आज कित्येक दिवसांनी आलोय तुझ्याजवळ निवांतपणे. तुझं हे सौंदर्य नेहमीच मला भुरळ घालतं, आजही घालतंय! हे मोहक रूप डोळ्यांत साठवून घ्यायला उभा जन्मही अपुरा पडावा. तुझ्याजवळ कधीही येऊन बसलो की खूप शांत, प्रसन्न वाटतं. हलकेच तुझ्या कुशीत गाढ झोप लागते नि रोजच्या दगदगीने थकलेल्या मनाला खूप आराम मिळतो. डोळ्यांना सुखावणारी ही दाट वनश्री, सोनसळी नव्हाळी ल्यालेली ही साळीची शेतं, भयाण गडगडाटांनी आसमंत भरून टाकणारे ते कृष्णमेघ, जीवाच्या आकांताने कोसळणार्या त्या जलधारा, त्या तिकडे मखमली गालिच्यावर लकाकणारी सोनेरी उन्हं, ही अवखळपणे डोंगरदर्यांना गुदगुल्या करत बागडणारी नदी - अरे आणखी किती वेड लावशील?! एखादं सुरेल गीत ऐकताना जसं उचंबळून यावं तसंच तुझी ही सारी मनमोहक रूपे पाहताना होतं!
स्कॉटलंडमधील 'ग्लेनको' व्हॅली असो किंवा परशुरामातून दिसणारं वसिष्ठीचं खोरं असो, दोहीकडे सारखाच आनंद, सारखंच सुख की रे! सह्यकड्यांत तू राकटपणातलं सौंदर्य दाखवतोस, तर ग्लेनकोमध्ये, क्वुलीनमध्ये या सौंदर्याला एक करूणपणाची झालर आहे. पण सारी तुझीच रूपं, त्यामुळं कुठंही एखाद्या अनोळखी प्रदेशात गेलो तरी अजिबात परकं वाटत नाही! तुझ्या दर्शनानं कुठंही असलो तरी नेहमीच खूप भरून येतं. अंतर्बाह्य लखलखाट होतो नुसता! कुणीतरी वीणा वा बॅगपाईप वा तत्सम वाद्याच्या अफाट सुरांनी काहीशी आर्त आळवण करतंय असा भास होतो!
"रोमांचातून कधि दीपोत्सव, कधि नेत्रांतून पुष्पांचे स्रव,
कधि प्राणांतून सागर तांडव, अमृतसिंचित जीणं,
सख्या रे झिणिझिणी वाजे बीन, अनुदिन चीज नवीन!"
असंच आहे की रे तुझंही! रोज नवं गीत, रोज नवी चीज! आणि जुनंच गीत पुन्हा आलं तरी त्याला प्रत्येक वेळी नवा अर्थ असतो! आणि नेहमी एकाच ठिकाणी येऊन जरी बसलो तरी किती विभिन्न अनुभवांनी समृद्ध करून सोडतोस तू! अमृतानुभव दुसरा तो काय? या अमृताची हाव लागून मी रसलंपट होतो तोच तुझ्यापुढं मी किती क्षुद्र आहे ही जाणीव अवचितपणे गोसावीपणही देऊन जाते! मग मनाला एकेक प्रश्न पडू लागतात..
मी कोण? कोठुनि आलो? अन कशास आहे जगती?
भंडावून सोडे मजला ही प्रश्नांची सरबत्ती!
वाटते तुझ्याजवळी रे, सुटतील प्रश्न हे सारे
हे भूमिभूषणा मजला, तूं कवेत घेशील का रे?
--"हे प्रश्न तुझे रे सोपे, कां उठते हे काहूर?
बघ उघडुन डोळे नीट, नाहीत उत्तरे दूर!"
कोठे घनदाट अरण्यें तर कोठे दुर्मुख माळ
कोठे सरितेसी पूर, कोठे भानुज दुष्काळ?
-- "चेहरे जरी हे माझे परि सूत्रधार मी नाही
त्या जगन्नियंत्याच्या मी प्रासादातील शिपाई"
तो कुठे मला भेटावा? ना इतुके माझे पुण्य!
-- "पुण्याची गणितें कसली? श्रद्धेविण उत्तर शून्य!
आक्रोश ओस माळाचा अन गांभीर्य काननाचे
बघ अनुभवुनी तुज त्यांत, अस्तित्व दिसेलच ’त्या’चे!"
निर्मळ आनंदाचा तूं परिपूर्ण स्रोत असताना
मज नकोच दर्शन त्याचे, साक्षात तुला बघताना!
पाहून तुझी ही रूपें, नि:शब्द थक्क मी होतो,
घे कवेत मजला आता मी तव मायेने न्हातो!
-- "मी केवळ निमित्तमात्र, हे सारे श्रीधन आहे
परमेशाच्या पूजेचे, मी केवळ साधन आहे!"
ना कर्मकांड ना पूजा, ना प्रार्थना ना धर्म
तादात्म्य तुझ्याशी हेच निर्मळ हर्षाचे मर्म
-- "हा मुक्त हर्ष अनुभवता, अद्वैतही तुज उमजावे
प्रश्नांचे तुझिया उत्तर, त्याद्वारे तुला मिळावे!"
अन गाभार्यात मनाच्या उसळोनि उत्कट मोद
"ब्रह्मास्मि!" साक्षात्कारें, दुमदुमला एकच नाद!
'तत् त्वमसि' खरे कसे रे, कुणि दिले ब्रह्मपण मजसी?
-- "सारेच ब्रह्म रे येथे, तूं त्याचे तत्त्वम् असि! त्वमेव तत्त्वमसि!"
सध्या मिपावर नर्मदा परिक्रमा गाजत असलेली पाहून मला कुंट्यांच्या पुस्तकाआधी भ्रमणगाथा आणि तत्त्वमसि ही पुस्तकं आठवली. त्यातलं तत्त्वमसि खूपच आवडलं मला. त्यातले निवडक उतारे आठवले! मग त्या पुस्तकापासूनच सुरू झालेली अन् बरेच दिवस रखडलेली एक कविता पूर्ण झाली. काही महिन्यांपूर्वी परशुरामात वसिष्ठी दर्शन पॉईंटवर बसलेलो असताना विचारचक्र सुरू झालं. थोडाफार निसर्गाशी संवाद सुरू झाल्यासारखं वाटलं होतं तेव्हा. त्या भावनेतूनच या कवितेची निर्मिती झाली होती. निसर्गाशी तादात्म्य भाव हा प्रत्येकात कुठेतरी दडलेला असतोच. त्यातून मिळणारा आनंद फार निर्मळ असतो हे खरं! आणि हा आनंद त्याच्या परम स्वरूपात प्रत्येक मनुष्यात प्रकट होतोच आणि एकदा का झाला, की त्या मनुष्याला आपोआपच 'तत्त्वमसि'ची जाणीव होते! :)
प्रतिक्रिया
16 Jan 2012 - 9:10 pm | असुर
__/\__
मेव्या, तुला साष्टांग दंडवत! खरोखर धन्य आहेस.
भानावर आलो की सविस्तर प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न करेन!
--असुर
16 Jan 2012 - 10:27 pm | मन१
+१
16 Jan 2012 - 11:09 pm | अर्धवटराव
निव्वळ अप्रतीम !!
अर्धवटराव
16 Jan 2012 - 9:14 pm | विलासराव
कवीता तर आवडलीच.
लेखही भावला.
16 Jan 2012 - 9:18 pm | गणपा
तुझ्यासारखे अगदी नेमकं आणि नीट नेटक लिहिणारे नेहमी का लिहीत नाहीत असा प्रश्न पडतो. :)
16 Jan 2012 - 9:22 pm | अन्या दातार
शब्दाशब्दाशी सहमत.
बराच वेळ नुस्ता वाचतच राहिलो होतो मेव्याची कविता. __/\__
16 Jan 2012 - 9:20 pm | यशोधरा
सुरेख मेव्या.
16 Jan 2012 - 9:22 pm | पक पक पक
तुमच्या लेखन शैलीला साष्टांग दंडवत! खरच खुप छान लिहीता .......
16 Jan 2012 - 9:30 pm | रेवती
कविता आवडली.
काहीच्या काही उच्च लिहिले आहेस.:)
16 Jan 2012 - 9:34 pm | पैसा
.......
16 Jan 2012 - 10:26 pm | गणेशा
"रोमांचातून कधि दीपोत्सव, कधि नेत्रांतून पुष्पांचे स्रव,
कधि प्राणांतून सागर तांडव, अमृतसिंचित जीणं,
सख्या रे झिणिझिणी वाजे बीन, अनुदिन चीज नवीन!"
अप्रतिम .. निव्वळ अप्रतिम ..
निसर्गाशी मुक्त निखळ संवाद जो साधु शकतो .. त्याचे मन खुप निर्मळ .. निरंकार असते .
आणि मग मनाच्या आनंदाचा उत्सव रोज अनुभवास मिळतो ...
आणि म्हणुन्च तुमचे लिखान खुप आवडले...
16 Jan 2012 - 10:35 pm | मेघवेडा
धन्यवाद.
वरील ओळी बोरकरांच्या आहेत. :)
16 Jan 2012 - 10:36 pm | अन्या दातार
बोरकर म्हणजे कवी बा.भ. बोरकर बरं का रे गणेशा; नाहीतर तुला मिपावरील एक बोरकर आठवतील ;)
16 Jan 2012 - 11:18 pm | गणेशा
[:)]
या ओळी जास्त आवडल्या..
आणि संपुर्ण कविता ही .. मला वाटले पुर्ण कविता या ओळींसहित तुमचीच आहे..
कविता ही खुपच छान आहे..
कुठले कडवे पेस्ट करावे इतके सगळे छान आहेत ..
बाकी
असेच लिहित रहा... वाचत आहे...
16 Jan 2012 - 11:23 pm | चतुरंग
हा मेवा आमच्याबरोबर वाटल्याबद्दल धन्यवाद! :)
काव्य खरेच सुंदर झाले आहे.
-रंगा
16 Jan 2012 - 11:25 pm | मितान
अप्रतिम !
नेमके, नेटके आणि निर्मळ लिखाण आहे हे..
तत्त्वमसि ने खरंच घर केलंय मनात..
17 Jan 2012 - 11:09 am | गवि
तीन शब्दात लिखाणाचं अचूक वर्णन...
हेच शब्द मनात आले होते.
17 Jan 2012 - 2:09 pm | स्वाती दिनेश
अप्रतिम !
नेमके, नेटके आणि निर्मळ लिखाण आहे हे..
अगदी,अगदी..
स्वाती
16 Jan 2012 - 11:53 pm | कवितानागेश
ग्रेट! :)
17 Jan 2012 - 12:39 am | पुष्करिणी
जे जे पुढचं मागचं एका क्षणासाठी का होइना सगळं विसरायला लावतं , लिव्हिंग इन द मोमेंट असतं ते ते असाच उत्कट अनुभव देतं. हा अनुभव अतिशय तरल पण कधी कधी थोडासा भीतीदायक ( मला स्वतःला ) सुद्धा असतो, कदाचित 'मी' पणा विसरायला होतो म्हणून असेल.
उत्तम लिहिलयस.
17 Jan 2012 - 3:35 am | स्मिता.
रेवतीताईंनी म्हटलंय तसं अतिशय उच्च लिहिलंय. यकुंचा लेख वाचून नंतर लगेच हा लेख वाचल्यामुळे कवितेचा मनावर जास्तच परिणाम झालाय.
वाचता वाचता
या ओळी वाचून मनात जे विचारचक्र सुरू झालंय की त्यामुळे जास्त काही लिहायला सुचतच नाहीये.
17 Jan 2012 - 5:29 am | पाषाणभेद
विचार करायला लावणारा लेख अन कविता.
मिपावर काही वादळे येत राहतात. येकुशेटच्या नर्मदा परिक्रमेच्या, मेवेच्या ह्या, व विजूभाऊंच्या 'उमजत नाही' ह्या धाग्यांच्या निमीत्ताने आध्यात्म, चिंतन, स्वत:बद्दल विचारांचं वादळ मिपावर येवू घातलेलं जाणवतय.
17 Jan 2012 - 8:20 am | ५० फक्त
चर पाभेंनी म्हणलेल्या वादळांसाठीच मिपावर यावंसं वाटतं आणि येत राहतो.
धन्यवाद मेवे, खुप छान लिहिलंयस, मजा आली वाचायला.
17 Jan 2012 - 9:57 am | प्यारे१
___/\___
कृ शि सा न वि वि
खरंच माणूस कसाही असला तरी समुद्राच्या काठी, पर्वताच्या माथ्यावर, नितळ छान पाण्याजवळ, शुभ्र, निरभ्र आकाश पाहताना, हिरवीगार शाल पांघरलेली बघताना, धबधब्याचा प्रपात पाहताना थोडा का होईना वेडा होतो, हरवून जातो....!
मेवे सारखा असला तर ठार वेडा होतो नी कविता करतो, दुसरा कुणी चित्रं काढतो , कुणी एखादा फोटो तर कुणी एखादा 'तस्सा' बसून राहिला असं वाटतं.
हे वेडं होणं का होतं?
थोडा उकलण्याचा प्रयत्न करुन बघू.
पाण्याला 'एच्च टू ओ' म्हणावं की 'आपोनारायण' ते माणसाच्या 'अपब्रिंगिंग' नी त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून.
पण तरीही वर म्हटल्याप्रमाणं 'ते मी आहे' चा अस्पष्ट का होईना अनुभव आपले आतले सग्गळे विकार त्या त्या काळापुरते पुसले गेल्यानं मन 'अ -मन' झाल्यामुळं, चित्त शांत झाल्यामुळं, अहंकार जवळपास नाहिसा झाल्यामुळं (निसर्गापुढं, त्याच्या विशालतेपुढं, रंगसंगतीपुढं, कुशल विणकामापुढं, प्रचंड वेग, आकार इ.इ. पुढं जाणवणार्या आत्यंतिक खुजेपणापुढं माणसाच्या 'इवल्या इवल्या 'अहंकाराला तोंड लपवावंसं वाटणारच की....) खरंच 'आत्मसुख' अनुभवत असतो.
आपल्याला वाटतं ... 'वा! काय छान आहे!' असतंच छान पण त्यामध्ये आपण 'बुडालेलो' असलो तरच ते छान वाटतं.
याच ठिकाणी पाच मिनिटांनी एखादा ' कसला बसला फोन गेला' तर त्याच दृश्याला बघण्याची इच्छा मरुन जाईल एखाद्याची कारण त्या व्यक्तीचं मन काम करायला लागेल, चित्ताची धावाधाव सुरु होईल....!
हीच गोष्ट साधा चहा पिण्याबाबतदेखील. बघा पटतंय का?
सुख 'आत' असतं. बाहेर नाही. :)
17 Jan 2012 - 4:00 pm | मेघवेडा
अगदी अगदी! फार सुंदर प्रतिसाद. स्पष्टीकरण पटले. वर पुष्करिणी म्हणते त्याप्रमाणे जेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये बुडालेलो असतो तेव्हा आपण पुढचं मागचं सगळं विसरून त्या क्षणात जगू लागतो. अहंकार, मीपण सगळं विसरतो. आत्यंतिक खुजेपणाची जाणीव भयावह असते हेही खरंय. फोनचं उदाहरणही चपखल.
सर्वच वाचक, प्रतिसादकांचा आभारी आहे.
17 Jan 2012 - 10:02 am | किसन शिंदे
अतिशय सुंदर लिहलंय.
17 Jan 2012 - 10:10 am | प्रीत-मोहर
मेव्या अरे नियमित लिहित जा रे. इतक अप्रतिम लिहितोस तु
17 Jan 2012 - 10:12 am | sneharani
सुंदर! अप्रतिम!!
लेख भावला!!
:)
17 Jan 2012 - 10:35 am | स्पा
उच्चं !
उच्चं !!
क लिवलंय, क लिवलंय,
मेवेपंत लिहित जा कि मध्ये मध्ये
17 Jan 2012 - 11:44 am | कॉमन मॅन
केवळ अप्रतिम, मन:पूर्वक अभिनंदन...!
17 Jan 2012 - 11:58 am | नगरीनिरंजन
मस्त लेख आणि सुंदर कविता.
निसर्गाबद्दल माझ्याही मनात विचार उमटतात पण इतक्या सुंदर रीतीने ते मांडणे मला कधीच जमले नसते.
जियो!
17 Jan 2012 - 3:08 pm | बिपिन कार्यकर्ते
सुरेख!