'एका नवीन देवस्थानाचा जन्म' ही व्यंकटेश माडगूळकरांची एक जमलेली कथा आहे. माणदेशातील एका लहानशा गावात ही कथा घडते. जून महिन्यातल्या एका सकाळी त्या गवात एक भला मोठा वानर येतो. वैराण, रखरखीत माणदेशात झाडेझुडे कमीच, त्यामुळे असले प्राणी बघायची काही त्या गावकर्यांना सवय नसते. त्यातून हा वानर चक्क मारुतीच्या देवळातच घुसतो. आणि मग येऊन एका झाडावर निवांत ऊन खात बसतो. हे बघणार्या गावकर्यांना मग तर काय साक्षात हनुमान आपल्या गावात आला असे वाटायला लागते. पण शाळेला येणार्या मुलांपैकी एक गुलाम मुलगा त्या माकडाला एक भिर्रकन धोंडा फेकून मारतो. मग तो माकड चिडतो आणि उंच पिंपळाच्या झाडावर जाऊन बसतो. आता हळूहळू तिथे गर्दी जमायला लागलेली असते आणि साक्षात हनुमान आपल्या गावात आला, म्हणून गावकरी त्याच्या आदरातिथ्याच्या तयारीला लागतात. गावातला गुरव त्याला भाकरीचा कोर खायला घालू इच्छितो, मूठभर शेंगदाणे आणतो, पण तो माकड काही कशाला दाद देत नाही. लोक म्हणतात की घ्येनार नाही बहुतेक. का, तर हे गुरव तोंडावरनं असं गरीब दिसतंय पन फाजील मनुष्य आहे ,म्हणतात. देवाच्या दिव्याला लोक गोडंतेल द्येत्यात, तर त्यात ह्यो भजी तळून खातोय, म्हणतात. देव अंधारात आणि भजी याच्या तोंडात असा परकार हाये, म्हणतात लोक. मग गुरवच गावातल्या आबानानांना म्हणतो, की नाना माझ्या पाप्याच्या हातचं घेणं काय याला पसंत दिसत नाही, तर तुमी पुढं व्हा आणि त्याला एवढं हे चार दाणं द्या, म्हणतो तो गुरव. आबानाना गावातले चांगले वयस्क भाविक असतात. नानांना मोठा बहुमान झाल्यासारखं वाटतं. ते पुढे होतात आणि या अंजनीसुताला विनंती करतात. म्हणतात की देवा, नगरीची इच्छा आहे की तुम्ही एक चार दाणे घ्या. आता असा अनमान करु नका. त्याबरोबर तो वानर हळूहळू खाली यायला लागतो. बघणारे म्हणातात, की बघा, आम्ही म्हनलं न्हवतं का की घेणार म्हणून. का, तर वडील मनुष्य आहे. वडील माणसांचं ऐकावं लागतं. मग लहान-मोठं असं केलेलं कशासाठी असतंय? एक चार तरुणांचं टारगट टोळकं म्हणतं की आम्ही आमचं मत राखून ठेवतो. येईल, न येईल, काय ते पुढचं पुढं बघू. आता काय सांगता येणार नाही. आता तो वानर हळूहळू खाली येतो आणि आबानानांच्या हाताला कच्चकन चावून परत झाडावर जाऊन बसतो. त्याबरोबर आबानाना अगाई मला माकाड चावलं म्हणून किंचाळतात. आता माकाड बरं का, हनुमंता, अंजनीसुता असलं काही नाही. ते टारगट टोळकं म्हणतं की बगा, नाना आता सज्जन दिसतुया, पर तरुणपणी त्यानं कायकाय केलेलं असंल ते त्याचं त्यालाच ठावकी. द्येवाला डोळं असत्यात, म्हणते ते.
मग अशा रीतीनं बघताबघता तो वानर गावातल्या धाबारा लोकांना चावून काढतो. मग बाकी आबानानांचा पैलवान मुलगा पिसाळतो आणि म्हणतो की आता मी बघतोच या द्येवाकडं. लई डाळ नासली या द्येवानं. आणि हातात दोन धोंडं घेऊन तो या द्येवाच्या मागं लागतो. त्याच्याबरोबर त्याचे काही सवंगडीही हातात काठ्याबिठ्या घेऊन येतात. म्हणतात, की नानाचा पोरगा आज वानेर हानतोय भौतेक. चला रं, लई दिसात आपल्याला काही हानायला गावलं न्हाई, ह्या वानराला हानूया आज. मग या रानातनं त्या रानात, या बांधावरनं त्या बांधावर असा त्या वानराचा पाठलाग करतात ती पोरं, आणि शेवटी नानाच्या तरण्या पोराचा अवलगामी ठोका लागून तो वानर जाग्यावरच प्राण सोडतो.
आता हा वानर मेला म्हटल्यावर सगळ्यांना उपरती होते. आत्ता, कालपरवा आपण हनुमान जयंती साजरी केली आणि आज वानेर हानला हे काही बरोबर नाही असं त्याना वाटायला लागतं आणि मग त्याचं जणू प्रायश्चित्त म्हणून त्या वानराची माणसासारखी प्रेतयात्रा काढतात, गुलाल, बुक्का, ताशा आणतात, घोषणाबिषणा देतात आणि ओढ्याच्या काठाला त्याचं दहन वगैरे करतात.
आता म्हातार्या आबानानाच्या मनाला बाकी ही गोष्ट लागून राहाते. त्याला वाटतं की वानेर आपल्या हाताला चावला, त्यात त्याची चूक काहीच नाही. का, तर करु नये त्या गोष्टी या हातानं केलेल्या आहेत. मग या रुखरुखीचं प्रायश्चित्त म्हणून नाना हजार-बाराशे रुपये खर्च करुन तो वानर जिथं पहिल्यांदा दिसला होता तिथं एक देऊळ बांधतात, गावच्या गवंड्याकडून एक हनुमानाची मूर्ती बनवून घेतात, भटाकडून त्याची प्रतिष्ठापना करतात आणि रोज सकाळी अंघोळ करुन त्याची पूजा-अर्चा सुरु करतात. हळूहळू गावात बोलबाला होतो की त्यी नानाचा हनुमान हाय ना, त्ये कडक देवस्थान हाये. पावतोय त्यो नवसाला, म्हणतात लोक. आधीचा पण पावत होता, तसं काय म्हणण्यात अर्थ नाही, पण ह्यो कायम पावतोय, म्हणतात लोक.
आणि अशा रीतीने गावात एका नवीन देवस्थानाचा जन्म होतो.
माडगूळकरांची ही कथा मानवी वृत्ती, विचार आणि कृती यांवर प्रकाश टाकून जाते. आधी अंजनीसुता म्हणून आरती ओवाळणारे आणि हाताला चावा बसताच त्या अंजनीसुताला 'माकाड' म्हणणारे आबानाना आपल्या आसपास दिसायला लागतात. जन्म, वाढ, परिपक्वता आणि लय या सृष्टीच्या क्रमात एखाद्याला मारुन मग त्याचं स्वतंत्र देऊळ उभारणारे, त्याची पूजा-अर्चा करणारे नाना आपल्यातलेच एक वाटायला लागतात. आधीच्या पावणार्या मारुतीला नमस्कार करणार्यांची पावले आता या नानाच्या नव्या 'कडक' मारुतीकडे वळताना दिसतात. तेच ते भाविक, तोच तो घंटानाद, तोच मारुती आणि तोच शेंदूर....देऊळ बदलले म्हणून काय? 'गाभारा सलामत तो देव पचास' हे आठवते. माडगूळकरांनी ही कथा माणदेशातील एक घटना म्हणून लिहिली असली तरी तिला (कदाचित माडगूळकरांना अपेक्षित नसणारे) एक वैश्विक परिमाण लाभले आहे, असे मला वाटते.
प्रतिक्रिया
22 Oct 2011 - 9:24 am | चिंतामणी
या योगायोगाची गंमत वाटली.
व्यंकटेश माडगुळकरांच्या लिखाणातुन अनेक मानवी पैलु दिसतात.
या निमीत्ताने त्यांच्या लेखनाचे स्मरण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
22 Oct 2011 - 9:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माडगूळकरांची ही कथा मानवी वृत्ती, विचार आणि कृती यांवर प्रकाश टाकून जाते. आधी अंजनीसुता म्हणून आरती ओवाळणारे आणि हाताला चावा बसताच त्या अंजनीसुताला 'माकाड' म्हणणारे आबानाना आपल्या आसपास दिसायला लागतात. जन्म, वाढ, परिपक्वता आणि लय या सृष्टीच्या क्रमात एखाद्याला मारुन मग त्याचं स्वतंत्र देऊळ उभारणारे, त्याची पूजा-अर्चा करणारे नाना आपल्यातलेच एक वाटायला लागतात.
अगदी खरं आहे....!
माडगुळकरांनी माणसाच्या मनाचे विविध कंगोरे जसे टीपले आहेत तसा हातखंडा तुमचाही माणसं टीपण्याबाबत आहे, आपलं शत्रुत्त्व मान्य करुन नम्रपणे ही भावना व्यक्त केलीच पाहिजे.
-दिलीप बिरुटे
22 Oct 2011 - 11:51 am | विसुनाना
एका ग्रामीण कथेचे रसग्रहण करताना 'पिच्चरची इष्टोरी' सांगण्याचा बाज आवडला. (वैविध्य हेच सन्जोपरावांच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे.)
- हेच कथेचे मर्म.
-किंबहुना आसपासच कशाला? आपल्याच अंतरंगात असलेले 'नाना'ही अशा कथांमधून प्रकट होतात. (तसेही आमच्या नावात 'नाना' आहेतच. ;))
- बरोबर. ज्याचेत्याचे गाभारे - ज्याचेत्याचे देव!
एकंदर लेखन आवडले.
22 Oct 2011 - 11:54 am | मदनबाण
चांगले लेखन... :)
जाता जाता :--- उगाच, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्याच पिल्लाला पाया खाली घेणार्या माकडीणीची बिरबल कथा आठवुन गेली.
22 Oct 2011 - 12:03 pm | प्रभाकर पेठकर
श्री. सन्जोप राव,
खूप पूर्वी श्री व्यंकटेश माडगुळांच्या कथा कथनाच्या ध्वनीफितीत ही कथा ऐकल्यावर त्याची अनेकदा पारायणे केली होती. त्या सर्व जुन्या सोनेरी स्मृतींना उजाळा मिळाला. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद.
कथापरिक्षण अचूक आहे. अभिनंदन.
22 Oct 2011 - 1:01 pm | श्रावण मोडक
कथेत दडलेलं भाष्य शेवटच्या परिच्छेदात उत्तमपणे उकललं आहे.
22 Oct 2011 - 7:55 pm | राजेश घासकडवी
असंच म्हणतो. शिवाय कथा समजावून देण्याच्या शैलीमुळेही लेख वाचनीय झालेला आहे.
तेच भाविक, नवीन देऊळ वरून विंदांची तेच ते अन तेच ते ही कविता आठवली.
22 Oct 2011 - 2:06 pm | पिंगू
वा सन्जोपराव श्टुरी आवडली..
- पिंगू
22 Oct 2011 - 2:35 pm | दादा कोंडके
माडगुळकर काय किवा जीए काय, मानवी स्वभावाचे प्रतिबिंब त्यांच्या कथेमध्ये उतरलेले असते. प्रसंग फक्त संदर्भासाठीच असतात. कालानुरुप संदर्भ बदलले तरी, राग, लोभ, मत्सर, मोह, वासना यागोष्टी आहे त्याच राहतात आणि म्हणुन त्यांचं साहित्य चिरंतन होउन जातं.
संजोपरावांचा फ्यान (दादा)
25 Oct 2011 - 10:14 am | मन१
फार पूर्वी वाचली होतीच कथा. पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल आभारी.
माझे वाचनविश्व तसे चिमुकलेच. पण कथा व्यंकटेश माडगूळकरांच्या आवडायच्या तशाच गावाकडच्या बिलंदर आणि माणसासारख्या माणसांची, बिलंदर लोकांची वर्णन करायची द मा मिरासदारांची शैलीही आवडायची.
बहुतेक द मा मिं ची अशीच एक "भुताचा जन्म" नावाची भन्नाट कथा ह्याच लायनीची असल्याने आठवली.
आपण वाचली असेलच.
छ्या. उगीच सरळ अर्थाने घेतलं लेखन. इथं दुसरच काही सुरु दिसतय. आमचा भोळसटपणा संपणार कधी.लोकांचे हेवेदावे अन् शालजोडीतले समजणार तरी कधी? : (
25 Oct 2011 - 10:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छ्या. उगीच सरळ अर्थाने घेतलं लेखन. इथं दुसरच काही सुरु दिसतय. आमचा भोळसटपणा संपणार कधी.लोकांचे हेवेदावे अन् शालजोडीतले समजणार तरी कधी? : (
मराठी आंतरजालावरील लेखकांचा व्यक्ती आणि लेखन म्हणून जेव्हा विश्वकोशाचा खंड कोणी लिहायला घेईल तेव्हा मराठी आंतरजालावरील लेखकांच्या (इथे प्रतिसाद देणारे सदस्यही ग्रहित धरले आहेत) वैशिष्ट्यांबाबत दोन पाच हजार पानांची खाडाखोड करुन पाच पंचवीस पानाच्या वर हा खंड जाणार नाही, असे मला राहून राहून वाटते. :)
-दिलीप बिरुटे
(दीपावली निमित्त फटाके फोडणारा)
25 Oct 2011 - 10:36 am | मदनबाण
वैशिष्ट्यांबाबत दोन पाच हजार पानांची खाडाखोड करुन पाच पंचवीस पानाच्या वर हा खंड जाणार नाही, असे मला राहून राहून वाटते.
त्यात "कंपूबाजी" बद्धल एक अध्याय नक्कीच जोडला जाईल यात तीळ मात्र शंका नाही ! ;)
(दीपावली निमित्त सुतळी बॉम्ब फोडणारा) ;)
25 Oct 2011 - 1:00 pm | बिपिन कार्यकर्ते
मन१राव! प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरूवात स्वतःपासून करावी. मी तरी करतो. त्यामुळे भोळसटपणा असो किंवा वैयक्तिक हेवेदावे असोत, आपल्यापुरते आपण दुर्लक्ष करावे. चांगले आहे ते घ्यावे, बाकीचे सोडून द्यावे. दुसरे कसे वागतात हा त्यांचा प्रश्न असतो ना! आपण आपलं नीट रहावं. आधी आपण स्वतःला बदललं तर जग तेवढ्या प्रमाणात बदललंच नाही का?
22 Oct 2011 - 4:14 pm | आत्मशून्य
डोक्याला शॉट असलेला "देल्ही ६" आठवला. त्यालाही वैश्विक परीमाण लाभले होते. बाकी मानवी वृत्ती, विचार आणि कृती वगैरे वगैरे यांवर काय बोलणार ? त्यावर टाकू तेव्हडा प्रकाश कमीच नाही का ?
22 Oct 2011 - 6:45 pm | चतुरंग
कथेतलं भाष्य चांगलं विषद करुन सांगितलंय.
नवीन देऊळ स्थापित होणे हे तसे नवीन नाहीच. आधीच्या देवळांमधून दर्शनाचा कंटाळा आला की लोक नवीन दगडाला शेंदूर फासतातच. चक्रनेमिक्र हे सुरुच असते. एखाद्या कंपनीतले बोर्डावरचे लोक काही काळाने स्वतःची दुसरी कंपनी सुरु करतात तसेच हे.
आम्ही नवीन देवळाच्या खिडकीतून डोकावलो आहोत पण अजून सभामंडपात प्रवेश केलेला नाही! :)
-(भाविक) रंगा
22 Oct 2011 - 8:11 pm | धन्या
कथेची छान ओळख करुन दिली आहे.
कुलदीप पवार आणि निळू फुले अभिनीत एका धमाल मराठी चित्रपटाची आठवण झाली.
22 Oct 2011 - 7:28 pm | मुक्तसुनीत
विवेचन आवडले. नव्या प्रयत्नांचे उमेद वाढवणारे . असेच आणखी येऊ द्यात.
23 Oct 2011 - 10:55 am | तिमा
सन्जोपराव,
कथा माहित असुनही तुम्ही ती इतक्या उत्तम रीतीने भाष्य करुन मांडलीत की पुन्हा नव्याने वाचल्याचा आनंद मिळाला.
24 Oct 2011 - 11:09 am | छोटा डॉन
कथेतला नेमकेपणा आवडला.
- छोटा डॉन
24 Oct 2011 - 11:51 am | वेताळ
नेमके सन्जोपरावाना काय म्हनायचे आहे?
24 Oct 2011 - 8:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
''तेच ते भाविक, तोच तो घंटानाद, तोच मारुती आणि तोच शेंदूर'' असेल तर नवीन देऊळ* कशाला अशा आशयाची लेखकाची मांडणी आहे, असे वाटते.
काय कल्लं का नाय :)
*शब्दार्थ : नवं देऊळ = नवं मराठी संकेतस्थळ
-दिलीप बिरुटे
24 Oct 2011 - 8:35 pm | दादा कोंडके
हे आसय व्हय. पर पुजारी येगळा न्हवं का!
25 Oct 2011 - 9:59 am | मदनबाण
शब्दार्थ : नवं देऊळ = नवं मराठी संकेतस्थळ
हॅहॅहॅ... ;)
24 Oct 2011 - 12:33 pm | विजुभाऊ
एका चांगल्या कथेच्या परीचयाबद्दल धन्यवाद.
यावरून मिरासदारांची "भुताचा जन्म " ही कथा आठवली
24 Oct 2011 - 12:45 pm | मनीषा
माडगूळकरांची ही कथा मानवी वृत्ती, विचार आणि कृती यांवर प्रकाश टाकून जाते. आधी अंजनीसुता म्हणून आरती ओवाळणारे आणि हाताला चावा बसताच त्या अंजनीसुताला 'माकाड' म्हणणारे आबानाना आपल्या आसपास दिसायला लागतात
अगदी अगदी ... दिसतायत खरे असे बरेच आसपास .
एक उत्तम (सत्य) कथा !
24 Oct 2011 - 7:21 pm | प्रकाश घाटपांडे
गावी आमचे खाजगी राम मंदिर आहे. तिथे लहानपणी एक वानर आले. मंदिराच्या पुढे हनुमानची मुर्ती असलेले छोटी देवळी आहे त्यावर ते बसून रामाच्या गाभार्याकडे निरखून पाहू लागले. मला तर त्यावळी तो साक्षात हनुमानच वाटला मी त्याला नमस्कारही केला. त्या दिवशी भीमरुपी अधिक भक्तीभावाने म्हटली.
24 Oct 2011 - 8:06 pm | बिपिन कार्यकर्ते
कथा आणि त्यावरील विवेचन आवडलेच. शेवटचे भाष्यही नेमके.
25 Oct 2011 - 8:00 am | Nile
दगडं मारणारे भोळसट गावकरी पाहून मौज वाटली.
25 Oct 2011 - 9:15 am | नंदन
कथा, टायमिंग आणि शेवटचे भाष्य आवडले. काही कारणाने (उदा. चावा घेणे) म्हणा वा अंमळ उशीराने म्हणा, अंजनीसुत मानलेली चीज ही खरं तर 'माकाड' आहे हे समजणेही तसे महत्त्वाचेच.
याच संदर्भात, मारूतीच्या मूर्तीच्या बेंबीतल्या विंचूदंशाची आणि गार वाटण्याची कथा आठवली :)