नमस्कार,
म. टा. मधील खालील बातमी आपल्या माहीती करता:
प्रिय एनआरएम’ मित्रहो!,
[ Wednesday, October 17, 2007 07:15:57 am]
नमस्कार ‘ एनआरएम ’ मित्रहो !,
स. न. वि. वि. ,
पत्रास कारण शुभेच्छा दस-याच्या. आमच्या ‘ एनआरएम डे ’ च्या.
इंडोनेशिया , जावा , सुमात्रा बेटांवर भारतीय संस्कृती घेऊन जाणा-या कौंडिण्य ऋषींचा उल्लेख भारतीय इतिहास पुराणात आहे . त्यांच्याशी नातं सांगणारी कोंढाणा किल्ल्यासह अनेक स्थानं आपल्या महाराष्ट्रात आहेत . देशाच्या इभ्रतीला आच येऊ नये म्हणून सह्यादीची सावली सोडून पानिपताच्या वेदीवर एक पिढी समर्पित करण्याचा वारसाही महाराष्ट्राला आहे . पाकिस्तानात ज्यांची देवळं आहेत , अशा संत नामदेवांची भगवी पतकाही महाराष्ट्राच्या खांद्यावर आहे . या वैभवशाली इतिहासाशी नाळ जोडत मराठी अस्मितेला ग्लोबल खेड्यात भक्कम जागा मिळवून देणा-या देश - विदेशातील आजच्या मराठी कोलंबसांचा वर्तमानही महाराष्ट्राकडे आहे . दस-याच्या निमित्ताने ‘ महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम ’ या मराठी कोलंबसांना , म्हणजेच तुम्हाला सलाम करतंय.
दस-याचं निमित्त फक्त एवढ्यासाठीच कारण हा विजयाचा , विजयादशमीचा दिवस . या दिवशी मराठी माणसांनी इतरांसारखा केवळ इतिहासातल्या विजयाचा उत्सव साजरा केला नाही . तर आपली शस्त्रं परजून सीमोल्लंघनाचे नवे इतिहास रचले . सीमोल्लंघन करून मराठी ध्वजा उभारण्यासाठी टाच मारणा-या मर्द मावळ्यांचा हा दिवस . आजच्या संदर्भात हा ‘ एनआरएम डे ’ म्हणजेच तुमचा , ‘ नॉन रेसिडन्ट महाराष्ट्रियनां ’ चा दिवस . तुमचा लाडका ‘ ऑनलाइन मटा ’ यंदा आणि यापुढे प्रत्येक दसरा ‘ एनआरएम डे ’ म्हणून साजरा करणार आहे . आम्हाला ठावूक आहे की आमची केवळ छोटीशी सुरुवात आहे . पण उद्या जगभर पसरलेल्या मराठीच्या कोट्यवधी लेकरांचा हा कारवा बनेल , याची खात्रीही आहे .
अमके , तमके डे आता पैशापासरी झाले आहेत . हे खरंच . पण ‘ वॅलेंटाइन डे ’ ला एखाद्याच्या जरी अव्यक्त प्रेमाला पालवी फुटली . ‘ फादर्स डे ’ ला चिरंजीवांचं डोकं पायावर बघून एखाद्या तरी बापाच्या डोळ्यातून टचकन आसवं आली . तरी या दिवसांनी हवं ते मिळवलं , असं मानायला हवं . त्याच अर्थाने दस-याला आपट्याचं सोनं वाटताना कुणाला आपला सातासमुदापारचा दोस्त आठवला . घरातल्या सुरीला हळदीकुंकू वाहताना डॉ . आनंदीबाई जोशींच्या कर्तृत्वाचं एखादं स्मरण झालं . दाराला तोरण बांधताना परदेशी मातीतल्या मराठी वैभवाला अभिवादन करावंसं वाटलं किंवा पाटीवर सरस्वती काढताना आयटी क्रांतीच्या पायाचे दगड बनलेल्या मराठी बुद्धीमत्तेविषयी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटली . तरी ‘ एनआरएम डे ’ भरून पावेल .
‘ एनआरएम डे ’ च्या निमित्ताने आम्ही ‘ महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम ’ एक नवं दालन सुरू करणार आहोत. ते तुमचं म्हणजे महाराष्ट्राबाहेरच्या मराठी जनांचं महाजालावरचं हक्काचं व्यासपीठ असेल. त्यात तुमच्या बातम्या , बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या संपर्कांची यादी , तुम्ही व्यक्त केलेली मतमतांतरे. तुमच्या सक्सेस स्टोरी , तुमच्या कथा-कविता , चित्रं , फोटो या सगळ्यांना त्यांची स्वतःची जागा असेल. आम्हाला या सेगमेंटला जगभरचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातलं तारुण्य यांच्यामधला सेतू बनवायचं आहे.
पण त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. सर्वात आधी या सेगमेंटसाठी एक छानसं नाव तुम्ही सुचवायचं आहे. उदाहरणार्थ पैलतीर , महाराष्ट्र अब्रॉड , बृहन्महाराष्ट्र , एनआरएम चावडी असं तुम्हाला वाटेल ते. शिवाय या सेगमेंटकडून तुमच्या अपेक्षा , आजच्या महाराष्ट्राविषयी तुमच्या भावना , महाराष्ट्राबाहेर मराठी संस्कृती जपण्यासाठीचे तुमचे प्रयत्न किंवा तुम्हाला जगभरच्या मराठी माणसांपर्यंत पोहोचवावंसं वाटेल असं काहीही लिहून पाठवा. आम्ही ते आवर्जून प्रसिद्ध करू. आमचा ई मेल पत्ता आहे , mtonlineeditor@indiatimes.co.in. आमच्यासाठी आणखी एक करा , तुमच्या एनआरएम मित्रांचे ई मेल पत्ते आम्हाला जरुर कळवा.
आम्ही तुमच्या मेलची वाट पाहत आहोत. धन्यवाद !
आपले ,
सचिन परब , चीफ ऑफ ब्युरो , महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम
आणि मटा ऑनलाइन टीम
प्रतिक्रिया
17 Oct 2007 - 10:37 pm | पुरणपोळी
बाहेर रहाणारयांचे कौतुक ........हं.. मी एन आर पी डे सुरु करणार आहे:)
18 Oct 2007 - 9:36 am | बेसनलाडू
म.टा. चा कारभार एकूणच ढिला दिसतो. त्यांना पाठवलेल्या विरोपाची साधी पोचपावतीही अजूनही आलेली नाही.
(सौजन्यशील)बेसनलाडू
20 Oct 2007 - 4:02 pm | बेसनलाडू
विरोपाची पोचपावती न देता तो विरोप म टा ने अनपेक्षितपणे त्यांच्या आंतरजालीय आवृत्तीत प्रसिद्ध केला आहे.
येथे वाचता येईल.
ही बातमी निदर्शनास आणून दिल्याबद्दल स्वातीताईंचे विशेष आभार
(आभारी)बेसनलाडू
या प्रसिद्धीला दिलेल्या उत्तरादाखल मी पाठवलेल्या नव्या विरोपात 'मिसळपाव'चा एक सुंदर संकेतस्थळ म्हणून विशेषोल्लेख केला आहे, हे येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते (तात्या, म. टा. कडून शाल-श्रीफळ आलेच, तर पाव नारळाच्या वड्या करून इकडे धाडून द्यायचे जरा बघा हो!)
(हावरट)बेसनलाडू
20 Oct 2007 - 6:20 pm | विसोबा खेचर
तुझं पत्र वाचलं.
या प्रसिद्धीला दिलेल्या उत्तरादाखल मी पाठवलेल्या नव्या विरोपात 'मिसळपाव'चा एक सुंदर संकेतस्थळ म्हणून विशेषोल्लेख केला आहे, हे येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते
वा वा! ये तो आपने बहोत अच्छा काम किया है..
(तात्या, म. टा. कडून शाल-श्रीफळ आलेच, तर पाव नारळाच्या वड्या करून इकडे धाडून द्यायचे जरा बघा हो!)
हो, नक्की...:)
असो, एन आर एम डे च्या संकल्पनेकरता मटाचे अभिनंदन..
तात्या.
20 Oct 2007 - 6:50 pm | विकास
विरोपाची पोचपावती न देता तो विरोप म टा ने अनपेक्षितपणे त्यांच्या आंतरजालीय आवृत्तीत प्रसिद्ध केला आहे.
मी आपला आधीचा प्रतिसाद पण वाचला होता, पण आता आपल्याला काय म्हणायचे आहे ते समजले... बहुतांशी प्रसार माध्यमातील लोकं व्यक्तिगत पोचपावती देत नाहीत. कारण सरळच आहे, की खूप विरोप येत असतात.
आपली बातमी वाचून एक सुचवावेसे वाटले: मिसळपाव/उपक्रम वगैरे किंवा गमभनचा उपयोग करून सरळ मराठीत लिहून ते पत्र विरोपात चिटकवून पाठवत जा.
21 Oct 2007 - 1:44 am | बेसनलाडू
आपली बातमी वाचून एक सुचवावेसे वाटले: मिसळपाव/उपक्रम वगैरे किंवा गमभनचा उपयोग करून सरळ मराठीत लिहून ते पत्र विरोपात चिटकवून पाठवत जा.
मी मराठी टंकलेखनासाठी बराहा वापरतो. पण म. टा. च्या न्याहाळकावर बराहाची अक्षरे कशी उमटतील, याचा अंदाज नसल्याने आधी इंग्रजीतून विरोपपाठवला. मात्र ऋषिकेश दाभोळकर यांचे पत्र पाहून वाटले, की बराहाची अक्षरे दिसण्यात बाधा यायची नाही. म्हणून मग नवा विरोप शुद्ध मराठीत टंकित करून पाठवला आहे :) सुचवणीबद्दल धन्यवाद.
(आभारी)बेसनलाडू