक आलेली घासुबाला >>
=))
कोटी बहाद्दर नंदुशेटला साष्टांग _/\_ दंडवत.
(उर्ध्वश्रेणी का मारा) गणा. ;)
4 Oct 2012 - 1:10 pm | श्रावण मोडक
संक्षीप्त धावफलक शैलीत वीरेंद्र सेहवाग २२ चेंडूत २५ धावा! :-)
4 Oct 2012 - 4:13 pm | अत्रुप्त आत्मा
अता टूलबॉक्स लवकर येवो,,आणी अमचे स्मायल्या टाकण्याचे हालं(ही) दूर होवोत :-)
@घासूबाला >>> नंदनला आमचे वंदन --^--
4 Oct 2012 - 4:25 pm | सस्नेह
आम्हालापण बघायची आहे शिंक आलेली घासुबाला ...
कुणीतरी लवकर आंबट वरणात गूळ घाला..
4 Oct 2012 - 4:36 pm | अत्रुप्त आत्मा
@कुणीतरी लवकर आंबट वरणात गूळ घाला.. >>>
4 Oct 2012 - 6:22 pm | गणपा
गुळ घातला वाटत. ;)
4 Oct 2012 - 6:58 pm | सूड
गूळ नाय वो, लाल मिरचीची चांगली चरचरीत फोडणी दिसत्ये. मस्त !!
4 Oct 2012 - 5:23 pm | पैसा
पिडां काकांची पाकृ आणि त्यावरचे प्रतिसाद वाचून माझी पण मरगळ दूर झाली. काल मला पण बाप्पूंचा दृष्टांत झाला आहे आणि तुम्हा सगळ्यांचं आवडतं मिपा आत येऊ का म्हणत दारात उभं आहे असं ज्ञान झालं. तेव्हा इतके दिवस धीर धरलात तसं आता ज ऽ ऽ रा थांबा. तुमचं गार्हाणं बाप्पूंपर्यंत पोचलं आहे याची खात्री बाळगा!
4 Oct 2012 - 6:29 pm | चौकटराजा
हिरवी पालक पनीर जाऊन अस्सल कोल्हापुरी तर्री आणल्याबद्द्ल मालक, आभारी आहे.
4 Oct 2012 - 6:51 pm | अत्रुप्त आत्मा
++++++++१११११११११११११११ भरपूर सहमती.........
आणी नीलकांत/प्र-शांत >>> तुमचे प्रचंड आभार...
ए....धत्तड तत्तड ..ए....धत्तड तत्तड ..ए....धत्तड तत्तड ..
नाचो..........
मुख्य म्हणजे टूलबॉक्स सुरू होऊन,आमच्या स्मायल्यांचे सहजागमन करवले....... त्याबद्दलंही थांकू...
=========================================================================
स्मायल्या माझ्या मी स्मायल्यांचा...
4 Oct 2012 - 7:09 pm | प्रभो
सो मालक, हजर सभासद च्या लिंक वर गेल्यास हजर सभासद दिसत नाहीत. :)
@पिडां काका : मस्त लिवलंय!!
6 Oct 2012 - 11:45 pm | आशु जोग
मराठी लिहीताना अक्षरे एकमेकात 'मिसळपाव'तात
(मिसळतात) त्यावर काही उपाय
उदा मरमराटठेी
7 Oct 2012 - 12:15 am | आशु जोग
'उर्ध्व लागणे' == कालचा गोंधळ बरा होता