मनाचे खेळ

मराठे's picture
मराठे in जनातलं, मनातलं
14 Jan 2011 - 7:53 pm

रविवार

मी आज हे कॉम्प्युटरवर टाईप न करता कागदावर का लिहितोय हे मला नक्की सांगता येणार नाही. गेल्या काही दिवसांपासून मला फार बेचैन वाटतंय. म्हणजे माझा कॉम्प्युटरवर विश्वास नाही असं नाही... पण.... मला वाटतं की इथे कागद पेन घेउन लिहिल्यामुळे माझे विचार मला थोडे नीट ऑर्गनाइझ करता येतील असं वाटतंय. इथे लिहिलेलं आपोपाप नाक्किच बदलणार नाही .. कागद नाही म्हटलं तरी कॉम्प्युटरपेक्षा थोडे टँजिबल .. नाही का? मनात झालेला हा विचारांचा गुंता सोडवायला थोडी मदत होईल का ते बघायचं आहे.

माझ्या ह्या छोट्याश्या खोलीत धड हातपाय मोकळे करायलापण जागा नाहीये. कदाचित हाच प्रॉब्लेम असेल. माझ्या सध्याच्या बजेटमधे मला यापेक्षा चांगली जागा ह्या एरियात मिळणारही नाही. ही खोली ग्राऊंडफ्लोअरवरच्या कोपर्‍यातली... एखाद्या बॅचलरची रूम जशी असते तशीच. सामान बरचसं अस्ताव्यस्त पडलेलं. एकच खिडकी. त्यातून धड उजेडही येत नाही. बिल्डींगच्या कुंपणाची उंच भिंत खिडकीच्या इतकी जवळ आहे की खिडकी असून नसल्यासारखीच आहे. खोलीत सतत अंधार. रात्र आणि दिवस एकमेकांत मिसळून जातात या खोलीत. मी गेले बरेच दिवस घरातून बाहेर पडलेलो नाही. म्हटलं की हे प्रॉजेक्ट पूर्ण करावं. म्हणून दिवस रात्र कॉम्प्युटरपुढेच बसून काम करत बसलोय. तासन् तास कॉम्प्युटरच्या स्क्रीन कडे बघून कोणालाही चमत्कारिक भास होउ शकतात... पण मला वाटतं की तेवढच कारण नाहिये.

हे असं काहितरी चमत्कारिक घडत असल्यासारखं वाटणं नक्की कधी सुरु झालं ते नीटसं आठवत नाहिये. खरं तर मला कोणी विचारलं की चमत्कारिक म्हणजे नक्की काय? तर मला तेसुद्धा धडपणे सांगता येणार नाही. मी कित्येक दिवसांत कोणाशी बोललोच नाहिये. हाच पहिला विचित्र विचार माझ्या मनात आला. मी नेहमी ज्या लोकांशी चॅटवर बोलतो ते सगळे ऑफलाईन किंवा "अवे" आहेत. माझ्या चॅट मेसेजेसला कोणाचंच उत्तर आलेलं नाही. सगळ्यात शेवटी आलेलं इ-मेल सुद्धा तीन दिवसापूर्वीचं आहे. ते सुद्धा स्पॅम. फेसबूकवर कोणतीच अपडेट नव्हती. कोणाला फोन करायचा म्हटला तर या खोलीत धड नेटवर्क मिळत नाही. ह्म्म... हेच करतो. बाहेर पडून कोणालातरी फोन करतो. कोणातरी माणसाचा आवाज तरी ऐकायला मिळेल.

नाही... बाहेर जाउन फोन करण्याचा बेत काही तडीस गेला नाही. भीतीचा भर ओसरल्यावर आता मला माझीच लाज वाटतेय. मी क्षुल्लक गोष्टींना उगाचच घाबरतोय असं वाटतंय.

बाहेर पडण्यापूर्वी एकदा आरशात डोकावलो. दोन दिवस दाढी न केल्यामुळे खुंट वाढले आहेत पण तरीही दाढी न करता आणि अंगावरचा शर्टही न बदलता पडलो खोलीच्या बाहेर आलो. म्हटलं फक्त एक कॉलच तर करायचा आहे. कोणाशी तरी बोलायला मिळालं पाहिजे होतं.

मी खोलीचं दार हळूच उघडलं.. आवाज न करता... उगाचच अनामिक धास्ती मनात वाटत होती... जणू सगळे कुठेतरी गायब झालेत आणि मी एकटाच मागे उरलोय... विचित्रच... दोन तीन दिवसात कोणाशी न बोलल्यामुळे असेल असं माझं मलाच समजावलं. खोलीबाहेरच्या अंधार्‍या पॅसेजमध्ये मी डोकाऊन पाहिलं. त्या पॅसेजच्या एका टोकाला असलेल्या एक्झॉस्ट फॅनचा आवाज त्या पॅसेजमध्ये भरून राहिला होता. दुसर्‍या टोकाला बिल्डिंगचं बंद लोखंडी गेट होतं.

मी आवाज न करता खोलीचं दार बंद करून गेटच्या दिशेने चालू लागलो. चालताना आवाज होणार नाही याची काळजी मी घेत होतो. असं मी का करत होतो ते मला माहित नाही. पण त्या पंख्याच्या आवाजाला धक्का न लावता चालण्यात मला थोडं समाधान मिळत होतं. मी गेटपर्यंत आलो आणि गेटच्या छोट्या खिडकीतून बाहेर डोकाऊन बघण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर कोणीतरी दिसेल ही माझी कल्पना साफ फोल ठरली. बाहेर बराच अंधार होता. रात्रीचे दोन्-अडिच वाजल्या सारखा... मी मोबाईल वर वेळ बघितली. .. रात्रीचे अकरा वाजले होते... खरं म्हणजे अकरा ही वेळ तशी मधलीच.. म्हटलं तर उशीर म्हटलं तर लवकर.. रस्त्यावर लांब एक सिग्नलचा पिवळा दिवा उघडबंद होत होता. शहरांतल्या लाईट आणि धुरामुळे थोडं उजळलेलं करड्या रंगाचं आकाश.. बस्स. उनाडपणे वाहणार्‍या वार्‍याच्या घुमण्याच्या आवाजाशिवाय कुठलाच आवाज येत नव्हता.

मी बाहेर न जाण्याचा निर्णय घेतला.

त्याऐवजी मी मोबाईल फोन खिडकीच्या जवळ नेला आणि नेटवर्क मिळतंय का ते पाहायला लागलो. नेटवर्क सिग्नल थोडेफार मिळत होते. कोणाचातरी आवाज ऐकायला मिळणार म्हणून मी थोडं सुखावल्याचं मला आठवतंय. काही कारण नसताना मला वाटण्यार्‍या भीतीचं मलाच हसू आलं. मी पटकन स्पीड डायलवर ठेवलेल्या अनिताचा नंबर लावला. फोनची रिंग एकदा झाली आणि फोन कट झाला. .. की केला??..थोडा वेळ काहिच झालं नाही. मी जवळ जवळ पाच मिनीटं फोन लावायचा प्रयत्न केला. पण नंतर तो नाद सोडून दिला. नेटवर्क पुन्हा चेक केलं तर सिग्नल मिळत होता. मी बघत असतानाच माझाच फोन वाजला. त्या शांततेत फोनचा आवाज ऐकून मी दचकलोच. मी फोन कानाला लावला.

"हॅलो ?" मी हळूच अंदाज घेत म्हणालो.

"अं... कोण बोलतंय?" पलिकडून कोणीतरी पुरुषाचा आवाज आला. कोणाचा ते काही मला ओळखू येईना.

"संदिप" मी गोंधळून उत्तर दिलं.

"ओह सॉरी... राँग नंबर" असं म्हणून त्याने फोन ठेऊन दिला.

मी फोन बंद केला. ह्यावेळी मला आलेल्या राँगनंबरचं पण मला आश्चर्य वाटलं. मी फोनमध्ये कॉल-लीस्ट चेक केली. अन्-नोन नंबर अशी नोंद होती. मी त्याचा विचार करत असतानाच फोन पुन्हा वाजला. ह्या वेळेला मी प्रथम नंबर बघितला. पुन्हा अन्-नोन नंबर... पण वेगळा. मी फोन रिसिव्ह करून कानाला लावला पण ह्या वेळेला मी काहीच बोललो नाही. पलिकडून कुठलाच आवाज येत नव्हता... पण कोणीतरी आहे हे मात्र जाणवत होतं. थोड्या वेळाने माझ्या ओळखीचा आवाज आला.

"संदिप?" एक शब्द...पण आवाज अनिताचा होता हे ओळखायला पुरेसा होता. मी समाधानाचा सुस्कारा टाकला.

"हाय! तू आहेस होय." मी म्हणालो.

"मी नाहीतर कोण असणार?" ती नेहमीच्या अवखळ स्वरात म्हणाली. "ओह बरोबर.. हा नंबर ना... मी इथे पार्टीला आलेय वसंत्-नगर मधे. आणि तू फोन केलास तेव्हाच माझ्या फोनची बॅटरी डाउन झाली. म्हणून दुसर्‍या फोनवरून करतेय."

"ओह ओके"

"तू कुठे आहेस?"

मी माझ्या आजूबाजूच्या भकास अंधार्‍या भिंतींकडे पाहात म्हटलं. "घरीच, मी सहजच फोन केलेला. कंटाळा आलेला म्हणून. मला वाटलं नव्हतं इतका उशीर झाला असेल."

"मग तू इथे ये ना!"

"नाही.. नको.... आत्ता रात्रीचं बाहेर पडून एकटं तिथपर्यंत यायचा कंटाळा आलाय." मी हळूच गेटच्या खिडकीतून बाहेर पडत म्हटलं. नाही म्हटलं तरी बाहेरचा त्या धूसर अंधाराची मला थोडी भीतीच वाटत होती. "मला वाटतं मी परत माझं प्रॉजेक्ट्चं काम सुरू करतो.. किंवा थोडा वेळ डुलकी काढीन."

"काहीतरीच काय! मी तुला घ्यायला येऊ का? तुझं घर वसंत्-नगर पासून जवळच आहे ना?" तिने विचारलं... परत माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

"तू ड्रिंक्स घेतली आहेस का?" मी आवाज शक्य तितका नॉर्मल ठेऊन तिला विचारलं "तू कितीतरी वेळा माझ्या घरी आलेली आहेस ना?"

"अरे हो रे!" मधेच ती म्हणाली... थोडीशी वैतागल्यासारखं ती म्हणाली. "म्हणजे मला वाटतं मी चालत तर तिथपर्यंत येउ शकत नाही.. बरोबर?" तिच्या आवाजावरून ती कसलातरी अंदाज घेतेय असं मला जाणवलं.

"येऊ शकतेस.. फक्त जवळ जवळ एक तास चालायला लागेल." मी जरा हसतच सांगितलं.

"ह्म्म. ओके, चल मला जायला हवं.. होपफुली तुझं काम लवकर संपेल मग आपण धमाल करू.. बाय" ती म्हणाली.. आणि तिनं फोन ठेवला.

मी फोन बंद केला. पॅसेजमधल्या पंख्याचा आवाज पुन्हा सगळीकडे भरून आला. दोन वेगवेगळे कॉल आणि बाहेरचा भीषण अंधार... माझ्या डोक्यावर परिणाम होतोय का? कदाचीत खूप गूढकथा वाचल्याचा हा परिणाम होता. मला प्रत्येक गोष्ट शंकास्पद आणि चमत्कारिक वाटत होती. कुठलीतरी गूढ अज्ञात शक्ती माझ्यावर पाळत ठेउन आहे. आणि मला किंवा माझ्यासारख्या इतर एकट्या लोकांना भ्रमिष्टपणाच्या दरीत ढकलून देणार आहे... अशी कल्पना मला सुचली. मला माहित आहे की माझी ही भीती थोडी हास्यास्पदच होती, अस्वाभाविक होती. पण तरीही त्या काळोखात उभं राहायची मला भीती वाटायला लागली. पट्पट चालत मी माझ्या रूमपर्यंत आलो. दार लाऊन घेतलं. घरात आल्यानंतर .. त्या बंद खोलीत मला जरा सुरक्षित वाटलं. अर्थात ही डायरी लिहिल्यामुळे सुद्धा थोडी भीती कमी व्हायला, सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत हे स्वत:ला पटवायला मदत होते. अर्धवट विचार आणि शंका दूर होतात आणि फक्त कोरडे स्पष्ट फॅक्ट्स तेवढे उरतात. सगळं ठिक आहे.. नेहमी सारखंच चाललंय.... पण...

पण..... अनिताबरोबरचं संभाषण मी परत आठवू लागलो. त्यात कसलीतरी गोम होती. कदाचीत तीनं ड्रिंक्स घेतली असल्यामुळे असेल.. पण तरीही तिचा स्वर मला जरा वेगळाच वाटत होता. ... हा... अर्थात... आत्तापर्यंत माझ्या हे लक्षातच आलं नाही.. लिहिण्यामुळे नक्कीच मदत होते. ती कुठल्याश्या पार्टीला गेली होती ना. मग फोनवर कुठलाच आवाज येत कसा नव्हता? जरी ती फोन करण्यासाठी म्हणून बाहेर गेली असेल... नाही तसंही नसणार.. कारण असं जरी समजलं तरी मग फोनवर बॅकग्राउंडला वार्‍याचा किंवा कसला तरी आवाज यायला हवा होताच ना. मला तरी असला कुठला आवाज ऐकू आला नाही. काहीतरी गडबड नक्किच आहे.

(क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

रेवती's picture

14 Jan 2011 - 8:13 pm | रेवती

पुढची गोष्ट वाचण्यास उत्सुक.
सुरुवात चांगली झालीये.

५० फक्त's picture

14 Jan 2011 - 10:24 pm | ५० फक्त

छान सुरुवात, गुढता खुप छान मेंटेन झाली आहे.

येउ द्या.

हर्षद.

रामपुरी's picture

14 Jan 2011 - 11:36 pm | रामपुरी

फक्त पहिला परिच्छेद वाचू शकलो. मराठी कथा आहे की इंग्रजी?

अनिता अस्तीत्वातच नसावी असे एकूणच वाटत आहे.

मस्त! चांगली झालीये सुरूवात! पुढे लिहा लवकर.

मराठे साहेब फारच मस्त लिहीलंय..
मला वाटतं ही कथा किंवा गूढकथा नसावी..
सध्या तरी टू दि पॉईंट वाटली.. रात्रीच्या बारा वाजता झोपेतून उठून वाचली...म्हणून आवडली..
पुढे मात्र हिंदी सिनेमासारखे फाटे फोडू नका प्लीज..

मदनबाण's picture

15 Jan 2011 - 7:05 am | मदनबाण

वाचतोय...

गवि's picture

15 Jan 2011 - 8:58 am | गवि

waiting eagerly... Great going...

sneharani's picture

15 Jan 2011 - 10:16 am | sneharani

मस्त झालीये सुरवात!
लिहा लवकर!

नन्दादीप's picture

15 Jan 2011 - 10:56 am | नन्दादीप

मस्त झालीये सुरवात!

परिकथेतील राजकुमार's picture

15 Jan 2011 - 12:36 pm | परिकथेतील राजकुमार

वाह !
बर्‍याच दिवसांनी शब्दशः गूढकथा वाचायला मिळत आहे. छान रंगवत आहात आणि मुख्य म्हणजे पुढचा अंदाज येत नाहिये.

पु.भा.प्र.

मितान's picture

15 Jan 2011 - 12:38 pm | मितान

+१

अगदी हेच म्हणतेय...

येऊद्या पुढचा भाग लवकर

मस्त सुरवात,
कार्तिक कौलींग कार्तिक ची आठवण झाली.

स्वाती२'s picture

15 Jan 2011 - 5:56 pm | स्वाती२

पुढे?

स्वाती२'s picture

15 Jan 2011 - 5:56 pm | स्वाती२

पुढे?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Jan 2011 - 8:02 pm | निनाद मुक्काम प...

वाट पाहतोय
पुढच्या भागाची