छोटे छोटे ससे कसे
टकमक इंद्रधनू बघती -
बघता कोपऱ्यात ते
रुसुनी मुकाट का बसती !
चुन्यात बुडुनी आलो वाटे,
लाल ना कुणी निळे -
रंग कुणाचे ना नारंगी
कुणीच ना काळे पिवळे !
एक छडी जादूची घेऊन
तिथेच जादुगार आला -
हिरमुसलेले तुम्ही दिसता
कोपऱ्यात ह्या का बसला ?'
'आम्ही सारे असे पांढरे -
रंगित नाही, शुभ्र कसे ?'
- एकमुखाने वदले सारे
जादुगार तो मनीं हसे !
मूठ उघडुनी जादुगार तो
रंगित चकती दावितसे
भरभर जादूच्याच छडीने
रंगित चकती फिरवितसे -
फक्त पांढरा रंगच दिसला-
फिरता चकती गरगर ती !
हसू लागले ससे बघुनिया
जादू रंगित चकतीवर ती !
मिसळुन सारे रंग जगीचे
शुभ्र ससे बनलात तुम्ही ,
मुळीच ना तुम्ही बिनरंगी-
बहुरंगी आहात तुम्ही ! '
आनंदाने फिरू लागले
सर्व ससे अवतीभवती -
गुप्त जाहला जादुगार तो
जादुची छडी अन् चकती !
प्रतिक्रिया
10 Nov 2011 - 10:35 am | मिसळलेला काव्यप्रेमी
आवडली.
10 Nov 2011 - 10:41 am | प्रकाश१११
विदेशां -खूपच मस्त
मूठ उघडुनी जादुगार तो
रंगित चकती दावितसे
भरभर जादूच्याच छडीने
रंगित चकती फिरवितसे -
अप;रतिं म्हणेन ...!!
10 Nov 2011 - 10:41 am | प्रकाश१११
विदेशां -खूपच मस्त
मूठ उघडुनी जादुगार तो
रंगित चकती दावितसे
भरभर जादूच्याच छडीने
रंगित चकती फिरवितसे -
अप;रतिं म्हणेन ...!!
10 Nov 2011 - 10:54 am | अमोल केळकर
खुप छान कविता
अमोल केळकर
10 Nov 2011 - 3:55 pm | गणेशा
छान बालगीत .. आवडले..
11 Nov 2011 - 6:53 am | मदनबाण
अरे वा माझ्यावर कविता ! :)
मस्तच ! :)
(फोटु जालावरुन घेतलाय.)
12 Nov 2011 - 12:32 am | पाषाणभेद
बालकवी, छान कविता आहे बरं
12 Nov 2011 - 10:04 pm | पैसा
पण बाणाने दिलेला तो ससा सगळ्या जगातला दुष्ट आहे!