प्रेमाची गोष्ट

हेरंब's picture
हेरंब in जनातलं, मनातलं
3 May 2008 - 5:34 pm

कांही वर्षांपूर्वी "प्रेमाची गोष्ट" हे नाटक आलं होतं. लागू आणि निळु फुले ही नांवे पहाताच आम्ही ग्रुपने ते बघायला गेलो. पण नाटक फार वरच्या पातळीवरचे असल्यामुळे आमच्या डोक्यावरुन गेले .दोन दिवस अस्वस्थपणाने काढले मग ठरवलं, जसं दिसलं तसं लिहून काढायचं, कोणी जाणकार सांगेल समजावून! पण कसलं काय हो, अजून कोणी भेटलं नाही. तर वाचाच त्याबद्दल......

प्रेमाची गोष्ट म्हणजे कॉय ?

के.बी. साठे, बी.सी. साठे आणि तात्या पाटील हे तिघे कॉलेजातले जिवलग मित्र. नाटकांत अभिप्रेत असलेल्या काळात, कोणालाच आपल्या जातीची लाज वाटत नसावी, किंवा ते तिघे खिलाडु वृत्तीचे असावेत. कारण ते एकमेकांना केबी म्हणजे कोब्रा, बीसी म्हणजे बॅकवर्ड अशा हांका मारत असतात. त्याच न्यायाने पाटलांना एस एम नांव का नाही ठेवले ? त्यांच्यात केबी जास्त हुशार असतो(योगायोगाने). त्याच्या कल्पना जगावेगळ्या असतात. एका मुसलमान मुलीबरोबर त्याचे अयशस्वी प्रेमप्रकरण असते. बाकीच्या दोघांना या केबीबद्दल प्रचंड कौतुक असते. या केबीला आपण लागू म्हटले तरी चालेल.
केबी मोठा सी. ए. होऊन लंडनलाच जातो बाकी दोघे गांवातच रहातात. मीना(मुस्लिम मुलगी) न्यायाधीश होते.

२५ - ३० वर्षांनंतर एक दिवस अचानक केबी गांवांत परततो, तो थेट भैरोबाच्या माळावर! तिथे त्याची आणि मीनाची शेवटची भेट झालेली असते. त्याचे स्वगत संपवून तो जातो. नंतर बीसी त्याच्या मुलीबरोबर लंगडत तिथे येतो आणि केबीच्या आठवणी काढतो. पण मुलीला मस्त भूक लागलेली असल्यामुळे ती त्याला कॅन्टीन मधे ओढून नेते. मग एक तरुण मुलगा जॉगिंग करत येतो, त्याला तिथे एक चिटोरा सापडतो त्यावर "म्हणजे काय?" असे लिहिलेले असते. ते वाचून तो अस्वस्थ होतो आणि इकडेतिकडे दगड भिरकावून पळून जातो. त्यानंतर तिथेच येऊन मीना आपली स्वगतें म्हणते. तिलाही तोच चिटोरा दिसतो. या सर्वांची स्वगतें नीट कान देऊन ऐकावी लागतात.
पुढचा सीन् एकदम रद्दीच्या दुकानांत! तिथे तात्या आणि जॉगिंग करणारा जग्या दिसतात. तात्याची तब्येत बरी दिसत नाही. दोघे एकच डॉयलॉग दोनतीनदा म्हणतात. जग्या कामाला गेल्यावर तिथे केबी येतो. तात्या आणि केबी कडकडून भेटतात 'सामना' नंतर बर्‍याच दिवसांनी भेटल्यामुळे तात्या(निळुभाऊ) केबीला बर्‍याच चापट्या मारुन घेतात. त्यांच्या संभाषणातून बीसीच्या मुलीप्रमाणेच तात्याचा मुलगाही राजकारणांत आहे हे कळते.
बीसीच्या घरी तो लंगडत का होता याचे कोडे प्रेक्षकांना उलगडते तोच तिथे केबी येतो. मग तोच आरडाओरडा, मिठ्या आणि गालगुच्चे! तेवढ्यांत बीसीची मुलगी येऊन तीही या जल्लोषांत सामील होते. तिला इथेही मस्त चहा करुन प्यावासा वाटत असतो. तेवढ्यांत बीसी 'रिझर्वेशनचा' उल्लेख करुन एक 'पीजे' करतो. बीसीची मुलगी हुषार दाखवायची असावी ,कारण तिचे नांव प्रज्ञा असते. तिला जातीयतेची इतकी अलर्जी असते की मूळाक्षरांच्या तक्त्यांतला भटजीतला 'भ' आणि यज्ञातला 'ज्ञ' सुध्धा तिला आक्षेपार्ह वाटत असतो. यासाठी तिला कांहीतरी ठोस उपाय हवा असतो. आंतरजातीय विवाहावर कायद्याचे शिक्कामोर्तब घेऊन त्याचा प्रसार करायचा तिचा बेत असतो. त्यासाठी केबीला घेऊन ती मीना न्यायाधीशांना भेटायला जाते, पण केबीला बघितल्याबरोबर न्यायाधीशांची तब्येत अचानक बिघडते आणि प्रज्ञाला केबी व मीनाचे रहस्य कळते.
जग्याच्या मदतीने तिला काहीतरी ठोस करुन दाखवायचे असते. पण जग्याला आम्लपित्त आणि तिला सायनसचा त्रास असल्यामुळे ते फारसे कांही करु शकत नाहीत.
आत्तापर्यंत सर्वांना काही ना काही रोग असल्याचे लक्षांत आल्यामुळे या केबीला पण काही रोग आहे का याचा ते तपास करु लागतात. पण केबी मात्र आपण ठणठणीत असल्याचे सांगून आपले कोरे मेडिकल रिपोर्ट भैरोबाच्या माळावर विखरुन ठेवतो व बायकामुले वाट पहातील असे खोटेच सांगून तिथून सटकतो.
शेवटी एकदाचे केबी आणि मीना भैरोबाच्या माळावर भेटतात. देऊळ व कबरीच्या जवळ बसतात, गप्पा मारतात, नाचतात सुद्धा!! मधेच एकदम गंभीर विषयांवर चर्चा करतात. केबी तिला, हिंदु-मुस्लिम संस्कृतीवर तिने अभ्यास केल्याचे इतक्यावेळा सांगतो की प्रेक्षकांबरोबर तिलाही ते खरे वाटू लागते!
गंभीर चर्चा चालू होते आणि त्यांत यज्ञातल्या 'ज्ञ' चा उल्लेख आल्याबरोबर मीनाला एकदम साक्षात्कार होतो. त्यावरुन तिला हिंदु-मुस्लिमांमधे ज्ञानाची देवाणघेवाण झालीच नसल्याचे आठवते. मग केबी ज्ञान म्हणजे कॉय ? असा मूलभूत प्रश्र्न "लागवी" आवाजांत विचारतो इतक्या गहन् प्रश्नावर विचारमंथन केल्यामुळे दोघांना हार्ट ऍटॅक येतो आणि ज्ञानाच्या शोधांत दोघेही परलोकी जातात!
मधल्या काळांत एका बिल्डरने ती जागा विकत घेऊन तिथले देऊळ व कबर हटवायचे ठरवलेले असते.
ते काम उरकण्यासाठी तो माणसांना आणि तात्याला घेऊन येतो. पण हे दोघे नेमके तिथेच मेल्यामुळे त्याचा व्यवहार घाट्यात जातो आणि त्याचक्षणी नाटक संपल्यामुळे प्रेक्षकांनाही(कांही सन्मानननीय अपवाद वगळतां) आपण अनुक्रमें ७०, ५०, ४० व २५ रुपयांना बुडल्याचे कमीअधिक दुःख होते!!!

नाट्यविनोदअनुभवसमीक्षा

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

4 May 2008 - 9:17 am | प्रमोद देव

मीनाचे नाव 'प्रेमा' असायला हवे होते. म्हणजे कदाचित 'प्रेमाची गोष्ट' हे नाव समर्पक ठरले असते. :))
बाकी नावात काय आहे म्हणा? असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी दासबोधात लिहून ठेवलंय.. हे लक्षात घ्या आणि द्या सोडून. 8}
तीन तासात तुमच्या डोक्याचा पार भुगा केला ना? त्याची किंमत म्हणून तिकिटे होती असे समजा. :T

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

अनिकेत's picture

4 May 2008 - 9:45 am | अनिकेत

खरंच नाटक असंच होतं की खिल्ली उडवताय?

३ तास कसे काढलेत हो?

(१० पाने वाचून कोसला सोडून दिलेला)
अनिकेत

धमाल मुलगा's picture

5 May 2008 - 2:15 pm | धमाल मुलगा

प्रेषक हेरंब ( शनी, 05/03/2008 - 17:34) . | नाट्य | विनोद| अनुभव | समीक्षा

हेरंबराव,
एकूणातच तुम्हाला आलेल्या विनोदी नाट्याची....नाही...नाही...नाट्याच्या विनोदी अनुभवाची समिक्षा चोख केलेली आहे :)

बाकी हे नाटक, त्याचं कथानक, त्याचं शिर्षकाशी दुरान्वयानेही नसलेला संबंध ह्या सगळ्या गोष्टी पाहता, हे नाटक समांतर वाल्यांचं होतं की ऍब्सर्ड वाल्यांचं? नाटकातल्या प्रकरणांचा एकमेकांशी संदर्भ काहीच लागला नाही म्हणून विचारलं :))

पण एक मात्र खरं, असं पैसे खर्चून एखादं 'अप्रतिम' नाटक पाहिलं की ती आयुष्यभराची आठवण राहते.:)

बाकी, संदर्भ लागले की प्लीज मलाही सांगाल का?

आंबोळी's picture

5 May 2008 - 3:00 pm | आंबोळी

मग केबी ज्ञान म्हणजे कॉय ? असा मूलभूत प्रश्र्न "लागवी" =)) आवाजांत विचारतो =)) =))

एक हात छातीवर आडवा धरुन दुसरा हात गालाला लाउन मान थोडी खाली झुकलेली लागूमुर्ती डोळ्यासमोर उभी राहिली...... लागवी आवाज हा तर छप्परफाड शेरा..... लै आवडला....
बाकी नाटकाचे परीक्षण (पोस्ट्मार्टेम) खुपच भन्नाट झालय....

हेरंबराव असेच लिहित रहा.....

अवांतरः तुमच्यात मला टीकाकाराची बिजे दिसतात.... तेवढे भडकमकरांकडे जाउन ब्रशअप करुन घ्या. महाराष्ट्रातील अघाडीचे टीकाकार व्हाल....
(गुणवेचक)आंबोळी

विसोबा खेचर's picture

5 May 2008 - 3:48 pm | विसोबा खेचर

आपण अनुक्रमें ७०, ५०, ४० व २५ रुपयांना बुडल्याचे कमीअधिक दुःख होते!!!

हे सर्वात मस्त! :)

भडकमकर मास्तर's picture

6 May 2008 - 12:37 am | भडकमकर मास्तर

त्याचे स्वगत संपवून तो जातो....//////त्यावर "म्हणजे काय?" असे लिहिलेले असते../////तिलाही तोच चिटोरा दिसतो. ...////.या सर्वांची स्वगतें नीट कान देऊन ऐकावी लागतात..../////इतक्या गहन् प्रश्नावर विचारमंथन केल्यामुळे दोघांना हार्ट ऍटॅक येतो आणि ज्ञानाच्या शोधांत दोघेही परलोकी जातात../////..त्याचक्षणी नाटक संपल्यामुळे प्रेक्षकांनाही(कांही सन्मानननीय अपवाद वगळतां) आपण अनुक्रमें ७०, ५०, ४० व २५ रुपयांना बुडल्याचे कमीअधिक दुःख होते!!!
=)) =)) =))
वरील वाक्ये विशेष दर्जेदार.... चिठोर्‍यावर म्हणजे काय? काय हा ऍब्सर्डपणा=)) =))
...........
कधी कधी मोठ्या लोकांनी अभिनय केलेला असला की नाटक बाय डिफॉल्ट बेष्ट असणार असला गैरसमज सगळे बाळगतात...मग त्या नाटकावर योग्य टीका करणेही मुष्किल होऊन बसते, हेरंबराव, आपण असली भीड बाळगली नाहीत ते योग्यच केलेत्...छान...

( आपले प्रेम कधीही फ्रीजमध्ये न ठेवणारा )
भडकमकर

"..शेवटी एकदाचे केबी आणि मीना भैरोबाच्या माळावर भेटतात. देऊळ व कबरीच्या जवळ बसतात, गप्पा मारतात, नाचतात सुद्धा"....."

हे बघण्यासाठी मी एकदा २५ रू द्यायला तयार आहे. =))

मुक्तसुनीत's picture

6 May 2008 - 10:02 pm | मुक्तसुनीत

हेनाटक पाहिले नाही , पण त्याचे पुस्तक आणि त्याचे लेखक शाम मनोहर यांच्या "कळ" आणि आणखी एक अशा २ कादंबर्‍या वाचण्याचा प्रयत्न केला. पुलंच्या भाषेत ,
"ए-क-अ-क्ष-र-क-ळ-लं-त-र-श-प-थ".

गणपा's picture

7 May 2008 - 12:55 am | गणपा

समिक्षा वाचुनच झीट आली.. तुम्ही कस काय बॉ सहन केलत? तुमच्या सहनशक्तिला सलाम.

पण "..शेवटी एकदाचे केबी आणि मीना भैरोबाच्या माळावर भेटतात. देऊळ व कबरीच्या जवळ बसतात, गप्पा मारतात, नाचतात सुद्धा"....."
या एकाच्या म्हणण्या प्रमाणे केबींना नाचताना पहायला आपण पण बी २५ दमड्या मोजायला तैय्यार..

पक्या's picture

7 May 2008 - 1:31 pm | पक्या

कसलं हे नाटक !!! आणि नाव काय तर प्रेमाची गोष्ट ?
त्या पेक्षा डोक्याच्या भुग्याची गोष्ट हे नाव द्या.(तुम्ही नव्हे..नाटककाराला म्हणतोय मी).
एखाद्यावर सूड उगवायचा असेल तर सरळ २५ रू चे ति़कीट काढून द्या धाडून त्याला ह्या नाटकाला.
तुमच्या सहनशक्तिला आपलाही सलाम.
--"..शेवटी एकदाचे केबी आणि मीना भैरोबाच्या माळावर भेटतात. देऊळ व कबरीच्या जवळ बसतात, गप्पा मारतात, नाचतात सुद्धा"....."

हे बघण्यासाठी मी एकदा २५ रू द्यायला तयार आहे

छ्या ..त्यापेक्षा पोतराजा ला नाचताना पाहू..त्याची तरी कमाई होईल.
-- पक्या