दातात अडकलेला सुपारीचा तुकडा किंवा आंब्याचा धागा किंवा कच्चट साबुदाणा जसा माफक पीडा देतो तशी डोक्यात त्या त्या वेळी बसलेली गाणीही..
.. जिभेने दाढ टोकरुन टोकरुन त्या अडकलेल्या तुकड्याला स्पर्श करत राहण्याची मंत्रचळसदृश इच्छा आवरता येत नाही...
तसंच आपल्या मनात कोणत्याही प्रसंगी एक नवंजुनं गाणं वाजत असतं तेही टोकरुन बाहेर निघत नाही. मनात वाजतानाचा त्याचा व्हॉल्यूम किती असतो ते नक्की सांगता येत नाही पण बर्याचदा मोकळीक मिळाली की ते तोंडातून बळकबळक बाहेरही पडत राहतं.
चिवित्रपणा असा की हे गाणं नेहमीच मधुर, सुरेल, अर्थपूर्ण(.. अर्थघन किंवा आशयघन म्हणू जडपणा हवा असेल तर..) असेल असं मुळ्ळीच नाही.
माझा एक घट्टमित्र त्याच्या हनीमूनला गेला तेव्हा नव्याकोर्या बायकोसोबत फिरताना, उठताबसता , काव्यशास्त्रविनोद करताना अधेमधे , सनसेट पॉईंटवर उभे असताना अशा सर्वस्थळीकाळी "दो बकेट पानी अब बचाना है रोजाना.." या ओळी गुणगुणत होता. बायको डिप्रेस झाली. पण तो तरी काय करेल बिचारा.. गाणं अडकलं होतं.. कॉन्स्टिपेशन.
माझ्या घरी माझ्या बाबांच्या मृत्यूनंतर उडालेल्या नातेवाईकसंमेलनात मी बरीच कामं करत होतो. अत्यंत गंभीर वातावरण होतं आणि मीही खूप म्हणजे खूप दु:खात होतो. तरीही.. तरीही.. त्यावेळेला त्रिदेव म्हणून जो देमारपट चालू होता त्यातलं "रातभर जाम से जाम टकरायेगा" हे गाणं उनदिनोंमे माझ्या डोक्याच्या आत घुमत होतं. त्या गाण्याची आठवणही आता भयानक वाटते.
परिस्थिती आणि मनात वाजणारी सीडी यात काडीमात्र संबंध नसतो असाच अनुभव आहे. हल्लीच पोराच्या शाळेत एकास एक तत्वावर असलेल्या शिक्षकपालक मीटिंगमधे बिचारी शिक्षिका काहीतरी सिरियसली सांगत होती आणि आमच्या टाळक्यात "अ अण्टे अमलापुरम.. आ अण्टे आहापुरम..."
..भेंडी... म्यूट करण्याचीही सोय नाही.
रेडी किंवा तत्सम सलमानपटात खिशात हात घालून कुल्ल्यांना अवघड झटका देत "झिंकचिका झिंकचिका ए ए ए ए" अशी रचना होती. मी सामान्य मर्यादेतला संसारी पुरुष असल्याने मी अर्थातच असले सिनेमे बघतो. हा सिनेमा बघून नेमकं हेच गाणं टाळक्यात अडकलं. थिएटरमधून बाहेर पडतानापासून पुढचे चार्पाच दिवस विचारगृहापासून व्हिडिओ कॉन्फरन्सपर्यंत सर्व स्थळीकाळी डोचक्यात "झिंकचिका झिंकचिका ए ए ए ए"..... .. कधीकधी तोंडातून बाहेरही ओघळायला लागलं..
बरं हे चीप फालतू बकवास गाणं आपल्याला अजिब्बात आवडलेलं नाहीये अशी अंतर्मनाची समजूत असल्याने असलं गाणं चारचौघांत तोंडातून आलं की ओशाळवाणेपणाने मी खिशातून रुमाल काढून तोंड पुसून घ्यायचो..
डोक्यात बसलेलं गाणं तथाकथित फालतूच असलं पाहिजे असं नाही.
पुण्यात एकटाच राहात होतो त्या काळात संध्याकाळी विशेषतः पावसाळी हवेत अमर्याद फिरताना मनात सोनू निगमचं "दीवाना" गाणं घुसलं होतं..तसा स्थळकाळाशी आणि वातावरणाशी थेट संबंध नाही पण ते गाणं त्या परिसराला आणि हवामानाला चिकटलं. आता तेराचौदा वर्ष होऊन गेली पण पुण्याच्या आळंदी रोड, विश्रांतवाडी, विमानतळ, लोहगाव परिसरातल्या ओल्या पावसात आणि बोचर्या पण तरुण थंडीत जाण्यासाठी मला डिझेल आणि वेळ खर्च करावा लागत नाही. फक्त कानात "दीवाना"ची एमपीथ्री लावावी लागते.
मी एकेकाळी विमान उडवण्याचं शिक्षण घेतलं होतं.. तेव्हा यथावकाश बरंच झगडून मला पहिला सोलो मिळाला. एकट्याने पहिलं उड्डाण करून मी उंचावर पोहोचलो आणि थरथरत खाली पाहिलं तेव्हा माझ्या मनात "लेमन ट्री" गाणं वाजत होतं. आजही लेमन ट्री लावलं की मी त्याच पहिल्या उड्डाणाच्या एकांत हुरहुरीसकट तीन हजार फुटांवरुन मेटुर धरणामागच्या प्रचंड जलाशयाच्या मधोमध जाऊन गोल फेरी मारुन येतो...गर्द हिरव्या पाण्याची गहराई पाहात.. थरथरत..
पुण्यात विश्रांतवाडीकडून एअरपोर्टकडे जाणारा रस्ता तेरा चौदा वर्षांपूर्वी एकदम शांत होता. अगदी शुकशुकाट. अशा रस्त्यावर मी पहाटे उठून एअरपोर्टकडे ग्राउंड ड्यूटीवर जायला निघायचो. वाटेत एक टपरीवजा हॉटेल होतं. त्या परिसरात भल्या पहाटे खायला मिळण्याची ती त्याकाळातली एकमेव सोय होती. गरम सांबार, वाफाळणार्या इडल्या, कुरकुरीत वडे आणि टेसदार चटणी.. या सर्वांसोबत सर्वात महत्वाची बॅचलरसुलभ पहाटभूक..
तर हा हॉटेलवाला अन्नदाता महिनोनमहिने एकच कॅसेट वाजवायचा. अष्टविनायकाची..
सांबाराच्या विशिष्ट चवीचा चटका, इडलीची त्यात चाललेली आंघोळ, चरचरीत थंड हवा, आणि भूक शांत होत चालल्याच्या अत्यंत सुखद फीलिंगसोबत कानात "बालभक्तालागी तूचि आसरा.. पालीच्या पालका, गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा.. जयदेव जयदेव.." ...शांत शांत.. शांत..
विलक्षण गोष्ट अशी की देवाच्या भानगडीत अजिबात नसलेला मी आता हे गाणं आवर्जून कारमधे लावतो आणि जिथे असीन तिथे विश्रांतवाडीची इडली, थंडी अन तो शांत क्षुधातृप्तीचा क्षण चाखतो.. रेकॉर्ड झालंय सगळं गाण्यासोबत मनात.
संथ आवाजातलं चरचरतं वंदे मातरम ऐकू आलं की देशाविषयी विचार न येता मी थेट रत्नागिरीतल्या सहावीतल्या माझ्या वर्गात पोहोचतो. ढगाळ संध्याकाळ.. फक्त वंदे मातरमची रेकॉर्ड संपली की शाळा सुटणार असते.. पण तेवढ्यावर सुटका नसते.. मी आणि केळकर वंदे मातरमला खूप घाबरतो. त्यावेळची स्तब्धता आम्हाला फिस्स करुन हसवते.. मग शेलार सर म्हणतात "तुम्ही दोघे थांबा.. बाकी सगळे जा".. नंतर साट्साट पट्टीचे तडाखे खाऊन झोंबत्या पंजांना कुरवाळत मागच्या पायवाटेने बाहेर पडायचं..
आज वंदे मातरम कुठे शांतपणे सुरु झालं की शेलारसर आणि केळकर दोघेही भेटतात.. पंचवीसतीस वर्षांनीही ..जस्से तेव्हा होते तस्सेच ..
प्रतिक्रिया
8 Aug 2012 - 4:45 pm | विसुनाना
लेख खूप आवडला.
9 Aug 2012 - 9:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेख खुपच आवडला.
परिस्थिती आणि मनात वाजणारी सीडी यात काडीमात्र संबंध नसतो
लंबर एक.
-दिलीप बिरुटे
8 Aug 2012 - 4:46 pm | सुप्रिया
सुरेख! वाचताना बर्याच ठिकाणी फिस्सकन् हसायला आलं.
8 Aug 2012 - 4:47 pm | मिरची
सही.......खरचं अशी कित्येक गाणी मनाच्या कोपर्यात अडकलेली असतात ते कधीतरी अचानकच जाणवतं....
8 Aug 2012 - 4:48 pm | प्रचेतस
अप्रतिम
8 Aug 2012 - 4:48 pm | स्पा
क्लासच
खास गविटच!!!!!!
8 Aug 2012 - 4:54 pm | मूकवाचक
+१
9 Aug 2012 - 3:09 am | नंदन
असेच म्हणतो. 'बालभक्तालागी' असंच डोक्यात कायमचं वसतीला आलेलं आहे.
9 Aug 2012 - 2:39 pm | मेघवेडा
बालभक्तालागी, डंकाविनायकारे, श्रीविघ्नेश्वरसदनशुभंकरओझरहो इ. इ.! ;)
9 Aug 2012 - 3:55 pm | सुहास झेले
यप्प... ह्येच बोलतो :) :)
8 Aug 2012 - 4:54 pm | मन१
आमचीही अशीच गोची होते. खरं तर अजूनच जास्त.
का?
कारण तुम्ही निदान शब्दच गुणगुणता. इथे आम्हाला डोक्यात घुमते ते चित्रविच्तिर संगीत.
उदा:- हम आपके है कौन मधील कुठल्ही गाणं घ्या. त्यात अशब्द कमी आहेत, संगीताची चाल जास्त.
माइनि माये मुंडॅर पे तेरी बोल रहा है कागा
जोगन हो गयी तेरी दुलारी मन जोगीसंग लागा.....
ह्यानंतर जे
ट्यां न नण्या न न न्ण्या ण्या ण्या जे येतं; त्याशिवाय अगदि गणपतीतल्या अंताक्षरीच्या स्पर्धेतही ते गाणं पूर्ण होत नाही.
ते म्युझिक आम्ही तोंडाअनच म्हणतो. पुन्हा जून अवघडाल्यासरखं होतं.
किंवा:-
ला ल्ल ला ...लै लै लै ला ल ला
ला ल्ल ला ...लै लै लै ला ल ला
डींग ट्यांग दिटँग डींग..........
असं म्हटाल्याशिवाय "दिदी तेरा देवर दीवाना" हे गाणं पूर्ण होउच शकत नाही.
शिंचं, शब्द नाही, पण हे विचित्र संगीतच त्याच्या चमत्कारिक उच्चारांसह आम्ही बोंबलत फिरतो.
लेख आवडाला हे वे सां न ल.
8 Aug 2012 - 4:55 pm | योगिरज
सुरेख!!!
8 Aug 2012 - 5:02 pm | यकु
फारा दिवसांनी गवि फॉर्मात आले ब्वॉ..
आता येऊ द्या आणखी
8 Aug 2012 - 7:19 pm | मन१
अजून येउ द्यात.
ईश्वर ही नाथ है |
8 Aug 2012 - 5:07 pm | स्मिता.
जास्त काही लिहित नाही कारण आता माझंच मन त्या अडकलेल्या गाण्यांत आणि त्यासोबतच्या आठवणीत हरवलंय.
9 Aug 2012 - 12:11 am | ढब्बू पैसा
+१ स्मिता!
गवी सुपर्ब!
9 Aug 2012 - 8:26 am | शैलेन्द्र
+१ अस्सचं..
8 Aug 2012 - 5:08 pm | आत्मशून्य
:) हे नेहमी असच होतं लहानपणी* रोजातलं रुक्मीणी रुक्मीणी अख्खं म्हणायची लय हौस (काय पण सुरेख चाल होती त्याची, वरुन बाबा सैगल व श्वेता शेट्टीचा तडाखेबंद आवाज ) पण साला घरात "र" जरी तोंडात आला तर कोण ऐकेलका भितीने हात आपोआप तोंडावर जायचे. तिच गोश्ट हाफीसात असताना सुट्टा ना मिला व GMD गाण्याची. कामाच्या तगाद्यात* दोन ओळी मनासारख्या गुण्गुणता येउ नयेत म्हणजे काय ? ;)
8 Aug 2012 - 5:09 pm | अमित
लेख आवडला
8 Aug 2012 - 5:16 pm | विजुभाऊ
असेच एक गाणे. चाल लै भारी " तेरी ** मे डंडा रे" हे गाणे अचानक घरात मोठमोठ्याने म्हणत होतो.
घरात कोणीच नव्हते तरीही हे गाणे मी घरात म्हणतो हे च मला अवघडल्यासारखे करत होते
8 Aug 2012 - 6:00 pm | sagarpdy
हे आमच्या ग्रुप मधलं "सबमिशन स्पेशल" गाणं. आठवलं कि खोलीभर पसरलेले कागद, कर-कर वाजणारा प्रिंटर आणि अजून थोडा वेग वाढवला तर निबेतून धूर निघेल अशा वेगाने कागदावर फिरणारं पेन आठवतं.
[प्रतिक्रियेत प्रथमदर्शनी दिसतो, तोच अर्थ घ्यावा, उगीच अनर्थ करू नये ]
8 Aug 2012 - 6:01 pm | बॅटमॅन
डंडा आणि भें** सुट्टा ही दोन गाणी विंजिनेरांच्या हॉष्टेलवरची राष्ट्रगीते आणि वंदेमातरम असतात.
8 Aug 2012 - 11:57 pm | मोदक
+१
;-)
9 Aug 2012 - 12:08 am | माझीही शॅम्पेन
अगदी च्यायला :)
+२
8 Aug 2012 - 9:20 pm | आत्मशून्य
इतक्या मेलडीअस सुरावटीमधे गुंफलय की सुटका अशक्य. आणी चार लोकात म्हणन अजुन अशक्य.
8 Aug 2012 - 5:22 pm | ऐक शुन्य शुन्य
*प्रवासात आम्ही लम्हा (संजय दत्त अन बिपशा बसु) सिनेमातील गाणी ऎकायचो. परत परत तीच गाणी ऎकायचो अन आजुबाजूला हिरवेगार पर्वत, खळखळ वहणाया नद्या, काय माहीती काय तरी जादू झाली. आज ही जेव्हा लम्हा मधील गाणी ऎकतो. डोळ्यासमोर तेच पर्वत, नदी, रस्ते हिरवळ दिसू लागते.*
http://www.misalpav.com/node/22459
कालच हा अनुभव मी लेखात लिहला.. बहुतेक गाण्यांची जादू सगळीकडे असते.
ह्या गाण्यांसारखे "तु मेरा हिरो", देसी बॉइझ अन "फिरसे उड चला", रॉकस्टार... हम्पी हॉस्पेट मध्ये अडकलेले आहे.. दोन्हीचा काही संबंध नसताना... फक्त हीच गाणी ऐकायचो हंपी मध्ये फिरत असताना...
मस्तच लेख...
8 Aug 2012 - 5:31 pm | जाई.
ग्रेट.
8 Aug 2012 - 5:35 pm | सर्वसाक्षी
प्रत्येकाने अनुभवलेलं असं आपल्या शब्दात मस्त मांडलं आहे.
18 Aug 2012 - 3:09 pm | अभिज्ञ
अगदी हेच म्हणतो.
मस्तच लेख.
अभिज्ञ
8 Aug 2012 - 5:35 pm | चैतन्य दीक्षित
अगदी आवडला.
8 Aug 2012 - 5:36 pm | मी_आहे_ना
अप्रतिम, खास 'गवि'टच. लोखंडाचं सोनं करणारं परीस नाही पाहिलंय मी, पण मिपावर येऊन वाचण्याचं सोनं झाल्यासारखे वाटणारे गवि टच लेख म्हणजे पर्वणीच! सगळ्यांच्या अंतर्मनाला ओळखणं कसं जमतं बुवा तुम्हाला... धन्य-धन्य-धन्यवाद.
8 Aug 2012 - 5:48 pm | इनिगोय
हम और तुम.. तुम और हम.. खुश हैं यूं आज मिलके... हे एक गाणं मोठमोठ्याने म्हणणं हा कोर्टशिपमध्ये असतानाचा आमचा दोघांचा आवडता टाईमपास होता. अजूनही हे गाणं असं अचानकच डोक्यात वाजायला लागतं. राजेश खन्ना गेला त्या दिवशी (दहाबारा वर्षांनी) पहिल्यांदाच टीव्हीवर पाहिलं.
तसंच शाळकरी वयात असताना नेपाळला गेलो होतो, तिथे पहिल्यांदाच भल्याSSSमोठ्या काचांच्या बसमधून खूप फिरलो होतो. त्यावेळी वॉकमनमध्ये "छोड आये हम वो गलियां" हे माचिस सिनेमातलं गाणं तुडुंब ऐकलं होतं. आजही केकेचा "छोड आये हमSSSSSS..." चा सूर कानावर पडला की, नेपाळचे सुंदर डोंगर-रस्ते दाखवणार्या काचेच्या खिडकीला नाक चिकटतं माझं..
अवांतर : केकेच ना?
8 Aug 2012 - 5:51 pm | पैसा
ते ते गाणं आपल्याबरोबर एकेक अख्खं जग घेऊन येतं. अशीच आशा भोसलेच्या खास गाण्यांची एक कॅसेट, मग सीडी आहे. जाइये आप कहां जाएंगे, चैन से हमको कभी, ये है रेशमी झुल्फों का अंधेरा, रात अकेली है वगैरे गाण्याची. त्यापैकी एखादं गाणं कुठे लागलं की गाडीतून केलेल्या भटकंतीच्या आठवणी येतात. गाडी प्रीमियर पद्मिनीपासून वॅगन आर पर्यंत बदलत गेली, पण बरोबरचा साथीदार, रस्ते आणि आशाचा आवाज तोच!
8 Aug 2012 - 5:52 pm | किसन शिंदे
वाह!!
तुमचे लेख नेहमी भुतकाळात घेऊन जाणारे असतात. :)
8 Aug 2012 - 5:58 pm | प्रेरणा पित्रे
पुण्याहुन मुंबईला एशियाडने जातांना मी नेहमी जब वी मेट मधिल "हम जो चलने लगे" हे गाणे एकायची.. ते अजुनही डोक्यात ईतकं फिट्ट बसलंय की जेव्हा एकते तेव्हा नेहमी तोच रस्ता व आजुबाजुचा परिसर डोळ्यापुढे येतो..
"गारवा" एकला की आजही कॉलेजमधला पावसाळा आठवतो...
रोज सकाळी ऑफिसला जातांना मी कुठ्लेतरी चांगले गाणे एकण्यावर भर देते...
नाहीतर दिवसभर डोक्यात "झल्ला वल्ला" "दिल गार्डन गार्डन होगया" जोरजोरात वाजत रहातं..
8 Aug 2012 - 6:01 pm | बॅटमॅन
अप्रतिम!!!! इतकेच म्हणतो.
8 Aug 2012 - 6:04 pm | राजेश घासकडवी
आत्ता परवाच डोक्यात अशा गाण्यांसारखाच हा विचारही अडकलेला होता. मुलाला आणलेल्या गाण्यांपैकी काही गाणी खरं तर डोक्यात जावी अशी आहेत. पण ती नुसती डोक्यात जातात असं नाही, तर तिकडे अडकून बसतात. आणि पिन पुन्हा पुन्हा त्या ट्रॅक्सवरून फिरत रहाते. कधीकधी मी स्वतःवरच वैतागून बायकोला सांगतो, अगं मला दुसरं काहीतरी गाणं सुचव.
लेख छोटेखानी झाला आहे - त्यामुळे जगातली सात आश्चर्य भराभर केसरी ट्रॅव्हलतर्फे आयोजित केलेल्या प्रवासात बघितल्यासारखी वाटली. अजून थोडा रंगवता येईल.
8 Aug 2012 - 6:16 pm | गणेशा
नेहमीप्रमाणे सुंदर लेख...
आठवणीत ठेवण्यासारखा
8 Aug 2012 - 6:25 pm | मिहिर
लेख आवडला!
8 Aug 2012 - 6:42 pm | अत्रुप्त आत्मा
सुखदायक मंगलमय पूर्व स्मृती उजळल्या....
8 Aug 2012 - 6:43 pm | प्रभाकर पेठकर
एखदी घटना, परिस्थिती, दृष्य आणि गाणं ह्यांचं एक अनामिक नातं असतं. अशा पैकी काही एक घडलं (जसं, घटना, परिस्थिती किंवा दृष्य) की दुसरी गोष्ट (जसं, गाणं) लगेच आठवतं तसेच, एखादे गाणे गायला लागले की त्याशी निगडीत ती घटना, परिस्थिती किंवा दृष्य लगेच आठवतं. अशा वेळी आनंद द्विगुणित होतो.
अवांतरः गाण्याच्या बाबतीत होतेच पण माझ्या बाबतीत भुकेचेही असेच आहे. टिव्ही समोर बसलं की काही तरी चरायला हवच असतं. आपोआप भुक लागते.
सर्वांनाच अनुभवास येणारी परिस्थिती गविंनी अत्यंत मोजक्या आणि नेमक्या शब्दांत व्यवस्थिती पकडली आहे. मजा आली वाचताना.
9 Aug 2012 - 12:08 pm | मैत्र
गविंचं पेटंट एकदम नेमकं लिखाण आणि तस्साच प्रतिसाद पेठकर काका !
काही गाणी ऐकली की थेट त्या जागी गेल्याचा भास होतो. काही गाणी कदाचित एका विशिष्ट काळात सलगपणे जास्त ऐकली जातात आणि मेंदूत ती जागा / काळ आणि गाणं यांची घट्ट रिलेशनशिप तयार होते.
तेच गाणं परत ऐके पर्यंत जाणवत नाही की आपल्या मनात काय परस्पर संबंध तयार झाले आहेत.
काही वेळा जर तो काळ नकोसा असेल तर पुन्हा ते गाणं ऐकण्याची इच्छा होत नाही...
किंवा काही वेळा एखादं गाणं थेट एखाद्या खोलीपर्यंत त्या जुन्या टेप पर्यंत घेऊन जातं.
गवि अनेक आभार !! पुन्हा एकदा मनातले विचार झक्कास पकडल्या बद्दल !!
8 Aug 2012 - 6:48 pm | अक्षया
सहीच लेख खुप आवडला.. :) प्रत्येकाने एकदा तरी अनुभवलेला..
लेख वाचुन अनेक गाणी, प्रसंग आठवले. त्यातला एक म्हणजे..कॉलेजला असताना सगळ्या मैत्रीणी एकत्र कॉलेजला जायचो. एकदिवस सकाळ पासुन मैत्रीण ' सारंगा तेरी याद मे नैन हुए बेचैन' ही एकच ओळ दिवसभर गुणगुणत होती. तीच तीच ओळ ऐकुन सगळ्या वैतागल्या शेवटी तीला सांगितले की बास कर आता हे गाणे नाहीतर ओळ तरी बदल. ती बिचारी गप्प बसली, आणि पुढच्या मिनिटाला नकळत मी तीच ओळ म्हणु लागले. सगळ्याजणी माझाकडे रागाने बघु लागल्या आणि सगळ्याजणी हसायला लागलो. अजुनही ते गाणं ऐकल की तो कॉलेजचा कट्टा आठ्वतो.
8 Aug 2012 - 6:54 pm | तिमा
मी जेंव्हा भारतीय पद्धतीच्या संडासात जायचो तेंव्हा मला कायम, 'मुत्तुकुळीका वाडी हडा' हेच गाणं आठवायचं!
8 Aug 2012 - 7:01 pm | शुचि
लेख मस्त झाला आहे.
आंघोळ सुरु झाली की रुद्राष्टकाची (सी डी वर ऐकलेल्या चालीत) माझी टेप रोज सुरु होते...... नकळत.
8 Aug 2012 - 7:43 pm | अमृत
अशीच काही आठवणी चिकटलेली गाणी आठवलीत.
अमृत
8 Aug 2012 - 7:58 pm | रेवती
छान.
प्रत्येकाची अशी आठवणीत अडकलेली गाणी असतात.
खूप पूर्वी होस्टेलमध्ये एक मुलगी 'साथिया नही जाना के जी ना लगे' म्हणत होती म्हणून मी तेवढच म्हणायचे.
अजूनही ते गाणं कसं दिसतं हे माहित नाही पण ही कल्पना नावाची मुलगी आठवते.
8 Aug 2012 - 8:00 pm | दिविजा
भुतकाळात घेऊन जाणारे लेखन..मला महिषासुर मर्दिनी स्तोत्र ऐकताना आजही आई बाबांबरोबर केलेल्या गोव्याचा प्रवास आठवतो..सगळ वातावरणच बदलून टाकतात काही आठवणी.
8 Aug 2012 - 8:27 pm | मराठे
आपल्या आठवणी दृष्यासोबतच स्पर्श, गंध किंवा आवाज घेऊन मेंदूत कोरल्या गेलेल्या असतात.. हा अनुभव कित्येक वेळेला घेतलेला आहे. पावसामुळे मातीचा गंध पसरला की 'आता उन्हाळ्याची सुट्टी संपली, शाळा सुरू' असा डिप्रेसिंग विचार माझ्या मनात पहिल्यांदा येतो.
सकाळची शाळा असताना रेडियोच्या गाण्यांच्या अनुसार आवरावं लागायचं; म्हणजे लता मंगेशकरांच 'रंगा येई वो' किंवा 'घनु वाजे घुनघुणा सुरू झालं' की आंघोळ उरकायची आणि समुहगान (याला त्याकाळी मी समुहघाण म्हणायचो) सुरू झालं (उदा: 'राही अगर तुझे है अपने पंखोंपर विश्वास' किंवा 'हम होंगे कामयाब') की शाळेसाठी घरातनं निघायचं. आता या गाण्यांचा आणि त्या (रम्य?) सकाळच्या आठवणींची इतकी सरमिसळ झाली आहे की आजही 'हम होंगे कामयाब' लागलं की पटपट आवरून शाळेत निघाल्याचं फिलिंग येतं!
लग्नापूर्वी हीला घेऊन पहिला पिच्चर पाहिला तो म्हणजे 'मुझे कुछ कहेना है' (!! जाउदे .. त्यावर कॉमेंट नको) .. अत्यंत रद्दड पिच्चर ! पण त्यातली गाणी अजूनही वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.
8 Aug 2012 - 8:32 pm | मयुरा गुप्ते
खरचं काहि गाणी कर्णपिश्चाचा सारखी कानामध्ये,डोक्यामध्ये अडकुन पडली आहेत हेच खरं.
२० वर्षांपुर्वी आजी गेली त्या दिवशी पाउस पडत होता....काय पण गाणं लागलेलं रेडीओ वर्..."ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता".इतकं पक्कं बसलयं गाणं डोक्यात कि निघता निघत नाही.
ते एक हिंदी गाणं होतं ना ' परदेसी परदेसी जाना नही मुझे छोडके..मुझे छोडके"...बास्स ते गाणं ऐकलं कि, ठाणा-विद्याविहार मधली ८:३२ च्या लेडिज स्पेशल ट्रेन मधली दोन छोटी मुलं हातामध्ये पेटी घेउन उच्च किनर्या आवाजात गातानाच आठवतात्...नथिंग एल्स.
असं वाटतं आपणही त्या 'टाईम कॅप्सुल' मध्ये अडकुन गेले आहोत.
मस्त आठवणी जागवणारा लेख.
--मयुरा.
8 Aug 2012 - 8:53 pm | इरसाल
आज हा लेख वाचताना सतत असं कुठेशी जाणवत होतं, की अरे हे तर आपल्याच मनातलं गविंनी कागदावर उतरवलेय.
अडकलेल्या गाण्यांबरोबर अजुन एक गोष्ट मला रिलेट होते ती म्हणजे गाणं गुणगुणत असताना मी प्रत्येक गाण्याशी एखादी जागा, व्यक्ती, प्रसंग, मुड किंवा काळ जोडु लागतो. आणी पुन्हा कधी ते गाणे ऐकले की तो जुना अनुभव घ्यायला मी मोकळा.
उदा. शाळेचा भला मोठा वर्ग रिकामा आहे आणी त्यात मी " हा सागरी किनारा ओला सुगंध वारा" गुण्गुणतो भले सुरेश वाडकरांसारखा आवाज नाही पण तो फिल नक्कीच येतो.
अतिशय उत्तम गवि.
8 Aug 2012 - 9:43 pm | बिपिन कार्यकर्ते
क्लास, बास!
8 Aug 2012 - 10:13 pm | खेडूत
छान...आवडले..आणखी येऊ द्या!!
8 Aug 2012 - 10:33 pm | सुमीत भातखंडे
अनुभव तसा सार्वत्रिकच
पण स्साला, असलं काही लिहिता येणं म्हणजे...
सलाम!!!
9 Aug 2012 - 12:41 am | वीणा३
एकदम मस्त लेख.
मी आणि केळकर वंदे मातरमला खूप घाबरतो. त्यावेळची स्तब्धता आम्हाला फिस्स करुन हसवते
यावरून पूर्वी बी बी सी वर एक कपलिंग नावाची सिरीयल लागायची ती आठवली. त्यात एक एपिसोड होता. त्याची youtube वर एक लिंक मिळाली. पूर्ण एपिसोड नाहीये. पण पूर्ण एपिसोड बघता आला तर नक्की बघा, एपिसोड काय फुल सिरीस बघा, एकदम मजेशीर.
http://www.youtube.com/watch?v=-iKjkPgVQcE
9 Aug 2012 - 11:02 am | sagarpdy
+1
8 Aug 2012 - 11:01 pm | आनंदी गोपाळ
अगदी मनापासून.
मस्त आहे.
8 Aug 2012 - 11:05 pm | सुनील
लेख मस्त! आवडला.
8 Aug 2012 - 11:07 pm | सुधीर
प्रत्येकाच्या मनातलं बोललात. पण शब्दात बद्ध करण्याचं शिवधनुष्य तुम्हीच पेलू शकता. हातात मोबाईल येईपर्यंत हिंदी चित्रपटांची गाणी एकण्याचा शौक बिल्डींग मध्ये कुठल्याशा समारंभामुळे लागलेल्या लाउड स्पिकरमुळे पूर्ण व्हायचा. त्यातली बरीचशी गाणी आजही आठवतात. लोअर परेलच्या शिवालय अभ्यसिकेची देखभाल करणारे एक मध्यमवयीन गृहस्थ दुपारी १ नंतर साजन चित्रपटाची एकच कॅसेट लावायचे, साली गाणी पण अशी गोड होती की अर्धा पाउण तास एकतच रहायचो. परिणाम म्हणून की काय त्या सेमिस्टरला मार्क्स पण कमीच पडले. :)
8 Aug 2012 - 11:30 pm | शिल्पा ब
आवडलं.
लग्न झाल्यावर नवर्याकडे आले तेव्हा त्याने फॅमिली गाय च्या सीडीज मागवल्या होत्या..मला दुपारी कैतरी मनोरंजन हवं म्हणुन. कधीही त्याचं सुरुवातीचं गाणं ऐकलं की लगेच ते दिवस आठवतात.
9 Aug 2012 - 12:11 am | माझीही शॅम्पेन
गवी लेख एक्दम फर्मास !!!
9 Aug 2012 - 1:27 am | वरुण मोहिते
लेख खुप आवडला...सगळ्यांच्या मनातले भाव नेमके पकडल्याबद्दल तुम्हाला सलाम ......
9 Aug 2012 - 1:50 am | अर्धवटराव
उगाच नाय आपन गवि ला मानत.
नमस्ते लंडन मधील "मै जहा रहु" हे गाणं असच मनात बसलय... पण त्यामागे कुठलाच प्रसंग आठवत नाहि :(
अर्धवटराव
9 Aug 2012 - 2:32 am | पिवळा डांबिस
गवि, सुरेख लेख!
आपल्या सगळ्याच्यांच मनामध्ये कधी ना कधी अशी कोणतीतरी गाणी जाऊन बसतात आणि मग अगदी अनपेक्षितरित्या ती प्रकट होतात.
एकदा मी आणि काकू तिचं व्याख्यान होतं त्यासाठी कॉन्फरन्सला लास वेगासला गेलो होतो.
आजकाल गाणी ऐकणं म्हणजे लांबचा ड्राईव्ह असतानांच!
पाच तासांच्या प्रवासात भरपूर मराठी गाणी ऐकली, भावगीतं, भक्तिगीतं, नाट्यसंगीत....
व्याख्यानाच्या आधल्या संध्याकाळी वेगासला पोचलो, शॉवर घेऊन फ्रेश झालो...
काकूचं अजून आवरायचं होतं म्हणून तिला सांगून रूममधून खाली कसीनोतल्या एका बारमध्ये जाऊन शिवास ऑर्डर केली....
किती वेळ गेला कुणास ठाऊक, मी आपला माझ्या तंद्रीत बुडालेला, तोंडाने 'विठ्ठला, तू वेडा कुंभार' गाणं गुणगुणतोय,
"तुझ्या घटांच्या उतरंडीला, नसे अंत ना पार..."
बायको कधी मागे येऊन उभी राहिली ते कळलंच नाही...
"नक्की कुणाच्या?", काकू. मला तिचा प्रश्न कळलाच नाही ...
"नक्की काय कुणाच्या?", मी.
"अरे इथे कसीनोत येऊन बसलायस," काकू खळखळून हसत म्हणाली," आजूबाजूला चिंध्या परिधान केलेल्या इतक्या पोरी फिरतायत, म्हणून विचारलं की नक्की कुणाच्या घटांच्या उतरंडीचं कौतुक करतोयस ते!!!!!!!!!!"
मी आधी हजार फुटांवरून खाली कोसळलो आणि नंतर तिच्या हास्यात सामील झालो....
...
नशीब त्या चिंध्याधारी पोरीना मराठी समजत नव्हतं, नाहीतर मार खायची पाळी!!!!!
:)
9 Aug 2012 - 9:45 am | मी_आहे_ना
पि.डां., मस्त अनुभव ,मजा आली.
9 Aug 2012 - 10:06 am | सुधीर१३७
गवि,
भारीच.............. वाचताना एक एक किस्से वाचून हसत हसत शेवटच्या वंदे मातरमच्या किश्शाला पार फुटलो.....
आणि पिडांच्या किश्शाने फुटून पार भुगा झाला........................ :)
9 Aug 2012 - 11:03 am | sagarpdy
हा हा हा! फुटलोच!
9 Aug 2012 - 3:43 pm | स्पंदना
सत्यानाश पिडाकाका आता कधीही हा अभंग हसु फुटल्याशिवाय अन तुमची आठवण आल्याशिवाय नाही ऐकता नाही येणार. किंबहुना ते घटवाले पिडाकाका अस काही तरी होणार.
9 Aug 2012 - 6:28 pm | सूड
आईशप्पथ !! आता हे गाणं ऐकलं की हा प्रसंग डोळ्यासमोर येणार आणि एखादवेळेस मनातलं हसू चेहेर्यावर आलंच तर समवयस्क व्यक्ती समोर असेल तर ठीकै, कोणी वयाने मोठी व्यक्ती असेल तर "का हसतोयस" या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं याचा विचार करतोय.
हल्ली 'गोमू तुझे नादानं गो, नादानं बांधलाय बंगला' हे गाण ऐकायची लहर येते. :D
9 Aug 2012 - 8:51 pm | श्रावण मोडक
गविच्या या लेखावर प्रतिसाद देण्यासाठी या किंवा अशाच प्रतिसादाची वाट पहात होतो. बाकी गाणी जाऊ द्या... पण या गीतातील घट आणि पिडांच्या नजरेसमोर काकूंनी नाचवलेले घट... बास्स!
9 Aug 2012 - 4:30 am | भडकमकर मास्तर
वा गवि.. म जा आली..
१९९१ मध्ये नवीन नवीन हॉस्टेल ला आलो होतो.... बाहेरून सतत साजन आणि सडकमधली गाणी वाजत असायची...
"तुम्हें अपना बनानेकी कसम खायी है" हे सानूच्या आवाजातलं गाणं आणि हॉस्टेलमधले पहिले काही दिवस, चुकून आणलेला कुठलातरी भंपक वासाचा विचित्र साबण, सकाळच्या क्लासला जायची गडबड अस्लं समीकरण डोक्यात फिट्ट आहे... सडक सिनमा कधीच पाहिला नाही ( आत्ताही आठवत नव्हतं नाव.. गूगल करून शोधले).. गाण्याचे विजुअल्स काय आहेत माहित नाही... नदीम श्रवण आणि शानूची गाणी भिकार्यांकडून ऐकायला मिळतात वगैरे नेहमी म्हणतो मी पण हे गाणं म्हणजे हॉस्टेलची आठवण पक्की.....
9 Aug 2012 - 7:53 am | ५० फक्त
लई भारी ओ गवि,
9 Aug 2012 - 9:25 am | सविता००१
मस्त लिहिलंय हो गवि. अप्रतिम.
9 Aug 2012 - 9:37 am | अक्षया
एक खुपच विनोदी प्रसंग घडला होता.
एका ओळखीचा फॅमिली मधे आजोबांची पंचाहत्तरी होती..
आमची सगळीच फॅमिली तिथे होती.. माझी बहीण व तीचे यजमान गायक असल्यामुळे सगळ्यांनी गाण्याचा आग्रह केला.
बरेच लोक बसले होते. एक मागुन एक नविन जुन्या गाण्यांची फर्माइश सुरु झाली त्यात एक गाणे आले 'चल उड जा रे पंछी के अब ये देस हुआ बेगाना' पंचाहत्तरीला ह्या गाण्याची फर्माइश ऐकुन सगळेच हसु लागले. ते आजोबासुद्धा ..:)
9 Aug 2012 - 9:52 am | सोत्रि
वा गवि, काय मस्त टायमिंग जुळून आले आहे!
गेले दोन आठवडे एस्कलेशन्स, रूट काॅज, काॅल्स, काॅन्फरन्स काॅल्स, बट व्हाय? ह्या गदारोळात बुडून गेलो होतो तेव्हा नेमकी अशीच मनात अडकलेली गाणी आठवून थोडासा विरंगुळा व्हायचा. आणि गंमत म्हणजे तुम्ही म्हणालात तसे, परिस्थितीचा आणि गाण्याचा काही संबंध असेलच असेही नव्हते.
मस्त लेख!
-(गविपंखा) सोकाजी
9 Aug 2012 - 10:12 am | दादा कोंडके
अगदी परवा परवा, मित्रांबरोबर दूरदर्शनवरच्या जुन्या जाहिरातींबद्दल बोलताना 'जरासी सावधानी, जिंदगी भर आसानी' हे जिंगल आठवलं. आणि दोन अडीच महिने अगदी चालीसकट गुणगुणत होतो. बायकोनी दम देउन ठेवला होता तरीसुद्धा घरातले सगळे असताना दोन्-तीनदा गाणं तोंडातून गेलच. :(
9 Aug 2012 - 11:26 am | सुकामेवा
+१
9 Aug 2012 - 12:07 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
काय सुंदर जमून आलाय लेख..
भावला.
9 Aug 2012 - 12:23 pm | निश
गवि साहेब, फारच अप्रतिम लेख झाला आहे.
तुम्हि समोर असता तर तुम्हाला त्रिवार नमस्कार केला असता पण तरीही ह्या प्रतिसादात तुम्हाला त्रिवार नमस्कार करतो.
नमस्कार नमस्कार नमस्कार.
हा तुमचा लेख म्हंजे मास्टर पीस आहे.
9 Aug 2012 - 12:42 pm | विजय नरवडे
सलाम
9 Aug 2012 - 12:47 pm | गवि
सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून हाच विचार मनात आला की सर्वांच्या बाबतीत अशी गाणी लाईफच्या एका ठराविक काळाशी बेमालूम मिसळून बसली आहेत. आणखी काही राहून गेलेलं आठवलं ते असं.
माझी आई जीवनमरणाच्या रेषेवर आयसीयूमधे महिनाभर होती. त्याकाळात मी सतत आयसीयूबाहेर बसलेला असायचो आणि अक्षरशः काहीही ऐकण्याच्या तयारीत. कोणत्याही पेशंटसाठी हाक आली तरी प्रचंड दचकून धावत जायचं. एकूण प्रचंड ताणलेली अवस्था. दाढी वाढलेली. डोळे खोल. आणि अशा अवस्थेत फक्त काही मिनिटांसाठी मी हॉस्पिटल सोडून घरी आलो तरी फोनकडे सतत लक्ष.. अशावेळी लगेच निघून या, परिस्थितीचं काही खरं नाही असे कॉल्स आलेसुद्धा आणि त्या फोनची दहशत बसली.
नंतर आई त्यातून बाहेर आली आणि सुदैवाने सगळं उत्तम झालं पण त्यावेळचा माझ्या फोनचा रिंगटोन असलेलं गाणं "चांद सिफारिश जो करता हमारी..(फना)" या गाण्याची ती सुरुवातीची शीळ आता इतक्या वर्षांनी जरी नुसती कुठे वाजली तरी धडकी भरल्यासारखं होतं.
त्यापूर्वी बरीच वर्षं आधी, मी शाळेत असताना दिल्ली / आग्रा/ पंजाब / चंदीगड / हरयाना /हिमाचल प्रदेश अशी पंचवीस दिवसांची प्रदीर्घ ट्रिप आईबाबांसोबत केली होती. पूर्ण ट्रिप दिल्ली ते दिल्ली बसने...
हिमालयातले डेंजरस रस्ते, खोल दर्या आणि शिखरं.. पंजाब हरयानातले लांबलांब रस्ते आणि आठआठ तास नॉनस्टॉप प्रवास.. हवापाणी न सोसल्याने पोटात होणारी खळबळ..टरकसिंग असं नाव पडलेल्या सरदार ड्रायव्हरची अत्यंत हळू बस चालवण्याची कंटाळवाणी तर्हा..
अशा बर्यावाईट प्रसंगांच्या अन स्थळांच्या पार्श्वभूमीवर या टरकसिंगने पंचवीसही दिवस एकच कॅसेट बसमधे लावली होती. त्यात हेअर कटिंग सलून छाप गाण्यांचं कलेक्षन होतं. एकही गाणं त्यापूर्वी न ऐकलेलं..
त्यात
१. "लिखनेवाले ने लिख दी है, मिलन के साथ जुदाई.." ......
२. "नैन मिले.. उसके बाद.. फूल खिले.. उसकेबाद...चैन गया.. उसके बाद... प्यार हुआ.. उसके बाद...
अशा उसके बाद आगगाडीनंतर :"तेरी मेरी शादी होगी, देंगे लोग मुबारक बात..."
अशी आठदहा गाणी होती.. वीट आलेला तेज्यायला..
मी ती गाणी त्यानंतरही कधी ऐकली नाहीत.. नुकताच सत्तावीस वर्षांनी त्याच एरियात परत गेलो होतो आणि एका ढाब्यावर बसून चापत असता वरची दोन्ही गाणी त्याच क्रमाने लागली तेव्हा अक्षरशः थक्क झालो. ते गाणं कालच ऐकल्याचा भास होत होता..
आता ते लिखनेवाले ने लिख दी है..गाणं गुणगुणायला गेलं की बसमधे स्वेटर घालन थंडीपासून बचाव करत बाहेरची हिमाच्छादित शिखरं पाहतोय असाच भास होतो.. पोटातली खळबळ आणि बाहेरच्या टेंपरेचरसकट..
9 Aug 2012 - 12:49 pm | अँग्री बर्ड
9 Aug 2012 - 2:24 pm | झकासराव
क्लास!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! :)
_/\_ दंडवत तुम्हाला....
पिडाकाकानी लिहिलेला किस्सा तर फुटलो कॅटेगरीतला :)
9 Aug 2012 - 3:40 pm | जातीवंत भटका
सुरेख लेख !
अगदी मनातल्या ओळी पकडणारा. काही गाणी आणि त्यांचे संदर्भ कायमचे आपल्या स्मृतीपटलावर कोरले जातात. १००० % सहमत !
--
जातीवंत भटका
9 Aug 2012 - 3:53 pm | स्पंदना
मस्त गवी.
माझ्याकडे माझ्या अनुभवापेक्षा भारी माझ्या नवर्याचा अनुभव आहे असाच. अक्षय बर्याचदा "प्यार दिवाना होता है.." हे गाण लागल की "प्रेमाच गाण.." अस म्हणतो. शेवटी विचारल "काय भानगड?" तर त्यान सांगितलेला किस्सा.
तो पहिलीत असताना त्याच्या वर्गात एक प्रेमा नावाची मुलगी यांच्या मध्ये बसायची. मध्ये म्हणजे दोन बाजुला दोन मुल..अक्षय आणि त्याचा मित्र ...अन मध्ये या बाईसाहेब. तर या बाई वर्गातल्या दादा प्रकरणातल्या होत्या. वयान मोठ्या..समोरचे दर्शनी दात किडलेले..गळक नाक! तर एकदिवस हीने या दोघांना बेंच्वर डोक ठेवायला लावुन दोघांना दोन्ही हातान थोपटत हे गाण म्हंटल होत. म्हणुन हे प्रेमाच गाण!
9 Aug 2012 - 4:01 pm | अक्षया
||तर या बाई वर्गातल्या दादा प्रकरणातल्या होत्या. वयान मोठ्या..समोरचे दर्शनी दात किडलेले..गळक नाक! तर एकदिवस हीने या दोघांना बेंच्वर डोक ठेवायला लावुन दोघांना दोन्ही हातान थोपटत हे गाण म्हंटल होत. म्हणुन हे प्रेमाच गाण! ||
खुपच आवडलं :)
9 Aug 2012 - 4:52 pm | प्रीत-मोहर
मस्तच लेख गवि. असाच आमचाही अनुभव गाणी आणि चाफ्याच्या बाबतीत :)
9 Aug 2012 - 8:27 pm | मराठे
माझ्या एका मित्राला गाण्यांवर कॉमेंटस् करायची फार वाईट खोड होती. उदा एकदा 'लागा चुनरी मे दाग' गाणं चालू असताना पटकन् म्हणाला "हे मोनिका लुइंस्कीचं फेवरेट गाणं" .. नंतर एकदा "मेहेबूब मेरे" गाण्यावर नको तिथे "स" घालून त्याची वाट लावली. अशी अनेक गाणी त्याने 'संस्कारीत' केली आहेत. त्यामुळे आजही ती गाणी कधी ऐकलीच तर त्या कॉमेंटस् आठवून फिस्सकन् हसायला येतं.
9 Aug 2012 - 9:01 pm | आबा
"रिमझीम गिरे सावन..." ऐकताना असंच होस्टेल आठवतं !
9 Aug 2012 - 11:28 pm | काळा पहाड
असंच एक म्हणजे, काही गाणी कारण नसताना अचानक मनात उगवतात. असंच एक नाट्यगीत "नारायणा रमारमणा" मी एका भल्या सकाळी गुणगुणायला सुरवात केली. पुर्वी कधी ऐकलं होतं ते ही आठवेना. नाटकाचं नाव आठवेना. फक्त ध्रुपद आठवत होतं. मग गुगलींग करुन ते गाणं शोधलं, दोन चार वेळा ऐकलं आणि मग आत्मा शांत झाला.