बोंबाबोंब...

चिगो's picture
चिगो in जनातलं, मनातलं
2 Mar 2012 - 2:03 pm

प्रेरणा: http://www.misalpav.com/node/20863 हा धागा..
खरं तर ह्यावर प्रतिक्रीया देवून थांबणार होतो, पण "अंगापेक्षा बोंगा जड" होईल म्हणून म्हटलं वेगळा धागाच काढूया.. (त्यातल्या रणजितजींच्या प्रतिसादावरुन शिर्षक सुचलंय. "अभ्यासु" टायपातलं आणि विषयाशी फारसं निगडीत नाही, त्यासाठी सॉरी बॉस.. ;-))

**************************************************************

माझ्या मेघालयावरच्या लेखावर प्रतिक्रीया देणार्‍या काही जणांनी इथल्या जेवण-खाणाबद्दल विचारलं होतं. आसामप्रमाणेच इथेही मुख्य खाद्य म्हणजे भात.. दुध आणि दुग्धजन्य पदार्थ फारसे नसतात. (खरंतर बाहेरुन आलेले आमच्यासारखेच लोक ते वापरतात. मुळ लोकांच्या जेवणात हे सगळे जवळजवळ नाहीतच.) मांसाहारामध्ये मुख्यतः "पोर्क", मासे (मैदानी भागात जास्त) आणि कोंबड्यावर भर असतो. (माझ्या आधीच्या अधिकार्याला एका नोकमाने दोन कोंबड्या भेट दिल्या होत्या. त्यांच्यापासुन पैदास वाढत वाढत आता माझ्या घराचा पार कोंबडीबाजार झाला आहे. ;-))

**************************************************************

ह्या धाग्यात मी ईशान्य भारताचा धावता आढावा तेवढा घेणार आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे माझा ह्या बाबतीत पुरेसा अभ्यास नाहीय, पण इथे राहील्याने जेवढं शिकलोय, त्यावर हे आधारीत आहे.

मी ह्यापुर्वी म्हटल्याप्रमाणे आपण एक मुळ चुक करतो, ती ह्या संपुर्ण भुप्रदेशाला "सिंगल एन्टीटी" मानण्याची.. तसं नाहीय. भौगोलिक दृष्टया इशान्य भारतात हिमालयाचा भाग, ब्रम्हपुत्रेचे खोरे आणि मैदान, आणि गारो-खासी-जैंतिया टेकड्या येतात. सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या ह्यात बौद्ध (सिक्कीम आणि अरुणाचलचा काही भाग), हिंदु (आसाम, मणिपुर आणि त्रिपुरा), मुस्लिम ( बांग्लादेश-भारत सिमा आणि इतर भाग), ख्रिश्चन ( मुख्यतः नागालँड, मेघालय, मणिपुर, मिझोराम) आणि काही मुळ जाती-जमाती ह्या समाविष्ट आहेत..

आता थोडं इतिहासात घुसूया.. इसवी सन १२२८च्या दरम्यान ह्या भागात अहोम आले. इंग्रजांनी इ. १८२६च्या इंडो-बर्मीज लढाईत त्यांना हरवेपर्यंत ही राजवट सुरु होती. त्यादरम्यान अहोमांनी मुघलांना १७ वेळा लढाईत धुळ चारली. टिव्हीवर गेंडा आणि वाघाचे कार्टून्स लुटूपुटूची लढाई खेळणारी अ‍ॅड पाहीली असेलच.. :-) (खरं तर, "पाणी पाजले" म्हणायला पाहीजे. कारण की ह्या विजयांमध्ये ब्रम्हपुत्र नदीच्या अलांघ्यतेचा फार मोठा हात होता.)

अहोम हे मुख्यत: शैवपंथी आणि शाक्तपंथी (शिबसागर येथील शिवमंदीर आणि कामाख्या देवी).. १६व्या शतकात श्री शंकरदेवांनी आसामात वैष्णवपंथाचा प्रसार करायला सुरुवात केली. त्यांच्यावर महाराष्ट्र आणि इतर भागातील भक्ती संप्रदायाचा प्रभाव असण्याचीही भरपुर शक्यता आहे, कारण की अहोमिया भाषेत अनेक मराठी-समान शब्द आढळतात. आता वैष्णव-धर्माचा प्रसार आणि प्रभाव वाढतो म्हटल्यावर अहोमांना उठावाची भिती वाटणारच, म्हणून मग त्यांनी त्याला दडपण्याचा प्रयत्न केला.. ह्या संघर्षातूम "मानमोरीया उठाव" झाला, ज्याला रोखण्यासाठी अहोमांनी त्यांचा ज्यांच्याशी वांशिक संबंध होता, त्या बर्मीज राजांशी संधान बांधले. बर्मातील राजांनी अहोमांना आसामातील उद्रेक दाबायला मदत केली, पण अती-महत्वाकांक्षेपायी ते आसामपलिकडे बंगालात सरकायला लागले...

इथे मात्र इंग्रज आणि अहोम-बर्मीज ह्यांच्यात ठिणगी पडली.. आणि इंडो-बर्मीज युद्ध होवून त्यात अहोमांचा पराजय झाला. १८२६च्या "यांदाबो तहा"नुसार अहोम राजवट संपुष्टात आली आणि आसामचा प्रदेश ब्रिटीशांच्या ताब्यात आला..

मात्र त्याआधीही आजच्या इशान्य भारतातील काही भाग ब्रिटीश अंमलाखाली (पुर्व बंगाल) आणि काही बाकीच्या राज्यांच्या ताब्यात होताच. (कुचबिहार, त्रिपुरा आणि मणीपुर).. अहोमांचा अंमल मुख्यतः ब्रम्हपुत्रेच्या उत्तर तीरावर होता.

असो. ह्यानंतर ब्रिटीशांना आसामात चहाचा शोध लागला. त्याआधी चीनमधुन युरोपात चहा पाठवण्याच्या प्रक्रीयेला जवळपास ३-४ वर्षे लागायची. आता मात्र इंग्रजांनी चहाची लागवड वाढवण्याचा सपाटा लावला. जो मागेल त्याला जमीन देण्यात आली.. पण अहोम-इंग्रज युद्ध, त्याआधीची मारकाट आणि रोगांचा उद्रेक ह्यामुळे आसामातील जनसंख्या प्रचंड कमी झाली होती. त्यामुळे ह्या चहा-बागानांना चालवण्यासाठी इंग्रज/बंगाली बाबु ह्यांना प्रचंद प्रोत्साहन दिल्या गेले. त्यांत राबण्यासाठी छोटा नागपुर, संथाल परगणा, आंध्र प्रदेश इथून आदिवास्यांना स्थलांतरीत करण्यात आले, त्याच आजच्या "टी ट्राईब्स.."

चहाचा धंदा हा मुख्यतः इंग्रज आणि बंगाल्याच्या हातात होता.. तसेच सद्य बांग्लादेशातल्या "मैमन्सिंग" ह्या भागातून मुसलामानांचेही भरपुर स्थलांतरण करण्यात आले. आजही आसामात मुसलमानांना "मैमनसिंघीया" आणि "मिया" (म्हणजे बंग्लादेशी) असे वेगवेगळे संबोधले जाते. मुघलांच्या स्वार्‍यामधे आलेल्या आणि तिथेच राहून गेलेले मुस्लिम हे आसामी समाजात पुर्णपणे मिसळून गेलेले आहेत. त्यांची आडनावेही हिंदुंसारखीच आहेत काही काही.. तसेच त्यावेळी आलेल्या शिखांच्या पुढच्या पिढ्यांपासून "अहोमिया सीख" ही एक वेगळीच जात तयार झालीय.. ;-)

आता हे चर्‍हाट मी का लावलंय? कारण की बोंब मारतांना आपण इतिहास एकतर बघत नाही, किंवा सोयिस्कररित्या विसरतो. अल्फा/उल्फाने जेव्हा आंदोलन केले तेव्हा त्यांनी "बाहेरच्यांना" हुसकावून लावायचा चंग बांधला. त्याचे म्हणणे होते की बाहेरचे लोक आसामच्या भरवश्यावर गब्बर होताहेत. (आजही बहुतांश चहा-कंपन्याचे कारभार कोलकातावरुनच चालतात) पण हे करतांना "बाहेरचे" म्हणजे कोण? ह्यात फरक पडत गेला. आधी विरोध फक्त "बांग्लादेशीं"ना होता. नंतर त्यात भारताच्या इतर भागातून आलेले (मुख्यतः बिहार, युपीचे लोक) ह्यांच्या विरोधात, असे ह्याचे स्वरुप बदलत गेले.. आसाम अकॉर्ड नुसार भारतात शिरलेल्या बांग्लादेशींना तीन प्रकारांत विभाजण्यात आले.

१. १९६५च्या आधी आलेले बांग्लादेशी, ह्यांना भारतीय मानण्यात गेले.

२. १९६५ ते १९७१ च्या दरम्यान आलेले बांग्लादेशी, ह्यांच्या बद्दल "फोरीनर्स कोर्ट" निर्णय देईल त्याप्रमाणे भारतात राहू दिल्या जाईल किंवा डिपोर्ट केल्या जाईल. (ह्या खटल्यांचा निकाल अत्यल्प प्रमाणात लागतो.) ह्या लोकांच्या नावापुढे मतदार यादीत D (for Doubtful) लिहील्या जातं. इलेक्शनच्या वेळी हे एक लै टेंशन/ कटकट आहे.

३. १९७१ नंतर आलेले बांग्लादेशी, ह्यांना सरळ परत पाठवण्यात येईल..

किती सोप्पं आहे ना? पण प्रश्न असा आहे की हे ठरवत बसण्यात वेळ घालवणार कोण आणि पुरावे-बिरावे कुठून आणणार? त्यात हे लोक लै म्हणजे लैच हुशार असतात. आता आसाम आणि मेघालयमध्ये "अमुक व्यक्ती ह्या गावचा रहीवासी असुन मी त्याला ओळखतो." हे प्रमाणपत्र गावबुढा किंवा नोकमा देत असतो आणि त्यानुसार मग पुढे कागदपत्रे/ कारवाई होते. (ह्याचा मुळाशी हा विश्वास असतो की गावबुढा/नोकमा हा तिथला मुळ निवासी/प्रतिष्ठीत असल्याने तो खरे प्रमाणपत्र देईल.)
आता हे प्रमाणपत्र मिळाल्यावर त्याच्या भरवश्यावर बाकीचेही मिळतात की.. (आसामातला एक ज्योक सांगतो. "कोण आसामी आणि कोण बांग्लादेशी हे कसं ओळखायचं?" "पुराच्या वेळी जर माणूस कपडे, भांडी, गुरं वाचवत पळत असेल तर तो आसामी.. आणि जर तो कागदपत्रांनी भरलेली बॅग वाचवत पळत असेल तर तो बांग्लादेशी! " ;-))

आता पुढची गंमत ऐका.. अल्फा/उल्फाने ज्या "उद्दात" हेतूंनी सुरुवात केली होती, त्यावर ती टिकू शकली नाही. बहुतांश अशा संघटनाप्रमाणेच तीही फक्त एक "एक्स्टॉर्शनिस्ट ग्रुप" बनली. इनफॅक्ट, मला बरेच जण बोलले आहेत की ह्या आंदोलनामुळे आसाम कमीत कमी वीस वर्षे मागे ढकलल्या गेला. कारण उल्फाच्या दहशती वगैरे मुळे एकतर उद्योगधंद्यांनी तिथून पळ काढला आणि नवीन उद्योगांनीही पाठ फिरवली. तसेच आसू/अगप ने बांग्लादेशींना "वर्क परमिट" द्यायला मनाई केली आणि त्यांना हुसकावून लावण्याचा चंग बांधला. (जे काही झाले नाही.) काही जाणकारांच्या म्हणण्याप्रमाणे हि चूक आज बांग्लादेशी घुसखोरांच्या "पॉलिटीकल वोटबँक/फोर्स" बनण्याच्या मुळाशी आहे. ह्याच आसाम आंदोलनाच्या काळात जन्माला आलेल्या राजकीय पक्षाचाही (असॉम गण परीषद) यंदाच्या निवडणूकीत बोजवारा उडाला.

मुख्य म्हणजे ज्या उल्फाने "बांग्लादेशीं" विरुद्ध सुरुवातीला हत्यारं हातात घेतली, त्याच बांग्लादेशात आता त्यांचे नेते लोक आश्रय घेताहेत.. ढाक्यात उल्फाच्या नेत्यांच्या इमारती आणि मॉल्सही आहेत म्हणे.. :-p

**************************************************************

आता जरा "जबरदस्तीच्या" ख्रिस्तीकरणाबद्दल बोलूया.. "जिओग्राफीक डिटरमेनिझ्म" म्हणून एक कंसेप्ट आहे. ह्यानुसार समाजाची रचना ही त्याच्या आजूबाजूच्या भौगोलिक परिस्थितीशी निगडीत असते. "मातृसत्तक पद्धती"चे कारणही फळबागांची व्यवस्था बघण्यात स्त्रियांची भुमिका आणि इतर गटांशी लढण्यात पुरुषांचा वाया जाणारा वेळ ह्याच्याशी लावला जातो.. सांगायचा मुद्दा हा, की इशान्य भारतात हिंदु धर्माचा प्रभाव हा मुख्यतः मैदानी भागात राहीलाय. डोंगरात राहणार्‍या मुलतः आदिवासी जमाती एकमेकांशी कट्टर वैर राखत जगत आल्याहेत.. नागालँड मधील नागाजमातींमधली "हेड हंटींग" प्रसिद्ध आहे. इंग्रजांनी अत्यंत व्यवस्थितपणे "इनर लाईन परमिट" द्वारे ख्रिस्ती धर्मप्रचारकांना केलेली मदत, ह्यामुळे ब्रिटीश काळात ख्रिस्ती-धर्माचा प्रचार चांगलाच जोरात झाला. मात्र त्यातही गोम आहे.. नागालँडमध्ये पाहिल्याप्रमाणे खुप सगळे, वेगवेगळे चर्चेस आहेत आणि त्यांच्यात भांडणंही आहेत..

ह्या ख्रिस्तीकरणाचा नेमका इथल्या मुळ जमातींच्या रितीरीवाजांवर काय फरक पडलाय हे मला ठावूक नाही.. कारण की अजूनही इथे मातृसत्ताक पद्धती कायम आहे. (ख्रिस्ती धर्म हा पुरेपूर पितृसत्ताक आहे, असं मला वाटतं.) त्यांच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धाही तश्याच आहेत हे त्यांच्याशी बोलतांना/ त्यांच्यात वावरतांना जाणवतं.. हां, काही फरक पडला असलाच तर तो म्हणजे भाषिक लिपी आता इंग्रजी झालीय आणि बाकीचा जो काही फरक आहे तो "मॉडर्नायजेशन"नी पडला असावा, फक्त ख्रिस्तीकरणाने नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे ख्रिस्तीकरणामुळे ह्या भागात इंग्रजी शिक्षणाचा प्रसार झालाय. मिझोरम हे राज्य साक्षरतेच्या टक्केवारीत केरळनंतर देशात दुसर्‍या स्थानावर आहे.

आता हळू-हळू हिंदू संघटनाही इथे धर्मप्रसाराचे कार्य करताहेत. माझ्यामते त्यात एक गोम आहे, ती म्हणजे ह्या संघटनांचे उद्देश्य "हिंदु धर्म" वाचवण्याचे आणि वाढवण्याचे आहे. पण इथल्या मुळ निवासींचा धर्म कुठला? आणि तो वाचवण्याचा प्रयत्न हिंदु असो वा ख्रिस्ती असो, कोणीच करत नाही.. माझ्यापुरतं बोलायचं झाल्यास, कुठल्याही धर्मापायी का होईना, इथल्या लोकांचे जीवन जर सुकर होत असेल तर बढीया है..

**************************************************************

आता मणिपुरातील अख्खी युवा पिढी अंमली पदार्थांच्या आहारी गेली आहे का, ह्या बद्दल माझ्याकडे कसलाही विदा/ माहिती नाहीये. भारत-म्यानमार बॉर्डर वर "प्रेशिअस स्टोन्स" सोबतच ड्रग्सचीही तस्करी होते हे ऐकिवात आहे. आणि अरुणाचलच्या पहाडांमध्ये अंतर्गत भागांत गांजाची लागवडही होते. तिथल्या काही जमाते ह्याच्या रोपाच्या रेशांपासुन वस्त्रे विणतात, हे वाचलेले आहे.. ह्याबद्दल फारशी माहिती नसल्याने "नो कमेंट्स" आणि खो: !!

पुन्हा भेटूया...

वावरदेशांतरप्रकटनविचार

प्रतिक्रिया

मस्त.
बर्‍याच मोठ्‍या आवाक्यात आंखो देखा हाल सांगणारे.

कोंबड्यावर भर असतो

आमच्या ऑफिसमध्‍ये एक आसामी आहे. असमींना (हे असंच म्हणायला पाहिजे असा त्याचा आग्रह असतो, आसामी म्हटलं की चिडतो) कोंबड्‍यांचे वेडच असते की काय कोण जाणे.. एकदा हा बाबा मला मुर्गी आणायला सोबत घेऊन गेला. त्यानं सांगितलं होतं कोंबडी आणायला जायचंय, तुला चालत असेल तर सोबत चल. मला वाटले फक्त जायचं आणि कोंबडी घेऊन यायचं.. सोबत गेलो तर हर ! हर! एक अख्खी जीवंत कोंबडी त्याने त्या खाटकास कापावयास लाविली ... आणि मला तिची तडफड, कॉक् , कॉक सगळे उघड्‍या डोळ्याने पहावे लागले.. ;-)

कारण की अहोमिया भाषेत अनेक मराठी-समान शब्द आढळतात.

अहोमिया कधी ऐकली नाही, पण आसामी आणि मराठीत पण बरेच सारखेच, सारख्याच अर्थानं वापरले जाणारे शब्द आहेत. उदा. उद्यापन

चिगो's picture

2 Mar 2012 - 3:05 pm | चिगो

>>अहोमिया कधी ऐकली नाही, पण आसामी आणि मराठीत पण बरेच सारखेच,
अरे दोस्ता, असमिया भाषेत "स"चा उच्चार "हो" असा होतो.. म्हणून असमी भाषा हीच "अहोमिया" भाषा होय.. :-D

आणि बरेच शब्द आहेत.. आई, घाम, पर्यंत, खेदणे (हाकलणे ह्या अर्थाने, विदर्भाकडे वापरतात हा शब्द) आणखीही बरेच..

अरे दोस्ता, असमिया भाषेत "स"चा उच्चार "हो" असा होतो.. म्हणून असमी भाषा हीच "अहोमिया" भाषा होय..

____/\___!!!!
पण यात माझा काही दोष नाही.
तो आसामी साला जास्त बोलतच नाही त्याच्या भाषेबद्दल .. तु उल्फाचा अतिरेकी वाटतोस असे त्याला म्हणालो होतो ;-)

मस्त.
बरीच नवी माहिती कळली रे चिगो तुझ्यामुळे.

मी-सौरभ's picture

2 Mar 2012 - 3:03 pm | मी-सौरभ

गणपा भौ शी सहमत
मला लिहायच असतं तेच भौ नी टंकल्यावर आमी काय फक्त +१ करणार ना??

(याच्या उलटं कधितरी व्हावं असं ईच्छीणारा)

ramjya's picture

2 Mar 2012 - 2:56 pm | ramjya

मस्त माहिती..... मागे वाचण्यात आले होते ,अरुणाचल प्रदेशातील एक बोली भाषा 'कोरो 'नष्ट होण्या च्या मार्गावर आहे ...

अमृत's picture

2 Mar 2012 - 4:19 pm | अमृत

या सात बहिणींच्या(seven sisters) प्रदेशात जायला खास परवाना घ्यावा लागतो म्हणे. खरं आहे काय हे?

अमृत

चिगो's picture

2 Mar 2012 - 4:34 pm | चिगो

दोन-तीन बहिणी नखरे करतात... बाकिच्या डायरेक्ट येऊ देतात. ;-)

मी-सौरभ's picture

2 Mar 2012 - 6:33 pm | मी-सौरभ

कसा आणि कुठे मिळतो? थोडि माहिती दे ना.

स्वाती२'s picture

2 Mar 2012 - 6:28 pm | स्वाती२

चांगली माहिती!

रामपुरी's picture

3 Mar 2012 - 2:34 am | रामपुरी

"१६व्या शतकात श्री शंकरदेवांनी आसामात वैष्णवपंथाचा प्रसार करायला सुरुवात केली. "
वैष्णवपंथीयाचे नाव शंकरदेव हे मजेशीर आहे. असे ऐकले आहे की, शैव आणि वैष्णव यांच्यात इतके पराकोटीचे वैर होते की वैष्णव "शिवणे" हे क्रियापद वापरत नसत त्याऐवजी "दोरा घालणे" असे म्हणत (शिवणे मध्ये "शिव" येतो म्हणून). जमीन सारवताना सुद्धा शैव लंब वर्तुळाकार तर वैष्णव शाळीग्रामाप्रमाणे गोलाकार सारवत असत. एकमेकांच्या देवळांची फोडाफोडी नित्याची होती.

फारच माहितीपुर्ण लेख.

अहोमिया सहकार्‍याशी आताच वार्तालाप करून अहोमिया भाषेत मराठी शब्द आहेत हे त्याला ठासवून दिले.

जय महाराष्ट्र!

चिगो's picture

4 Mar 2012 - 1:37 pm | चिगो

>>अहोमिया सहकार्‍याशी आताच वार्तालाप करून अहोमिया भाषेत मराठी शब्द आहेत हे त्याला ठासवून दिले.

मस्तच.. तेखॅत की कोईसिले ? (तो काय बोलला?) थोडीफार उच्चार आणि शब्दांची ओळख करुन घेतलीत, तर ही भाषा कळायला सोपी आहे मराठी माणसाला..

मी मिपावर आल्या-आल्या "असा मी आसामीया" हा लेख टाकला होता. त्यातला हा भाषाविषयक उतारा...

अहोमीयातही आईला "आई" असे म्हणतात म्हणुन ह्या भाषेशी भावनिक नाते जुळते. (वडिलांसाठी "देवता" हा शब्द आहे.) दादा, घाम, भात (जेवण करणे म्हणजे "भात खाणे". लग्नात जायचे म्हणजे लग्नात खायचे), उदाहरण, पर्यंत, आना (आणा), तुमि (तुम्ही) आपुनी (आपण) असे बरेच शब्द मराठीसारखेच आहेत.
पण उच्चारांच्या बाबतीत मात्र तफावत आहे आणि ती गमतीशीर आहे. शब्दांचे उच्चार "ओ"कारांत करतात. "च" चा उच्चार "सो" असा होतो. म्हणजे "सोनु" म्हणायचं असेल तर "चनु" लिहा. चिटीबच = सिटीबस. "स" श" चा उच्चार "हो" "ख्हो" असा, पण त्यातही nuiances आहेत. "क्ष" चा उच्चार "ख्खो" असा होतो.पण जोडाक्षरे मात्र जशीच्या तशी उच्चारली जातात. म्हणजे चिन्मय "सिन्मॉय" झाला तरी च्यवन "च्यवन"च राहतो, आणि शिक्षक "हिख्खोक" झाला तरी अश्व तो "अश्व"च... खरंतर अहोमीयातली "स" "श" "क्ष" असलेले शब्द उच्चारले तर रामदेवबाबांचे श्वासोच्छावासाचे व्यायाम आपोआप होतील ! अवांतर: अहोमीयात "बिया" म्हणजे लग्न आणि बेया म्हणजे वाईट !! (किती सुचक असतात ना शब्द !?)

http://www.misalpav.com/node/14414 इथे तो लेख आहे.

अतिशय उत्तम माहिती,

कित्येक ज्वलंत वाटणा-या किंवा असणा-या प्रश्नांचं मुळ अतिशय साध्या आणि सोप्या मार्गानं उखडुन टाकता आलं असतं, पण परिस्थितीमुळं, काही जणांच्य इगो, पैसा, राजकारण आणि समाजकारण यामुळं काही गोष्टींचा कसा मोठा गुंता होत जातो, याची थोडी कल्पना आली.

चिगो's picture

4 Mar 2012 - 1:20 pm | चिगो

>>कित्येक ज्वलंत वाटणा-या किंवा असणा-या प्रश्नांचं मुळ अतिशय साध्या आणि सोप्या मार्गानं उखडुन टाकता आलं असतं,

बरोबर, पन्नासराव... प्रॉब्लेम हा असतो की माणसामागे कळप जमायला लागला की मग त्याची सारासार विवेकशक्ती लुप्त होते. दोन माणसांच्या क्षुल्लक भांडणाला जमावाचा पाठींबा मिळाला की त्यातून मोठ्या मारामार्‍या होतात ना, त्याचंच विशाल रुप आहे हे.. खोदून पाहीलं की कळतं, "अरे, हे तर सोप्पं आहे यार !" पण असा विचार करायला वेळ आहे कुणाला?

आणि, दुसरी गोष्ट म्हणजे हे कदाचित व्हायचं ते घडून गेल्यावर केलेलं निरीक्षण आहे. घटना होतांना परीणाम कुणाला ठावूक असतात?

चिगो, तुमचा हा माहितीपूर्ण लेख अतिशय आवडला.
वरती यकु म्हणतो तसं यांना आसामी म्हटल्यावर राग येतो कारण अहोमिया मध्ये 'आसामी' शब्द गुन्हेगार वैगरे अशा अर्थाने वापरला जातो - इति माझा एक अहोमिया सहकारी.

चिगो's picture

5 Mar 2012 - 4:15 pm | चिगो

>>वरती यकु म्हणतो तसं यांना आसामी म्हटल्यावर राग येतो कारण अहोमिया मध्ये 'आसामी' शब्द गुन्हेगार वैगरे अशा अर्थाने वापरला जातो

अगदी बरोबर... अहोमिया भाषेत "आसामी"चा अर्थ गुन्हेगार असाच आहे.. आणि "आसाम"चा उच्चारही "अख्हॉम" असा होतो.

सोत्रि's picture

4 Mar 2012 - 4:42 pm | सोत्रि

कुठल्याही धर्मापायी का होईना, इथल्या लोकांचे जीवन जर सुकर होत असेल तर बढीया है..

असेच म्हणतो! लोकांचे जीवन सुकर करणे हाच खरा धर्म!

- (धार्मिक) सोकाजी

मन१'s picture

4 Mar 2012 - 4:50 pm | मन१

लेख व प्रतिसाद दोन्ही आवडले आहेत.

तिमा's picture

4 Mar 2012 - 5:47 pm | तिमा

लेख माहितीपूर्ण आणि वाचनीय. फक्त एक खटकले ते स्पष्टपणे लिहितो.

भारतात राहू दिल्या जाईल

आसाम कमीत कमी वीस वर्षे मागे ढकलल्या गेला.

वरील वाक्यांतील, 'राहू दिले जाईल', 'ढकलला गेला', ही मराठीची शुद्ध रुपे आहेत असे आम्ही जुने लोक मानतो.
प्रतिक्रियांमधे असे वाचल्यावर ते विनोदासाठी लिहिले आहे असे आम्ही समजायचो. पण आता लेखातही तसे वापरले गेले हे पाहून न रहावून लिहित आहे. कोणती मराठी शुद्ध हा वादाचा विषय होऊ शकतो. पण जुन्या लोकांना नेहमीच त्यांच्यावेळेची मराठी शुद्ध असे वाटते.
असो.

चिगो's picture

5 Mar 2012 - 4:11 pm | चिगो

तुम्ही दाखवून दिल्यावर मलापण ती वाक्ये चुकीची वाटायला लागली आहेत.
धन्यवाद..

प्यारे१'s picture

6 Mar 2012 - 11:36 am | प्यारे१

दिल्या, घेतल्या, केल्या, खाल्ल्या, पिल्या, जेवल्या इ.इ. हे वैदर्भीय मराठी आहे तिमा.

>>>आम्ही जुने लोक
अरे वा! मिपावर जुने की वयाने जुने की आणखी कशाने तरी जुने? :)

>>>उरलो उपकारापुरता!
हे जरा अवघड वाटतंय! :P

तिमा's picture

6 Mar 2012 - 6:25 pm | तिमा

अरे वा! मिपावर जुने की वयाने जुने की आणखी कशाने तरी जुने?

शंका बरोबर आहे. गंज चढल्यामुळे जुने!

उरलो उपकारापुरता!
हे जरा अवघड वाटतंय!

अहो, असं लिहिल्यावर तरी स्वार्थ कमी होतोय का बघतोय.

वपाडाव's picture

6 Mar 2012 - 6:46 pm | वपाडाव

.

वपाडाव's picture

6 Mar 2012 - 6:47 pm | वपाडाव

नॉट एग्झॅक्टली रे प्यारे...

दिल्या, घेतल्या, केल्या, खाल्ल्या, पिल्या, जेवल्या इ.इ. हे वैदर्भीय मराठी आहे तिमा.

नांदेडच्या आजुबाजुच्या तालुक्यांपासुन ते फक्त यवतमाळ पर्यंतच्या तालुक्यात...
त्यातल्या त्यात 'भोकर, कंधार' ह्या तालुक्यात चिक्कार... ही तालुके 'आंध्रा' बॉर्डरवर आहेत...

प्रदीप's picture

4 Mar 2012 - 6:33 pm | प्रदीप

लेख आवडला. धन्यवाद.

आवडेश ,

लिहीत रहा रे चिन्या, न माहीती असलेल्या भागाबद्दल :)