बूटासिंगची गोष्ट !

ज्ञानेश...'s picture
ज्ञानेश... in जनातलं, मनातलं
31 Jan 2011 - 1:31 pm

आपल्याला ज्ञात असणारा इतिहास हा प्रामुख्याने काही महत्त्वाची ऐतिहासिक पात्रे आणि घटना यासंबंधीचा असतो. याव्यतिरीक्तही भूतकाळात बरेच काही घडत असते, ज्याला फारसे ’मूल्य’ नसल्याने ते कोणी लक्षात ठेवत नाही. मात्र या घटना आपल्यासोबत त्या काळाच्या काही विवक्षीत खुणा घेऊन उभ्या असतात- ज्या पाहिल्यावर आपल्याला स्वत:चाच जुना फोटो पाहिल्यावर होतो, तशा जातीचा आनंद होतो.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

काळ: भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि फाळणी झाली, तेव्हाचा. ऑगस्ट-सप्टेंबर १९४७.

ठिकाण: पंजाब.

या कहाणीचा नायक आहे बूटासिंग. ब्रिटिश लष्करातील एक निवृत्त सैनिक.
ही कहाणी घडली, तेव्हा बूटासिंगचे वय होते ५५ वर्षे. तो आता आपल्या शेतीवाडीत सुखाने आयुष्य घालवत होता.

सप्टेंबर १९४७ चा तो काळ. पंजाबची फाळणी झाली होती. जगातले सर्वात मोठे मानवी स्थलांतर सुरू होते. अमानुष नरसंहार चालला होता. खून-बलात्कार-अपहरण इत्यादि नित्याच्या बाबी झाल्या होत्या.

तर अशाच एका सप्टेंबरातल्या दुपारी बूटासिंग आपल्या शेतात काम करत होता. तेवढ्यात त्याने एक कर्णकटू, भयचकित किंकाळी ऐकली. तो मागे वळून पाहू लागला. एक शीख एका तरूण मुसलमान मुलीच्या मागे लागला होता. ती तरूणी धावत येऊन बूटासिंगच्या पायावर पडली- "मला वाचवा- मुझे बचाव !" म्हणत.
बूटासिंगने त्या माणसाला अडवले. काय घडले आहे याची त्याला कल्पना आली. जवळच्या रस्त्यावरून जाणार्‍या निर्वासितांच्या तांड्यातून ओढून आणलेली ही एक निरपराध स्त्री आहे हे त्याच्या लक्षात आले. बूटासिंगच्या एकाकी, वैराण आयुष्यात अकस्मात आलेल्या या संधीचा फायदा घेण्याचे त्याने ठरवले. बूटासिंग अविवाहीत होता. त्याने लगेच त्या शीखाला प्रश्न केला-

"किंमत सांग"

"पंधराशे रुपये !" जबाब मिळाला.

बूटासिंगने कसलीच घासाघीस केली नाही. केवळ पंधराशे रुपयाच्या मोबदल्यात त्याला सतरा वर्षाची चुणचुणीत छोकरी मिळाली.
’जैनुब’ तिचे नाव.
राजस्थानातील एका छोट्या मुसलमान शेतकर्‍याची ती मुलगी. वास्तविक बूटासिंगपेखा ३८ वर्षांनी लहान असलेली जैनुब त्याच्या मुलीसारखी. मात्र मुलगी नाही. एक विकत घेतलेली गुलाम, एक दासी.

तर असा हा विलक्षण संसार सुरू झाला. बूटासिंग एखाद्या लहान मुलाने आपल्या खेळण्याला जपावे, तसे जैनुबला जपू लागला. जैनुबलाही या अकल्पित प्रेमाच्या शिडकाव्याने खूप सुख मिळाले. तिच्या अंत:करणात बूटासिंगविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण झाली. ती त्याच्यावर खूप माय करू लागली.
असेच अनेक सुखासीन दिवस निघून गेले. यथावकाश बूटासिंगने आपल्या निवडक इष्टमित्रांच्या साक्षीने जैनुबशी विधिपूर्वक विवाह उरकून टाकला. नंतर ज्याची आशाही केली नव्हती, ते घडले. त्यांच्या संसारवेलीवर फूल आले. हो, बूटासिंग बाप बनला. त्याला एका सुंदर कन्यारत्नाची प्राप्ती झाली. त्यांनी 'तन्वीर' असे त्या मुलीचे नाव ठेवले.

खरं तर बूटासिंगची ही गोष्ट इथेच संपायला हवी. पण ते व्हायचे नव्हते.
कारण नियतीच्या मनात काही वेगळेच होते !

अशीच काही वर्षे निघून गेली.
बूटासिंगच्या दोघा पुतण्यांचा त्याच्या संपत्तीवर डोळा होता. साहजिकच त्याचे जैनबशी झालेले लग्न त्यांना बिलकुल आवडलेले नव्हते. तिचा काटा काढण्यासाठी त्यांनी एक धूर्त चाल खेळली.

मधल्या धामधुमीत अपहरण केलेल्या स्त्रीयांची नोंद व शोध सरकारी अधिकारी करत होते. त्यांना या पुतणेद्वयांनी जैनबची माहिती कळवली. झाले ! अधिकार्‍यांनी विशेष विचार न करता तिला बूटासिंगकडून काढून घेतले आणि एका सरकारी आश्रयालयात ठेवून ते तिच्या पाकिस्तानातील कुटुंबाचा ठावठिकाणा काढण्याच्या प्रयत्नास लागले.

बूटासिंगला काय करावे काही सुचेनाच. तो सुसाट पोचला नव्या दिल्लीस. मागचा पुढचा कसलाही विचार न करता कोणताही शिख जन्मजन्मांतरी जे कृत्य करणार नाही, ते त्याने केले. तो थेट एका मशिदीत गेला. त्याने आपले सर्व केस कापून घेतले आणि चक्क मुसलमान धर्माचा स्वीकार केला. आधीचा बूटासिंग आता ’जमाल महंमद’ म्हणून बाहेर आला. तेथून जो निघाला तो थेट भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तांच्या दारात. त्यांच्याकडे त्याने दाद मागीतली, आपली लग्नाची बायको परत मिळावी म्हणून. मात्र त्याला या प्रयत्नात यश आले नाही.

जवळजवळ सहा महिने बूटासिंग रोज तिच्या छावणीस भेट द्यायचा. दोघेजण एकमेकांजवळ गप्प बसून रहायची- आपल्या भंगलेल्या सुखस्वप्नांवर अश्रू ढाळत.

शेवटी एकदाचा जैनुबच्या कुटुंबाचा पत्ता लागला. जैनुब जायला निघाली. दोघांनी एकमेकांना भारावलेल्या अंत:करणांनी, अश्रूपूर्ण नयनांनी निरोप घेतला. जैनुबने त्याला कधीच न विसरण्याची, शक्य तितक्या लवकर त्याच्याकडे परत येण्याची कसम खाल्ली. मुलगी तन्वीर त्याच्याकडेच राहिली.

बूटाने जास्त काळ कळ काढली नाही. एक मुसलमान म्हणून आपल्याला पाकिस्तानात स्थलांतर करू द्यावे असा त्याने अर्ज केला. तो फेटाळण्यात आला. मग त्याने तात्पुरता प्रवास-परवाना मागीतला. त्याचीही तशीच वाट लागली.
शेवटी मानसिक स्वास्थ्य हरपलेला बूटासिंग चोरट्या बेकायदेशीर मार्गाने पाकिस्तानात गेला. सोबत मुलीलाही घेतले.
लहोरमधे मुलीला ठेवून तो जैनुबच्या खेड्यात दाखल झाला आणि त्याला तिथे प्रचंड निष्ठूर असा हादरा बसला. त्याच्या प्रिय जैनुबने तिला ट्रकमधून आणून गावात सोडल्यावर काही तासातच आपल्याच एका चुलतभावाशी निकाह लावला होता !

"मला माझी बायको परत द्या हो !" अशी रडतरडत विनवणी करणार्‍या बूटाला जैनुबच्या भावांनी निर्दयपणे चोपले आणि ’एक बेकायदा परदेशी नागरिक’ म्हणून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याच्यावर रितसर खटला भरला.
आपण मुसलमान आहोत, आपली बायको आपल्याला परत मिळावी असा दावा त्याने न्यायालयात मांडला. निदान आपल्या पत्नीला भेटण्याची तरी परवानगी द्यावी, ती परत येण्यास तयार आहे का हे आजमावून बघण्याची संधी मिळावी अशी याचना त्याने न्यायमूर्तींना केली. त्याच्या भावपूर्ण याचिकेचा सहानुभूतीपूर्वक विचार झाला. त्याला तशी परवानगी मिळाली.

वृत्तपत्रांतून या प्रकरणाला भलतीच प्रसिद्धी मिळाल्यामुळे सुनावणीच्या दिवशी न्यायालयात चिक्कार गर्दी जमली. अवतीभवती संतापलेल्या नातेवाईकांचा घोळका, बेसुमार गर्दी या वातावरणात आधीच भेदरलेली जैनुब आणखीनच घाबरली.

न्यायाधीशाने बूटासिंगकडे बोट दाखवत प्रश्न केला- "तू या माणसाला ओळखतेस काय?"

"हो, हा माणूस माझा पहिला पती- बूटासिंग आहे. मी याला ओळखते." थरथर कापत तिने उत्तर दिले. नंतर आपल्या पोटच्या पोरीचीही तिने ओळख दिली.

न्यायाधीशांनी पुढचा प्रश्न केला- "या माणसाबरोबर भारतात परतण्याची तुझी इच्छा आहे काय?"

बूटासिंगने आपले प्राण डोळ्यात आणून तिच्याकडे पाहिले. पण त्याच्याकडे दोनच डोळे होते. जैनबच्या मागे, अवतीभवती अशा हजारो नजरा होत्या की ज्यातील अंगार तिला आपल्या वंशाची, धर्माची आठवण करून देत होता. कोर्टातील सगळे मुसलमान पुरूष, तिचे जातभाई तिच्यावर नजर रोखून तिला बजावत होते- ’खबरदार!’

एक जीवघेणी शांतता पसरली न्यायालयात. उगीचच असह्य झाले ते काही क्षण.

जैनबने मान हलवली आणि खालच्या आवाजात ती म्हणाली- "नाही, माझी तशी इच्छा नाही."

बूटासिंगला काही क्षण खूप यातना झाल्या. त्याच्यामागे असलेल्या कठड्यावर तो रेलला. भावनावेग ओसरल्यावर त्याने मुलीला हाताला धरले आणि तो चालत गेला जैनबपाशी.

"ठीक आहे. जशी तुझी मर्जी. पण तुझ्या या मुलीला तरी ठेवून घे. माझे जीवन तर आता संपल्यासारखेच आहे." आपल्या खिशातून काही नोटा काढून त्याने तिच्यासमोर धरल्या. मुलीला पुढे केले.

पुन्हा एकदा न्यायाधीशांनी विचारले- "या मुलीला आपल्याजवळ ठेवून घेण्यास तू तयार आहेस का?"

पुन्हा एकदा पुर्वीसारखेच वातावरण तयार झाले. आता तर तिच्या नातेवाईकांनी आवेशाने माना हलवून तिला सरळसरळ सुचवले- "नाही." आपल्या समाजातील वातावरण दूषित करणार्‍या शिखाच्या रक्ताला प्रवेश करू देण्यास त्यांचा सक्त विरोध होता. जैनबने आपल्या मुलीकडे निराश नजरेने पाहिले. तिचा स्वीकार करणे म्हणजे भावी आयुष्यातील हाल-अपेष्टांशी जवळीक करणे याची जाणीव तिला होती. तिच्या शरीराला अस्फुट हुंदक्यांनी, मूक वेदनांनी कंप फुटला.

ती उत्तरली- "नाही, त्यालाही माझी तयारी नाही."

आता मात्र बूटासिंगच्या आसवांचा बांध फुटला. जैनबलाही अश्रू आवरेनात. आसवांनी भरलेल्या डोळ्यांत बूटासिंग आपल्या लाडक्या जैनबचा चेहरा साठवून घेऊ लागला. आपल्या मुलीला त्याने हळूवारपणे कडेवर उचलून घेतले आणि मागे वळून न पाहता तो न्यायालयातून चालू लागला.

ती रात्र त्याने मुस्लिम साधू दादा गंग बक्ष यांच्या कबरीपाशी बसून काढली. रडत, प्रार्थना करत.
सकाळ झाल्यावर तो जवळच्या बाजारात गेला. बायकोला देऊ केलेल्या पैशातून त्याने मुलीसाठी एक नवा झगा व जरतारी चपला विकत घेतल्या. नंतर बापलेक हातात हात घालून ’शहादरा’ या जवळच्या रेल्वेस्टेशनवर गेली. गाडीची वाट पहात असतांना बूटाने मुलीला तिची आई कधीच भेटणार नाही असे सांगीतले- रडत रडत.

स्टेशनात येणार्‍या इंजिनाची कर्कश शिटी अवकाशात घुमली. बूटासिंगने आपल्या मुलीला नाजूकपणे उचलले. तिचा मुका घेतला. तो फलाटाच्या टोकावर उभा राहिला. इंजिन धडधडत जवळ येत चालले. आपल्या बापाची आपल्या भोवतालची मिठी आवळत आहे, असे मुलीला जाणवले. अचानक आपण पुढे झुकलो आहोत, असेही तिला वाटले.

बूटासिंगने आगगाडीसमोर स्वत:ला झोकून दिले होते.

गाडी त्याच्या अंगावरून धडधडत शीळ घालत पुढे निघून गेली. तिच्या शिटीच्या आवाजात आता मुलीच्या किंकाळ्यांचा आवाज मिसळला होता.

खरं तर आपल्या बूटासिंगची गोष्ट इथे तरी संपायचीच.. पण नाही, ते व्हायचे नव्हते !

.. गाडी बूटासिंगच्या अंगावरून धडधडत निघून गेली. एका क्षणात बूटासिंगच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या.
मात्र विलक्षण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या मुलीला-तन्वीरला काहीही झाले नाही. ती सहीसलामत राहिली.

त्या वयोवृद्ध शीखाच्या छिन्नविछिन्न प्रेतावर पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली. आपल्या तरूण पत्नीचा निरोप घेतला होता त्याने त्या चिठ्ठीत.

"प्रिय जैनब, तू तुझ्या जातभाईंची, जमातीची हाक ऐकलीस. पण लक्षात ठेव- त्या आवाजात प्रीतीचा लवलेशही असणार नाही कधी. माझी शेवटची इच्छा एकच आहे- तुझ्या सहवासात राहण्याची. माझ्यावर दया करून माझी कबर तुझ्या गावातच बांध अणि अधूनमधून तिच्यावर एखादे फूल तुझ्या हाताने चढवत जा.
करशील ना एवढे माझ्यासाठी?"

बूटासिंगच्या या अपूर्व आत्महत्येने पाकिस्तानात एक भावविवशतेची लाट उसळली. त्याच्या अंत्ययात्रेला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले. त्याच्या मरणोपरांतही तो वयोवृद्ध शीख पंजाबातील अग्निदिव्याचे प्रतीक होवून राहिला.

जैनबचे कुटुंबीय व इतर गावकर्‍यांनी त्याच्या प्रेताचे दफन गावच्या दफनभूमीत करण्यास संमती दिली नाही. दफनासाठी प्रेत घेऊन आलेल्या लोकांना अटकाव करण्यात जैनबचा दुसरा नवरा आघाडीवर होता.

२२ फेब्रुवारी १९५७ या दिवशी घडलेली ही घटना अविस्मरणीय ठरली !

उगीचच दंगलीला निमित्त नको म्हणून सरकारी अधिकार्‍यांनी बूटासिंगच्या नाट्यपूर्ण आत्मत्यागाने प्रभावित झालेल्या हजारो पाकिस्तानी नागरिकांची समजूत घालून त्यांना बूटासिंगच्या प्रेतासह परत पाठवले.
बूटासिंगचा मृतदेह लाहोरला परत आला. विधिपूर्वक त्याचे दफन झाले. हजारो लोकांनी उत्स्फुर्तपणे वाहिलेल्या पुष्पराशींच्या पर्वताखाली बूटासिंगच्या देहाचे अवशेष विसावले.

बूटासिंगला मिळालेल्या या सन्मानाचा जैनबच्या परिवाराला संताप येऊन त्यांनी लाहोरला आपल्यातर्फे एक गुंडांची टोळी पाठवली. त्यांच्याकरवी बूटाच्या थडग्याची नासधूस करण्यात आली. ते उखडून टाकण्याचाही प्रयत्न झाला. या आडदांडपणाची लाहोरवासियांना भलतीच चीड आली. त्यामुळे अधिकच चेव येऊन त्यांनी पुन्हा नव्याने, पूर्वीच्याच आदरभावनेने नवे थडगे उभारले.
मात्र या खेपेस त्यांनी वेगळी दक्षता घेतली.
एका धर्मांतरित शिखाच्या थडग्यावर पहारा देण्यासाठी शेकडो मुसलमान आपखुशीने पुढे आले. १९४७ मधील पंजाबच्या भूमीवर घडलेल्या रक्तलांछित घटनांच्या कडवट स्मृती गाडून टाकण्याचा तो एक विशालबुद्धी प्रयत्न होता. म्हणजे एका दृष्टीने बूटासिंगचा आत्मत्याग अलौकिकच ठरला.

आगगाडी अंगावरून जाऊनही जिवंत राहिलेल्या बूटासिंगच्या अनाथ मुलीला- तन्वीरला लाहोरातील एका कुटुंबाने दत्तक घेऊन तिचे पालन-पोषण केले. आज ती लिबियात आपल्या इंजीनीअर पतीसोबत आणि मुला-नातवंडांसोबत सुखाने दिवस काढते आहे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

उपसंहार-

तर ही होती बूटासिंगची कहाणी.

नुकतेच मी ’फ्रीडम ऍट मिडनाईट’ हे पुस्तक वाचले.
लेखकद्वय आहेत- डॉमिनिक लॅपिए आणि लॅरी कॉलिन्स. मराठीत अनुवाद केला आहे माधव मोर्डेकर यांनी आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने ते प्रकाशित केले आहे.

भारताला मिळालेले स्वातंत्र्य, फाळणी आणि त्या कालावधीतील घटनांचे तपशिल यात दिले आहेत. याच पुस्तकात मला ही बूटासिंगची गोष्ट वाचायला मिळाली. ही कथा मी जशीच्या तशी इथे टंकली आहे. त्यामुळे कुणाला कथेचे भाषासौंदर्य किंवा मांडणी आवडली, तर ते श्रेय माझे नसून मूळ लेखक आणि अनुवादकाचे आहे- हे नमूद करतो.

कथा इथे देण्याचे प्रयोजन हेच, की आपण आज उपभोगत असलेल्या स्वातंत्र्याची एकेकाळी काही लोकांनी किती जबर किंमत मोजली आहे, याची आपल्याला कल्पना यावी. ’पंजाब’ नामक भूप्रदेशातील माणसांनी जे काही भोगले आहे, तेवढे जगाच्या इतिहासात अन्य कुठल्या मानवसमूहाने भोगले असेल असे वाटत नाही. बूटासिंगसारखे किती दुर्दैवी जीव त्या आगीत होरपळले असतील, याची गणतीच नाही. शतकानुशतके मनात जपलेल्या द्वेषभावना आणि राजकीय नेत्यांचे राक्षसी स्वार्थ यांची परिणती अमानुष नरसंहारात होणे- हा आपला इतिहास आहे. यातूनच आपल्याला शिकायचे आहे, पुढे जायचे आहे. येणार्‍या पिढ्यांसाठी आपण काय वारसा सोडून जाणार आहोत, हे ठरवायचे आहे !

बूटासिंगच्या या अद्वितीय कथेने वर्षानुवर्षे लोकांना प्रेरीत केले आहे. त्याच्यावर शेकडो कवने रचली गेली आहेत. १९९९ साली गुरुदास मान(बूटासिंग) आणि दिव्या दत्ता(जैनुब) यांच्या प्रमुख भूमिका असलेला ’शहीद-ए-मोहब्बत बूटासिंग’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. २००१ साली आलेल्या ’गदर’ मधे सनी देओलने रंगवलेले ’तारासिंग’ हे पात्र बूटासिंगवरूनच प्रेरीत झालेले आहे, हे सांगण्याची गरज नाही.

देशांतरइतिहासजीवनमानलेख

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

31 Jan 2011 - 1:41 pm | परिकथेतील राजकुमार

धन्यवाद ज्ञानेश.
कथा खूप आधी वाचलेली होती, वाचुन हळहळ देखील वाटली होती. मात्र गदर मध्ये ह्या सत्यकथेची लावलेली वाट पाहून संताप आला होता.

याच कथेवर "शहिद - ए - मुहब्बत बुटासीन्ग "
नावाचा सिनेमा झाला होता गुरदास मान आनि दिव्या दत्ता यान्च्या सुरेख अभिनयाने कथा जिवन्त केलि होति
गदर पेक्शा हा सिनेमा जास्ति भावला
पन हा सिनेमा गदर च्या स्पर्धेमुळ मागे पडला त्यावेळी !
:)

फ्रीडम ऍट मिडनाईट एक अतिशय चांगले संग्रही ठेवावे असे पुस्तक.

ज्ञानेश, अतिशय धन्यवाद, आधी वाचलेली नव्हती अगदी डोळ्यात पाणि आलं वाचुन. पंजाब भागातल्या लोकांनी एवढं भोगलेलं आहे की कुणि सरदारजीचे विनोद सांगायला लागला कि लगेच त्याला विरोध करावासा वाटतो मला.

हर्षद.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

31 Jan 2011 - 2:44 pm | निनाद मुक्काम प...

हे पुस्तकही वाचले आहे .आणि चेंबूर मधील सिंधी केंप मधील पंजाबी व सिंधी मित्रांच्या घरी त्यांच्या आजोबांकडून ह्या गोष्टींबद्दल प्रत्यक्ष एकले आहे .
अर्थात आज कराची मधील मुहाजिर (भारतातून गेलेले मुसलमान ) कुटुंब लंडन व फ्रेंक फ्रांत ला भेटली ( व्यापार व शिक्षण ह्यामुळे जरी सुब्बता आली असली .तरि समाजात व राजकारणात विशेष वाव नाही ).त्यांच्या सुद्धा कथा कम व्यथा अश्याच आहेत .(पु ल देश्पान्द्याना बोटीवर भेटलेला सरदारजी व तुम्हाला स्वातंत्र्य मिळाले ना ? असा प्रश्न विचारतो .हा प्रसंग आठवला )
भारतात त्यांचे मुंबई व उत्तर प्रदेश येथे नातेवाईक असून दोन्ही बाजूने जाणे येणे असते .

डावखुरा's picture

31 Jan 2011 - 2:24 pm | डावखुरा

धन्य्वाद...
अतिशय हृदय्स्पर्षी कथा...
कथा वाचतांना थोडा गदर आठवत होता...पण त्यांनी केलेला बदल ही दिसला...
’शहीद-ए-मोहब्बत बूटासिंग’ हा चित्रपट पाहण्याची ईच्छा होत आहे..
चांगल्या पुस्तकाची ओळख..

गोगोल's picture

31 Jan 2011 - 3:33 pm | गोगोल

आवडली कथा.
आणि डोळ्यात पाणि देखील आले :(

Only Some Massages Have Happy Endings ...

भडकमकर मास्तर's picture

31 Jan 2011 - 3:37 pm | भडकमकर मास्तर

भारी गोष्ट आहे.. आजच माहिती झाली...आता फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट वाचले पाहिजे

गणपा's picture

31 Jan 2011 - 4:48 pm | गणपा

काय बोलु ?
:(

नगरीनिरंजन's picture

31 Jan 2011 - 4:50 pm | नगरीनिरंजन

अंतःकरण कळवळले.

शुचि's picture

31 Jan 2011 - 7:22 pm | शुचि

अतिशय वाईट वाटले.

मुलूखावेगळी's picture

31 Jan 2011 - 7:55 pm | मुलूखावेगळी

खरेच अतिशय ह्रुदयद्रावक कथा...

कथा इथे देण्याचे प्रयोजन हेच, की आपण आज उपभोगत असलेल्या स्वातंत्र्याची एकेकाळी काही लोकांनी किती जबर किंमत मोजली आहे, याची आपल्याला कल्पना यावी. ’पंजाब’ नामक भूप्रदेशातील माणसांनी जे काही भोगले आहे, तेवढे जगाच्या इतिहासात अन्य कुठल्या मानवसमूहाने भोगले असेल असे वाटत नाही.

ऐकुन माहित होते पन ही कथा वाचुन त्याची तिव्रता जाणवली
अनि हे कळाल्यामुळे आता गदर पुन्हा नाहि बघवनार

jaydip.kulkarni's picture

31 Jan 2011 - 8:00 pm | jaydip.kulkarni

Freedom at midnight हे पुस्तक साधारण ५ ते ६ वर्षापूर्वी वाचले होते , खूप दिवसांनी हा भाग वाचून खूप छान वाटलं . पुस्तकातील हा उतारा तसेच गांधीजीवरचा सुरुवातीचा उतारा मला खूप प्रभावी वाटला होता ............

यशोधरा's picture

31 Jan 2011 - 8:15 pm | यशोधरा

बोलण्यापलिकडचे...

स्वाती२'s picture

31 Jan 2011 - 8:30 pm | स्वाती२

धन्यवाद!

निखिल देशपांडे's picture

31 Jan 2011 - 9:25 pm | निखिल देशपांडे

या बुटासिंग च्या कथेवर शहिद ए मोहब्बत बुटासिंग नावाचा पंजाबी/हिंदी पिक्चर पाहिल्याचे स्मरते. चित्रपटात गुरुदास मानने बुटा सिंगची भुमिका केली होती. चित्रपट फारसा काही आठवत नसला तरी त्यातली काही नुसरत फतेह अली खानने गायलेली गाणी नक्कीच आठवतात.

ज्ञानेश यांनी इतक्या सविस्तर पणे ही कथा इथे दिल्या बद्दल धन्यवाद.

दाद's picture

1 Feb 2011 - 12:49 am | दाद

मन सुन्न झाले!

कथेची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद...

पुस्तकाची ओळख करुन दिल्य बद्दल धन्यवाद

मेहता मध्ये मेंबरशीप आहे माझी ३० % डिस्कॉउंट मिळतो , मी घेणार नक्कीच हे पुस्तक .. आणि कोणाला हवे असल्यास सांगणे ..

शहराजाद's picture

3 Feb 2011 - 4:26 am | शहराजाद

कथा मनाला भिडली. सत्यकथा असल्याने जास्तच.
फाळणीच्या काळातल्या अशा घटना वाचून सुन्न व्हायला होतं.
धन्यवाद ज्ञानेश.

धनंजय's picture

3 Feb 2011 - 5:19 am | धनंजय

अफलातून प्रेमकहाणी - आणि तीसुद्धा खरीखरची!

प्रियाली's picture

3 Feb 2011 - 7:01 am | प्रियाली

बूटासिंगची प्रेमकहाणी अद्वितीय आहेच पण ज्ञानेश.. तुम्ही केलेली मांडणी अतिशय आवडली. तुम्हाला कथा खुलवून सांगण्याची कला आहे. वेळ मिळेल तसे अधिक लिहा.

Rahul D's picture

30 Apr 2016 - 8:05 pm | Rahul D

कथा मनाला भिडली.

बाबा योगीराज's picture

30 Apr 2016 - 8:16 pm | बाबा योगीराज

____/\____

चलत मुसाफिर's picture

30 Apr 2016 - 11:53 pm | चलत मुसाफिर

स्वधर्माला लाथ मारून मुसलमान झालेल्या आणि निलाजरेपणाने पाकिस्तानात जायला तयार झालेल्या व्यक्तीला सहानुभूती दाखवली जात आहे याचा मनस्वी संताप आला. त्या स्त्रीला शीख करून घेण्याचा पर्याय या व्यक्तीला उपलब्ध होता.

अशा प्रकारे इस्लाम सोडून हिंदू/शीख झालेल्या मुसलमान माणसाची कथा कुणाला माहीत असल्यास जरूर सांगा. पण शक्यता नाही.

खरे प्रेम पुरूष करतो स्रीया स्वार्थ पाहतात क्वचित अपवाद आढळतो