हिच हायकर्स ( एलिस किती लांब ,तरी किती जवळ )

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
21 Jun 2012 - 11:11 am

एलिस किती लांब ,तरी किती जवळ

मोजकंच समान घेऊन सँक पाठीवर टाकायची अन निघायचं ,मिळाली तर लिफ्ट तर ठीक, नाहीतर सरळ ११ नं. बस ,अर्थात हे काही सोप्प नाहीये त्यासाठी लागते बेधडक वृत्ती ,आणि ऑस्ट्रेलीयन माणसांच्या नसानसात ती असते , क्रिसमस सुट्टीत लेखक अन त्याच्या पीटर नावाच्या ऑस्ट्रेलीयन मित्रासोबत ३४०० कि.मी.च्या "हीच हायकिंगला " निघालेल्या या वेगळ्या ऑस्ट्रेलीयाची ओळख अन अनुभव खास मि.पां.करा साठी इथे शेअर करत आहे ,
यासाठी मला श्री. दिलीप चिंचाळकर ( खुद्द ) लेखक यांनीच परवानगी दिली आहे मी फक्त लेखक अन वाचक यातलं माध्यम आहे . अपेक्षा आहे हा लेख मि. पां करांना नक्कीच आवडेल :)
शेवटी क्रिसमस उजाडला .गेले कित्येक आठवडे पीटर आणी मी मशीनप्रमाणे नुसते राबत होतो. वीकेंडच्या फुटबॉल मॅचेस नाही ,पबमधल्या रोजच्या गप्पा-गोष्टी नाही आणि टवाळक्या पण एकदम बंद .
हर्क्युर्लस कोरुगेटेड बॉक्स फॅक्टरीत तसे आम्ही चाळीसेक कामगार होतो आणि कामाच्या ओझ्याखाली सगळेच मरमर मरत होतो .तरी पीटर आणि एना बरोबर माझी एक टीम जमली होती."दारूच्या पुडक्याच सर्वात जास्त प्रोडक्शन देणारी नंबर वन टीम ."
अवघ्या तासाभराच्या मोटार रस्त्यावर बरोसा व्ह्यली आहे .सुपीक डोंगराळ जमीन आणि फळभाज्या. लागवडीला मानवणार हवामान असल्यामुळे द्राक्षाचे असंख्य मळे इथ गर्दी करून आहेत त्यांची विशिष्ट चव आणि भरपूर पिकामुळ त्यापासून वाईन तयार करणाऱ्या कंपन्या दक्षिण ऑस्ट्रेलीयातील ह्या भागात चांगल्याच बोकाळल्या आहेत ,बर ऑस्ट्रेलीयन लोक म्हणजे अट्टल पिणारे !.बाटली सोडून सरळ पिंपाला तोंड लावणारे ,त्यामुळे इथे वाईनच पँकिंग देखील एक गँलनच्या तोटीदार डब्यांमध्येच होत आणि असले मोठे डबे पुरवणारी फॅकट्री ती आमची .इथल्या चार मशीन ऑपरेटर्सपैकी मी एक आणि इथले कामगारच माझे मित्र-मैत्रिणी .त्यामुळे सर्वांच्या सवयी अंगवळणी पडलेल्या ,हिवाळा असो वा उन्हाळा ,दिवसाची सुरुवात थंडगार कोक घशात ओतून अन शेवट नेहमीच्या ठराविक पबमध्ये स्नुकरचे डाव हाणत होत असे.
दसरा - दिवाळीची नुसती आठवण शिल्लक होती ,खरा मोठा सन क्रिसमसच होता .ऑगस्टपासून त्याचे वेध लागत .तब्बल ४ महिने खपल्यावर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुट्या सुरु होत . आता त्या परिश्रमाच चीज होणार होत. नाताळाच्या सुट्टीभर प्यायला,खायला, हवी तशी नशा करायला आणि रात्र - दिवस हुंदडायला आम्ही मोकळे होतो , एना बोर्नियासावा जाणार होती ग्रीसला ,तिच्या आजोळी.तिने गप्पांमध्ये रंगवून सांगितलेल्या खडकाळ डोंगरातल्या त्या गावाची मी कल्पना करत होतो ,जिथे रेल्वे जात नाही बस जात नाही अस लहानग खेड,जिथ सगळे एकमेकांना ओळखतात ,जीवन इतक संथ कि वाईनचे पेले केव्हाही भरलेले चालतात .गावाच्या वेशीवर ऑलीव्ह्च्या फळबागा अन दुसर्या टोकावर बघितलं कि खाली दूरवर पसरलेला निळाशार भूमध्य सागर.
" कुठे हरवला आहेस मित्रा ? मी घेऊन चलतो तुला असल्याच एका गावी ,तिथ रेलगाडी किंवा बस जात नाही , कार आपण नेणार नाही ,पायीच जाऊया .एना सोडल्यास ,मोहात पडण्याऱ्या या सर्व गोष्टी भेटतील तुला , समुद्राऐवजी फक्त वाळवंट चालवून घ्यावं लागेल तुला ,बोल येतोस ?
पीटरबरोबर मी कधीही कुठेही जायला तयार असे ,माझ्याहून बरीच वर्ष लहान असला तरी पीटर सिडनी वूड फॅकट्रीबाहेर तो माझा गुरु होता . तो खर्या अर्थाने ऑस्ट्रेलीयन होता .म्हणजे खिशात दमडी असो वा नसो उन्हात तापत असो कि पावसात ओला, आपण जिवंत आहोत , स्वच्छंद आहोत ह्याचाच अतोनात आनंद ,दररोज जणू ह्या सुखाचा आनंदोस्तव चालत असे त्याचा .
एका शुक्रवारची गोष्ट .काम उरकून मी फॅकट्रीबाहेर पडणार तोच पीटर लगबगीन आला म्हणे “एक ट्रक आपले खोके घेऊन चाललाय ,ड्रायव्हर कुणालपिनपर्यंत लिफ्ट देईन पटकन चल मागच्या दाराने “मला कळेना अस कुठे जायचं काहीच ठरलेलं नव्हत ,खर सांगू ? अर्ध्या तासापूर्वी हे पीटरच्या ध्यानीमनी हि नसेल ,दुसर्या महायुद्धातला पार मोडीत निघालेला जुना खटारा ट्रक पाहून त्याला हुक्की आली ,ड्रायव्हरला खडा टाकून पहिला इसिप्त जमून आल ,मग त्याला आठवलं कि रस्त्यात कुठल्याश्या फार्मवर आमचा मित्र जॉन होर्पोल कांगारूपाळकाच काम करतोय ,त्याच्याकडे अचानक जाऊन धडकायचं ,दोन दिवस चैन करायची आणि रविवारी संध्याकाळी परतायचं ,आता गाड्याबरोबर नळ्यालाही यात्रा भाग होती ,काय लोच्चा झाला त्या वीकेंडचा सांगू ,रस्त्यात ट्रक बिघडला ,रात्री उपास घडला ,पावसात चिंब ओले झालो ,चिखलात - अंधारात वणवण भटकलो तरी जॉन भेटलाच नाही .मी पार वैतागलो होतो पण पीटर मजेत होता वरतून म्हणाला कसा ""अरे कायम कपड्याची काळजी करत राहिलास तर जीवनाच्या गमतीला मुकशील प्राण्या "
एके काळी मी होतो एडिलेड युनिव्हरसिटीचा बायो- केमिस्ट्री लॅबोरेटरीत मोजून - मापून काम करणारा शोधार्थी .जेमतेम शालेय शिक्षण आटोपनारा हा ऑस्ट्रेलीयन टपोरी त्याच्याचप्रमाणे मलाही उडान- टप्पू बनवायला टपला होता.
ह्यावेळी भटकंतीचा हा नवा गळ त्याने टाकून पहिला होता. ऑस्ट्रेलीयाच्या मध्यभागात असलेल्या एलीस स्प्रिंगला हीच - हायकिंग करत जायचं. मी खूप हिंडलो फिरलो होतो ,छान - छोक वातानुकुलीत गाड्यांमधून ,पण असल्या प्रकारचा फारसा अनुभव नव्हता ,एखाद्याच्या स्कूटरवर लिफ्ट मागून २-३ मैल जाणं वेगळ अन आपल्याला हव्या त्या दिशेने जाणार्या मोटारगाड्यामध्ये फुकटात स्वार होऊन टप्पे गाठत प्रवास करण हे मला तरी नवचं होत , अंतर बरच होत पण घाई कसलीच नव्हती तिथ जाऊन काय करायचं ? हे हि ठरलं नव्हत, पण कल्पना बरी वाटली .”जाऊया” म्हटलं
" एना नाहीतर ,एलीसच सही "

एक जीन्स घालायची ,एक बरोबर घ्यायची ,२-३ टि- शर्ट ,स्लीपिंग बॅग आणि फ्रेश वाटण्यासाठी तुला जे- जे हव ते ,पण आवश्यक तेच घे, पाठीवरल्या बॅगेचे ओझं उगीच वाढवू नकोस , पीटरन मला निक्षून सांगितलं . एलीस स्प्रिंगला जायची तयारी सुरु झाली .मी पाण्याची मोठी बॉटल भरून घेतली .वाळवंटात पाणी तर हव ?,घश्याची कोरड भागवायला ,पीटर गालातल्या गालात हसला " पाणी भेटेल तर भरशील न भल्या गृहस्था "
त्यान काय घेतलं होत ? चाकू , मेणबत्तीचे तुकडे ( एक मोठी हरवली तर बस बोंबलत, तुकडे काय एक हरवला तर दुसरा तरी सापडेल ? ) काड्यापेटी ,जुने फाटके नकाशे ,तंबू, तंबाखू सिगारेट वळायचा कागद अन गांजा .

अवघ्या सतरा वर्षाच्या ह्या बेट्यान दोनदा अक्खी ऑस्ट्रेलीया पालथी घातली होती ,शाळेत जायला फारसा वेळ मिळाला नाही त्यात आश्चर्य काय ?
आज ६ डिसेंबर ,वेळ दुपारचे दोन, खूप उकडतंय माझी डायरीच्या पानावरची पहिली नोंद !,आतल्या पानांमध्ये पेरून ठेवलेल्या १-१ ,२-२- डॉलर, एकूण २० डॉलरच्या जोरावर आम्ही ३,४०० कि.मी.चा प्रवास करणार होतो ,भटकंतीसाठी लागणारया दोनच गोष्टी पैसा अन वेळ ! एक कमी असल तरी दुसर तितकच जास्त प्रमाणात होत. आमच्याकडे वेळेचा तोटा नव्हता .

डिसेंबर म्हटलं कि हिंदुस्थानात थंडीचे दिवस दक्षिण गोलार्धात हा मात्र ऐन उन्हाळ्याचा महिना ,माझ्या अनुभवातला सर्वात जास्त तापलेला दिवस होता तो फक्त ३९ डिग्री सेल्शियस ,पण अहाहा तो हि किती आल्हाददायक ,नदीकाठी गवतामध्ये लोक लोळत पडली होती बागांमध्ये पाण्याची कारंजी थयथय करत होती ,मला तरी तो वसंत आगमनाचा काळ भासत होता .तसे वर्षाकाठी ९ महिने हिवाळा अन पावसाळ्याची किचकीच लागून असते १ सप्टेंबरला वसंत ऋतू आगमनाचा दिवस ठरला असला तरी वार्यात उन्हाळ्याची चाहूल नोव्हेंबर मध्येच लागते

त्यामानाने ऑस्ट्रेलीयाचा आउटबॅक हा एक भीषण प्रकार आहे चहुबाजूला समुद्राकाठापासून १००-१५० मैलाची झालर सोडली तर आतला संपूर्ण मुलुख एक रुक्ष माळरान आहे उत्तर पुर्वेतली नॉर्दन - टेरीटरी वगळता वर्षाकाठी फारतर दीड दोन इंच भरेल इतकाच पाऊस. तोही एका वर्षाआड , खुरटलेली झुडूप , बाराही महिने घोंगावणारा वारा, त्यावर डोलणार " मुलगा " नावाचं खुरटलेल झुडूप ! आसमंतात उडणारी लाल धूळ .

इथले लोक लहानसहान वसाहती करून राहतात ,व्यवसाय अर्थात शेतकी नसून मेंढी पालनाचा ,इंद्रदेव देईल तितक्या पाण्यात काम भागविणे ,वस्ती म्हणजे ८-१० टपर्या . शेजारची वस्ती १००- सव्वाशे मैल,पूर्वी इथल वाहन घोडे किंवा खेचर असत आता त्यांची जागा मजबूत अस्युव्ही किंवा ट्रकने घेतली ,इथल्या लोकांची राहणी पाश्चिमात्य धर्तीवर संपन्न अन दिपवून टाकणारी जरी असली तरी आउटबॅक बराच रुक्ष मागासलेलं आहे ,इथल्या लोकांचा बाहेरच्या जगाशी संपर्क टेलिफोन, टी,व्ही,, अन इंटरनेटमार्फत लहानग्यांच शिक्षण सुद्धा ह्याच पद्धतीन पार पडतं ,ह्या प्रचंड भूभागात २००-३०० चौरस मैलाचे शेकडो फार्म्स ,त्यात हजार - हजार मेढरांचे कळप गडप झाल्यावर कुठे शोधायचे हे त्यांनाच माहित.!

सिटीबस आम्हाला गावाबाहेर शेवटच्या थांब्यावर सोडून परत फिरली .आता पुढ्यात होता लांबच लांब प्रिन्सेस हायवे.हा राजमार्ग निम्म्या ऑस्ट्रेलीयाला वळसा घालणारा रिंगरोड ,पर्थ, एडिलेड,सिडनी,ब्रीसब्न आणि केर्नस अशा सहा प्रमुख शहरांना एका माळेत ओवणारा .
थम्सअपच्या लोगोप्रमाणे अंगठा काढून पीटर पुढे चालू लागला ,अन त्याच्या १०० पावलं माग मी. सहलीला निघालेल्या लहानग्या प्रमाणे माझा उत्साह नुसता उतू जात होता ,माझ्या बडबडीला कंटाळून पीटरने हि अंतर ठेवण्याची युक्ती शोधून काढली होती , अन म्हणे " गाडी चालवंनारयाला एक नाही दिसला तर दुसरा हायकर नक्कीच दिसेल ,प्रथम मला वाटल अंगठा दाखवला कि लिफ्ट पुढ्यात हजार ,सगळीच गोरी मंडळी उदार ,सगळ्या धाडसी प्रयत्नांना उत्तेजन देणारी वैगेरे वैगेरे .............

चालता चालता १५ मिनिट झाली ,भोंगा वाजवत चाकांची करकर करत एक स्टेशनवॅगण पुढे जाऊन थांबली ,माझा आनंद आणखीनच उसळला मागून येणाऱ्या ड्रायव्हरने आधी मला पहिले म्हणून ह्या यशाचा मानकरी मीच.

तशी ती गाडी खटाराच होती . दोन पेंटर गावोगावी क्रीसमसची पोताई करत फिरत होते .गाडीत मागील बाजूस रंगाचे डबे,ब्रश ,चिंध्या,घडीची शिडी ई. साहित्य .माशाही खूप भिनभिनत होत्या .“चलेगा” म्हणून आम्ही आत शिरलो .रंगकामात आपल्याला गती जरी नसली तरी त्यांना बरं वाटावं म्हणून ह्या विषयावर गप्पा मारणे भाग होते .कशी करावी सुरुवात ? तेव्हढ्यात ते दोघे पेंटर रस्त्याच्या बाजूने पायी जाणार्या एका विक्षिप्त दिसणाऱ्या माणसाकडे हातवारे करून भोंगा वाजवू लागले ,मला वाटल झाल......आता हि ब्यादहि आत येते कि काय ?पण ती व्यक्ती वेडी खासच नव्हती ,पायी संपूर्ण ऑस्ट्रेलीयाचा चक्कर लावायचा ध्यास मात्र ह्या चक्रमने घेतला होता ,ह्या पेंटरची अन त्याची भेट दर एक दोन दिवसाआड रस्त्यावर घडत होती .म्हणूनच त्याला बघून दोघांनी गलका केला, तेच बोलू लागले .चाळीस मैल गेले असू-नसू कि आमच्या वाट दुभंगल्या .

दुसर्या लिफ्टसाठी अंगठा काढून चालता चालता आता चांगला पाऊन -एक तास उलटला ,माझा उत्साह मंद पडू लागला " पीटर आपण पायीच चालत जाणार का रे एलीसला? " त्यान ऐकल न ऐकल केल . दुपारी घरून मी दोन नारंग्या घेऊन निघालो होतो. त्यातली एक पीटरला दिली. माझ्या वाटेची नारंगी पहिली लिफ्ट सेलिब्रेट करायला मी पीटर अन पेंटर मध्ये वाटून खाल्ली होती . आता पीटरन नारंगी सोलायला घेतली तेव्हा त्यात आपलाही वाटा असेल अस मला वाटण साहजिकच होत .ती त्याने एकट्यान फस्त केली अन मी आशाळभूतपने बघतच राहिलो.

वाटून खायचा प्रकार ऑस्ट्रेलीयन तरुणांमध्ये कमीच. त्याच कोणी वाईट मानत नाही
" तुम्हाला हव तेव्हा तुम्ही खा , आम्हाला हव तेव्हा आम्ही खाऊ ,नसत्या औपचारिकता ,अडथळा नको मध्ये . जश्यास तसं म्हणून मी हि पाण्याची बाटली काढली आणि मोठे घुटके घेत अर्धी संपवली .पीटरला विचारलसुद्धा नाही " कि बाबा रे तुला हवय का पाणी ?त्याच माझ्याकडे मुळीच लक्ष नव्हत

मी गप्प बसलो येणारे ट्रक बघत . हीच - हायकर्सना लिफ्ट बहुधा ट्रक ड्रायव्हरच देतात .एव्हाना माझे हात ट्रक दिसला कि अपोआप हलू लागले होते .तासाभरात कितीतरी ट्रक समोरून निघून गेले होते ,तरी आम्ही जागचे-जागी उभे. ट्रकचा व्यवहार असा ,तर मोटारीकडून काय अपेक्षा करावी ?
त्याचवेळी एक कार सर्र....कन पुढे गेली . आम्ही हात दाखवला नाही तरीदेखील थांबली आणि झपाट्याने रिव्हर्स आली .कच्चकन ब्रेक दाबल्यामुळे उडालेल्या धुळीच्या लोटामागून गोड आवाजात " come,come " अशी हाक ऐकू आली
बघतो काय ? दोन देखण्या मुली आमच्याकडे बघत हात हलवत होत्या " हॅलो, हॅलो wanna come with us ?" का नाही गं बाई ? अगदी झहन्नुममध्येसुद्धा चलू " Wink मी मराठीत बोललो , ह्या लिफ्टच क्रेडीट मी पीटरला दिल ,कारण माझ्यासारख्या दाढीवाल्याला पाहून एखादी तरुणी क्वचितच थांबली असती .माझी हि समजूत निव्वळ भारतीय होती अस नंतर कळून आल.

मघाच्या पोतईवाल्यांच्या तुलनेत ह्या मुलींची स्टेशनवॅगन अगदी मच्छी बाजार होती, मागच्या जागेत सुटकेस ,हॅडबॅग , सँडल्स,पुस्तक आणि सुट्या कपड्याच्या ढिगार्यात कसेबसे पाय रोवून आम्ही आत बसलो होतो . डोकं टपाला आपटत होत तरी आम्ही आनंदात होतो . दोघी कन्या क्विसलँडवरून पर्थला जायला निघाल्या होत्या .गेली ३-४ वर्ष गावोगावी मिळेल ती नोकरी करत ,अनुभव गोळा करत फिरत होत्या ,कधी नर्सरीत बेबी सिटींग ,कधी दुकानात सेल्सगर्ल तर कधी पेट्रोल पंपावर अटेंडंट.मन मानेल तोवर काम करायचं ,मन भरल ,खिशात चार पैसे आले कि चालू लागायचं ,शालेय शिक्षण पूर्ण झाले कि इथले बहुतांश तरुण पोर -पोरी २-३ वर्ष तरी ह्याप्रमाणे घालवतात - जीवनाची इंटर्नशिप म्हणा हव तर !
खरोखरच मजा आहे बुवा अस स्वत:शी म्हणत थोड मागे रेललो तर " प्यांक " अशा आवाजामुळे लक्षात आल कि आमच्या दोघाव्यतिरिक्त ह्या ढिगार्यात आणखी एक पॅसेंजर दडलेला आहे .मघापासून झोपलेले कुत्र्याचं पिलू आळे-पिळे देत उठलं ,बाळाला खाऊ म्हणून मी ४ बिस्किटे काढली ,लेकान एक खाल्लं आणि दोन चावून टाकून दिली. "जा उडत " म्हणत उरलेलं मी बिस्कीट तोंडात टाकल,पीटरला न देता , आता मलाही तस वागायला जमू लागल होत , माझे हात चाटता चाटता पिल्लाची मजल माझे केस ओरबाडण्या पर्यंत गेली शेरास सव्वाशेर म्हणून मी ही त्याचे कान अन शेपूट ओढायला लागलो तसा तो दुप्पट जोमाने दंग करू लागला अनावारेबल झाला अगदी ,खर पाहता प्रवासान तो कंटाळला होता ,खाण्याचे लाड भरपूर पुरवले जात असले तरी त्याला खेळायला ,मस्ती करायला हवी होती ,एकूण प्रकार लक्षात येत मी पाय मोकळे करण्यासाठी गाडी थांबवायला लावली ,त्याला बाहेर काढलं, सगळा कार्यभाग आटोपल्यानंतर त्याने बिस्कीट खाल्ली अन थोड थोपटलं तसं झोपी गेला

तास - दीड तासांच्या गप्पागोष्टीमध्ये त्या मुलींची आमच्याशी छान गट्टी जमली होती .आमचा ओपन प्ल्यान एकूण आम्हाला पर्थला चलायचा आग्रह करू लागल्या ,”पुढे नलारबराचा हजार मैलांचा टप्पा निर्जन आणि बराच कठीण आहे आमच्या संगतीत तुमचा प्रवास मजेशीर झाला असता अस म्हणाल्या” सगळी सज्जनता पणाला लावून आम्ही ते आमंत्रण नाकारलं :(

पोर्ट ऑगस्टपासून व्लीसाची वाट वेगळी जाते हि आउटबॅकची खरी सुरुवात . रस्त्याच नाव स्टार्टहायवे असल तरी तो होता बहुतांश फेयरवेदर रोड ,वाहतूक जेमतेम ,आता एडिलेडपासून सव्वा तीनशे कि.मी रस्ता पार पडला होता .आजचा स्कोर शक्य तेव्हढा वाढवावा म्हणून आम्ही झपाटयान चालू लागलो तासाभरात दिवस मावळू लागला रात्रीचे साडे आठ वाजले होते उन्हाळ्यात इथे रात्री नऊ पावेतो उजेड असतो .

सडकेच्या बाजूला पीटरने तंबू ठोकला आणि बिली उकळायाला घातली .पूर्वीच्या काळी जमिनीतल सोनं अगर हिर्यांच्या शोधात पाठीवर गाठोड बांधून पायी प्रवास करण्यार्यांना जॉली स्व्यागमॅन म्हणत ,तसल्या राहणीत मोकळ्यावर शेकोटी पेटवून उकळलेल्या चहास बिली - टी म्हटले जाई ,चहा - सँड्वीच झाल्यावर आम्ही दोघ दिलखुलास बोलत बसलो खडकाळ सडकेवर दगड मारून निघणार्या ठिणग्या पाहत आणि नंतर आकाशातल्या चांदण्यांना ओळखायचा प्रयत्न करत शेवटी झोप लागली .
पहाटे थंडी बरीच वाढली होती ,उबदार स्लीपिंग बॅगमध्ये मी गाढ झोपलो होतो .मात्र स्वेटर असून सुद्धा पीटरला हुडहुडी भरली होती ." छान छान , मला सोडून एकटाच नारंगी खातो काय ? भोग आता पापाची फळ ,मी मनातल्या मनात म्हणालो.
पीटर पहाटे ५ पासून जागा , आवारावर करून तयार बसला होता. झुंजूमुंजू होताच आम्ही विनोबा एक्स्प्रेसन निघालो ,काल लिफ्ट भराभर मिळत गेल्या आज खरी गंमत सुरु होणार होती ह्या भागात मुळात वाहनांची वर्दळ कमी त्यातून इकडचे लोकही तर्हेवाईक !
आजची लिफ्ट कठीणच दिसत होती .तास तासाला १० मी. विश्रांती घेत आगेकूच चालू होती
थोड्या थोड्या अंतरावर गाडीखाली येऊन मेलेले ससे , कांगारू पडले होते त्यांचा घाण वास चांगला फर्लांगभर पिच्छा पुरवत होता चार तासात आम्ही २० कि.मी. पार केले
सकाळच्या थंडगार वातावरणात निर्जन माळरानाच सौंदर्य तारुण्याप्रमाने मोहून टाकणारं होत , जणू एखादा चमत्कार, मैलभर लांब चिवचिव वार्यावर तरंगत स्पष्ट एकू येत होती ,बोललेले शब्द सभोवारच्या शुकशुकाटला घाबरून आमच्या भोवती घुटमळत होते.

खरं तर हे आपल्या मन: स्थितीवर अवलंबून असतं ,मनाला शांती देणारं दृश्य उपाशीपोटी ,लिफ्ट न मिळालेल्या हताशेच्या क्षणी खायला धावत होतं आम्ही वाट पाहत होतो ती जागा एका खूप मोठ्या कँटल - ऱँचचा भाग होता ,दिसत कुणी नसल तरी चारी बाजून तारेच कुंपण होत मैलो मैल हद्द ,नवी हद्द तिथे लोखंडी पगबाधा ,जनावर एका ऱँचमधून दुसरीत जाऊ नये म्हणून ,रात्र दिवस फिरणाऱ्या पवनचक्क्या बोरवेलच पाणी उपसून जनावरांना पाणी पिण्याची सोय करीत शेळ्याची निगराणी करणारे घोडेस्वार क्वचित दृष्टीस पडत .

सकाळपासून कार, टँकर , कँरोव्ह्यान आणि एक रिकामी स्कूल बस जवळून गेली पण कुणी आमच्यावर दयामाया दाखवली नाही उलट दिशेने जाणारे मात्र हॉर्न वाजवून हात हलवून आम्हाला खुणावत होते " लगे रहो ",मध्ये मी वेळ मारून न्यायला एका खांबावर माझ नाव गाव कोरून काढल.

पीटरन कुठूनतरी एक कोकचा रिकामा टीन पैदा केला त्याला एका उंच जागेवर ठेवून आम्ही दगडान नेम साधू लागलो ,पण चित्त कुठे ठिकाणावर?एकही नेम बरोबर लागला असेल तर शपथ ! खांदे दुखू लागले शेवटी रागाच्या भरात पीटरन जवळ जाऊन त्याला हाणून पाडलं मोठ्या दगडांनी चेचून पार त्याला चपटा करून टाकला तेव्हा एकदाच बरं वाटल, लाजपण वाटली स्वत: चीच ,निघताना पीटरन कादंबरी घ्यायची सूचना केली होती ,मी दुर्लक्ष केल खंत आता वाटत होती. आजच्या अनुभवानंतर मी ठरवलं कि पुढे कधीही कारने प्रवास करताना रस्त्यात भेटणाऱ्या असल्या वाटसरूंची शक्य तेव्हढी मदत करायची ,ह्या निर्धारान प्रसन्न होऊन कि काय देवानं तत्क्षणी एक स्टेशन वँगन आम्हाला तारायला पाठवली. :)

क्रमश :

देशांतरआस्वाद

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

21 Jun 2012 - 11:20 am | मृत्युन्जय

आयला अवघड आहे हा असा प्रवास. वाचतोय. पुभाप्र.

प्रास's picture

21 Jun 2012 - 11:33 am | प्रास

छान ओळख करून देताय पियुबै.
लिखाण आवडलं आणि तुमचं मध्यस्ताचं कामही.
और आन्दो....

मृगनयनी's picture

21 Jun 2012 - 12:01 pm | मृगनयनी

मस्त गं पिवशे!.. इन्टरेस्टिन्ग!!!! :)

पप्पुपेजर's picture

21 Jun 2012 - 12:14 pm | पप्पुपेजर

पुभाप्र.

शैलेन्द्र's picture

21 Jun 2012 - 1:36 pm | शैलेन्द्र

मस्त.. असे अनुभव नेहमीच आवडतात..

अमितसांगली's picture

21 Jun 2012 - 1:46 pm | अमितसांगली

पहिल्यांदाच इतका मोठा लेख वाचला...पुभाप्रु...

कवटी's picture

21 Jun 2012 - 2:28 pm | कवटी

आयला भारी आहे हा प्रकार.
तिकडे खुशिंची नर्मदा परिक्रमा तर इकडे ही....
ती तिकडे नर्मदा फिरवून आणतीय... आणि इकडे ऑस्ट्रेलिया फिरुन होतय...
लै भारी. लै मज्जा.

जे.पी.मॉर्गन's picture

21 Jun 2012 - 2:42 pm | जे.पी.मॉर्गन

फारच रोचक. भन्नाट वर्णन आहे ! पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

जे पी

गणपा's picture

21 Jun 2012 - 2:56 pm | गणपा

वाचतोय....

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jun 2012 - 4:31 pm | परिकथेतील राजकुमार

वाचतो आहे...

अभिनंदन पहिल्यांदा तुमचं एवढा मोठा लिखाण केल्याबद्दल,

आणि दिलिप चिंचाळकरांचं देखील , धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

21 Jun 2012 - 6:44 pm | मुक्त विहारि

उत्कंठा वाढली आहे..

स्वाती दिनेश's picture

21 Jun 2012 - 6:56 pm | स्वाती दिनेश

वाचते आहे, पुढचा भाग लवकर टाक ग,
स्वाती

वाचते आहे. अनआवरेबल पिल्लू आवडून गेले :)

शिल्पा ब's picture

22 Jun 2012 - 7:32 am | शिल्पा ब

छान आहे. पण अगदी शब्दा शब्दाचं भाषांतर नको करुन. ते "मुलगा" नावाच झाड /झुडुप म्हणजे नेमकं नाव काय?

पण अगदी शब्दा शब्दाचं भाषांतर नको करुन. ते "मुलगा" नावाच झाड /झुडुप म्हणजे नेमकं नाव काय
"mulga" हे नाव बरोबर आहे शिल्पा तै , अशा नावाचच झाड आहे ते :)

प्रचेतस's picture

22 Jun 2012 - 8:31 am | प्रचेतस

आवडलंय.
पुभाप्र.

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jun 2012 - 6:34 pm | बिपिन कार्यकर्ते

भन्नाट्ट!

पैसा's picture

22 Jun 2012 - 7:22 pm | पैसा

लवकर पुढचा भाग येऊ द्या!

चित्रगुप्त's picture

23 Jun 2012 - 11:29 am | चित्रगुप्त

दिलीप चिंचाळकरने केलेल्या ऑस्ट्रेलिया-भ्रमंती विषयी वाचायला मिळते आहे, हे वाचून खूपच आनंद होत आहे.
हा प्रवास माझ्या आठवणीप्रमाणे साधारणतः १९७२-७५ चे सुमारास केला गेलेला असावा.

दिलीप हे एक अद्भुत रसायन आहे. उत्तम चित्रकार, लेखक तर तो आहेच, शिवाय त्याची जीवन-पोतडी अनेकानेक विविध अनुभवांनी ठासून भरलेली आहे.
दिलीपच्या अन्य लेखनाची आणि चित्रांची संगत मिपाकरांना नेहमी लाभत राहो.

पुढील भागाची आतुरतेने वाट बघत आहे.

पियुशा's picture

23 Jun 2012 - 1:19 pm | पियुशा

अरे वा चित्रगुप्त तुम्ही ओळ्खता त्यांना ? वाचुन खरच खुप छान वाटले :)

दिलीपच्या अन्य लेखनाची आणि चित्रांची संगत मिपाकरांना नेहमी लाभत राहो.
हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहचवते आता :)

तसेच सर्व वाचकांचे मनपुर्वक आभार :)

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Jun 2012 - 4:39 pm | llपुण्याचे पेशवेll

हे नारंगी म्हणजे काय बरे?

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Jun 2012 - 4:41 pm | llपुण्याचे पेशवेll

हे नारंगी म्हणजे काय बरे?

नारंगी म्हणजे ऑरेंज ऑरेंज (मोठी संत्री /संत्र)

ऋषिकेश's picture

27 Jun 2012 - 10:29 am | ऋषिकेश

वाह! हीच हायकिंगच्या वेडाबद्द्ल बरेच ऐकून आहोत.
माझ्या एका मित्राने, बरेच दिवस नोकरीसाठी खटपट करूनही न मिळाल्यावर वैतागून ब्रेक हवा म्हणून भारतात मुंबई ते लेह असे हीच-हायकिंग केले होते. आता तो भारतात रहात नसला तरी त्याला या लेखाचा दुवा देतो.

भारतात याबद्दल माहित नसल्याने ट्रकवाल्यांचे - कारवाल्यांचे अनुभव अगदी गमतीदार आहेत. तुमच्या या छान लेखामुळे त्यालाही लिहायची हुक्की आली तर क्या कहने! (अर्थात आशा! त्याचा आणि लिहाय-वाचायचा संबंध शाळा-कॉलेजनंतर कितपत आला असेल कोण जाणे ;) )