मी आताशा ठरवुनच टाकलंय,
पुढचं प्रेम या डॉक्टरवरच करायचं.
सगळे दात काढले तिनं,
तरी तिच्यावरच मरायचं.
मी आताशा ठरवुनच टाकलंय...
एक दिवस काय झालं,
बासुंदी पिता पिता हाटेलात
पुढचा एक दात कर्रकन हलला
मला वाटलं त्याचा बेरिंगच निसटला
घरी येता येता दवाखान्यांत गेलो
तिथली रांग पाहुन मनोमन सुखावलो
बाहेर एक बाउन्सर बहुधा कंपाउंडर असावा
आत नाही जमलं की इथंच उपटत असावा.
शेवटी माझा नंबर आला, हळुच आत गेलो
बेसिनमधले गोरे हात पाहुनच गार झालो
या हातानी एक काय चार दात काढा
जमलं तर भरुन द्या मागच्या दोन दाढा
'येस,प्लिज, य, खुर्चीवर बसा,' आवाज बरा नव्हता,
काळी तिन पांढरी दोनच्या मध्ये अडकला होता
काय झालंय ते विचारलं, तेंव्हा बरं वाटलं
खुप दिवसाचं दुख: एकदम घशात साठलं,
भारावुन म्हणलं, सगळेच दात दुखतात
तोच खर्रारा आवाज, 'इथंच सगळे चुकतात '
मी म्हणलं, चुकत असेल तर चुको लाख बापडं
आवाज बरा नसला तरी छान असावं रुपडं
मागुन येउन तिनं हनुवटी धरली
दाढी न केल्याची मलाच लाज वाटली
ग्लोव्हज मधुन देखील तिला टोचु नयेत केस
परतफेड म्हणुन उद्या ड्ब्बल करेन फेस
तो स्टिलचा आकडा, डोळ्यासमोर आला
प्रेम बिम विसरा,मला माशाचा हुक वाटला
मासा तर घाबरेलच असा हुक पाहुन
मी मात्र सावरलो मागची बोटं पाहुन
' अरे अरे, फार त्रास असेल ना ?'
जेवताना सारखं अवघड होत असेल ना ?
सताड उघड्या तोंडातुन ग्वाँ ग्वाँ आवाज आला
सवयीनं तिच्या मेंदुनं पटकन संदेश टिपला
शेवटी तो हुक दुख-या दातावर विसावला
त्याचा थंडपणा मला कण्यापर्यंत जाणवला
ओरडता येत नसल्यानं मी तोंडच हलवलं
तिथंच मला गो-या बोटातलं बळ जाणवलं
दोन मिनिटं तिच्या बोटांचा खेळ चालु होता
त्याचवेळी चुकार बटा खाली पडत होत्या
त्या सगळ्याचा अंत खरंच सुखात होता
आता एक खड्डा माझ्या मुखात होता
रक्ताळलेल्या बोटानीच तिनं कापुस दिला
'पाच मिनिटं धरा ' पुन्हा खर्रारा आला
मग थोडा सावरुन बसलो समोर येउन
ती ही बसली खुर्चीत, मास्क काढला ठेवुन
ती पाहताच बाला, जबडा उलुशिक हलला
क्रुकेड दात तिचा,तिच्या ओठावर दिसला,
नालायक तो दात तिला अस्सा टोचत असेल
शाप दिला त्याला तुझ्यात कच्ची मटकी फसेल
समोरच्या कागदावर फक्त तीन लाईनि दिसल्या
आवाजात देव तर अक्षरात मास्तर फसला,
'ह्या सकाळी आणि ह्या रात्री दोन घ्या;
आज आणि उद्या फक्त थंडच काही प्या'
कागद हातात घेताना, थोडासाच झालेला स्पर्श
घाण अडकलेल्या नखांना दुर्मिळ असा हर्ष
' माझा दात मिळेल का , शेवटचा पाहायला
एवढी वर्षं घातलं होतं कोलगेटनं नाहायला
पटकन उठली तशी, खुर्ची मागं करुन
वळली गर्रकन तिथंच ओढणी वर ओढुन
स्टिलच्या ट्रे मधुन एक दात उचलला
कापसात ठेवुन हळुच माझ्या पुढे ठेवला
मग तोच खर्रारा पुन्हा एकदा घुमला
'जपुन ठेवा तुमच्याकडं, व्यवस्थित चांगला,
असा दात काढलेला जसा नागाच असतो
प्रेमात आलं आड कुणी तर कचकन चावतो,
असल्या भ्याड कल्पना कधी पटत नाहीत
तेंव्हा मात्र दात ठेवला खिशात कापसासहित
भिती आहे उद्या दुसराच कुणी येईल
माझे सगळे दात एकदम सुधारुन देईल
दुसरा एखादा दात दुखरा नाही याचं दुखः होतंय
नेक्स्ट व्हिजिट परवाच आहे याचं बरं वाटतंय
वाटलं इथंच विचारावं तोंड उघडुन एकदा,
पण बिल पाहुन म्हणालो,
च्यायला एका दाताला ५००/- बराय तुमचा धंदा.
प्रतिक्रिया
20 Mar 2012 - 10:19 pm | सूड
'देवा मला रोज एक अपघात कर, आणि तिच्या हातून जखमा या भर ' हे गाणं आठवलं.
20 Mar 2012 - 10:28 pm | यकु
हाहाहाहा
=))=))=))
दातांच्या डॉक्टरनी फारच प्रेमळ असतात ब्वॉ ;-)
माझे तर या वयातच दोन दोन दात पडले आहेत
* अधोरेखित शब्द काळजीपूर्वक वाचावा, पडले आहेत कुणीही पाडले नाहीत ;-)
20 Mar 2012 - 10:29 pm | प्रचेतस
तंबाखू फार खाता काय?
20 Mar 2012 - 11:12 pm | यकु
नाही, आपल्या परममित्रांएवढी नाही ;-)
20 Mar 2012 - 10:46 pm | किसन शिंदे
=)) =)) =))
आम्हाला आमच्या एका मित्राची आठवण आली. बिचारा त्या डेंटिस्टकडून आल्यापासून गजला काय लिहतो, गाणी काय गातो. :)
20 Mar 2012 - 10:53 pm | प्रचेतस
जणू हे गीत त्याच मित्राला डोळ्यांसमोर ठेवून लिहिलंय इतकं जिवंत झालंय. अर्थात तो गझला लिहितोय, गाणी गातोय पण एक हात कायम त्या दुखर्या बाजूच्या गालावर ठेवूनच.
20 Mar 2012 - 11:01 pm | धन्या
किंबहूना त्या मित्राला मराठी काव्यप्रकार हाताळता येत नसल्यामुळे त्याने आपली व्यथा मराठी कवितेतून लिहिण्याचे काम पन्नासरावांना आऊटसोर्स केले असावे असे वाटते. ;)
पन्नासरावांनी काम अगदी चोख बजावले आहे. :)
त्या (हनुवटीखालील) बोकडछाप चुकार केसांना दाढी म्हणतात?
20 Mar 2012 - 11:04 pm | प्रचेतस
आवरा.
20 Mar 2012 - 11:51 pm | अत्रुप्त आत्मा
@त्या (हनुवटीखालील) बोकडछाप चुकार केसांना दाढी म्हणतात? >>> मेलो मेलो... धनाजी... आय आय आय...
21 Mar 2012 - 1:00 am | मोदक
:-D
21 Mar 2012 - 8:35 am | सूड
पुण्यात नाही का चहाला 'अमृततुल्य' म्हणतात तसंच ते. बरं असे लोक सारखं 'दाढी करायला हवी, वाढलीये' असं ऐकवून दाखवतात.ज्याला ऐकवतात तो मात्र मनात म्हणत असतो, 'माताय, या दाढीला हा वाढलेली दाढी म्हणतो ? मी शेव्ह केल्यानंतर माझी दाढी दोन दिवसात येवढी वाढते.'
21 Mar 2012 - 9:44 am | मोदक
जळजळ पोहोचली...
कोणताही विषय ओढून ताणून आणि दुसर्याच्या खांद्यावर भार टाकून *पुण्यविषयावर शरसंधान करण्याच्या मनोवृत्तीवर काय बोलावे..?
तुमच्या कंपनीने बदलापूरात शाखा का नाही काढली हो..? ;-)
*पुण्यविषय हे पुण्यनगरीचे पेशवेकालीन / शिवकालीन नाव आहे.
21 Mar 2012 - 9:51 am | प्रचेतस
चूक.
पुण्यविषय नव्हे, पुण्यकविषय. शिवाय हे नाव शिवकालीन अथवा पेशवेकालीन नव्हे. ते त्याहूनही प्राचीन. ९ व्या शतकात मिळालेल्या काही ताम्रपटांवर पुण्याचा 'पुण्यकविषय' असा उल्लेख आढळतो. नंतर यादवकाळात त्याचे पुनवडी असे अपभ्रष्ट रूप झाले व नंतर पेशवेकालात ते आजच्या पुणे ह्या नामाप्रत पोहोचले.
21 Mar 2012 - 9:56 am | प्यारे१
मोदक, गाव कुठलं रे तुझं????
पुण्याच्या चहाबद्दल पक्षी कुठल्याच गोष्टीबद्दल कुणी बोलूच नये का? पुण्याचं पुणेरीपण र्हायलंय का अशानं ते तरी बघा जरा.
साला बुरख्याच्या आत मिनी स्कर्ट अशी अवस्था आहे पुण्याची.
संस्कृती (म्हणजे काय कुणास ठाऊक) सोडवत नाही आणि उधार कॉस्मोपॉलिटनपणाची बक्कळ आवड.
हे म्हणजे आपलं ते हे झालं की.... एकाच्या हातात हात नी डोळा घालणार तिसर्यालाच.
पुण्यात कुणी बोलावलेलं का असा अपेक्षित प्रश्न विचारणारांना फाट्यावर सुद्धा मारले जाणार नाही. ;)
21 Mar 2012 - 5:19 pm | मोदक
कंपू.. कंपू.. ;-)
21 Mar 2012 - 1:36 pm | सूड
>>तुमच्या कंपनीने बदलापूरात शाखा का नाही काढली हो..?
शाखा काढायला हरकत नाही हो, पण 'पुण्यकविषया"वर बोललं की तिथले लोक त्यांच्याच विषयी सगळं चाललं आहे असं समजून जसं तरातरा धावत येतात तसे बदलापूरातले येत नाहीत. ते बरेच वास्तवात वावरतात. कानाची भोकं राहून तिथले काप गेलेत हे त्या लोकांना मान्य असतं. 'पुण्यकविषया'तले लोकच निराळे, मिशीला कोकम लावून तूप सांगत हिंडण्यात स्वारस्य असतं त्यांना. त्यामुळे बदलापूरात शाखा काढून काहीही उपयोग नाही. ;)
21 Mar 2012 - 5:23 pm | मोदक
>>>बदलापूरात शाखा काढून काहीही उपयोग नाही..
पुण्यात शाखा काढली आहे म्हणजे इकडे उपयोग होतो आहे म्हणायचा... :-)
20 Mar 2012 - 10:48 pm | अत्रुप्त आत्मा
वाहव्वा... वाहव्वा... पन्नसराव... काय बेक्कार दात काढायची संधी दिलित हो...
लै मज्जा येणार आता....
आनंदी आनंद गडे, येतात का पाहू ते इकडे
@दोन मिनिटं तिच्या बोटांचा खेळ चालु होता
त्याचवेळी चुकार बटा खाली पडत होत्या>>>
त्या सगळ्याचा अंत खरंच सुखात होता
आता एक खड्डा माझ्या मुखात होता >>> कळ्ळे हो आम्हास कळ्ळे.. ;-) अता बघु येतात का इकडे..?
21 Mar 2012 - 1:07 am | मोदक
बुवा.. ए चॉलबे ना...
सुपारी घेतली एकाने.. काम पूर्ण केले दुसर्याने.. (आणि आता श्रेय घेतोय तीसरा ;-))
20 Mar 2012 - 11:06 pm | पैसा
माझ्या एका दाताला पुरुष दंतवैद्याने कालव्यासाठी खड्डा केला होता त्याने हळूवार हाताने आपलं काम केलं. काही त्रास नंतर झाला नाही. पण पुढच्या वेळेला तो गावाला गेल्यामुळे एका दंतवैदिणीकडे जायचा प्रसंग आला. तिने आईच काय आज्जीची आठवण करून दिली. पुढचे ४ दिवस गालावर हात धरून बसून रहावं लागलं. तात्पर्यः दंतवैद्य वैदिणींपेक्षा हळूवार हाताने काम करतात.
इथे एक गोष्ट लक्षात घ्या. साक्षात दंतवैदिणीचाच दात वाकडा का बरं?
21 Mar 2012 - 12:44 am | मोदक
>>>दंतवैद्य वैदिणींपेक्षा हळूवार हाताने काम करतात.
हरकत नोंदवतो.. (ऑब्जेक्षन... च्या चालीत वाचावे..) ;-)
आमच्या परममित्राचा अनुभव तुमच्या अनुभवाच्या एकदम विरूध्द आहे.
21 Mar 2012 - 6:25 am | स्पंदना
अहो परम मित्राचा अनुभव, अन परम मैत्रीणीचा अनुभव एकच आहे, पण ते दोघे विरुध्द लिंगी असल्याने तो तुम्हाला विरुद्ध वाटतोय.
21 Mar 2012 - 9:15 am | चौकटराजा
हितं लिंगवाद कयापायी आन्ता वो ? हे दात काड्न्याच येक धंदा हाय ! तिनी बक्क्ळ पाचशाचं ब्यील लावल का नाय ? आसा ईषय परात काल्डाना
ना मंग आमची प्वारं आनतो काचा फोडाया !
21 Mar 2012 - 4:32 pm | स्पंदना
चौकट राजाजी जरा चौकटीतुन बाहेर या ना हो? का इतके गरम होताय?
आता स्पष्टीकरण, त्याच अस आहे, की वैद्यीन बाईंच्या हाताने परम्मित्राला कस गार वाटल, पण त्याच परिस्थितीत, परम मैत्रीणीला दोन दिवस वेदना झाल्या? का? कारण गरिब बिचारा ग, अस कळवळुन वद्यीन बाईंनी जरा हल्क्या हातान परम मित्राला ट्रीट केल असाव , पण हीच नाक माझ्या पेक्षा चांगल कस , वा अश्याच तस्तम विचारान परम मैत्रीणीच्या ट्रीटमेंट मध्ये जरा हात जड झाला असावा. अन हाच फरक जेंव्हा मैत्रीण बाई वैद्यबुवांकडे गेल्या तेंव्हा पडला असावा...मी काय लिहिते आहे? ओ माय गॉड, लिव्ह इट.
21 Mar 2012 - 7:11 pm | धन्या
माया साराभाई काकूंची आठवण करुन दिलीत. ;)
22 Mar 2012 - 9:18 am | चौकटराजा
आवं, ह्ये गराम व्हनं आमचं न्हाई . येक फोन आला सोंस्क्रुति राखनार्या कून . म्नन्ला आमी सदश्य न्हाई .तवा तुमच्या बुरूजावनं आमच्ची तोप
डागा. न्हाईतर तुमचीच चौकट उखडून पाडू. मंग आमी घाबारलो आन...................
21 Mar 2012 - 1:16 am | JAGOMOHANPYARE
छान
21 Mar 2012 - 1:25 am | सुहास..
हा हा हा हा हा
लई भारी !!
आले लगेच वाचायाला की काय लिहीलय डाक्टरीण विषयी ;)
21 Mar 2012 - 6:30 am | स्पंदना
पयल्या कडव्यातच गारद! हसुन हसुन पुरेवाट!
मी परवा एका हँडसम दंतवैद्याकड गेले होते. आपुन एकदम सरळ बोलेला, इतना हँडसम मानुस, इधर काय कु मिलनेका? डॉक्तर बोला, नेक्स्ट जनम मे फिट करते है, ये टाइम दात पे काम चलाते है।
सच्ची! चाहे तो अक्षय को पुछो। हस हस के वो गोलपोल हुआ था!
21 Mar 2012 - 9:08 am | चौकटराजा
तुमच्या सारखाच अनुभव मला आला होता. जरासाच वेगळा. शरीर शास्त्र विषयक प्रदर्शन होते. ती बी जे ला असावी. फार फार म्हंजे फारच सुंदर.
तिच्या समोर फॉरमॅलिन चोपडलेले काही अवयव पडले होते. पटकन तिने जठर उचलले. " हे स्टमक. ही एच सी एल सिक्रेट करणारी आउटलेटस " तिचे चालू होते. मी ते स्टमक धरलेल्या गोर्यापान हाताकडे पहात होतो. फॉरमॅलिन चा वास शरीराला दोन दिवस टिकला पण त्या
रूपाचा दरवळ अजून काही जात नाही. पुण्यातच प्रॅक्टीस करीत असेल काय हो ? की बोस्टनला ?
आपली कविता मस्त आहे .थोडी लांबलेली वाटते. पण कोणत्याही विषयाचे बंधन काव्याला नसते याचे हे उत्तम उदाहरण आहे. तुम्ही मला जाताना
का घेउन गेला नाही . मी आता कायम तुमच्यावर दात धरणार .
चौ रा.
ता. क.- आर तिज्यायला ती पण आता साठीला आली असेल नाही. तिचेही एक दोन दात काढले असतील का ?
21 Mar 2012 - 8:32 am | स्पा
बाब्बो,,,,,, ठ्ठो !!!!!
__/\__
क लिवलंय क लिवलंय
ती पाहताच बाला, जबडा उलुशिक हलला
क्रुकेड दात तिचा,तिच्या ओठावर दिसला,
नालायक तो दात तिला अस्सा टोचत असेल
शाप दिला त्याला तुझ्यात कच्ची मटकी फसेल
खॅ खॅ खॅ =)) =)) =))
21 Mar 2012 - 9:22 am | प्यारे१
५० फक्त मस्त मस्त....!
याला 'वयात येणं' म्हणायचं का???? ;)
21 Mar 2012 - 9:28 am | जेनी...
हर्षद एक्दम भन्नाट ..खूप खूप आवडलं.:D
सगळ्या ओळि मिश्किल पणान तुडुंब भरलेल्या ,
त्यात फक्त ह्या खालच्या ओळि जरा अनुरुप वाटल्या .:(
मग तोच खर्रारा पुन्हा एकदा घुमला
'जपुन ठेवा तुमच्याकडं, व्यवस्थित चांगला,
असा दात काढलेला जसा नागाच असतो
प्रेमात आलं आड कुणी तर कचकन चावतो,
बाकि एकदम खल्लास .......:P
21 Mar 2012 - 9:36 am | धन्या
हे जरा समजावून सांगा ना. :)
21 Mar 2012 - 9:53 am | जेनी...
नक्तंदिनानि मे यान्ति कथंभूतस्य संप्रति।
दु:खभाङ् न भवेत्येवं नित्यं सन्निहितस्मृति:॥
हे आधी समजावुन सांगा मग सांगते :P
21 Mar 2012 - 9:53 am | जेनी...
नक्तंदिनानि मे यान्ति कथंभूतस्य संप्रति।
दु:खभाङ् न भवेत्येवं नित्यं सन्निहितस्मृति:॥
हे आधी समजावुन सांगा मग सांगते :P
21 Mar 2012 - 10:32 am | धन्या
अष्टांग हृदयम्, सुत्र २, श्लोक क्र. ४६,४७
श्लोकाचा मतितार्थ असा आहे की देश, काल आणि परिस्थितीनुसार आपलं वर्तन ठेवलं तर त्रास होत नाही. अधिक माहिती हवी असल्यास जालावर शोधावे. :)
21 Mar 2012 - 1:20 pm | सुहास..
देश, काल आणि परिस्थितीनुसार आपलं वर्तन ठेवलं तर त्रास होत नाही >>>
ही ओळ काव्य कर्त्या साठी आहे का ;)
21 Mar 2012 - 3:35 pm | धन्या
नाही. मात्र ज्यांना नजरेसमोर ठेऊन हे काव्य जन्माला घातलं आहे त्यांना हा उपदेश नक्की उपयोगी पडेल. :)
21 Mar 2012 - 11:38 am | मालोजीराव
एक दात काढायचे ५०० रु आणि त्या मानाने प्रगती खूपच स्लो होती...फक्त हस्तस्पर्श जाहला ;)
ओ पन्नासराव पुढच्या वेळी भारती विद्यापीठला या आमच्या इथे डेंटल ला...५०-१०० रु मध्ये काम होईल...आणि आपली 'सेटिंग' पण आहे !
- मालोजी
21 Mar 2012 - 4:26 pm | गणेशा
भारी झालीये कविता.
बिचार्या परम मित्राचे सगळे दात तिने काढले तर मग बोळक्याच्या प्रेमात ती पडेल का ?
मस्त
21 Mar 2012 - 6:47 pm | अमोल केळकर
मस्तच :)
अमोल केळकर
21 Mar 2012 - 8:47 pm | रेवती
छान. वाचून गंमत वाटली.
22 Mar 2012 - 2:10 am | प्रभाकर पेठकर
बापरे! बधीर न करताच दात काढला? की डॉक्टरणीला पाहूनच तुम्ही 'बधीर' झाला होतात?
एकदा एका (पुरूष) दंतवैद्याने माझ्या दुखर्या दाताला काढण्यासाठी बधीरतेचे इंजेक्शन दिले. पण बहुदा चुकीच्या दातांखाली दिले. थोड्या वेळाने मला जाणवले दुखरा दात (आता कमी पण..) अजून दुखतोच आहे आणि शेजारचा दात बधीर झाला आहे. मी दंतवैद्याला तसे सांगितले तर त्याने अजून १० मिनिटे मला वाट पाहायला सांगितली. तेवढ्या वेळात बधीरतेचे औषध ओसरु लागले आणि दुखरा दात जास्त दुखु लागला. शेवटी माझा नंबर आला तेंव्हा मी दंतवैद्यास तसे सांगितलेही पण त्याने, ' पाहू जरा' करून माझ्या जबड्यात पकड घातली तो दात धरला आणि तो उपटायला लागला. माझ्या मस्तकी कळ गेली. मी 'उंहू' 'उंहू' करीत प्रतिकार करायचा प्रयत्न केला पण 'अहो, थांबा, ओरडता काय' असे म्हणत शहाण्याने तो दात, बधीरता उतरल्या अवस्थेत, उपटून काढला. 'हा बघा...' दंतवैद्य मला दात दाखवत होता मी डोळे गच्च्च्च्च्च्च मिटले होते. मरणप्राय वेदना शमण्याची वाट पाहात होतो. मिनिटभराने जरा सावरलो.
ह्या अनुभवानंतर दंतवैद्य म्हंटल्यावर (वैद्य असो अथवा वैद्यीण) मी चार हात दूर राहणेच पसंद करीत आलो आहे.
22 Mar 2012 - 9:27 am | चौकटराजा
पेठकर काकांची दंतवैद्याशी उलीशिक लढाई झाली व गडबडीत त्याने काकांचा नीट असलेलाच दात काढला व परत ५०फक्त सारखे ५०० रूपये
काकांवर ठोकले.
22 Mar 2012 - 3:34 pm | चिगो
कविता झक्कास, पन्नासराव.. सुंदर दंतवैद्यिणी लै महागात कापतात, हे मात्र खरं..
23 Mar 2012 - 3:40 pm | चौकटराजा
कारन की त्या दाकतरनी " चिगो बुटी पारलर" मदी जात्यात . ( चिगो यानेकी चिकनी गोरी .असा आर्त येक सामजिक कार्यकर्ता याने सांगित्ला )) त्यो सम्दा खर्च कुनाकडून वसूल करनार ? म्हंजी भारी यारडले चा सूगंधी माल त्येनी वापरायचा. आनि वास फुकाट प्येशंटनी घ्यायचा . नाय ये बराबर नाय !
23 Mar 2012 - 12:09 pm | प्रास
पन्नासराव, मस्त कविता लिहिलीयेत बरंका.....!
आवडली.
एक प्रश्न - तो मेला दात 'बासुंदी' पिता पिता कसा काय कर्रकला?
24 Mar 2012 - 11:50 am | पिंगू
प्रासबुवा, बासुंदी भलतीच कडक होती... ;)
- पिंगू
24 Mar 2012 - 11:53 am | पिंगू
मी पुन्हा दर्द-ए-दातांचा इलाज करायला कोणा दंतवैद्याकडे आणीबाणीची अवस्था आली तरच जाईन. कारण दंत वैद्य/वैद्यीण दोघांनी माझे दात कोरून काढले आणि वरुन भक्कम बिले लावली..
आय हेट दंतोबा..
- पिंगू
24 Mar 2012 - 1:01 pm | विदेश
आवडली . एकदम मस्त कविता .
16 Jan 2013 - 10:23 am | मोदक
आमच्या एका मित्राची दाताची ट्रीटमेंट सुरू आहे.. त्याच्यासाठी हा धागा दृष्यमान करता का फ्लीज..?
बेस्ट लक रे बिनमोल. :-D
16 Jan 2013 - 10:57 am | सूड
दाताची ट्रीटमेंट सुरु असणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा !!
17 Jan 2013 - 4:18 am | रेवती
मलाही अमोलचीच आठवण आली.
17 Jan 2013 - 1:56 am | शुचि
मस्त!!!
17 Jan 2013 - 2:08 am | अभ्या..
हायला गाववाल्याची व्यथा गाववालाच जाणे.
५० राव अगदी परफेक्ट ओ.
अगदी शेम 'बेसिनमधले गोरे हात'
आवाज मात्र एक्दम राणी मुखर्जीची आठवण करुन देणारा.
हाय हाय. गेले ते चार दात. :(
17 Jan 2013 - 8:27 am | स्पंदना
आता दात धरुन काय फायदा?
17 Jan 2013 - 8:46 am | ५० फक्त
गेले ते दात, राहिले ते सुळे
17 Jan 2013 - 10:19 am | अजया
अशा प्रतिक्रिया वाचुन माझ्यासारख्या दंतवैद्यिणीचा भडका उडला असुन बधीर न करता दात पाडण्यची इच्छा होत आहे ;)
17 Jan 2013 - 10:35 am | पैसा
समोर कोण आहे? मिपाकर आहे का विचार आणी पाड बिनधास्त!
17 Jan 2013 - 2:48 pm | अजया
आयडिया वाईट नाही, पैसा ताई ! आता मिपाकरान्चे माझ्या दवाखान्यात स्वागत आहे!
17 Jan 2013 - 3:46 pm | ५० फक्त
एक तर पत्ता द्या अन वेटिंग एरियात एक वेगळं बाकडं करुन घ्या, 'मिपाकरांसाठी फक्त'
17 Jan 2013 - 10:19 pm | अजया
बधीर न करता दात काढल्यावर ठो ठो ओरडणार्या मिपाकरान्चा कट्टा माझ्या क्लिनिकला भरवायला मजा येईल.वेटिंग एरिया तेवढा साऊन्ड प्रुफ करावा लागेल.आमच्या रसायनीला ध्वनी प्रदूषणाचा त्रास नको !
17 Jan 2013 - 10:38 am | सूड
अच्छा..!! तुम्ही दंतवैद्यिण आहात तर !!
17 Jan 2013 - 11:02 am | स्पा
वर्ष सरले ;)
जुन्या आठवणी ताज्या झाल्या
-- ( रूटकॅनलच्या आठवणीत रमलेला ) स्पा
17 Jan 2013 - 11:18 am | श्रिया
कविता वाचताना खूप धमाल वाटली. नेक्स्ट विज़िट वरती पण एक कविता येऊ द्यात.
@"भिती आहे उद्या दुसराच कुणी येईल
माझे सगळे दात एकदम सुधारुन देईल"
ही भीती खरी ठरली का?
17 Jan 2013 - 10:37 pm | मदनबाण
सुंदर कविता ! ;)
मला माझ्या लेडी डॉकची आठवण झाली ! ;) लयं ग्वाड बोलती... :) ३ दाढा तिच्याकडुनच वाचवल्या आहेत ! :)
पहिल्याच ट्रिटमेंट वरुन ठरवले की पुढच्या २ खेपा इथेच माराव्या ! :)