तडपत रैना दिन.. (येथे ऐका)
पं अजय चक्रवर्ती. पतियाळा गायकीचे एक दिग्गज कलाकार. 'दादाजी' बडे गुलामअलींचा वारसा समर्थपणे पुढे चालवणारे..!
सदरचा दुवा त्यांच्या एका जमलेल्या मैफलीचा आहे. राग सुरू आहे मारुबिहाग..
राग मारुबिहाग. आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातला एक वेगळीच गोडी, एक वेगळीच खुमारी असलेला शृंगाररसप्रधान राग. परंतु हा शृंगार आमच्या नंद, हमीर सारखा कॉलेज गोईंग नाही बरं का मंडळी. त्या मानाने हा जरा मॅच्युअर शृंगार आहे. लग्नानंतरच्या २-५ वर्षातला, थोडा अधिक मुरलेला समजूतदार शृंगार..! :)
"तडपत रेना दिन.."
मंडळी, ही मारुबिहागातली एक पारंपारिक बंदिश. अजयजींनी काय जमून गायली आहे ते खरंच ऐकण्यासारखं आहे.
काय अन् किती कौतुक करावं आमच्या अजयजींचं..! अत्यंत सुरीली, मस्तीभरी, जवारीदार, लयदार आणि चैनदार आलापी अन् गायकी..! उस्ताद बडे गुलाम म्हणायचे, "गानेमे चैन होना चाहिये.!"
अजयजी अगदी त्या बरहुकूम गाणं मांडतात..!
मध्यलय त्रितालातला हा छोटा ख्याल जो जमलाय त्याला तोड नाही. 'तडपत..'ची सम कशी सहज येते आहे पाहा.. अक्षरश: भन्नाट भट्टी जमली आहे..! काय बोलावं..?!
"पिया बिन मोरा जिया तरसे.."
मंडळी, ऐकलीत ही ओळ..? स्वत: बंदिशीची मजा घेत गाणं म्हणजे काय, ते इथं कळतं..!
लहानसहान हरकती, मुरक्या, सहजरित्या सम गाठणार्या छोटेखानी ताना, स्वच्छा आकाराच्या ताना, दुहाया, तिहाया..! सरगमवरची नुसती हुकुमत नव्हे, तर बादशाही..!
काय नाही अजयजींच्या गाण्यात? अत्यंत दुर्लभ अश्या गानविद्येवर या माणसानं किती प्रभूत्व मिळावावं..?
मंडळी, माझं भाग्य की मला या माणसाकडनं खूप काही ऐकायला मिळालं. तेही अगदी प्रेमानं ऐकवलं त्यांनी..! त्यांचा स्नेह मला लाभला हे माझं भाग्य..!
हा आम्हा दोघांचा एक फोटू..! त्या मैफलीआधी अजयजींनी मला स्वत:च्या हातांनी ब्लॅक लेबल पाजली होती त्यानंतरचा हा फोटू. त्यानंतर मी त्यांना 'याद पिया की आये.." या ठुमरीची खास फर्माईश केली होती आणि त्यांनी ती पूर्ण केली होती..! :)
केवळ भन्नाट..! :)
अजयजी मला थट्टेने म्हणाले होते, "आप तो अन्नाजी के शागीर्द है. आपको तो सुनानाही पडेगा..! " :)
जळ्ळा मी कसला अण्णांचा शागीर्द? पुण्याला अण्णांना हे कळ्लं असतं तर त्यांनी धरून चोपला असता मला..! :)
असो, खूप काही ऐकलं, खूप आठवणी आहेत..!
अजून काय लिहू?
आपला,
(पतियाळाप्रेमी) तात्या.
प्रतिक्रिया
11 Jan 2011 - 10:29 pm | डावखुरा
तात्या असेच मुड मधी राहोत आणि आम्हाला रोज तात्यांनी केलेल्या रसग्रहाणाचा फडशा पाडायला मिळो..
जियो तात्या...
12 Jan 2011 - 8:29 am | यशोधरा
छान.
12 Jan 2011 - 1:20 pm | अवलिया
मस्त !!
12 Jan 2011 - 10:16 pm | वाटाड्या...
अजयजींच आजच गुनकाली ऐकला....आवाज छानच आहे....खानदानी पेशकश...
अजयजींची मुलगी कौशिकी पण काय बहारदार गायन करते...
(चक्र(म)वर्ती ) - वाटाड्या...
13 Jan 2011 - 11:47 am | विसोबा खेचर
असहमत..
12 Jan 2011 - 10:17 pm | कौशी
तात्या
असेच छान- छान वाचायला आणि ऐकायला
आवडेल....
13 Jan 2011 - 12:12 pm | योगप्रभू
<<राग मारुबिहाग. आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातला एक वेगळीच गोडी, एक वेगळीच खुमारी असलेला शृंगाररसप्रधान राग. परंतु हा शृंगार आमच्या नंद, हमीर सारखा कॉलेज गोईंग नाही बरं का मंडळी. त्या मानाने हा जरा मॅच्युअर शृंगार आहे. लग्नानंतरच्या २-५ वर्षातला, थोडा अधिक मुरलेला समजूतदार शृंगार..! >>
तात्या एकदम चावट्ट आहे. पण खरं बोलतोय. वरील निरीक्षणाशी सहमत.
मारुबिहागच्या शृंगाराचा घटकाभर अंग पुलकित करुन टाकणारा आनंद अनुभवायचा असेल तर 'सत्यं शिवं सुंदरं' मधले 'भोर भये पनघट पें, मोह नटखट श्याम सताये' हे गाणे ऐका. श्रवणीय आणि प्रेक्षणीय.
13 Jan 2011 - 5:41 pm | विजुभाऊ
तात्या एकदा कधीतरी केदार वर आणि शिवरंजनीवर लिहा ना.
14 Jan 2011 - 11:09 am | विसोबा खेचर
सर्व प्रतिसादी रसिकवरांचा मी ऋणी आहे..
वाचनमात्रांचेही औपचारीक आभार मानतो..
तात्या.