अंधार

ढब्बू पैसा's picture
ढब्बू पैसा in जनातलं, मनातलं
29 Sep 2011 - 12:55 am

खूपशा अंधार्‍या रात्री आणि दिवस सरत चालले आहेत. जीवघेणा अंधार व्यापून रहावा सगळीकडे असं वातावरण. प्रकाशाला घुसमट व्हावी आत शिरताना असे काळोखे कोपरे. जिथे मनाला जखम झाली ना तरी जखमेतून बाहेर पडतो आरक्त अंधार.

हळू हळू नशा चढत जाते अंधाराची. उजेड धडका देत राहतो दाराखिडक्यांवर. एखाद्या चुकार फटीतून आलाच उजेड आत अंधाराशी लढाई जिंकून तरी मी सज्ज असतेच गडद काळं ठिगळ घेऊन. फटीला खिळा मारला की मग तगमग कमी होते. मग मी अशीच ठिगळं लावत फिरते घरभर, उजेडाची प्रत्येक शक्यता बंद करत.

अंधार धमन्यांमधे वाहतो. श्वास उच्छवास अंधाराचेच होतात आणि मग मनातला सैतान छद्मीपणे हसत राहतो माझ्या धडपडीवर. काळा पलंग, काळं कार्पेट आणि मी सुद्धा. मग स्वतःचंच अस्तित्व जाणवत नाही. स्वतःलाच वाटतं की आता मी नाहीच! मी कुठाय, उरलाय तो फक्त काळोख.

या अंधाराचं एक बरं असतं, सावल्या पण दिसत नाहीत. म्हणजे कुणी आहे की नाही हेच कळत नाही मग स्वत:लाच सेफ वाटतं उगाच की माझ्यापर्यंत कोणीच पोचू शकणार नाही. ह्या नादात लक्षातही येत नाही मीही कुणापर्यंत पोचू शकणार नाही.

त्या अंधारात मी चाचपडत बसते. अंधाराला सराईत असल्याने सगळे कोपरे, खाचाखोचा माहिती असतात. मी आहे त्या खोलीत एका कोपर्‍यात कधी काळी आकाशी रंगाचं असलेलं टेडीबेअर आहे. 'त्या'ने दिलेलं! ह्या जीवघेण्या अंधारात त्याचा गोडवा दिसेनासा झालाय. कधीतरी उगाच भरकटतांना त्याचा मऊसर स्पर्श मला मस्त निळ्या रंगाची आठवण करून देतो, एक क्षणभर घुसमट थांबली असं वाटतं , पण दुसर्‍याच क्षणी मनातली निळाई भोवतालच्या कृष्णविवरात वितळत जाताना दिसते आणि एकदम पुन्हा तो अंधार मला वेढून टाकतो.

कधीतरी वाटतंच, की काय अर्थ आहे अश्या असण्याला? स्वतःच स्वतःला छळत बसण्याला? पण हे वाटणं क्षणिकच. पुन्हा खोलीच्या कोपर्‍यात शक्य तेव्हढं अंग मुडपून मी बसून असते, अंधारडोहातलं खोलपण किंवा उथळपण बघत.

कथामुक्तकप्रकटनप्रतिभा

प्रतिक्रिया

जातीवंत भटका's picture

29 Sep 2011 - 1:26 am | जातीवंत भटका

मिपावरच्या तुझ्या पहिल्या (गद्य) लेखाबद्दल अभिनंदन ..
पुढील लेखनास शुभेच्छा
--
जातीवंत भटका ..

मुक्तसुनीत's picture

29 Sep 2011 - 2:31 am | मुक्तसुनीत

यांच्या एका कवितेची आठवण

सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण

शुचि's picture

29 Sep 2011 - 2:49 am | शुचि

मुक्तक आवडलं.

राजेश घासकडवी's picture

29 Sep 2011 - 3:30 am | राजेश घासकडवी

पण अंधार वाईट आणि प्रकाश चांगला असंच का ठरलेलं असतं? कोणी ठरवलं ते? काळा आणि पांढरा हे निव्वळ दोन विरुद्ध रंग आहेत. पद्धत आहे म्हणून पांढऱ्या कागदावर आपण काळ्या अक्षरांनी लिहितो. उलटीच सवय असती आपल्याला तर? किंवा आत्ता या क्षणाला सर्वांच्या मेंदूतल्या सॉफ्टवेअरमध्ये बदल झाला आणि आपल्याला दिसणारी चित्रं फक्त काळीपांढरी, आणि तीही निगेटिव्ह दिसायला लागली तर? जग बदलेल का?

मनाच्या आतली एकलकोंडी काळीकुट्ट शांतता आणि जगाच्या जमावाच्या कोलाहलाचा प्रकाश... खिडक्या बंद करून आपण प्रकाश येणं थांबवत नाही, तर मनाला सुख देणारा अंधार बाहेर निसटून बाहेर जाणं थांबवतो. बाहेर कडाक्याची थंडी पडलेली असताना घरात साठवलेली ऊब नाही का आपण बाहेर जाऊ देत नाही. तसंच.

अस्तित्व आणि नास्तित्व. हे सुद्धा नुसते शब्द आहेत. एकमेकांच्या विरुद्ध. कुठचा चांगला कुठचा वाईट हे कसं सांगणार? पण नास्तित्व काळं समजतो आपण. अस्तित्वाला उजेडाशी जोडतो. खरं तर उलटं आहे. जगाच्या गोंगाटाच्या पांढऱ्या कागदावर आपण स्वत्वाची काळी अक्षरं उमटवत रहात असतो. त्या अंधारामुळेच तर त्या कागदाला अर्थ येतो. नाहीतर जग म्हणजे दुसरं काय, निव्वळ व्हाइट नॉइज.

श्रावण मोडक's picture

29 Sep 2011 - 9:53 am | श्रावण मोडक

क्या बात है! गुर्जी, उत्तम प्रतिसाद. विशेषतः "नाहीतर जग म्हणजे दुसरं काय, निव्वळ व्हाइट नॉइज." हे विधान एकदम पटले. माझीच एक कविता आठवून गेली उगाचच. :)

ढब्बू पैसा's picture

29 Sep 2011 - 10:09 am | ढब्बू पैसा

+१ श्रावण
गुर्जींचे प्रतिसाद पण बरंच काही नवीन शिकवून जातात :)

परिकथेतील राजकुमार's picture

29 Sep 2011 - 11:45 am | परिकथेतील राजकुमार

ही असले काही लिहू शकते ह्यावर अजून विश्वास बसत नाहीये.

छान आहे मुक्तक.

@श्रामो :- मुक्तिदाता आठवली का ?

श्रावण मोडक's picture

29 Sep 2011 - 12:19 pm | श्रावण मोडक

केलं का लगेच खोदकाम? काही सोयच नाही राहिली. ;)
बाकी, ढब्बीविषयीच्या तुझ्या मताशी सहमत होण्याची दुर्दैवी वेळ तिनंच आणली. सुधार गं थोडी तरी. ;)

ढब्बू पैसा's picture

29 Sep 2011 - 12:28 pm | ढब्बू पैसा

आता प्रकरण हाताबाहेर गेलं आहे.
मला बिघडवलं कुणी ;) मी तर ठीक होते आधी :P
असो अतिअवांतर होतंय!

आत्मशून्य's picture

29 Sep 2011 - 12:35 pm | आत्मशून्य

मनाच्या आतली एकलकोंडी काळीकुट्ट शांतता आणि जगाच्या जमावाच्या कोलाहलाचा प्रकाश... खिडक्या बंद करून आपण प्रकाश येणं थांबवत नाही, तर मनाला सुख देणारा अंधार बाहेर निसटून बाहेर जाणं थांबवतो. बाहेर कडाक्याची थंडी पडलेली असताना घरात साठवलेली ऊब नाही का आपण बाहेर जाऊ देत नाही. तसंच.

_/\_

अर्धवटराव's picture

29 Sep 2011 - 11:40 pm | अर्धवटराव

पण पांढर्‍यारंगाला प्रकाशाचा वास आहे. त्यामुळे दृष्टीला पोषक-आश्वासक परिमाण पांढरा रंग देतो. अंधारात अनिश्चितता आहे, म्हणुन घुसमट आहे. कदाचित म्हणुनचच त्याला नकारात्मकता आहे.

(रात्रप्रेमी) अर्धवटराव

ऋषिकेश's picture

30 Sep 2011 - 10:43 am | ऋषिकेश

छान प्रतिसाद!

जग म्हणजे दुसरं काय, निव्वळ व्हाइट नॉइज.

क्या बात है स्सार!!!
आमचं भाषासामर्थ्य इतकं प्रभावी नाही पण मिपावरील सुरवातीच्या काळात हे लिहिलं होतं ते आठवलं

स्मिता.'s picture

30 Sep 2011 - 1:51 pm | स्मिता.

गुरुजी, काय मस्त लिहिलंय...
ढब्बीनं लिहिलेलं मुक्तक तर आवडलंच पण तुमच्या प्रतिसादाने चार चांद लगा दिये!!

नाहीतर जग म्हणजे दुसरं काय, निव्वळ व्हाइट नॉइज.
व्वाह! अतिशय आवडलं...

विनीत संखे's picture

29 Sep 2011 - 10:49 am | विनीत संखे

नाहीतरी पदार्थविज्ञान म्हणतंच ह्या सृष्टीत अंधारमय काळ्या गोष्टीच उदा. कृष्णद्रव्य आणि कृष्णऊर्जा भरून राहिल्यात.

स्वानन्द's picture

29 Sep 2011 - 10:55 am | स्वानन्द

वा वा... मस्त मस्त मस्त.

दीप्स's picture

29 Sep 2011 - 12:05 pm | दीप्स

अतिशय सुन्दर !!

पुढील लेखनासाठी शुभेच्छा !!

गवि's picture

29 Sep 2011 - 12:09 pm | गवि

फार छान.. आवडले.

हे जरा कळाले तर मन हलके होईल.उगाचच मनाला खुप अडाणी वाटत आहे.
उलट गुर्जीनी जरा समजेल असे लिहले आहे त्याबद्दल धन्यवाद.

योगप्रभू's picture

29 Sep 2011 - 1:20 pm | योगप्रभू

'अंधाराची खंत तू कशाला करीसी रे, गा प्रकाशगीत' असे म्हणत असताना हा अंधार हा कधीकधी हवाहवासा पण वाटतो. मनाशी एकांतात संवाद करताना अंधारासारखा दुसरा मित्र नाही. अंधाराच्या साथीत आपले आपल्यालाच खूप काही उमगते.

समर्थ रामदास म्हणतात,
जयासी एकांत मानिला, अवघ्याआधी कळे त्याला'

हा एकांत, आत्ममग्न करणारा अंधार आणि जोडीला नीरव शांतता असली की आपण निखळ सत्याच्या अधिकाधिक जवळ जातो.

एरवीही मनाला चैतन्य मिळवून द्यायला अंधार उपयुक्त ठरतोच.

इंदिरा संत यांच्या कवितेच्या दोन छान ओळी आहेत.

मध्यरात्रीच्या निवांत प्रहरी, सौंधावरती उभे राहावे
झुळझुळता अंधार भोवती, पुन्हा नवेपण मनास यावे

मन१'s picture

29 Sep 2011 - 1:57 pm | मन१

अंधारात मन रमले आहे.
कळोखात रमलेला

पैसा's picture

29 Sep 2011 - 7:11 pm | पैसा

सहजच आठवली :)

रात्र काळी,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय !
बुंथ काळी,बिलवर काळे, गळामोती एकावळी काळी हो माय !

ढब्बू, इतके दिवस कुठच्या अंधारात लपली होतीस?

जाई.'s picture

29 Sep 2011 - 7:36 pm | जाई.

मुक्तक आवडल

सुरेख

प्रभो's picture

29 Sep 2011 - 11:33 pm | प्रभो

आवडलं...

आनंदयात्रीची आठवण झाली.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Sep 2011 - 1:04 am | बिपिन कार्यकर्ते

मुक्तक आणि राजेशचा प्रतिसाद दोन्ही आवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Sep 2011 - 11:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच म्हणतो.

-दिलीप बिरुटे

नन्दादीप's picture

30 Sep 2011 - 10:53 am | नन्दादीप

लेख छान आहे..
पण आभार-प्रदर्शनाचा कार्यक्रम राहीला की काय?????