सर्व पात्र व प्रसंग काल्पनिक..
नेहमीप्रमाणे दर ५ सालांनी महापालिका निवडणुका येतात, तशा त्या यंदाही आल्या. महापालिका निवडणुका म्हणजे बंडुचं ५ सालातून एकदा भरघोस उत्पन्न मिळण्याचं पिक. या वर्षीही बंडुने पेरणी-लावणी-कापणी म्हणून जे काय करतात ते सारं केलं आणि त्याला पुन्हा एकदा ५ लाखांचं भरघोस उत्पन्न मिळालं आणि बंडू आज सकाळीच कोकण रेल्वे पकडून चाराठ दिवसांकरता बायको आणि लेकीला घेऊन गोव्याला मस्त मजा करण्यासाठी रवाना झाला! :)
बंडु आपल्या विभागात, विशेष करून विभागातल्या 'अबक' समाजात तसा फेमस माणूस. सुशिक्षित, सगळ्यांना मदत करणारा, नेहमी हसतमुख असा. आता ही मदत म्हणजे पैशांची नव्हे बरं का, तर कुठे कुणाचं पेन्शनचं काम अडलं असेल तर खेपा मार, कुणी हास्पिटलात आजारी असेल तर रात्री सोबत म्हणून जा, कुणी ओळखीतला बुजुर्ग रस्त्यात भेटला तर लगबगीने त्याच्या हातातलं सामान घेऊन त्याला घरापर्यंत सोडायला जा... वगैरे वगैरे..! पंचेचाळिशीच्या घरात असलेल्या बंडुला आणि त्याच्या बायकोला तशी नोकरीही होती. पण दोघांनाही पगार तसा बेताचाच. एकुलती एक मुलगी राणी, ती यंदा आठवीत की नववीत आहे.
महापालिका क्षेत्रातील बंडू ज्या वॉर्डात रहातो त्या वॉर्डाची मतदारसंख्या साधारण २०००० च्या आसपास. त्या वीस हजारात निरनिराळ्या जातीपातीधर्माचे लोक. 'आजही आपल्याकडे निवडणुका होतात त्या जातीधर्माच्या आधारावरच होतात' या तत्त्वावर बंडुचा पक्का विश्वास. आणि त्यामुळेच विभागातील आपल्या 'अबक' जातीतील नाही म्हटलं तरी गेलाबाजार ३०० ते ४०० मतं ही बंडुच्या अगदी खिशातली. आता तुम्ही म्हणाल की वीस हजारात ३०० ते ४०० मतं म्हणजे काहीच नाही. अगदी डिपॉझिट सुद्धा जप्त व्हायचीच पाळी. परंतु ही वस्तुस्थिती बंडुला माहीत नव्हती अशातली बाब मुळीच नव्हती, तर उलटपक्षी बंडुची अपेक्षाही तेवढ्याच परंतु हक्काच्या ३०० ते ४०० मतांपुरतीच मर्यादीत होती.
"आज्जी, मी उभा आहे बरं का.. मलाच नक्की मत द्या"
"बंडू, अरे प्रश्नच नाही. माझं मत फक्त तुलाच"
"नमस्कार काका, यंदा उभा आहे. तुमचं मत आपल्याला पाहिजे बरं का.."
"अरे अगदी नक्की.. आमची ही आजारी होती तेव्हा तूच तर धावपळ केली होतीस बाबा!"
अशी आपल्या विभागातील आज्या, काका, मामा, मावश्यांची मतं बंडुलाच मिळणार होती आणि एकंदरीत ही सारी मतं तीनचारशेच्याच घरात जात होती याबद्दल बंडुचा पक्का अभ्यास होता. पण बंडुचे धंद्यातले पुढचे ठोकताळे मात्र अजब होते.
त्याच्या वॉर्डातील एकूण मतदारसंख्या साधारण २००००. मतदानाची टक्केवारी फार्फार तर ५५%. म्हणजे साधारण हिशेब झाला तो ११००० मतांचा. आता या ११००० मतांकरता, धरून चाला ७ ते ८ उमेदवारात मारामारी आणि रस्सीखेच. त्यातून महापालिकेच्या निवडणुकात अगदी १०० ते २०० मतांच्या फरकानेदेखील उमेदवार जिंकू वा पडू शकतो हाही बंडुचा ठोकताळावजा अभ्यास अगदी ठाम होता. आणि हेच सारे ठोकताळे म्हणजे बंडुचं भांडवल! :)
या वर्षी बंडुच्या वॉर्डातून ठाकरेसाहेब आणि पवारसाहेब असे दोन प्रस्थापित पक्षांचे दिग्गज रिंगणात उभे होते. दोघात अगदी अटीतटीचा सामना होणार, अशीच सगळी हवा होती. म्हणजे उद्या वेळ आल्यास १०० ते २०० मतांच्या फरकानेही निर्णय बदलू शकणार होता.
आणि अपेक्षेप्रमाणे बंडुला पवारसाहेबांचा फोन आलाच. पवारसाहेबांनी बंडुला घरी चहाला बोलावले होते! ;)
"या बंडोबा...कसं काय...? हे घ्या २ लाख रुपये. अपक्ष म्हणून तुम्हीही फॉर्म भरा पाहू. अहो, तुमचं इतकं समाजकार्य आहे, तुम्ही अगदी नक्की निवडून याल!"
असं म्हणून हजाराच्या दोन गड्ड्या पवारसाहेबांनी बंडुच्या पुढ्यात टाकल्या. बंडुही खुश! कारण त्यामागील पवारसाहेबांचा कावा बंडू जाणून होता. बंडूला उभं करून बंडुच्या हक्काची जी काही ३०० ते ४०० मतं आहेत ती बंडुलाच मिळावीत,परंतु तीच ३०० ते ४०० मतं बंडुच्याच समाजातल्या ठाकरेसाहेबांना मात्र मिळू नयेत अशी पवारसाहेबांची त्यामागे साधीसोपी खेळी होती. ३०० ते ४०० मतं मिळून बंडू नक्कीच निवडून येऊ शकत नाही, परंतु कदाचित तीच ३०० ते ४०० मतं ठाकरेसाहेबांना मिळाली तर मात्र उद्या अटीतटीच्या वेळेला आपल्याला अडचणीचं होऊ शकेल, असा पवारसाहेबांचा राजकारणाचा जबर अभ्यास होता.
झालं. बंडुनेही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आणि अपेक्षेप्रमाणे ती बातमी ठाकरेसाहेबांच्या कानावर गेलीच! लागलीच ठाकरेसाहेबांचाही बंडुला फोन.
"का रे बाबा? अरे आपला समाज एकच की. एकाच जातीचे आपण. मला सांग की तुला काय पाहिजे ते! बरं, असं कर.. हे ठेव ३ लाख रुपये आणि उमेदवारी मागे घेऊन उलट मलाच निवडणुकीत मदत कर पाहू. अरे, तू तर लेका माझ्या घरातलाच!"
"तसं नाही हो ठाकरेसाहेब. पण घरच्यांचा आणि इतरही काही ओळखीच्यांचा आग्रह झाला म्हणून उभा राहिलो झालं. तूर्तास हे पैसे राहू द्यात. मी जरा घरच्यांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. तेव्हा मला हे पैसे द्या!"
बंडू पुन्हा बॅक टू पवारसाहेबांच्या घरी..! महापालिका निवडणुकीत ऐनवेळेस ३०० ते ४०० मतांनाही किती किंमत असते हे बंडू चांगलंच जाणून होता! :)
"हम्म... तुला काहीही झालं तरी उभं राहिलंच पाहिजे..भोसडीच्या, हे ठेव अजून ३ लाख रुपये!"
पवारसाहेबांनी पैसे देत कौतुकानं बंडुच्या पाठीवर थाप मारली! :)
वास्तविक पवारसाहेबांचा राजकारणातला वकूब बंडुला माहीत होता. त्यांची खरी तयारी ५ लाखाचीच होती परंतु सुरवातीला चाचपणी करण्याकरता म्हणून त्यांनी फक्त २ लाखांचीच हड्डी आपल्या पुढ्यात टाकली हेही बंडुला माहीत होतं! आणि तसंही ४०० मतं विकत घेणं काय, किंवा बंडुच्या नावाने त्या ४०० मतांवर पाणी सोडणं काय, पवारसाहेबंकरता दोन्हीही सारखंच होतं. कुठल्याही परिस्थितीत त्या ४०० मधलं एकही मत ठाकरेसाहेबांना मिळू द्यायचं नाही, ही पवारसाहेबांची खेळी होती..! :)
अर्थात, बंडूचा हाच तर धंदा असल्यामुळे त्याला हे सारं माहीत होतं..! :)
निवडणुका झाल्या, निकाल लागले. अपेक्षेप्रमाणे बंडू हापटला, त्याचं डिपॉझिटही जप्त झालं. पवारसाहेब निवडणूक जिंकले. अवघ्या ३२५ मतांनी.! ;)
बंडू आज सकाळच्याच गाडीनं निवडणुकीतलं हारण्याचं दु:ख हलकं करायला बायको-मुलीला घेऊन गोव्याला गेला आहे, तो चाराठ दिवसांनी परत येईल. आल्यावर पुन्हा पुढच्या पाच वर्षांकरता त्याच्यातला परोपकार जागा होईल आणि कुठे कुणाचं पेन्शनचं काम अडलं असेल तर खेपा मार, कुणी हास्पिटलात आजारी असेल तर रात्री सोबत म्हणून जा, कुणी ओळखीतला बुजुर्ग रस्त्यात भेटला तर लगबगीने त्याच्या हातातलं सामान घेऊन त्याला घरापर्यंत सोडायला जा... वगैरे वगैरे..! हे सगळं त्याचं सुरू होईल! ;)
बाय द वे, डिपॉझिट जप्त झालेल्या बंडुला फक्त ३६५ मतं मिळाली होती! ;)
-- कॉमॅ.
प्रतिक्रिया
13 Feb 2012 - 9:32 pm | चेतनकुलकर्णी_85
मला तर वाटले कि हे एक कोडे आहे आणि शेवटी तुम्ही विचाराल" सांगा पाहू एकूण किती जणांनी मतदान केले ते ?" :P
शंका : मिपावर दिवसाला धाग्यांचा रतीब घालणार्यांना मिपा संपादक मंडळा कडून काही "आकर्षक " बक्षीस मिळते काय?
13 Feb 2012 - 9:49 pm | वपाडाव
ते नाडी'कर्णींना विचारा... धागे ओतुन 'प्राण' घेतलेत त्यांनी...