आज महाराष्ट्रदिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातल्या दोन महापुरुषांचा 'महाराष्ट्रभूषण' हा खिताब देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या दोन्ही व्यक्ती महाराष्ट्राला भूषणभूत आहेत हे सर्वांना माहीतच आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकर नेहमी प्रसिध्दीच्या झोतात असल्यामुळे त्यांचे नांव सर्व मराठीभाषिकाच्या चांगल्या परिचयाचे आहे, तर डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी प्रसिध्दीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत गेली चौसष्ठ वर्षे अव्याहतपणे चालवले आहे. त्यांनी सुरू केलेल्या कार्याचा वटवृक्ष आता जगभर फोफावला असल्यामुळे ज्यांनी त्या कार्यात सहभाग घेतला आणि ज्या लोकांना त्यापासून लाभ मिळाला अशा लोकांची संख्या फार मोठी आहे, त्यांना नानासाहेबांविषयी अत्यंत आदर वाटत असणारच, आज अभिमानाने त्यांना आनंदाचे भरते आले असेल.
महिनाभरापूर्वी मंगेश पाडगांवकरांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांच्या कांही उत्तमोत्तम काव्यपंक्तीतून त्यांच्याबद्दल लिहिले होते. त्यात भर टाकण्यासारखे खूप कांही असले तरी त्याबद्दल आज लिहिण्यापेक्षा डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांची ओळख करून देतो. त्यांच्या मागे गेली चारशेहे वर्षे समाजप्रबोधनाच्या कार्याची वंशपरंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव 'शेंडे' असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने 'धर्माधिकारी' अशी पदवी दिली. तेंव्हापासून आजतागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनांव लावत आले आहेत आणि त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आले आहेत.
डॉ.नानासाहेबांनी आपल्या पित्याकडून प्रेरणा घेऊन निरूपणाचे सेवाव्रत घेतले आणि ते अव्याहतपणे चालवले आहे. धर्माचरणाविषयी बोलतांना त्या अनुषंगाने अज्ञान, अंधश्रध्दा, भेदाभेद, व्यसनासक्ती, स्त्रियांवरील अत्याचार आदि दुष्ट प्रवृत्तींचे उच्चाटन करून समाजाला सन्मार्गाला लावण्याची शिकवण ते देत आले आहेत. या कामासाठी त्यांनी ६४ वर्षांपूर्वी श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती स्थापन केली. त्याच्या शाखा आज भारताबाहेरील अनेक देशांपर्यंत पसरल्या आहेत. नानासाहेबांचे वय आता ऐंशीच्या घरात असून त्यांचे पुत्र श्री. अप्पासाहेब यांनी या समाजप्रबोधनाच्या कार्याची धुरा स्वतःच्या शिरावर घेतली आहे. अर्थातच त्यांनी आपल्या वडिलांच्याच निष्ठेने आणि तळमळीने हे व्रत अंगिकारले आहे हे सांगायला नकोच.
'महाराष्ट्रभूषण' या सरकारी पदवीमुळे नानासाहेबाच्या महत्तेत विशेष लक्षणीय अशी वाढ होवो वा न होवो, त्यांचे कार्य त्या विषयी अनभिज्ञ असलेल्या लोकांच्या समोर येऊन त्यांना यातून स्फूर्ती मिळाली तरी समाजाला त्याचा लाभ नक्कीच मिळेल. पाडरांवकरांचे काव्य तर कायमच मनाला तजेला देण्याचे कार्य करत असते. या दोघां विभूतींना सादर प्रणिपात.
प्रतिक्रिया
1 May 2008 - 1:49 pm | स्वाती दिनेश
नानासाहेब धर्माधिकारींचा परिचय चांगला करून दिला आहे.मला त्यांच्या कार्याबद्दल माहिती नव्हती.
स्वाती
1 May 2008 - 1:56 pm | आनंदयात्री
धन्यवाद.
1 May 2008 - 2:39 pm | अभिज्ञ
आनंदघनजी,
नानासाहेब धर्माधिकारींचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.
परिचय थोडासा मोघम वाटतोय.अजुन थोडिशि भर घातल्यास
वाचायला निश्चित आवडेल.
दोघाहि थोर लोकांचे 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन.
अबब.
1 May 2008 - 6:18 pm | शितल
कविवर्य मंगेश पाडगांवकर आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारीं या॑ना 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन.
तसेच, डॉ. नानासाहेब धर्माधिकारीं या॑चा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.