साधारण १९३७-३८ चा काळ. करमणूकीचं एक माध्यम म्हणून रेडिओ स्थिर झालाय. एका सकाळी दुकानातील रेडिओवर एक शास्त्रीय चीज लागते. एक किनारा आवाज ठुमरी अलगद उलगडू लागतो. गाणं ऐकू येताच भर बाजारातले व्यवहार अचानक ठप्प होतात. जो तो आपलं काम सोडून त्या आवाजाच्या दिशेने खेचला जातो. प्रत्येकाच्या तोंडी एकच प्रश्न कोण ही नवी गायिका? इतर गायिकांसारखा हा काही अनुनासिक आवाज नाही, मग गातंय कोण? गाणं सर्वजण स्तब्ध होऊन ऐकतात. आणि गाणं संपल्यावर निवेदक नाव सांगतो, 'मास्टर मदन'. लोकांच्या चेह~यावर एकच प्रश्न, बाईचं नाव 'मदन' कसं? पुढे निवेदक लोकांना परिचय करून देतो दहा वर्षीय 'मास्टर मदन सिंह' या बालगायकाचा जी एका दर्जेदार गायकाच्या संगीत क्षितिजावरच्या आगमनाची नांदी असते. घरोघरी मास्टर मदनचीच चर्चा होऊ लागते.
मास्टर मदन, पंजाब राज्यातील, जालंधर जिल्ह्यातल्या सरदार अमरसिंह आणि पुरणदेवी यांचं धाकट अपत्य. २८ डिसेंबर १९२७चा याचा जन्म. अमरसिंह स्वत: चांगले गायक आणि तबला वादक होते. मास्टर मदन यांचा मोठा भाऊ, मास्टर मोहन, गाणं आणि व्हायलीन शिकत असे. त्या वेळेस छोटा मदन त्यांच्याच अवतीभवती असे. साडेतीन वर्षाचे असतानाच मास्टर मदन यांनी गायला सुरुवात केली. आसपासच्या गावात मास्टर मदन आणि मास्टर मोहनची जोडगोळी प्रसिद्ध झाली. पुढे त्यांनी देशभर संगीताचे कार्यक्रम करत दौरे केले. त्या काळात संस्थाने आणि मोठ्या शहरात गाण्याचे जलसे भरत. त्यांना मास्टर मदन यांनी हजेरी लावायला सुरुवात केली. अगदी लहान वयात त्यांचा आवाज, दमसाज, गायकी आणि संगीताची समज यांमुळे लवकरच त्यांना संगीत क्षेत्रात प्रसिद्धी मिळाली.
तो बोलपटांचा सुरुवातीचा काळ होता आणि चित्रपट संगीत प्रसिद्ध होऊ लागलेले. या चित्रपट संगीताचा राजा होते, कुंदनलाल सहगल. अख्खा भारत त्यांच्यावर फिदा होता पण तेच कुंदनलाल सहगल फिदा होते मास्टर मदन यांच्यावर. कलकत्त्याला आले की मास्टर मदन यांचा मुक्काम सहगलांच्या घरीच असायचा. अनेकदा ते मास्टर मदन यांच्याबरोबर गायन करायचे. त्यांचे गाण्याचे जलसे आयोजित करायचे, इतर ठिकाणच्या मास्टर मदनच्या कार्यक्रमाला हजेरी लावायचे.
याच सुमारास रेडिओचे आगमन झाले आणि मास्टर मदन यांनी पहिलं गाणं तिथे गायलं आणि त्यांची लोकप्रियता भारत भरात पोहोचली. जलशांमध्ये मास्टर मदन यांना खूप मागणी येऊ लागली. त्यांचे दौरे ही वाढले. ते १४ वर्षाचे असताना कलकत्त्याला त्यांची एक मैफल झाली, त्यात त्यांनी पहिल्यांदा 'मोरी बिनती मानो कान्ह रे' ही एक अप्रतिम ठुमरी गायली. ती लोकांच्या इतकी पसंतीला पडली की त्यांना तिथल्या तिथे त्याकाळ चे रु. ५००/- नजर केले गेले आणि अनेक सुवर्ण पदके दिली गेली. (त्याकाळी सुवर्ण पदके खरोखर सोन्याचीच असायची.)
तिथून परतल्यावर त्यांनी दिल्ली रेडिओवर एक गझल रेकोर्ड केली. त्यानंतर त्यांना बारीक बारीक ताप येऊ लागला. औषधांनी गुण येईना म्हणून त्यांना हवापालटासाठी सिमल्याला आणले गेले. औषधोपचार चालू असतानाच त्यांचे कपाळ आणि सांधे यांच्यात चमक दिसू लागली आणि अचानक निदान झालं की त्यांना कुणीतरी पारा पाजला आहे. पा~याच्या विषाने त्यांचे शरीर पोखरले गेले. त्यांना स्वत:ला पूर्ण कल्पना आली आणि त्यांनी परिस्थितीला अत्यंत धीराने तोंड दिले. सर्व औषधोपचाराचा काहीही उपयोग न होता मास्टर मदन यांची प्राणज्योत ५ जून १९४२ रोजी वयाच्या १५व्या वर्षी मालवली. त्यांच्या मृत्यूचे गूढ, गूढच राहिले.
मला मास्टर मदन यांची माहिती एका मराठी पुस्तकात त्यांच्या बद्दल पहिल्यांदा वाचलं तेव्हा झाली. (पुस्तकाचं नाव आत्ता आठवत नाहीये, बहुदा अंबरीश मिश्रांचे 'शुभ्र काही जीवघेणे' असावं पण नक्की आठवल्यावर सांगेन.) त्यांच्याबद्दल वाचतानाच काळजात कुठेतरी जखम झाल्यासारखं वाटलं. ' यु ट्यूब'वर अचानक त्यांची गाणी ऐकायला मिळाली आणि ती जखम भळाभळा वाहू लागली. कुणाच्या इर्ष्येपायी आपण किती मोठ्या गायकाला मुकलोय याची जाणीव झाली. मास्टर मदन सामान्य मूल नव्हते, ते नक्कीच कुणी शापित गंधर्व आपल्या पृथ्वीतलावर जन्म घेऊन आलेले. त्या 'मदन गंधर्वाला' माझी ही छोटीशी शब्दरूप श्रद्धांजली.
http://www.youtube.com/watch?v=BmgCzEJhxWk&feature=related
http://www.youtube.com/watch?v=Cmi5QD3sqOE&feature=related
मास्टर मदन यांचे सूर स्वर्गीय आहेतच पण मला एक गोष्ट जास्त महत्त्वाची वाटते आणि ती म्हणजे त्यांची गायकीची समज. अगदी अलीकडे अलीकडे पर्यंत, मोठे मोठे शास्त्रीय गायक रेडिओवर गायचं टाळत. रेडिओवर शास्त्रीय गायानालाही वेळेचं बंधन होतं आणि हीच एक अडचण होती.
शास्त्रीय गायनाची परंपरा अशी की एक राग आळवला जाई, तो राग नि गाणं हळू हळू फुलवलं जाई, रागाचे निरनिराळे पदर गायक उलगडवून दाखवी आणि अखेर अखेर ताना, पलटे नि फिरक यांनी तास-तास भर चाललेल्या गायनाची सांगता होई. दरम्यानच्या काळात रसिक त्या गायलेल्या रागाचा, पदाचा आणि गायकाच्या कौशल्याचा पूर्ण आनद घेत असत. साधारण ७०-७५ सालापर्यंत शास्त्रीय गायन कमी वेळेत सादर होणेच अशक्य मानले जाई. कोणताही राग ३-४-५ मिनिटांच्या थोडक्या काळात सादर करण अशक्य मानलं जाई. अशा परिस्थितीत मास्टर मदन यांचं १९३५-४० सालातलं ३-४ मिनिटात रागाचं स्वरूप पूर्णत: उलगडून दाखवायचं कसब भन्नाट आहे. तेव्हढ्याच कालावधीत आलेल्या त्यांच्या ताना, पलटे, आवाजातली फिरक, कोवळ्या वयातला दम आणि तालावरचं प्रभुत्व खरोखर दृष्ट लागण्यासारखं आहे.
आज मास्टर मदन जिवंत असते तर..... हा प्रश्न अनेकदा मनात येतो. जर तर च्या गोष्टींना तसा काही फार अर्थ नसतो. पण एकच बाब तुम्हा सुहृदांसमोर ठेऊ इच्छितो.
साधारण याच काळात एक आणखी मुलगा संगीत क्षेत्रात प्रसिद्ध झाला. अशाच लहान वयात तोही संगीताच्या मैफिली गाजवू लागला. भारतभर त्याच्या संगीताचे कार्यक्रम होऊ लागले. त्याच्यावरही जीवाची संकट आली. पण एकच झालं की तो जगला. त्याने बनचुकेपणा केला नाही. सतत विद्यार्थी राहून शिकला, अनेकांना शिकवलं. गात राहिला, पुढे अनेक वर्ष. जग त्याला ओळखतं, "कुमार गंधर्व"म्हणून.....
कुणास ठावूक, कदाचित मास्टर मदन यांचंही असंच काही झालं असतं आणि संगीत क्षेत्रामध्ये या बहारदार कलाकाराने आणखी अनेक यशाची शिखरे पादाक्रांत केली असती.... (शेवटी पुन्हा यातही जर तर आहेच, नाही?)
प्रतिक्रिया
22 Feb 2011 - 11:01 am | शिल्पा ब
मास्टर मदन बद्द्ल आधी एकदा वाचले होते....कुणाचाच उत्कर्ष पाहवत नसलेल्या एखाद्याच्या कुबट डोक्यातून ती हत्या घडली असणार....एवढा छोटासा मुलगा इतक्या तयारीचा आहे हे पाहून जळफळ मनात मावलीच नाही.
22 Feb 2011 - 11:35 am | ५० फक्त
खरंच हे अतिशय वाईट झालं, आणि ज्यानं केलं असेल त्याला हाल हाल करुन मारायला पाहिजे होता.
असो,
अशा काही दंतकथा भारतातील इतर प्रतिथयश गायक गायिकांबद्दल पण ऐकल्या आहेत, त्यावर इथं कुणी लिहिल काय ?
कलाकराची जी एक काळी बाजु असते, ति शक्यतो त्या कलाकराचे पंखे जगासमोर येउ देत नाहीत, पण कधीतरी हे पुढं येतंच आणि मग पुन्हा एक वादळ उभं राहतं. मला वाटतं, कट्यार काळजात घुसली' ची कथा पण अशीच आहे ना काहीतरी.
अगदि परवा परवा च्या कांटा लगाच्या रिमिक्स मध्ये सुद्धा असाच प्रकार दाखवला होता. एकुण काय हे पुर्वापार पासुन चालत आलंय आणि चालत राहणार आहे.
एका गुणी कलाकराच्या अतिशय छोट्या पण खुप सम्रुद्ध जीवनाची ओळ्ख करुन दिल्याबद्दल प्रासना अतिशय धन्यवाद.
22 Feb 2011 - 11:42 am | पाषाणभेद
मला वाटले की आपले मदणबाणावरच लेख आहे की काय?
खरोखरच दुर्दैवी मृत्यू आला त्यांना. त्यांना आदरांजली.
22 Feb 2011 - 12:22 pm | गवि
खूपच करुण.. :(
22 Feb 2011 - 12:25 pm | स्वैर परी
प्रास यांचे प्रथम आभार कि त्यांनी अतिशय सुरेख शब्दांत मास्टर मोहन यांची ओळख करुन दिली! अतिशय दुर्दैवी आणि शापित जन्म होता यांचा. परंतु ते जितके जगले ती १५ वर्षे देखील असामान्य आणि सन्मानाची होती, हेहि नसे थोडके!
मास्टर मदन मोहन यांना भावपुर्ण आदरांजली!
22 Feb 2011 - 1:13 pm | गवि
मदन मोहन वेगळे. "तुम जो मिल गये हो " आणि "तेरे लिये-वीर झारा" पर्यंतचे म्युझिक डायरेक्टर.. ते वेगळे..
असं मला वाटतं.
22 Feb 2011 - 1:17 pm | प्रास
चालतंय हो, थोडा नावांचा घोळ झालाय पण त्याची स्वैर परींना व्य.नि.त कल्पना दिलेली आहे.
22 Feb 2011 - 2:28 pm | स्वैर परी
चुकुन मदन ऐवजी मोहन लिहिले गेले! त्याबद्दल खेद व्यक्त करते!
22 Feb 2011 - 12:54 pm | रणजित चितळे
आपला लेख वाचून मला आनंद गंर्धवाची आठवण झाली - अर्थात एवढी प्रतिभा नव्हती त्याची पण १९७८ च्या सुमारास बरेच कार्यक्रम झाले. आता कोठे आहे माहीत नाही.
माहीती व लेख आवडला आपला.
22 Feb 2011 - 1:21 pm | प्रास
सहमत. आनंद गंधर्व मलाही आठवतायत. जबरदस्त नाट्यगीते गायचे, विशेषतः बालगंधर्वांची आणि ते ही अगदी लहान वयात!
सध्या पुण्यातच असतात अशी माहिती आहे. काही वर्षांपूर्वी 'नक्षत्रांचे देणे'च्या एका भागात त्यांना गाताना पाहिल्याचे स्मरते.
22 Feb 2011 - 2:35 pm | जोशी 'ले'
आनंद गंधर्व सध्या पुण्यात असतात ....
http://www.anandbhate.com/profile.html
22 Feb 2011 - 8:52 pm | वाटाड्या...
म्हणजे आनंद भाटे...पुण्यातच असतात. आपल्या अण्णांचे शागिर्द...चांगले गातात...अण्णांच्या त्यांच्याकडुन फार अपेक्षा आहेत असं त्यांच्या व्हिडीयोवरुन कळतं...
मास्तर मदन उत्तमच होते. पण आपल्या संगीत क्षेत्रातही काही काळे डाग आहेतच...वाईट वाटलं...
- सांगितीक वाटाड्या...
22 Feb 2011 - 1:41 pm | विजुभाऊ
मास्तर मदन वर पूर्वी एक लेख मिपावर प्रसिद्ध झालेला आहे. साधारण दोन वर्षापूर्वी .त्याची लिंक सापडत नाहिय्ये
22 Feb 2011 - 1:57 pm | प्रास
मी थोडाफार शोध घेतला तेव्हा मलाही या विषयावरचे काही लेखन दिसले नाही म्हणून मग हा लेख मी अपलोड केलाय.....
अर्थात आधीचा लेख मिळाल्यास तो वाचण्यास उत्सुक.....
22 Feb 2011 - 7:52 pm | प्राजु
सुरेख लेख.
आणि तितकाच करूणही आहे..
22 Feb 2011 - 8:31 pm | रामजोशी
मास्टर मदन्वरचा जुना लेख
23 Feb 2011 - 10:04 am | प्रास
या जुन्या लेखाचा दुवा दिल्याबद्दल अत्यंत आभारी आहे.
हा लेख खूपच छान जमून आलेला आहे.
22 Feb 2011 - 8:43 pm | नगरीनिरंजन
वाईट झालं. इतका प्रसिद्ध असूनही त्याच्या आकस्मिक मृत्युचे कारण शोधण्याचे पोलीसांनी प्रयत्न केले नाहीत?
22 Feb 2011 - 8:58 pm | jaydip.kulkarni
जुन्या लेखाबद्दल धन्यवाद ................
23 Feb 2011 - 11:15 am | स्पंदना
काहीच माहीती नव्हती .
प्रास तुमच्या मुळे बरच काही कळल अन ऐकल देखील.
परत एकदा 'प्रास तुमचे प्रयास आम्हाला आवडले'!