दातात अडकलेला सुपारीचा तुकडा किंवा आंब्याचा धागा किंवा कच्चट साबुदाणा जसा माफक पीडा देतो तशी डोक्यात त्या त्या वेळी बसलेली गाणीही..
.. जिभेने दाढ टोकरुन टोकरुन त्या अडकलेल्या तुकड्याला स्पर्श करत राहण्याची मंत्रचळसदृश इच्छा आवरता येत नाही...
तसंच आपल्या मनात कोणत्याही प्रसंगी एक नवंजुनं गाणं वाजत असतं तेही टोकरुन बाहेर निघत नाही. मनात वाजतानाचा त्याचा व्हॉल्यूम किती असतो ते नक्की सांगता येत नाही पण बर्याचदा मोकळीक मिळाली की ते तोंडातून बळकबळक बाहेरही पडत राहतं.
चिवित्रपणा असा की हे गाणं नेहमीच मधुर, सुरेल, अर्थपूर्ण(.. अर्थघन किंवा आशयघन म्हणू जडपणा हवा असेल तर..) असेल असं मुळ्ळीच नाही.
माझा एक घट्टमित्र त्याच्या हनीमूनला गेला तेव्हा नव्याकोर्या बायकोसोबत फिरताना, उठताबसता , काव्यशास्त्रविनोद करताना अधेमधे , सनसेट पॉईंटवर उभे असताना अशा सर्वस्थळीकाळी "दो बकेट पानी अब बचाना है रोजाना.." या ओळी गुणगुणत होता. बायको डिप्रेस झाली. पण तो तरी काय करेल बिचारा.. गाणं अडकलं होतं.. कॉन्स्टिपेशन.
माझ्या घरी माझ्या बाबांच्या मृत्यूनंतर उडालेल्या नातेवाईकसंमेलनात मी बरीच कामं करत होतो. अत्यंत गंभीर वातावरण होतं आणि मीही खूप म्हणजे खूप दु:खात होतो. तरीही.. तरीही.. त्यावेळेला त्रिदेव म्हणून जो देमारपट चालू होता त्यातलं "रातभर जाम से जाम टकरायेगा" हे गाणं उनदिनोंमे माझ्या डोक्याच्या आत घुमत होतं. त्या गाण्याची आठवणही आता भयानक वाटते.
परिस्थिती आणि मनात वाजणारी सीडी यात काडीमात्र संबंध नसतो असाच अनुभव आहे. हल्लीच पोराच्या शाळेत एकास एक तत्वावर असलेल्या शिक्षकपालक मीटिंगमधे बिचारी शिक्षिका काहीतरी सिरियसली सांगत होती आणि आमच्या टाळक्यात "अ अण्टे अमलापुरम.. आ अण्टे आहापुरम..."
..भेंडी... म्यूट करण्याचीही सोय नाही.
रेडी किंवा तत्सम सलमानपटात खिशात हात घालून कुल्ल्यांना अवघड झटका देत "झिंकचिका झिंकचिका ए ए ए ए" अशी रचना होती. मी सामान्य मर्यादेतला संसारी पुरुष असल्याने मी अर्थातच असले सिनेमे बघतो. हा सिनेमा बघून नेमकं हेच गाणं टाळक्यात अडकलं. थिएटरमधून बाहेर पडतानापासून पुढचे चार्पाच दिवस विचारगृहापासून व्हिडिओ कॉन्फरन्सपर्यंत सर्व स्थळीकाळी डोचक्यात "झिंकचिका झिंकचिका ए ए ए ए"..... .. कधीकधी तोंडातून बाहेरही ओघळायला लागलं..
बरं हे चीप फालतू बकवास गाणं आपल्याला अजिब्बात आवडलेलं नाहीये अशी अंतर्मनाची समजूत असल्याने असलं गाणं चारचौघांत तोंडातून आलं की ओशाळवाणेपणाने मी खिशातून रुमाल काढून तोंड पुसून घ्यायचो..
डोक्यात बसलेलं गाणं तथाकथित फालतूच असलं पाहिजे असं नाही.
पुण्यात एकटाच राहात होतो त्या काळात संध्याकाळी विशेषतः पावसाळी हवेत अमर्याद फिरताना मनात सोनू निगमचं "दीवाना" गाणं घुसलं होतं..तसा स्थळकाळाशी आणि वातावरणाशी थेट संबंध नाही पण ते गाणं त्या परिसराला आणि हवामानाला चिकटलं. आता तेराचौदा वर्ष होऊन गेली पण पुण्याच्या आळंदी रोड, विश्रांतवाडी, विमानतळ, लोहगाव परिसरातल्या ओल्या पावसात आणि बोचर्या पण तरुण थंडीत जाण्यासाठी मला डिझेल आणि वेळ खर्च करावा लागत नाही. फक्त कानात "दीवाना"ची एमपीथ्री लावावी लागते.
मी एकेकाळी विमान उडवण्याचं शिक्षण घेतलं होतं.. तेव्हा यथावकाश बरंच झगडून मला पहिला सोलो मिळाला. एकट्याने पहिलं उड्डाण करून मी उंचावर पोहोचलो आणि थरथरत खाली पाहिलं तेव्हा माझ्या मनात "लेमन ट्री" गाणं वाजत होतं. आजही लेमन ट्री लावलं की मी त्याच पहिल्या उड्डाणाच्या एकांत हुरहुरीसकट तीन हजार फुटांवरुन मेटुर धरणामागच्या प्रचंड जलाशयाच्या मधोमध जाऊन गोल फेरी मारुन येतो...गर्द हिरव्या पाण्याची गहराई पाहात.. थरथरत..
पुण्यात विश्रांतवाडीकडून एअरपोर्टकडे जाणारा रस्ता तेरा चौदा वर्षांपूर्वी एकदम शांत होता. अगदी शुकशुकाट. अशा रस्त्यावर मी पहाटे उठून एअरपोर्टकडे ग्राउंड ड्यूटीवर जायला निघायचो. वाटेत एक टपरीवजा हॉटेल होतं. त्या परिसरात भल्या पहाटे खायला मिळण्याची ती त्याकाळातली एकमेव सोय होती. गरम सांबार, वाफाळणार्या इडल्या, कुरकुरीत वडे आणि टेसदार चटणी.. या सर्वांसोबत सर्वात महत्वाची बॅचलरसुलभ पहाटभूक..
तर हा हॉटेलवाला अन्नदाता महिनोनमहिने एकच कॅसेट वाजवायचा. अष्टविनायकाची..
सांबाराच्या विशिष्ट चवीचा चटका, इडलीची त्यात चाललेली आंघोळ, चरचरीत थंड हवा, आणि भूक शांत होत चालल्याच्या अत्यंत सुखद फीलिंगसोबत कानात "बालभक्तालागी तूचि आसरा.. पालीच्या पालका, गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा.. जयदेव जयदेव.." ...शांत शांत.. शांत..
विलक्षण गोष्ट अशी की देवाच्या भानगडीत अजिबात नसलेला मी आता हे गाणं आवर्जून कारमधे लावतो आणि जिथे असीन तिथे विश्रांतवाडीची इडली, थंडी अन तो शांत क्षुधातृप्तीचा क्षण चाखतो.. रेकॉर्ड झालंय सगळं गाण्यासोबत मनात.
संथ आवाजातलं चरचरतं वंदे मातरम ऐकू आलं की देशाविषयी विचार न येता मी थेट रत्नागिरीतल्या सहावीतल्या माझ्या वर्गात पोहोचतो. ढगाळ संध्याकाळ.. फक्त वंदे मातरमची रेकॉर्ड संपली की शाळा सुटणार असते.. पण तेवढ्यावर सुटका नसते.. मी आणि केळकर वंदे मातरमला खूप घाबरतो. त्यावेळची स्तब्धता आम्हाला फिस्स करुन हसवते.. मग शेलार सर म्हणतात "तुम्ही दोघे थांबा.. बाकी सगळे जा".. नंतर साट्साट पट्टीचे तडाखे खाऊन झोंबत्या पंजांना कुरवाळत मागच्या पायवाटेने बाहेर पडायचं..
आज वंदे मातरम कुठे शांतपणे सुरु झालं की शेलारसर आणि केळकर दोघेही भेटतात.. पंचवीसतीस वर्षांनीही ..जस्से तेव्हा होते तस्सेच ..
प्रतिक्रिया
10 Aug 2012 - 2:03 am | खालिद
गवि,
सहावी (ब?) शेलार सर म्हणजे शिर्के हायस्कूल का?
10 Aug 2012 - 4:25 am | बाळ सप्रे
गवि,
अगदी अगदी मनातल आहे ... नस पकडलीय बरोबर ..
17 Aug 2012 - 10:03 am | दिपक
सुंदर लिखाण. परत परत वाचावासा वाटणारा. लेख वाचुन मनात अडकलेल्या गाण्यांची आणि त्याला निगडीत प्रसंगाची उ़जळणी झाली..
धन्यवाद गवि.
17 Aug 2012 - 1:24 pm | llपुण्याचे पेशवेll
झक्कास लेख. रातभर जामसे जाम टकरायेगा बद्दलची आठवण तर झक्कास. आम्ही अजाणत्या वयात ते गाणे पाहीले होते. नंतर पुन्हा जरा मोठा झाल्यावर ते गाणे पाहीले आणि ते डोक्यात बसले. :)
असेच कधीतरी ते उफाळून वर येते.
चायला त्या रेडीओवरची सरकारी गाणी पण मधेच कधीतरी उफाळून येतात. असतात एकतार भंगार आणि टुकार गाणी तरीही कशी काय डोक्यात जाऊन बसतात कोणास ठावूक.
ती एक रेडीओवरची जाहीरात "मला हो आणा तथास्तुची पैठणी" ही पण उगाच डोक्यात राहून कधीही उफाळून येते. :(
23 Mar 2016 - 1:11 am | गामा पैलवान
गवि,
तुम्ही कसले मनकवडे आहात हो. मनाचा नेम धरून नेमका रंग पकडता. मनकवडा यालाच म्हणतात ना?
माझ्या डोस्क्यात अशी गाणी रुतून बसली आहेतंच. शिवाय गाणी (मनातल्या मनात) भलत्याच चालीत म्हणून बघायचा आचरट छंद होता. त्यामुळे काही गाणी हास्यास्पद प्रकारे ओठांवर येतात. उदा. 'लकडीकी काठी' हे गाणं 'दम मारो दम' च्या चालीवर घट्टपणे स्मरणात आहे. 'रिमझिम गिरे सावन' आणि 'दोस्त दोस्त ना रहा' ही गाणी एकमेकांच्या चालीत घुसून राहिलीयेत! तर 'चेहरा है या चांद खिला है' हे सागरमधलं ऋषी कपूर व डिंपलचं गाणं पोवाड्याच्या चालीवर मनाच्या चिखलात फसून बसलंय.
आ.न.,
-गा.पै.