भांग

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
1 Jan 2011 - 3:51 pm

''बगड बबं बबं बम लहरी ऽऽ'' कैलाश खेरचा मनमोकळा स्वर कँटीनच्या म्युझिक सिस्टीममधून मदमस्त घुमत होता. चहाच्या पेल्यांच्या तळव्यांनी चिकट झालेल्या टेबलावर ठेवलेल्या काचेच्या पेल्यातील चहामृत प्राशन करत सर्व मित्रमंडळी एकेक लंब्या चवड्या बाता मारण्यात गर्क होती.

''गेल्या शिवरात्रीला आम्ही मित्रांनी भांग-पार्टी केली. काय सॉलिड मजा आली यार.... मी म्हणे व्हरांड्याच्या खांबाला धरून शोलेचे डायलॉग्ज म्हणत बसलो होतो.... मला तर काही आठवत पण नाही यार... हॅ हॅ हॅ!'' आमच्या ग्रुपमधील एकाचा नुकताच झालेला दोस्त सांगत होता. बाकीचे सर्व नग त्याचं बोलणं भक्तिभावाने ऐकत होते. मला नकळत हसू फुटले. भांगेच्या नावासरशी जुन्या धूळ साठलेल्या काही आठवणी जाग्या झाल्या...

भांगेशी माझा संबंध तसा प्रत्यक्षात येईल असे कधी वाटले नव्हते. शंभुनाथ महादेवाचे ते एक आवडते पेय आहे, उत्तरेकडे महादेवाचा प्रसाद समजून महाशिवरात्रीला भांगेचे सेवन करतात इतपत माहिती होती म्हणा! आणि हो, राजेश खन्ना व मुमताजला भांग प्यायल्यावर ''जय जय शिव शंकर'' गात थिरकताना पाहून हे नक्कीच काहीतरी ढँटढँ प्रकरण आहे हा माझा समज पक्का झाला होता. सदाशिव पेठेच्या वरणभाताच्या वट्ट ब्राह्मणी साच्यात लहानाचे मोठे झाल्यावर भांग हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर पाल पडल्यागत दचकणारी व किंचाळणारी मंडळी पाहिली होती. अशीच मंडळी भोवताली असताना मला ह्या आयुष्यात तरी ''भांग'' नामक वनस्पतीचे किंवा वनस्पती-निर्मित द्रव्याचे सेवन तर सोडाच, दर्शन तरी होईल की नाही ही शंकाच होती. कुतूहल होते आणि भीतीही! पण एका प्रसंगाने मला भांगेच्या करामतीची नुसतीच ओळखच नव्हे तर पुरती ओळख-परेड करून दिली. ते चोवीस तास कायमचे हरवले ते हरवलेच!!

एक बोचर्‍या थंडीने गारठलेली दुपार. लग्नाच्या पंगतीसाठी गारढोण फरशांवर अंथरलेल्या सतरंज्यांच्या पट्टीवर बसून मी आमच्या पंगतीकडे मिठाईची ताटे कधी वळताहेत ह्याची चातकाच्या आतुरतेने वाट बघत होते. सकाळपासून गुलगुलीत बाळसेदार पदार्थांचे तबियतीने सेवन चालू होते तरीही जेवायच्या वेळेपर्यंत भुकेने जीव गोळा व्हावा इतकी थंडी होती बाहेर! पंगतीत पाठीला पाठ लावून सुटाबुटातील, उंची शेरवानी-सफारीतील पुरुष, नखशिखान्त नटलेल्या काही स्त्रिया आणि बरीच छोटी छोटी मुले आमच्यासोबत जेवायला होती. एकमेकांना आग्रह करकरून भोजनाचा आस्वाद घेणे चालू होते.

समोरच्या पत्रावळी-द्रोणांत तर्‍हेतर्‍हेचे फरसाण, नमकीन, ढोकळा, कडक पुर्‍या, रस्सा-भाजी, कढी, पापड वगैरे पदार्थ दुर्लक्षित पडून होते. मला प्रतीक्षा होती ती त्या जेवणाचा मानबिंदू ठरलेल्या, तोंडात ठेवता क्षणी अलगद विरघळणार्‍या, पांढर्‍या शुभ्र बर्फाप्रमाणे दिसणार्‍या, अतिशय रुचकर अशा खोबर्‍याच्या मलईयुक्त बर्फीची! नेमका तोच पदार्थ सोडून बाकीचे सर्व पदार्थ समोर हजेरी लावत होते. तेवढ्यात अंगावरच्या सुवर्णालंकारांच्या आणि हातभर जरतारी पल्लूच्या ओझ्याने वाकलेली लग्नघरातील थोरली सून तिच्या नणंदेसह हातात पुर्‍यांची टोकरी घेऊन आमच्यापाशी येऊन पत्रावळीत पुरी वाढू लागली.
''भाभीजी, मुझे वह सफेदवाली मिठाई चाहिए | '' मी निर्लज्जपणे माझी मागणी नोंदविली.
तत्परतेने एक वाढपी पंगतीतून वाट काढत आमच्यापाशी आला आणि हातातील ताटातून ती मिठाई मला वाढू लागला. मी मागितल्यावर शेजारी-पाजारी बसलेल्या अनेकांनीही ती मिठाई हौसेने वाढून घेतली. बघता बघता माझ्या समोरच वाढप्याच्या हातातील मिठाईचे ताट रिकामे झाले. काही म्हणा, ही ''सफेदवाली'' मिठाई लग्नाच्या पंगतीत भलतीच हिट झाली होती!

आमचे मातृदैवत माझ्या डाव्या बाजूला बसले होते. मला नजरेने दाबत होते. तरीही नि:संकोचपणे मी त्या बर्फीचे अजून काही तुकडे पुन्हा मागणी करून वाढून घेतले. शिवाय वर, ''वाह! क्या मिठाई बनी है |'' अशी दाद द्यायला विसरले नाही! पंगत चालू राहिली. माझा त्या सफेद मिठाईचा मनसोक्त समाचार घेणेही चालूच राहिले.

मध्य प्रदेशात महाराष्ट्राच्या सीमेच्या अगदी नजीक, तापी नदीच्या काठावर वसलेल्या बर्‍हाणपुरातील हा ऐन थंडीचा मोसम. विलक्षण धुके, पाऊस, गारपीट असे टिपीकल ''ओलें''वाले वातावरण. दिवसेंदिवस सूर्याचे दर्शन दुर्मिळ. गारठलेले शहर व शहरवासी. धुक्याच्या आच्छादनात गुरफटलेला आसमंत. आणि ज्या हवेत सर्वसामान्य बर्‍हाणपुरवासिय बाहेरही पडणार नाहीत अशा हवेत भल्या सकाळी साडेसहाचा लग्नाचा मुहूर्त ठेवलेला!

त्या पहाटे अतिशय कष्टांनी, प्रयत्नपूर्वक ऊबदार रजयांच्या बाहेर पडून पुण्याहून खास ह्या लग्नासाठी आलेले आमचे चौकोनी कुटुंब मोठ्या मुश्किलीने सजून धजून तयार तर झाले... पण त्या गारठलेल्या हवेत लॉजच्या बाहेर पाऊलही टाकवत नव्हते. बरं, मुहूर्त गाठणे तर महत्त्वाचे होते. अखेर वडिलांच्या एका ज्येष्ठ स्नेह्यांच्या मुलाचे लग्न होते ते! मग काय!! भल्या सकाळी लेफ्ट राईट करत आमची परेड निघाली रस्त्याने वाजत-गाजत! ओस पडलेल्या रस्त्यावर आमच्या पावलांचा आवाज उगाच मोठा वाटत होता. एरवी नाक्या-नाक्यावर उभे असणारे टांगेवालेही धुकं-थंडीने गारठून गायब झाले होते.

''हे काय... आत्ता येईल कार्यालय!'' वडिलांनी धूर्त राजकारण्याच्या आवेशात दिलेल्या ह्या आश्वासनावर विसंबून मी व माझी बहीण एकमेकींना ढकलत ढकलत मार्गक्रमणा करत होतो. अगदी दोन मिनिटांचा रस्ता दहा-पंधरा मिनिटे चालले तरी कसा संपत नाहीए ह्यावर विचारमंथन करण्याएवढी अवस्थाही नव्हती आमची! थंडीने बधीर झालेली शरीरे आणि मेंदू तर अगोदरच थंडीने गोठलेला व अर्धनिद्रेत!

आपण लग्नस्थळी जाऊ तेव्हा आपणच तिथे पहिले पोहोचणारे निमंत्रित असू हा आमचा भ्रम कार्यालयाच्या दारातच गळून पडला. आमच्या अगोदर तिथे दोनशे-अडीचशे डोकी रंगीबेरंगी फेटे, शेरवान्या, चमचमणार्‍या साड्या- अलंकारांच्या व उंची पर्फ्युम्सच्या दरवळात वावरत होती. आत शिरल्यावर सुरुवातीचे नमस्कार - चमत्कार, आगत - स्वागत झाले. मग मात्र जवळपासच्या दोन-तीन खुर्च्यांवर टेकून व स्वतःला शालीत गुरफटून मी व भगिनीने तत्परतेने दोन-तीन डुलक्या काढल्या. लग्न आर्य समाज पद्धतीने लावले जात होते, ते आमच्या पथ्यावरच पडले. कारण ह्या लग्नात फार बजबजाट - गोंधळ नसतो. लहान मुलांचा, कोर्‍या नव्या कपड्यांचा आणि माफक कुजबुजीचा आवाज सोडला तर शांत वातावरण. त्यात फक्त पुरोहितांचा काय तो गंभीर स्वर. माझे डोळे जे मिटले ते साडेसाताला मातेने बाहेर वाजत असलेल्या बँडच्या पार्श्वसंगीताच्या लयीत मला गदगदा हालवून ''लग्न लागलं आहे, नाश्त्याला गरम गरम इम्रती, बटाटेवडे आणि पहुवा (पोहे) आहेत. खाणारेस का?'' असे म्हटल्यावरच टक्कन् उघडले.

माझ्या वयाची मुले-मुली तिथे जवळपास नव्हतीच. होती ती माझ्यापेक्षा लहान बच्चे कंपनी. मग त्यांच्याबरोबर जरा दंगा, खेळ, गप्पा यांत थोडा वेळ गेला. प्रीतीभोज सुरु होण्यास अजून बराच अवधी होता. अचानक आमच्या पिताश्रींना आम्हाला बर्‍हाणपुरातील काही प्रेक्षणीय स्थळे दाखवण्याचे सुचले! आमची अकरा नंबरची बस पुन्हा एकदा मजल दरमजल करत निघाली. रस्त्यांवर अगदीच शुकशुकाट होता. बुरहानपुरचा किल्ला आणि तेथील राजेशाही हमामखाना ओस पडले होते. आधीच सुसाट सुटलेले वारे त्या भग्नावशेषांना, खंडहरांना अजूनच गूढ, गारठवणारी डूब देत होते.... तेथील दु:खी, वेदनामय इतिहासाची झाक सार्‍या वातावरणात भरून राहिली होती. तब्बल दोन - अडीच तास पायपीट केल्यावर पिताश्रींना आम्हा श्रमल्या-थकल्या व भुकाळलेल्या जीवांची दया आली. कार्यालयात परत येईस्तोवर भोजनाची वेळ झाली होती. मला तर भीम-बकासुराच्या गोष्टीतील बकासुराप्रमाणे भूक लागली होती. मग काय, आने दो और मिठाई!!!

भरपेट जेवण झाल्यावर मी तिथेच पंगतीत ''आता मी अजिबात चालणार नाहीए,'' हे जाहीर करून टाकले. मोठ्यांनाही जेवण अंमळ जडच झाले असावे. कारण कधी नव्हे तो हेडक्वार्टर्सकडून माझी टांगासवारीची मागणी संमत झाली आणि आमची उचलबांगडी त्वरित कार्यालयाच्या दाराशी उभ्या असलेल्या एका टांग्यात झाली. परतीचा प्रवास अजिबात न आठवण्याइतपत आम्ही झोपाळलो होतो. लॉजवर आल्यावर जेमतेम आवरले आणि गुबगुबीत गाद्यांवर, रजयांमध्ये गुरफटून घेऊन जे देह लोटून दिले ते......

...... दुपारची चार-साडेचाराची वेळ.

दारावर जोरजोरात धडका का बसत आहेत म्हणून मी डोळे चोळत अंथरुणातून उठून बसले. खोलीचे पडदे ओढलेले, अंधार भरून राहिलेला.... शेजारी बहीण व आई-बाबा अजून निद्राधीनच होते. बाबांना हालवले पण ते काहीतरी पुटपुटत पुन्हा घोरासुराला शरण गेले. मग आईला हालवले. दोघींनी मिळून बाबांना उठविले.
''अहोऽ, बघा बरं कोण दार बडवतंय ते.... कधीचे वाजवताहेत दार...'' पिताश्रींना आम्ही दरवाजाच्या दिशेने जवळपास ढकललेच!
त्यांनी जांभई देत, डोळे चोळत दार उघडले. समोर लॉजचा मॅनेजर, एक सुटाबुटातील उंचेपुरे गृहस्थ व त्यांच्या सोबत केसांचा बॉब असलेली एक स्त्री उभे होते. मॅनेजरने हसून मान डोलवली आणि तो चालता झाला. समोरील दांपत्य मात्र अवघडले होते... ''ओह्ह.... आप लोग आराम कर रहे थे.... बहुत देर से हमने यहां का फोन ट्राई किया, कोई जवाब नही मिला... तो फिर आप को लेने हम खुद आये....''

एव्हाना वडिलांची झोप बर्‍यापैकी हटली होती. कारण समोरचे गृहस्थ म्हणजे तेथील नगर निगमचे उच्चपदस्थ अधिकारी श्रीयुत देवडा होते व सोबत असलेल्या बाई त्यांच्या अर्धांगिनी होत्या.
आम्ही लगबगीने उठून आमच्या खोलीत त्यांचे स्वागत केले. जमेल तसा पसारा आवरला व दडपला. दोघेही बिचारे आमच्या झोपेत व्यत्यय आणल्याने जरा संकोचले होते.
वडिलांना तेवढ्यात सुचले, ''चलिए, हम लोग गरमागरम चाय पीते है.... '' लॉजच्या रूम सर्व्हिसने लगेच आलं, वेलदोडा वगैरे घातलेला मसाला चहा पुरविला. तो वाफाळता चहा पीत असताना आमचे गोठलेले मेंदू हळूहळू वितळू लागले होते.

''हमने आप सब की कल शाम बहुत राह देखी डिनर के लिए...'' मिसेस देवडा सांगत होत्या, ''लेकिन आप लोग तो आये नही, ना कुछ खबर.... तो मैने देवडा साब को बोला भी.... आप ने जरूर कुलकर्णी साब को डिनर के लिए ठीक से इन्व्हाईट नही किया होगा.... शायद बुरा मान गए वह....''

आमच्या पिताश्रींचा चेहरा एव्हाना भांबावल्यासारखा झालेला... त्यांनी श्रीयुत देवडांकडे वळून पृच्छा केली, '' देवडा साब, अगर आप बूरा न माने तो एक बात पूंछू?'' त्यांच्या रुकारासरशी वडिलांनी बिचकतच विचारले, ''आप ने तो आज के दिन खाने पे बुलाया था नं? मैने आप को बोला भी था शायद की आज दोपहर शादी का इतना हेवी खाना खाने के बाद हम लोग डिनर कर पाएंगे या नही, पता नही...''

आता देवडासाहेबही बुचकळ्यांत पडलेले दिसू लागले. ''माफ कीजिये जनाब, लेकिन शादी तो कल थी...''

''आँ??!!!'' आमच्या चौघांच्या चेहर्‍यावर एक निर्बुद्ध प्रश्नचिह्न.

''क्या मजाक कर रहे है देवडाजी.... अभी तो दोपहर को आए हम शादी का खाना खा के....'' आई न राहवून उत्तरली.

जरा वेळ हे वाग्युद्ध असेच चालू होते. शेवटी देवडांनी लॉजच्या मॅनेजरला बोलावले.

''भाईसाब, इनको बताइए जरा आज कौन सी तारीख है....''

मॅनेजराने सांगितलेली तारीख ऐकल्यावर आमची पार दाणादाण उडाली! ह्याचा अर्थ काल दुपारी दीड - दोनच्या दरम्यान परत आल्यावर आम्ही जे झोपलो ते थेट आजच्या तारखेला दुपारी चार वाजता उठलो??? कसं शक्य आहे हे? थंडी असली, जास्त जेवण झालं म्हणून काय झालं? इतकी गाढ कुंभकर्णाची झोप कशी काय लागली? मधल्या काळात वाजलेला फोन, ठोठावले गेलेले दार.... काही म्हणजे काहीही ऐकू न येण्याइतपत??

त्या सायंकाळी देवडा पती-पत्नींच्या आग्रहाखातर आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या खास मध्य प्रदेशी शैलीच्या आदरातिथ्याचा आनंद घेतला. पण डोके अजून जडावलेलेच होते. आपले चोवीस तास असे झोपेत कसे काय गेले ह्याचे समाधानकारक उत्तर मिळत नव्हते.

एवढी काळझोप कशी काय लागली?

डोक्याचा मद्दडपणा, अंगात जाणवणारा जडशीळपणा अजून का जात नाहीए?

दुसरे दिवशी सकाळी आम्ही राहत असलेल्या लॉजच्या खालील प्रल्हाद भोजनालयातील प्रसंग. नाश्त्याचे वेळी परवाच्या लग्नाला आलेले आणि वडिलांच्या ओळखीचे एक सद्गृहस्थ भेटले. आम्हाला पाहिल्यावर आपल्या पांढर्‍या झुबकेदार मिशांतून मिश्किलपणे हसत ते माझ्या वडिलांना विचारू लागले...'' क्या कुलकर्णी साब.... हमने तो सुना की शादी की मिठाई बहुत पसंद आयी आपको? सुना है की गहरी नींदमें आप देवडाजी के यहां डिनर करना भी भूल गए.... हा हा हा.... ''
एव्हाना वडिलांना काहीतरी काळेंबेरे असल्याचा दाट संशय येऊ लागला होता.
त्यांनी भुवया उंचावून, डोळे बारीक करून ''आपण त्या गावचेच नाही'' असा चेहरा केला. पण समोरचे सद्गृहस्थ त्यांच्यापेक्षा वीस-पंचवीस पावसाळे जास्त पाहिलेले असल्यामुळे मागे हटणार्‍यातील नव्हते.
''कमाल है भई, आप को किसी ने बताया नही....'' समोरच्या वाफाळत्या मलईदार मसाला दुधाचा एक घुटका घेऊन त्या सद्गृहस्थांनी आपले वाक्य तसेच हवेत तरंगत सोडून दिले.
एव्हाना वडिलांच्या चेहर्‍यावर तेच ते चिरपरिचित गोंधळलेले भाव येऊ लागले होते.
''क्या... क्या बात बतानी चाहिए थी?'' वडिलांचा पेचात पडलेला स्वर.
''अरे जनाब, जैसी यहां की शादी खास होती है वैसे ही शादी की मिठाई भी खास होती है.....''
''तो?'' वडिलांचा प्रश्न.
''अरे भई, अब भी समझे नहीं?'' वडिलांची मुंडी नकारार्थी हालताना पाहून त्यांनी डोळे मिचकावून वडिलांना जवळ यायची खूण केली.
''क्या?''
''अरे भाया, समझा करो.... यह मिठाई ऐसी वैसी नही होती.... हमारे यहां उसमें भंग मिलाते है शादी ब्याह के वक्त! अब यह मत कहना कि आप भंग वगैरा जानते नही.... वही जय भोलेनाथ वाली.... तो शादीकी भंगवाली मिठाई खाके बहुत मस्त हो जाते है लोग... महा स्वादिष्ट जो होती है ऐसी मिठाई... जितनी खाओ उतनी कम लगती है.... भंग का असर जो होता है...''

एव्हाना त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असलेल्या मातृदैवताचा चेहरा प्रेक्षणीय झाला होता!

''काऽऽय? भांग?? अहो, ते भांगच म्हणताहेत ना? म्हणजे त्या परवाच्या लग्नाच्या मिठाईत भांग होती? आपण सगळ्यांनी भांग घातलेली मिठाई खाल्ली??'' मातृदैवत वडिलांची बाही खेचून फुसफुसू लागले. वडिलांच्या चेहर्‍यावर मात्र गेले दोन दिवस तरळत असलेले प्रश्नचिन्ह निवळून आता तिथे तरल साक्षात्काराचे तेज विलसू लागले होते. धाकट्या बहिणीला ''एवढं मोठं काहीतरी घडलं आणि तरीही कोणीच आपल्याला काही कसं सांगितलं नाही?'' ह्याची चुटपूट लागलेली स्पष्ट दिसत होती. पुढच्या प्रवासात तिने एका हलवायाच्या दुकानाच्या पिछाडीस भांग घोटा पाहून ''मला आत्ताच्या आत्ता भांगेची गोळी पायजेल ऽ ऽ'' म्हणून भर-रस्त्यात भोकाड पसरला आणि आजूबाजूच्या लोकांचे यथेच्छ मनोरंजन केले तो किस्सा वेगळाच!!

आणि मी? लग्नाच्या पंगतीत आधी खास आग्रहाने मागवून घेऊन व नंतर नंतर वाढप्याला निर्लज्जपणे पुकारून खादडलेल्या बर्फ्यांचे एक नव्हे, दोन नव्हे, ते अनेक पांढरे शुभ्र तुकडे मला मोठ्या प्रेमाने माझ्या अवतीभवती ''भांग...भांग'' ओरडत भांगडा करताना पुढचे अनेक दिवस स्वप्नात छळत होते!

--- अरुंधती

मौजमजाप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

लॉरी टांगटूंगकर's picture

1 Jan 2011 - 4:33 pm | लॉरी टांगटूंगकर

बेस्ट
मला पण हवी सफेद वाली मिठाई .पुण्यात कुठे मिळू शकेल का???सहज सोपे असेल तर पा.कृ. टाका

स्वाती२'s picture

1 Jan 2011 - 6:51 pm | स्वाती२

:D

तिमा's picture

1 Jan 2011 - 8:29 pm | तिमा

छान लिहिलंय. फारच मजेशीर प्रसंग!
फार पूर्वी आम्ही एकदा ठरवून भांग प्यायली होती आणि नंतर मी ५-६ पुरणाच्या पोळ्या रिचवल्या होत्या. जेवणानंतर ताटावरच बसलेलो असताना चुलतभाऊ व मी तासभर एकमेकांकडे पाहून हंसत बसलो होतो असे बाकीचे सांगतात. तर वडिल जेवणानंतर गाण्याच्या साथीला गेले आणि गायन व पेटीवादन हे वेगवेगळ्या रागात चाललं होतं म्हणे.

हाहाहा.. अशी नकळत झालेली फजिती आवडली.. बाकी अरुंधती ताईच दर्शन आज बर्याच दिवसांनी घडतय..

- पिंगू

यशोधरा's picture

1 Jan 2011 - 8:37 pm | यशोधरा

हहपुवा

रेवती's picture

1 Jan 2011 - 8:43 pm | रेवती

खी खी खी!
छान लेखन!

सूड's picture

2 Jan 2011 - 8:48 am | सूड

मस्त लेखन !!

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Jan 2011 - 12:21 pm | बिपिन कार्यकर्ते

मजा आली...

विनायक बेलापुरे's picture

2 Jan 2011 - 1:06 pm | विनायक बेलापुरे

हे काय ? झोपूनच राहिलात ?
श्या !!! जागे राहिले असतात तर लोकांची करमणूक तरी झाली असती. :)
आमचे मेहुणे (मावस बहिणीचे मिष्टर) अधून मधून असा प्रसंग आणत असतात.

पण मस्त लिहिलय, जाम मजा आली.

स्वाती दिनेश's picture

2 Jan 2011 - 1:49 pm | स्वाती दिनेश

मस्त किस्सा! मजा आली वाचायला..
स्वाती

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 Jan 2011 - 2:13 pm | निनाद मुक्काम प...

होळीच्या दिवशी आमच्या बटाट्याच्या चाळीतून हौशी मंडळी एक दिवस आधी भांग आणतात .व थंडाई होळीच्या दिवशी बनवतात(आमचा अनंता गोखले पहाटे उठून बदाम पिस्ते चारोळ्या खसखस घेऊन जे काही मिश्रण घोळवतो .) ,नि मग तिचा आस्वाद घेण्यासाठी पंचक्रोशीतून लोक येतात .
पण सध्या भाई काका ह्यांनी वर्णन केल्या प्रमाणे अर्ध्याहून जास्त चाळकरी परदेशात अथवा उपनगरात वास्तव्यास गेल्यामुळे हि प्रथा आजकाल मोडीत निघाली आहे .
आमच्या तळमजल्यावरील पिढ्यानपिढ्या वास्तव्य करणारे महार्ष्ट्रीयान बनिये आणि उत्तरभारतीय आपल्या नवीन पिढीला पिढीजात धंद्यात न टाकता बाबूगिरी करायला प्रवृत्त करत आहेत .
तस्मात हि पिढी सुद्धा आता उपनगरीय झाली आहे .त्यामुळे आता उरल्या आठवणी
आणि त्या ताज्या केल्या ह्या बम बम भोले लेखाने

एकदा परदेशात ह्या गोर्यांना भांग चारावी म्हणतो .
मग पाहूया काय होते ते ..

पंगा's picture

2 Jan 2011 - 9:13 pm | पंगा

एकदा परदेशात ह्या गोर्यांना भांग चारावी म्हणतो .
मग पाहूया काय होते ते ..

जर्मनीतील कायद्याच्या परिस्थितीची मला फारशी कल्पना नाही, पण...

बहुधा (१) ड्रग पेड्लिंग चार्जेसखाली अटक आणि दीर्घ मुदतीचा कारावास, आणि/किंवा (२) डीपोर्टेशन, याहून अधिक फार काही होईलसे वाटत नाही.

(सिंगापूरसारख्या देशांत परिस्थिती यापेक्षा किंचित वेगळी असल्याबद्दल ऐकलेले आहे. निश्चित कल्पना नाही. चूभूद्याघ्या.)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 Jan 2011 - 11:32 pm | निनाद मुक्काम प...

माझ्या मते भांग हि अमली पदार्थात येत नाही .निदान माझ्या माहितीप्रमाणे परदेशातिल अमली पदार्थांच्या सूचीमध्ये भांग हा पदार्थ नसावा
.मुंबईतील मुंबादेवी मंदिराच्या पाठच्या गल्लीत (मरीन द्रैव च्या जवळ ) अनेक दशक भांग खुले आम विकली जाते .
जाणकारांनी ह्यावर अधिक प्रकाश टाकावा .
मुळात ह्या भांगेशी जर अमली पदार्थासोबत नाव जोडले गेले असते( तर ती बेकायदेशीर ठरली असती ) .
तर त्याची किंमत सुध्धा महाग प्रचंड महागली असती. .असा साधा सोपा मध्यमवर्गीय प्रश्न मला पडतो .

पंगा's picture

3 Jan 2011 - 3:31 am | पंगा

माझ्या मते भांग हि अमली पदार्थात येत नाही .निदान माझ्या माहितीप्रमाणे परदेशातिल अमली पदार्थांच्या सूचीमध्ये भांग हा पदार्थ नसावा.

या दुव्यावरील जर्मनी आणि भारताबद्दलची माहिती जरूर वाचावी.

कदाचित हाही दुवा उद्बोधक ठरेल.

शिवाय, भांगेचा स्रोत आणि तिची अमली पदार्थांतील जातकुळी, तिचे भाऊबंद वगैरे लक्षात येण्यासाठी कदाचित या, या आणि यासारख्या दुव्यांचीही मदत होऊ शकेल, असे वाटते.

(अर्थात, आपल्याला - म्हणजे मला - त्यातले काही कळत नाही, त्यामुळे आपले -म्हणजे माझे - म्हणणे कदाचित चुकीचेही असू शकेल हो! अर्थात, तज्ज्ञ यावर जो काय पाडायचा तो प्रकाश पाडतीलच म्हणा!)

(अतिअवांतरः खसखस, अर्थात अफूचे बी, हा पदार्थ भारतात आणि इतर अनेक देशांत बेकायदेशीर नाही. मात्र, संयुक्त अरब अमिरातींत त्याच्या आयातीवर - अगदी थोड्या प्रमाणात, स्वतःच्या वापराकरिता आणि प्रवासी सामानातूनसुद्धा - बंदी आहे, असे ऐकलेले आहे - अर्थात स्वतः त्या बाजूला फिरकलेलो नसल्याने खात्री नाही. मात्र, अमली पदार्थाशी जोडले गेल्यामुळे खसखशीची किंमत वाढल्याचे ऐकलेले तरी नाही. चूभूद्याघ्या.)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 Jan 2011 - 6:21 pm | विश्वनाथ मेहेंदळे

पंगा :- वैनी जर्मन असल्यामुळे निनादभाऊ जर्मन नागरिकही असू शकतात, तसे असेल तर त्यांना परत नाही पाठवणार. चतुर्भुज करू शकतील, तुमचे म्हणणे खरे असेल तर.

निनादभाऊ, कुठलेही संदर्भ शोधण्याच्या भानगडीत पडू नका. वरील दुवे वाचा अथवा वाचू नका. पण माझे एक म्हणणे ऐका, पंत, हा नाद सोडा (शेवटच्या वाक्याचा संदर्भ :- उपास, बटाट्याची चाळ)

मंद्या, दोन्ही स्वाती, तिरशिंगराव, यशोधरा, विनायक, बिपिन, रेवती, निनाद, सुधांशू, पिंगू.... सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! :-)
तिरशिंगराव.... पेटी व गायन वेगवेगळ्या रागात... हा हा हा....

निनाद.... काय सांगताय? हरिद्वार, ऋषिकेशला कधी गेलात तर तिथे भांग, गांजा वगैरे वगैरे घेऊन धुंदफुंद अवस्थेत भटकणारे गोरे हिप्पी दिसतील रात्रीच्या वेळेला.... दिवसासुध्दा दिसतात कधी कधी!

पैसा's picture

2 Jan 2011 - 8:34 pm | पैसा

भांग पिऊन माणूस पहिल्यांदा जे करतो, तेच खूप वेळ करत रहातो म्हणे! रत्नागिरीतल्या एका सुप्रसिद्ध मंडळाच्या गणेशोत्सवात गणेश विसर्जनाच्या आधी मिरवणूक सुरू होताना लेझिम खेळणारे भांग पितात. मग मिरवणूक २ किमी अंतर लेझीम खेळत समुद्रावर पोचली तरी लेझिम वाले दमत नाहीत!

मस्त कलंदर's picture

2 Jan 2011 - 11:09 pm | मस्त कलंदर

होळीच्या वेळी भांग प्यायल्यानंतरचे किस्से उत्तर भारतीय मैत्रिणींकडून ऐकले आहेत. त्यांच्यात तेव्हा तर सगळेच घरी भांग पितात आणि मग कुठली तरी आत्या, कुठले मावसोबा , आणि कुठले आजोबा यांनी कशा गमतीजमती आणल्या होत्या त्या बर्‍याच गोष्टी आठवल्या.
बाकी, अरूंधती ताईचा लेख म्हणजे मेजवानीच असते. त्याबद्दल वेगळे काय बोलावे?

सखी's picture

4 Jan 2011 - 12:14 am | सखी

मस्तच अनुभव!
बाकी, अरूंधती ताईचा लेख म्हणजे मेजवानीच असते. त्याबद्दल वेगळे काय बोलावे?
- अनेकदा सहमत आणि मी वाटही पहात असते.

चिंतामणी's picture

2 Jan 2011 - 11:19 pm | चिंतामणी

मस्त.

गोगोल's picture

3 Jan 2011 - 5:06 am | गोगोल

जबरदस्त आहे. आणि त्याहूनही चांगली या सगळ्या अनुभवाला शब्दबद्ध करण्याची हातोटी.

अरुण मनोहर's picture

3 Jan 2011 - 7:55 am | अरुण मनोहर

खुप वर्षे झालीत असा अनुभव घेऊन! पुन्हा अशा एखाद्या लग्नाला जावे म्हणतो!

शिल्पा ब's picture

3 Jan 2011 - 11:32 pm | शिल्पा ब

धमाल अनुभव...
मलापण भांगेची गोळी पायजे sssssss ल!!!

प्राजु's picture

4 Jan 2011 - 12:09 am | प्राजु

हाहाहा...
मस्त लिहिलं आहेस गं.
एकदम छान.

अरुंधती's picture

5 Jan 2011 - 6:01 pm | अरुंधती

सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार! :-)