मुळे कविता : 'आलेख'
नोट : राजेश जीं नी कविता रसग्रहन केलेले आवडले..म्हणुन येथे त्यापुढेच २ क्रमांक लिहुन पुढे चालु केले.
माझे मिपावर बहुतेक हे पहिलेच रसग्रहन आहे..आवडले तर ते कवितेचे यश समजावे..आनि पहिलेच रसग्रहन असल्याने सोप्पी परंतु छान कविता मी निवडली आहे, आणि एक वाचक म्हनुन येथे लिहित आहे.
------------------------------------------------------
जीवन -आयुष्य कसे गमतीदार असते नाही... ? या जीवनामध्ये आपण कीती चढउतार पाहिलेले असतात, नाही ?... जसजसे पुढे जाऊ तसतसे वेगळीच वळणे अनुभवत आपण पुढे निघालेलो असतो .. आपल्या आठवणीतील लहानपणापासुन - मोठेपणापर्यंत काही गमतीशीर.. काही हवेहवेसे... काही आपुलकीच्या वळनांचा 'आलेख' कवयत्री आपल्या शब्दातुन येथे मांडते आहे.
बर्याचदा जीवनातील घटनांना मनाच्या परिमाणाने आपण तोलुन पाहतो.. तसे मन असतेच तसे.. कधी ते आपलेच रुप असते, तर कधी ते आपलेच प्रतिस्पर्धी बनलेले असते... परंतु ह्या कवितेत कवयत्रीने 'कागद' ह्या परिमाणावर जीवनाचा आलेख रेखाटला आहे.. आणि तो खरेच एक वेगळेपण दाखवतो...
माझा कागद सहा महिन्यांचा असतो.
पालथ पडून पुढ सरकताना
पेपरवर हात मारून येणारा आवाज
त्याला गम्मत वाटतो.वर्तमान पत्रातलं अक्षर न अक्षर
चिमण बोटांनी उखडून टाकण्याचा
त्याचा निर्धार असतो.
आपण सहा महिन्यांचे असतानाची अवस्था कवयत्री या सुंदर शब्दात करुन देते..
पण हे शब्दांचे प्रतिबिंब मनावर उमटले की त्या आलेखामध्ये हळुच वाचकाच्या मनातील, त्याने पाहिलेले बालपण तरळुन जाते.. त्याला आपल्या बाळाचे इवले इवले नाजुक हात दिसतात, पालथे पडलेले ते आणि आपण वाचत असलेला पेपरचा त्याच्या चिमन बोटांनी पार विस्कुट करुन टाकालेला गोळा दिसत असतो.. या शब्दातुन सुरुवातीलाच कवयत्री वाचकाला एका निरागस दुनियेत घेवुन जाते.
कागद थोडा मोठा होतो.
दारातल्या झिम्मड पावसात
छोट्या छोट्या नावांनी
भिजत रहातो.आता कागदाला उधान येत
ताज्या वर्तमान पत्राचे गोळे करून
तो युद्ध खेळतो,
कधी घडी घडीच विमान होऊन
गल्लीभर उडतो.
ह्या निरागस दुनियेतुन, हळुवार पणे वाचकाच्या मनातील एक निरागस कप्पा कवयत्री येथे अलगद उघडते.
वाचक स्वताच त्या झिम्मड पावसात आपली कागदाची नाव पाण्यात सोडतो आहे असेच त्याला वाटते...
ओलेचिंब झालेले केस, पुढे जाणारी तायडीची नाव पाहुन आणखिन मोठी नाव करुन जास्त वेळ तरंगत राहिन अशी वेडी आशा केलेलो आपण, वाचक या शब्दातुन पाहत असतो...
याही पुढे जावुन, वाचकापुढे वर्तमानपत्राचे गोळे म्हणजे जणु तोफेचा गोळा समजुन आपण घराच्या या टोकातुन त्या टोकापर्यंत खेळत असलेले युद्द त्याचेच चित्र समोर येते... आणि दादा कडुन किंवा ताई कडुन आईला नाव न सांगण्यावरुन किंवा त्यांच्या मागे न लागण्याच्या सबबीवरुन तयार करुन घेतलेली विमाने, मन गल्लीभर उडवुन येते.
मग कागदावर गिचमिड अक्षर उमटतात.
हळू हळू ती सुवाच्य होतात,
त्यांची अक्षर बनतात
.
गिचमिड अक्षर म्हंटले की, वाचकाला आपण पहिल्यां पहिल्यांदा गिरवलेला गिरगिट काला आठवतोच.. आणि त्याच बरोबर बाबांबरोबर बसुन शिक्षा म्हणुन गिरवलेल्या त्याच त्याच ओळीतुन ही एक वेगळीच आठवण येत राहते.
आपल्या गुरुजींच्या, बाबांच्या शिक्षेमुळे.. वळनामुळे.. आपले अक्षर कधी वळनदार झाले हे कळतच नाही.. कळते तेंव्हा आपण शाळेत हस्ताक्षर स्पर्धेत जिंकलेल्या एरिमेल पेनचे ते अप्रुप एकदम समोर उभे राहते.. आणि येथे कवयत्री पुन्हा एकदा प्रत्येक वाचकाचा वेगळा आलेख बनवण्यात यशस्वी झाली आहे असे वाटुन जाते.
आता कागद इतिहास भूगोलात
गरगरु लागतो.
व्याकरण गणितान भिरभिरू लागतो.
आणि
कागदाला शिंग फुटतात!
रॉकेट होऊन तो अचूक नेमबाजी करतो,
पकडला की चोरासारखा निसटतो !
आपली शाळा.. आपले मित्र..आपले शिक्षक सारे आठवुन वाचक आता नव्या गोष्टींकडे वळलेला दिसतो...
प्रुथ्वी गोल फिरते तर इकडचा दरवाजा तिकडे का जात नाही? .. बे दुने चार का बरे डोक्याला ताप? असले अनेक प्रश्न आपल्या मनात येत होते.. हे पाहुन वाचकाला आता खरेच आश्चर्य होते... आणि या प्रश्नांमुळे त्या विषयांनाच चुकीचे समजुन आपण हातात येइल त्या कागदाचे कसे रॉकेट करत होतो अरे बापरे...
कीती व्यवहारी झालोय ना आपण आता.. या आधी कधी आपल्या जीवनाचा आलेख आपण का पाहिला नाही.. आपण कसे होतो हे आपणच अजुन पाहिलेले नाही ह्याची जानीव निर्माण करण्यात कवयत्री पुन्हा यशस्वी होते.
कागद आणखी मोठा होतो.
त्याला डोळेही फुटतात
अगदी एक दोन प्रेम पत्रेही होतात.
चारदोन हलक्या ओळींच्या कवितांचा प्रयत्न होतो,
दोन चार ठिकाणी नकार घेऊन
कागद मार्गाला लागतो.
ह्या ओळींना वाचकाचे मन एका हळुवार.. नाजुक पण त्यानेच लपवलेल्या प्रेमाच्या शितल गावात फिरुन येते...
त्याला आठवते त्याचे पहिले प्रेमपत्र.. ते लिहिन्यासाठी ढापलेल्या चारोळ्यांची बरसात.. नुकतेच मिसरुड ही फुटले नसतानाही आपण आता मोठे झालोय ही भावना कीती उच्च होती असे वाचकाला वाटुन जाते... खरेच त्यावेळेस आपण कीती नादान होतो ना.. जीवन म्हणजे 'ती'/तोच सगळे असे वाटनारे आपण काही वेगळेच होतो असे वाटायला लावण्यात कवयत्री येथे पुन्हा नकार पेरुन ही पुढे मार्गक्रमण करण्यास वाचकाला भाग पाडते.
आता कागद प्रौढ होतो.
एक दिवस पत्रिका बनून येतो !
आणि अश्यातच जीवनातली सर्वात मोठी घटना म्हणजे आपले लग्न.. त्या आठवणी . त्यावेळेसची धांदल.. मोठ्यांची मने आणि हळुच चोरुन तिच्याकडे पाहण्याचे.. भेटताना हळुवार स्पर्शातुन जीवनाचे नाते विनणारे आपल्या मनाचे तंतोतंत धागे हे शब्द येथे विनतात ...
आज मी
दुसऱ्या पिढीचा कागद
मांडीवर खेळवते.त्याच्या कडे बघताना
अचानक माझं कागद नजर फिरवतो
अगदी डोळ्यात डोळे घालून बघतो
हळूच त्याच्या नजरेत रॉकेट फिरून जात !
माझ्या नजरेन ते टिपल्याची
खात्री झाल्यावरच
तो परत
वर्तमान पत्र बनतो.....
आणि अचानक वाचकाला त्याच्या मनाला पुन्हा त्याच्या अस्तित्वापाशी पोहचवण्याचे काम ही कवयत्री सहज या शब्दांमार्फत करुन जाते..
येथे आपल्याच बाळाला मांडीवर खेळवताना पुन्हा त्याच सर्व आलेखांच्या रेषा पुन्हा मनात गारुड घालतात.. अवखळ पणे त्याची चिमन बोटे हातात घेवुन त्याच्या डोळ्यात आपण पुन्हा आपल्याच स्वप्नांना पाहत राहतो .........
अगदी मनापासुन.
प्रतिक्रिया
6 Sep 2011 - 12:20 am | जाई.
कवितेचे उत्तम रसग्रहण केलेत
ही कविता आधी वाचली नव्हती
या ऊपक्रमामुळे नविन कविता वाचायला मिळतायेत
पुलेशु
6 Sep 2011 - 2:45 am | राजेश घासकडवी
आयुष्याचा एक आलेख असतो. काही ठरलेले चढउतार असतात. तर काहींचे आकार बोटांच्या ठशाप्रमाणे वैयक्तिक असतात. हा आलेख नोंदणारे कागद वेगवेगळ्या स्वरूपात येतात. जीवन त्यांवरून सरपटत जातं. हे या कवितेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कागदाचं हे रूपक वापरण्याची कल्पना अभिनव आहे.
तुम्ही खूप छान रसग्रहण केलं आहे. ही लेखमाला उत्स्फुर्तपणे पुढे चालवल्याबद्दल धन्यवाद. अनेक जण यात सहभागी होतील अशी आशा आहे.
6 Sep 2011 - 6:21 am | अभिजीत राजवाडे
रसग्रहण आवडले आणि स्रोत हि आवडला.
6 Sep 2011 - 6:29 am | सहज
कविता व रसग्रहण दोन्हीही छान.
ही लेखमाला अशीच पुढे चालू दे.
6 Sep 2011 - 7:02 am | प्रचेतस
कविता आणि रसग्रहण दोन्ही अतिशय सुरेख.
6 Sep 2011 - 7:14 am | धनंजय
लेखमाला अशीच चालू दे +१
6 Sep 2011 - 1:47 pm | नगरीनिरंजन
असेच म्हणतो.