खरंच मरण एवढं अवघड आहे मान्य करायला? कुणाचं ? स्वतःच की दुसऱ्याच ?
स्वतःच्या जाण्याबद्दल, मरणाबद्दल भीती जरी वाटत असली तरी ती भीती फक्त त्या सोसाव्या लागणाऱ्या वेदनेची असते, ज्याची आपल्याला काहीच कल्पना नसते. एक क्षण येतो कि जेव्हा ती वेदना तिची सीमा ओलांडते जी काही क्षण, काही तास, काही दिवस किंवा काही वर्षे आपली सोबत करत होती...आणि मग सगळं अगदी शांत होतं....काहीच मागे उरत नाही....पण फक्त आपल्यापुरत, आजुबाजुच्यासाठी नाही...स्वतःच्या मरणाचा विचार बहुदा इथेच संपतो....
आजूबाजूचे लोक, जवळचे, यांच्या बाबतीत मात्र अस नसतं. आपले आई वडील, नवरा, भाऊ-बहिण, मुलं यांच्या मरणाची कल्पनाही आपल्याला सहन होत नाही. स्वतःच्या मरणाच्या परिणामांची फिकीर आपण सहसा करत नाही, कारण आपल्यासाठी विषय तिथेच संपतो, कधीच संपतो. पण तेच इतरांच्या जाण्याचे परिणाम आपल्यावर होतात, अगदी खोलवर आणि विविध प्रकारे होतात. त्यांच्या जाण्याने आपण काहीतरी गमावतो, आपला आधार जातो, भावनिक, शारीरिक,मानसिक आणि आर्थिक ही आणि या आधारांबरोबर येणारी सुरक्षितता ही गेलेली असते.
काही वेळेस आपल्याला गेलेल्या माणसाबद्दल फारसं काही वाटतही नाही, पण त्याच्या जाण्याने आपल्या आयुष्यात उलथापालथ होते, छानशी असणारी घडी विस्कटते. आपल्या स्वार्थी गरजांपोटी आपल्याला वाईट वाटत राहतं.
पण अगदी जवळच्या लोकांबद्दलही वाटणार प्रेम स्वार्थीच असत का? काही प्रमाणात असतंच....आपल्या प्रेमाच्या, कौतुकाच्या, आधाराच्या अपेक्षा त्यांच्याकडून पूर्ण व्हाव्या अशी आपली कायमच इच्छा असते. अगदी आपली ८०-९० वर्षांची आई- आजी जी अगदी पलंगाला खिळून आहे ती ही आपल्याला हवी असते, तिला रोज जगताना सोसावा लागणारा त्रास, वेदना दिसत असूनही.....का तर आपल्याला तीच आवाज ऐकायचा असतो, तिच्याकडून डोक्यावरून हात फिरवून घ्यायचा असतो....
हा पण स्वार्थीपणाचाच एक प्रकार....नाही का? तो चुकीचा आहेही आणि नाहीही...यात जेवढी आपली चूक आहे तेवढीच चूक समोरच्याची पण. आपण त्या व्यक्तीत गुंतलेले असतो कारण त्या व्यक्तीनेच कुठेतरी आपल्याला तिच्या दिशेने ओढलेले असते, गुंतवलेले असते...
प्रत्येकजण आपल्यामागे राहणाऱ्यांना या जाळ्यात अडकवून पुढच्या प्रवासाला निघून जातो....आणि मागे राहणारा ही हाच कित्ता गिरवत त्याच्या मागे राहणाऱ्यांना आपल्यात गुंतवून पुढे निघून जातात...
प्रतिक्रिया
9 Feb 2012 - 3:43 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मुक्तक छान आहे, पण फारसे पटले नाही. विषेशतः
असं असेल तर त्या व्यक्तिशी असलेल्या नात्यावरचं शंका घेतल्यासारखे होते.
स्वार्थीपणा हा सापेक्ष आहे हे मान्य. पण तुम्ही म्हणताय त्या परिस्थितीत तो स्वार्थीपणा मानायला मी धजावत नाही.
9 Feb 2012 - 3:48 pm | स्पा
(किरवंत फेम )
गवि कॅल्लिंग
9 Feb 2012 - 3:57 pm | मिरची
कळ्ली नाही हो प्रतिक्रिया.....
10 Feb 2012 - 4:17 pm | गवि
आलो आलो रे स्पावड्या. तुझ्या हाकेला ओ देऊन पूर्वी मरणाविषयी लिहिलेलं मंथन वा कुंथन इथे पस्ते करतोय.
मध्यंतरी माझा किरवंत म्हणून लौकिक होऊन काही बोलावणीही यायला लागली होती विधीसाठी.. त्यामुळे इथे पूर्वी पोस्टवलं नव्हतं.. ;)
...........................
फिजिक्स हे बेसिक सायन्सेसपैकी एक मानलं गेलंय. मी ग्राज्वेट होताना ते थोडंफार शिकलोही. असं वाटलं की फिजिक्सचा उपयोग करून जेवढ्या गोष्टी सिद्ध करता येतात त्याहून जास्त गोष्टींवर प्रश्न उभे होतात. कळत गेलेल्या नवीन "शोधां"चा उपयोग काहीतरी सुखकारक वस्तू बनवायला होतोच. पण ते काही ज्ञान नव्हे. ती तर शिकलेली नवीन युक्ती असते फक्त. खरंखुरं नवीन ज्ञान मिळवणं म्हणजेच अज्ञानाचा खड्डा खोल करत जाणं हे फिजिक्सकडून शिकावं.
मरण, देव, ईश्वरी शक्ती या विषयांवर शास्त्रीय दृष्टिकोनातून काय बोलावं..?? आनंदच आहे सगळा. पण फिजिक्समधे, आणि एकूण मूलभूत शास्त्रांमधे वापरल्या जाणार्या "थॉट एक्स्पिरिमेंट्स"चा वापर इथे कामाला येतो.
मरणाविषयी आपण जिवंतपणी काहीच सांगू शकत नाही. आपण कसेही जगलो तरी स्वतःचं मरण हा एक नॉन-ऑप्शनल कार्यभाग आपल्याला पार पाडायचाच आहे. मरण म्हणजे काय असेल त्याविषयी जगभर खूप थियरीज मांडल्या जातात. "निअर डेथ" अनुभव घेऊन "परतलेले" लोक सुरस अनुभव सांगतात. त्यांची रेंज "आपण आपलंच शरीर उंचावरून पाहिलं", इथपासून "एका तेजस्वी रस्त्यावरुन चार घोड्यांचा रथ दौडत येत होता.." पर्यंत एकदम व्हर्सटाईल असते. अर्थातच ते लोक प्रत्यक्षात "मेलेले" नसतात त्यामुळे या कथा मनोरंजक असल्या तरी पुढे त्याचं काही "करता" येत नाही.
आपण मेल्यावर आपलं काय होणार याला उत्तर आमच्या शाळेतल्या एका धड्यात होतं. "आप मेला जग बुडाले.."
आपलं जग, दुसर्याचं जग असं काही वेगळं वेगळं दाखवणं शक्यच नाही. त्यामुळे, जे काही फील होतंय ते "आपलं" जग आपल्यासोबत अस्तित्वात आलं आणि म्हणूनच ते आपल्यासोबत नष्ट होणार ही एक थियरी. ही थियरी बिनतोड आहे. आणि तसं असेल तर चांगलंच.
पण आत्तापर्यंत तरी आपण असं समजतोय की जग ही आपली कल्पना अतएव "माया" नसून ती खरीखुरी वस्तू आहे आणि ती आपण नसतानाही (आपल्यानंतर..!!!) शिल्लक राहीलच.
झोप लागल्यावर जसं आपल्याला थोड्या वेळासाठी काही कळत नाही तशीच अवस्था कायम राहाणं म्हणजे मरण अशीही एक थियरी असू शकेल. पण झोपेतही आपलं मन किंवा कॉन्शसनेस खूप जागा असतो. स्वप्नं पडतात. मेंदूचा काही भाग आणि ब-याच शरीर यंत्रणा काम करत असतात. मेल्यावर तसं काही होत नाही. म्हणजे अनंतकाळ झोप म्हणजे मरण हे काही खरं नव्हे.
बाय द वे.. कशा(ला) या भिंतीवर धडका द्यायच्या? येईल तेव्हा आणि तसं येऊ दे..
नाही.. तसं नाहीये..या सर्वाचा विचार करायला हवा तो यासाठी की ते मरण शांत, आनंददायक वगैरे असेलच असं नाही. आणि त्यानंतर सगळं सगळं संपून मुक्तता असंही असेलच असं नाही. "होतं काय की आपण सोयीस्कर आणि एकाच बाजूची शक्यता पकडून बसतो आणि दुसरी शक्यता कधी बघतच नाही."
सॉरी.. कन्फ्युजन पुरे.
आपण थॉट एक्पिरिमेंटच्या मार्गाने विचार करू:
समजा मरणाच्या क्षणाच्या आधीच मेंदूला रक्तपुरवठा बंद होऊन सर्व संवेदना (त्यासोबत वेदनाही) नष्ट होऊन प्रत्यक्ष मरणक्षणी शांत आरामदायक वाटत असेल तर ठीकच. पण तसं नसेल तर?
(वाईट शक्यता गृहीत धरत जाऊन पहायचं..!!)
आपण आपली शक्यता नंबर एक गृहित धरूया की:-
मरणाच्या क्षणी संवेदना जागृत असतात..
आता दुसरा प्रश्न. त्या (मरणा) नंतर आपली विचारशक्ती, अस्तित्व यांचं काय होणार?
ते नष्ट होत असेल तर बरंच. पण त्याचं शिल्लक न राहणं हे आपल्या कल्पनेच्या पलिकडचं आहे. आपल्या शरीराला पूर्ण "खेरीज" करुनही आयुष्यभर आपलं मन (अस्तित्व, आत्मा, कॉन्शसनेस काहीही म्हणा) अस्तित्वात असतो आणि तोच "पाहणे, ऐकणे, वास घेणे, स्पर्श अनुभवणे" अशा सगळ्या इनपुट्स ना सामोरा जात असतो. शरीराचा प्रत्येक भाग हे फक्त इन्द्रियच आहे. प्रत्यक्ष अनुभव घेणारा वेगळाच असतो आणि म्हणून तो शरीरासोबत नष्ट होईलच असं गृहित धरता येत नाही.
म्हणून शक्यता नंबर दोन गृहित धरूया:
मरणानंतर आपलं अस्तित्व (कॉन्शसनेस, फील करणारा भाग) शरीराच्या मदतीखेरीजही टिकून राहील.
अर्थात आता शरीराकडून त्याला इनपुट्स मिळत नसल्यामुळे त्याला नवीन स्पर्श, वास वगैरे नक्कीच मिळणार नाहीत.
पण आधी शरीराकडून मिळालेल्या जुन्या इनपुट्सचं काय?
म्हणून शक्यता नंबर तीन गृहित धरूया:
मरणानंतरही शिल्लक राहिलेल्या आपल्या अस्तित्वाला नव्याने सेन्सेस होणार नाहीत पण जुन्या सेन्सेसची आठवण त्यात शिल्लक राहील.
सर्व सेन्सेस कोण्या एका जादूने मागे सुटत असतील तर छानच.. पण तसं नसेल तर?
फार फार तर जुन्या सेन्सेसच्या मेमरीज (मेंदूपेशींत साठवलेल्या असल्यामुळे) मेंदूसोबत नाहीशा होत असतील. पण मरणाच्या क्षणी झालेल्या जाणिवेचं काय?
म्हणजेच मरणाच्या शेवटच्या क्षणीची जाणीव आपल्या अस्तित्वासोबत कायमची "फ्रीझ" होऊन राहील. त्याचा घाव कमी करायला आता "खपली धरणारं" शरीर नसेल.
मरण्याच्या क्षणी आपण आत्यंतिक वेदनेने पिळवटलेले असलो तर शरीर वजा झाल्यावर आपण तशाच वेदनेत त्यापुढे कायम राहू..
सेन्सेस देणारं आणि नंतर भरून बरं करणारं शरीर नसल्यामुळे आंधळं, बहिरं, मुकं, स्पर्शसंवेदनाहीन, हालचाल करु न शकणारं आपलं अस्तित्व अशा वेदनेसोबत कायम शिल्लक राहील.
……………………………………………………
हे सर्व होईलच असं नाही. पण कदाचित होत असेलही. आणि ते सांगायला कोणी परत येणार नाही..
म्हणून आपला आणि इतरांचा मरण्याचा क्षण जास्तीतजास्त वेदनारहित कसा करता येईल याची काळजी आपण घेऊ शकतो..त्या क्षणीची जाणीव कदाचित अनंतकाळपर्यंत आपली साथ करेल असं आधीच गृहित धरून..
टू बी ऑन द सेफर साईड हं…
सुरुवातीला म्हटलं ना… "होतं काय की आपण सोयीस्कर आणि एकाच बाजूची शक्यता पकडून बसतो आणि दुसरी शक्यता कधी बघतच नाही."
म्हणून हा थॉट एक्स्पिरिमेंट..
शेवटचा दिस गोड व्हावा असं पहिल्यांदा म्हणणार्याने हाच थॉट एक्स्पिरिमेंट केला असावा..
............
इति..
9 Feb 2012 - 3:59 pm | यकु
नेमेची येतो मग पावसाळा... सारखे सगळेच प्लेन लिहीले आहे.. जे घडते तेच.
त्यामुळं तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते कळलं नाही.
9 Feb 2012 - 5:28 pm | इनोबा म्हणे
कदाचित हे जरा नाटकीय स्वरुपात लिहीले असते, लोकांना थोडे नेहमीच्या अनूभवापेक्षा वेगळे दाखवले असते तर चालले असते.
अशा प्रकारचे लेखन करताना नेहमीपेक्षा जरा हटके असे आर्टीफीशीयल प्रसंग उभे करावे लागतात(किंवा स्वतःचा वेगळा असा अनूभव तरी लिहावा लागतो.) ज्याची प्रस्तूत लेखकाला कल्पना नसावी किंवा विसर पडला असावा. ज्यामूळे 'नेमेची येतो मग पावसाळा... सारखे सगळेच प्लेन लिहीले आहे.. जे घडते तेच.' अशा प्रकारचे प्रतिसाद येतात. सिनेमा, टिव्ही सिरीज पाहताना ज्या प्रकारचे तद्दन भिकारचोट प्रसंग उभे केले जातात(अर्थात सगळेच प्रसंग त्या लायकीचे नसतात.) तेवढे नाही पण आपल्याला जे म्हणायचे आहे त्याच्या समर्थनार्थ एखादा तरी काल्पनीक प्रसंग दर्शकांच्या/वाचकांच्या गळी उतरवता यायला हवा. तरच 'शॉकींग', 'अरेरे! सुन्न झालो' वगैरे छापाच्या प्रतिक्रीया मिळतात.
9 Feb 2012 - 5:44 pm | सूड
+१
9 Feb 2012 - 5:59 pm | परिकथेतील राजकुमार
हर जिंदा को मौत आती है!! ......
9 Feb 2012 - 6:34 pm | राघव
जवळच्या कुणाचा मृत्यू झाल्यानंतर होणार्या जाणिवेतून लिहिल्यासारखं वाटतंय.
राघव
9 Feb 2012 - 9:30 pm | धमाल मुलगा
मुक्तक उत्तम उतरलं आहे. आणि कितीही नाकारलं तरी खुपसं पटणारंही.
मरण मरण म्हणजे शेवटी काय? दिव्याचा स्विच दाबल्यानंतर फटकन दिवा बंद व्हावा तशी अवस्थाच की. चालू असताना तापलेला बल्ब हळूहळू निवत गेल्यासारखं मरणानंतर शरीर थंड पडतंच की. ह्याची जाणिव ना त्या बल्बला, ना जीव गेलेल्या शरीराला..आपल्यातून गेलेल्या व्यक्तीची अनुपस्थिती अन् विझलेल्या दिव्यानंतरचा अंधार..उरलेल्यांसाठी!
आपल्या समाधानासाठी कितीही भव्यदिव्य भावनांचा डोलारा उभारला तरी मुळ जे आहे ते नाकारता येत नाहीच. कोणत्या ना कोणत्या रुपाचा,अगदी आपल्याही नकळत असा स्वार्थ हा असतोच. शेवटी काय आहे, कितीही प्रगत असला तरी माणूस हाही एक प्राणीच की. निसर्गाचे मुलभूत नियम त्यालाही लागू पडणारच. आणि ज्याला आपण स्वार्थ म्हणतो, तो अवास्तव असेल तर तो स्वार्थ, अन् नकळत्या पातळीवरचा हळुवार असेल तर निसर्गनियमच म्हणा की.
- (मसणजोगी) ध.
9 Feb 2012 - 9:38 pm | उदय के'सागर
हॅ.... अत्ता कस्स...येकदम पटलं ....
हे असं असायला हवा होता मुळ लेख, इथे कसं दोनच परीच्छेद आहेत पण सगळं कसं भिडतं मनाला....... धन्यवाद धमु.... :)
असो....@मिरची - पु.ले.शु.
10 Feb 2012 - 10:23 am | मिरची
खरंच थोडक्यात आणि तरिही सर्वार्थाने अर्थवाही आणि मनाला थेट भिडणारे........धन्यवाद....
10 Feb 2012 - 4:02 pm | धमाल मुलगा
उदयराव, मिरची,
अमंळ लाजलो बुवा. :)
10 Feb 2012 - 10:19 am | मिरची
लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे....जे मनात आलं आणि जसं जमलं तसं लिहिल ...तुमच्या सुचना आणि प्रतिक्रियांचा पुढील लेखनात नक्कीच उपयोग होईल.... अशा स्पष्ट प्रतिसादांचीच गरज आहे....धन्यवाद!!!!
10 Feb 2012 - 10:53 am | चौकटराजा
जन हो , मरण व प्रेम हे फार गहन विषय आहेत . तिसरा विषय परमेश्वर ! तर .... कय सांगत होतो ... मरणा वर भाउसाहेब पाटणकरांची शायरी वाचा ! बाळ सामन्त सम्पादित " मरणात खरोखर जग जगते " हे पुस्तक वाचा ! शेवटी .... जगण्यात राम आहे तो पर्यंतच " हे राम
म्हणण्यात मौज आहे. नाहीतर " श्रीराम जय राम जय जय राम " हा फक्त उपचार रहातो. त्यातील दु:ख संपलेले असते.
10 Feb 2012 - 4:05 pm | धमाल मुलगा
काय याद दिलवलीत! बढिया.
चार-दोन समविचारी (काही हलकटलोक ह्याला सम-व्यसनी म्हणतात्..दुर्लक्ष करावे.) मित्र जमवावेत अन भटसाहेब, भाऊसाहेब पाटणकर, भीमराव पांचाळ ह्यांच्या झक्कास गझला असाव्यात..हा हा म्हणता रात्र सरुन पहाट कधी उजाडते कळतही नाही. :)