२४ एप्रिल हा सण कधीचाच जगभर साजरा होतोय. भारतात तर शेकडो, हजारो लोक केक कापून त्यांचा स्वतःचा वाढदिवस असल्याच्या थाटात तो साजरा करतात. आम्ही तुझ्यापर्यंत पोचू शकत नाही...तेही खरं नाही म्हणा तूच आमच्यात आहेस त्यामुळे आम्ही कुठे पोचायचं हा प्रश्नच आहे! तुझं अभिनंदन.
लोक तुला क्रिकेटमधला देव मानतात पण खरं सांगू तू देव नाहीस, निदान मी तरी मानत नाही. देव बनणं तसं फार सोपं असतं, दगडालाही शेंदूर फासला की देवपण येतं. खरं अवघड असतं ते माणूस बनणं, असा माणूस की यश, कीर्ती, मानमरातब, पैसा ह्या सगळ्याला दशांगुळे पुरुन जो उरतो आणि ज्याचं सच्चं माणूसपण हलवून जातं, असा माणूस की त्याचे साथी खेळाडू त्याला अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचतात, असा माणूस की ज्याच्यात प्रत्येकजण कोणती ना कोणती प्रतिमा बघत असतो, असा माणूस की ज्याचे प्रतिस्पर्धीदेखील त्याच्याविरुद्ध खेळायला मिळालं म्हणून स्वतःला धन्य समजतात, असा माणूस की जो आमच्यासारख्या सामान्यांना आपला वाटतो!
नैसर्गिक गुणवत्तेला प्रयत्नांची पराकाष्ठा, सातत्य आणि मुख्य म्हणजे खेळावरचं अनिवार आणि निस्सिम प्रेम कुठल्या पातळीला घेऊन जातं ह्याचा तू मूर्तिमंत आविष्कार आहेस. तुझ्याबद्दल भल्याभल्यांनी लिहिलं आणि बोललं आहे. तरीही माझ्यासारखे लिहीत राहणार, त्याला इलाज नाही.
१९८३ चा वर्ल्डकप मी बघितला कपिलनं चषक उंचावला तेव्हा अभिमानानं अंगावर काटा आला होता. २०११ चाही वर्ल्डकप मी बघितला तुला डोक्यावर घेऊन टीम नाचली तेव्हा डोळे डबडबले! विराटनं तर कोट्यवधी लोकांच्या भावनाच शब्दबद्ध केल्या "२१ वर्षे जो सचिन सगळ्या देशाच्या अपेक्षा खांद्यावर वाहतोय त्याला आज आम्ही खांद्यावर घेणार!" क्या बात है!! सहकारी खेळाडूंच एवढं प्रचंड प्रेम किती जणांच्या भाग्यात असेल? खरं सांगू, मला त्याक्षणी तुझा हेवा वाटला!
२१ वर्षे - जगात कुठला खेळ आणि कोणता खेळाडू असा असेल की जो २१ वर्षे सातत्यानं खेळतोय आणि नुसता नाही तर विक्रमांची रास रचत रचत खेळतोय! तब्बल दोन पिढ्यांनी ज्याची अख्खी करिअर समोर घडताना पाहिली ते एका इतिहासाचे साक्षीदार आहेत. आम्ही स्वत्:ला नशीबवान समजतो की तुला आम्ही खेळताना बघतोय.
भारताची फलंदाजी आली की ड्रेसिंगरुममधून येणार्या वाटेकडे डोळे खिळलेले असतात. हातातली बॅट खेळवत तुझी बटुमूर्ती मैदानावर अवतरली की एका नवीन नाट्याचा प्रारंभ होणार ह्याची जणू नांदीच असते. लोक आतुरतेने वाट बघत असतात की कधी तुझी बॅट तळपते आणि कधी त्यातून धावा सुरु होतात. निर्विकार चेहर्याने सभोवार बघत, क्षेत्ररक्षकांचा अंदाज घेत तू स्टान्स घेतोस, वातावरणात सन्नाटा असतो, जलदगती गोलंदाज धावायला सुरुवात करतो, तुझी तीक्ष्ण नजर खिळलेली असते गोलंदाजावर, तो धावत जवळ आला की 'चल ये' अशा अर्थाची तुझी मानेची किंचित हालचाल, शेकडो हृदयांची धडधड एका क्षणात वाढते, एक उंच उडी, त्वेषाने टाकलेला १५० किमि प्रतितास वेगाने सणाणत येणारा चेंडू , किंचित मोठे डोळे करत, अतिशय स्थिर डोक्याने घेतलेला चेंडूचा वेध, पायांची आणि हातांची अचूक हालचाल, बॅटचं पातं लक्कन चमकतं आणि चेंडू हिरवळीवरून एखाद्या गोळीसारखा सुसाटतो, क्षेत्ररक्षकांनी हालचाल करणे सोडाच त्यांना काही समजायच्या आत चेंडू सीमापार झालेला असतो, फॉलोथ्रू करणार्या गोलंदाजाच्या आश्चर्यचकित चेहर्यावरचे भाव बरंच काही सांगून जातात! जगभरातल्या अनेक गोलंदाजांना तू 'घडवलं' आहेस असं म्हणायला हरकत नसावी!!
तू मैदानावर असलास की प्रतिस्पर्धी संघाला जिंकण्याची अपेक्षा करणं म्हणजे एकदम काहीतरीच वाटायला लागत असावं. त्यांचं पहिलं आणि एकमेव लक्ष्य हे तुला बाद कसं करता येईल ह्याकडेच असतं ह्यातंच सगळं आलं! सर ब्रॅडमन ज्याच्या खेळात त्यांचा खेळ बघायचे, सर रिचर्ड्स सारखे महान दिग्गज ज्याची भलावण करतात, अभेद्य बचावाचा आमचा सनी गवास्कर (हा उच्चार असाच करायचा!) ज्याचा चाहता आहे, अक्रमसारखा महान स्विंगर ज्याला वचकून असायचा, वकार, मॅग्रा आणि ब्रेट ली सारख्या अनेक गोलंदाजांना ज्यानं आपल्या तळपत्या तलवारीचं पाणी पाजून पवित्र केलंय, प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधारांच्या यच्चयावत डावपेचांना न जुमानता ज्यानं निर्दयपणे सामने खेचून घेतले आहेत, कसोटी, एकदिवसीय आणि २०-२० सामने ह्यात जो तेवढ्याच ताकदीने आणि नजाकतीने खेळतो त्या तुला माझा मानाचा मुजरा!
एक खेळाडू म्हणून तू महान नव्हे एकमेवाद्वितीय आहेस. पण शिवाजी पार्कला सरावाला जाणं जवळ पडावं म्हणून ज्यांच्याकडे तू राहिलास ते काका-काकू, रोज नोकरीवरुन घरी परताताना उलट्या दिशेने प्रवास करुन आज माझं लेकरु कसं आहे हे बघायला अनेक वर्षं येत राहणारी माउली, तुझं अद्वितीय करिअर बहरावं म्हणून ज्यानं पॅकप केलं तो अजितदादा, साधेपणा आणि सच्चेपणा ह्या गुणांची तुझ्यात रुजवात करुन दुर्दैवानं अर्ध्यातच डाव सोडून ज्यांना जावं लागलं ते तुझे बाबा, ज्यांनी दिलेली एकेक रुपयाची तेरा नाणी तुला कुबेराचा खजिना वाटतो आणि दरवेळी बाद होऊन परतताना 'आउट कसा झालास?' असं विचारणारे तुझे आचरेकर मास्तर , तुझी पत्नी, बाबाच्या सहवासासाठी भुकेलेली तुझी लेकरं, ह्या सगळ्यांच्या कष्टाचं आणि त्यागाचं तू चीज केलंस! त्यांना त्यांचे जन्म सार्थकी लागले असं वाटलं तर नवल नाही!
ज्याचं मस्तक आभाळात आणि पाय जमिनीवर आहेत अशा माणसाबद्दल मी एवढंच म्हणू शकतो -
अनंतहस्ते तेंडुलकराने
देता किती घेशील दो कराने!
तुझाच
-(फाटकी झोळी असलेला)चतुरंग
प्रतिक्रिया
24 Apr 2011 - 3:39 pm | प्रास
अत्यंत समर्पक शब्दात अभीष्टचिंतन! चतुरंगभाऊ, लेख आवडला.
सचिनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
24 Apr 2011 - 4:08 pm | अप्पा जोगळेकर
सचिन तेडुलकरला शुभेच्छा.
24 Apr 2011 - 5:00 pm | टारझन
एकदम परफेक्ट :
ह्याच धर्तीवार "प्रिय विजुस " असाही लेख लिहीण्याचा आज योग आहे .
सचु आणि विजुभाऊंना वा. दि. शु.
24 Apr 2011 - 5:25 pm | गणपा
क आणि ड आणि क..
24 Apr 2011 - 5:53 pm | सर्वसाक्षी
सुरेख लेखन!
सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
24 Apr 2011 - 6:44 pm | धिन्गाना
उत्तम लेख,तेन्डुला हार्दिक शुभेच्छा.
24 Apr 2011 - 8:01 pm | राजेश घासकडवी
तो पुढच्या वर्ल्डकपपर्यंत असाच भन्नाट खेळत राहो.
24 Apr 2011 - 8:14 pm | सुधीर काळे
चतुरंग-जी, लेख वाचून मन कसे प्रसन्न झाले! लेख सुरेख जमलाय!!
सचिनला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! जीवेत् शरदः शतम्!
त्याच्या वाढदिवसाच्याच दिवशी ज्यांना सचिन खूप मानतो त्या सत्य श्री साईबाबांचे देहावसान व्हावे हा केवढा दैवदुर्विलास! प्रत्येक वाढदिवसाला ही कटु आठवण येत रहाणार! अरेरे!
24 Apr 2011 - 8:29 pm | कच्ची कैरी
खरच खूपच छान लेख आहे ,मनापासुन आवडला !सचिनला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा !!!
25 Apr 2011 - 8:17 am | संदीप चित्रे
लेख आवडेश एकदम....
सचिनच्या अजून एका निस्सीम चाहत्याचा लेख लवकरच मिपावर दिसेल :)