एक कविता हरवलेली ... सापडली :)

मस्तानी's picture
मस्तानी in जे न देखे रवी...
15 Apr 2012 - 8:12 am

शाळेत शिकलेल्या कविता, कोणतीतरी त्यापैकी एक मनात कुठेतरी घर करून राहिलेली आणि खूप खूप आवडलेली, भावलेली. काही वर्षांनंतर ऐकली की मनाला आणखीच जास्त भुरळ घालणारी. मला वाटत आपल्या प्रत्येकाची अशी एखादी 'खास' कविता असेलच. माझीही होती. शाळेत खूप खूप आवडलेली म्हणून माझ्या एका मैत्रिणीने तिच्या स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात मला लिहून दिलेली. पण नंतर नोकरी-संसार या सगळ्या पसाऱ्यात हरवून गेली. दोन-चार ओळी लक्षात होत्या पण पूर्ण नीट अशी आठवेच ना.

शोधली म्हणा, गुगल करा काहीही सापडतं ... पण नेमकी हीच नाही मिळाली, का मलाच शोधता आली नाही काय माहित. 'आठवणीतली गाणी' धुंडाळून झाली, ओर्कुट / फेसबुक वरच्या कविताप्रेमी ग्रुप मध्ये विचारून पाहिलं, इथे मिसळपाव वर देखील विचारलं की इथे नक्की कुणीतरी सांगेल. पण नाही, अजून प्रतीक्षा संपत नव्हती. आणि आज अचानक खूप वर्षांपूर्वीची, लहानपणीची मैत्रीण भेटावी तशी समोर आली :) माझ्यासारखेच आणखीही काही लोक ही कविता शोधात होते नक्कीच. मग काय, ही घ्या ...

[ ई - प्रसारण वर या आठवड्यात वसंत बापटांवर विशेष 'स्वरसंध्या' कार्यक्रमात ३३ व्या मिनिटाला ऐकायला मिळेल, माझी मनसोक्त ऐकून झालीये ... तुम्हीही ऐका ! ]

आणि वाचा ...

दख्खन राणीच्या बसून कुशीत
शेकडो पिले ही चालली खुशीत

सुंदर मानव तुंदिल अंगाचे
गालिचे गुलाब शराबी रंगाचे
ठेविल्या बाहुल्या बांधून बासनी
गोजिरवाणी लाजिरवाणी
पोरटी घेऊन पोटाशी कुशीत
... दख्खन रानी ही चालली खुशीत

निसर्ग नटला बाहेर थाटात
पर्वत गर्वात ठाकले थाटात
चालले गिरीश मस्तकांवरून
आकाशगंगांचे नर्तन गायन
झेलून त्यांचे नुपूर घुंगुर
डोलती डौलात दुर्वांचे अंकुर
मोत्यांची जाळी घालून भली
रानाची चवेणी जाहली प्रफुल्ल
... दख्खन राणीला नव्हती दखल

ड्यूकचे नाकड सरळ अजस्त्र
राहिले उभे हे शतके सहस्त्र
त्याच्याही पाषाण हृदया कळाली
सृष्टीची शोभा ही वृष्टीत वेगळी
नीला तो तलाव तांबूस खाडी ती
पांढरा प्रपात हिरवी झाडी ती
डोंगरकडे _________
अवतीभवती इंद्राची धनुष्ये
... दख्खन राणीत मुर्दाड मनुष्ये

दख्खन राणीच्या कुशीत पोटात
बुडाली जाणीव चहाच्या घोटात
किलवर चौकट इसपिक बदाम
फेकीत फेकीत जिंकित छदाम
नीरस पोकळ वादांचे मृदंग
वाजती उगाच खमंग सवंग
खोलून चंची पोपटपंची
करीत बसले बुद्धीचे सागर
... दख्खन रानी ही ओलांडे डोंगर

धावत्या बाजारी एकच बालक
गवाक्षी घालून बसले मस्तक
म्हणाले "आई गं, धबधबा केवढा
पहा ना चवेणी, पहा हा केवडा
ढगांच्या वाफेच्या धूसर फेसात
डोंगर नहाती पहाना टेसात"
म्हणाली आई "पूरे गं बाई,
काय या बेबीची चालली कटकट"
... दख्खन राणीचा चालला फुंफाट

दख्खन राणीच्या पोटात कुशीत
शेकडो पिले ही चालली खुशीत
मनाने खुरटी दिसाया मोठाली
विसाव्या तिसाव्या वर्षी ही आंधळी
बाहेर असू दे उन वा चांदणे
संततधार वा धुक्चे वेढणे
ऐल ते पैल शंभर मैल
एकच बोगदा मुंबई पुण्यात
... दख्खन राणी ही चालली वेगात
... दख्खन राणी ही चालली वेगात

कलासंगीतकविताभाषावाङ्मय

प्रतिक्रिया

खेडूत's picture

16 Apr 2012 - 11:49 pm | खेडूत

छान आहे,
आमच्या पुस्तकात नव्हती. १९८४ नंतर बदललेल्या बालभारती मध्ये ही असावी. कविता समजण्यापेक्षा त्या पाठ असणे महत्वाचे होते, आणि ही तर पाठ होणे म्हणजे...:)
त्या कुठल्याश्या चालीत बसवून सगळ्या वर्गाने मिळून म्हणायच्या.
चाल लागत नसेल तेव्हा ठरलेल्या एक-दोन ढोबळ चालीत बसवून वेळ मारून न्यायाची.
खरी कवितेची गोडी लागते ती शाळा संपल्यावरच !

बापट यांच्याच ''शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट'' आणि ''सदैव सैनिका पुढेच जायचे'' या दोन होत्या.