पाणी अन् माती

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
10 Nov 2011 - 12:41 pm

(१)
कसं असतं ना
माती आणि पाणी यांच नातंच निराळ
पाण्यातल्या मातीचे प्रमाण जास्त असेल तर
पाणी दिसत नाही अन्
मातीतल्या पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर
माती दिसत नाही
.
.
माणसाचही असंच असतं काहीसं
कधी मातीच्या देहात डोळ्यातले पाणी दाटते
तर कधी
डोळ्यातल्या पाण्यात मातीचा देह विरघळतो
अन् मग
.
.
कधी माती, कधी पाणी
कधी पाणी, कधी माती

(२)
मातीत पाणी नसेल तर
बीजे रुजत नसतात
मातीत पाण्याशिवाय फक्त निवडुंग फुलतात
.
अन्
पाण्यात माती नसेल तर
फक्त मनीप्लांट रुजतो
.
.
.
कधीही फुले न येणारा

(३)
कुठल्याही पाण्यात कुठलीही माती मिसळली तर
मृदगंध दरवळत नसतो
.
जमिनीला तडा देणा-या
अनेक रणरणत्या दिवसांमधून
तापलेल्या मातीवर जेव्हा
.
अनेक डोंगर पार करून
जडशीळ दु:खांचे बाष्प वाहून आणलेले
कृष्णमेघ रिते होतात तेव्हाच
.
मृदगंधाचे उंची अत्तर
दरवळून आल्हाद पसरतो

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१०/११/२०११)

शांतरसकवितामुक्तकसाहित्यिक

प्रतिक्रिया

मस्त

२ नं. जास्त आवडली आणि भावली.. ग्रेट. निवडुंग .. मनिप्लाँट मस्त सांगितले एकदम...
पुन्हा पुन्हा वाचली ही कविता,

३ मधले जडशीळ दु;खाचेच बाष्प का ? .. आनंदाचे ... आर्त हाकेला ओ देणारे... प्रेमाचे.. वाट बघण्यातले अधीरतेचे बाष्प का नाही असे अनेक प्रश्न उभे राहिले ..

१ मधले दूसरे कडवे अप्रतिम .. खुप छान ...

परंतु पहिले कडवे लगेच मानले जात नाहि..
मातीत पाणी जास्त असले तरी मातीचे अस्तित्व पाण्याला ही गढुळ बनवते...
आणि पाण्यात माती जास्त असली तरी पाणी आतुन ओलावा जिवंत ठेवते मातीतला ..

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Nov 2011 - 11:46 am | मिसळलेला काव्यप्रेमी

३ मधले जडशीळ दु;खाचेच बाष्प का ? .. आनंदाचे ... आर्त हाकेला ओ देणारे... प्रेमाचे.. वाट बघण्यातले अधीरतेचे बाष्प का नाही असे अनेक प्रश्न उभे राहिले ..

१ मधले दूसरे कडवे अप्रतिम .. खुप छान ...

परंतु पहिले कडवे लगेच मानले जात नाहि..
मातीत पाणी जास्त असले तरी मातीचे अस्तित्व पाण्याला ही गढुळ बनवते...
आणि पाण्यात माती जास्त असली तरी पाणी आतुन ओलावा जिवंत ठेवते मातीतला ..

तुम्ही म्हणताय ते पटतयं. पण ज्या क्षणाला तुमच्या समोर असे काही येते, तेव्हा तुमच्या मनातले भाव कसे आहेत त्यावर सगळं अवलंबून आहे. मी ते बघतांना कदाचीत उदास होतो काही कारणाने, म्हणून मला ते तसे दिसले.
थोडक्यात जसे सुचले तसे उतरवले. :)

विदेश's picture

10 Nov 2011 - 10:29 pm | विदेश

कविता आवडली. 'निवडुंग' आणि 'मनीप्लँट' खास .

पाषाणभेद's picture

10 Nov 2011 - 11:32 pm | पाषाणभेद

उत्तम काव्य आहे मिका

नगरीनिरंजन's picture

11 Nov 2011 - 12:58 pm | नगरीनिरंजन

दुसरी आवडली.
त्यात माती आणि पाण्याचा संबंध चांगला खुलून आला आहे.

तिसरीही छान आहे पण "कुठल्याही मातीत कुठलेही पाणी" असे म्हणण्याचा संदर्भ कळला नाही. माती आणि पाणी हे काही रुपक म्हणून वापरले आहे काय? असल्यास कसले ते कळले नाही.

मदनबाण's picture

11 Nov 2011 - 1:13 pm | मदनबाण

मस्तच... :)

डावखुरा's picture

11 Nov 2011 - 1:25 pm | डावखुरा

मनभावन..