मला सगळ्यात जास्त अश्या प्रकारची ईमेल येतात - 'मी तुमचा लेख वाचतो/वाचते. मी स्त्री/पुरुष, वय: ___, उंची: ____. मला डाएट सांगा.' आता, फक्त एवढीच माहिती सांगून डाएट मागणं म्हणजे एखाद्या डॉक्टर ला एवढंच सांगून त्याच्याकडे 'आता मला औषध द्या' असं म्हणण्या सारखं असतं. आहो, डाएट कशासाठी हवंय, काय विकार आहे, तुमच्या खाण्या पिण्याच्या सवयी काय आहेत, व्यायाम किती (किंवा किती नाही!), व्यवसाय काय, घरचं जेवता कि बाहेरचं, शाकाहारी/ मांसाहारी ई. एवढी सगळी माहिती लागते. माझ्या कुठल्याही क्लायन्ट ची पहिली भेट (मुलाखत) कमीतकमी एक तास चालते. कारण मी जो सल्ला देणार त्याचा त्यांच्या रोजच्या जीवनातल्या सगळ्यात महत्वाच्या आणि आवडीच्या विषयावर परिणाम होणार असतो. तर, तुम्ही पण मला जरूर ईमेल पाठवा आणि मी सगळ्यांचं उत्तर पण देईन पण फक्त हे लक्षात घ्या कि डाएट सांगायला मला काय काय माहिती लागेल. आणि हो, ह्यात ही बरीच मंडळी 'फुकट ते पौष्टिक' मानून बसलेले असतात-तो विषय तर आणि निराळा. असो.
दुसरं सातत्याने विचारला जाणारा प्रश्न म्हणजे 'तुम्ही पारंपारिक जेवण जेवा असं म्हणता, पण ते नक्की काय असतं?' ह्या प्रश्नाचं सगळ्यांना अनुकूळ असं एक उत्तरच नाहीये मुळी. शाळेत असताना तुम्ही डबा न्यायचात? त्यात कुठल्याही दोन घरची बटाटा भाजी एका पद्धतीने बनवलेली किंवा एका चवीची असायची का? कोणी नारळ घालणार, कोणी कांदा टोमाटो, कोणी नुसती परतून करणार तर कोणी रस्सा भाजी. एवढे वेगळे प्रकार आपल्या मराठी घरांमध्येच असतात. तर मग, डोश्यात घालतात त्या बटाटा भाजी चा तर विषयच वेगळा. तुमच्या साठी उपयुक्त पारंपारिक जेवण म्हणजे जे खाऊन तुमचे आई वडील मोठे झाले ते. पण एक लक्षात घ्या कि जेवढ्या पोळ्या किंवा भात तुमचे वडील खायचे तेवढंच तुम्ही खाता कामा नाही कारण तेवढे परिश्रम आणि अंगमेहनत आता आपण घेत नाही. तसंच मिष्टान्नाच पण असतं- पूर्वी जे चकली लाडू चिवडा करंजी फक्त सणासुदीला होत होते ते आता वरचेवर घरी केलं/आणलं जातं आणि बेहिशोब खाललं जातं. तसं न करता, पूर्वी च्या पद्धती प्रमाणेच हे पदार्थ त्या त्या सणालाच खालले पाहिजेत.
दमणूक म्हणजे व्यायाम का? नाही. नुसतं डाएट करून वजन कमी करता येतं का? येतं, पण मी तसं करायला कधीच सांगत नाही. कारण व्यायाम हा रोजच्या जेवणा एवढाच महत्वाचा असतो. व्यायामाला सुट्टी देऊन चालत नाही. आणि हो, दिवसभर फिरतीच काम, उभराहून काम, घरकाम ह्यात जरी खूप वेळ जाऊन दिवसाच्या शेवटी प्रचंड दमायला होत असेल तरी तो व्यायाम नसतो. त्यामुळे नुसतं डाएट आणि बाकी घरकाम किंवा बैठी नोकरी करून वजन कमी होण्याची किंवा परिश्रमाने कमी केलेले वजन टिकून राहण्याची अपेक्षा ठेवू नये.
आणि हो, सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे उपासमार न करून घेणे. अति जेवण झाल्यावर, संध्याकाळच्या पार्टी च्या आधी दिवसभर उपाशी राहणे, मधुमेही व्यक्तींनी 'आज गोड खाणं झालंय तर आता पुढचे तीन दिवस कमी जेवणे' असे सर्व प्रकार तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. चांगल्या आरोग्यासाठी, आहार आणि व्यायाम हे रोजच्या रोज सांभाळावं लागतं; त्यात हप्तेवारी चालत नाही.
चला तर मग, असंच आपल्या आणि आपल्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, स्वस्थ खा स्वस्थ रहा!
प्रतिक्रिया
2 Aug 2011 - 7:28 am | निवेदिता-ताई
:)
2 Aug 2011 - 10:34 am | चित्रगुप्त
माझ्या एका मित्राचे वजन बेचाळिसाव्या वर्षी एकशे वीस किलो झाले होते, त्याने नियमित व्यायाम (घरीच, जिम वगैरेत नाही) आणि साखर पूर्णपणे सोडून देणे, यातून साडेचार वर्षात सत्तर किलोवर आणले. आता तो रोज दोन तास नियमित व्यायाम करत असतो. आहार भरपूर घेतो.
2 Aug 2011 - 1:04 pm | कच्ची कैरी
शिर्षक वाचुन्च तुझाच लेख असेल असेच वाटले आणि तेच खरे निघाले.
2 Aug 2011 - 5:24 pm | प्रियाली
वरील लेखात नेमकं नावीन्य काय, वेगळं काय सांगितलंत ते कळलं नाही. लेख अगदीच त्रोटक आहे. दमणूक म्हणजे व्यायाम नाही हे खरे. तासन् तास शाळेत/ कॉलेजात उभे राहून शिकवणार्या शिक्षकांच्या किंवा ओट्याशी उभं राहून काम करणार्या बाईच्या पाठीला आणि मणक्याला रग लागत असेल पण तो व्यायाम नाही हे ही खरे, उलट चुकीच्या पोश्चरमध्ये उभं राहिल्याने किंवा (केर काढताना) ओणवं राहिल्याने त्रासच अधिक होऊ शकतो हे ही खरं.
पारंपरिक जेवणाच्या विविध तर्हा असतात हे खरे असले तरी तुमचे आई-वडिल जे खात होते ते तुम्ही खावे हे उत्तर फार ढोबळ होते असे वाटते. चकली, लाडू, करंज्या, अनरसे, चिरोटे वगैरे वगैरे दिवाळीला एकत्रित होत. याचा अर्थ वर्षभरात इतर दिवशी लोक चकली आणि लाडू खात नव्हते असा होत नाही. घरगुती पदार्थांसोबत ढोकळा, कचोरी, फाफडा, फरसाण, समोसे, न्यूडल्स, स्प्रिंगरोल्स वगैरे वगैरे अपारंपरिक आणि बाजारू पदार्थांचा समावेशही खाण्यात होत आहे.
(खरेतर हे सर्व तुमच्या लेखात नाही. मी आहारतज्ज्ञ नाही पण हे सांगायला मला तज्ज्ञाची गरजही नाही. आजकाल हे जनरल नॉलेज अनेकांना असतं.)
घरकामात व्यायाम नाही हे उदाहरण सरसकट खरे वाटत नाही. जर व्यवस्थित पोश्चर (स्थिती) राखून घरकाम केलं, बागकाम केलं, साफसफाई केली तर नक्कीच व्यायाम होत असावा असे वाटते. अर्थात, तो अपेक्षे एवढ्या कॅलरी बर्न करत नसावा त्यामुळे नुसत्या घरकामाने वजन कमी होणार नाही हे ठीक आहे.
असो. मला वाटतं तुम्ही त्रोटक लेख लिहिण्यापेक्षा साधे सोपे व्यायाम कोणते, त्यांचा फायदा कसा होतो, ते केव्हा करावे वगैरे वर एखादी मालिका सुरू करावी.