आयुष्यावर बोलू काही ....

प्राजक्ता पवार's picture
प्राजक्ता पवार in जनातलं, मनातलं
24 Feb 2011 - 3:44 pm

एखादी कलाकृती मग ती कविता असो , चित्रकाराने रेखाटलेले चित्र , गायकाने गायलेले गाणे वा एखादा लेख रसिक मनाला आवडला की त्या रचनाकाराला दाद ही मिळतेच.कधी ती टाळ्यांच्या स्वरुपात तर कधी बोलुन . आज या लेखनप्रपंचाचा उद्देशदेखील हाच. आयुष्यावर बोलु काही ( प्रयोग ५०० ) या सलील कुलकर्णी व संदीप खरे यांच्या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी .
तुमच्यापैकी बर्‍याचजणांना ही गाणी माहित असतील , आवडत असतील. मला मात्र जरा उशिराच का होइना पण या महफिलीचा आनंद लुटायला मिळाला.
त्याला कारणही तसेच घडले. बर्‍याच दिवसांनी जरा दोन दिवस सवड काढून मी हॉस्टेलच्या मैत्रिणीला भेटायला आले होते. तब्बल तीन वर्षांनी आम्ही भेटणार होतो. निमित्त दुसरे काही नाही , फक्त भेटायचे व मनसोक्त गप्पा मारायच्या. गेल्या वर्षातील गप्पांचा बॅकलॉग भरुन काढायचा हा अजेंडा आधिच ठरवलेला.
सुरुवातीला हाय - हलो झाले. तीच्या लहान मुलाशी ओळख झाल्यावर कळले की त्याचा फक्त एकच हट्ट .एकतर त्याचाशी खेळा किंवा त्याच्यासोबतच बोला ( तुम्हाला भाषा कळली नाही तरी :) ) दुसर्‍या दिवशी मात्र तीचा नवरा ऑफिसमध्ये व मुलगा झोपेत बिझी असल्याने आम्हाला गप्पा मारण्याची संधी मिळाली. हॉस्टेलच्या जुन्या कडू- गोड आठवणी , आत्ताचं बदलेलं रुटीन , काही मागे पडलेले छंद तर काही अजुनही जपलेल्या आवडी असे बरेचकाही निघाले बोलण्याच्या नादात. बोलता बोलता विषय निघाला कॉलेजच्या ऑर्केस्ट्राचा व आवडणार्‍या मराठी गाण्यांचा आणि तीला आठवले की तीच्याकडे "आयुष्यावर बोलू काही " या कार्यक्रमाची व्ही सी डी आहे आणि मग वाट कोण बघतंय लगेच या सुरेल महफिलीला सुरुवात झाली.

Get this widget | Track details | eSnips Social DNA

" जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही !
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही ! "

या शब्दांनी हळुवार आपल्याशी मैत्री करत , हे दोघे गात असतात. काहीतरी मनाला भिडणारं , पटणारं...
बरं आयुष्यावर बोलायचं म्हणजे काही फक्त गंभीर चर्चा वा गंभीर अर्थाची गाणी असं नाही तर अनेक मुड व्यक्त करणार्‍या गाण्यांनी ही महफिल सजलेली आहे.
पाउस म्हटला की कोणी वर्तमानकाळात रोमँटीक योजना आखणार तर कोणी जुन्या आठवणींना उजाळा देणार. अश्याच काहीश्या भावना ' सरीवर सरी ' व ' पाउस असा रुणझूणता पैंजणे सखीची वाजती' या गाण्यातुन व्यक्त होतात. गायनासोबत हे दोघं मधुनमधुन प्रेक्षकांशी गप्पा मारतात , संदीप खरेचे कविता वाचन ( त्याच्या खास स्टाईलने ) यामुळे ही महफिल आपल्या घरीच सुरु आहे असे वाटते.

मोठ्यांबरोबर लहानांना देखील आवडतील , ते त्यांच्यापरीने दाद देतील अशी काही गाणीदेखील आहेत. आजकालच्या मुलांना मोबाईलचं आकर्षण असतं. तो त्यांच्या हातात पडला की त्यावरचे प्रत्येक बटण दाबणे हा खेळ सुरु होतो . अशामुळे कधितरी कुणाला चुकुन फोन लागतो. हा अनुभव बहुतेकांना आला असेल. याच विषयावर असलेले " मी पप्पांचा ढापुन फोन..." हे गाणे मोठ्यांनादेखील आवडते. सुरुवातीला गमतीदार वाटणारे पण शेवटच्या कडव्यातील
" मी ढगातुन बोलतोय बाप्पा ,
बाप्पा बोलतोय तर मग थांब , सगळ्यात आधी एवढ सांग,
कालच सांगत होता पप्पा , तिकडे आहेत आमचे अप्पा ,
अप्पांना तु धाडून दे , नाहीतर फोन जोडून दे ,
तुला सांगतो अगदीच स्पष्ट , अर्धीच राह्यलीए आमची गोष्ट "

हे बोल ऐकून मात्र आपणदेखील हळवे होतो व लहानपणी बाप्पाशी मनातच केलेल्या चर्चा आठवतो.
"दूर देशी गेला बाबा , गेली कामावर आई " हे गाणे सध्या बहुतांश घरात असणार्‍या परिस्थीतीचे चित्रण आहे. पण त्याचबरोबर आईप्रमाणेच बाळामध्ये जीव गुंतलेल्या पण कामाच्या व्यापातुन वेळ न काढु शकणार्‍या बाबांचे मनोगत " दमलेल्या बाबांची कहाणी " या गाण्यातुन कळते.आज आपण वेळ देऊ शकत नाही त्यामुळे उद्या मोठे झाल्यावर आपले हे लेकरु आपल्यामध्ये असेच गुंतलेले असेल का हा प्रश्न हा हळवा झालेला बाबा विचारतो -
" तुझ्या जगातुन बाबा हरवेल का गं , मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं ,
सासुरला जाता जाता उंबरठ्यामध्ये , बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये "
या शब्दांनी नकळत डोळ्यांच्या कडा ओलावतात व दाद देण्यासाठीदेखील शब्द बाहेर पडत नाहीत. अश्रु हीच काय ती पावती.

कधी रडवणारी , कधी विचार करायला लावणारी तर कधी हसवणारी अशी गाणि ऐकत हा कार्यक्रम बहरत असतो.
पहिल्या प्रेमाचे वर्णन करणारी कविता वाचतांना प्रेयसी किती नाजूक हे वर्णन करतांना संदीप अनेक उपमा देतो मात्र शेवट केवळ अप्रतिम -
" ईतकी नाजूक की आतातर स्मरणाचेही भय वाटे ,
नकोत रुताया फुलास असल्या , माझ्या जगण्यातील काटे ".

तसेच अव्यक्त प्रेमाचे वर्णन करणारे " हे भलते अवघड असते " हे गाणे -
" गाडी सुटली रुमाल हलला , क्षणात डोळे टचकन ओले ,
गाडी सुटली पडले चेहरे , क्षण साधाया हसरे झाले ."
खरंच अवघंड . असो..

यात बेला शेंडे व अंजली कुलकर्णी यांनीदेखील १-२ गाणि गायली आहेत. बेलाने गायलेले " रुणझूण नाचत पैंजण " हे प्रियकराला भेटायला आतुर झालेल्या प्रेयसीची मनस्थिती सांगणारे अतिशय सुंदर गाणे-
" या तिरावर जरी अंगावर पाश मला छळणारे,
त्या तिरावर दिसते लाघव निळसर मोहवणारे
एका स्पर्शी शतजन्माची तहान शांतवणारे,
एकदा येउ दे कानी ती मुरली ,
या स्थळी , या तिरी ना जरी माझी मी उरली.."
व्वा ! क्या बात है !

नुसतीच फुलपाखरी नाही तर मानवी स्वभावाच्या अनेक पैलू दाखवणारी गाणी आहेत. मग ते सो कॉल्ड सरळमार्गी , बहुतांशी बधीर लोकांचे वर्णन करणारे " मी मोर्चा नेला नाही " हे गाणे असो वा " जपत किनारा शिड सोडणे नामंजूर, अन वार्‍याची वाट पाहणे नामंजूर , मी ठरवणार दिशा वाहत्या पाण्याची , येईल त्या लाटेवर डुलणे नामंजूर " हे गाणे असो. प्रत्येक गाणे आवडले तरी एखादे गाणे मात्रं जास्तंच जवळीक साधतं , जणू आपलंच असल्यागंत ...

" बाश्शं ! " असा ओरडा व पाठीत एक गुद्दा पडल्यावर जाणवले की त्या लहानग्याची झोप पुर्ण झाली होती व तो आम्हाला टि व्ही बंद करण्याबाबत सांगत होता . त्यामुळे गाण्याच्या महफिलीतुन आमचा मोर्चा आम्हाला बोबड्या भाशेतील घरातल्या वेगळ्या कार्यक्रमाकडे वळवावा लागला. त्यातदेखील तेवढाच गोडवा आहे हे ही खरेच .
ट्रूली सलील - संदीप रॉक !

संगीतकविताआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

सुकामेवा's picture

24 Feb 2011 - 4:02 pm | सुकामेवा

खरच खूप अप्रतिम गाणी आहेत या कार्यक्रमात मला तर नेहमी हे दोघे Jr.( गदिमा आणि बाबूजी )वाटतात.

महेश_कुलकर्णी's picture

25 Feb 2011 - 4:18 pm | महेश_कुलकर्णी

१०० % मान्य

विनायक पाचलग's picture

24 Feb 2011 - 4:15 pm | विनायक पाचलग

हे असले सगळे माझ्या बाबतीत २ वर्षापुर्वी व्हायचे .. जाणकार मिपाकराना माहित आहेच ..
एनीवे
सलील संदीप इज लै भारी ..नो डाउट

हरिप्रिया_'s picture

24 Feb 2011 - 4:25 pm | हरिप्रिया_

संदीप,सलील ची गाणी, त्यांची मैफिल सगळच सुंदर...
त्याची गाणी तर अशी वाटतात की अरेच्या आपल्याच मनातील विचार ह्याने अगदी बरोब्बर शब्दात पकडले की..
त्याचे "नसतेस घरी तू जेव्हा , आता पुन्हा पाऊस येणार,मैत्रीण , प्रिये ये निघोनी, दोन मी " अशी कित्ती तरी गाणी केवळ अप्रतिम...
आणि सध्या सप्तरंग मध्ये येणारे दोघांचे लेख पण नादखुळा...

कच्ची कैरी's picture

24 Feb 2011 - 5:15 pm | कच्ची कैरी

हे प्राजक्ता यु मेड माय डे !मस्त !

स्वतन्त्र's picture

24 Feb 2011 - 5:40 pm | स्वतन्त्र

संदीप सलील यांची गाणी खरच जीवनाला भिडणारी आहेत !
कधी घरात एकटा असलो,त्यांची गाणी ऐकली कि असा वाटतं,कि अर्रे हि तर आपल्याच मनातली घालमेल आहे.

आणि गाणी हि आयुष्यातल्या सर्व टप्प्यांवर हवी हवीशी वाटणारी.मला त्यांची सर्वच गाणी आवडतात आणि विशेषतः आवडणारी म्हणजे,
सांग सख्या रे मधलं 'लागते अनाम ओढ श्वासांना' आणि 'अजून उजाडत नाही गं'.

आज हि आवडतात उद्या त्यांचीच कोणती तरी दुसरी.

५०० व्या प्रयोगाला मी गेलो होतो.LIVE बघण्यात तर अजूनच मजा आली होती. आता ७०० व्या प्रयोगाची वाट पाहत आहे.

यांचा शो हौशेने बर्याच दा पाहिला आहे.

"तुटले ..." " सांग सख्या रे अजुन आहे का ती तैशीच गर्द राई परी ..." , "दमलेल्या बापाची कहानी" , "बरे झाले मी झाड झालो" , तळ्यात मळ्यात .. नसतेस घरी तु जेंव्हा .. कीती कीती गाणी माझी आवडती आहे .. सगळी गाणी एकावेळेस मनात येवुन गेली ..

क्या कहना ...

तुम्ही मस्त लिहिले आहे, फक्त आता live शो ला जा.. नक्कीच मजा येइन ..

मराठी गाणी / कविता यांना नविन पिढीमध्ये घराघरात पोहचवण्याचे काम यांनी केले आहे.. मस्त एकदम ..

इन्द्र्राज पवार's picture

24 Feb 2011 - 7:29 pm | इन्द्र्राज पवार

"...गाण्याच्या महफिलीतुन आमचा मोर्चा आम्हाला बोबड्या भाशेतील घरातल्या वेगळ्या कार्यक्रमाकडे वळवावा लागला. त्यातदेखील तेवढाच गोडवा आहे हे ही खरेच ....!"

~ हे फार आवडले. शेवटी गोडवा साखरेत नसून आईच्या हातात असतो हे जेव्हा प्रथमच घराबाहेरचा चहा घेतल्यानंतर लक्षात आले होते आणि तिच्या आठवणीने डोळ्यात पाणी आले.

लेखातील भाषा "घरातील" च असल्याने तो जास्तच भावल....सलिलसंदीपच्या मैफिलीइतकाच.

इन्द्रा

संदीप च्या कवितेतला प्रत्येक शब्द न शब्द काळजाला भिडतो ........

मनराव's picture

24 Feb 2011 - 8:16 pm | मनराव

गाणी सगळीच चांगली आहेत........no doubt.......
पण कार्यक्रमाला गेल्यावर अगदी मोजकिच नविन गाणी ऐकायला मिळतात......... बाकि जोक्स वगैरे तेच तेच रिपीट असतात...........

५० फक्त's picture

25 Feb 2011 - 8:47 am | ५० फक्त

गाणि चांगली आहेत काही प्रश्नच नाही, पण बहुतेक सगळी गाणि कोथरुड- हिंजेवाडी पट्यात राहण्या-या आणि तथाकथित आयटि व संबंधित क्षेत्रात मजुरी करणा-यांना डोळ्यासमोर ठेवुन लिहिलेली आहेत.

बाकी काही गाण्यातले , विशेषतः प्रिये ये निघोनि, सलिलचे खास पुणेरी ब्राम्हणी भाषेतले उच्चार कधीतरी बरे वाटतात. पण या गाण्यतली एकओळ ' तुझ्या पास यावे ; मधला हिंदि पास लगेच खटकतो आणि पुढ्च्या ओळितलं शुद्ध मराठि समजायला मला तर ते गाणं ४ वेळा ऐकावं लागलं, 'तुझ्या सॉम्य नेत्रातले नीर व्हावे ' , चाल तयार आहे म्हणुन त्यात बसवलेले शब्द आहेत त्यामुळं फार फार खोटे वाटतात.

त्याचेवेळी ' न ठावे किती वेळ चालेल खेळ, न ठावे किती चावी या माकडाची ' हे मी सुरुवातीला ' न ठावे किती वेळ चालेल खेळ, नटावे किती चावी या माकडाची ' अशी ऐकायचो.

असो, पण पंकजप यांनी केलेली तुलना म्हणजे कुठे इद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी अशी वाटली, असो आपली आपली मते आहेत.

मी_ओंकार's picture

25 Feb 2011 - 10:25 am | मी_ओंकार

नशीब तीन चार वेळा ऐकल्यावर कळाले तरी. आम्हाला अजून 'कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली' म्हणजे नक्की काय ते कळालेले नाही. आणि 'ये गो ये ये मैना पिंजडा बना है सोने का' या गाण्याला मराठी गाणे म्हणावे का? या विचारात आहोत.

बाकी प्रिये ये निघोनी हे गाणे चालीवर लिहिलेले नाही. ते भुजंगप्रयातात लिहिले आहे.

- ओंकार.

विकाल's picture

3 Mar 2011 - 1:43 pm | विकाल

".................पण बहुतेक सगळी गाणि कोथरुड- हिंजेवाडी पट्यात राहण्या-या आणि तथाकथित आयटि व संबंधित क्षेत्रात मजुरी करणा-यांना डोळ्यासमोर ठेवुन लिहिलेली आहेत'

I OBJECT...!!

हे आपण कस पाहतो त्यावर आहे....!!
आताशा मी फक्त रकाने ... हे ऐकलय...?

क्षितीजाच्या पार... न तुझ्या माझ्यासवे...??

तुझ्या माझ्यासवे..हे फार सुंदर आहे... नवतरूणापासून ते अगदी प्रेमात असलेला नसलेला प्रत्येक जण भारावून जाईल अस ते आहे. यात कोथरुड- हिंजेवाडी पट्यात राहण्या-या आणि तथाकथित आयटि व संबंधित क्षेत्रात मजुरी करणा-यांना डोळ्यासमोर ठेवुन लिहिलेली आहे असा वास कसा येतो..??

माझे अनेक मित्र आहेत सिंहगड रोड, वडगाव बुद्रूक, येरवडा, बिबवेवाडी इ. ठिकाणी राहणारे. त्यांना संदीप सलील ची गाणी आवडतात.
पाच एक वर्षापूर्वी कार्यक्रम सुरु झाला तेव्हा मी बजाज शोरूम मध्ये गेलो होतो. तिथला मनुष्य काही काम करत होता म्हणून वाट बघताना बाईक ची डिलिव्हरी देणार्‍या क्लार्क बरोबर हवापाण्याच्या गप्पा मारत होतो. अचानक त्यांनी विचारलं की तू हा कार्यक्रम पाहिला आहेस का? मी तेव्हा नव्हता पाहिला. त्या तथाकथित आय टीच काय पण थोडया फार उच्च मध्यमवर्गाशी काहीही संबंध नसलेल्या माणसाने मला बरंच वर्णन करून त्याला आवडलेल्या गोष्टी सांगितल्या आणि मला सांगितलं की जरूर जा. मस्त आहे.
बाबुजी किंवा गदिमांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. संदीप सलील अर्थातच नाही.

पण त्यांनी नवीन गाणी / कविता आणल्या. त्या बहुतेक जणांना वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांना आवडल्या. कितीही उत्तम असलं तरी शुक्रतारा चाळीस वर्षे गात राहण चूक नसलं तरी एकदम नवीन आणि चांगलं काही निर्माण करणं, उत्तम रीत्या सादर करणं हे महत्त्वाचं आहे.
त्याचा तथाकथित आय टी / कोथरूड शी दुरान्वयाने संबंध नाही.

वर दिलेले उदाहरण विचारात घेतले तर या धर्तीवर गदिमांची अनुप्रास, उपमा उत्प्रेक्षांनी भरलेली जड भाषेतली पण अप्रतिम गाणी तद्दन टाकाऊ म्हणावी लागतील.

पिवळा डांबिस's picture

8 Mar 2011 - 3:32 am | पिवळा डांबिस

अरे बाबांनो, वाद नको!
संदीप-सलीलची ही गाणी कोथरूड-हिंजेवाडीच काय पण सिंहगड रोड, वडगाव बुद्रूक, येरवडा, बिबवेवाडी इ. अखिल महाराष्ट्रात पॉप्युलर आहेत, बास?:)

आता कार्यक्रमाविषयी वैयक्तिक मत:
खूप नांव ऐकलं म्हणून ही ५००व्या प्रयोगाची सीडी विकत घेऊन नुकतीच पाहिली. त्यातलं 'नामंजूर, नामंजूर' हे कव्वालीच्या चालीतलं गाणं सोडून बाकीची सामान्य वाटली. काही रचना तर पुलंच्या भाषेत 'बायकांच्या आड्यन्सला रडवायला' म्हणूनच रचलेल्या अशा वाटल्या. दोघांमध्ये सलील काव्य आणि गाण्याविषयी समज याबाबतीत उजवा वाटला.
असो...

आता कार्यक्रमाविषयी वैयक्तिक मत:
खूप नांव ऐकलं म्हणून ही ५००व्या प्रयोगाची सीडी विकत घेऊन नुकतीच पाहिली. त्यातलं 'नामंजूर, नामंजूर' हे कव्वालीच्या चालीतलं गाणं सोडून बाकीची सामान्य वाटली. काही रचना तर पुलंच्या भाषेत 'बायकांच्या आड्यन्सला रडवायला' म्हणूनच रचलेल्या अशा वाटल्या. दोघांमध्ये सलील काव्य आणि गाण्याविषयी समज याबाबतीत उजवा वाटला.
असो...

अगदि अगदि...
मनातले बोललात.

अभिज्ञ.

मी_ओंकार's picture

8 Mar 2011 - 10:20 am | मी_ओंकार

दोघांमध्ये सलील काव्य आणि गाण्याविषयी समज याबाबतीत उजवा वाटला.

फक्त 'आयुष्यावर बोलू काही' या कार्यक्रमावरून दोघांची ओळख झाली असेल तर कदाचीत असे वाटू शकेल. पण संदीपच्या बाकीच्या कविता वाचल्या/ऐकल्या तर हा समज बदलेल. 'आ.बो. का.' मध्ये सध्या सादर होणारी बरीचशी नवीन गाणी ही चालीवरून लिहिली आहेत. त्यामुळे शब्दांना/विषयांना मर्यादा आल्या आहेत. तरीदेखील त्यातही संदीपने कुठेही अर्थहीन शब्द घुसडलेले नाहीत. 'दूरदेशी गेला बाबा' आणि 'दमलेल्या बाबाची कहाणी' सारखे बायकांच्या आड्यन्सला रडवायला केलेली गाणी ही सगळी चालीवरचीच. संदीपने याबद्दल 'सलील सोकावलाय' असे उद्गार काढले आहेत.

संदीपची सलीलच्या आधीची 'कधी हे कधी ते', 'मी गातो एक गाणे', 'दिवस असे की' हे संग्रहही जरूर ऐका.
हा एक दुवा http://www.in.com/music/kadhi-he-kadhi-te/songs-51871.html
संदीपच्या काव्यातली प्रेरणा तो हल्ली 'सकाळ सप्तरंग' मध्ये त्याचे लेख येतात त्यात दिसून येते. या सदराची संकल्पना छान आहे. सलीलच्या एकसुरी लेखांपेक्षा हे नक्कीच सुखावह आहेत.
हा दुवा
http://www.esakal.com/esakal/20110123/5750033453735221088.htm
http://www.esakal.com/esakal/20110227/4828802106652704133.htm

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 Feb 2011 - 1:26 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

संदीपदाच्या सगळ्या कविता फारच सुन्दर आणि साध्या सोप्या शब्दात बरेच काही सांगून जाणार्या असतात....
संदीपदाचे

मौंनाची भांषांतरे

हा कविता संग्रह जरूर वाचावा.
फार सुन्दर अनुभुती देऊन जातो.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Feb 2011 - 1:12 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त.

संदीप आणि सलील दोघांची गाणी झकास आहेत.

आपल्याला तर जाम आवडतात बॉ !

तुषार घवी's picture

25 Feb 2011 - 5:36 pm | तुषार घवी

संदीपने 'विद्युत अभियान्त्रिकीची' पदविका घेतली आहे असे ऐकतो.

योगेश सुदाम शिन्दे's picture

26 Feb 2011 - 2:04 pm | योगेश सुदाम शिन्दे

बरोबर...
पुन्यातील शासकिय तन्त्रनिकेतन येथुन सन्दिप चे शिक्शन झाले आहे...

भडकमकर मास्तर's picture

3 Mar 2011 - 3:44 pm | भडकमकर मास्तर

सलीलने वैद्यकीय पदवी घेतलीय असे ऐकतो

ज्ञानेश...'s picture

8 Mar 2011 - 9:18 am | ज्ञानेश...

बरोबर...
पुन्यातील बीजे वैद्यकिय येथुन सलिल चे शिक्शन झाले आहे...

कमाल आहे!
हि डॉक्टर लोक पेशंट तपासायचे सोडून नाटक गाणी वगैरे मध्ये कशाला वेळ घालवतात देव जाणे.
;)

अभिज्ञ.

विनायक बेलापुरे's picture

8 Mar 2011 - 10:25 am | विनायक बेलापुरे

मेडिकलची एक शीट पण वाया घालवली ना ? ;)