वडाप (पुर्ण)

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जनातलं, मनातलं
24 May 2008 - 12:17 am

वडाप..

सेन्ट्रल लाईनवरच शेवटच स्टेशन... कसारा.... लोकल मधुन ऊतरलेली गर्दी, उताराकडे वाहणारया पाण्यासारखी एकाच दिशेने वाहते आणि ऊभ्या आड्व्या लावलेल्या बस आणि जीप वर आदळत तिथेच जिरते. घाट माथ्यावर असलेल्या या गावाच हेच प्रयोजन आहे.. या गावात उतरलेली सगळी गर्दी पोटात घेवून महामन्ड्ळाचे लाल डबे आणि खाजगी जीप्स फुर्फुरत घाट चढायला लागतात.. नाशिकच्या दिशेने..

तिथेच तो ऊभा असयचा, कचरू , कचरूच नाव होत त्याच बहुदा.. बहुतेक सगळ्या गाड्या नाशिककडे जायच्या. पण हा मात्र दुसरीकडेच जाणारा, माझ्या आजोळि, सह्याद्रीच्या उतरत्या ऊजव्या खान्द्यावर, कलसूबाई आणि भन्डारदर्‍याच्या पुढे, राजुरला..

मला पाहिल कि आपसूक त्याचा हात वर जायचा, तेवढी ओळख होति आमची. पुढच, ड्रायव्हर शेजारच, "शेफ शिट" माझ्यासाठी राखुन ठेवल जायच. पाठिमागच्या ऊभ्या आड्व्या हाऊद्यात सोळा पाशिन्जेर बसुन, पुढच चाक वर ऊचलल जाइल अशी परिश्थीति आली कि तो पुढच्या सीट वर मि धरून चार जनाना बसवून बॅलेन्स करायचा. मग तो बसयचा.. म्हणजे टेकायचा. त्याचा उजवा हात आणि उजव्या पायाच्या वरचा भाग, जीप्च्या बाहेर राहुन मागच्या पुढच्या वाहनान्शी कम्युनिकेट करायचा. व्यवस्थीत बसुनहि चालवायला कठीन अशा रस्त्यावर, त्याची अशी अर्ध्या बुडावरची रथयात्रा सुरु व्हायची...

एका मागोमाग एक असलेल्या तटासारख्या उभ्या केलेल्या गाड्या भेदत तो कसार्‍याचा उतार उतरायला लागायचा. गर्भार डुकरीनी सारखी गच्च झालेलि गाडी दबुन, कुर्कुरत वळण घेत चालायची. घड्याळात सकाळचे आठ वाजुन गेलेले असायचे.

कसार्‍यातुन बाहेर पडता पडता एक म्हातारा हात करतो, "कुढ?" तोंडातली रसवंति संभाळत हाताने विचारलेला प्रश्न,

"शेंडी ... पण किति घेणार?"
"३० रुपये होतिल बाबा...."
"र्‍हाउन्दे, कार्ड हाये माझ्याकड"
"या मंग सरकारी गाडिन... काय बॉ ह्ये आर्धे कार्ड वाले पाशिन्जेर आता आपले न्हाई राहिले"

"अरे पण आता कुठे बसवल असतस त्याना?" माझा बाळ्बोध प्रश्न, "टेकल असत वो माग, काय जड होत व्हय ते?" प्रश्न वजनाचा नसुन आकाराचा आहे हे कचरुच्या गावीही नसायचं.

"काय म्हणतय तुमच राजुर?" दोन पाय गिअरच्या दांड्याच्या दोन्ही बाजुस, आणि हात सिट्च्या मागुन टाकत मी कम्फ्र्टेबल होत विचारतो.

वरचा ओठ खालच्या ओठाने नाकाकडे दाबत, नाकावर आणि कपाळावर आढया घालत कचरु हात झटकतो.. रुटिन चाललय पासुन बोगस आहे पर्यंत सगळे अर्थ एकाच फट्क्यात.. जो पर्यत हा थुंकत नाहि तो पर्यत बोलण्यात अर्थ नाहि हे उमजुन मि शान्त होतो.

हा कचरु वंजारि समाजाचा, चार पीढ्या राजुरमध्ये गेलेल्या. यांचा खरा धंदा कोकनातुन सुकि मासळी आणुन घाटावर विकायचा. त्याहि आधी बैलावरुन सामान लादुन घाटातुन वाहतुक करायचा.. याच्या वाड वडिलानी गुरांवरुन सामान वाहीलं, हा जीपमधुन माणसांना गुरासारख वाहतो.

घाटाच्या एका वळणावर ऊजविकडे झुकत कचरु समोरुन येणारि गाडी निरखतो, आणि मान खालि झुकवून घाइने तोन्ड मोकळ करतो.
"काय रे, दगड पडलाय का?"
"हो, दोघ हायेत" समोरच्या जीपचा ड्रायव्हर माहिती पुरवतो.

एक कच्कचीत शिवि घालुन कचरु समोर बघायला लागतो, मि अजुनहि क्लू लेस्स... आणि पुढच्याच वळणावर दोन हवलदार हात करतात.

"येतो ना साहेब परत, पयलीच फेरि हि.." कचरु निगोशिएशन्स चालु करतो. "***च्या, मि इथ थांबु का रे तोवर **च्या? ...
गेन्डे बोलले तर तेहि बहुदा असेच बोलतिल... कसातरी त्यांना २० रुपयाचा चारा टाकुन कचरु परत येतो.

"बरे मानले रे येवढ्यात?" मागुन सरकारि खात्यात असावा असा दिसणारा एकजन बोलला. "अवो हे अशेच फिरते कुत्रे, रेगुलर वाल्याना वेगळे असतात" कचरु आमच्या सामान्य ज्ञानात भर टाकतानाच तो घेत असलेल्या भाड्याच जस्टीफिकेशन देतो.

पुढच्याच वळनावर पाठिमागुन आधी खोकल्याचि ऊबळ, आणि मग थांबा..थांबा.. चा गलका.. प्ल्यास्टिक्च्या पिशवीचि शोधाशोध.. आणि खिडकीतुन पळ्णार्‍या शाहिस्तेखानाच्या चपलतेने ऊडी मारुन एक कन्या रस्त्य्याच्या कडेला झेप घेते.

"संभाळे!, ट्रकींला संभाळ"... कचरुमधला सावध ड्रायव्हर ओरडतो.

घाटातली हि आन्हीक संपवून, घाटनदेविला बत्ती लावली कि कचरु थोडा मोकळा होतो. गावच्या, घरच्या गोष्टी सांगायला लागतो. शेति, धन्दा यावरुन गाडि राजकारणाकडे येते. पाठीमागे बसलेल्या पाहुन्यांचा अन्दाज घेत कचरु दबक्या आवाजात त्याचि रोकठोक मतं मांड्तो. शेवटी "काय करायच बो आपल्याला, रस्त्यावरची जिंदगी आपली" हि भितीही बोलुन दाखवतो. हप्त्याने घेतलेलि नवीन गाडी आणि ते फेडायचे प्ल्यानही मला समजवून सान्गतो. त्याच गणित साधं आहे, आज जितक कमवता येइल तितक मान खालि घालुन कमवायच. शरिर आनि गाडी साथ देते तो पर्यन्त... आयुष्याचा शेवटचा वडाप काहि न करता घालवता येइल इतके शिट आत्ताच ओढायचे.. गप गुमान.. मान खालि घालुन..

ह्म्म... ऊजव्या हाताल दिसनार्‍या ऊत्तुंग कळसुबाइकडे दुर्लक्ष करत मि होकार भरतो....

समाजजीवनमानप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

24 May 2008 - 12:24 am | भडकमकर मास्तर

याच्या वाड वडिलानी गुरांवरुन सामान वाहीलं, हा जीपमधुन माणसांना गुरासारख वाहतो.

हे मस्त...
कचरूच्या वैयक्तिक गोष्टी, (घर आई बाप,त्याची स्वभाववैशिष्ट्ये )...( गावच्या, घरच्या गोष्टी सांगायला लागतो. शेति, धन्दा यावरुन गाडि राजकारणाकडे येते. पाठीमागे बसलेल्या पाहुन्यांचा अन्दाज घेत कचरु दबक्या आवाजात त्याचि रोकठोक मतं मांड्तो) हेच डीटेलमध्ये अजून आले असते तर मजा आली असती....

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

24 May 2008 - 12:49 am | स्वाती दिनेश

याच्या वाड वडिलानी गुरांवरुन सामान वाहीलं, हा जीपमधुन माणसांना गुरासारख वाहतो.
वा..
प्रकटन आवडले.
स्वाती

शैलेन्द्र's picture

24 May 2008 - 12:51 am | शैलेन्द्र

नक्किच सर, पुढच्या वेळि जरुर प्रयत्न करु,
पण ह्या लेखाचा उद्देश " कचरु" हा नसुन, त्याच्या आणि सामान्य माणसाच्या आयुष्यातली ओढातान, त्या पायी येणारि लाचारि, आणि, उत्तुन्गतेकडे होणारे दुर्लक्ष हा होता...

धमाल मुलगा's picture

26 May 2008 - 5:39 pm | धमाल मुलगा

खिडकीतुन पळ्णार्‍या शाहिस्तेखानाच्या चपलतेने ऊडी मारुन एक कन्या रस्त्य्याच्या कडेला झेप घेते.

:) काय डोकं चालतं राव ! जबरा.

शरिर आनि गाडी साथ देते तो पर्यन्त... आयुष्याचा शेवटचा वडाप काहि न करता घालवता येइल इतके शिट आत्ताच ओढायचे.. गप गुमान.. मान खालि घालुन..

खलास! काय वाक्य आहे :)

शैलेंद्र, एव्हढंसच का हो लिहिलंत?
पुढच्यावेळी मोठा लेख लिहा हो.
हे म्हणजे जेवायला येऊन बसलो पाटावर आणि नुसतीच बडीशेपेची वाटी पुढ्यात आल्यासारखं होतं बॉ.

येऊद्या अजुनही :)

पु.ले.शु.

आनंदयात्री's picture

27 May 2008 - 12:34 pm | आनंदयात्री

चांगले लिहलेय. पुलेशु.