कालपरवाच जालावर खालील फोटो पाहायला मिळाला आणि माझं मन एकदम काही वर्ष मागे गेलं. एच एम व्ही च्या याच मालिकेतली एक फिरती संगीत थाळी (Record) माझ्याकडे आहे त्याची आठवण झाली.
मुंबैचा चोरबाजार. म्हणजे गोल देउ़ळ, भेंडीबाजारचा भाग. या चोरबाजाराबद्दल पुन्हा केव्हातरी सवडीने आणि डिट्टेलमध्ये. इथे काय काय मिळू शकतं, त्याचे भाव काय असतात, भावाची घासाघीस कशी चालते, अवचित गुंडगिरी-दादागिरी कशी चालते ते सगळं मी अनुभवलं आहे. पण एकुणात चोरबाजारात विंडो शॉपिंग करणं हा खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे. नानाविध जुन्यापुराण्या वस्तू पाहायला मिळतात आणि मन नॉस्टॅल्जिक होतं. एच एम व्ही च्या जुन्या जुन्या दुर्मिळ संगीतथाळ्या आणि जुने परंतु चांगल्या अवस्थेतले फोनोही इथे पाहायला मिळतात. काही थाळ्या तर बर्यापैकी महागड्या मिळतात. खूप भाव करायला लागतो. असो..
असाच एकदा जुन्या वस्तू पहात या चोरबाजारात हिंडत होतो. पावसाळ्याचे दिवस होते. एक स्टँडसारखी मोठीशी छत्री घेऊन पदपथावरच एक माणूस नानाविध जुन्या वस्तू घेऊन विकायला बसला होता. पाऊस होता त्यामुळे जिथे शक्य होतं तिथे त्याने प्लॅस्टिकचं कव्हर आच्छादलं होतं. सहज माझी नजर गेली ती त्याने जी चटई अंथरली होती तिच्या टोकाला असलेल्या, अर्धवट पावसात भिजत असलेल्या ७८ आर पी एम च्या एच एम व्ही च्या एका जुन्या जीर्ण संगीत थाळीकडे. मी सहजच ती थाळी उचलून पाहू लागलो, तिच्यावरची अक्षरं निरखून पाहू लागलो. पुसटशीच अक्षरं होती.
'नाथ हा माझा' - स्वयंवर - यमन - sung by BalGnadharva.
"ही रेकॉर्ड? कितनेको दिया??"
त्या विक्रेत्याने माझ्याकडे दयाबुद्धीने पाहिलं. 'अरेरे, बिच्चारा गरीब दिसतो आहे. पावसात भिजत उभा आहे. काय सांगावी बरं ह्याला किंमत?'
"दो दो, १५-२० रुपीया..!"
थोडक्यात, 'तुझ्याकडे काय असतील ते १५-२० रुपये दे आणि टळ इथून एकदाचा भोसडीच्या' - असाच भाव होता त्याच्या चेहेर्यावर..! :)
आभाळातून संततधार सुरू होती. आता माझ्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहण्याच्या बेतात होत्या. खूप भरून आलं. आसपासचं जग आपापल्या उद्योगात मग्न होतं. माझ्या मनात काही विचार आले आणि मी त्या विक्रेत्याकडे पाहिलं. मनातल्या मनात त्याच्याशी संवाद सुरू केला..
'मला भोसडीच्या म्हणतोस काय? अरे, तुला माहित्ये का की तू काय विकतो आहेस? किती मौल्यवान वस्तू तुझ्या पदरी आहे? आणि ती अशी रस्त्यावरच्या पाण्यात तू अर्धवट भिजत्या अवस्थेत विकायला ठेवली आहेस?'
'पण तुझा तरी काय दोष म्हणा? तुझी रोजीरोटी आहे. रस्त्याने येणारे-जाणारेही फोकलीचे कपाळ करंटेच..! या अश्या जुनाट भिजत्या संगीतथाळीकडे कुणीच पाहायला तयार नाही, ना कुणी चौकशी करतोय. त्यापेक्षा समोर हा इसम उभा आहे त्यालाच ही थाळी विकावी. तेवढेच १०-१५ रुपये भेटले तर भेटले..!'
'तुझंही बरोबरच आहे म्हणा..'
मीच काय तो येडाखुळा. भ्रांतचित्त झालो होतो आणि वरील स्वगत बडबडत होतो. प्रत्येकालाच त्या संगीतथाळीविषयी ममत्व हवं असा आग्रह मी तरी का धरावा?
चुपचाप खिशातनं १५ रुपये काढले आणि त्या विक्रेत्याला दिले.
नारायणराव रस्त्यावर भिजत पडले होते. त्यांना स्वच्छ पुसले, आणि छातीशी धरून थोडी उब देत घरी आलो. आजही ती थाळी माझ्यापाशी आहे, परंतु जाहीर फोटो टाकावा अश्या अवस्थेत नाही..!
-- तात्या अभ्यंकर,
प्रतिक्रिया
11 May 2011 - 12:17 pm | ज्ञानेश...
वाजते का?
11 May 2011 - 12:36 pm | प्रचेतस
वाजण्यापेक्षाही तिचं आपल्याकडं असणं जास्त महत्वाचं. नाही का?
13 May 2011 - 8:47 am | ज्ञानेश...
असणं महत्वाचं आहेच. नाही म्हणत नाही. वाजते की नाही याची उत्सुकता आहे फक्त !
"वाजतच नसेल तर काय फायदा?" असे बिटवीन द लाईन्स वाचू नका कृपया.
11 May 2011 - 12:49 pm | किसन शिंदे
भाग्यवान आहात तात्या....एक अप्रतिम ठेवा तुमच्याकडे आहे.
आणि भाग्यवान आहोत आम्ही....कारण तुमच्यासारखी अप्रतिम माणसं आम्हाला भेटली आहेत.
11 May 2011 - 1:24 pm | चिगो
भावना पोहचल्या...
प्रत्येकालाच त्या संगीतथाळीविषयी ममत्व हवं असा आग्रह मी तरी का धरावा?<<
हेच तर ना तात्या... ज्यांना बालगंधर्वांच माहात्म्य माहीत त्यांना कदर आहे.. नाहीतर "रात्रभर एक माणुस बाईच्या वेषात गातो आणि मध्यांतरात बटाटेवडा नाही !?" असा करंटा प्रश्न विचारणारी लोकंही आहेत. (संदर्भ : कणेकरांचा एक लेख. त्यात कुणीतरी त्यांना हा प्रश्न विचारतो.)
12 May 2011 - 10:27 pm | विजुभाऊ
माझ्याकडे अशा दीडशे रेकॉर्ड्स होत्या........ दुकानातल्या माणसाच्या चुकीने त्या सर्वांची वाट लागली.
अक्षरशः रडलो होतो त्या दिवशी.
12 May 2011 - 11:36 pm | टारझन
विजुभाऊ आणि तात्यांशी सहमत. एकदा आप्पा बळवंत चौकात मित्रांबरोबर खरेदीला गेलेलो. तिथे डायमंड पब्लिकेशन चे "नागराज " आणि चांदोमा ही पुस्तके पाहिली आणि माझ्या अश्रुंना पारावार उरला नाही. माझ्या मित्रांना कळलंच नाही की क्षणभर काय झालं ते. मी ओक्साबोक्शी रडत होतो. नागराज चे कार्टुन मी लहानपणी खुप तन्मयतेने वाचायचो. त्याचा एकही भाग मी सोडला नव्हता. मला आज जी वाचनाची आवड आहे त्याचे सर्व श्रेय मी लहानपणी वाचलेल्या कॉमिक्स त्यातल्या त्यात नागराज आणि चांदोमा ला देतो. त्या दिवशी बळवंत चौकात मी ते नागराजचं चित्र पाहिलं .. आणि काळजाचा थरकापंच उडला जणु.
माझ्या डोळ्यांसमोर आंधारी आली होती. आणि मला माझं बालपणीचं चित्र आठवलं.. ह्या कॉमिक्स वरुन मी एका मुलाशी पंगा घेतला तेंव्हा त्याने मला पॉटात जोराचा गुद्दा लावला होता . तो आठवुन मला तेंव्हा पोटात प्रचंड वेदना झाली आणि अजुन एक हंबरडा फुटला .
खरंच .. काही काही गोष्टींची आपल्या लेखी जी अमुल्य किंमत असते ती केवळ आपल्या साठीच ..
आय मिस यु माय नागराज . हा प्रतिसाद लिहीताना काही ओघळ नकळत गालावरुन गळ्यापर्यंत गेले आहेत हे वेगळे सांगणे न लगे.
- दवनियकुमार हळवे
13 May 2011 - 12:59 am | गोगोल
नागराज और बेम बेम बिगेलो
13 May 2011 - 10:52 pm | चिगो
अरे काय खतरा आठवण करुन दिलीस, भाऊ?
नागराज, सुपर कमांडो ध्रुव, अश्वराज, राम-रहीम, मामा-भांजा, पिंकी, चाचा चौधरी, साबू, बांकेलाल, बिल्लू.... अरेरे, बदाबदा रडतोय मी बालपणीच्या आठवणींनी... सुबक सुबक, बुहूहूहू..
13 May 2011 - 10:52 pm | चिगो
अरे काय खतरा आठवण करुन दिलीस, भाऊ?
नागराज, सुपर कमांडो ध्रुव, अश्वराज, राम-रहीम, मामा-भांजा, पिंकी, चाचा चौधरी, साबू, बांकेलाल, बिल्लू.... अरेरे, बदाबदा रडतोय मी बालपणीच्या आठवणींनी... सुबक सुबक, बुहूहूहू..
13 May 2011 - 6:51 am | नरेशकुमार
http://www.saamana.com/2011/May/13/Link/Main3.htm
इथं तर जागा पन नाही.
सामना पेपर मधुन कॉपी पेस्ट
ज्या मराठी सिनेमाने प्रेक्षकांच्या पसंतीची दाद मिळवत कान्सपर्यंत धडक देण्याची कर्तबगारी दाखविली त्या चित्रपटाला सोडून हिंदीतील टुकार सिनेमांना हेच मल्टिप्लेक्स प्राइम टाइम बहाल करीत असल्याचे दिसून येत आहे. मराठी चित्रपट कितीही उच्च दर्जाचे असले तरी केवळ हिंदी सिनेमांच्या सोयीसाठी त्यांना दुपारच्या दुय्यम सत्रात टाकण्याचा करंटेपणा मल्टिप्लेक्सवाले करीत असल्याने मराठी रसिकांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
15 May 2011 - 10:15 am | नितिन थत्ते
>>केवळ हिंदी सिनेमांच्या सोयीसाठी त्यांना दुपारच्या दुय्यम सत्रात टाकण्याचा करंटेपणा मल्टिप्लेक्सवाले करीत असल्याने मराठी रसिकांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
मी बालगंधर्व चित्रपट रात्रीच (पावणे आठचा शो) पाहिला.