वनराणी ..३

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
22 Jan 2011 - 5:59 am

वनराणी २


"शबरी...! चल! माझ्यासोबत चल. माझ्या आश्रमात चल. उठ बालिके. जे व्रत घेतलं आहेस ते पुर्ण कर. " अतिशय गंभीर आणि निर्णायक आवाजात हे काय ऐकतेय मी!! आनंदाने डोळे भरून आलेत...
"मुनीवर.. मुनीवर.. मी आपली..." अरे!! हे काय!! मुनीवर... मुनीवर... !! मुनीवर अरण्याकडे चालू लागले!! मलाही जायला हवं. ....मलाही जायला हवं....


"थांबा मुनीवर! मुनीवर थांबा.. मी येतेय.. थांबा मुनीवर.. थांबाऽऽऽऽऽ...."

*******************************
पुढे वाचा...

मी मुनीवरांच्या सोबत या आश्रमात आलेय खरी, पण इथलं हे गंभिर आणि पवित्र वातावरण..! त्यात मी अशी भिल्ल. पण जमतंय हळूहळू मला. मुनींचे सगळे शिष्यगण , त्यांच्या ध्यान धारणेच्या वेळा.. आणि मी.. सगळ्यात एकदम वेगळी!! मुनींखेरीज कोणी नीट बोलतही नाही माझ्याशी. फ़क्त मुनिंची आज्ञा म्हणून मला कोणी हटकत नाही ... इतकंच!! मी इथे आल्याच्या एक-दोन दिवसांनी ती घटना घडली. हो.. !! अजून मला आठवलं तरी अंगावर शहारा येतो..

मी येथे आल्यापासून जमेल तितके कामे करते आहे. त्या दिवशीही सकाळी मी सगळा आश्रम झाडून स्वच्छ केला. शाळेतली सगळी दालने सारवून लख्ख केली. आणि काही फ़ळे आणून ठेवावी म्हणून अरण्यात गेले होते. काही केळी, बोरं करवंदं, लिंबं घेऊन आले.. पण जसजशी आश्रमाच्या जवळ आले तसतसे काही आवाज कानावर येऊ लागले. कोणीतरी मोठमोठ्याने बोलत होतं. आश्रमापाशी आले तेव्हा पाहिलं, काही ऋषीगण त्यांच्या शिष्यांसोबत आश्रमाच्या अंगणात उभे होते. आणि मातंग ऋषी त्या सर्वांच्या समोर उभे होते..

"मुनीवर, तुम्ही हे योग्य केले नाहित. एका.. एका... शुद्र जातीतल्या मुलीला तुम्ही तुमच्या आश्रमात आश्रय दिलात? तुमच्या मनाला हे पटले तरी कसे? या असल्या कृत्याने तुम्ही कर्मकांडाच्या नियमांना आडकाठी करताहात.. आणि आम्ही ते कदापि सहन करणार नाही." वल्लभ ऋषी मुनीवरांना बोलत होते. मुनीवर मात्र शांत होते. मी मात्र उभ्या उभ्या थिजून गेले होते. मी इथे राहिले तर अशी आपत्ती नेहमीच येत राहिल.. माझ्यामुळे मुनीवरांना मान खाली घालायला लागू नये!!

"मुनीराज, तिचं नाव शबरी आहे. आणि तिला आश्रय देऊन आम्ही कोणताही नियम मोडला नाहीये. आपण ब्राह्मण.. दिक्षा देत राहणं आणि समाजाला ज्ञान देणं हेच आपलं काम आणि आम्ही तेच करतो आहोत." मुनीवर शांतपणे बोलत होते.
"आपलं काम काय आहे हे आपण शिकवू नये आम्हांस!! ते आम्ही जाणतोच. पण होम-हवन आणि इतर ध्यानधारणे सारखी कृत्ये जिथे केली आणि शिकवली जातात तिथे एक शूद्र कन्या रहावी हे आम्हांस पटत नाही. आणि ते आम्ही कदापि सहन करणार नाही. तेव्हा आपण त्या मुलीस निघून जाण्यास सांगावे आणि आश्रम दूध आणि गोमुत्राने धुवून घ्यावा हेच योग्य आहे." भानू ऋषी बोलताना संतापाने थरथरत होते. इतके दिवस ऋषीमुनी संतापी असतात, संतापून शाप देतात असे ऐकले होते. पण आज प्रत्यक्षात त्यांचं संतापणं काय असतं हे पहात होते. त्या क्षणाला असं वाटलं पळत पळत जाऊन त्या 'पूर्णे मध्ये स्वत:ला झोकून द्यावं.' पण इतक्यात मुनीवरांची नजर पडली माझ्यावर आणि त्यांनी जवळ बोलावून घेतलं मला.
"बाळ शबरी इकडे ये." इतका प्रेमळस्वर.. !! मी काही न बोलताच मान खाली घालून त्यांच्याकडे गेले.

मुनींना वाकून नमस्कार केला. समोर उभ्या असणार्‍या ऋषी गणांना नमस्कार केला. सगळ्यांच्या नजरा माझ्यावर रोखलेल्या होत्या. मुनीवर नसते तर कदाचित नुसत्या नजरांनीच या ऋषीगणांनी मला उभी जाळली असती, इतक्या जळजळीत नजरा होत्या त्या! मला काय करावं काहीच सुचत नव्हतं. या क्षणी अचानक मरण आलं तर किती बरं होईल असंही वाटून गेलं. डोळ्यांतून अश्रू कधी खाली ओघळले हे समजलंच नाही. त्या अश्रूंमध्ये काय काय दडलं नव्हतं !! मा' आणि बां'पासून दूर गेल्याचं दु:ख, माझा बालपणीचा सवंगडी आणि माझ्यासोबत संसारची स्वप्नं रंगवणारा भोरा.. त्याला दु:ख दिल्याची टोचणी, मुनीवरांनी दाखवलेल्या मायेबद्दलची कृतज्ञता, आणि माझ्यामुळे मुनीवरांना होणार्‍या मन:स्तापाचं शल्य!!

"क्षमा करा ऋषी ! पण शबरी इथून कुठेही नाही जाणार. ज्या ईश्वराने तुम्हा-आम्हाला बनवले आहे, त्यानेच तिलाही बनवले आहे. त्याला जर तिच्यात आणि आपल्यात फ़रक करयचा असता तर त्याने तो आधीच केला असता. मनुष्यप्राणी आणि मनुष्येतर प्राणी इतकाच फ़रक त्या परमेश्वराने केला आहे. आपल्याला अधिकार नाहीये त्याने बनवलेल्या या सृष्टिचा अपमान करण्याचा. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो त्याबद्दल त्याचे आभार मानले पाहिजेत. आपणच जर असा भेदभाव करू लागलो तर आपल्यामध्ये आणि अरण्यात वावरणार्‍या वन्य जीवांमध्ये काय फ़रक राहिला? हे तपस्वींनो.. बोला..! आहे उत्तर??" बोलता बोलता मुनीवरांचा आवाज तीव्र झाला. असं वाटलं क्षणभर सगळं जागच्या जागी थांबलं आहे..! कोणी काहीच बोलत नाही हे पाहून विष्णूदास मुनी पुढे आले.
"हे पहा, आम्हाला तत्वज्ञान शिकवू नका. धर्माने जे नियम घालून दिलेले आहेत ते पाळणं आमचं आद्यकर्म आहे. आणि त्यामध्ये बदल करण्याचा तुम्हाला अधिकार नाही." विष्णूदास मुनींनी बोलता बोलता माझ्याकडे पाहिले.. ती नजर!! इतक्या जखमा करून गेली...काय सांगू?? मी एक मुलगी चालती-बोलती, तुमच्यासारखीच! मलाही भूक लागते, तहान लागते. जखम झाली तर शरीरातून येणारं माझं रक्तही लालच आहे. भिल्ल जामातीत जन्मले तर, माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नाही मला!!! हा कोणता न्याय आहे? मनांत विचरांचा कल्लोळ माजला होता. पण मी काय करू शकत होते, मान खाली घालून उभे राहण्याखेरीज!!

"आमचा निर्णय अढळ आहे. शबरी इथेच राहिल याच आश्रमात." मुनीवरांचा तो निर्णायक स्वर ऐकून मला एकदम गलबलून आलं, श्वास कोंडला आणि मी एकदम रडू लागले. हुंदका थांबेचना.
"मातंग!!!!!!!" भानू ऋषी कडाडले. वीजेचा प्रहार झाल्यासारखं वाटलं. "मातंग, ही अस्पृष्या, इथे राहणार असेल तर आमच्या आश्रमांची द्वारे तुमच्यासाठी बंद झाली असे समजा. आम्ही आपल्या आश्रमात पाऊलही नाही ठेवणार नाही. सगळ्या धार्मिक विधीतून तुम्हाला बहिष्कृत करत आहोत. चला मंडळी.." असे बोलून सगळे ऋषीगण भानू ऋषींच्या मगोमाग ताडताड निघूनही गेले. सगळे शिष्यगण, मी, आणि मुनीवर स्तब्ध उभे होतो. कोणीच काही बोललं नाही.

"प्रिय शिष्यगणांनो, शबरीचे इथे वास्तव्य आपल्यापैकी कोणाला रूचले नसल्यास आपणही हा आश्रम सोडुन इतरत्र विद्या ग्रहण करण्यासाठी जाऊ शकता. आमचा कोणताही आक्षेप नाही यावर. " इतकेच बोलून मुनीवर कुटीमध्ये निघून गेले. हळू हळू शिष्यगणही पांगले.. पण कोणीही जाण्यासाठी बाहेर पडले नाही. मी ही खाली मान घालूनच कुटीत परतले.

या घटनेला एक मास लोटला असेल आता. पण अजूनही ती घटना आठवली की पाय डळमळू लागतात. पण मी हळूहळू रुळलेय इथे. इथल्या तरूवेलीत, गाई-वासरांत, हरणांमध्ये माझे सवंगडी भेटलेत मला. जे आहे .. त्यात खूप समाधान आहे मला. इथे अशीच राहिले मुनीवरांच्या छायेत, तरी माझं अयुष्य स्वर्ग होईल. ज्या दिव्यशक्तीने हे सगळं घडवून आणलय, तीच मला या सगळ्यातून तारून नेईल.

क्रमश:

कथाप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

सन्दीप's picture

22 Jan 2011 - 1:07 pm | सन्दीप

सुन्दर. वाचतोय.
पुलेशु.

आत्मशून्य's picture

22 Jan 2011 - 1:52 pm | आत्मशून्य

एकूणच शबरीची भक्ती तीच्या मदतीला धावून आली असेच म्हणावेसे वाटते, नास्तीकता पाळून बीचारीचे काय हाल झाले असते ? तीला स्वतंत्र आयूष्य बाणेदारपणे जगाता आले असते काय याचा केवळ एक माणूस म्हणून एक वीचारच मनाला चटका लावून जातोय.... असो कथेचे तात्पर्य जे भक्ती आहे ते मनाला जास्त भीडले.

आपणच जर असा भेदभाव करू लागलो तर आपल्यामध्ये आणि अरण्यात वावरणार्‍या वन्य जीवांमध्ये काय फ़रक राहिला? हे तपस्वींनो.. बोला..! आहे उत्तर??"

हे तर खासच...

सुंदर लिहितेयस ग तायडे. :)

शुचि's picture

22 Jan 2011 - 6:49 pm | शुचि

मस्तच. अप्रतिम.

धन्यवाद.
लिहिते आहे पुढचे भाग लवकरच. कमितकमी भागांत ही कथा बसवायचा प्रयत्न करते आहे. बघूया कसे जमतेय ते.

हे नजरेतुन सटकलं कसं होतं ? तिण्ही भाग वाच्या. आवड्या. बर्‍याच दिवसांनी ही भाषाशैली वाचली. मस्त वाटलं :)
पु.ले.शु.

अवलिया's picture

24 Jan 2011 - 8:55 am | अवलिया

मस्त चालू आहे... :)

अवलिया's picture

24 Jan 2011 - 8:56 am | अवलिया

मस्त चालू आहे... :)

स्वाती दिनेश's picture

24 Jan 2011 - 1:13 pm | स्वाती दिनेश

प्राजु, वाचते आहे शबरीकथा.. छान लिहिते आहेस, हाच टेंपो कायम ठेवून लवकर लिहून पूर्ण कर,:)
स्वाती

प्राजु's picture

24 Jan 2011 - 8:14 pm | प्राजु

टार्‍या, नाना आणि स्वातीताई... मनापासून आभार.

स्वातीताई... तुझ्या अपेक्षेला उतरण्याचा १०० % प्रयत्न करेन. :)