मनाचे खेळ (भाग ३) (अंतिम)

मराठे's picture
मराठे in जनातलं, मनातलं
20 Jan 2011 - 1:42 am

ह्या आधीचे भागः
भाग १
भाग २
अंगावर सरसरून काटा आला. सगळ्या भावना बाजूला सारून मनात फक्त भीती व्यापून राहिली. मी दरवाज्याची कडी घट्ट धरून ठेवली... "वाचवा! वाचवा! कोणी आहे का ?" वेड्यासारखा जोरजोरात ओरडायला लागलो..... दरवाज्यावर भिंतींवर जोरजोरात हात पाय आपटून आवाज करत होतो.. कोणीतरी माझ्या मदतीला येइल... शुद्ध कधी हरपली हे मला समजलं नाही..

शुक्रवार

म्हणजे मला वाटतंय की आज शुक्रवार आहे. शुद्धीवर आल्यानंतर मी घराताली विजेवर चालणारी प्रत्येक वस्तू तोडून फोडून टाकली आहे. फक्त हा टेबलावरचा दिवा तेवढा शिल्लक आहे. काँप्युटर, फोन, वेब-कॅम सगळंच. मी स्वतः कॉलेज मधे कॉम्प्युटर इंजिनीयरिंग करतोय, त्यामुळे हॅकिंगविषयी मला माहिती आहे.. मी माझ्याबद्धलची माहीती दिल्याशिवाय .. म्हणजे माझं नाव, फोन नंबर, पत्ता... कोणतीच माहिती बाहेरून मला मिळाली नव्हती. मी आत्तापर्यंत लिहिलेल्या डायरीची पानं सारखी चाळून बघतोय .. विचार कर करून डोकं खूप दुखायला लागलं आहे. क्षणात ती अज्ञात अनामिक भीती तर क्षणात स्वतःच्या ह्या वेडेपणाबद्धल चीड अशा दोन परस्पर विरोधी विचारांमधे गुंतत चाललो आहे. कधीकधी तर माझी अगदी खात्रीच होते की कोणीतरी मला घराबाहेर काढण्यासाठी भरपूर प्रयत्न करतो आहे. अगदी अनिताचा पहिला फोन आला तेव्हापासून... ती मला बाहेर येण्यासाठीच सुचवतेय. परवा इथे आली तेव्हापण दार उघडून बाहेर घेउन जाण्यासाठीच आली होती.

मी मनात पुन्हा पुन्हा झाल्या प्रसंगाची क्रमवारी लावण्याचा प्रयत्न करतो आहे. एखाद वेळी वाटतं, की मला पार वेड लागलं आहे. कारण कधी कधी असं होतं ना! रस्त्यांवर कोणी माणसं दिसत नाहीत... तुम्हाला हवं तेव्हा चॅटवर कोणी गप्पा मारायला नसतं... .. अगदी अचानकच कोणतारी वायरस तुम्हाला जंक ईमेल पाठवतो.. नक्कीच होऊ शकतं. पण लगेच दुसर्‍या क्षणाला असं वाटतं की हे असं एकदम एकाच वेळी होण्याची शक्यता किती असेल? लाखात एकदा.. आणि कदाचीत यामुळेच "त्यांना" मी अजून सापडलो नसेन. मी ह्या बिल्डिंगच्या गेटबाहेर अजून पडलेलो नाही. मी माझ्या खोलीची खिडकीसुद्धा पूर्ण उघडू शकत नाही. आणि परवा तो कॅमेरा बाहेर ठेवल्या ह्या खोलीच्याही बाहेर मी पडलेलो नाही. जर मी प्रथम अनिताला फोन केला नसता तर...."ते" जे कोणी असतील त्यांना मी इथे आहे हे कळलं ही नसतं ! तो फोन जो लागला नाही.. उलट "त्यांनीच" मला फोन करून माझं नाव विचारून घेतलं.

ते छोटं.. असंबद्धपणे लिहिलेलं ईमेल.. कोणाकडून होतं ते? कोणीतरी इतरांना सावध करण्यासाठी पाठवलं होतं का? "ते" येण्याआगोदर मला सावध करण्यासाठी मित्रत्वाचा सल्ला म्हणून ?? "स्वतःच्या डोळ्यांनी ....... त्यांच्यावर विश्वास ठेऊ नको... ते.. .." .. अगदी मला ज्या गोष्टीची भीती वाटतेय तेच शब्द ! "ते" कुठल्यातरी पद्धतीने काँप्युटर, मोबाईल फोन हॅक करून माझी माहिती गोळा करत आहेत.. आणि त्याचा उपयोग करून आणि माझ्या मित्र्-मैत्रीणींचे आवाज काढून मला बाहेर बोलावताहेत.

पण... "ते" घरात का घुसत नाहीत ? त्यांनी काल अनिताच्या रूपात येऊन दरवाजा वाजवला याचा अर्थ ते भुतांसारखे बंद दरवाज्यामधून आरपार जाऊ शकत नाहीत. ह्या बिल्डींगमधल्या खोल्यांचे दरवाजेपण मजबूत आहेत. मी स्वतः प्रयत्न केला तरी एकट्याने दरवाजा तोडू शकत नाही. बिल्डिंग जुनी असल्याचा फायदा. पण ह्या सगळ्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की त्यांना माझ्याकडून काय हवंय? जर मला ठार मारायचं असेल तर कितीतरी इतर मार्ग आहेत.. अगदी सोप्पा उपाय म्हणजे भुकेने तडफडून मारणं. गेले काही दिवस मी फ्रिजमधलं उरलं सुरलं अन्न खाउन जगतोय.. पण कधितरी ते संपेलच. म्हणजे मला बाहेर काढून ते मारणार नसावेत.. मग काय ? मृत्युपेक्षाही भयंकर असं काय आहे त्यांच्या मनात? या सगळ्यातून मी सहिसलामत बाहेर पडू शकेन का?

दरवाज्यात कोणीतरी आहे वाटतं ! होय.. दरवाजा कोणीतरी वाजवतंय!

****

"मला विचार करायला एक दोन मिनिटं द्या ! मग मी बाहेर येतो" मी बाहेरच्या लोकांना सांगितलं. मी आता हे इथे लिहून फक्त यासाठी ठेवतोय की जेणेंकरून माझे विचार भरकटणार नाहीत. बाहेरून कोणाच्यातरी बोलण्याचा आवाज येतोय ! पण माझं वेड मला स्वस्थ बसू देत नाहिये. हो, मला समजतंय की माझे विचार एखाद्या मनोरुग्णासारखेच आहेत. पण त्यांना माझ्यापर्यंत पोहोचायला तीन दिवस लागले? तीन दिवस "ते" काय करत होते?? बाहेर अनिताचा आवाज पण येतोय. आणखी काही माणसं आहेत. दोन पोलीस आणि एक डॉक्टर... कदाचीत ह्या तीन दिवसांमधे माझ्या "शंकांची" उत्तरं "ते" तयार करत असावेत.. .डॉक्टर तरी त्यातल्या त्यात जास्त समजूतदारपणे बोलतोय. म्हणजे जर मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर त्याच्या बोलण्यातून माझ्या सर्व शंकांचं नीट निरसन होऊ शकतंय.... जर मी विश्वास ठेवला तर...

डॉक्टर साठीच्या आसपासचा असावा... त्याच्या स्वरात जरब आणि समजूतदारपणाचं मिश्रण आहे. त्याचा आवाज मला आवडला... अगदी माझ्या बाबांसारखाच आहे त्याचा आवाज. त्याच्या मते मला सायबर-सायकोसिस.. म्हणजे आंतरजालिय्-मनोविकार (?) झाला आहे. त्याची साथच पसरलेय म्हणे जगभरात. लाख्खो लोक त्यामुळे आत्महत्या करत आहेत. हे सगळं एका ईमेल मुळे झालं... जे "कसंतरी निसटलं"... आई-शप्पथ त्याने हेच शब्द उच्चारले... "कसंतरी निसटलं"... मला वाटतं की त्याला म्हणायचं होतं की ते एक स्पॅम मेल होतं.. पण माझ्या मनात शंकेचं भूत पुन्हा किंचाळू लागलं. नक्कीच "त्यां"च्या तोंडून खरं काय ते चुकून बाहेर पडलं होतं. तो डॉक्टर सांगत होता की... माझं हे वागणं ह्या रोगाची लागण झालेल्या इतर लोकांसारखंच आहे. एकटेपणामुळे वाटणारी पराकोटीची भीती... आणि त्यातून मग मनाचे खेळ सुरू होणे...सगळं फक्त इतर लोकांशी डायरेक्ट संपर्क न ठेवल्यामुळे. सगळी लक्षणं मला लागू पडत होती. ह्या रोगाची लागण सुद्धा अशीच होते.. एखादा रुग्ण वेडाच्या भरात इतर लोकांना ईमेल किंवा फोनवरून संदेश पाठवतो. संदेश मिळणार्‍याने त्याचा विचार करायला सुरूवात केली की त्यालाही याची लागण होते.

त्याच्या बोलण्यातून त्या विचित्र ईमेलचं कारण मला समजलं. तसंच मी माझ्या फोनवरून सगळ्यांना पाठवलेला तो संदेशही आठवला. "गेल्या काही दिवसांत तुम्ही कोणाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय का ?"... म्हणजे या रोगाचा प्रसार मी सुद्धा नकळत केला होता. कदाचीत माझा संदेश वाचून आत्ता या क्षणी कोणितरी या रोगाला... भीतीला बळी पडत असेल. कारण त्या संदेशाचा अर्थ कोणीही कसाही लाऊ शकेल.

डॉक्टर मला समजावत होते.. म्हणाले "तुझ्यासारखी एकलकोंडी मुलं या रोगाच्या जाळ्यात सहजच अडकतात. शिवाय आजकालच्या जमान्यात माणसं एकमेकांना प्रत्यक्ष भेटतही नाहीत. त्यामुळे या रोगाचा प्रसार फार झपाट्याने वाढला आहे. 'आम्हाला आणखी एकाला गमवायचं नाहिये' ! "

एक मात्र मानलं पाहिजे.. त्याचं स्पष्टीकरण खरोखरच चांगलं होतं. माझ्या जवळ जवळ प्रत्येक शंकेचं उत्तर त्यानं दिलं होतं. अगदी योग्यप्रकारे..... मी दार बंद करून आत बसून राहण्यासाठी.. माझ्याच भीतीच्या आणि शंकांच्या जाळ्यात आणखी गुरफटण्यासाठी खरं म्हणजे आता कोणतंच कारण नव्हतं. बाहेर मला पकडून मरणापेक्षाही भयंकर अशी शिक्षा देण्यासाठी कोणी नाहिये! काही वेळापूर्वी या जगात आता मीच एक ह्या बंद खोलीत सुरक्षित उरलो आहे आणि कोणीतरी अनामिक शक्ती मला मृत्युपेक्षाही भयंकर नरकयातना देण्यासाठी मला ह्या सुरक्षित जागेतून बाहेर काढायला बघते आहे असं मला वाटत होतं. आता डॉक्टर मला दरवाजा उघडायला सांगताहेत... त्यांनी माझ्याबाबतीत घडलेल्या सगळ्या प्रसंगांच बरोब्बर उत्तर दिलं आहे.. त्यांची उत्तरं.. त्यांचं स्पष्टीकरण इतकं सडेतोड.... इतकं चपखल.. इतकं पर्फेक्ट ... अगदी ठरवल्यासारखं...

नेमक्या याच कारणासाठी मी आता दरवाजा मुळीच उघडणार नाही.

माझी खात्री कशामुळे पटेल? खरं काय आणि भ्रम कोणते हे मला कशामुळे समजेल? ह्या सगळ्या वायर्स, आणि नेटवर्क सिग्नल... हे आंतरजाल.. कुठून सुरू होतं?? हे काही खरं जग नाही.. आभासी आहे.. आणि असे आभास निर्माण करणं काहिच अवघड नाही... ईमेल , फोन वेब्-कॅम सगळं काही हॅक होउ शकतं... ईमेल, फोनवर ऐकू येणारा आवाज .. विडोयो चॅटवरचं दिसणंसुद्धा बनावट असू शकतं ! हे तर फक्त विजेचे तरंग आहेत .. त्यावर नियंत्रण मिळवणं फारसं अवघड नाहिये "त्यांना".

दारावर आता "ते" धडका मारताहेत.. "ते" थोड्याच वेळात दरवाजा तोडून आत येतील. आले तर बरंच आहे.. मी माझ्या डोळ्यांनी त्यांना पाहिन तरी... डोळ्यांनी... "स्वतःच्या डोळ्यांनी ....... त्यांच्यावर विश्वास ठेऊ नको... ते.. " .. एक मिनिट.. तो ईमेल मला माझ्या स्वत:च्या डोळ्यांवरही विश्वास ठेउ नको असं तर सांगत नव्हता ?? शेवटी डोळ्यांना दिसणारं चित्र म्हणजेसुद्धा मेंदुत उमटणारे एक प्रकारे विजेचे तरंगच नाही का? ... हो नक्कीच.. नाही नाही .. "ते" मला असे फसवू शकणार नाहीत... मला खात्री केली पाहिजे.. डोळ्यांशिवाय....

तारिख / वार माहित नाही

मी रोज एक पेन आणि पेपर मागत होतो.. आज शेवटी मला मिळालं. अर्थात आता त्याने काही फरक पडणार आहे असं नाही. आता मी काय करू शकणार आहे?.. कोणाला सावध करणार आहे? डोळ्यांना लावलेली बँडेजेस आता माझ्या शरिराचा भागच झाली आहेत. पूर्वी होणार्‍या यातना आता जाणवेनाशा झाल्या आहेत. मला वाटतं की माझं हे शेवटचंच लिखाण असेल.. कालांतराने हाताला योग्य वळण राहणार नाही. मग मी लिहिलं तरी ते वाचता येईलच याची शाश्वती नाही. हे लिखाण म्हणजे.. आता. स्वतःला रमवण्यासाठीच करतोय. आणि हे माझं लिखाण या जगातलं शेवटचंच लिखाण असेल.. कारण या जगातील सगळी लोकं आधीच मेलेली आहेत. मेलेली...? किंवा त्यापेक्षाही वाईट ... ?

मी ह्या हॉस्पिटलच्या खोलीत एकटाच बसलोय.. भिंतींना आतून मऊ असं पॅड लावलाय.. मी डोकं आपटून आत्महत्या करू नये म्हणून. "ते" मला खायला प्यायला आणून देतात. कधी कधी चांगल्या नर्सचं रूप घेऊन.. तर कधी म्हातार्‍या डॉक्टरचं रूप घेऊन. त्यांना कदाचीत माहितेय की डोळे गेल्या पासून माझे कान भलतेच तल्लख झालेत.. म्हणून मग ते कधी कधी दरवाज्याबाहेर उभं राहून इतर विषयांवर एकमेकांत बोलतात.. काही डॉक्टर आणि नर्स घरच्या खाजगी गप्पा सुद्धा मारत असतात. ..... .कोण्या एका नर्सला दिवस गेलेत... एका डॉक्टरच्या बायकोचं बाहेर कुठेतरी लफडं आहे.... सगळं खोटं ...खोटं.. मला फसवण्यासाठी..ह्या सगळ्या बोलण्याचा माझ्यावर काही परिणाम होत नाही..

पण मला जास्त त्रास होतो तो वेगळ्याच गोष्टीचा. ते अनिताचं रूप घेऊन येतात तेव्हा. हे रूप अगदी खरं वाटावं असंच आहे. आवाज अगदी अनिता सारखा... अगदी तिच्या आवडीचं सेंटही असतं.. स्पर्शसुद्धा तिच्यासारखाच जाणवतो. माझी खात्री पटावी म्हणून खोटे खोटे अश्रु डोळ्यात आणून ते बोलतात. जेव्हा त्यांनी मला इथे पहिल्यांदा आणलं तेव्हा ती म्हणत होती.. "संदिप! माझ्या राजा! अरे असं काय करतोस.. माझ्यावर विश्वास नाही का तुझा? माझं तुझ्यावर प्रेम आहे.... तू असं का वागलास? अजूनही मी तुझ्याशी लग्न करून तुझी काळजी घेईन! " .अजून बरंच काही.. . अभिनय चांगला करत होते...ती खरोखरच अनिता आहे हेच त्यांना माझ्या मनावर ठसवायचं होतं. त्यांनी माझी खात्री पटवायचा आटापिटा केला.

इथे आल्यानंतरही मला बर्‍याचदा वाटलं की मी तरी इतकं निष्ठुरपणे कशाला वागतोय? अनिता.. जिच्यावर माझंपण प्रेम आहे तिच्यावर विश्वास मी का ठेऊ नये? पण ते सगळं अगदी बिनचूक, चपखल बसणारं ...टू पर्फेक्ट.. म्हणूनच ते खरं नव्हतं.. प्रथम ते अनिताचं रूप घेउन दररोज येत होते. मग दोन तीन दिवसांनी एकदा.. मग काही आठवड्यांनी.. आणि मग शेवटी त्यांनी येणं बंद केलं. पण मला नाही वाटत "ते" इतक्या सहजा-सहजी हार मानतील. मला वाटतं त्यांचं हे वाट पहाणं सुद्धा त्यांचीच एक चाल आहे. मी जिवात जीव असे पर्यंत त्यांना शरण जाणार नाही. मला बाकिच्यांचं काय झालंय ते माहित नाही, पण माझी खात्री आहे की मी स्वतःहून त्यांना शरण आल्याशिवाय ते माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. जर असं असेल तर.. कदाचित.. मी त्यांच्या वाटेतला अडसरच असेन.. म्हणूनच ते माझ्या शरणागतीसाठी इतक्या युक्त्या काढत आहेत. कदाचीत अनिता अजूनही जिवंत असेल.. आणि कदाचीत माझ्यावर ताबा मिळवण्यासाठीम्हणून तिला जिवंत ठेवलं असेल... नाही.. मी कधीच हार मानणार नाही.. मरेपर्यंत नाही.

========================

डॉक्टरांनी संदिपने लिहिलेले पेपर हातात घेतले.. त्यावरची वेडीवाकडी अक्षरं जेमतेम वाचता येत होती...दिसत नसतानाही संदिपने इतकं लिहिलं होतं. डॉक्टरांच्या डोळयात अभिमानाची झाक दिसत होती. संदिपच्या कणखर वृत्तीचं.. ... एकाकीपणाने झुंज देण्याच्या विश्वासाचं त्यांना खूप कौतुकच करावंसं वाटत होतं..अर्थात त्यांना माहित होतं की त्याचं वेड आता आटोक्यात येणं शक्य नव्हतं

कोणत्याही शहाण्या माणसात इतका कणखरपणा.. स्वतःवर इतका विश्वास कुठला असायला ?

डॉक्टरांना आनंद झाला होता... त्यांना संदिपच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायची होती. जोराने ओरडून "त्यांना" सांगायचं होतं.. "तुम्ही हरलात!" ...

इतक्यात त्यांच्या डोक्यात बसवलेल्या चकतीमधून झिणझीण्या आल्या आणि एक तीव्र वेदना त्यांच्या चेहर्‍यावर उमटली.. एखाद्या कळसूत्री बाहूलीप्रमाणे पावले टाकत ते संदिपच्या खोलीत शिरले.. आणि त्याला हे सगळे त्याचा मनाचेच खेळ आहेत हे समजावून सांगू लागले.

(समाप्त)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

मस्तानी's picture

20 Jan 2011 - 3:18 am | मस्तानी

बाप रे ... इतकंच सुचतंय ...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

20 Jan 2011 - 3:24 am | निनाद मुक्काम प...

झिणझिण्या आल्या डोक्याला वाचून

सध्या फेस बुक वर शेतीसारखाच आता शहर वसवण्याचा खेळ जोम धरू पाहत आहे
.नवे आभासी शहर जिथे झोपडपट्या, गटारे , आदर्श मनोरे नाहीत
.ते शहर वसवण्यात तेथे स्वताची मालकी प्रस्थापित करण्यात
माझे अनेक अनामिक आभासी जगातील मित्र मग्न आहेत
.मी मात्र मिसळपाव हादण्यात मग्न आहे .

तिसर्‍या भागाच्या सुरुवातीला एकदा संदिप मानसोपचार घेत असावा अशी शंका आली होती.
हे जरा वेगळं कारण होतं हे वाचल्यावर स्प्ष्ट झालं.
कथा वेगळ्या विषयावरची आहे.
अश्या प्रकारच्या सध्याच्या मनोरुग्णांबद्दल वाचल्याचं थोडंफार आठवतय.

स्पंदना's picture

20 Jan 2011 - 11:30 am | स्पंदना

खुपच रोचक, गुंतवणारी कथा.

एकुण तोच खरा ठरला तर..

टुकुल's picture

20 Jan 2011 - 12:00 pm | टुकुल

जबरदस्त..
वाचुन डोक सुन्न झाल.
खरोखर एखाद्या मनोरुग्णाने लिहिल आहे अस वाटत (क्रु. ह. घ्या)

--टुकुल

खिळवुन टाकणारी कथा, पण लवकर संपवलीत म्हणुन अभिनंदन नाही तर हे मनाचे खेळ पार मणामणाचे झाले असते आणि माझ्या तर मन, मेंदु व आत्मा अशा सगळ्यांच्या पलिकडे गेले असते.

या अशा गोष्टि होउ नयेत म्हणुन या वर्षभरात प्रत्यक्ष कमीत कमी ५० मित्र मॅत्रिणि जोडायचं ठरवलं आहे आणि त्यासाठी बजेट पण वाढवुन घेतलं आहे घरुन.

हर्षद.

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jan 2011 - 2:07 pm | परिकथेतील राजकुमार

ज ह ब र्‍या द स्त कथा मराठेशेठ.
शेवट कळला कळला असे वाटत असतानाच एकदम धोबीपछाड.

पैसा's picture

20 Jan 2011 - 4:14 pm | पैसा

बापरे!

मराठे's picture

20 Jan 2011 - 6:29 pm | मराठे

धन्यवाद मित्रांनों.!!

खूप ज ब र द स्त कथा.
या आजाराला काय म्हणतात, हे कळू शकेल काय?

:(
तुम्ही कथा शेवट पर्यंत वाचली नाही का? अणि तरिही जर असा प्रश्न पडत असेल तर मंजे कथेचा "पंच" पोहोचवण्यात माझं लिखाण गंडलं असं वाटतं .. ! :(

प्राजु's picture

20 Jan 2011 - 8:51 pm | प्राजु

बापरे!! जबरदस्त आहे कथा.

गोष्ट आवडली! अजून लिहा!