भीमराव पांचाळे नावाचा सुरांचा जादूगार कुवेतमधे येऊन गेला आणि आम्हा कुवेतकरांना त्यांच्या सुरांच्या इंद्रजालात पार अडकवून गेला. त्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाहीये. खरं तर त्यातून बाहेर यावंसंच वाटत नाहीये. त्यांनी त्याच्या साधेपणाने आम्हाला कायमचं आपलंसं करुन टाकलंय. त्यांच्या सुरांच्या प्रेमात अगदी आकंठ बुडवून टाकलंय.
संक्रांतीच्या कार्यक्रमासाठी गजलनवाज भीमराव पांचाळे आणि त्यांचे सहकारी डॉ.देवेंद्र यादव आणि जगदीश मेस्त्री कुवेतमधे आले आणि चार दिवस आम्हा सगळ्यांना त्यांचा मंतरलेला सहवास लाभला. २० जानेवारीची २०११ ची सकाळ. एअरपोर्टवर आम्ही त्यांना घ्यायला गेलो तेव्हा फारच उत्सुकता होती. भीमराव कसे दिसत असतील कारण आतापर्यंत त्यांच्याबद्दल फक्त ऐकलंच होतं. टिव्हीवर, वर्तमानपत्रातून फोटोंमधूनच त्यांना बघितलं होतं पण आता त्यांना प्रत्यक्ष भेटणार होतो. हुरहुर वाढत होती. पण फार काही वाट बघायला लागली नाही. सामान घेऊन ते बाहेर आले. त्यांनीही आम्हाला बघितलं नव्हतं पण एकमेकांना बघताच खूण पटली. त्या पहिल्या भेटीत खूपशी उत्सुकता, कुतूहल होतं….त्यांनाही आणि आम्हालाही.
गुरुवारी सकाळी आल्यानंतर त्याचं चहापाणी, जेवणखाण, आराम झाल्यानंतर त्यांची थोडीशी भटकंती झाली. त्यादिवशीचं त्यांचं रात्रीचं जेवण माझ्या घरी होतं. त्यांची तब्येत थोडीशी नरम होती. सारखे दौरे सुरु असल्यामुळे, थंडीमुळे आवाजही जरा जड झाला होता. त्यामुळे साधंच जेवण बनवा, असा त्यांचा आग्रह होता. भीमराव माझ्या हातचं जेवणार …. ही जाणीवच मुळी स्वप्नाच्या दुनियेत नेण्यास पुरेशी होती. हात चालत होते पण डोक्यात वेगळेच विचार होते. त्या धुंदीतच सैपाक केला. संध्याकाळ झाली…ती वेळ आली आणि दारावरची बेल वाजली. दारात दस्तुरखुद्द भीमराव ! आगत –स्वागत झालं. हलक्या फुलक्य गप्पा..सोबत सूप, starters झाले. तोपर्यंत नवर्याने माईक्स वगैरेची तयारी केली. भीमरावांनी सूर लावला………!! मग एकेक गजलेचा मुखडा.. अहा.. !! अद्वैतचा किबोर्ड होताच. त्याचा जगदीशजींनी ताबा घेतला. अद्वैतही भीतभीत आपली गिटार घेऊन बसला. ते दृश्य माझ्यासाठी स्वप्नदृश्यच होतं. मनाच्या कोपर्यात एकेका क्षणाची साठवण आपसूकच होत होती. अर्धा-पाऊण तास त्यांनी शेरांची तोंड-ओळख करुन दिली. फक्त थोडीशी झलक….. अभी तो पूरी मूंहदिखाई बाकी थी !
जेवणाची वेळ झाली. काकडीची कोशिंबीर, गाजराचं लोणचं, भरली वांगी, मुगाची उसळ, पनीर जालफ्रेजी, दाल तडका, भात आणि गाजराचा हलवा असा अगदी साधाच बेत होता. माझी साठवण सुरु होतीच. जेवता जेवता ते म्हणाले की आपण उद्याचा कार्यक्रम संवादस्वरुपी करुया. तुम्ही मला प्रश्न विचारा आणि मी त्यांची उत्तरं देईन. अधे मधे थोडं काही विषयाच्या अनुषंगाने बोला. झालं…… माझा घास घशातच अडकला. म्हटलं, अहो, असं काय करता. तुम्हाला ऐकायला येणार लोक. दोन गजलांच्या मधेही तुम्ही फार सुरेख बोलता. मग मी मधेच कशाला ? पण ते ऐकेचनात. माझी तर भूकच उडाली. त्यांनी खूप धीर दिला. म्हणाले, तुम्ही तयारी करा. तुम्ही नक्की करु शकाल. मी आहे ना…… सांभाळून घेईन. ज्या ज्या गजला ते गाणार होते त्याचे पहिले शेर त्यांनी मला त्यांच्या मोत्यांसारख्या अक्षरात लिहून दिले. होय…….. अक्षरश: मोत्यांसारखं अक्षर आहे त्यांचं. वहीत अगदी मोत्यांच्या ओळी आहेत..अगदी प्रत्येक पानावर तसेच मोती !!
खरं तर प्रेक्षकात बसून मला त्यांचं गाणं ऐकायचं होतं, अनुभवायचं होतं. आता त्यांच्यासोबत निवेदन करायचं म्हणजे कार्यक्रम संपेपर्यंत मी ऑक्सिजनवर. तसा ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा आणला होता त्यांनी. माझ्यासाठी गजलांची ३-४ पुस्तकं, छंदशास्त्राचं पुस्तक, त्यांच्या काही सीडीज….. असा भरपूर खजिना आणला होता.
सगळे लोक गेल्यानंतर मी कसंबसं सगळं आवरलं. रात्रीचे बारा वाजले होते. मी माझ्याकडची सगळी गजलांची पुस्तकं पसरुन बसले. एकीकडे ह्यांनी त्यांची सीडी लावली. त्यांची माहिती त्यांनी पाठवली होतीच. ह्यातलं थोडं, त्यातलं थोडं असं करत करत निवेदन तयार केलं. Computer वरंच टाईप करत असल्यामुळे त्यात हवे तसे बदलही करता आले. माझं टेन्शन बघून हे सुद्धा माझी मदत करत होते. ३-४ वेळा वाचून झाल्यावर final draft तयार झाला. तोवर घड्याळाने रात्रीचे अडीच वाजल्याचा ठोका दिला. आता जऽऽराशी भीती कमी झाली होती.
दुसर्या दिवशी संध्याकाळचा कार्यक्रम होता. साडे दहाला हॉलवर एकदा जाऊन बघायचं होतं तयारीसाठी. पण ९ वाजताच कळलं की जिथे कार्यक्रम होणार आहे, म्हणजे रिगईला, तिकडली पॉवरच गेलीये….सकाळी ७ पासून. असं खरं तर कधीच होत नाही. कुवेतमधे अशी पॉवर कधीच जात नाही. पुन्हा टेन्शन. थोडा वेळ वाट बघायची असं ठरलं. ११ वाजेपर्यंत वाट बघूया असं ठरलं. वेळ जसजसा सरकत होता तसतसं टेन्शन वाढायला लागलं. कारण आयत्यावेळी करता येण्यासारखं काहीच नव्हतं. इतक्या लोकांना कळवणार कसं, जेवणाच्या ऑर्डरचं काय….. कार्यक्रम कुठे करायचा….. ना ना विचार !! गणपती बाप्पाकडे साकडं घातलं नेहेमीप्रमाणे ! सव्वा बाराला कळलं की पॉवर आलीये. झालं……हुश्श केलं अगदी !! बाप्पानेही नेहेमीसारखी हाकेला धाव घेतली होती. देवाचे शतश: आभार मानले. मग तयारी !! सकाळचं सगळ्यांचं हॉलवर जाणं टाळून संध्याकाळी लवकरात लवकर पोहोचायचं असं ठरलं. आदल्या दिवशी संध्याकाळी जाऊन बाकी सगळ्यांनी स्टेज डेकोरेशन वगैरे आधीच करुन ठेवलं होतं. त्यामुळे आता फक्त साऊंड सिस्टीमच सेट करायची होती. ती पण तयारी झाली. पाहुण्याचं साऊंड चेकिंग वगैरे मनासारखं झालं.
संध्याकाळी सगळे जण हॉलवर पोहोचलो. स्मिता राणे आणि नंदा खनकेने अप्रतिम सजावट केली होती. प्रवेश केल्याबरोबर सगळी सजावट लक्ष वेधून घेत होती. प्रसन्न वातावरण तयार झालं होतं. हळदी-कुंकू, वाण, तीळगुळ(प्रज्ञा पावगीच्या हातचा) सगळं सुरु झालं. पारंपारिक वेशभूषेत लोक येत होते. हळुहळु हॉल गच्च भरला. पाहुणेही आले. कार्यक्रम सुरु झाला. नुपूर आणि रसिकाने आपल्या अतिशय मोहक अशा नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. बाकी सगळे सोपस्कार होऊन मुख्य कार्यक्रम सुरु झाला.
वाद्यांची जुळवाजुळव झाली आणि ज्या क्षणाची आतुरतेनी सगळे वाट बघत होते तो कार्यक्रम सुरु झाला. “अंदाज आरश्याचा” पासून सुरवात जी झाली त्यात हळुहळु लोक गुंतायला लागले. गजल म्हणजे काय…..गजल कशी गायची…..गजल कशी फुलवायची हे सगळं सगळं भीमराव हळुवार उलगडून दाखवत होते. मधेच हलक्या फुलक्या आठवणी, किस्से….!! मैफिल रंगायला लागली…लोकांची भरभरुन दादही मिळायला लागली. तिकडे तबलजी पण एकदम मूडमधे आले. त्यांचीही कलाकारी लोकांनी मनापासून अनुभवली. “तू चोर पावलांनी येऊ नकोस आता”, “ख्वाब के जैसे झूठे मेरे यकीं निकले”, सारख्या गजलांनी भीमरावांच्या आवाजाची जादू पसरायला लागली. “ऐ सनम, आंखोको मेरी खूबसूरत साज दे” ह्या द्वैभाषिक गजलेने तर त्यांनी माहौलच बदलवला. रसिकांची उत्तम दाद मिळत होती.
छोट्या विश्रांती नंतर कार्यक्रम पुन्हा सुरु झाला. “हारण्यास एक नवा डाव पाहिजे” ह्या संगीता जोशींच्या गजलेने पुन्हा एकवार रसिकांचा ताबा घेतला. “तू नभातले तारे”, “भलभलते सांगतेस, कां उगाच भांडतेस” ह्या गजलेचं नाट्यगीताच्या पध्दतीचं सादरीकरण म्हणजे एक नवाच प्रयोग होता. शेवटी सुरेश भटांच्या “ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची” ह्या भैरवीने मैफिल संपली. अजूनही खूप काही ऐकायचं होतं पण वेळ संपली होती त्यामुळे थांबावं लागलं. खरं तर रविवारी त्यांची पुन्हा एक मैफिल अनुभवायची होतीच त्यामुळेही समाधान मानून घेतलं मनानं सुद्धा.
दुसरा दिवस त्यांचा भटकंतीचा दिवस होता. कुवेतदर्शन थोडं फार केलं त्यांनी आणि संध्याकाळी पुन्हा एकवार गप्पांची मस्त मैफिल रंगली. भीमरावांच्या साधेपणाबद्दल काय सांगावं……!! इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने ते सगळ्यांशी बोलतात ना….. की खरंच वाटत नाही आपण इतक्या मोठ्या सेलीब्रेटीशी बोलतो आहोत म्हणून.
रविवारचा एकच दिवस उरला होता. त्यांना थोडी खरेदीही करायची होती. दुपारभर मस्त मनासारखी खरेदी केली आणि थोडा आराम करुन पुन्हा ताजेतवाने होऊन मैफिलीला आले. दिवेकरांकडे एकदम मस्त माहौल तयार झाला होता. Sound system सुद्धा एकदम तयार होती. दर्दी लोकांची गर्दी होती. चहा, आणि गरमागरम समोसे खाऊन लोक आपापल्या जागेवर बसले आणि एक विलक्षण अनुभव घ्यायला सिद्ध झाले. जेमतेम ४-५ फुटांचं अंतर त्यांच्या आणि आमच्या मधे. प्रत्येकाला वाटत होतं की ते फक्त आपल्यासाठीच गाताहेत. आज मलाही अगदी समोर बसून त्यांच्या गजलेचा आस्वाद घेता येणार होता. कारण आधीच्या मैफिलीत मी निवेदनामुळे मोकळेपणाने ऐकू शकले नव्हते.
आज तर जणू काही ते ठरवूनच आले होते की आलेल्या प्रत्येक श्रोत्याला अगदी भरभरुन द्यायचं म्हणून. एकेक गजल अशी काही रंगत गेली….. सगळं वातावरणंच धुंद होऊन गेलं. तबलजी पण एकदम जबरदस्त मूडमधे होते. आज ह्या त्रयीनं सगळ्यांना जिंकून घ्यायचा पणच केला होता जणू.
माहौल जमायला वेळच लागला नाही. स्वरांची रिमझिम सुरु झाली आणि हळुहळु चक्क धुवाधार पावसाची बरसात !! गाणं अक्षरश: आतपर्यंत झिरपत जात होतं !
“जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही” भीमरावांनी गायलेली ही पहिली गजल. त्यांनी अशी काही पेश केली…. की सगळे त्यांच्या स्वरपाशात आपसूकच बांधले गेलो.
“केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी” ह्या गजलेनी तर काळजाचा ठावच घेतला. तालाशी खेळत खेळत ते जे काय गायले ना…. ते केवळ अप्रतिम !! श्रोत्यांशी मिश्कील संवाद साधत साधत त्यांनी स्वरांची सुरेल कशिदाकारी केली… ते फक्त अनुभवत राहिलो आम्ही. खरं तर शब्दात सांगण्यासारखं नाहीच काही. डोळे मिटून ते गाणं ऐकावं म्हटलं तर ते पण करता येत नव्हतं कारण समोर जे काही सुरु होतं ते कसं दिसणार ! ते स्वरांचा चक्रव्यूह असा काही रचत होते की त्यातून बाहेर पडताच येत नव्हतं. अधिकाधिक आम्ही गुंतत चाललो होतो. तबलजींचा जोरही काही औरच होता. शब्द सुरांच्या या खेळात संवादिनीचाही तितकाच महत्वाचा वाटा होता.
“रुदाद मेरे बेताबी की” ह्या गजलेने तर वेगळाच माहौल तयार केला. श्रोते मंतरल्यासारखे ऐकत होते. किती किती ऐकू, किती किती साठवू असं होत होतं. तबला, पेटी आणि भीमरावांचे सूर ह्यांचा एकमेकांशी चाललेला लडिवाळ खेळ अगदी रंगात आला होता.
“ठंडी हवाके झौके, चलते है हल्के हल्के” ही गजल ऐकतांना तर खरंच थंड हवेची अल्हाददायक झुळूक येऊन गेल्याचा भास होत होता.
“तू दिल्या जखमात मी हरवून गेलो” ह्या गजलेत तर त्यांनी फारच अभिनव असा प्रयोग केला. ही गजल सहा मात्रा, सात मात्रा आणि आठ मात्रा अशा तीन तालात गायली. धम्माल आली.
“मज नको हे गगन, ही धरा” ही वेगळ्याच मूडची गजल पण मस्त रंगली.
“आयुष्य तेच आहे” ह्या गजलेनी तर बहार उडवून दिली. काय विशेषणं वापरावी तेच कळत नाहीये….!!
मारव्यातली “राहिले रे अजून श्वास किती”…..!! डोळ्यातून अक्षरश: पाणी गळायला लागलं होतं. असे काही विलक्षण सूर होते की ते अनुभवल्याच्या आनंदाने डोळे सारखे भरुन येत होते. शब्दात तो अनुभव सांगता येणंच शक्य नाहीये.
“मी किनारे सरकतांना पाहिले” ह्या फरमाईशी गजलेचा मुखडा पण अप्रतिम होता.
आता वेळ निरोपाची आली होती. भैरवी…! “हमारे बाद हाले दिल सुनाने कौन आएगा” …. आई गं….!! हृदयाचा ठोकाच चुकला. जायची वेळ जवळ आल्याची जाणीव त्या शब्दातून इतकी intence येत होती ना…. अश्रू रोखताच आले नाहीत.
कार्यक्रम संपला हे मन मानायला तयारच होत नव्हतं. भीमरावांनी आपलं सुरांचं जे संमोहन पसरवलं होतं ना….. त्यामुळे सगळ्या जाणीवाच बधिर झाल्या होत्या. फक्त सूर आणि तेच सूर मनात घोळत होते. श्वासच अडकला होता काळजात. मनाची ती अवस्था सांगूच शकत नाहीये.
भीमराव काल भारतात परत गेले तरी पण ते इथेच आहेत अजून. मी न दुसरं काही वाचू शकतेय की ऐकू शकतेय. तडफड होतेय अगदी. त्यांच्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिग केलेलं सारखं ऐकतेय. अजूनही समाधान होत नाहीये. असं गाणं मी कधीच अनुभवलं नव्हतं. अगदी पार आत….आतपर्यंत झिरपलंय ते. त्या गजला पुन्हा ऐकतांनाही तोच अनुभव येतोय. माहित नाही कधी बाहेर पडेन यातून !
प्रतिक्रिया
26 Jan 2011 - 8:06 pm | कच्ची कैरी
मला तर तुमचा फारच हेवा वाटतोय ! आणि त्या कवितेतील अक्षर म्हणजे मोत्यांनाही लाजवेल असे आहे .
26 Jan 2011 - 8:13 pm | प्राजु
खूप सुंदर!!
तुम्ही सगळे खरंच एका सुवर्ण मैफिलीत न्हाऊन निघाला आहात.
वृत्तांत सुंदर लिहिला आहेस.
वाचताना.. मी ही अनुभवते आहे का.. असं वाटून गेलं.
27 Jan 2011 - 10:54 am | टारझन
जियो जयवी तै !! सुपर्ब :)
26 Jan 2011 - 8:23 pm | स्वाती दिनेश
रंगलेल्या मैफिलीचं वर्णन छान केलं आहे,
मैफिलीची एखादी झलकस्वरुपात दृकश्राव्य फित टाकली असती तर लेखाला चार चाँद लागले असते,
स्वाती
26 Jan 2011 - 8:28 pm | श्रावण मोडक
'मी किनारे सरकताना पाहिले' या गझलेचा उल्लेख पाहून आश्चर्य वाटले. ही गझल गाणे पांचाळे यांनी थांबवले आहे असे ऐकले होते. मागे पुण्यातील एका कार्यक्रमात या गझलेची जोरदार फर्माईश होऊनही त्यांनी ती गायली नव्हती. ही गझल नीता भिसे यांची आहे.
26 Jan 2011 - 8:49 pm | चिगो
गझल गावी तर भिमराव पांचाळेंनीच... सूर सरळ काळजाचा ठावच घेतात. "अंदाज आरशाचा", "तू नभातले तारे माळलेस का", "आयुष्य तेच आहे".. माझं वैयक्तीक मत आहे की "गझल-गायक" म्हणून प्रसिद्धी आणि त्या अनुषंगाने भरपूर पैसा कमावणार्या अनेक गायकांपेक्षा भिमराव खूप उजवे आहेत, बट ही हॅसन्ट गॉट हिस ड्यू.. असो...
अतिशय सुंदर वृत्तांत दिलाय तुम्ही मैफिलीचा... हेवा वाटतो तूमचा.. आणि काय सुंदर, सुरेख अक्षर आहे हो त्यांचे...
27 Jan 2011 - 9:23 am | उल्हास
गझल-गायक" म्हणून प्रसिद्धी आणि त्या अनुषंगाने भरपूर पैसा कमावणार्या अनेक गायकांपेक्षा भिमराव खूप उजवे आहेत, बट ही हॅसन्ट गॉट हिस ड्यू.. असो...
भाग्यवान आहात
रेकॉर्डींग टाकता येईल काय बघा
27 Jan 2011 - 9:58 am | उल्हास
http://www.esnips.com/doc/4715f0ac-9a86-44b9-b365-ab9e03dce942/01_Andaaj...
26 Jan 2011 - 9:30 pm | रेवती
तुझे लेखन हे भीमरावांच्या मैफिलीचा अनुभव देवून गेले.
उत्कटतेने आलेले लेखन आवडले. फोटू छान आलेत.
(तूही छान दिसते आहेत. पैठणीचा हा रंग मी फारसा पाहिला नव्हता.)
27 Jan 2011 - 10:54 pm | सखी
तुझे लेखन हे भीमरावांच्या मैफिलीचा अनुभव देवून गेले.
उत्कटतेने आलेले लेखन आवडले. फोटू छान आलेत.
- असेच म्हणते. भीमरावांच्या साध्या, विनयी स्वभावाबद्दलपण खूप ऐकलं आहे.
26 Jan 2011 - 9:47 pm | प्रास
जयश्रीजी,
असं लिहिलंयत की जणू त्या प्रत्येक भेटीदरम्यान आणि कार्यक्रमादरम्यान आमचीही तिथेच उपस्थिती होती असं वाटावं. कदाचित तुमच्या छायाचित्रांमुळेही ही भावना जास्त उचंबळून आली असेल.
अप्रतिम लिखाण......
26 Jan 2011 - 11:28 pm | पिंगू
भीमरावांची "अंदाज आरशाचा" ही गजल मला खूप आवडते.. तुम्ही जो वृत्तांत लिहिला आहे. तो अप्रतिम आहे..
- पिंगू
26 Jan 2011 - 11:29 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्तच!
आज कुवेतमधे असतो तर? :(
27 Jan 2011 - 11:57 am | श्रावण मोडक
भीमराव तिथून परतले आहेत. ;)
27 Jan 2011 - 12:39 pm | टारझन
=)) लेख न वाचता प्रतिक्रीया दिली नसेल ना ? :)
27 Jan 2011 - 5:51 am | शुचि
उत्कट लेखन
27 Jan 2011 - 9:44 am | सहज
भीमराव पांचाळे यांचे हस्ताक्षर काय सुंदर आहे!!
वृत्तांत आवडला.
आपल्या प्रमोदकाकांनी भीमराव पांचाळे यांची घेतलेली मुलाखत येथे पहाता येईल.
27 Jan 2011 - 10:45 am | गवि
एक छान अनुभव छान रितीने लिहिला आहे.
आवडले.
ते वहीतलं अक्षर तर हेवा करावा असं सुंदर.
एक किडा चावलाच पण.
ती वहीतली रचना गझल आहे?
सर्व दुसर्या ओळी फक्त खाली परत लिहितोय.
आसवांना उगाच त्रास नको.
..
आज कोणीच आसपास नको.
..
इथपर्यंतही ठीक..
पण....
..
ही फुलांची मिठी कुणास नको
...
हाय नुसतेच स्पर्श भास नको
..
सोबतीला तुझा सुवास नको
...
जीवनाचा तुरुंगवास नको..
--------------
ही उत्तम कविता म्हणून म्हणता येईलही.. पण गझल ? आणि गझलनवाझ अशा उल्लेखानंतर? गझल म्हणून फॉर्मॅट फार उजवा वाटला नाही, किंवा माझी "गझल" या वृत्ताविषयीची सामान्यज्ञानाधारित समजूत चूक असावी.
फार काही त्यातले माहीत नाही हे कबूल...फक्त..
मिठी कुणास, स्पर्श भास, सुवास, तुरुंगवास ..
?????
ते "ठी कु" , "र्श" , "झा सु" ," रुंग"
असे वेगवेगळे टोकेरी काही त्या "णास", "भास", "वास" पूर्वी येऊन कानास बोचले.
27 Jan 2011 - 12:37 pm | स्पंदना
काही गझला 'गैरमुर्रद्दफ' म्हणुन ओळखल्या जातात गवि. गझलातच गझलांचे खुप प्रकार असतात.
बाकि जयवींच्या चांदण भरल्या रात्रीचा अन सुरावटीच्या सहवासातले चार दिवसांचा शिडकावा आमच्या पर्यंत पोहोच्ल्याची पावती आम्ही त्यांना देउ इच्छितो.
27 Jan 2011 - 12:44 pm | गवि
अच्छा..
असं आहे होय ?
मी आपले मराठीत भटांच्या आणि उर्दूतल्या फराज, फाजली वगैरेंच्या गाजलेल्या गझला ऐकून मनात धरलेली काहीतरी कन्सेप्ट होती.
तरीच पूर्वीही काहीकाही गझल म्हणून दाखवलेली काव्ये आवडली खूप पण गझल या नावाखाली दाखवल्याने नेहमी अशीच खटकत आली.
खुलाश्याबद्दल थँक्स. आता अशा दृष्टीने काही माहिती मिळते का बघतो.
29 Jan 2011 - 3:01 pm | जयवी
खूप खूप धन्यवाद :)
27 Jan 2011 - 1:09 pm | मनराव
>>>काकडीची कोशिंबीर, गाजराचं लोणचं, भरली वांगी, मुगाची उसळ, पनीर जालफ्रेजी, दाल तडका, भात आणि गाजराचा हलवा असा अगदी साधाच बेत होता. <<<
असलं साधं जेवण मला पण अवडेल....... ;)
असो, मस्तच मैफिल जमली आहे इथे सुद्धा...............
27 Jan 2011 - 4:49 pm | मुलूखावेगळी
मी गायनाची प्रथम परीक्षा दिली तेव्हा हे माझ्या क्लास मधे परीक्षक मह्नुन आलेले तेव्हा मे त्याना प्र॑त्यक्श पाहिलेले
पन तेव्हा त्यान्ची इतकी माहिती हि नव्हती आनि मी लहान होते ६वीत
29 Jan 2011 - 2:59 pm | जयवी
तहे दिल से शुक्रिया यारो :)
4 Feb 2011 - 8:11 pm | क्रान्ति
मस्तच लिहिलास वृत्तांत जयू!
5 Feb 2011 - 8:47 am | प्रीत-मोहर
आज भीमराव आम्च्या पर्वरीत युवा साहित्य संमेलनात येणार आहेत !!!!