मॅट्रिक ते मॅट्रिक्स

हेरंब's picture
हेरंब in जनातलं, मनातलं
10 May 2008 - 8:46 pm

"द मॅट्रिक्स" हा प्रसिद्ध इंग्रजी सिनेमा पाहिल्यावर असे मनांत आले की हा सिनेमा जर कोणी गांवाकडच्या व्यक्तिने पाहिला तर तो त्याची गोष्ट कशी सांगेल ? या कल्पनेवर ही कथा लिहिली आहे.

म्या सदा येळकाढूकर, मुक्काम मुंबै !! माज्या बापाची गांवी शेती हाये. पन् म्या शिकावं अशी माज्या आयबापाची लई विच्छा. तसा म्या गेलो साळंत, पन् म्यॅट्रिकला गाडी फेल ! लई धडका मारल्या बगा पन् काईच उपेग नाय जाला. टकुर्‍याचा भुगा व्हायची येळ आलती. म्हंजी व्हायाचं काय की मला झ्वाप यायची कंदीबी, झ्वापलेला असताना काय भन्नाट सपानं यायची राव ! पर कोनाला सांगाया ग्येलं तर येडं हाय म्हनायची. शेवटी बा थकला. मुंबैहून बारक्या आलावता गांवाकडं, त्याला म्हन्ला, याला चिटकव गड्या कुठतरी तिकडच, आता शेतीतबी काय र्‍हायलेलं न्हाई.
म्या आलो मंग हिकडच् बारक्यासंगट. बारक्याच्याच हापिसात लागलो. हापिस येकदम् झ्यॅक बगा. निसत्या चौकोनी छोट्या छोट्या उघड्या खोल्या येका साईडीला अन् दूसरीकडं ही केबिनांची रांग. खोल्यांमदी बसल्येली मानसं उबी र्‍हायली तरच दिसायची. हापिस येकदम आरश्यावानी चकाचक, अन् बाप्ये पन. बाया तर हिरवीनीसारकी कापडं घालून टकाटका चालायच्या. माजं काम सक्काळी साफसफाई, पानी भरनं आन् समद्या काचा पुसनं. सायेब लोकंबी चांगली. म्हंजी दुपारी थोडी डुलकी लागली तरी बोलायची न्हाईत. फायली येळच्यावेळेत नेउन दिल्या की जालं. माजी सपानं बगन्याची संवय चालूच व्हती. पन् सांगनार कुनाला अन् आईकनार कोन् ? बारक्या तर मला येडाच म्हनायचा.
येक दिवस बारक्या म्हनला, ये सद्या, लेका तुला म्यॅट्रिक व्हतां आलं न्हाइ कंदी. आता म्यॅट्रिक नांवाचा पिक्चर आलाय् आन् समदी लोकं खुळी जालीत त्याच्यापायीं. आपल्या सायबाची टायपिस एन वक्ताला रुसली म्हनून मला दोन तिकटं दिलीत त्यानं. तर येनार का बगायला फुकटात ? तो बगितल्यावर तरी म्यॅट्रिक व्हशील लेका. म्या म्हनालो, जाऊ की, काय नाय तर थंडगार हवेत झ्वाप तरी मिळंल निवांत.
थेटर बगूनच गपगार झालतो, पिक्चर तर काय जबरी व्हतं राव माला जे समजलं तसं सांगतो तुमास्नी. पैल्याछूट येका बिल्डिंगीवर पोलिस आन् काळ्या गोगल घातलेल्या मानसांचा वेढा, मंग गोळीबार. येक काळ्या कापडांतली बया कांपुटरवर, काळे चष्मेवाले तिला पकडायला बगतात. त्येच्या मायला, ती बया पळाया लागते, येका बिल्डिंगीवरुन दुसरीवर. गावंतच न्हाइ, जाते पळून. मंग येक पोरगा दिसतो, त्येला कांपुटर उठवतोय्, ते मंग हापिसात जाताय तेच्या. थितं फोनवर येक बाप्या सांगतो, तुज्या मागावर मानसं लागलीयात् तंवा पळ काढ लेकां. त्ये खाली वाकून पळतंय येका केबिनमंदी. थितं फोनवाला बाप्या तयाला खिडकीभाईर जायला सांगतो. ह्ये जातंय् पन् मोबाईल पाडतंय् खाली. मंग घाबरुन आंत येतं. काळे चष्मेवाले पकडतात आन् आडवा करुन येक र्‍हइमानी किडा त्याच्या प्वाटांत घालतात. त्ये बोंबलू पाहतं तर व्होठ शिवलेलं. जागं हुतं तर घरात खाटल्यावर. मायला, म्हंजी हा माज्यासारकाच दिसतुय, सपान बगनारा.

पन् त्ये फोनवालं ब्येनं काइ पाठ सोडत न्हाई. परत फोन यितु. हा जातोय रस्त्यावर. येक गाडी येते आन् हा बसतोय आंत. तर आतल्या दोन बया त्याचं जबरी आप्रेशनच करुन टाकतात. र्‍हईमानी किडा भाईर ! तेला नेतात येका हबशाकडं. त्ये तर लई भारी असतंय. त्ये म्हनताय कसं, मजा बगायची असल तर गुलाबी गोळी गिळायची, न्हाईतर निळी गोळी गिळून गपगुमान् वापस. पन् पोरगं डेरिंगबाज निघतं. ते बिनधास गुलाबी गोळी गिळतय.

हबशा त्याला कांपुटर रुममधी बशिवतं. येक बया मशिनच्या वायरी चिटकवते. उजवीकडं आरसा असतोय. हा आरशाला हात लावतो तर ते चिटकूनच येतंय हाताबरुबर. गळ्यापर्यंत पसरताय. मंग बगतो तर येका चिकाट घानींत बुडाल्येला. आजुबाजुला छोटी बाळं पन् तशीच बरबटल्येली. येक मोठ्ठा कोळी येऊन तेचं डोस्कंच खातं. हा येकदम पान्यात. जागा होतो, हबशी विचारतो, मजा वाटतीं का? डोकीवर हात फिरवतो तर मागं ह्ये टेंगुळ ! हबशी म्हनतो तुला आता कोंतीबी वायर जोडता येईल. मंग हबशी तेच्याबरुबर लई खेळ खेळतंय. ज्युडो कराटे असं कायबीं. हेला काईच सुदरत नसतं. हबशी सांगतो आपुन जे खातो पितो ते कायबी खरं नसतं. ना वास ना चव ना पर्श.

ह्येच्या म्होरं जे सांगितलं ते डोसक्यांत शिरंना. मंग सपानात सपान असं सर्व फास्टमफास्ट फिराया लागलं. कोन कोनाच्या इरुध हाय त्येच कळंनासं जालं. येवडंच कळलं की त्यो पोरगा हिरो व्हता आन् त्याकडं टक लावून पहानारी ती हिरवीन्. शेवटी तिनं तेचा मुका घेतला तवा तर नक्कीच जालं. शेवटी भन्नाट जादू असलेली फायटिंग! त्यात काळं चष्मेवाले हरले आनि पोरग्याचा दनदनीत विजय!
लास्टला म्यां उबं र्‍हाउन येक सनसनीत शिट्टी हानली तर सर्व्या थेटरातली मानसं माज्याकडं भूत बगितल्यागत बगाया लागली. बारक्या उगा माज्यावर कावला. आयला, म्यॅट्रिक होवून फुडं शिकलो असतो तर पिक्चरमंदी काय बोलत होते तेबी समजलं नसतं का ??

विनोदचित्रपटआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

मन's picture

10 May 2008 - 9:18 pm | मन

मस्त हो.
शेवटाचे दोन परिच्छेद आवडले.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

स्वाती राजेश's picture

11 May 2008 - 1:09 am | स्वाती राजेश

छान कथा लिहिली आहे.
मराठी मॅट्रिक्स आवडले.:)

विसोबा खेचर's picture

11 May 2008 - 9:01 am | विसोबा खेचर

हेच म्हणतो!

तात्या.

अरुण मनोहर's picture

11 May 2008 - 5:51 am | अरुण मनोहर

वाहव्वा हेरंबकुमार
गावरान शैली छान साधलीय.
आणखी गोष्टी येउद्यात.

प्रभाकर पेठकर's picture

11 May 2008 - 8:50 am | प्रभाकर पेठकर

अशीच कथा आधी कुठेतरी वाचल्यासारखी वाटते आहे.

हेरंब's picture

11 May 2008 - 9:27 am | हेरंब

हो, हीच कथा मी 'मनोगत' वर पाठवली होती मागे, आता 'मिपा' वाल्यांसाठी इथे परत पाठवली आहे.

विसोबा खेचर's picture

11 May 2008 - 9:30 am | विसोबा खेचर

आता 'मिपा' वाल्यांसाठी इथे परत पाठवली आहे.

आम्हा मिपावाल्यांवर तुमचे लई उपकार झाले तिच्यायला!

आपला,
(कट्टर मिपाकर) तात्या.

चतुरंग's picture

11 May 2008 - 9:02 pm | चतुरंग

लेखन छान आहे.

(अवांतर - "'मिपा' वाल्यांसाठी" हा शब्दप्रयोग फारसा रुचला नाही. मानसिक पातळीवर तुम्ही अजून 'मिपा कर' नाही असं दाखवणारा आहे. कदाचित अनवधानाने झालं असेल तर सोडून देऊयात. दुसरी संधी पकडा!!)

चतुरंग

हेरंब's picture

14 May 2008 - 10:47 pm | हेरंब

अनवधानाने 'मिपावाल्यांसाठी' असे लिहिले गेले. अगदी 'दोन्ही कर जोडून' दिलगिरी व्यक्त करतो, सर्वांची.
मी पण मिपावालाच झालोय. चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद!

चला मिसळ चापूयात ;)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

15 May 2008 - 12:15 am | विसोबा खेचर

म्हणतो..!

रात गई, बात गई!

हेरंबा, यापुढे तू आमचा! :)

तात्या.

झकासराव's picture

12 May 2008 - 10:44 am | झकासराव

भारीच लिहिलय.
रेहमानी किडा :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

भडकमकर मास्तर's picture

12 May 2008 - 11:03 am | भडकमकर मास्तर

पहिला भाग पाहिला..नंतर भाग ३ आम्ही एकदम पाहिला होता....
कोण कोण मला येड्यात काढतंय राव माझी प्रतिक्रिया ऐकून पण मला खरंच जाम वैताग आला....
उंच उंच किड्यांची फायटिंग काय संपायलाच तयार नाही...
... आता या सिनेमाचं कौतुक करायची फार पद्धत आहे,आपल्याला नाही बुवा असे वाटत... पण मला मट्ठ म्हतले तरी चालेल, पण हे इंग्रजी प्रायोगिक नवफायटिंग चे सिनेमे इतकेच... मराठी प्रायोगिक न नाट्यासारखे ( की जे समजले नाही त्यामुळे फालतु होते असे म्हणणारा माणूसच मूर्ख ठरतो) ....

( मॅट्रिक्स चा तिसरा भाग १०० रुपये देऊन सिनेमागृहात सहन केलेला) भडकमकर

ऋचा's picture

12 May 2008 - 11:44 am | ऋचा

भारीच लिहिलय.
हबशी.......... :))