वेळ लावू नका
रात नवेली आली चालून
विडा ठेवला चुना लावून
तुमच्या येण्याचा नाही भरवसा
वेळ लावू नका बेगीनं या राजसा
वाट तरी पहावी कितीक बाई
दिस गेला हि रात सरत जाई
ऐन मोक्याला धोका कसला?
जीव झाला येडापीसा
वेळ लावू नका बेगीनं या राजसा
लाडीगोडीचं तुमचं बोलनं
गोडगुलाबी कोडं घालनं
आधारासाठी हात उशाला
पांघराया अंग द्या न विसरता
वेळ लावू नका बेगीनं या राजसा
शिनगाराचा असल्या येळी
आठव तुमची डोळा आली
दोन्ही पापण्या न्हाती पाणी
विरह सहन होईना जरासा
वेळ लावू नका बेगीनं या राजसा
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२०/०९/२०११
प्रतिक्रिया
20 Sep 2011 - 5:01 am | प्रकाश१११
पाषाण भेदा -
रात नवेली आली चालून
विडा ठेवला चुना लावून
तुमच्या येण्याचा नाही भरवसा
वेळ लावू नका बेगीनं या राजसा
निव्वळ; झकास ...!!
20 Sep 2011 - 10:15 am | निनाद
झकास लावणी. आवडली.
लाडीगोडीचं तुमचं बोलणं
गोडगुलाबी कोडं घालणं
यात सर्व णं च्या ठिकाणी नं असे असल्यास अजून बरे...
20 Sep 2011 - 10:28 am | वसईचे किल्लेदार
अहो, "विडा ठेवला चुना लावून" हे "विडा ठेचला चुना लावून" असे वाचले हो...
बाकी चालुद्या ...
अरे हो ... राहिलेच ... लावणी छानच आहे!
20 Sep 2011 - 8:50 pm | अत्रुप्त आत्मा
वाहव्व पा.भे..नेहमी प्रमाणे फक्कड लावणी केलीत हो :-)
अवांतर---तुझ सगुण म्हनु की निर्गुण रे.. याची चाल परफेक्ट बसतीये तुमच्या लावनीला,,, बराबर हाय पेरनी जोमदार त लावनी भरदार,,,निसर्ग नियमच हय त्यो...