जत्रा-१

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
21 Oct 2007 - 10:01 pm

बुंडेसलिगाच्या फुटबॉल मॅचेस चालू झाल्या की बरेच जण टोळक्याटोळक्याने स्पोर्ट्स बार मध्ये 'म्याच' पहायला जमतात. पूर्वी नाही का क्रिकेटची म्याच पहायला गल्लीत टीव्ही असलेल्या एकुलत्या एका घरात सगळे हक्काने जमायचे ,नाहीतर मग दुकानातल्या टीव्ही समोर गर्दी करायचे,तसेच काहीसे..आपापल्या घरात एकट्याने मॅच पाहण्यात काय मजा? म्हणून मग असे टोळक्याने एखाद्या स्पोर्ट्स बार मध्ये जाऊन मोठ्ठ्या पडद्यावर दंगा करत म्याच पहायची.अशाच एका गुरूवारी ख्रिसने फ्रांकफुर्ट विरुध्द बायर्न म्युनशन ची फुटबॉल मॅच पाहण्याचे आवताण दिले.म्याच सुरू व्हायला अजून अर्धा तास होता तरी मेरीयॉटच्या स्पोर्ट्स बार मध्ये भरपूर गर्दी जमली होती.जागा मिळेल तिथे लोकं बसले होते,उभे होते,पोमीज्,वुर्ष्ट खाणे आणि बिअर पिणे चालू झाले होते. आम्ही जागा शोधत होतो,एवढ्यात फ्लो दिसला.आमची वाट पाहून,जागा पकडून वैतागलाच होता जरा.आजूबाजूला फुललेली जत्रा पाहत,म्याच सुरू होण्याची वाट पाहत आम्हीही खानपानाची 'आर्डर' दिली.फ्रांकफुर्टचं काही खरं नाही.बायर्न म्युनशन वाले त्यांना कच्चे खातील हे भाकित थोड्याच वेळात खरे ठरू लागलं आणि साहजिकच आमच्या गप्पांची गाडीही म्युनशनवर उतरली.

"ऑक्टोबर फेस्ट चालू आहे ना,कॉलेजात असताना नेहमी जायचो आम्ही मित्र. हल्लीच नाही जमत! तुम्हाला पण पहायचा आहे ना ऑक्टोबर फेस्ट? जाऊया का जत्रंला?" आम्ही हो/नाही म्हणायच्या आतच ,"पण हाटेलं सगळी ओवरफुल्ल असतात आणि इवेंट प्राइस लावतात लेकाचे.त्यापेक्षा आपण मोनीलाच विचारू या तिथे ती आहे का ते."ख्रिस स्वत:च प्रश्न विचारत होता,स्वतःच उत्तरं देत होता.लगेचच त्याने मोनीला फोनही लावला आणि शनिवारीच आम्ही तिथे टपकणार असल्याचे तिच्या कानावर घातले.मोनी ,ख्रिसची मोठी बहीण ,म्युनशन मधील एका शाळेत इंग्रजी आणि इतिहास शिकवते.ऑक्टोबर फेस्टचे वातावरण असल्याने शाळांमध्येही सगळे उत्सवीच वातावरण होते.ख्रिसने लगेच बटाटेवड्यांची 'आर्डर' दिली.वाटेत मॅकदादाकडे थांबून वेळ जायला नको! आपल्याला स्लिपिंग बॅग न्यायला लागतील.तिच्याकडे एवढ्या जणांसाठी अंथरुण पांघरुण नाही. अशा गप्पा सुरू झाल्यावर मॅच मधले लक्षच उडाले.म्याच मग सोडूनच देऊन आम्ही शनिवारचा बेत ठरवू लागलो.
ख्रिसची फोल्क्स वागन सुसाटत निघाली ती मानहाईमलाच थांबली.सुझन पण तिथे अजून शिदोरी घेऊन तयारच होती.तिला घेऊन हमरस्त्याला लागलो आणि ख्रिसबाबाने गाडी भलतीकडेच वळवली.बोरीस बेकरने बांधलेले आइस हॉकीचे स्टेडीयम त्याला आम्हाला दावायचे होते.ते अप्रतिम स्टेडीयम पाहण्यात वेळ गेला खरा पण मुद्दाम कोण आइस हॉकीचे स्टेडीयम पाहण्यासाठी येणार होतं?गाडी ऑटोबानला म्हणजे फ्रीवेला लागल्या लागल्या ख्रिसने ब.वडे हाणायला सुरूवात केली. नेवीगेशन सिस्टीमवर सरळ पुढे जा असा संदेश येत होता आणि ख्रिस मात्र लेफ्ट टर्न घेऊन परत एकदा तिसर्‍याच रस्त्याला लागला होता."आता काय रे आणखी? उशीर होईल ना आपल्याला,आधीच स्टेडीयमवर बराच वेळ गेला आहे.मोनी वाट पाहत असेल ना." उत्तरादाखल मोनीला भटक्यावर संपर्क करून आम्हाला समोर पहायला सांगितले त्याने.तर समोर "काँकार्ड म्युझियम"ची पाटी! आश्चर्याचे सानंद सुखद धक्के बसत होते.उत्साहात आम्ही सगळे आत घुसलो.तिथे एक काँकार्ड विमान आतून पाहण्यासाठीही खुले आहे.लहान मुलाच्या कुतुहलाने आम्ही आत शिरलो.मनसोक्त आणि अर्थातच मनात काँकार्ड सवारी करून मग पुढे निघालो.
फ्रांकफुर्ट -म्युनशन साधारण ६०० किमी अंतर १५०/१७५ च्या वेगाने सुसाटत जात होतो,मध्ये मध्ये ही आकर्षणं आम्हाला थांबवत होती.१० च्या पुढे आम्ही एकदाचे मोनीकडे पोहोचलो.गाडीतून उतरल्यावर आल्प्स ची थंडी जाणवायला लागलीच.गरम गरम टोमॅटो सूपचा आस्वाद घेत आमच्या गप्पा सुरू झाल्या.गप्पा सगळ्या ऑक्टोबर फेस्ट भोवतीच फिरत होत्या अर्थात!इतिहासाच्या मोनीबाईंनी आम्हाला उत्साहाने माहिती पुरवली.
इस.१८१० मध्ये बव्हेरियाचा राजपुत्र लुडविक आणि साक्सनची राजकन्या थेरेसा यांच्या विवाहाच्या मेजवानी प्रित्यर्थ १२ ते १७ ऑक्टोबर असा पहिल्यांदा हा सोहळा झाला.घोड्यांच्या शर्यतीने त्याची सांगता झाली तेव्हापासून आजतागायत म्युनशेनचा ऑक्टोबर फेस्ट त्याचे वैशिष्ठ्य टिकवून आहे.पुढे मात्र ऑक्टोबर मधल्या थंडगार हिवाळ्यात याचा आस्वाद घेता येत नाही हे लक्षात आल्यावर आता तो सप्टेंबरच्या शेवटून दुसर्‍या शनिवारी सुरू करून ऑक्टोबरच्या पहिल्या रविवारी संपतो.जर १ किवा २ ऑक्टोबरला शनिवार/रविवार आला तर ३ ऑक्टोबरच्या रियुनिफिकेशनच्या सुट्टीचा मोका साधून एक दिवस लांबवतात ही!ज्या पेल्यातून बिअर देतात त्याला मास म्हणतात आणि मास म्हणजे १ लिटरचा जंबो जगच असतो आणि तंबूत काम करण्यासाठी एका हातात ५ आणि दुसर्‍या हातात ५ भरलेले मास धरून नेता आले पाहिजेत अशी अटच असते.कॉलेजात शिकणारे स्टुडंट्स बरेचदा हे काम करून सुट्टी मध्ये पैसे मिळवतात.बिअर बरोबरच न पिणार्‍यांसाठी राडलर(बिअर+ कोला/फँटा/स्प्राईटचे मिश्रण) ,आफेलशोर्ल (ऍपल ज्युस +सोडावॉटर),कोला,अल्कोहोल नसलेली बिअर इ.सुध्दा असतेच.पण मान असतो बिअरचा आणि म्युमशनमधल्या ब्रुअरीजजा.फक्त म्युनशन मधल्याच ब्रुअरीजना या जत्रेत बिअरचे स्टॉल लावता येतात.

सजवलेल्या घोडागाडीतून बिअरची पिंपे वाजतगाजत मिरवणूकीतून आणली जातात. मिरवणूकी मध्ये पारंपरिक बायरीश कपडे घालून लोक नाचत,गात असतात.


स्त्रीया,पुरूष एवढेच नव्हे तर लहान मुलेसुध्दा या सोहळ्यात सहभागी होतात.आपापल्या आयांबरोबर आलेली ही चिमुरडी जत्रेचा आणि परेडचा पुरेपुर आनंद घेतात.मग बव्हेरियन स्टॅच्युपुढे सॅल्युट होतो आणि वाजतगाजत पिंपाचा नळ सोडून मास भरून बव्हेरियाच्या मिनिस्टर प्रेसिडेंटच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन होते.एकच जल्लोश होतो!मग तंबूराहुट्यांमधून बायरीश गाणी सुरू होतात, सोनेरी जाम रिकामे व्हायला सुरूवात होते.
रात्रीबरोबर गप्पाही चढायला लागल्या.सक्काळी लवकर जाऊ या हं,नाहीतर जागा नाही मिळत तंबूत. अशी प्रेमळ दटावणी करून शेवटी एकदाचे त्या चढत्या गप्पांना आवर घालत झोपलो.

समाजजीवनमानलेख

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

22 Oct 2007 - 12:50 am | विसोबा खेचर

गाडीतून उतरल्यावर आल्प्स ची थंडी जाणवायला लागलीच.गरम गरम टोमॅटो सूपचा आस्वाद घेत आमच्या गप्पा सुरू झाल्या.

सजवलेल्या घोडागाडीतून बिअरची पिंपे वाजतगाजत मिरवणूकीतून आणली जातात. मिरवणूकी मध्ये पारंपारिक बायरीश कपडे घालून लोक नाचत,गात असतात.

एकच जल्लोश होतो!मग तंबूराहुट्यांमधून बायरीश गाणी सुरू होतात, सोनेरी जाम रिकामे व्हायला सुरूवात होते.

क्या बात है! स्वाती, तुझं प्रवासविश्व खरंच खूप समृद्ध आहे! वाचायला नेहमीप्रमाणेच मजा आली. नेहमीप्रमाणेच चित्रेही सुरेख...!

अवांतर - दिनेशरावांना नमस्कार! भारतात येणार आहेस तेव्हा येताना बार्सिलोनाहून माझ्याकरता न विसरता केशर आण आणि ड्युटीफ्री मधून ग्लेनफिडिचची बाटली आण! केशराचे पैसे मिळतील, ग्लेनचे मिळणार नाहीत! बियरचं एवढं वर्णन वाचायला लावलंस पण आम्हाला बियर मिळालीच नाही त्याकरता तुला ग्लेनफिडिचची शिक्षा!:)

हलके वगैरे घेऊ नकोस हो! आय ऍम सिरियस! :))

असो, जत्रा - २ ची वाट पाहात आहे..

आपला,
(बार्सिलोनाच्या केशराचा दिवाना असलेला शाळूसोबती!) तात्या.

धनंजय's picture

22 Oct 2007 - 1:45 am | धनंजय

या पेयश्रेष्ठाचा महिमा गावा तितका कमीच.

नंदन's picture

22 Oct 2007 - 2:10 am | नंदन

वा! बीअरच्या 'तीर्थ'जत्रेची सुरुवात झकास झालीय. जर्मनीतला ऑक्टोबरफेस्ट म्हणजे तर कुंभमेळ्यासारखाच :)
Beer is proof that God loves us and wants us to be happy हे वाक्य आठवलं.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

सर्किट's picture

22 Oct 2007 - 11:06 pm | सर्किट (not verified)

खरोखर,

वरची चित्रे बघून हा 'कुंभ'मेळा आहे, ह्याची खात्रीच पटली. लिव्हर निकामी होण्याआधी एकदा ह्या 'तीर्थ'यात्रेत हजेरी लावावी असा मानस आहे.

स्वातीजी,

वर्णन आवडले. पुढील भागाची उत्सुकता आहे.

- सर्किट

सहज's picture

22 Oct 2007 - 7:29 am | सहज

ऑक्टोबर फेस्ट हा १८१० साली सुरू झाला, म्हणजे इतका जुना असूनही त्याला नेहमीच्या उत्सवासारखे धार्मीक अधिष्ठान वगैरे नव्हते तर धमाल / पार्टी म्हणता येईल असा होता हे ह्याचे वेगळे वैशिष्ट्य!! :-)

बव्हेरीया प्रांतातील पारंपारिक पोशाख, बव्हेरीयाचे (प्रांतीय रंग??) पांढरे व निळे रंग. आठवण म्हणून असाही फोटो काढता येतो. :-)

इतके जड बीयर ग्लास रात्रभर वेगवेगळ्या टेबलवर लिलया ने-आण करणार्‍या देवींना प्रणाम!!

हिच्या वाटेला जायचे येर्‍याबगाळ्याचे काम नव्हे! एका ठोश्यात निकाल लावेल इतकी मनगटात ताकद असते. :-)

अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे जगभर जिथे जिथे ही साऊथ जर्मन मंडळी आहेत, तिथे तिथे ती हा "ऑक्टोबर फेस्ट"सण मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात. :-)

ह्या "वारी"(सोहळ्या) च्या कृपेमूळेच, माझी बायको मला "कौतुकाने-प्रेमाने" अधून मधून "बीयर-स्प्राईट" भरून आणून देते म्हणून हा उत्सव मला अजूनच प्रिय!!!

प्रकाश घाटपांडे's picture

22 Oct 2007 - 10:13 am | प्रकाश घाटपांडे

हिच्या वाटेला जायचे येर्‍याबगाळ्याचे काम नव्हे! एका ठोश्यात निकाल लावेल इतकी मनगटात ताकद असते. :-)
बरं झाला अदुगरच सांगून ठुलं. नाही त फुकाट knock out झालो असतो. पन या बयेला सांडायच भ्या वाटत न्हाई का?
प्रकाश घाटपांडे

गुंडोपंत's picture

22 Oct 2007 - 10:49 am | गुंडोपंत

बाईच्या
हातातली १ अगदी उजव्या बाजूची बीयर आधीच फ्लॅट झालेली दिसतेय! :)))

आपला
गुंडोपंत

सहज's picture

22 Oct 2007 - 10:55 am | सहज

हाफ ग्लास / नो फोम (कदाचित बीयर नसेलही ) अशी खास मागणी होती भॉ!!!!!

प्रकाश घाटपांडे's picture

22 Oct 2007 - 8:05 pm | प्रकाश घाटपांडे

हाफ ग्लास / नो फोम (कदाचित बीयर नसेलही ) अशी खास मागणी होती भॉ!!!!!

म्ह्जी कटींग च्या वानी कटिंग बिअर बी भेटतीय का?. बिनतारी होस्टेलवर असताना मित्रांसोबत बिअर पिताना मधेच उठून लघुशंकानिरसनासाठी थोडावेळ स्वच्छ्तागृहात जाउन आल्यावर मधल्या काळात मित्रांनी आपला ग्लास अर्धा करु नये म्हणून मी सर्वांसमोर बिअरची छोटी चूळ परत त्याच चषकात सोडत असे. ही ट्रिक लक्षात आल्यावर एका मित्राने "दोस्ती मे झूटा कुछ नही रहता" असे म्हणून मी परत आल्यावर माझ्यासमोर तो उरलेलि बिअर पित असे.
प्रकाश घाटपांडे

कोलबेर's picture

22 Oct 2007 - 8:01 am | कोलबेर

ऍनहायजर बुश हा मुळचा जर्मन असला तरी जर्मन बियर समोर अमेरिकन बडवायजर अगदीच पानचट वाटते. अमेरिकेत मिळणारी बेक्स प्रिमीयम ही जर्मन बियर मात्र मस्त आहे

जर्मनीमध्ये पणे ही प्रसिद्ध आहे का?

सहज's picture

22 Oct 2007 - 8:33 am | सहज

बेक्स जगभर प्रसिद्ध आहे. माझी पण आवडती आहे.

जर्मन लोक पण एकदम स्वाभिमानी म्हणून आपापल्या प्रांताचीच पिणार. :-) बघ ना ऑक्टोबरफेस्ट मधे म्युनीच शिवाय बाहेरची चालत नाही. पॉलानर पण चांगली आहे

ट्राय करून बघा. बेक्स + स्पाईट..

सर्किट's picture

22 Oct 2007 - 10:06 pm | सर्किट (not verified)

एकदा एक सेंट लुईसचा माणूस (बडवायजर चे हेडक्वार्टर), एक मिलवाकीचा माणुस (मिलर चे हेक्वा), आणि एक बेलफास्ट चा आयरिश माणूस बार मध्ये जातात.
सेंलु म्हणतो: "मला एक बडवायजर द्या. किंग ऑफ बीअर्स".
मिल्वाकी म्हणतो: "मला एक मिलर द्या. क्वीन ऑफ बीअर्स".
बेलफास्ट म्हणतो: "मला एक पेप्सी द्या".

इतर दोघेही त्याला आश्चर्याने विचारतात, "तू गिनेस का ऑर्डर केली नाहीस ?".
तेव्हा तो म्हणतो: "तुम्ही सॉफ्ट ड्रिंक्स पिणार असाल, तर मी एकटाच बीअर कशाला पिऊ?"

- सर्किट

आजानुकर्ण's picture

22 Oct 2007 - 8:35 am | आजानुकर्ण

अगदी हेनिकेन आणि बडवायजरची तुलना केली तरी रावसाहेबांच्या शब्दात तंदूर चिकन आणि उकडलेले रताळे असे म्हणावे लागेल.
किंगफिशर सुध्दा चांगली असते.

हा... गेले ते दिन गेले.

(व्यसनमुक्त) आजानुकर्ण

प्रमोद देव's picture

22 Oct 2007 - 8:51 am | प्रमोद देव

लेख आणि छायाचित्रे मस्तच आहे. का कुणास ठाऊक पण तुमच्या वर्णन शैलीमुळे आम्ही तुमच्या सह वर्तमान तिथे उपस्थित(त्या वासाचा मात्र त्रास झाला हो) आहोत असे सारखे वाटते. हे तुमच्या लेखनशैलीचे(शैला चे नव्हे बरं का!)वैशिष्ठ्य आहे.
बाकी हे परदेशी लोक कसले कसले उत्सव साजरे करतील ह्याचा काही नेम नाही. पण करतात ते अगदी 'जंक्शन' असते.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत

(बारा महिने श्रावण पाळणारा)प्रमोद देव

बेसनलाडू's picture

22 Oct 2007 - 9:22 am | बेसनलाडू

लेख आणि छायाचित्रे मस्तच आहे. का कुणास ठाऊक पण तुमच्या वर्णन शैलीमुळे आम्ही तुमच्या सह वर्तमान तिथे उपस्थित(त्या वासाचा मात्र त्रास झाला हो) आहोत असे सारखे वाटते. बाकी हे परदेशी लोक कसले कसले उत्सव साजरे करतील ह्याचा काही नेम नाही. पण करतात ते अगदी 'जंक्शन' असते.

(सहमत!)बेसनलाडू

गुंडोपंत's picture

22 Oct 2007 - 9:00 am | गुंडोपंत

वा मजा आला!
काय वियरच्या नद्या हो ह्या!
वा वा! मला घेऊन चला हो तिकडे कुणीतरी!

किंवा इथेच बियर डे चालू केला तर कसे?
"मास म्हणतात आणि मास म्हणजे १ लिटरचा जंबो जगच असतो "

ज्योतिष्यात मास म्हणजे महिना!
म्हणून
किंवा बियर मंथ कसे वाटते?

"महात्मा बियर डे" तात्या हे नाव कसं वाटते ?

किंवा ''महात्मा सोम डे' पण चालेल...

करा रे सुरू कुणी तरी...

"फक्त म्युनशन मधल्याच ब्रुअरीजना या जत्रेत बिअरचे स्टॉल लावता येतात."
क्या बात है! नशीब च्यायला तिथे भय्ये नाहीत नाही तर ते तिथेही आपली भट्टी लावून "इधरही का माल है ना बबबु" म्हणून चालू व्हायचे!

असो,
बव्हेरियाला राजाही होता ना? त्याचे काय झाले? की क्रांती मध्ये ते घराणेही नामषेश झाले?
राजाचा उल्लेख उद्घाटन संदर्भात दिसला नाही म्हणून विचारतोय.

आपला
बियरपंत

सहज's picture

22 Oct 2007 - 9:12 am | सहज

>>बव्हेरियाला राजाही होता ना? त्याचे काय झाले? की क्रांती मध्ये ते घराणेही नामषेश झाले?

ती तर मस्तच कथा आहे. एक स्वतंत्र लेख होईल. ह्या लुडविकने असेल नसेल तो सगळा पैसा बव्हेरीयात नवनवीन राजवाडे बांधण्यात खर्चीला. :-) शेवटी म्हणे बुडून मेला (वय ४० वर्षे) पण कारण संशयास्पद.. जिथे बुडाला तिथे गुढघाभरच पाणी होते...आता बोला. :-)

येथे वाचा

गुंडोपंत's picture

22 Oct 2007 - 9:34 am | गुंडोपंत

चला!

सांगा आता राजाची गोष्ट!
वाट पाहतोय...

आपला
गुंडोपंत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Oct 2007 - 6:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला आणि छायाचित्रेही मस्तच आहे.
आपण केलेल्या बिअरच्या वर्णनाने मात्र आमचा अस्वस्थपणा वाढला आहे ! :)
एक लिटरचा बीअरचा जंबो जग तिथे आहे, पण त्याच्याबरोबर आम्हाला चखना म्हणून तिथे चिकनचे पीस मिळतील का ? :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

22 Oct 2007 - 7:14 pm | विसोबा खेचर

एक लिटरचा बीअरचा जंबो जग तिथे आहे, पण त्याच्याबरोबर आम्हाला चखना म्हणून तिथे चिकनचे पीस मिळतील का ? :)

हेच विचारतो! :)

तात्या.

चित्रा's picture

23 Oct 2007 - 12:01 am | चित्रा

स्वाती लेख आवडला. तुम्ही सर्वांनी धमाल केली असणार. असो.

पोमीज्, वुर्ष्ट म्हणजे काय?
राडलर(बिअर+ कोला/फँटा/स्प्राईटचे मिश्रण) ,आफेलशोर्ल (ऍपल ज्युस +सोडावॉटर) हे कळले (बाय द वे, यातील घटकांचे प्रमाण कसे असते? - म्हणूनच म्हटले की एक लेख पाककृतींवर लिहायचा विचार कर). मला या एकंदरीतच पाश्चात्य लोकांचे हे एक आवडते की प्रत्येक गोष्टीचे नामकरण करणे. शब्दसंपत्ती केवढी वाढत असेल. शोर्ल म्हणजे काय?

स्वाती दिनेश's picture

26 Oct 2007 - 11:59 am | स्वाती दिनेश

मित्रहो,
आमच्याबरोबर जत्रेला आलात आणि जत्रा आवडली ,आवडते आहे हे सांगितलेत. अनेक धन्यवाद!
जत्रा-२ मध्ये तुमच्या बर्‍याचशा प्रश्नांची उत्तरे आहेत, त्यामुळे इथे त्यांची पुनरुक्ती आणि रसभंग टाळते आणि लवकरच, जत्रेत पुढे काय काय केले ते मिपावर चढवते.
स्वाती